कान्हा

Submitted by शिवानी बलकुंदी on 19 August, 2026 - 06:24

शेवटचा पीरियड संपला आणि वर्गातली सगळी मुलं मुली, एक एक करून बाहेर पडू लागली, सकाळी नऊ ला सुरू झालेले क्लासेस दुपारी चार वाजेपर्यन्त सुरूच असत, मध्यंतराचा एका तासाचा ब्रेक मिळायचा तेवढाच. त्यातही मधल्या सुट्टीत सगळी मुले बहुधा कॉलेज कॅंटीन मध्येच जात असत. क्वचित कुणी लायब्ररी मधे जात असे.
शंतनू कधीतरी कॅंटीन मधे जाई, बरेच वेळेस तर तो लायब्ररी मध्येच असायचा, अनेक वेळेला तर तो लायब्ररी मधे वाचनात इतका बुडालेला असे की लेक्चर ला पण अॅबसेंट राहत असे.
एक मात्र होतं. कॉलेज संपलं आणि शंतनू घरी जायला निघाला की दोन चार मुली, त्याला डाऊटस विचारायला त्याच्या भोवती घोळका करत असत. कधी कधी त्याचे काही मित्र त्यावरून त्याला चिडवतही असत. शंतनू मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असे. आज ही त्याने एक दोन मुलींना वर्गातच झालेल्या लेक्चर चे काही कठीण प्रश्न समजाऊन सांगीतले. आणि तो घरी जायला निघाला, एव्हाना बाकी वर्ग पण सुटले होते. तो मित्रांशी बोलत बोलत पार्किंग ला पोहचला. तो आपली स्कूटर घेऊन निघणारच होता, एवढ्यात,
“शंतनूsss..” आरुषी ने आवाज दिला, तसा शंतनू थबकला. कॉलेज झाल्यावर तसंही रोजच तो कोणा ना कोणा साठी तरी थांबतच असे. पण आजवर आरूशी ने कधी त्याला असे मोठ्याने आवाज देऊन थांबवले नव्हते.
शंतनू ने मागे वळून बघितले तर आरूशी त्याच्याकडे धावत येत होती,
जवळ येऊन धापा टाकत आरुषी म्हणाली “शंतनू, अरे आज मला घरी सोडतोस का?”
आरुषी च्या या प्रश्नाने शंतनू, भांबावला काय बोलावे हे त्याला सुचेना, त्याच्या तोंडून सहजच “हो चल न” असे वाक्य निघाले. आरुषी आणि शंतनू एकाच बिल्डिंग मधे राहत असत. त्यामुळे एरवी आरुषी त्याच्यासोबत फारशी बोलत नसली तरी ती त्याला आपला हक्काचा मित्र मानत असे.
तसे तर आरुषी सोबत बोलायला पण अनेक जण उत्सुक असत, तिने वर्गातल्या कोणालाही लिफ्ट मागितली असती तरी तीला कोणीही आनंदाने घेऊन जायला तयार झाले असते, पण आज तीने शंतनू सोबत च घरी जायचे ठरवले.
शेवटी भरलेल्या कॅम्पस मधून शंतनू च्या मागे बसून आरुषी घरी जायला निघाली. आणि कधी नव्हे ते सगळ्यांच्या माना तिकडे वळल्या.
घरापासून कॉलेज साधारण पाच एक किलोमीटर वर होते, नाही म्हटले तरी पोहचायला पंधरा ते वीस मिनिट लागत असत. शंतनू आणि आरुषी निघाले आणि थोडेच अंतर गेल्यावर गाडी बंद पडली.
“अरे देवा, आज सकाळी गाडीत पेट्रोल भरायला विसरलोच्.”
“काय?” आरुषी जवळ जवळ ओरडलीच
“अगं खरच, आज निघायला उशीर झाला आणि लवकर पोहचण्याच्या नादात, पेट्रोल भरायचे आहे हे मी साफ विसरलो बघ” शंतनू म्हणाला.
“अरे आज मला घरी लवकर जायचे होते, म्हणून तर मी तुला सोबत येते म्हणाले, तू रोज लवकर घरी पोहचतो, हे मला माहितीये,”
“सॉरी आरू, मी पेट्रोल बद्दल साफ विसरून गेलो, वेरी सॉरी.”
“तुझ्या सॉरी मुळे आपण घरी लवकर थोडीच पोचणार आहोत? त्यापेक्षा मी माझी माझी बस ने गेले असते तर बरे झाले असते. मला आता उशीर होईल ना, त्याचं काय?” आरुषी चांगलीच रागावली होती. आणि शंतनू तीला सॉरी म्हणत होता.
वर वर रागावली आहे असे दाखवत असली तरिही शंतनू च्या तोंडून “आरू” हे नाव ऐकून आरुषी मनातून सुखावली होती.
“मी तुला रिक्शा करून देतो,” शंतनू म्हणाला,
“आणि तू काय करणार आहेस?” आरुषी ने विचारले.
“अग थोड्याच अंतरावर तर आहे पेट्रोल पंप, तिथपर्यंत गाडी हातात घेऊन जातो”
“अरे मग मी ही येते ना तुझ्यासोबत” आरुषी म्हणाली.
“अगं, पण तुला तर घरी लवकर जायचे आहे ना”
“असेच काही नाही अरे, आपण सोबत जाऊया, नाहीतर तुला वाटेल मी तुला रस्त्यात असेच एकटे सोडून दिले, असे म्हणून आरुषी गालातल्या गालात हसू लागली. शंतनू ला पण हसू आले, आणि दोघेही बोलत बोलत गाडी हातात घेऊन पेट्रोल पंपाकडे निघाले.
“बर मला सांग आज तुला घरी लवकर का जायच आहे?”
शंतनु च्या प्रश्नाने आरुषी गडबडली, तीला काय उत्तर द्यावे सुचेचना, “अं” तिच्या तोंडून एवढेच शब्द निघाले.
“अगं, मी काय विचारतोय आरू”
“मी काय म्हणते आहे शंतनू मी जाते रिक्शा ने” आरुषी ने विषय बदलत म्हटले.
एवढे बोलून आरुषी ने एका रिक्शा ला थांबवले,“शांतिवन सोसायटी” असे म्हणून ती रिक्षात बसून निघून ही गेली.
आणि शंतनू बघतच राहीला.

