सहवास तो सुखाचा!

Submitted by पराग र. लोणकर on 17 August, 2026 - 05:28

सहवास तो सुखाचा!

प्रतीक पल्लवीपेक्षा चार-पाच वर्षांनी मोठा. दोघेही एकाच कार्यालयात कामाला होते. सुरुवातीला पल्लवी जॉइन झाल्यावर तेथे आधीपासूनच असलेल्या प्रतीकशी तिचा केवळ कामापुरताच संवाद होता. पण प्रतीकनं एकदा तिला लग्नासाठी प्रपोज केलं, आणि तिनंही होकार दिला.

पण प्रत्येक प्रेमकहाणीचा शेवट सुखद होत नाही. काही कारणांमुळे पल्लवीच्या घरच्यांचा विरोध झाला आणि दोघांनाही आपले प्रेम दूर सारावे लागले.

दोघांनीही आपापल्या आयुष्याच्या वेगळ्या वाटा धरल्या. प्रतीकचं लग्न झालं, आणि काही काळाने पल्लवीचंही! सुरुवातीला एकमेकांशी संपर्क तुटला. पण काही वर्षांनी ई-मेलवर पुन्हा संवाद सुरू झाला.

त्या संवादात कोणतीही तक्रार नव्हती. कोणताही अपराधभाव नव्हता. फक्त एक जुनी, मनाच्या कुठल्यातरी शांत कोपऱ्यात अजूनही जिवंत असलेली माया होती, प्रेम होतं.

ते ई-मेलवर नियमित संवाद साधू लागले. जुन्या आठवणींबद्दल. कधी आपापल्या मुलांबद्दल. कधी आयुष्याबद्दल. आणि अगदी कधी आपल्या जोडीदाराबद्दलही.

दोघांचेही संसार चांगले झाले होते. दोघांनीही आपापल्या जोडीदारांवर प्रेम केले होते. जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. मुलांना मोठे केले होते. आयुष्याने त्यांना जे काही दिले होते, त्याबद्दल त्यांना समाधान होते. ते त्यांनी मनापासून स्वीकारले होते.

तरीही प्रतीकच्या मनात एक छोटासा कोपरा कायम रिकामा राहिला होता.

आणि त्या कोपऱ्यात पल्लवी होती.

तो कधी; खरं तर अनेकदा; स्वतःलाच विचारायचा—
‘पल्लवीबरोबर आपला संसार झाला असता तर आपले आयुष्य कसे असते?’

पण त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे कधीच नव्हते. काळ त्याच्या गतीने; पण वेगाने पुढे जात होता.

एके दिवशी पल्लवीने ई-मेलमध्ये लिहिले- ती तिच्या ट्रेकिंग ग्रुपबरोबर, नऊ-दहा दिवसांच्या ट्रेकला जाणार होती. आता असंख्य वेळा त्या ग्रुपबरोबर जाऊन ती त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमधील एक झाली होती.

प्रतीकने तो मेल वाचला, आणि काही वेळ तो स्क्रीनकडे पाहत राहिला.
आणि मग त्याने लिहिले—
‘मी या ट्रेकला आलो तर तुला चालेल?’

पल्लवीचे उत्तर अगदी लगेच आले. त्यात हे का शक्य नाहीये, हे तिने स्पष्ट केले होते. तिला असंख्य ट्रेकचा अनुभव होता. चढ-उतार, दगडधोंडे, जंगलवाटा, लांब चालणे, सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा प्रवास— हे तिच्यासाठी नवीन नव्हते. पण प्रतीकसाठी मात्र हे सगळे अगदी नवीन होते. शरीराला याची काहीच सवय नव्हती. आणि नाही म्हटलं तरी आता प्रतीकचं वयही या सगळ्यात थोडं अडथळा आणेल असं होतं.

तिचं उत्तर वाचून तो काही क्षण थांबला. आणि त्यानं पुन्हा आग्रही मेल केला.
‘तुझ्याबरोबर काही दिवस घालवण्याची संधी, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट असेल. एक आश्वासन देतो, इतर लोकांप्रमाणेच माझे तुझ्याशी आचरण असेल. काहीही अतिशहाणपणा माझ्याकडून होणार नाही. प्लीज नाही म्हणू नकोस.’

