राजवाड्यातले बालपण (समाप्त)

Submitted by -शर्वरी- on 13 September, 2026 - 19:32

राजवाड्यातले बालपण (१)
https://www.maayboli.com/node/88793

राजवाड्यातले बालपण(२)
https://www.maayboli.com/node/88807

भाग ३

हॉस्टेलच्या पलिकडे भाजी मंडई होती. एवढी सुंदर दगडातून बांधलेली मंडई. तेंव्हा मला ताज्या भाज्या, पालेभाज्या यांचे अप्रूप वाटत नसे. पण तरी ही मंडई मला तेंव्हाही आवडली होती. भाजी विकणाऱ्या मावशी, काका वर जोत्यावर बसत, चालणाऱ्या गिऱ्हाईकाला भाज्या निवडताना खाली वाकायला लागत नसे. मला हे फार आवडायचे. किती विचारपूर्वक बांधकाम केले आहे असे तेंव्हाही वाटायचे.

या मंडईमुळे आमच्याकडे फार उंदीर होते. घुशी पण. आम्ही तिघेही उंदराला घाबरायचो. उंदीर दिसला की पळापळ सुरु. मी तर स्वयंपाकघर ते बेडरूम धूम पळत सुटायचे. पटकन बेड वर, टेबलवर, झोक्यावर चढून बसायचे. माझ्या बहिणीचे केस लांब, सुंदर होते. रात्री झोपताना ती केस बेड वरून खाली सोडून झोपायची. एक दिवस सकाळी ती ओरडतच उठली. तिचे केस उंदराने कुरतडले होते!

बाथरूम मध्येही त्यांचा मोकळा वावर होता. बरं हे उंदीर लहान नव्हते. चांगले मोठे, माजलेले उंदीर असत. एकदा तर माझा पाय पकडला होता एका उंदराने.आता आईने उंदरांचा बंदोबस्त करायचा ठरवले. सगळी बीळं बुजवून टाकली. ठिकठिकाणी औषधाच्या गोळ्या ठेवल्या. मग आम्हाला कुठे कुठे हे मेलेले उंदीर सापडायला लागले. सापडले नाहित तर काही दिवसांनी वास यायचा, मग आम्ही त्यांना शोधून काढायचो. नाक बंद करून सुपलीत भरून लांब टाकून यायचो. हे करताना प्रचंड आरडाओरड चालायची. एखादा उंदीर घरात घुसला तर आम्ही नाकेबंदी करायला लागलो. त्याला बाहेर काढणे ह्यात आई आणि दादा प्रविण झाले. ते दोघे तर हाॅकी खेळावे त्या सहजतेने उंदराला स्पर्श न करता काठीने बिळात ढकलत असत. मी आणि बहिण बेडवर चढून उंदिर कुठे गेला किंवा कुठे चाललाय याचे धावते समालोचन करायचो. बाबा आले की चाराचे सहा हात होत.आम्ही ५ आणि उंदीर सगळ्यांचा मिळून खुप दंगा चालायचा. पुढे बहुतेक उंदरांना कळून चुकले की इथे काही सुखाने राहता येणार नाही. कालांतराने उंदिर बरेच कमी झाले, आम्ही जरा सुखाचा श्वास घेतला.

या काळात आई आम्हाला खुप पुस्तके वाचून दाखवायची. आनंद यादवांचे नांगरणी, झोंबी, विश्वास पाटलांचे झाडाझडती. कोसला पुस्तकातील पांडुरंग सांगवीकरच्या उंदरांच्या शिकारीचे सविस्तर वर्णन वाचून आम्ही फार हसलो होतो ते अजूनही आठवतंय.

