सामूहिक स्वयंपाकघरे आणि स्त्री-सक्षमीकरणाचा जागतिक पट

Submitted by राज अज्ञानी on 24 August, 2026 - 02:05

प्रस्तावना : मायबोलीच्या वाचकांसाठी हा लेख आहे. यात स्वयंपाकघरातील कामगारांचे स्वरूप, अर्थकारण, वेतन/मेहनताना आणि कार्यपद्धती यावर सविस्तर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हढी माहिती मिळाली ती दिली आहे. वैयक्तिक मर्यादा असल्याने खूपशी माहिती मिळाली नाही. त्यामुळे वाचक आपल्याकडची माहिती या धाग्यावर देऊन हा उपक्रम समृद्ध करू शकतात. जागतिक पटलावर हा उपक्रम संख्येने खूपच कमी दिसतो. पण एक सुरूवात म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. याचे फायदे तोटे यावर प्रतिसादात बोलूच. जगभरात किचनची जबाबदारी स्त्रीकडेच असते त्यामुळे हा उपक्रम महत्वाचा वाटतो. त्यातही जातीच्या आधारेच कम्युनिटी किचन ही एक अडचण आहे. यावर मात कशी करायची हे सामूहिक विचारमंथनातून पुढे येईल.

मायबोली विशेष

स्त्री-मुक्ती, सक्षमीकरण आणि लिंगभाव समानता यावर जेव्हा चर्चा होते, तेव्हा बहुतांश वेळा शिक्षण, नोकरी किंवा राजकीय हक्क यांवरच भर दिला जातो. परंतु, स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात मोठा आणि अदृश्य अडसर म्हणजे 'बिनपगारी घरगुती काम विशेषतः रोजच्या स्वयंपाकाची आणि चुलीची जबाबदारी.

"चूल आणि मूल" या चौकटीतून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी केवळ वैचारिक प्रबोधन पुरेसे ठरत नाही, तर त्यांना या कामातून प्रत्यक्ष भौतिक आणि वेळेशी संबंधित मुक्ती मिळणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर, भारतात आणि जगभरात सामूहिक स्वयंपाकघर (Community Kitchens) आणि सार्वजनिक आहार व्यवस्थांचे असे अनेक प्रयोग झाले आहेत, ज्यांनी स्त्रियांना कौटुंबिक चुलीच्या ताणातून मुक्त तर केलेच, पण त्याचसोबत अनेकांसाठी रोजगाराची नवी दारे उघडून दिली.

प्रचि सौजन्य : Bloomberg Getty Images
licensed-image.jpgसामूहिक स्वयंपाकघरातून रोजगाराची निर्मिती

१. ही स्वयंपाकघरे कशी चालतात? काम कोण करतं आणि मोबदला कसा मिळतो?
सामूहिक स्वयंपाकघरांचे स्वरूप आणि त्यांचे अर्थकारण वेगवेगळ्या मॉडेल्सवर आधारित असते:

अ. व्यावसायिक व सहकारी मॉडेल (उदा. केरळचे कुटुंबश्री व झारखंडचे SHGs)
काम कोण करते? स्थानिक स्वयंसहाय्यता गटातील (SHG) महिलाच येथे मुख्य शेफ, व्यवस्थापक आणि पुरवठादार म्हणून काम करतात.

वेतन आणि नफा: हे पूर्णपणे व्यावसायिक आणि 'नो प्रॉफिट, नो लॉस' किंवा अल्प नफ्याच्या तत्त्वावर चालते. शासनाकडून सुरुवातीचे भांडवल किंवा अनुदान* मिळते. जेवणाचे डबे किंवा थाळी अत्यंत माफक दरात विकली जाते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून महिलांना नियमित दैनिक किंवा मासिक वेतन दिले जाते. उरलेला नफा सर्व महिलांमध्ये समान वाटून घेतला जातो. यामुळे घरातील मोफत कामाचे रूपांतर 'पगारी रोजगारात' होते. (टिप्पणी - अनुदान कायमस्वरूपी राहीलच याशी शाश्वती नाही. यामुळे सबसिडीचा विचार न करताच कम्युनिटी किचन्सचा विचार झाला पाहीजे.)

ब. समुदाय-आधारित व ट्रस्ट मॉडेल - उदा. दाऊदी बोहरा समाजाचे Faizul Mawayid al Burhaniyah (FMB)
काम कोण करते? येथे स्वयंपाकासाठी व्यावसायिक आचारी आणि पगारी कर्मचारी नियुक्त केले जातात. समाजातील महिलांना येथे विनामोबदला स्वयंपाक करावा लागत नाही.

अर्थकारण: बोहरा समाजातील कुटुंबांकडून त्यांच्या क्षमतेनुसार स्वेच्छेने किंवा निश्चित वार्षिक योगदान घेतले जाते. या निधीतून मध्यवर्ती स्वयंपाकघराचा खर्च, कच्चा माल आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते. सर्व कुटुंबांना मोफत किंवा समान डबा पोहोचवला जातो. येथे महिला केवळ लाभार्थी असतात, ज्यामुळे त्यांचा पूर्ण वेळ वाचतो.

क. रोटेशनल व स्वयंसेवी मॉडेल (उदा. इस्रायलचे किब्बुत्झ व चांदणकी गाव)
काम कोण करते? अशा मॉडेल्समध्ये गाव किंवा वस्तीतील सर्व सदस्य (स्त्री आणि पुरुष दोघेही) आलटून-पालटून स्वयंपाकघरात सेवा देतात. म्हणजे रोटेशन पद्धतीने हे चालते.

मोबदला: येथे रोख वेतन न देता सेवा विनिमय होतो. म्हणजे आज ५ महिलांनी संपूर्ण गावाचा स्वयंपाक केला, तर उरलेल्या महिलांना त्या दिवशी स्वतःच्या कामासाठी पूर्ण वेळ मिळतो. पूर्वी खेड्यात वस्तू विनिमय चालायचा. त्याचेच हे रूपांतर समजा.

२. भारतातील प्रमुख प्रयोगांचा आढावा
दाऊदी बोहरा समाजाचे 'फैज़ुल मुवाय्द मोइदिया' (FMB):

राजकोट, मुंबई व इतर शहरांत बोहरा समाजाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे स्त्रियांचा दररोजचा ३ ते ४ तासांचा वेळ वाचला. या वाचलेल्या वेळेत महिलांनी मुलांचे शिक्षण, धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम, तसेच हस्तकला, गृहउद्योग आणि दागिन्यांचे छोटे व्यवसाय सुरू केले.

स्वयंसहाय्यता गट आणि दीदी की रसोई (झारखंड, केरळ, ओडिशा):

केरळचे कुटुंबश्री मॉडेल असो की झारखंडमधील आजीविका' अभियान , महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांनी चालवलेल्या उपहारागृहांनी महिलांचे अर्थकारण बदलले. येथे काम करणाऱ्या महिलांना शासकीय दरानुसार किंवा हॉटेलच्या उत्पन्नातून प्रतिमाह ८,००० ते १५,००० रुपयांपर्यंतचे स्वतंत्र उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली.

चांदणकी गाव (गुजरात) - संपूर्ण कौटुंबिक स्वयंपाकघर मुक्ती:

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील 'चांदणकी' गावाने एक क्रांतिकारक पाऊल उचलत कौटुंबिक चुली ऐवजी संपूर्ण गावासाठी एकच मध्यवर्ती स्वयंपाकघर सुरू केले. घरगुती स्वयंपाक बंद झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा संपलाच, शिवाय महिलांना कौटुंबिक आहाराच्या अविरत आणि एकतर्फी ताणतणावातून मुक्ती मिळाली.

३. जागतिक पटलावरील प्रयोग
इस्रायलचे 'किब्बुत्झ' (Kibbutz Movement):

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इस्रायलमध्ये स्थापन झालेल्या 'किब्बुत्झ' या सहकारी वस्त्यांमध्ये कौटुंबिक स्वयंपाकघर ही संकल्पनाच मोडून काढली गेली. तेथे सर्वांसाठी एकच मोठे सामूहिक भोजनालय असायचे. स्वयंपाक ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी मानल्यामुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने शेती, उद्योग आणि राजकारणात भाग घेता आला.

पेरूचे कोमिदोरेस पोपुलारेस, मूळ शब्द - Comedores Populares :

१९८० च्या महागाईच्या काळात लिमा (पेरू) शहरातील गरीब महिलांनी एकत्र येऊन 'लोकप्रिय भोजनालये' सुरू केली. कमी खर्चात कच्चा माल खरेदी करून सर्व कुटुंबांसाठी एकत्र स्वयंपाक केला जायचा. यामुळे महिलांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले. पुढे या महिलांनी आपल्या या नेटवर्कचा वापर स्त्री-हक्क आणि कौटुंबिक हिंसाचाराविरोधात लढा देण्यासाठी केला.

क्युबाची सार्वजनिक उपहारगृहे:

क्युबामध्ये घरगुती कामांचे सामाजिकीकरण (Socialization of Domestic Work) करण्यात आले. शाळा आणि कारखान्यांमध्ये मोफत भोजन उपलब्ध करून दिले गेले, जेणेकरून महिलांना घरी येऊन वेगळा स्वयंपाक करावा लागू नये आणि त्या उत्पादन क्षेत्रात पूर्ण योगदान देऊ शकतील.