पल्लवीनं त्या वाक्याला लगेच उत्तर दिलं नाही. पण बऱाच विचार करून तिनं उत्तर दिलं, ‘तुम्हाला यायचं असेल, तर जरूर या. मी संस्थेच्या सहकाऱ्यांशी बोलले आहे. ट्रेकचा सर्व तपशील पाठवून ठेवत आहे.’ (हो, नोकरी करतानापासून पल्लवी प्रतीकला अहोजाहोच करत असे.)

प्रतीकनं धन्यवाद देणारा मेल पाठवला, आणि आपली नोंदणी करून टाकली.

ट्रेक सुरू झाला.

पहिले काही दिवस प्रतीकचा उत्साह कायम होता. नंतर मात्र त्याला थकवा जाणवू लागला. डोंगर, चढाई, धुके, सततच्या पावसाच्या सरी, आणि अखंड चालणं.

पल्लवी शक्य तितकी त्याच्या जवळ असे, पण अंतर राखून. इतरांसारखाच त्याच्याशी संवाद होता. कुणालाच त्यांची पूर्वीची ओळख असेल असे अजिबात जाणवून न देणारा.

आयुष्याने त्यांना उशिरा एक अशी संधी दिली होती, जिथे ते एकमेकांच्या सहवासात राहू शकत होते— अर्थात कुठल्याही अपेक्षेशिवाय. प्रतीकला त्या काही दिवसांत एक विलक्षण समाधान मिळालं.

त्याला पल्लवीबरोबर संसार करता आला नव्हता. पण आता तिच्याबरोबर एकत्र चालता येत होतं. तिचं बोलणं ऐकता येत होतं, ज्याच्या एके काळी तो प्रेमात पडला होता. तिचं मनमोकळं, गोड हसणं पाहता येत होतं. संध्याकाळी थकून सर्व जण एकत्र बसल्यावरही तिच्याशी काही मनसोक्त गप्पा मारता येत होत्या. इतकंच तर हवं होतं त्याला.

पाचव्या दिवशी सकाळी प्रतीक ठरलेल्या वेळी उठू शकला नाही. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं, आलेल्या थकव्यामुळे असेल. नवीन मंडळींच्या बाबतीत असं त्यांनी गृहीत धरलेलंच असतं. पण दुपारपर्यंत त्याची प्रकृती बिघडत गेली. डॉक्टरांची मदत घेतली गेली. परिस्थिती गंभीर असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. आणि प्रतीकच्याही!

प्रतीकनं पल्लवीला बोलावलं.

‘मला तुझ्याशी थोडं एकटं बोलायचं आहे.’

पल्लवी त्याच्याजवळ बसली. काही क्षण दोघेही शांत होते.

मग प्रतीक हळू आवाजात म्हणाला—
‘पल्लवी... तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम असतानाही माझ्या बायकोला मी सगळं सुख देण्याचा प्रयत्न केला. तिच्या वाट्याचं प्रेम तिला पुरेपूर दिलं. तिला काही कमी पडू दिलं नाही. मी गेल्यानंतरही तिला काही कमी पडणार नाही. तिच्यासाठी पुरेसं ठेवलं आहे. मुलंही स्वतःच्या पायावर उभी आहेत. आता कोणतीही मोठी जबाबदारी शिल्लक नाही.’

तो थोडा थांबला.
‘आणि हे सर्व करताना तुझ्याबद्दलही माझ्या मनात कायम हळव्या भावना राहिल्या.’

पल्लवीनं त्याच्याकडे पाहिलं.
‘आणि मला याबद्दल कधीच अपराधी वाटलं नाही. कारण खरं तर आपण एकत्र यायला हवं होतं, आपला संसार व्हायला हवा होता, असं माझं कायमच मत राहिलं आहे. माझा देवावर अतिशय विश्वास आहे. तरी देखील आपल्याला एकत्र येऊ न देऊन देवानं आपल्यावर- निदान माझ्यावरतरी अन्यायच केला आहे, असं मला कायम वाटतं. माझ्या सर्व सांसारिक जबाबदाऱ्या आता पूर्ण झाल्या आहेत. आयुष्यात आता काही करायचं, मिळवायचं राहिलं नाहीये. तुझा काही काळ निर्भेळ सहवास मिळावा अशी इच्छा होती, तीही या ट्रेकने पूर्ण झाली.

