पागोळ्या

Submitted by मनीमोहोर on 18 August, 2026 - 02:00
पागोळी  पाऊस

पागोळ्या

पाऊस मला कोणत्याही गावातला आणि कोणत्या ही वेळेचा आवडतो. पण सर्वात जीव लावतो तो पावसाचे चार ही महिने आपली नित्य नवी रूपं दाखवणारा, मनाला अक्षरशः वेड लावणारा कोकणातला पाऊस. ..

कधी रिमझिम ,कधी मुसळधार, कधी न पडता नुसताच घुंघट घेतलेला , कधी सात दिवस अजिबात सूर्यदर्शन न घडवता, सतत पडून पावसाचं सातेरं धरणारा, कधी पडतोय न पडतोय असा पण दिवसाच्या दिवस लागणारा शेतीला उत्तम असा मुरवाणीचा , कधी काढता ओढता म्हणजे मधूनच “ मी आहे गेलो नाहीये, आहे अजून “असं सांगत पाच दहा मिनिटं जोरात बरसणारा आणि पुन्हा मी त्या गावचाच नाही म्हणत गायब होणारा , कधी ऊन पावसाचा खेळ करून इंद्रधनुष्य दाखवणारा, वाऱ्या वादळाला साथीला घेऊन कधी काळजात धडकी भरवणारा, कधी व्हाळाच्या हौराचे रौद्र रूप दाखवणारा, ऐन दिवाळीत कधीतरी अचानक येऊन आकाश कंदील भिजवणारा आणि मोठ्या कष्टाने खळ्यात काढलेल्या रांगोळीवर लौकिकार्थाने आणि शब्दार्थाने ही पाणी फिरवणारा .. अशी त्याची सगळीच रूपं डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावी अशी..

लहानपण छोट्या गावात आणि कौलारु घरात गेल्याने आणि आता ही अनेक वेळा कोकणातल्या घरी ही जाणं होतच असल्याने पाऊस आणि पागोळ्या जवळ जवळ एकच शब्द शब्द असल्या सारख्या वाटतात . हल्ली कौलारु घरं जवळ जवळ नामशेषच झाल्याने अनेकाना पागोळ्या म्हणजे काय हे माहित ही नसेल कदाचित.

कौलारु घराच्या छपरावरून पावसाचं जे पाणी पडतं त्याला पागोळ्या म्हणतात. पावसाच्या जोरावर त्यांच्या धारेचा जोर ही अवलंबून असतो तरी त्यांचा येणारा लहान मोठा आवाज मनाला गुंगी घालतोच. पावसाचे चार महिने पाणी पडून पडून अंगणात बरोबर त्या जागी छोटे छोटे खड्डे पडत असत, पाऊस उलगला की अंगणी करे पर्यंत मुलं त्याचा उपयोग गोट्या खेळताना लागणारी गल म्हणून करत असत. घराच्या छपराच्या कोनात थोडी वेगळ्या तऱ्हेची कौलं घातली जातात आणि तिथली पागोळी नेहमीच फार मोठी पडते. दारच्या विहीरीला जरी तुडूंब पाणी असलं तरी ह्या पन्हळी खाली पाणी फुकट जाऊ नये म्हणून कायम बालदी ठेवलेली असते. तात्पुरतं रेन हार्वेस्टिंग. Happy

लहानपणी पागोळ्या बघायला मला फार आवडत असे. पावसाळ्यात तासन तास काही न करता मी नुसती पागोळ्या पाहत बसून राहू शकत होते. अभ्यास सोडून काय चाललंय हे म्हणून त्यासाठी अनेक वेळा आईची बोलणी ही खाल्ली आहेत. अजून ही कोकणात गेले पावसाळ्यात तर झोपाळ्यावर बसून ओटीच्या रेज्यांमधून खळ्यात पडणाऱ्या पागोळ्या बघताना अशी काही तंद्री लागते आणि मन इतकं काही हलकं होतं की विचारूच नका.