४. सामाजिक बदलाची नवी दिशा
सामूहिक स्वयंपाकघरांचे हे प्रयोग केवळ 'भूक भागवणे' यापुरते मर्यादित नाहीत. जेव्हा अन्न शिजवण्याचे काम कौटुंबिक चार भिंतींमधून बाहेर येते, तेव्हा:
१. बिनपगारी श्रमांचे मुल्यांकन होते: स्वयंपाकासारख्या कामाला आर्थिक मूल्य प्राप्त होते.

२. जात आणि वर्गाच्या भिंती गळतात: एकाच किचनमधून शिजलेले अन्न एकत्र खाल्ल्याने पारंपरिक स्पृश्यास्पृश्यतेचे आणि सामाजिक विषमतेचे नियम ढासळतात.

३. वेळेच्या बंधनातून मुक्ती: स्त्रियांना स्वतःच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि विश्रांतीसाठी मोकळा वेळ मिळतो.

चूल हे पिढ्यानपिढ्या स्त्रीच्या शोषणाचे आणि तिच्या अदृश्य श्रमांचे प्रतीक राहिले आहे. या चुलींचे सामूहिक आणि व्यावसायिक रूपांतर करणे, हाच खऱ्या अर्थाने स्त्री-मुक्तीचा एक व्यावहारिक मार्ग ठरतो.

वैयक्तिक अनुभव : सोसायटीच्या वार्षिक बैठकीत हा ठराव मांडला होता. पण अनुमोदन मिळाले नाही. त्यानंतर एक ग्रुप बनवून त्यात सोसायटीतल्या लोकांना अ‍ॅड केलं. बैठका घेतल्या. कम्युनिटी किचनचे महत्व सांगितले. क्लब हाऊस मधे किचन आहेच. लोकांना पटले पण कुणी पुढे आले नाही. याची कारणे नंतर समजली. एक म्हणजे दुसर्‍याच्या हाताने बनवलेलं रोज खाणे काही स्त्रियांना मान्य नाही. आपल्या कुटुंबाला आपल्याच हाताने खाऊ घालणे हा अट्टाहास किंवा प्रेम, काळजी यामागे असते. जेव्हां आपण ओळखीच्या लोकांत काम करतो तेव्हां त्यांच्या समजुतीवर प्रहार करू शकत नाही. महत्व तर पटते, पण अंमलबजावणीत अड्चण.

गावाकडे पण हा विचार सांगितला. पण गावात जातीची अडचण आहे. शिवाय जे गरीब आहेत ते जास्त योगदान देणार नाहीत म्हणजे बोजा आपल्यावरच येईल अशी अनेकींची अटकळ आहे. हे प्रश्न एकट्याने सोडवणे अवघड आहे. यावर प्रबोधनाने मार्ग काढता येईल. म्हणजे भेदभाव ढासळण्यासठी या उपक्रमाचा उपयोग होऊ शकेल. सध्या तरी जातवार कम्युनिटीज किचन्सची सुरूवात झाली आहे, हे ही नसे थोडके. असे तर असे. सोसायटीत मात्र हे शक्य नाही कारण क्लब हाऊस सामूहिक आहे, तीत विशिष्ट समूहालाच वापर करू देणे शक्य नाही.

संदर्भ :
पुस्तके व नियतकालिके:
१. Federici, Silvia (2012). Revolution at Point Zero: Housework, Reproduction, and Feminist Struggle. PM Press. (घरातील बिनपगारी काम आणि स्त्री-मुक्ती यांवरील सैद्धांतिक विवेचन).

२. Reiter, Ester (1996). Making Fast Food: From the Nurturing Hearth to the Global Cash Register. McGill-Queen's University Press.

३. Kudumbashree Mission Reports (2020). Community Kitchens as Gender Responsive Interventions in Kerala. Government of Kerala.

४. Lind, Amy (2002). Making Feminist Sense of Neoliberalism: Development, Globalization, and Women's Social Movements in Ecuador and Peru. Journal of Developing Societies, 18(2-3).

या पुस्तकांचे उल्लेख जालावरच्या लेखात आहेत. ती मिळवून वाचलेली नाहीत.

जालनावरील दुवे (Web Links):

दाऊदी बोहरा एफएमबी (FMB) उपक्रम: The Dawoodi Bohras - Faizul Mawayid al Burhaniyah
https://www.google.com/search?q=https://www.thedawoodibohras.com/faizul-...

झारखंड राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM):
https://www.google.com/search?q=https://daynrlm.gov.in/
National Rural Livelihoods Mission (NRLM) - Success Stories

केरळ कुटुंबश्री मॉडेल: Kudumbashree Official Website
https://www.kudumbashree.org/

इस्त्रायलमधील किब्बुत्झ आणि लिंगभाव समानता: Jewish Women's Archive - Gender Equality in the Kibbutz
https://www.google.com/search?q=https://jwa.org/encyclopedia/article/kib...