दुसऱ्या दिवशी शंतनू कॉलेज ला आलाच नाही. आरुषी ला उगाचच चुटपुट वाटू लागली, काल आपण त्याला मध्येच सोडून गेलो, नंतर त्याला पेट्रोल मिळाले असेल का? की त्याने घरापर्यंत गाडी ओढत आणली असेल का?
तीच्या डोक्यात असंख्य प्रश्न येऊ लागले. त्यामुळे आज तीचे वर्गात ही कोणत्याच पिरेड ला काय शिकवले जात आहे याकडे लक्षच नव्हते.
कॉलेज झाल्यावर तिने सरळ त्याच्या घरी जायचे ठरवले. नेहमी प्रमाणे ती घराजवळ पोहचली. पण का कुणास ठाऊक त्याच्या घरी जायचा तीला काही धीर झाला नाही.
घरी आल्यावर देखील ती नेहमी सारखी बडबड करत नाहीये हे आई च्या लक्षात आले म्हणून आई ने विचारले, “आरू, आज अजून भूक लागली नाही वाटतं,”
असं काही नाही आई, तुला उगाचच असं वाटतंय”
“अगं मी तुला खाण्याबद्दल विचारते आहे आणि तू कशाबद्दल बोलतेय” आई ला काही तरी गडबड आहे हे जाणवले.
“अगं आई कल ना माझी एक वही मी शंतनू ला दिली होती, आणि आज तो आलाच नाही मी त्याच्या कडे जाऊ का वही आणायला?”
“हो, जा ना, तुझ्या अभ्यासाची असेल ना? मग मागायला काय हरकत आहे? म्हणून आज तुझं लक्ष नाही ये का माझ्या बोलण्याकडे?” आई चा प्रतिप्रश्न
“अं, असं काही नाही आई, मी शंतनू कडे जाऊन येते.”
आरुषी च्या मनात थोडी थोडी धडधड होत असते तरिही ती हिम्मत करून शंतनू च्या दारावरची बेल वाजवते.
शंतनू ची आई दार उघडते तसे आरुषी विचारते, “काकू शंतनू आहे का घरी?”
आरुषी चा आवाज ओळखून शंतनू समोर येत आरुषीला म्हणतो, “अरे तू आज इथे कशी काय?”
“मला आत ये नाही म्हणणार का शंतनू?”
“हो हो ये ना आरुषी,”
आरुषी हसत हसत आत आली. शंतनू तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत म्हणाला, “ बोल आरुषी, कसं काय येणं केलं?”
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults