#नागपंचमी
परंपरेच्या पाऊलखुणा
नागपंचमीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सुलभा(निवृत्त जीवशास्त्र प्राध्यापिका) स्वयंपाकघरात कामात गुंतली होती. डायनिंग टेबलावर काकडी, कार्टुली, कोथिंबीर आणि इतर भाज्यांचे ढीग मांडलेले होते. गॅसवर पुरण तयार होत होतं. बाजूच्या डब्यांत फुलोरा—करंज्या आणि साटोऱ्या—आधीच करून ठेवलेल्या होत्या.
पुण्यातल्या त्या फ्लॅटमध्ये श्रावणसरींचा मंद आवाज येत होता.
सुलभा स्वच्छतेबाबत काटेकोर होती. सोवळं-ओवळं पाळत होती, पण त्यामागे अंधश्रद्धेपेक्षा शिस्त, स्वच्छता आणि आरोग्य यांचा विचार होता. कॉलेजमध्ये जीवशास्त्र शिकवताना तिने विद्यार्थ्यांना नेहमी सांगितलं होतं—
"एखादी गोष्ट पिढ्यान्पिढ्या टिकली असेल, तर तिच्यामागचं कारण शोधून बघा. काहीतरी शिकण्यासारखं नक्की सापडेल. प्रत्येक गोष्टीमागचं कारण शोधा. कारण समजलं की श्रद्धा अधिक दृढ होते आणि समजही वाढते."
आज घरात फक्त ती, तिचा मुलगा आणि नात ओजस्वी होते. ओजस्वीची आई मनीषा कंपनीच्या कामासाठी दिल्लीला गेली होती आणि आजोबा मित्रांसोबत सहलीला गेले होते.
ओजस्वी हॉलमध्ये बसून काही स्केचेस काढत होती. व्यवसायाने आर्किटेक्ट, मनाने कलाकार. पण प्रत्येक गोष्टीमागचं कारण शोधणं हा तिचा स्वभाव होता. लहानपणापासून आजीभोवती फिरत फिरत तिला प्रश्न विचारायची सवय लागली होती.
ती आजीकडे बघत म्हणाली,
"आजी, एवढी तयारी कशाची?"
"उद्या नागपंचमी आहे."
"पण आजच सगळं का?"
सुलभा आजीने हात पुसले.
"कारण उद्या कापाकापी, चिराचिरी, तळण टाळतात. म्हणून आपण भाज्या आज चिरून ठेवतो. फुलोरा, साटोऱ्या आणि पुरणही आधी करून ठेवतो."
तेवढ्यात तिने हातातली करटूली उचलली.
"आणि ही बघ करटुली. वर्षभर फारशी दिसणार नाही, पण श्रावण आला की बाजारात हमखास दिसते. औषधी गुणांनी भरलेली भाजी आहे ही."
"म्हणजे?"
"आपल्या पूर्वजांना ऋतूनुसार काय खावं हे चांगलं माहीत होतं. म्हणून श्रावणात कार्टुली, तोंडली, पडवळ, पालेभाज्या यांना महत्त्व असायचं. आज ज्याला सीझनल न्यूट्रिशन म्हणतात, तेच."
"म्हणजे सण आणि आहार यांचाही संबंध आहे?"
"अगदी आहे."
"म्हणजे नियम?"
"नियम नाही गं, एक पद्धत. सणाच्या दिवशी कामाचा ताण कमी व्हावा, सगळ्यांना वेळ मिळावा, शरीरालाही योग्य आहार मिळावा—असे अनेक विचार त्यामागे असू शकतात."
ओजस्वी विचारात पडली.
तेवढ्यात बाबा ऑफिसमधून आले.
"काय मदत करू?"
"करटुली धुवून दे. आणि त्या डब्यातला फुलोरा वरच्या शेल्फवर ठेव."
"आज्ञा शिरसावंद्य!"
बाबा लगेच कामाला लागले.
ओजस्वीने हसत ते दृश्य पाहिलं.
तिने लहानपणापासून एक गोष्ट पाहिली होती. घरात कामांची विभागणी स्त्री-पुरुषांप्रमाणे होत नसे. आई ऑफिसमधून उशिरा आली की बाबा स्वयंपाक करायचे. कधी डबा भरायचे, कधी भाजी चिरायचे.
बाबा नेहमी हसत म्हणायचे,
"तुझी आई नोकरी करत होती म्हणून माझ्या आईने मला लहानपणापासून स्वयंपाक शिकवला. भूक लागली की पुरुष असो वा स्त्री, पोळी स्वतःलाच भाजावी लागते!"
