माझी गोष्ट - एका बदलाची सुरुवात

Submitted by छायाप्रभा on 8 September, 2026 - 02:56

ही माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे
माझं माहेर आणि सासर दोन्ही तळकोकणातलं. माहेरी ज्या वातावरणात वाढले, त्याहून फार वेगळं वातावरण सासरी नव्हतं. घरच्या रीती, सणवार, माणसांची ये-जा आणि बायकांच्या वाट्याला येणाऱ्या जबाबदाऱ्या, सगळं परिचयाचंच होतं. त्यामुळे सासरच्या एकत्र कुटुंबात रुळायला मला फार वेळ लागला नाही. हळूहळू त्या घरातली माणसं, त्यांच्या आवडीनिवडी आणि रोजची कामं हेच माझं जग झालं.

घर सांभाळताना माझ्या शिकवण्याही सुरू होत्या. त्यात दिवसाचा बराच वेळ जायचा. घरात माझ्या हातच्या जेवणाचं कौतुक होत असे आणि बाहेर ‘शिकवणीच्या बाई’ म्हणून आदर मिळत असे. या जगण्यात मी समाधानी होते. आपल्यावर घरच्यांचा विश्वास आहे, तो जपावा, एवढंच मनापासून वाटायचं.

तेव्हा आमच्याकडे विवाहित बायकांनी साडीखेरीज दुसरे कपडे घालणं दिसत नसे. छोट्या शहारत एखादी डॉक्टरबाई किंवा श्रीमंत घरातली स्त्री पंजाबी ड्रेस घालायची. तिच्या कपड्यांचा बायकांच्या गप्पांत उल्लेख व्हायचा. त्यात कुतूहल असे, कधी नापसंतीही असे; पण ती काहीतरी वेगळं करते आहे, अशीच भावना असायची. ९० च्या दशकांत मुंबईत बऱ्यापैकी बदलणं सुरुवात झालेली , तिला पाहून आपणही तसं करावं, असं माझ्या मनात येत नसे. तिचं राहणं वेगळं, आपलं वेगळं, एवढंच वाटायचं.

लग्नापूर्वी कॉलेजला जाऊ लागले, तेव्हापासून मी साडी नेसत होते. त्याकाळात साडी नेसणे हीच एक रूढ पद्धत होती आणि सासरीही सगळ्या विवाहित बायका साडीच नेसायच्या. काम करताना, बाहेर जाताना, रात्री झोपतानासुद्धा. त्यासाठी कुणाला रोज सांगावं लागत नसे. आम्ही सगळ्याच तशा राहत होतो. दुसरे कपडे घालण्याची इच्छा असून ती दाबून ठेवली होती, असंही नाही. साडी इतकी अंगवळणी पडली होती की तिच्याशिवाय स्वतःची कल्पनाच कधी केली नव्हती. विशेष म्हणजे दुसरं काही कुणाला माहित नव्हतंच. ह्या पिढीला हे सगळं विचित्र वाटेल .

मुलगा कॉलेजसाठी मुंबईला गेला आणि माझ्या या नेहमीच्या आयुष्यात मुंबईच्या फेऱ्या सुरू झाल्या. तो पहिल्यांदाच घरापासून दूर, हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याची काळजी वाटायची, भेटावंसं वाटायचं. मुंबईत भावाचं घर होतं. भाऊ कामानिमित्त परदेशात असे. घरी त्याची बायको सुनीता आणि मुलगी प्राजक्ता असायच्या. मी गेले की आठवडा-दोन आठवडे त्यांच्याकडे राहायचे.

सुनीता मला आदरानं ‘ताई’ म्हणायची; पण आमच्यात मोकळेपणा होता. ती बोलकी होती. तिच्याजवळ बसलं की गप्पांत वेळ कसा जायचा कळत नसे. प्राजक्ता अभ्यासात रमलेली असायची. आम्ही दोघी घरातली कामं करता करता बोलायचो. माझ्या येण्यानं तिलाही सोबत व्हायची आणि मलाही माहेरच्या माणसांत राहिल्याचं समाधान मिळायचं.

सुनीता मुंबईतच लहानाची मोठी झालेली. स्वतःला काय पटतं, काय सोयीचं वाटतं, याचा विचार करून राहणारी. आमच्या गावच्या घरात कोणती पद्धत आहे म्हणून मुंबईतही तसंच राहिलं पाहिजे, असं तिला वाटत नसे. घरी ती बहुतेक वेळा गाऊन घालायची. त्यासाठी रात्र व्हायची वाट पाहण्याचा प्रश्नच नव्हता. साडी नेसली, तरी कधी स्लीव्हलेस ब्लाऊज घालायची. तिच्यासाठी या गोष्टी इतक्या साध्या होत्या की कुणाला त्याबद्दल काही वाटेल, याची ती फिकीर करत नसे.