इतर काही लिंक्स जसजशा मिळतील तस तसे अपडेट करण्यात येईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ राज अज्ञानी,

फार चांगला, विचारणीय विषय / धागा.

ज्ञानवर्धक चर्चेच्या प्रतीक्षेत.

संबंधित विषयावर लिहिलेल्या एका स्फुटाची आणि त्यावर मायबोलीकरांमधे झालेल्या मजेदार चर्चेची एक लिंक :

https://www.maayboli.com/node/83214

अनिंद्य, तुमचा लेख आवडलाच. हा मला सर्च मधे दिसला नाही. दाउदी बोहरा समाजाचे उदाहरण त्यात आले आहे. बरीच नवीन माहिती मिळाली. अमेरिकेत हा प्रकार होता हे नवीन आहे माझ्यासाठी. त्यांनी रशियन्समुळे बंद केला हे हास्यास्पद आहे.

इथे उलटे झालेय. ही आयडिया एका सर्कलमधून आली. आण मग अंमलबजावणी सुरू करताना आज अस्तित्वात असलेल्या कम्युनिटी किचन्सची माहिती मिळत गेली.

यातून धार्मिक कम्युनिटी किचन्स वगळले आहेत, कारण त्यामागची कन्सेप्ट वेगळी आहे असं वाटलं. अम्मा कि रसोई, हमाल पंचायत सुद्धा वगळली. रोजचे जेवण एकत्रितरित्या बनवायचे, म्हणजे घरात इन्डिव्हिज्युअल चूल पेटणार नाही.

मात्र प्रत्यक्षात प्रत्येकाची चव वेगळी, खाण्यापिण्याच्या सवयी, संस्कृती या मोठ्या अडचणी आहेत. एकच एक संस्कृती असलेल्यांमधे ही कन्सेप्ट यशस्वी झाली आहे हे दाऊदी बोहरा उदाहरणात दिसते. वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक असलेल्या आमच्या सोसायटीत लोकांना फायदे पटतात पण वळत नाही.

आपल्याकडे दक्षिणेत सुद्धा मायबोलीकर असणारच. तिथेही असे प्रयोग झाले आहेत. जर कुणी प्रत्यक्ष जाऊन माहिती द्दिली तर हा उद्देश इथे आहे. तसेच इस्त्राएलमधे कशा प्रकारे काम चालते याची प्रत्यक्ष भेट दिलेले मायबोलीकर भर घालू शकतील.

खरेतर आमच्या सोसायटीत ही कल्पना प्रत्यक्षात आली तर रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या डिशेस चाखायला मिळू शकतील हा प्रचंड मोठा फायदा आहे. यातून रोजगारसुद्धा उभा राहू शकेल. काही कुटुंबांना नक्की गरज आहे. सेवा विनिमय ही पद्धत पण चांगलीच आहे. पण तिथेही महिनाभराचे काम दोन दिवस अंगावर पडेल. ज्याला / जिला गरज आहे त्याला घराजवळच काम मिळाले तर हा विचार होता.

एकाच घरात प्रत्येकाची फर्माईश वेगळी असते. कोणाला चमचमीत हवे असते, कोणाला डाएट चे हवे असते. कोणाला पालेभाज्या आवडतात, कोणाला आवडत नाहीत. कोणाला चपाती, कोणाला फुलका, कोणाला भाकरी, तर कोणाला पराठा हवा असतो. एकाच घरात हे करताना जीव मेटाकुटीला येतो. कॉम्युनिटी किचनमध्ये हे सर्व कसे करणार? तसेच हळू काम करणारे, गलथान, काम करणारे, कामचुकार, स्वच्छतेची पराकोटीची सवय असलेले , OCD वाले, चालता है वाले यांचा मेळ कसा घालणार. काहींना चपाती तव्यातून थेट ताटात लागते.

ही संकल्पना तात्विक दृष्ट्या ठीक असली तरी, त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स बरेच आहेत.
विशेषत: , महाराष्ट्रातील पांढरपेशा, उच्च मध्यमवर्गीय समाजात ही संकल्पना कधीच मान्य होणार नाही. पुरुषसत्ताक मानसिकता, चव हा व्यक्तीसापेक्ष बदलणारा निकष, खाण्याचे अतीव चोचले, करणाऱ्या व्यक्तींबद्दल विनाकारण असलेला आकस, ( म्हणजे त्याची चव, स्वच्छता, तेल किती वापरतात! असे मुद्दे) , करणाऱ्याची मानसिकता अन्नात उतरते..अशा आयुर्वेदिक समजुती, सिनियर सिटीझन्स नी स्वतःच ठरविलेले अतार्किक पथ्य पाणी, ताजे - शिळे याचे स्तोम , नैवेद्य वगैरे असल्यास घरचेच अन्न पाहिजे अशा घट्ट समजुती....

घर म्हणजे मुख्यतः 'किचन आणि खाणे ' अशी समजूत असलेल्या भारतीय समाजात हे शक्य नाही!

फारतर महिन्यातून एक अथवा दोन दिवस करून पाहायला काही हरकत नाही. पॉटलक टाईप. चटपटीत मेन्यू वगैरे ठरवून!

धागा उत्तम आहे. माहितीपुर्ण आहे.
जे खवैय्या आहेत त्यांना कम्युनिटी किचन फारसे आवडणार नाही. पण नोकरदार पुरुष, विद्यार्थी, एकल पुरुष यांना ते फार उपयोगाचे आहेत, एक स्त्री दुसर्‍या स्त्रीच्या स्वयंपाकाविशयी फारसे बरे बोलत नाही. त्यांन इतर स्त्रियांचा स्वैपाक फक्त परावलंबी झाल्यास नाईलाजाने खावा लागतो. खाण्यासाठी जगणारे व जगण्यासाठी खाणारे अशी विभागणी केल्यास मी जगण्यासाठी खातो. त्यामुळे मला कम्युनिटी किचन ही कल्पना फार आवडली

धागा चांगला आहे.
घरच्या अन्नाची तुलना कशाशीही होणार नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. स्वयंपाकघर भटारखाना झाले की काही नको त्या गोष्टी ओघाने येणारच.
वैयक्तिक आवडी निवडी, (जी असणे नैसर्गिक आहे. ) स्वच्छता , अन्नाचा ताजे पणा कमी होणे (उदा एवढं सॅलड कापायचं असेल तर ते किती तरी वेळ आधी कापून ठेवावं लागेल. ) , मोलाने करून घेतल्याने वाढणारी cost असे अनेक मुद्दे आहेत.
स्त्रियांना ह्यातून सुटका द्यायची असेल तर घरातल्या सर्वांनी (पुरुष, मोठी मुले वगैरे ) घरकामात तेवढीच जबाबदारी घ्यावी म्हणजे घरातल्या सर्वांना घरी केलेले , कुटुंबाच्या आवडीचे, अन्न खाता येईल आणि त्याचा भार एकावर पडणार नाही.

*सर्वांनी (पुरुष, मोठी मुले वगैरे ) घरकामात तेवढीच जबाबदारी घ्यावी म्हणजे ...* पूर्णपणे सहमत. हल्ली बऱ्याच घरात हे सहजपणे होतानाही दिसतं.
महाराष्ट्रातल्या स्वयंपाकाच्या पद्धतीतलं प्रचंड वैविध्य , त्यातही शुद्ध शाकाहार व मांसाहार हा राडा आहेच, बघता, कम्युनिटी किचन रोजच्या जेवणासाठी इथे स्विकारलं जाईल असं वाटत नाही. मला स्वतःला तरी जेवणाच्या व स्वयंपाक करण्याच्या बाबतीतली ही तडजोड जगण्यातला एक मोठा आनंद हिरावून घेणारी वाटते. अर्थात, हे माझं निव्वळ वैयक्तिक मत व आवड.

अहो, पण सामूहिक किचनमधल्या जेवणात माझ्या चुका काढायचा रोजचा आसुरी आनंद तुम्हाला कसा मिळणार !!!20190103_224652_0.jpg

माझे मत अशा चर्चांमध्ये एखादी गोष्ट कुठल्या कुठल्या केस मध्ये सूट होणार नाही, माझ्या कुटुंबात सूट होईल की नाही पेक्षा टार्गेटेड कुटुंबे कोणती त्यांना सूट होते की नाही हे बघायला हवे.
तेव्हा ओसीडी असणारे, कडक सोवळे लागणारे, आजरपणामुळे अथवा वृद्धत्वामुळे नियमित स्पेशल पथ्य लागणारी, नवजात ते नॉर्मल जेवण करता येईपर्यंत मोठी न झालेली मुले असणारी कुटुंबे तूर्तास बाजूला ठेवावी.

याचा उपयोग खास करून बाहेरची कामे, नोकरी, व्यवसाय, इतर ऍक्टिव्हिटीज् यात भरपूर वेळ लागणाऱ्या कुटंबाना होणार आहे, नव्हे तोच उद्देश आहे असे वाटते.