आम्हाला शाळेत असताना पागोळ्या नावाचीच एक सुंदर कविता होती. ती कविता कायम ओठावर येते पागोळया बघताना.
" पागोळ्या पडती झराझर किती ह्या पांढऱ्या गोजिऱ्या
गेहाच्या निटलावरी विलासती मुंडावळ्या साजिऱ्या "
अश्या त्याच्या पहिल्या दोन ओळी आहेत. एखाद गरीब घर ही
पागोळ्यांमुळे कसं श्रीमंत घर वाटतं त्याचं वर्णन केलं आहे. घराला थेंब रुपी मोत्यांच्या माळा लागतात, पाणी हिऱ्यांसारखं चमकतं वगैरे वगैरे… नेटवर ही आहे. मिळाली तर नक्की वाचा छानच आहे.

माझ्याकडे आमच्या कोकणातल्या घरातून दिसणाऱ्या पावसाचा आणि पागोळ्यांचा व्हिडिओ आहे आणि तो किती ही वेळा पाहिला तरी पुन्हा पहाताना मला तेवढीच मजा येतेय. इथे तो दाखवणे शक्य नाही म्हणून पागोळ्यांचा स्क्रीन शॉट घेऊन दाखवत आहे. तेवढीच दुधाची तहान ताकावर..

Screenshot_20260818_075354_Video Player_0.jpg

हेमा वेलणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! किती तरी दिवसांनी अंगणातला पाऊस आणि त्यासंबंधित आवडत्या गोष्टी नजरेसमोर पुन्हा आल्या.
कधीकधी खूप जोरात पाऊस पडतो तेव्हा पागोळ्यासुद्धा जोरात पाणी आल्यामुळे थोड्या पुढे जाऊन पडतात!
मलापण पाऊस बघायला आवडायचं. वरून पडणाऱ्या थेंबांमुळे अंगणातल्या पाण्यात बुडबुडे तयार व्हायचे आणि पाण्याबरोबर वहात पुढे जायचे. थोडे पुढे गेले की आपोआप किंवा वरून दुसरा थेंब पडल्यामुळे फुटायचे. बुडबुड्यांचा असा नजरेने पाठलाग करायला मजा यायची. किती तरी वेळ यात घालवता यायचा. (खरं तर यात काय आहे! पण मजा यायची हे खरं.)

सुंदर लेख! आमच्याकडेही खूप कॉमन होत्या पागोळ्या छताच्या रचनेमुळे. पावसाचा जोर छतावरच्या आवाजानेही लगेच समजायचा.

किती तरी दिवसांनी अंगणातला पाऊस आणि त्यासंबंधित आवडत्या गोष्टी नजरेसमोर पुन्हा आल्या. >>> हो!

इथे अमेरिकेत छताच्या खालच्या बाजूला एक मोठी पन्हाळी फिरवून घराच्या एका बाजूला तिचे पाणी सोडतात. त्यामुळे चारीबाजूनी पागोळ्या किवा खाली पडणारे पाणी दिसत नाही.

अरे मस्तच.. या पागोळया बघत बसायचे addiction मलाही होते. त्या आवाजाशी चटकन एकरूप व्हायला होते.
खालून वरच्या दिशेने बघताना त्याच्या बॅकग्राऊंडला आकाश दिसायचे. त्यावर एकटक बघत राहिले की असे वाटायचे की त्या पागोळया आपल्या जागी स्थिर आहेत आणि आपण त्यांना मागे सोडत प्रवास करत आहोत Happy

त्यात हात पुढे करून ओंजळ भरून ठेवायला सुद्धा मजा यायची. जोपर्यंत त्यात हात घालायचा मोह होत नाही तोपर्यंत ठीक, पण एकदा घातला की काढायची इच्छा होत नाही. मूठ कमीजास्त आवळून ओंजळीचा आकार बदलला तरी त्यातील पाण्याची डेप्थ बदलल्याने त्यात पडणाऱ्या पाण्याचा आवाज बदलतो. तो ही एक खेळच वाटू लागतो. त्यात कोकणात पाऊस सुरू झाला की एका लयीत चालूच राहतो. त्यामुळे एकदा या पागोळयात गुंतले की हिपनोटाईज व्हायला होते.
वावेनी वर म्हटले तसे पाण्यावर तरंगणाऱ्या बुडबुड्यांचा किंवा मग एखाद्या पानाफुलाचा नजरेने पाठलाग करा. म्हटले तर काहीच नाही यात पण तरीही या खेळात तेवढ्यापुरते सगळी दुःख चिंता विसरून काहीतरी सुकून मनाला नक्की गवसत असणार.