मला तिचं हे राहणं वेगळं वाटायचं. मुंबईत राहणाऱ्या माझ्या दोन्ही नणंदा साडीच नेसायच्या. इतर नातेवाइकांकडेही तेच दिसायचं. सुनीता मात्र एखादी पद्धत जुनी आहे, घरात पाळली जाते, एवढ्यासाठी ती मान्य करत नसे. गप्पांत अशा गोष्टी निघाल्या की ती थेट प्रश्न विचारायची. मी कधी हसून टाळायचे, कधी “आपल्याकडे असंच आहे गं,” असं म्हणायचे. तिला मात्र ते उत्तर पुरेसं वाटत नसे.

गाऊन घालण्याचा विषय तिनं काढला, तेव्हा तिचा हा स्वभाव अधिकच जाणवला. रात्री झोपताना गाऊन घालून पाहा, असं ती म्हणाली आणि मी लगेच नकार दिला. मला साडीचीच सवय आहे, असं सांगितलं. त्यावर ती म्हणाली, “सवय आहे म्हणून दुसरं काही घालून बघायचंच नाही का, ताई?”

मी विषय टाळला. तिनं गाऊन काढून दाखवला, तरी घेतला नाही. त्या पहिल्या आग्रहाच्या वेळी मी तो घातलाच नाही. तिनं ठेवून दिल्यावर बरं वाटलं. पण पुढे ती पुन्हा समजावू लागली, तेव्हा माझी खरी अडचण सांगावी लागली.

“ह्यांना अजिबात आवडणार नाही, सुनीता. घरात कुणालाच आवडणार नाही.”

हे ऐकल्यावर तिच्या बोलण्याचा सूर बदलला. माझ्यावर चिडली नव्हती; पण अशा गोष्टीसाठीही मला घाबरावं लागतं आहे, याचा तिला राग आला होता. “झोपताना तुम्ही काय घालायचं, तेही सगळ्यांच्या आवडीचं हवं? तुम्हाला कशात बरं वाटतं, त्याला काही किंमत आहे की नाही?” ती विचारत होती. “साडी नेसली की घरची रीत जपली आणि गाऊन घातला की बिघडली? हे कसले नियम करून ठेवलेत!”

तिचे प्रश्न ऐकताना मला अस्वस्थ वाटत होतं. इतकी वर्षं ज्या गोष्टींना प्रश्नच विचारला नव्हता, त्यांच्याबद्दल ती इतकं स्पष्ट बोलत होती. तिच्या मनात अशा बंधनांविषयी तिटकारा होता. मला मात्र त्या आपल्या घरच्या रीती वाटत होत्या. त्यांच्याविषयी असं बोलणं ऐकतानाही नकळत घरच्यांची बाजू घ्यावीशी वाटायची.

“अगं, पण सगळ्याच तशा राहतात आपल्याकडे,” मी म्हटलं. त्यावर ती म्हणाली, “म्हणून तुम्हालाही तसंच राहिलं पाहिजे? एखादी गोष्ट सगळ्या जणी करतात म्हणून ती बरोबरच असते का?”

तिच्याजवळ उत्तरं होती. माझ्याजवळ भीती होती. ह्यांना समजलं, तर त्यांना राग येणार, हे ठाऊक होतं. घरातल्या इतर बायका तीच रीत पाळत असताना मी त्यांच्या नकळत वेगळी वागले, तर विश्वास मोडल्यासारखं होणार नाही का? मुंबईला आले म्हणून मला वेगळी मुभा मिळाली होती का? सुनीताला हे कपड्यांचं बंधन वाटत होतं; मला त्यात घरच्यांचा मान गुंतलेला दिसत होता.

एक गोष्ट मात्र माझ्या बाजूनं होती. मुलगा मुंबईत असला, तरी तो हॉस्टेलमध्ये राहत होता. सुनीताकडे रोजच्या राहण्यात तो नव्हता. त्यामुळे घरात मी कशी वावरते, हे त्याला सहज कळण्याचा प्रश्न नव्हता. त्याच्या भेटी वेगळ्या असायच्या. तो इथंच राहत असता, तर त्याच्यासमोरही मला धीर झाला नसता. त्याची प्रतिक्रिया काय असेल, हे माहीत नव्हतं; पण सुनीताच्या घरी आम्हा तिघींचंच असणं मला थोडा आधार देत होतं.

बराच आग्रह झाल्यानंतर अखेर एका रात्री मी होकार दिला. त्यात हौस नव्हती. तिचं म्हणणं एकदा ऐकून पाहावं आणि लगेच साडी नेसावी, एवढाच विचार होता. रात्रीची कामं आटोपली होती. मी गाऊन घेऊन बेडरूममध्ये गेले. तो घालून तिच्याजवळ येणार होते. आत जाईपर्यंत तेवढं तरी जमेल असं वाटत होतं.

पण प्रत्यक्ष अंगावर घातल्यावर कसंतरीच झालं. सवयीनं हात खांद्याकडे गेला. पदर नव्हता. अंग पूर्ण झाकलेलं असूनही काहीतरी कमी असल्यासारखं वाटत होतं. आरशात पाहिलं, तर नजर टिकेना. गाऊन पुढून, बाजूनं सारखा करून पाहिला. काही बिघडलं नव्हतं; पण त्या रूपात स्वतःला पाहण्याचीच माझी तयारी नव्हती.

आता सुनीतासमोर जायचं होतं. ती आपल्याकडे पाहील, या कल्पनेनंच संकोच वाटत होता. तिनं एवढा आग्रह केला होता, त्यामुळे ती हसणार नाही हे माहीत होतं. तरी तिच्यापुढे असं उभं राहणं जमत नव्हतं. बाहेर यायचं ठरवून आत गेले होते आणि आता पुन्हा साडी नेसूनच बाहेर जावं, असं वाटू लागलं. इतर कुणाचं राहू दे, माझ्या वहिनीसमोर यायलाही धीर होत नव्हता.

मी बाहेर आले नाही म्हणून ती विचारायला आली. तेव्हा तिला माझी अवस्था सांगितली. ती आत आली, तरी तिच्याकडे सरळ पाहता येत नव्हतं. आपण फार विचित्र दिसतो आहोत का, असं तिला विचारलं. रूढींविषयी इतकं ठामपणे बोलणारी सुनीता त्या वेळी मात्र शांतपणे माझ्याजवळ बसली. तिनं थट्टा केली नाही. खूप कौतुक करून आणखी अवघडवलंही नाही. नेहमीसारखं बोलत राहिली.

तिच्या त्या साध्या वागण्यामुळे थोडं बरं वाटलं. नंतर तिच्याबरोबर बाहेर आले; पण बसतानाही अंग चोरल्यासारखं होत होतं. हात मांडीवर ठेवून गप्प बसले होते. एरवी मुलांना शिकवताना, त्यांच्या पालकांशी बोलताना माझा आवाज ठाम असायचा. इथं मात्र सुनीतानं काही विचारलं की थोडक्यात उत्तर द्यायचे. अंगावरच्या एका कपड्यामुळे आपण इतकं बुजू शकतो, याचंच वाईट वाटत होतं.

झोपताना शरीराला मात्र आराम जाणवला. कमरेभोवती मोकळं वाटत होतं. कूस बदलताना साडी सावरावी लागत नव्हती. पण मनातली भीती तशीच होती. बरं वाटतं आहे, हे मान्य करतानाही अपराधी वाटत होतं. पहाटे उठल्यावर आधी साडी नेसली आणि मगच बाहेर आले.

पुढचे काही दिवस कधी गाऊन घातला, कधी साडीच नेसले. सुरुवातीला सुनीता सांगायची. पण हळूहळू तिच्यासमोर गाऊनमध्ये बसताना पहिल्या रात्रीसारखं होत नव्हतं. गप्पांत लक्ष जाऊ लागलं. काही काम असेल, तर उठून करू लागले. रात्रीपुरता तो अंगवळणी पडू लागला होता.

एका सकाळी उठून अशीच चहाला जाऊन बसले. अंघोळ अजून व्हायची होती. काही वेळानं लक्षात आलं की आज साडी नेसलेलीच नाही. क्षणभर उठावंसं वाटलं; मग चहा संपवून अंघोळीला जाऊ, असं ठरवलं. सुनीता आणि प्राजक्ताच्या वागण्यात काही बदल नव्हता. मला जाणवत असलेल्या गोष्टीकडे त्यांचं विशेष लक्षही नव्हतं.

पुढे सकाळी उठल्याबरोबर कपडे बदलण्याची घाई कमी झाली. चहा होईपर्यंत, घरातलं एखादं काम होईपर्यंत गाऊन अंगावर राहू लागला. अंघोळीनंतर साडी नेसायचे. त्यासाठी वेगळं काही ठरवलं नव्हतं. रोजच्या जगण्यात ते आपोआप घडत गेलं.

एका संध्याकाळी बाहेरून दमून परतल्यावर गाऊन घातला. आता कुठं जायचं नव्हतं. घरात जरा निवांत राहावंसं वाटत होतं. त्या वेळी सुनीतानं सांगितलं नव्हतं. स्वतःच ठरवलं होतं. बाहेर आले आणि नेहमीच्या कामांत मिसळले. कुणी काही म्हटलं नाही. त्या रात्री झोपेपर्यंत पुन्हा साडी नेसली गेली नाही.

अशा छोट्या प्रसंगांतून सवय वाढत गेली. दुपारी विश्रांतीसाठी गाऊन घातला, तर उठल्यावर लगेच बदलला गेला नाही. कधी अंघोळीनंतरही घरातच राहायचं म्हणून गाऊन घातला. त्यात काम करताना किंवा सुनीताशी बोलताना स्वतःच्या कपड्यांची जाणीव कमी होऊ लागली. माझ्यापुरती मोठी असलेली ही गोष्ट त्या घरात कुणासाठी विशेष नव्हती. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला सावरत बसण्याची गरजही हळूहळू कमी झाली.

मला वाटलं, सुनीताचा आग्रह आता संपला. पण घरातला संकोच कमी झाल्यावर तिनं बाहेर जातानाही पंजाबी ड्रेस घालून पाहायला सुचवलं. आणि माझ्या मनात पुन्हा सगळे प्रश्न उभे राहिले.

“गाऊन घालते आहे ना? आता हे नको सांगूस,” असं मी तिला ठामपणे म्हटलं. तिनं आणलेला ड्रेस पाहूनही आनंद झाला नाही. पुन्हा आग्रह सुरू होणार, याचंच दडपण आलं.