मला वाटते निम्न आर्थिक स्तरावर अशी संकल्पना जास्त प्रमाणात आणि लौकर स्वीकारली जाईल, कनिष्ठ मध्यम वर्गीयांपर्यँत अथवा बाहेरून डबा लावणे जिथे सहज स्वीकारले जाते तेथ पर्यंत. हायजीन आणि समतोल न्यूट्रिशन तिथेही पाळले पाहिजे.

त्यापुढे मग आवडीनिवडीचा भर वाढत जातो. रेस्टॉरंट मधून खाणे मात्र तिथेही कॉमन आहे. तिथे किचन रेस्टॉरंट असलेल्या ३ स्टार ते पुढील हॉटेल्स प्रमाणे इमारतीतच, इमारतींच्या समुहात चालवले गेलेले किचन/रेस्टॉरंट म्हणता येईल ते चालु शकेल. माल, तेल कुठला वापरतात, स्वच्छता, हायजीन यावर देखरेख व नियंत्रण राहील. चार्जेस, मेन्यू त्या त्या सोसायटीच्या आर्थिक स्तरांप्रमाणे असेल. सुट्टी, सणासुदीला अथवा वाटेल तेव्हा घरी करण्याचा पर्याय असेलच.

अशी व्यवस्था स्विकारो न स्वीकारो स्वयंपाक आवराआवरी सकट पुरुषांनी घरकामात समान जबाबदारी उचलून सहभाग करायला हवा.

शिजवल्यावर अन्न अमुक वेळातच खाल्ले पाहीजे, शिळे खातात तिथे दुर्भिक्ष्य येते, फ्रीज, फ्रिजर मुळे सत्वांचे फार नुकसान होते, नैवेद्य म्हणजे घरचाच हवा, वगैरे पाळायचे ते पाळतील त्यासाठी समाजाने का थांबुन रहायचे? अशा समजुती सोडल्या तर माहिती काढुन फ्रीज/ फ्रिजर व इतर उपकरणे आणि स्मार्ट थिंग्ज शिकून, दोघांच्या सहभागाने घरातही रोजच्या धावपळीतला स्वयंपाकास लागणारा वेळ खूप वाचवतो येतो. हायजीन आणि न्यूट्रिशन कॉम्प्रोमाईझ न करता. जोपर्यंत अशा सामुहिक स्वयंपाकघराची / सोसायटी रेस्टॉरंटची वगैरे सोय होत नाही तो पर्यँत /नंतरही आवडीचे काही पटकन करण्यास वगैरे असे करता येईल, तिथुन सुरवात करणे इष्ट होईल.

ज्या आर्थिक, सामाजिक इ इ समूहांना गरज, आवड, निकड वगैरे आहे त्यांनी जरूर असे करावे. मला यात सध्यातरी काहीच अपिलिंग दिसत नाही. असे आवडी चवी आणि पदार्थांचे लसावी काढून केलेले जेवण मेस मध्ये खूप खाल्ले. असे जेवण खावेसे वाटले तर पैसे देऊन हॉटेलात खातोच, पण रोज डिफॉल्ट असे कसलेही नियंत्रण नसलेले आणि निवडीचा अधिकार गमावलेले पदार्थ ताटात घेऊन खायची जराही इच्छा नाही. जेवण रांधण्याइतका वेळ उत्साह आणि पैसे जागा आहे.
माझ्या घरात स्त्रियांवर भार पडणार नाही आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे बघतो. जगातील स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यात रस आणि तितका वेळ आणि मुळात इच्छा सध्यातरी नाही.
ऑल यू कॅन इट अगदी फाय स्टार जेवण मिळालं तरी त्याचा तीन दिवसांत कंटाळा येतो. अगदी ५० पदार्थांचा स्प्रेड गुणवत्तेची खात्री इ इ असेल तरीही. नॉट माय कप!

>>>>>>पण रोज डिफॉल्ट असे कसलेही नियंत्रण नसलेले
अगदी हाच मुद्दा माझ्या डोक्यात आला. आपला कंट्रोल काय? शून्य. मग असा कंट्रोल आ ऊटसोर्स का करावा?

अमितव, योग्य मुद्दे ! Happy
चवी, आवडी आणि पदार्थांचा लसावी ही कल्पना खूप आवडली....