>>>>>आम्हाला शाळेत असताना पागोळ्या नावाचीच एक सुंदर कविता होती. ती कविता कायम ओठावर येते बघताना.
" पागोळ्या पडती झराझर किती ह्या पांढऱ्या गोजिऱ्या
गेहाच्या निटलावरी विलासती मुंडावळ्या साजिऱ्या "........मिळाली तर नक्की वाचा छानच आहे.

अरे वाह!! काय सुंदर ओळी आहेत. छान लेख आहे ममो.

"आम्ही दीन दरिद्रतेसह जिथे संकोचुनी राहतो।
त्या गेहावरूनी प्रवाह रजता आता तुझा वाहतो॥"
- कवि हरी सखाराम गोखले

खूप छान लेख आहे.

मलाही माझ्या माहेरच्या गावातला पाऊस आवडतो. माहेरच्या घराच्या वरचं छप्पर अजून कौलारू आहे. ओट्याला ( घराचा मोकळा व्हरांडा ) त्याला पत्रे आहेत. मागच्या पडवीच्या कौलावरून पावसाच्या धारा बघायला मलाही आवडायचं. पावसाळ्यात नेहमी वीजेचा लपंडाव असायचा मग नळाच्या पाण्याचाही प्रॉब्लेम .. मी घासायची भांडी, धुवायचे कपडे पायऱ्यांवर पडणाऱ्या पावसाच्या धारांखाली नेऊन ठेवायचे.

घर गावाच्या एका टोकाला असल्याने बाजूला पूर्ण शेती होती. लांबवरून येणारा पावसाच्या पाण्याचा लोंढा आमच्या अंगणातून वाहायचा. घराबाजूच्या शेताच्या पुढे खाजन ( समुद्र आणि खाडीच्या बाजूचा भाग, जिथे मिठागरे असतात..) आहे .. तिथे जाऊन मिसळायचं पुराचं पाणी. जेव्हा खूप पाऊस पडायचा तेव्हा दारात मोठे-मोठे खड्डे पडायचे. एकदा तर गावातल्या बाजूच्या एका अंगणात सकाळीच वीज कोसळून खड्डा पडला होता. त्या घरातल्या काकू सुदैवाने वाचल्या होत्या.

सातवीत होते तेव्हा त्यावर्षी खूप पाऊस पडलेला.. अंगणात मोठाले खड्डे पडले होते.. त्यातून एक ( छत्रपतींची प्रतिमा असलेले ) शिवकालीन नाणे सापडले होते मला.. बरीच वर्ष जपून ठेवले होते.. नंतर बेपर्वाई नडली. पुढे काही वर्षाने नाणे कुठे हरवले काही कल्पना नाही.

हल्ली काही लेख , कविता वाचून भूतकाळातल्या माझ्या निद्रिस्त आठवणी जाग्या होऊ पाहताहेत.

Urmilas, वावे, सामी, फारएन्ड, ऋन्मेऽऽष, सामो , रुपाली धन्यवाद.
वावे, फारएंड, ऋन्मेऽऽष, सामो , रुपाली प्रतिसाद , आठवणी खूप आवडल्या.

गणपतीला गावी जायचो तेव्हा गावाच्या पावसाची मजा घेता यायची. तुम्ही टाकलेला व्हिडीओ पाहून आमच्याच अंगणात उभा आहे असे अनुभवता आले. धन्यवाद ममो

खुप छान लिहिलय!
पागोळ्या कविता इंटरनेटवर शोधून वाचली, खूप आवडली.