घरातला गाऊन आणि बाहेरचा ड्रेस, यात माझ्यासाठी फार मोठा फरक होता. घरी ओळखीचं कुणी आल्याचं कळलं, तर आत जाऊन साडी नेसता आली असती. थोडी धावपळ झाली असती; पण सावरता आलं असतं. रस्त्यावर ड्रेसमध्ये कुणी समोर आलं, तर काय करणार होते? एकदा पाहिल्यावर ती गोष्ट लपवणं शक्यच नव्हतं.

मुंबईत सासरचे नातेवाईक होते. त्यांच्यापैकी कुणाला दिसले, तर घरापर्यंत गोष्ट पोहोचायला वेळ लागला नसता. सुनीता मला ड्रेसच्या सोयीबद्दल सांगत होती आणि माझ्या मनात घरी द्यावी लागणारी उत्तरं सुरू होती.

माझं तेच बोलणं पुन्हा ऐकल्यावर ती एकदा म्हणाली, “ताई, इतक्या वर्षांचा तुमचा संसार, तुमचं वागणं, तुम्ही माणसांसाठी करता ते सगळं बाजूला पडणार आणि एका ड्रेसवरून तुमची परीक्षा होणार? हेच मला पटत नाही.”

तिचा राग समजत होता. तरी तो माझा धीर होत नव्हता. घरच्यांच्या नाराजीला सामोरं जायची तयारी माझ्यात नव्हती. त्यामुळे तिच्या कितीतरी समजावण्यांनंतर कसंबसं फक्त घरात घालून पाहायला तयार झाले.

ओढणी व्यवस्थित पसरवून घेतली, तरी आरशासमोर उभं राहिल्यावर आपल्याला हे शोभतं का, असं वाटत होतं. सुनीता चांगलं दिसतंय म्हणत होती; पण ते ऐकून आनंद होण्याआधी संकोच जाणवत होता. त्या दिवशी काही वेळानं पुन्हा साडी नेसली. बाहेर पडले नाही.

पहिल्यांदा ड्रेस घालून बाहेर जायला आणखी वेळ लागला. अखेर हो म्हटलं, तेव्हाही काळोख पडल्यानंतर जाऊ या, असं मीच सांगितलं. अंधारात सहज कुणाचं लक्ष जाणार नाही, अशी स्वतःची समजूत घालत होते. सुनीताला या काळजीची गरज वाटत नव्हती; पण तिनं माझं ऐकलं.

रस्त्यावर तिच्या जवळूनच चालत होते. ओढणी सारखी सावरत होते. समोरून येणाऱ्या माणसांकडे लक्ष होतं. ओळखीचं कुणी दिसू नये, एवढंच वाटत होतं. आपण आधी कसे राहत होतो, हे त्या अनोळखी माणसांना माहीत नाही, हा साधा विचारही त्या वेळी पुरेसा धीर देत नव्हता. घरी परतल्यावर एकदाची सुटले, असं वाटलं.

पुढे काही वेळा काळोख पडल्यानंतरच बाहेर पडले. हळूहळू खरेदीत लक्ष जाऊ लागलं. वस्तू पाहताना, भाव विचारताना कपड्यांचा विसर पडू लागला. प्रत्येक वेळी पहिल्याइतकी धडधड झाली नाही. चालण्यातला आखडलेपणा कमी झाला. कुणी ओळखीचं दिसू नये, ही काळजी होतीच; पण ड्रेस अंगावर आहे म्हणून प्रत्येक हालचालीकडे लक्ष द्यावं लागत नव्हतं.

याच काळात केस बांधण्याची पद्धतही थोडी बदलली. एरवी नेहमी वेणी घालायचे. आता कधीतरी केस मागे घेऊन पोनी बांधू लागले. सुरुवातीला त्यानंही चेहरा वेगळा वाटायचा. ड्रेसची सवय होत गेली, तशी पोनीचीही झाली. प्रत्येक बदलासाठी आधीसारखं मनाशी झगडावं लागत नव्हतं. पण नातेवाइकांकडे जायचं असलं की नेहमीची साडी आणि वेणी असे. त्यांच्या समोर माझ्यातलं हे वेगळेपण जाऊ द्यायची तयारी अजून नव्हती.

आता आठवलं की थोडं हसूही येतं. घरच्या रीती पाळणारी म्हणून मान मिळवलेल्या मला, सासरच्या कुटुंबात गाऊन आणि पंजाबी ड्रेस घालणारी पहिली विवाहित स्त्री होण्याचा ‘बहुमान’ मिळाला होता. फक्त हा बहुमान कुणाला सांगता येत नव्हता! आपल्या या पहिल्या क्रमांकाची घरात कुणाला खबर लागू नये, यासाठीच जास्त जपावं लागत होतं.

मुंबईच्या फेऱ्या सुरू राहिल्या आणि सुनीताकडच्या राहणीत हे बदल मिसळत गेले. पुढे घरात गाऊन आणि बाहेर जाताना पंजाबी ड्रेस, असं होऊ लागलं. घरात साडी नेसणं जवळजवळ बंद झालं. ज्या गोष्टीसाठी सुरुवातीला इतका विरोध केला होता, तीच आता माझ्या रोजच्या सोयीचा भाग झाली होती. मात्र हा मोकळेपणा सुनीताच्या घरापुरता होता. गावी परतल्यावर नेहमीचीच राहणी सुरू होई.

एकदा मुंबईहून येताना दोन गाऊन गावी घेऊन आले. आणताना वाटलं होतं, कधीतरी रात्री घालता येतील. पण घरी आल्यावर जाणवलं की मुंबईतली सवय इथं आणणं आणि प्रत्यक्ष तिच्याप्रमाणे राहणं, यात किती अंतर होतं.

ह्यांना गाऊन घातलेला अजिबात आवडणार नव्हता. त्यांच्या समोर घालायचा, तर आधी त्यांना विचारायला हवं होतं. पण ते हो म्हणतील, अशी थोडीसुद्धा आशा वाटत नव्हती. उलट विचारलं तर मुंबईत असताना घालतेस का, हा प्रश्न आला असता. मग पुढे काय सांगणार होते? त्यामुळे विषय काढण्याचीही हिंमत झाली नाही.

कधीतरी ते बाहेरगावी असताना घालावा, असं मनात यायचं. पण घरात इतर माणसं होतीच. चुकून कुणाला दिसलं आणि त्यांच्या कानावर गेलं, तर आणखी पंचाईत झाली असती. त्यांच्या गैरहजेरीत मुद्दाम असं राहिले, असा त्याचा अर्थ निघाला असता. नुसता गाऊन घातल्यापेक्षा त्यांच्या नकळत घातल्याचाच राग जास्त आला असता. तो विचार आला की मन लगेच मागं घ्यायचं. एकदोन वेळा रात्री रूम मध्ये जाऊन गाऊन घालायला बॅग मधून काढला देखील , पण घालायचा धीर होईना . एवढी घरच्यांची भीती होती . खरतर त्यात असे विशेष काही नव्हते , पण त्यानंतर होणारे निरर्थक वाद मला नको होते आणि हे घरी नसताना असे काहीतरी करणे म्हणजे असे वाद वाढवून घेण्यासारखे होते .

मग माझंच मला कळेना, मी कोणत्या भरवशावर हे दोन गाऊन घेऊन आले होते! मुंबईत ते घालणं इतकं नेहमीचं झालं होतं की गावीही कधीतरी जमेल, असं वाटलं असावं. पण इथं आल्यावर अंगावर साडी जितकी सहज चढली, तितकीच जुनी भीतीही मनात परत बसली. दोन्ही गाऊन तसेच राहिले. त्यांना गावी आणता आलं होतं; ते घालतानाचा मोकळेपणा मात्र सुनीताच्या घरीच राहिला होता.

या सगळ्यांत आपली कशी गंमत होते आहे, हे एका प्रसंगानं माझ्याच लक्षात आणून दिलं. गावाकडच्या माहेरी गेले असताना अचानक रात्री राहायचं ठरलं. बदलायला साडी आणलेली नव्हती. भाची सहज म्हणाली, “आत्या, गाऊन घाल ना.” आणि माझ्या तोंडून लगेच निघालं, “छे गं, मला असलं काही नाही आवडत. साडीच दे एखादी.”

बोलून झाल्यावर माझंच मला नवल वाटलं. मुंबईत दिवसभर गाऊनमध्ये राहणारी मीच हे म्हणत होते! भाचीनं मात्र त्यात काही विशेष मानलं नाही. तिच्या माहितीतली आत्या अशीच होती. तिनं साडी आणून दिली आणि विषय संपला. माझ्या मनात मात्र ते वाक्य राहिलं. मला गाऊन आवडत नाही, हे खरं नव्हतं. तो इथं घालायला धीर होत नाही, हे खरं होतं.

सुनीताला सांगितलं असतं, तर तिनं मला यावरूनही चांगलंच सुनावलं असतं. तिला जे पटत नसे, ते ती स्पष्ट बोलायची. मला मात्र घरच्यांची नाराजी टाळताना स्वतःला काय आवडतं, हेही लपवावं लागत होतं. तिच्याइतका मोकळेपणा माझ्यात आला नव्हता; पण तिच्या आग्रहामुळे माझ्या सवयींपलीकडचं काही अनुभवता आलं होतं.

साडीविषयी मनात राग नव्हता. घरच्या माणसांविषयीचा मानही कमी झाला नव्हता. मात्र साडीखेरीज दुसऱ्या कपड्यांतही आपण सुखानं राहू शकतो, हे आता कळलं होतं. पहिला गाऊन आणि पहिला पंजाबी ड्रेस घालण्यासाठी सुनीतानं खूप समजूत काढली होती. पुढे प्रत्येक वेळी तिचा आग्रह लागत नव्हता. ती सोय आता मलाही हवीशी वाटत होती.

