व्हॉटसॅप मेसेज

Submitted by तुष्कीनागपुरी on 29 August, 2026 - 13:42

कागदावर हाताने लिहून
छोटसं असलं तरी पूर्ण करायला
एखादा दिवस लागतोच पत्राला
मग
तसे पत्र मिळाल्यावर
तुझे पत्र आले आहे यातच
तुझं माझं असणं भरघोस मिळतं मला
तुझं अस्तित्व
शब्दात
जे शब्द लिहिले त्यांच्या निवडीत
कागदात
शाईत
बाजुला सोडलेल्या समासात
काढलेल्या चित्रांमधे
लिफाफ्यावर लिहिलेल्या पत्यात
मायन्यात आणि सहीत
सोडलेल्या रिकाम्या जागेत
पत्र लिहायचा विचार मनात आल्यापासून
ते पोस्ट होईपर्यंत तू दिलेल्या वेळेत
मिळतं मला
.
व्हॉटसॅप मेसेज
काही क्षणात करता येतो
पण त्यात तू आहेस की नाही
याचा अंदाज येत नाही रे
.
पत्रच लिहित जा.
.
तुष्की नागपुरी
नागपूर, मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६, १८:५५

Group content visibility: 
Use group defaults