जल्लोष

Submitted by शर्मिला. on 3 September, 2026 - 02:05

जल्लोष

पृथ्वीवरचा दहा दिवसांचा गणेशोत्सव जवळ आला, तशी स्वर्गा मध्ये पण थोडी अस्वस्थ हालचाल सुरू झाली..., विशेषत: देवी मंडळींमधे.

“किती छान नं.. पृथ्वीवर सतत कोणते तरी सण, समारंभ.. उत्सव चालू असतात.. मज्जा आहे बाई तिथे.. आपणच निर्माण केलेल्या माणसांची..” आसुसून इंद्राणी म्हणाली.
“तर काय.. आपण देवांनी मानवाची निर्मिती केली.. अन् मानवाने आपलं नाव घेत एक एक सण.. समारंभ सुरू केले.. अन् आता तर प्रत्येक सणाचं रूपांतर मोठ्या उत्सवात होतं..” लक्ष्मीमातेने तिला साथ दिली.
“तुमचं तरी बरंय गं.. तुझा तरी उत्सव असतोच तिकडे. कसलं जंगी स्वागत होतं तुझं.. सगळीकडे लावलेल्या पणत्या काय.. रोषणाई का.. केवढाले फटाके फुटतात पहाटेपासून रात्रीपर्यंत! ह्या दुर्गा, शारदाच्या नावाने पण नवरात्र बसतं.. तेव्हाही धमाल असते तिथे.. रोज संगीत.. नाच.. गाणं..” मेनका मध्येच बोलली. वर्षानुवर्षे तीही इंद्राच्या दरबारात नाचतच होती पण ते शास्त्रीय नृत्य. त्यात नेहमीचीच एक शांत लय होती. पृथिवरच्या माणसांचा तो उल्हास.. तो जल्लोष त्यात नव्हता.
“मी काय म्हणतेय.., आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या नावाने सणवार करतातच खाली. पण आपण सगळे तिथे उत्सवात एकत्र.. असं कधी होत नाही. आपण पण करू या का काही धमाल इथे..?” आता इंद्राणी राणीनेच असं म्हणल्यावर, अवघड काय होतं..?
“पण म्हणजे नक्की काय करायचं..? आणी कधी करायचं..? कारण सतत कुणी ना कुणी खाली जातच असतं नं.. ‘ऑन ड्यूटी’! म्हणजे सगळ्यांची एकत्र सुट्टी पाहिजे.” गौरी म्हणाली. गणेश खाली गेला की, दोन दिवसांनी तिलाही निघायचेच होतं, तिच्या होणार्‍या तीन दिवसांच्या माहेरपणाला.
“तू जाऊन ये खाली.. मग गणपतीही परत येतोच आहे इथे तुझ्या मागोमाग.. नंतर करूया का आपण आपला उत्सव? पुढचे काही दिवस मग तसे रिकामेच आहेत.” सिद्धी म्हणाली.
“हो पितृपक्ष म्हणजे सगळ्यांची सुट्टी असते. आपल्या कुणाचा उत्सव तेव्हा माणूस करत नाही. रिद्धिने तिची री ओढली.
आता देवी मंडळींनीच असं मनावर घेतल्यावर काय! स्वर्गातले सगळे देवही सामील झाले, कार्यक्रमाची आंखणी करण्यात. कधी नाही ते पहिल्यांदाच स्वर्गात वेगळं काहीतरी घडणार होतं. कार्यक्रम काय काय करायचे, कसे करायचे ह्यावर सर्वांचीच जोरदार चर्चा रंगली. कार्यक्रमाचं नावही ठरलं, ‘जल्लोष’.