या गोष्टीला बरीच वर्षं झाली. पहिल्या रात्री गाऊन घालून सुनीतासमोर उभं राहतानाचा संकोच अजून आठवतो. तो हळूहळू गेला. पंजाबी ड्रेसमध्ये बाहेर वावरणंही जमलं. पण गावी आणलेले दोन गाऊन घालण्याचा धीर तेव्हा झाला नाही. कपडे बदलणं जमू लागलं होतं; ते आपल्याला आवडतात, हे घरच्यांसमोर सांगणं अजून जमलं नव्हतं. हे सगळं वाचून ह्यात एवढं काय असं आताच्या पिढीला वाटणार , पण तेव्हा ते तसंच होतं .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
ह्या ही काळातून, विचारसरणीमधून लोकं गेले होते, जातायत हे अनेकांना माहितीही नसेल.

कसलं प्रामाणिक कथन आहे. एकदमच भिडलं.
कुठेच आपलं समर्थन नाही. स्वतःचं सूक्ष्म निरीक्षण आणि ते तंतोतंत शब्दात उतरवल्याने गावातल्या, घरातल्या तीसेक वर्षांपूर्वीच्या स्त्रिया आठवल्या. त्यांचं बुजणं हे हसण्याचं कारण होत असे. अशा नतद्रष्ट पुरूषांमुळेही बाई बुजलेलीच राहिली.
बायकांसाठी साध्या साध्या गोष्टी बदलणं किती अवघड हे सांगणारा हा लेख अमूल्य ठेवा आहे.

खूप प्रांजळपणे प्रामाणिकपणे हा प्रवास लिहिला आहे तुम्ही. एखादी गोष्ट अंगवळणी पडते तेव्हा त्यातून आपल्या इच्छांविरुद्ध काही होत आहे हेदेखील न जाणवणे हे जे कंडिशनिंग आहे ते फार छान उलगडवून दाखवले आहे. कुणा व्यक्तिकडे बोट न दाखवता समाजाकडे कलेक्टिव्हली ते आहे.

छान लिहिलंय. आपल्या पिढीतल्या बायकांना ही उलघाल समजू शकते.

तिचं राहणं वेगळं, आपलं वेगळं, एवढंच वाटायचं>> असा समजूतदारपणा बऱ्याच बाबतीत होता तेव्हा.त्यामुळे ईर्ष्या कमी होती.

छान लिहिलंय.

माझी आई ऑफिसला जाताना सुरुवातीपासून साडी नेसायची. मी कॉलेजला जाऊ लागल्यापासून तिने पंजाबी ड्रेस घालायला सुरुवात केली ते ही प्रचंड समजावल्यानंतर. लेख वाचल्यावर त्याच गोष्टीची आठवण झाली..

छान लिहिलंय.
तुमच्या पिढीतल्या बायकांना आता साध्या साध्या गोष्टींसाठी वाटणाऱ्या किती मेंटल हर्डल्स ओलांडावे लागायचे.

खूप छान लिहिला आहे हा प्रवास. विशेष म्हणजे लेखिकेने स्वतःची बाजू मांडण्याचा कुठेही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे हा अनुभव अजूनच खरा आणि मनाला भिडणारा वाटतो.

अरे वाह, खूप छान लिहिले आहे. असे अनुभवातून आलेले लेख मायबोलीवर जास्त यायला हवेत. आणखी वाचायला आवडेल. छान लिहिता. तुम्हाला पहिला मायबोलीकर चाहता मिळाला Happy

मला पूर्ण लेखात माझी आईच आठवत होती. नेहमीच साडी घालणारी. पण काही वर्षांपूर्वी अपघात झाला आणि खाली बसणे बंद झाले. तेव्हापासून साडी गेली आणि चोवीस तास गाऊन घालू लागली. ज्यालाही ती आधी स्वतः तयार नव्हती. ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर बॅक टू साडी येणार होती. पण आता मनातला संकोच गेला आहे तर कम्फर्ट बघ म्हणून आम्हीच अडून राहिलो.

पण घराचा उंबरठा ओलांडला की साडीच घालते. आम्ही सारे सांगतो की बाहेर जातानाही ड्रेस घाल किंवा छानसा गाऊनच घाल. त्यात आजच्या तारखेला घरचे वातावरण असे की तिने काही वेस्टर्न मॉडर्न घातले तरी आम्ही कौतुकाने त्याचा फोटो काढून आणखी चार लोकांना दाखवू. पण आधीच्या पिढीत घरात जे वातावरण होते त्यात आयुष्य गेलेल्या तिला आज स्वतःलाच संकोच वाटत असेल तर त्याचे आपण काही करू शकत नाही हे लक्षात आल्याने कधी फोर्स केला नाही. शेवटी कम्फर्ट मानसिकदृष्ट्या देखील हवाच. जे ती स्वतः कसा विचार करते यावरच अवलंबून आहे. आपण फक्त तिला कुठली बंधने पाळायची गरज नाही हे ठसवणारे पोषक वातावरण तयार करू शकतो.

त्या अनुषंगाने तुमच्या वहिनीची समंजस आणि संयमी भूमिका देखील आवडली.