आई घरी कोणतेही फळ आणले की तीन समान वाटें करायची. दादाला फळे खुप प्रिय. एकदा आईने द्राक्षे ३ डब्ब्यात ठेवली. भावाने त्याच्या वाटणीची खाऊन संपवली. मी आणि बहिण पुरवून, सावकाश खाणार. मग आम्ही आमची लपवून ठेवली. दादा सगळीकडे शोधाशोध करत होता. ताईने तिच्या वाटणीची द्राक्षे डब्यात घालून कपाटावर लपवून ठेवली. २-३ तासांनंतर ताईने जेंव्हा डबा उघडून पाहिला तेंव्हा उंदरांनी त्यातली द्राक्षे पळवली होती. होय, उंदरांनीच पळवली होती. कारण त्यांनी डब्यात चिठ्ठी सोडली होती की तुमची द्राक्षे उंदरांनी पळवली आहेत!

दादा त्याच्या शाळेत NCC मध्ये होता. पण ते नंतर. तोपर्यंत आम्ही NCC च्या मुलांच्या आणि त्यांच्या सरांच्या नाकी दम आणला होता. शाळेच्या मैदानावर NCC च्या कवायती होत. आम्ही त्या कवायती पहात पायरीवर बसायचो. एका लयीत, एका शिस्तीत हलणारे हात-पाय बघायला मजा यायची. या विद्यार्थ्यांना लीड करणारे एक-दोन कॅडेट असायचे. तर ते तोंडाने काही विशिष्ट आवाज करत. डावी कडे, उजवीकडे वळ वा त्यांचे काही अर्थ असावेत. कारण त्यानुसार ती मुले वळायची. पायरीवर बसून शहाणे बहिण भाऊ शिस्तप्रिय कवायत बघतात वै नरेटिव्ह सेट झाले होते. काही दिवसांनी व्हरांड्याच्या भिंतीआड बसून तोंडाने ते आवाज काढणे, ही फारच भारी आयडिया दादाला सुचली. मग पोरांची कवायत सुरु झाली की काही डावीकडे वळत, काही उजवीकडे. शिस्तीचे बारा वाजले. सैन्यात गोंधळ उडाला. सुरुवातीला आम्ही जपून आवाज काढायचो. भीड चेपली तशी फ्रिक्वेंसी वाढली. गोंधळही वाढला. शहाणे बहिण भाऊ आगाऊच आहेत हे सगळ्यांना समजले असणारच. आम्ही दिसायचो नाही आणि त्यात मुख्याध्यापकांची मुले! नंतर आईच्या धाकाने आम्ही पुढे हे उद्योग बंद केले.

शाळेतील NCC च्या मुलांच्या छऱ्याच्या बंदुका घरी असत. आम्हाला त्यांना हात लावायची सक्त मनाई होती. तरीही भाऊ एखादी बंदूक आणायचा. त्यात छर्रे नसायचे. बहुतेक ते NCC चे सर दुसरीकडे ठेवत असत. मग दादाने त्याच्या सुपिक डोक्यातून एक कल्पना लढवली. छर्र्या सारखे गोल, छोटे दगड गोळा करुन आणले, बंदुकीत भरले आणि झाडांच्या पानांवर निशाणाबाजीचा सराव सुरू केला. नंतर बंदुक लोड करून एक प्रयोग माझ्या हातावर केला. अजुनही ती आठवण माझ्या हातावर आहे. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे परत कधी बंदुका घरी दिसल्या नाहीत.

लिहिण्यासारखे खुप आहे. एकदा आठवणींच्या या राजवाड्यात उतरले की किती काय काय सापडते! सगळेच काही मौल्यवान असेल किंवा रंजक असेल असे नाही. माझ्यासाठी आहे, पण इतरांसाठी? मग आठवणींची जंत्री देण्यात काय अर्थ? जुनी जाणती लोकं म्हणतात की अन्न आणि काळाबद्दल अतृप्ती नसावी. अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करावे. नावे न ठेवता. काळाचेही तसेच. आजच्या काळात जगताना भूतकाळात किती रमावे? ते योग्य नव्हे.

१६-१७ व्या वर्षी जेंव्हा हॅरी पॉटर वाचायला लागले तेंव्हा माझ्या मनातले Hogwarts म्हणजे हा राजवाडा होता. त्या पूर्वी सुद्धा हा राजवाडा होताच. ही शाळा होतीच. Dumbledore ने त्याच्या pensieve मध्ये आठवणींचा एखादा रुपेरी धागा सोडावा तशी ही माझी रुपेरी आठवण. इथे मला आई भेटते म्हणून अधिकच प्रिय.