जल्लोषाची सुरवात बाल गणेशाच्या नाचाने करायची ठरली. माणसं आपलं अनुकरण करतात.. मग आपणही त्यांच थोडं तरी नको का करायला? कारण शेवटी आपल्या जल्लोषाची प्रेरणा तेच आहेत नं!
नंतर बाळकृष्णाची दहीहंडी करायचं ठरलं. सगळ्यांना मस्त ढोल ताशे वाजवत धम्माल नाचायचं होतं. कृष्णालाही ते हवच होतं. त्यालाही समोर येणारं आयत अमृत प्यायचा कंटाळा आला होता. सवंगड्यां सोबतचा कल्ला अन् काला हवाच की, मेहनतीच्या लोण्या सोबत! ‘बाकी संगळ्यांनाही त्या गोपाळकाल्याची चव चाखून बघा म्हणावं!’ त्याच्या मनात आलं. पुढच्या वर्षीपासून सगळे देव पृथ्वीवर येतील दहीहंडी फोडायला अन् गोपाळकाल्याला हजेरी लावायला.
सगळेच देव पृथ्वीवर आले तर, दहीहंडी फोडणाऱ्या मुलांना वरच्यावर झेलून, त्यांचे प्राण वाचवायला तरी मदत होईल, हा विचार होताच कृष्णाच्या मनात... दरवर्षी थरावर चढणाऱ्या कुणाचा जीव गेला की त्याला वाईट वाटायचं. उत्सव चांगला आहे.. पण त्यात पण माणसांनी अगदीच ताळतंत्र सोडून बेभान झाल्यावर एकटा कृष्ण तरी कुठे कुठे पुरा पडणार होता..?
ताज्या लोण्याची अन् गोपाळकाल्याची ‘रीफ्रेशमेंट’ झाल्यावर मग गरबा रंगणार होता. तिथे लहान मोठे.. देव देवता.. सगळ्यांनाच वाव होता मोकळेपणे अन् मनसोक्त नाचायला. शिवाय नेहमीच्या वस्त्रां ऐवजी हीरे माणके जडलेल्या.. सोन्याच्या तारांनी विणलेल्या.. चनिया चोळीचं आकर्षण होतंच देव्यांना. देवांना केडियू घालवच लागणार होतं, देवीना ‘मॅच’ करायला! ‘जसा देश तसा वेश..’, ह्याच उक्तीनं ‘जसा कार्यक्रम.. तसा ड्रेस!’ मस्त माहौल रंगणार होता.

स्वर्गातला पहिला वहिला कार्यक्रम! कुबेराचा हात सढळ झाला होता. बाकी सगळ्यांना कामं वाटून देण्यात आली. वरुणराजाला कार्यक्रमा आधी स्वर्गात हलकेच शिंपण करायची होती. म्हणजे जेमतेम आकाशात धूळ होणार नाही आणी चिखलही होणार नाही इतपतच. कुणाला खडे रुतू नये म्हणून ढगांनी गालीचा अंथरायचा होता एकसारखा. वाऱ्याला सांगण्यात आलं, ‘मंद मंद वहा, बरं का.. आणी येतांना केवडा.. रातराणी.. पारिजात ह्यांच अत्तर लावायला विसरू नकोस..’ सूर्याला सांगण्यात आलं, ‘संध्याकाळचा कार्यक्रम आहे.. तू आपला ढगाआडूनच बघ.... बाकी चंद्र राहिलच ‘फोकस’ द्यायला..’ चंद्राला आणखींन एक जास्तीचं काम पण करायचं होतं.. उंचावर दहीहंडी सांभाळण्याचं.. चांदण्यांना ‘डेकोरेशन’ करायचं होतं, ‘निषे’ ला सोबत घेऊन.