तुमच्या पिढीतल्या बायकांना आता साध्या साध्या गोष्टींसाठी वाटणाऱ्या किती मेंटल हर्डल्स ओलांडावे लागायचे.>>> हाच विचार मनात आला सगळ्यात पहिल्यांदा!
खूप प्रांजळ आणि अ‍ॅज-अ-मॅटर-ऑफ-फॅक्ट आहे. कसलाही अभिनिवेश नाही, थेट आणि सरळ. आवडलं.

खूप छान लिहिलं आहे. माझ्या आईनेही आत्तापर्यंत कधीच गाऊन किंवा पंजाबी ड्रेसही घातलेला नाही. शहरात पहिल्यापासून राहणारी माझी एक आत्या मात्र पूर्वीपासून गाऊन आणि पंजाबी ड्रेस घालते. पुण्यात राहणाऱ्या माझ्या सासूबाई गेली काही वर्षे चालायला जाताना, बागेत योगासनांना जाताना किंवा एरवीही पंजाबी ड्रेस घालतात. गाऊन मात्र घालत नाहीत, किंवा नसाव्यात Proud
मला आठवतंय, नवऱ्याच्या एका काकूंनी ट्रिपला जाताना पंजाबी ड्रेस शिवून घेतला आणि ट्रिपला घातलाही. पण पुण्यात परत आल्यावर मात्र परत घातला नव्हता. एकदा इथे बंगळूरला आल्यावर घातला होता. पण तेव्हा त्यांनी ड्रेसची ओढणी पदरासारखी खांद्यापासून खालपर्यंत घेतली होती Happy

मागच्या पिढीतल्या बायकांनाच नाही, तर मलाही नेहमीपेक्षा वेगळे कपडे घालून बघायचे असतील तर ट्रिपला गेल्यावर घातलेले बरे वाटतात Happy खरं तर इथे सासर/माहेरच्या कुणी बघण्याचा प्रश्न नाही. कुणी काही म्हटलं तरी आता मी दुर्लक्षही करेन. तरीही! कदाचित आपलं आपल्यालाच अवघडल्यासारखं वाटत असतं. ते रोजच्या माहितीच्या माणसांच्यात नको, असं वाटत असेल.

सुंदर लेख . आताची पिढी याकडे वेगळ्या नजरे ने पाहिल. साडी घालण्याची सक्ती होती का? सक्ती व परिस्थितीजन्य सामाजिक दबाव यात फरक केला पाहिजे. परिस्थितीजन्य मधे देश काल वर्तमान इ. घटकांची सापेक्षता असते. पुरुषांनाही धोतर बंडी मधून शर्ट पॅन्ट मधे यायला वेळ लागला. मी गावाकडे असताना सदरा व पायजमा वापरत असे. जरी कॉलेज वरुन सुटीला घरी गेलो तरी गावाकडे गेल्यावर त्याप्रमाणे पोशाख असे. मला कुणाची सक्ती नव्हती पण सर्वांशी मिळून रहाताना ते सोयीचे जायचे. शहरात जाउन लईच शहरावानी झाला असे ऐकायला लागू नये म्हणुनही एक दबाव असायचा. थोडी बंडखोरी म्हणुन मी सदरा लेंग्यावर गांधी टोपी घालत नसे. हायस्कूल संपे पर्यंत गांधी टोपी हा गणवेशाचा अपरिहार्य भाग होता. ग्रामीण भागातही हळु हळु शर्टपॅन्टला समाज मान्यता मिळाली.
शांताबाई शेळक्यांना डोईवर पदर असण्याची सक्ती होती काय? कधी कधी आपल्याच प्रतिमेचा आपल्यावर दबाव असतो तो आपण राजीखुशीने मान्य केलेला असतो. समाजात कुठलाही बदल स्वीकारण्याचा वेग हळूच असतो.
सध्या मी कपडे घालतो ते स्वत:चे उन थंडी वारा पाउस वगैरें पासून संरक्शण व इतरांचे लज्जारक्षण यासाठी.
ही चर्चा पुढे ड्रेसकोड या मुद्द्याशी नक्की येईल. उद्या जर कॉलेज मधे शिकवायला प्राध्यापिका बिकिनी घालून आली तर? प्राध्यापिका म्हणून तीची गुणवत्ता वादातीत आहे. किंवा अध्यात्मिक विषयावर प्रवचन द्यायला जर एखादी महंतीण उत्तान पोशाख करुन आली तर?
मी गावाकडून जेव्हा पुण्यात येत असे त्यावेळी इथल्या स्रियांचा पोशाख मला वेगळा वाटत असे. एकदा कॅम्प मधे गेलो होतो तिथे फ्रॉक घातलेली म्हातारी पाहिली. यवढ्या मोठ्या बाया कशा काय फ्रॉक घालतात? असा प्रश्न मला पडला. पण इतिहासाताल्या पुस्तकात ॲनी बेझंटचा फोटो पाहिला होता त्यामुळे मला अजून काही इंग्रज स्त्रिया पुण्यात आहेत असे वाटले.
मध्ये मी भूतान ट्रिप ला गेलो होतो त्यात काही शेतकरी कुटुंबातील स्त्रिया होत्या. एक आजी अतिशय उत्साही होत्या वीणा वर्ल्ड बरोबर त्यानी काही टू केल्या होत्या. कॅटवॉक ही भारी केला होता. त्यांना म्हटले," आता इथे ट्रिपला आला आहात तर एकदा पंजाबी ड्रेस घालून पहा की कोण येतय इथे बघायला?"
आजी म्हणाल्या अजून तेवढ डेअरिंग होत नाही. आपल आपल्यालाच बरं वाटत नाही. मग कशाला घालायचा?