चहा घेताना ओजस्वीने प्रश्न विचारलाच.
"आजी, खरंच सांग. आपण शहरात राहतो. साप दिसतही नाहीत. मग नागपंचमी का साजरी करायची?"
सुलभा आजीच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.
तिला हा प्रश्न आवडला.
"कारण हा सण सापाबद्दल कमी आणि निसर्गाबद्दल जास्त आहे."
"म्हणजे?"
"पावसाळ्यात सापांची बिळं पाण्याने भरतात. ते बाहेर येतात. पूर्वी शेतकरी दिवसभर शेतात असायचे. साप भेटण्याची शक्यता वाढायची. लोकांनी भीतीपोटी त्यांना मारू नये म्हणून आदराची भावना निर्माण झाली."
"पण पूजा?"
"आज आपण जैवविविधता म्हणतो ना? इकोसिस्टम म्हणतो ना? त्याचाच हा सांस्कृतिक धडा आहे."
सुलभा आजी पुढे म्हणाली,
"साप उंदीर खातात. उंदीर धान्य खातात. म्हणजे साप अप्रत्यक्षपणे अन्नसाखळी टिकवतात. म्हणून नागाला शेतकऱ्याचा मित्र मानलं गेलं."
ओजस्वी मन लावून ऐकत होती.
"आणि दूध?"
"खऱ्या सापाला दूध पाजू नये. तो त्याचा नैसर्गिक आहार नाही. पण दूध हे पोषणाचं प्रतीक आहे. नारळ समृद्धीचं. फुटाणे म्हणजे धान्याचं प्रतीक. हे सगळं कृतज्ञता व्यक्त करण्याचं माध्यम आहे."
खिडकीबाहेर पाऊस वाढत होता.
आजी पुढे म्हणाली,
"आपल्या धर्मात निसर्गपूजा च आहे. वड, पिंपळ, तुळस, नदी, पर्वत, गाय, नाग. कारण माणूस निसर्गापासून वेगळा नाही. तो त्याचाच भाग आहे."
त्या वाक्यावर ओजस्वी बराच वेळ विचार करत राहिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी नागपंचमीची पूजा झाली.
फुटाणे, नारळ, दूध, फुलोरा आणि इतर नैवेद्य मांडले गेले.
दिंडासाठी पुरणाचे सारण भरले जात होते.
आजी काम करत होती, बाबा मदत करत होते आणि ओजस्वी दोघांचं निरीक्षण करत होती.
"मी काय करू?" ती म्हणाली.
"दिंडाला घड्या घालायला शिक."
"म्हणजे महाराष्ट्रीयन मोमोज?"
आजी हसली.
"अगदी!"
दुपारपर्यंत दिंड तयार झाले. घरभर गुळ, पुरण आणि वाफेचा सुगंध दरवळू लागला.
जेवताना बाबा अचानक म्हणाले,
"माहितीय ओजू, माझ्या लहानपणी नागपंचमी म्हणजे वर्षातला आवडता सण असायचा."
"का?"
"शाळेला सुट्टी. झोके. मित्र. दिंड. पाऊस. आणि आईचा ओरडा."
"ओरडा कशासाठी?"
"दिंड जास्त खाल्ले म्हणून."
सगळे हसले.
बाबा पुढे म्हणाले,
"आमच्या गावात नागपंचमीला बहिणी झिम्मा-फुगडी खेळायच्या. आम्ही मित्र झाडांवर झोके बांधायचो. सण म्हणजे फक्त पूजा नव्हती. लोकांना एकत्र आणण्याचा मार्ग होता."
ओजस्वी शांतपणे ऐकत होती.
तिला जाणवत होतं की सण म्हणजे फक्त परंपरा नसते. ती आठवणींची साखळी असते.
सायंकाळी पाऊस पुन्हा सुरू झाला.
आई दिल्लीत असल्यामुळे रात्री जेवायला काय करायचं यावर चर्चा सुरू होती.
"आज रात्री मोमोज बनवूया का?" बाबांनी विचारलं.
"नागपंचमीला?" ओजस्वीने आश्चर्याने विचारलं.
"का नाही?" आजी म्हणाली.
"पण..."
"अगं, आजच्या पदार्थांमागचा एक विचार म्हणजे वाफवलेले, हलके आणि पचायला सोपे अन्न. मोमोजही वाफवलेलेच असतात."