अशा चर्चेकडे कसे पाहतो यावर आहे असे वाटते. यात जर प्रतिसाद देणाऱ्यांनी आपण असे सामूहिक किचन निघाले आपल्याकडे तर सहभागी होऊ का हे पण सांगायचे असेल तर त्यानुसार भर घालतो:

आता किंवा पाचेक वर्षांपूर्वी पर्यन्त मागे असा आपल्यास योग्य त्या प्रकारे असे किचन इमारतीत सोसायटीत करावे का , तुम्ही निमयमित सदस्य होणार का विचारले तर आमचे उत्तर: नाही. आता त्याची आवश्यकता नाही, तेवढी धावपळ नियमित होत नाही. हवं ते करून खायला व्यवस्थित वेळ मिळतो. जमत नाही तेव्हा स्विगी, झोमॅटो आणि आता त्यातही ते कमी करून फावल्या वेळात जमेल तसे फ्रोजन फूड घरीच करुन फ्रीज करून ठेवतो आम्ही. पोळ्या/भाकरीही थोड्याच शेकून फ्रीज करून ठेवून वापरल्यात, मग वेळेवर काढून तव्यावर शेकल्या की झाले. पंधरा दिवस पर्यंत ठेवून पाहिल्या. अजुन जमेल तसे इतर पदार्थांवर प्रयोग विकांताला असतात. फ्रिजिंग साठी व्हॅक्युम पॅकरही घेण्याचा विचार सुरू आहे.
तरीही आमच्या इमारतीत झालीच सोय तर वेळ पडेल तेव्हा उपयोग करून घेऊ.

पण त्या आधी विशेषतः २००५ ते २०१७ असा पर्याय असला तर आनंद झाला असता. एखाद्या हॉटेल सारखे राहत्या इमारतीतच किचन, रूम सर्व्हिस सोय असणे आणि हाऊस किपिंग सोय असावी असे मला फार पूर्वी पासुन वाटत होते. घरी स्वयंपाकला मावशीही झाल्या पण फारच चवहीन बनवत. २०१३ आसपास आम्ही इथे एक सर्व सोयी असलेली गेटेड कम्युनिसटी बघितली. तिथे किचन, डायनिंग हॉल होता, मनाजोगती स्वच्छता होती. आणि रूम सर्व्हिसही होती. तिथे आम्ही जेवणही केले, आवडले, घरगुती होते. पण हवा तो फ्लॅट न मिळाल्याने तिकडे घेतला नाही.

लोक आधी तयार गव्हाचे पीठ घ्यायला तयार नसत, विकतच्या लोणच्या पापडांना , दह्या पनीरला नसते म्हणत वगैरे. आता बऱ्याचपैकी पॅकेज्ड फूड चालते प्रोसेस्ड सुद्धा बऱ्या प्रमाणात. याचेही सावकाश असे होईल. सोयी-गरजेप्रमाणे लोक वापरतील. आणि तरीही ज्यांना आवडत नाही, त्यांना स्वतः करण्याचा पर्याय उपलब्ध राहीलच की तो कोण हिरावुन घेणार?

*सोयी-गरजेप्रमाणे लोक वापरतील. आणि तरीही ज्यांना आवडत नाही, त्यांना स्वतः करण्याचा पर्याय उपलब्ध राहीलच की तो कोण हिरावुन घेणार ?* -
सोयी - गरजेनुसार ज्या गोष्टी अस्तित्वात येणार त्या चर्चा करून थांबणार नाहीत, हे १00% सत्य. कदाचित, कांहीं दशकांनंतर फक्त व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, फायबर्स याच्या गोळ्या हाच सोयी - गरजेनुसारचा जेवणा - खाण्याला पर्याय सर्रास वापरला जाईलही. पण, जरी सुनीता विल्यम्सला अवकाशात हा पर्याय वापरणं अत्यावश्यक व कौतुकास्पद असलं, तरीही सरसकट सर्वांचा प्रवास त्या पर्यायाच्या दिशेने होणं अत्यावश्यक व हितावह आहे का, ह्यावर चर्चा आवश्यक असावी. ' पाककले' ला व खवय्येपणाला जीवनात स्थान द्यायचं की नाही हे फक्त सोयीवरच अवलंबून ठेवायचं की ते स्थान जपण्यासाठी सोय - गरज दुय्यम समजायची , यावर चर्चा माझ्या मते अधिक अर्थपूर्ण आहे. बाकी, " ज्यांना आवडत नाही, त्यांना स्वतः करण्याचा पर्याय उपलब्ध राहीलच की ", हे म्हणून कोणत्याही पर्यायावरची चर्चा बंद करता येईलच की !

प्रतिसाद वाचतोय.
मानव, नस पकडली आहे. वेगवेगळ्या चवींचा धाग्यात विचार केलेला नाही असे काही नाही. दोन वेळा तो उल्लेख झाला आहे.

कम्युनिटी किचन्स कुणाला उपयोगी आहेत, याचा विचार व्हायला हवा. ज्यांना नकोय त्यांच्यावर सक्ती असला हा प्रकारच नसतो. तसं होऊच शकत नाही. महिलांचे स्वयंसेवी गट चालवणार्‍या स्त्रियांना कम्युनिटी किचन्सची गरज समजू शकते. या दृष्टीनेच आधी म्हटलेय कि एकच एक संस्कृती असलेल्या दाउदी वोहरा समाजात ही कल्पना यशस्वी झाली आहे.

