स्वेच्छानिवृत्ती
समुद्रापासून फारसं अंतर नसलेलं ते छोटंसं गाव होतं. गावाच्या एका टोकाला जुनं बंदर होतं. दिवसाढवळ्या तिथे मच्छीमारांच्या होड्या ये-जा करत. मालवाहू बोटींचे आवाज घुमत आणि खाऱ्या वाऱ्यासोबत डिझेलचा उग्र वास संपूर्ण परिसरात पसरत असे. देशोदेशींना जाणारे खरेदी विक्रीचे सामान वाहून नेणाऱ्या भल्यामोठ्या मालवाहू नौका, जहाजे बंदरावर ठिय्या ठेवून उभ्या असायच्या. सामान हलवायला हमाल लोकांची पळापळ सुरू व्हायची. पण संध्याकाळ झाली की बंदरावरची लगबग कमी व्हायची. काम जवळपास संपलेलं असायचं आणि गावावर एक वेगळीच शांतता उतरायची.
त्याच छोट्याश्या गावात समुद्राकडे तोंड करून उभ्या असलेल्या जुन्या पण प्रशस्त घरात त्र्यंबकराव निंबाळकर गेली काही वर्षं आपल्या पत्नीसोबत राहत होते. पोलिस दलात तब्बल बत्तीस वर्षं सेवा केल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.
निंबाळकरांना दोन मुली. दोघीही लग्न करून परदेशात स्थायिक झालेल्या. मोठी मुलगी कॅनडात आणि धाकटी जर्मनीत.
दोघींची लग्नं झाली होती. नातवंडंही होती. निंबाळकरांच्या फोनमध्ये त्यांच्या नातवंडांचे फोटो भरलेले होते. कधी व्हिडिओ कॉलवरून त्यांचा आवाज ऐकू आला की कठोर चेहऱ्याचा हा माणूस काही क्षणांत आजोबा बनून जायचा. सेवेत असताना निंबाळकरांना तितका वेळ मिळत नसायचा. दोन्ही मुली जावई निंबाळकरांना आता धावपळ सोडून इथे आमच्याकडे या नातवंडांमध्ये रमा अशा प्रकारची गळ घालायचे. निंबाळकरांना सुद्धा आता निवांतपणा हवा होता. शरीर पाहिल्यासारखं साथही देत नव्हतं. धाकट्या मुलीला नुकतंच एक मुलं झालं होतं त्याच्या नामकरण सोहळ्याला इकडे जर्मनीत यावंच लागेल असा लकडा तिने लावलेलाच होता. सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन निंबाळकरांनी शेवटी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला.
आज त्यांच्या निरोप समारंभाचा दिवस होता.
घराच्या अंगणात सकाळपासूनच लगबग सुरू होती. मंडप उभारला गेला होता. घराच्या भिंतींवर फुलांच्या माळा चढल्या होत्या. अंगणात गावातील मंडळी, नातेवाईक आणि पोलिस दलातील त्यांचे जुने सहकारी येत-जात होते.
निंबाळकर मात्र नेहमीप्रमाणे शांत होते.
पांढरा शुभ्र कुर्ता, त्यावर नेहरू जॅकेट, चेहऱ्यावर वयाची सुरकुती आणि डोळ्यांत अजूनही पोलिसी धार. निवृत्त झाले असले तरी त्या डोळ्यांनी अजूनही समोरच्याला दोन क्षणांत वाचण्याची सवय सोडली नव्हती.
"अहो पाहुणे येतील आता सगळे.. पुढे हॉलमधे जाऊन बसा?" त्यांच्या पत्नीने हसत विचारलं.
निंबाळकरांनी तिच्याकडे पाहिलं.
"हो हो ... पण मी एका माणसाची वाट पाहतोय."
"कोणाची?"
"आहे एक व्यक्ती."
त्यांच्या आवाजात नकळत उत्साह आला.
"हो पण ती व्यक्ती येणार आहे ना?" निंबाळकरांच्या पत्नीने विचारलं.