बाबा लगेच म्हणाले,
"म्हणजे आज नागपंचमी स्पेशल इंटरनॅशनल मेन्यू!"
क्षणात तिघेही कामाला लागले.
बाबा पीठ मळत होते.
ओजस्वी सारण तयार करत होती.
आजी मोमोजच्या घड्या घालत होती.
"आजी, हे इतकं छान जमतं तुला?"
"अगं, दिंड करणाऱ्यांना मोमोज काय अवघड?"
सगळे हसले.
एक मोमो हातात घेत आजी म्हणाली,
"खरं सांगू? दिंड आणि मोमोज हे चुलत भाऊ-बहीणच वाटतात मला."
"कसं काय?"
"दोघंही सारण भरून वाफवलेले. फक्त एकाचा जन्म महाराष्ट्रात आणि दुसऱ्याचा हिमालयाच्या पलीकडे."
हशा पिकला.
त्या रात्री मात्र ओजस्वी बराच वेळ जागी होती.
आजीच्या बोलण्यात तिला उपदेश नव्हता.
भूतकाळाचं अंध स्तुतीगान नव्हतं.
प्रश्नांना राग नव्हता.
फक्त समजावून सांगण्याची तयारी होती.
तिने तिचा कॅनव्हास उघडला.
रंग काढले.
आणि चित्र सुरू केलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुलभा आजी हॉलमध्ये आली आणि थबकली.
भिंतीला टेकवून एक मोठं कॅनव्हास उभं होतं.
ओजस्वीने रात्रभर जागून चित्र पूर्ण केलं होतं.
गौड शैलीतील एक भव्य नाग.
त्याच्या वेटोळ्यांमध्ये हिरवीगार शेतं होती. धान्याची कणसं होती. पावसाच्या रेषा होत्या. बेडूक, पक्षी, फुलपाखरं, झाडं, ओढे आणि नद्या होत्या.
नागाच्या प्रत्येक वळणातून जणू निसर्गाचीच गोष्ट उलगडत होती.
चित्राखाली काहीही लिहिलेलं नव्हतं.
फक्त एका कोपऱ्यात छोट्याशा अक्षरांत लिहिलं होतं—
"ओजस्वी — श्रावण, २०२६"
सुलभा आजी बराच वेळ चित्राकडे पाहत राहिली.
तिला अचानक जाणवलं— कालपर्यंत प्रश्न विचारणारी तिची नात आज उत्तर रंगवून ठेवून गेली होती.
शब्दांशिवाय.
रंगांमध्ये.
तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
ओजस्वी धावत आली.
"आजी, एवढं वाईट झालं का?"
आजीने तिचा हात हातात घेतला.
"वेडाबाई! उलट खूप सुंदर झालं."
"मग रडतेस का?"
सुलभा आजी हसली.
"कारण मला वाटलं होतं मी तुला नागपंचमी समजावतेय. पण तू तर तिचा आत्माच रंगवून दाखवलास."
तेवढ्यात बाबा स्वयंपाकघरातून ओरडले,
"अहो कलाकारांनो, भावना नंतर व्यक्त करा. उरलेले दिंड गरम केले आहेत!"
सगळे टेबलाभोवती जमले.
पहिला घास घेत बाबा म्हणाले,
"पुढच्या वर्षी दिंड कोण करणार?"
"आपण तिघे."
ओजस्वीचं उत्तर लगेच आलं.
"मी सारण."
"मी उकड."
बाबा म्हणाले.
"आणि मी निरीक्षण करणार," आजी खोडकरपणे म्हणाली.
"अगं नाही! तू मुख्य सल्लागार."
पुन्हा एकदा घरभर हशा पसरला.
खिडकीबाहेर श्रावणधारा कोसळत होत्या.
टेबलावर नागपंचमीचा नैवेद्य होता.
भिंतीवर ओजस्वीचा नाग हसत उभा होता.
आणि सुलभा आजीच्या मनात एक उबदार विचार तरळत होता—
परंपरा पुढच्या पिढीकडे जातात त्या प्रश्न न विचारता मान डोलावल्याने नाही, तर प्रश्न विचारण्याची मोकळीक आणि उत्तर समजून घेण्याची तयारी दोन्ही जिवंत राहिली की. तेव्हाच त्या परंपरेच्या पाऊलखुणा काळाच्या ओघातही जपल्या जातात.
मुग्धा देवळे
खुप छान
खुप छान