प्रघा, जगण्यासाठी खाणे उत्तम वाकप्रचार.
ज्या स्त्रियांना गरज आहे त्यांच्यासाठी हे वरदान आहे. आपल्याला गरज नाही म्हणून संकल्पनाच चुकीची आहे असे समजण्यात अर्थ नाही. सिंहगड रस्त्याला काही बचत गटात असा प्रकार करतात पण त्याला कम्युनिटी किचन असे नाव आहे हे त्यांच्या गावीही नाही. त्यामुळं बचत गटात महिला जास्त वेळ लक्ष देऊ शकतात.

इथेच जगताप हॉस्पिटलजवळ आणखी एक बचत गट फास्टफूडचा व्यवसाय करतो. बारामतीजवळच्या एका गावात महिलांच्या बचत गटाने जेवण एकत्र बनवायला सुरूवात केली आहे. त्याची माहिती घ्यायची आहे. कच्च्या मालाची खरेदी एकत्र केल्याने स्वस्त पडत असणार.

पुरूषांनी घरात स्वयंपाक करून महिलांना हातभार लावावा ही कल्पना आकर्षक आहे. पण ही समाजाच्या सर्व थरात झिरपायला किती काळ जाईल, आणि ते सर्वांच्या गळी कोण उतरवणार आणि कसे हा प्रश्नच आहे. त्यासाठी उत्साह, नेटवर्किंग आहे का? जर ही कल्पना झिरपत नसेल तर मग काय करायचं हे प्रश्न आहेत.

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातल्या चांदणकी गावातला हा प्रयोग
https://www.youtube.com/watch?v=I7O7C2k-T-8

असे प्रयोग व्यापक होऊ लागले तर जातीभेदाच्या भिंती सुद्धा गळून पडण्यास मदत होऊ शकते. रोटीबेटॉ व्यवहारापैकी रोटी व्यवहाराची मोठी ताकद कम्युनिटी किचन मधे आहे. सुरूवातीला विरोध होईल, पण जर हा प्रकार रूजला तर याचे होणारे फायदे व्यक्तिअगत आवडीनिवडीपेक्षा प्रचंड आहेत. कम्युनिटी किचन म्हणजे रोज उकडलेला बटाटाच खा असा सक्तीचा जुलमाचा रामराम नसतो. गावात ज्यांना पटत अशी कुटुंबे एकत्र येऊन हा उपक्रम सुरू करतात. पथ्यपाणी वाले आपला वेगळा कार्यक्रम चालू ठेवू शकतात. त्यांच्यावर जबरदस्ती नसते.

समविचारी लोकांनी एकत्र येऊन करायचा हा प्रकल्प आहे.

दुसर्‍याच्या हातच्या खाण्याची किळस ही गोष्ट पाहिली आहे. पण असे अनेक लोक बघण्यात आहेत जे रोजच्या रोज स्विगी, झोमॅटो वरून जेवण मागवतात. त्या वेळी ते अन्न कसं आहे याबद्दल ते बेफिकीर असतात. दृष्टीआड सृष्टी. ते कुणी बनवलंय, कसं बनवलंय हे माहिती नसण्यातच त्यांचा फायदा असतो.

आमच्याकडे घरकामाला येणारी बाई चार कुटुंबात रोज स्वयंपाक करते. अशा पाच सहा बायका आहेत. काही घरात फक्त भाजी बनते, पोळ्या ते जवळच्या पोळी भाजी केंद्रातून आणतात. त्या केंद्राचा व्यवसाय आमच्या सोसायटीच्याच जिवावर चालतो कि काय असं वाटायच, पण अशा अनेक सोसायट्या आहेत. मध्यंतरी त्या केंद्रात आग लागली तेव्हा ते काही दिवस बंद होतं. त्यामुळं घरकाम करणार्‍या बायांना एक्स्ट्रा पोळी बनवायचं काम पडलं होतं.

काही घरात पोळ्या बनतात आणि भाज्या ते बाहेरून मागवतात किंवा पोळी भाजी केंद्रावरून आणतात. आता तर गाडी धुवायला येणारा मुलगा तिथून पोळी, भाजी आणून देतो.

अशा केस मधे दुसर्‍याच्या हातचं खाणं आणि त्याची किळस हा प्रकार फाट्यावर मारला जातो. गरज आहे. विकतचं आणलं तर किळस वाटत नाही पण माहितीच्या व्यक्तीने बनवलं तर वाटते ही मानसिकता बदलायला हवी. घरात पुरूषाने मदत करावी ही मानसिकता बदलणे जितके गरजेचे आहे तितकेच हे ही.