इथे कसली जादू नाही. इतक्या पुरातन वाड्यामध्ये राहूनसुद्धा एकही भूत दिसले नाही ना त्याची चाहूल लागली. गेला बाजार एखादा सापही दिसला नाही. आम्ही ते घर सोडल्यावर नविन मुख्याध्यापक जेंव्हा तिथे पोचले तेंव्हा याच घरात ३ नाग त्यांना दिसले. आम्ही ४ वर्षे रात्री बेरात्री आत बाहेर केले. भिंतींवरुन चढून घरात उड्या घेतल्या, जमिनीवर झोपलो, कोंबड्या पाळल्या, सरपण साठवली पण कधीही आम्हाला भीतीचा स्पर्श झाला नाही. कदाचित आम्ही अज्ञानी होतो. कदाचित बेसावध. पण आमचे रक्षण करणारी शक्ती होती. ती माझी आई होती की आईची पाठीराखण करणारी आई भवानी होती, माहीत नाही.

चार वर्ष आम्ही इथे राहिलो. माझी आई खरंच कशी होती ते मला पहिल्यांदा इथे समजले. काय केलेले तिला आवडते, कसे वागले की ती रागवते, केंव्हा लाड करते आणि केव्हा अबोला धरते ते सारे इथे मला समजले. त्या आधी मला माहित नव्हते की आईला काय आवडते. ती कशी आहे. तिच्या व्यग्र नोकरी-कामामध्ये ती जेऊ खाऊ घालायची. माया करायची पण बरोबर नसायची. बाबा तेंव्हा इतके जवळचे होते की आईचे नसणे फारसे जाणवायचे नाही. पण तिला जाणवत असणार! साताऱ्यात आल्यावर तिला आमच्यासाठी वेळ मिळू लागला. ती आमच्याबरोबर रमली.

त्यामुळे राजवाड्याशी निगडीत प्रत्येक आठवणीच्या फ्रेम मध्ये आई आहेच. हा लेखनाचा धागा त्या रुपेरी आठवणीचा पण धागा आहेच ज्यात सगुण आई भेटते.

————-समाप्त —————

-शर्वरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डब्यात चिठ्ठी - द्राक्षे उंदरांनी पळवली 😁 हाऊ क्यूट !

सुंदर लिहिले आहे, आणि जास्त न रेंगाळता योग्य जागी थांबलात. बेस्ट.

अहा !! सुरेखच आहेत आठवणी एका दमात तीनही भाग वाचले.. अजून अजून वाचावे असे वाटत होते / आहे.
या भागातील NCC कवायतींचा किस्सा भारीच.. बंदुकीचा डेंजर एकदम!
आई तुम्हला पुस्तक वाचून दाखवायची याचा हेवा वाटला!
उंदराने लिहिलेली चिठ्ठी Lol
वाचताना मला शांता शेळकेंच्या चौघीजणी पुस्तकाची आठवण झाली बऱ्याचदा..
(तुम्ही ज्या शाळेबद्दल लिहिलंय त्यात शिकणारी माझी एक fb frd आहे )

आठवणींचा खजिना रिता केला आहे

आनंदी आणि निरोगी रहा _/\_

अतिशय हृदयस्पर्शी, हळुवार लेखन. तीनही भाग वाचून जुन्या आठवणींच्या राजवाड्यात आपणही फेरफटका मारून आलो असं वाटलं.

किती तरल लिहिले आहे. खूप छान वाटले तुमच्याबरोबर राजवाड्याची, त्या काळची सफर करून. लिहित रहा तुम्ही, आवडेल वाचायला.

डब्यात चिठ्ठी - द्राक्षे उंदरांनी पळवली >> हे फारच मस्त होते Lol

NCC च्या आठवणी पण आवडल्या.

तीनही लेख आवडले.

तुम्ही हे लेखन वाचले, मला तुमच्याबरोबर माझ्या बालपणातील काही भाग share करता आला, तुम्हाला तो आवडला, सर्वांचे आभार!