छानच लिहिलंय.मुख्य म्हणजे म्हणजे कुठलाही तक्रारीचा सूर नाही.

तुमच्या वहिनीची समंजस आणि संयमी भूमिका देखील आवडली........ +१.

तुमच्या पिढीतल्या बायकांना आता साध्या साध्या गोष्टींसाठी वाटणाऱ्या किती मेंटल हर्डल्स ओलांडावे लागायचे....... +१

चांगलं लिहिलं आहे. नेहमीपेक्षा वेगळे कपडे घालायला धैर्य गोळा करायला लागतं खरं. ते आपल्याला शोभतील की नाही, ही धाकधूक असते.

स्त्रियांच्या बाबत साडी न नेसता दुसरं काही घालणं याला आणखीही कंगोरे आहेत आणि तेच जास आहेत.

यात एक वाक्य आलंय -" यांना अजिबात आवडणार नाही."

हे आपलं आपणच ठरवून टाकलेलं असतं की खरंच तसं असतं? मला झिम्मा चित्रपटातले निर्मिती सावंत आणि अनंत जोग आठवले. आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे हे निर्मिती घाबरत घाबरत विचारते. नवरा मात्र सहज जा म्हणतो. पुढे लंडनला गेल्यावर ड्रेसम धला फोटो नवर्‍याला पाठवते. त्याला तो आवडतो.
फेसबुकवर रील दिसतात त्यातही सासू सुनेला सासर्‍याला आवडत नाही किंवा असंच लागतं म्हणून अनेक गोष्टी करायला लावते. एका रीलमध्ये तोंड अजिबात दिसणार नाही असा घुंघट घेऊन धडपडणार्‍या नववधूला तिचा जेठ हातभर घुंघट घ्यायची गरज नाही, असे सांगतो.

माझी बहीण कॉलेजात होती तेव्हा बेलबॉटमची फॅशन होती. तिनेही ते घातलंय. घरी लांब स्कर्ट आणि टॉप. लग्न झाल्यावर ती विभक्त कुटुंबातून संयुक्त कुटुंबात गेली. दोन्ही मुंबईतच. पण माहेर बहुभाषक तर सासर मराठी तेही आमच्यासारखंच कोकणी बहुल भागातलं. चार सुनांत सगळ्यांत लहान. तिथे कायम साडी नेसली. तिला सून आली तेव्हा सुनेलाही प्रेग्नन्सीचे काही महिने सोडले तर कायम साडी. यांना आवडणार / चालणार नाही म्हणे. "हे" मात्र सून आली तरी पातळ अर्ध्या चड्डीत असतात.

याशिवाय मुलींनी ड्रेसेस घातलेले चालतात, सुनांनी नाही असेही प्रकार पाहिलेत. तिथे घरचे सगळे गावाला गेल्यावर सून ड्रेसमध्ये फिरताना दिसली. पुढच्या पिढी तल्या सुनेने मात्र ऑफिसला जाताना पहिल्या दिवसापासून ड्रेस घातलेला दिसला.

माझ्या घरची गंमत -
मुलाने लग्न त्याचं त्याचं ठरवलं होतं. आमची तर कधीच कशाला हरकत नव्हती. आम्हा पालकमंडळीची एकदाच फोन वर तोंडओळख झाली होती. सुबा ऑफिस च्या कामाने अमेरिकेहून बंगलोरला काही दिवसांकरता आली होती. तेव्हा एका दिवसाकरता तिने एकटीनेच नाशिकला यायचं ठरवलं.
पहिल्यांदाच भेटत होती आम्ही. मीच जास्त अवघडले होते. सुबा मात्र छान मोकळेपणी बोलत होती. दिवसभर गप्पाटप्पा जेवण थोडंस फिरणं झालं.
रात्री मी तिला म्हटलं तुला change करायचं असल नं? मग बसू परत आरामात.
तर ती म्हणाली ' मैने shorts लाई है... अंकल सोने जायेंगे तब change करुंगी ' (तेव्हा आम्ही अंकल आंटी होतो.)

मी म्हटलं 'तू नेहमी वापरते आहेस आणि पुढेही वापरणार आहे नं? मग एक दिवसाकरता नको बदलूस इतर कुणाला चालेल की नाही म्हणून...'
तिने घातले तिचे छोटे कपडे.
अंकल ना काहीच फरक पडला नाही.ते तर घरात एक गोड बोलणारी मुलगी आली म्हणूनच खुश होते. (आम्हाला एकच मुलगा)

पुढे मुलाच्या लग्नानंतर आम्ही त्यांच्याकडे राहायला गेलो तेव्हा ऑलरेडी कपड्यांचा प्रश्न सुटलेला होता त्यामुळे सुबा ला काही बदल करायला नाही लागला.