सोहळा करण्याचा दिवस ठरला, वेळ ठरली. आणखींन एक महत्वाची गोष्ट ठरवल्या गेली. ‘पृथ्वीवरची लोकं आपल्या करता कार्यक्रम करतात. तेव्हा त्या आधी, देवांना आवाहन करतात. आता देवांनी स्वर्गात असलेल्या थोर मानवांना निमंत्रण द्यायचं, आपल्या ‘जल्लोषात सामील व्हायचं.
कार्यक्रमाचा दिवस उजाडला. सकाळ पासून गडबड सुरू झाली. रंगीबेरंगी वस्त्रे तयार होती हीरे माणके लावून अन् चांदण्यांच्या टिकल्यांनी सजवून. स्वर्गातले सगळे देव देव्या.., अप्सरा.. कीन्नरे.., देवदूत.. नटून थटुन आले. निमंत्रित प्रेक्षकही आले. गणपती बाप्पा तर पृथ्वीवरच्या तलावा.. विहीरीतून.. नदी समुद्रातून डायरेक्ट इकडेच आला होता, पळत पळतच, इथे उशीर व्हायला नको म्हणून. पहिला कार्यक्रम त्याचाच होता ना! आणी हे पृथ्वीवरचे लोकं चोवीस तास.. अठ्ठेचाळीस तास जास्तीचे घेतात त्याच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत...

उत्साहाने सगळे जमले. असं ठरवून एकत्र येणं कधी झालच नव्हतं त्यांच. देवींनी एकमेकिंचा साज शृंगार न्याहाळला. देव स्वत:च्या नवीन वस्त्रात मोकळ्या हालचाली करून बघत होते. कल्पवृक्षातून हातात अमृत नव्हे, तर अमृततुल्य पेय आलं. कारण अमृत तर काय रोजचंच होतं. कार्यक्रमाला सुरवात झाली. बालगणपती नेहमीप्रमाणेच गोड दिसत होता.

हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥
असं गणपतीचं लोभस रूप होतं. गंधर्व गात होते. गणपती नाचत होता. सगळे रंगून जाऊन बघत होते. बालरूप तर कुठेही बघतच रहावं असं असतं ना!
ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
शंकर पार्वती कौतुक पाहती ।।..

ही ओळ आली मात्र.., सर्वांना एकदम शंकर पार्वतीची अनुपस्थिति जाणवली. इंद्राच्या लक्षात आलं, कैलास पर्वतावर निमंत्रण द्यायचंच राहिलं. कार्यक्रम स्वर्गात ठरत होता, तेव्हा जवळपास सगळे कार्यक्रम ठरवण्यात.. त्या बद्दल बोलण्यात.. अधून मधून तरी इतर देव देवी सहभागी होतंच होते. लक्ष्मी माता सुद्धा ह्या तयारीत सुरवातीपासून सामील होती. त्यामुळे एरवी लांब समुद्रात राहणारे विष्णु भगवान सुद्धा आले होते. ह्या सगळ्या गडबडीत, कैलास पर्वत मात्र विसरल्याच गेला होता. किंवा गणपती आहे म्हणजे त्याचे आई बाबा आहेतच, असच गृहीत धरल्या गेलं होतं.
इंद्राने ताबडतोब नारदमुनींना कैलास पर्वताकडे पाठवलं, शंकर पार्वतीला समक्षच येथे घेऊन यायला. ही सगळी गडबड ‘बॅकस्टेज’ ला चालू होती तरी, उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसमोर ठरलेला कार्यक्रमही चालूच होता.

दहीहंडी बांधल्या गेली. दहीहंडीत कामधेनूच्या दुधाचं ताजं लोणी होतं. स्वर्गात कधी कशाचीच कमतरता नसली, तरी लोण्या करता अशी मेहनत करण्याचा आनंद काही वेगळाच होता. ढोल ताशे वाजत होते. कृष्ण त्याच्या सवंगड्या बरोबर उंच उंच थर चढत होता. त्यांच्यावर वरुण राजा नेम धरून पाण्याचा हलका हलका शिडकावा करत होता. चंद्र ती हंडी कधी किंचित खाली करत होता तर कधी आणखींन उंच नेत होता. अप्सरा.., देवदूत फेर धरून नाचत होते. जल्लोष वाढत होता. अशा जल्लोषातच कृष्णाने ती हंडी फोडली. गोपांवर चवदार लोण्याचा शिडकावा झाला. वातावरणात आनंदाचे चीत्कार उमटले.

ह्या सगळ्या गोंधळातच नुकत्याच आलेल्या शंकर पार्वती कडे कुणाचंच लक्ष नव्हत. ‘एवढी सगळी मजा चालू आहे, अन् आपल्याला मात्र ह्या समारंभाच आगाऊ आमंत्रण द्यायलाही विसरले..’ हे जाणवून पार्वती फारच कष्टी झाली. ‘गणपती होता एक गडबडीत.. पण इतर कुणीच लक्षात ठेवू नये आपल्याला..?’ पार्वतीच्या डोळ्यात पाणी तरळलं. भगवान शंकर तर रागाने लालेलाल झाले. नारद मुनींनी फक्त ‘ताबडतोब स्वर्गात बोलावलं आहे..’ एवढंच त्यांना सांगितलं होतं. काहीतरी भयंकर उत्पात घडत असेल असं वाटून भगवान शंकर होते तसेच निघाले होते पार्वती सकट स्वर्गाकडे यायला. तिला बिचारीला तर तयार व्हायलाही वेळ नव्हता मिळाला. आणी इथे मात्र सगळ्या नवीन वस्त्रांनी सजलेल्या..नटलेल्या.. आणी आता पार्वतीच्या डोळ्यात पाणी!

शंकरानी तांडव करायला सुरवात केली. शंकराच ते उग्र रूप पाहून, सगळे होते तिथेच थिजले. स्वर्ग थरथरायला लागला. इंद्राचे आसन डगमगायला लागले. त्या उत्पातामुळे इकडे पृथ्वीवरही समुद्रात मोठ मोठ्या लाटा उसळायला लागल्या. पृथ्वीवर एकच कल्लोळ माजला, ‘त्सुनामी आली.. त्सुनामी आली..’ लोकं सैरावैरा पाळायला लागले..
ब्रम्हदेव पुढे होऊन शंकराची समजूत काढायचा प्रयत्न करायला लागले. ते बघून इतर देवताही शंकराची करुणा भाकायला लागले.. शंकराचं तांडव चालूच होतं..

निमंत्रिता मधून काही लोकं उठून समोर मंचावर गेले. त्यात होत्या लता मंगेशकर, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व.
लतादिदीनीं सुर धरला..

सोsहम हर डमरू बाजे ..
भीमसेनजीनी पुढची ओळ उंचलली..
उसके सुर तालों के
सुखकारक झुले पर

वसंतराव आणी कुमारंजी साथीला आले..
झूम रहे सरिता-सर
भुवन-त्रय गाजे
सोsहम हर डमरू बाजे ..
आळवणी करणारे देव थबकले..,
डमरू-ओंकार नाद
परामेसर का प्रसाद
भगवान शंकरही तांडव विसरले..
उसके ही महिमा से
गिरी कंदर गाजे..
सोsहम हर डमरू बाजे ..

वातावरणात भक्तिरस आला. पूर्ण वातावरण ह्याच चार सूऱ्यांनी भारून गेलं. माता पर्वतीही आपलं दुख्ख: विसरली. भगवान शंकर शांत झाले. जमलेले सगळे देवादीक.., निमंत्रित.. मंत्रमुग्ध झाले. स्वर्ग स्थिर झाला. डळमळणारं आसन स्थिर झालं. पृथ्वीवरच्या उंचावलेल्या लाटा परतल्या. खवळलेला समुद्र शांत झाला. स्वर्गीय सुरांनी स्वर्गातलं वादळ थोपवलं.
सर्व देवादीकांच्या मध्ये शंकर पार्वतीला ठेवून गरब्याचा फेर धरल्या गेला..

आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन
अनादि निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासुर मर्दाना लागुनी
विविध तपंची करावयाची झाडणी
भक्तालागी तू पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन ..
पृथ्वी शांत झाली.. अन् स्वर्गात स्वर्गीय जल्लोषाला सुरवात झाली.
******************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
नवीन प्रतिसाद लिहा