"बेलाशक.. देशमुख स्वतः म्हणालाय तसं." निंबाळकरांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं.
क्षणभर ते शांत झाले.
"आणि देशमुख येणार नाहीयेत का?" पत्नीने विचारलं.
"देशमुख स्वतः येणार होते. पण एक केस अडली म्हणे. बाहेरगावी जावं लागलं. म्हणून सत्यवीरला पाठवलं."
"तुम्ही त्याला आधीपासून ओळखता?" पत्नीने विचारलं.
निंबाळकर मंद हसले.
"नावानेच नाही... कामानेसुद्धा ओळखतो...फक्त आज त्याला भेटायचा योग्य आला आहे"
त्यांच्या त्या उत्तरानंतर निंबाळकरांच्या पत्नी पुढे काहीही न विचारता स्वयंपाकघरात तयारीला गेली.
निंबाळकर काहीसे तसेच स्वस्थ बसून राहिले.
हळूहळू घरात पाहुण्यांची गर्दी वाढली होती. एका बाजूला निंबाळकरांचे भाऊ, पुतणे आणि इतर नातेवाईक बसले होते. दुसऱ्या बाजूला पोलिस दलातील त्यांचे जुने सहकारी गप्पा मारत होते. खाण्याची ताटे टेबलावर ठेवली जात होती. काही लोक कोपऱ्यात ड्रिंक्स घेत उभे होते. पण निंबाळकर सगळ्यांचं आदरतिथ्य पाहत होते. पण त्यांची नजर अजूनही दरवाजावर खिळलेली होती.
काही वेळात गेटच्या समोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. गाडीतून एक उंच, शरीराने मजबूत असा तरुण खाली उतरला.
साधा डार्क निळा शर्ट, ऑफ व्हाईट पॅन्ट आणि हातात एक छोटी बॅग.
चेहऱ्यावर कोणताही विशेष भाव नव्हता. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. समोर बंदर होतं.
दूरवर काही मच्छीमारीच्या होड्या हेलकावत होत्या. खाऱ्या वाऱ्याची झुळूक त्याच्या चेहऱ्यावर आली. त्याने घड्याळात पाहिलं.
संध्याकाळचे पाच वाजले होते. तो घराच्या दिशेने चालू लागला. दारापाशी पोहोचताच आतून आवाज आला.
"या या ...सुस्वागतम" त्र्यंबकराव स्वतः दारापर्यंत आले होते.
दोघांची नजरानजर झाली.
क्षणभर निंबाळकरांच्या चेहऱ्यावरचा कडकपणा नाहीसा झाला.
"गुप्तहेर सत्यवीर" अतिशय सौम्य आवाजात त्यांनी हाक मारलेली होती.
"नमस्कार निंबाळकर साहेब."
सत्यवीरने आदराने वाकून नमस्कार केला. निंबाळकरांनी त्याला तसं करू न देता वरचेवर त्याचा हात घट्ट धरला.
"साहेब नाही रे आता. निवृत्त झालो."
"तुम्ही निवृत्त झाला म्हणून सवय थोडी बदलणार आहे."सत्यवीर हलकंसं हसला.
निंबाळकर मोठ्याने हसले.
"अगदी देशमुखांसारखं बोलतोस...असायला हवा होता इथे तो"
"हो पण एका केससंदर्भात बाहेरगावी जावं लागलं त्यांना."
"हो हो... सांगितलं मला त्याने"
निंबाळकर सत्यवीरला घरात घेऊन आले.
"देशमुख पोलीस अकादमीमध्ये सामील झाला तेव्हा त्याचं ट्रेनिंग मीच घेत होतो... मोठा उमदा आणि मेहनती तरुण.. आजही कर्तव्यनिष्ठा बजावत आहे.. जेव्हा जेव्हा त्याला फोन करतो तेव्हा तुझ्याबद्दल तर भरभरून बोलत असतो. एकदा तुला भेटायचचं होतं.. मला आनंद आहे तू आज आलास. "निंबाळकरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
सत्यवीरने त्यांच्या डोळ्यांकडे पाहिलं. त्या नजरेत फक्त आनंद नव्हता. प्रेमभावाची झलक होती.
निंबाळकरांनी सत्यवीरची ओळख आलेल्या सगळ्या पाहुण्यांना करून दिली. सत्यवीर थोडंसं लाजतच तिथे बसला. लगेचच बाजूच्या वेटरने एका थाळीत ड्रिंक्स घेऊन त्याला ऑफर केली. प्रवासाने शिणवल्याने सत्यवीरने एक पेग उचलला आणि घोट घेतला तसं त्याला बरं वाटलं.
दुसऱ्या बाजूला पोलिस दलातील त्यांचे जुने सहकारी गप्पा मारत होते. कुणी जुन्या आठवणी सांगत होतं.
कुणी निंबाळकरांच्या धाडसी कारवायांचा उल्लेख करत होतं. तर कुणी त्यांच्या स्वभावातील कडकपणाच्या मजेदार आठवणी सांगत होतं.
"तुमच्या साहेबांनी मला एकदा मध्यरात्री स्टेशनवर बोलावलं होतं," एक वयस्कर पोलीस अधिकारी हसत सांगत होता, "आणि कारण काय तर माझे बूट चकाकत नव्हते!"
सगळे हसले.
निंबाळकरांनी दूरूनच त्याच्याकडे कटाक्ष टाकला.
"तेव्हा बूट चकाकवले असते तर आज निवृत्तीच्या कार्यक्रमात ही गोष्ट सांगावी लागली नसती."
पुन्हा हशा पिकला.
सत्यवीर मात्र शांतपणे सगळं निरीक्षण करत होता.
घर, लोक... त्यांची ये-जा.. प्रत्येक चेहरा... प्रत्येक आवाज.
त्याची नजर अधूनमधून खिडकीबाहेर जात होती. खिडकीच्या पलीकडे बंदर दिसत होतं. निंबाळकर साहेब सगळ्यांना बोलत होते.
"आता घराकडे लक्ष द्यायला हवं," ते आपल्या जुन्या मित्रांकडे पाहत म्हणाले.
"म्हणून निवृत्ती?"
"हो."
ते खिडकीजवळ गेले.
"बत्तीस वर्षं पोलिसात घालवली. चोर, गुन्हेगार, राजकारणी, अधिकारी... सगळ्यांचा पाठलाग केला."
क्षणभर ते समुद्राकडे पाहत राहिले.
पण आता वाटतं. स्वतःच्या आयुष्याचा थोडा पाठलाग करायला हवा. मुली म्हणतात बाबा आता तुम्ही आणि आई आमच्याकडे राहायला या. नातवंडांसोबत वेळ घालवा." निंबाळकरांच्या आवाजात मऊपणा आला.
"तुम्ही निर्णय योग्य घेतलात." एक जण म्हणाला.
निंबाळकरांनी त्याच्याकडे पाहिलं.
"आपल्या पोलिसांना देखील कुटुंब असतात कधीकधी आपल्यालाच याचा विसर पडतो. कुटुंबाकडेसुद्धा लक्ष द्यायला हवं"
"खरं आहे अगदी" दुसऱ्या एकाने दुजोरा दिला.
सत्यवीर त्यांचं बोलणं ऐकून हलकंसं हसला.
संध्याकाळ सरत चाललेली होती. कार्यक्रमासाठी सगळे अंगणात जमले. मंचावर निंबाळकरांचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देण्यात आलं.
एका जुन्या सहकाऱ्याने भाषण करताना म्हटलं- "त्र्यंबकराव निंबाळकर हे फक्त अधिकारी नव्हते. ते एक शिस्त होते. सगळ्या डिपार्टमेंटसाठी प्रेरणास्थान होते "
टाळ्यांचा कडकडाट झाला. निंबाळकरांनी हात जोडले.
त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. सत्यवीर मागच्या रांगेत उभा राहून सगळं पाहत होता.
कार्यक्रम संपल्यानंतर लोक पुन्हा गप्पांमध्ये रमले. काहीजण पुन्हा एकदा ड्रिंक्स घेऊ लागले.
तेवढ्यात एक व्यक्ती गेटमधून घरात आली. तिच्या चेहऱ्यावर तणाव आणि थकवा स्पष्ट दिसत होता. तिच्या अंगावर पोलिसांचा गणवेश होता म्हणजेच ती व्यक्ती ऑन ड्युटी होती. खांद्यावरचे स्टार्स धुळीने माखलेले. बूटांवर रस्त्याची माती. चेहऱ्यावर प्रचंड थकवा आणि डोळ्यांत अस्वस्थता.
तो थेट घराकडे आला. निंबाळकरांनी त्याला पाहताच ओळखलं.
"शौनक... ये ये"
"नमस्कार सर."
शौनक दासगुप्ताने सलाम केला.
निंबाळकरांनी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं.
"काय झालं?"
शौनकने एक क्षण आजूबाजूला पाहिलं.
"सर... दोन मिनिटं बोलायचं होतं."
निंबाळकरांच्या चेहऱ्यावरचा उत्साह नाहीसा झाला.
"चल."
दोघे घराच्या एका बाजूला गेले.
शौनक दासगुप्ता. स्थानिक पोलीस ठाण्याचा इन्स्पेक्टर.
निंबाळकर सेवेत असताना तो त्यांना जुनिअर होता. त्याच्या अनेक तपासांत त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं होतं. पण आज परिस्थिती वेगळी होती. निंबाळकर निवृत्त झाले होते आणि शौनक आजही ड्युटीवरून थेट इथे आला होता. म्हणजे प्रकरण गंभीर असणार होतं.
सत्यवीरने दोघांकडे पाहिलं.
शौनक काहीतरी सांगत होता. निंबाळकर मध्येच प्रश्न विचारत होते.
एकदा शौनकने खिशातून कागद बाहेर काढला आणि काहीतरी दाखवलं.
निंबाळकरांचा चेहरा क्षणभर बदलला. ते काहीतरी गंभीरपणे म्हणाले त्यावर शौनकने मान खाली घातली.
काही मिनिटांनी निंबाळकरांनी अचानक सत्यवीरकडे पाहिलं.
"सत्यवीर.. जरा इकडे येतोस का?"
सत्यवीर पटकन जागचा उठला आणि त्यांच्या दिशेने गेला.
निंबाळकरांनी दोघांची ओळख करून दिली.
"सत्यवीर.. हा शौनक दासगुप्ता. आपल्या इथल्या ठाण्याचा इन्स्पेक्टर.,,आणि शौनक हा गुप्तहेर सत्यवीर.
तुझ्यासारखाच माझा एक जुनिअर ऑफिसर आहे देशमुख नावाचा.. त्याचा हा मित्र. ज्या ज्या केसमधे देशमुखची मती कुंठित झाली तिथे यानेच केसचा छडा लावला. असा हा एक हुशार गुप्तहेर"
शौनकने हात पुढे केला. सत्यवीरने हसून हात मिळवला
"सत्यवीर शौनक सध्या एका विचित्र आणि गुंतागुंतीच्या केसमध्ये अडकला आहे. सेवेत असताना त्याला माझी मदत घेणं सोपं जायचं पण आता मी निवृत्त झालोय त्याला माझी फारशी मदत होणं अवघड झालंय" निंबाळकर म्हणाले.
"शौनकच्या हातात असलेली विलक्षण केस तुही ऐकावी असं मला वाटलं म्हणून तुला मगाशी हाक मारली... शौनक... सुरुवातीपासून सांग" निंबाळकरांनी मात्र वेळ न दवडता विचारलं
"ठीक आहे सर..." शौनकने खोल श्वास घेतला आणि बोलू लागला.
"एक विलक्षण खून झालाय." खोल आवाजात शौनक म्हणाला.
===============================================================
पुलेशु
पुलेशु
छान चालु आहे.
छान चालु आहे.
छान सुरुवात आहे, पुलेंशु.
छान सुरुवात आहे, पुलेशु.