मात्र या आयुष्यात तुझ्याबरोबर संसार करता आला नाही. तुझ्याबरोबर सकाळचा चहा घेता आला नाही. तुझ्याबरोबर कुठे फिरता आलं नाही, प्रवास करता आला नाही, एखाद्या साध्या, सामान्य, नेहमीच्या संध्याकाळी घरात बसून, तुझ्याबरोबर गप्पा मारता आल्या नाहीत, याची वाटत असलेली खंत काही केल्या दूर होत नाहीये. या माझ्या इच्छा या जन्मात कधीच पूर्ण होणार नाहीत, याचीही मला आपण दूर झाल्यापासून इतकी वर्षे कायम कल्पना होती. पण अगदी प्रामाणिकपणे सांगू, या सर्व वर्षांत माझ्या मनात एकच इच्छा होती, पण तीही आता पूर्ण होईल असं वाटत नाही.’

पल्लवीने त्याच्याकडे पाहिले.
‘कोणती?’

तो हळूच म्हणाला—
‘दोन मित्र किंवा मैत्रिणी जशा कोणतीही वेगळी भावना मनात न ठेवता एकमेकांना जवळ घेऊ शकतात, तशा भावनेने- तुझ्याबद्दल वाटणाऱ्या कमालीच्या मायेमुळे, आत्मियतेमुळे, आपुलकीमुळे तुला एकदा जवळ घ्यावं अशी माझी खूप इच्छा होती.’

पल्लवी स्तब्ध झाली. तिच्या मनात असंख्य विचारांची गर्दी झाली. इतकी वर्षे जपलेली मर्यादा. दोघांचे संसार. त्यांचे कुटुंब. त्यांच्या नात्याचा सगळा इतिहास.

आणि समोर मृत्यूशी झुंजणारा तो माणूस... ज्याने तिच्यावर अगदी मनापासून प्रेम केले होते.

तिनं त्याच्याकडे पाहिलं. त्याला हळूच बसवलं. त्याच्या शरीरात आता शक्ती उरली नव्हती. तरीदेखील त्याने आपले दोन्ही हात पुढे केले आणि पल्लवीने त्याला स्वत:ला जवळ घेऊ दिले.

ती मिठी क्षणभराची होती. त्यात कुठेही वासनेचा गंध नव्हता. तशी ती वासना त्याच्या मनात कधीच नव्हती. अगदी तिला ‘प्रपोज’ केल्यापासून आत्तापर्यन्त.

होतं ते निष्पाप, निर्मळ प्रेम!

पल्लवीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. प्रतीकच्या चेहऱ्यावर मात्र शांत असं समाधान होतं.

त्यानं डोळे मिटले आणि तिच्या मिठीतच त्याचा श्वास थांबला.

पल्लवी बराच वेळ तशीच बसून राहिली. आपल्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती- जिला आपण तिच्या शेवटच्या प्रवासात आपला सहवास लाभू दिला होता. आपल्याशी मनसोक्त गप्पा मारू दिल्या होत्या. आणि शेवटी... त्याची शेवटची इच्छा आपल्याला पूर्ण करता आली होती.
दुःख होते. खूप होते. पण त्या दुःखामध्ये एक खोल समाधानही मिसळले होते.

तिने त्याला त्या ट्रेकला येण्याची परवानगी दिली नसती, तर? कदाचित त्याची ही शेवटची इच्छा कायमची अपूर्णच राहिली असती.

पल्लवीनं डोळे पुसले. डोंगरांच्या पलीकडे संध्याकाळ उतरत होती. वारा शांतपणे वाहत होता.

आणि तिच्या मनात एकच विचार उमटला— काही प्रेमकहाण्या संसारात परिवर्तीत होऊ शकत नाहीत. पण अगदी वेगळ्या प्रकारे एखादी प्रेमकहाणी पूर्णही होऊ शकते.

एक शांत, सुंदर आणि समाधान देणारा शेवट अशा प्रेमकहाणीला मिळूही शकतो.

*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults