
(अनुभव मार्च - २0२६ पूर्वप्रकाशित
ललिता- प्रीतीने मुद्रितशोधनासाठी मदत केली आहे. )
द क्वीन्स गॅम्बिट : चौसष्ट चौरसांतली शांतता
'तुझ्या आसपास अनेक पुरुष येतील आणि तुला ते सांगत राहतील तू काय करायला हवं, तुला कशाबद्दल काय
वाटायला हवं, तुझ्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. पण तू मात्र तेच कर जे तुला योग्य वाटेल!'-
९-१0 वर्षांची बेथ हार्मन आपल्या आईचं हे बोलणं लक्षपूर्वक ऐकतेय... आई ॲलिस, गणितात डॉक्टरेट केलेली,
वडिलांपासून विभक्त होऊन दूर निघाली आहे, गाडी चालवताना मागच्या सीटवर बसलेल्या आपल्या मुलीशी
बोलतेय, बेथला पुढच्या आरश्यात आईचे फक्त डोळे दिसतायत... दुदैवाने हा मायलेकींमधला शेवटचाच संवाद
ठरतो. कारचा अपघात होतो. ॲलिस त्यात दगावते. बेथला मात्र साधं खरचटत सुद्धा नाही- अर्थात बाह्य शरीरावर.
कोवळ्या वयातला मनावरचा हा आघात तिला कायमचा खोल व्रण देऊन जातो.
नेटफ्लिक्सवरची 'द॒ क्वीन्स गॅम्बिट' ही मालिका म्हणजे एलिझाबेथ हार्मन नावाच्या या अनाथ मुलीच्या संघर्षाची
गोष्ट आहे. व्यसनाधीन झालेली, सोशली ऑकवर्ड असणारी, पण बुद्धिबळातील ग्रँडमास्टर होण्याची मोठी स्वप्नं
पाहणारी एकटी, एकाकी बेथ.
१९४0-६0 च्या दशकात, म्हणजे शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेतील केंटकी, लेक्सींटन इथे मालिकेचं कथानक
उलगडतं. त्या काळात स्त्रियांनी बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेणं प्रचलित नव्हतं. त्यांनी आक्रमकपणे खेळून पुरुषांना
हरवणंही सर्वमान्य नव्हतं. मुलींना नृत्य, गृहोपयोगी कला, फार तर पत्ते वगैरेंच्या क्लबात जाण्याला प्रोत्साहन दिलं
जायचं. त्यामुळे बेथसाठी हा लढा अनेक प्रतलांवरचा असतो.
या लढ्यात तिला बुद्धिबळ कुठे आणि कसं भेटतं?
बेथच्या एकटेपणामागे केवळ मायेची माणसं किंवा कुटुंबाचा अभाव इतकंच कारण नसतं. ती अतिशय बुद्धिमान-
गिफ्टेड असते; भावनिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या इतरांपेक्षा वेगळ्या प्रतलावर असते. त्यामुळे तिला समजून
घेऊ शकणारं कोणी नसतं. असं म्हणतात, की 'लोन्लीनेस इज अ ह्युमन कन्डिशन, इट हॅपन्स टु एव्हरीवन फ्रॉम
टाइम टु टाइम!' पण बेथचा एकाकीपणा तिचा पिच्छा पुरवतो. तो तिच्या मोठमोठ्या, सताड, रिक्त डोळ्यांत कायम
दिसतो. तिथून तो आपल्यापर्यंत पोचतो देखील.
कार अपघातात आई दगावल्यानंतर अंगावरच्या झग्यानिशी बेथची रवानगी केंटकीच्या 'मेथुएन' नावाच्या मुलींच्या
अनाथाश्रमात होते. मुळातच इंट्रोव्ह्ट असलेली बेथ अधिकच अलिप्त होऊन जाते.
अनाथाश्रमातल्या स्त्रिया तशा चांगल्याच असतात, पण तिथे मायेचं वातावरण नसतं. तिथल्या सारख्याच कपड्यांमधल्या सहा ते सोळा वर्षांच्याअनेक मुलींमध्ये तिला बावरायला होतं. ती गप्पगप्प असते, पण तिचं निरीक्षण चालू असतं. त्या काळात लहान मुलांनी लवकर झोपावं, त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागू नये म्हणून त्यांना सर्रास गुंगीचं औषध दिलं जायचं. आश्रमातही ही पद्धत असते. चांगल्या व सुदृढ वाढीसाठी रोज या निळ्या गोळ्या घ्यायच्या असतात, असा मुलींचा समज करून दिला गेलेला असतो. या गोळ्यांची आधी सवय व नंतर व्यसन जडतं बेथला! एकटेपणा आणि
व्यसनाधीनता तशी हातात हात घालूनच चालते.
हळूहळू आश्रमातलं वातावरण तिच्या अंगवळणी पडायला लागतं. तरीही आईचं विचित्र वागणं, वडिलांपासून विभक्त
होणं, नंतरचा अपघात या आठवणींची बाधा तिच्या मनाला झालेली असते. (त्याबद्दल इथे अधिक सांगणं उचित
ठरणार नाही.) त्यामुळे बालमनाला अनेक प्रश्न पडलेले असतात, उत्तर ढेण्याइतकं विश्वासू कुणी नसतं, स्वतः
घडाघडा बोलावं असा स्वभाव नसतो. यातून एकटेपणा मुरत मुरत जातो.
अशातच शाळेतील कवितांना कंटाळलेल्या बेथला फळा पुसण्याचं, डस्टर धुण्याचं काम मिळतं. त्यासाठी तिला
वरचेवर तळघरात जावं लागतं. ही सुटका तिलाही हवीच असते. तळघरात सफाई कर्मचारी मिस्टर शायबेल एकटाच
बुद्धिबळ खेळण्यात मग्न असलेला दिसतो. तिचं कुतूहल चाळवतं. ते पाहून तो तिला शिकवायला सुरुवात करतो.
त्यालाही एक छोटी सोबतीण मिळते. तळघरातील अंधारात बुद्धिबळ खेळत-खेळत दोघांमध्ये जिव्हाळ्याचं नातं
निर्माण होतं. दोघंही तसे अबोलच असतात, पण बुद्धिबळाबद्दल ते जे काही बोलत असतात त्यातूनच हा आपलेपणा बहरायला लागतो. वरवर हे नातं अलिप्त वाटतं, पण बेथला यातून खूप काही मिळत जातं.
बेथ भराभर बुद्धिबळ शिकत जाते. शायबेल तिला हार मानायची गरज शिकवतात. पराजय स्विकारणं खेळाचा आणि
पर्यायाने आयुष्याचा भाग आहे हे तिला कळतं. आवडत नसतंच, पण कळतं. प्रोफेशनली खेळताना जो एक ॲटिट्यूड
आणि ग्रेस लागते, ते देखील पहिल्यांदाच तिला कुणीतरी शिकवतं. लवकरच शायबेलना तिच्यातील असामान्य
क्षमतेची कल्पना येते. ते केंटकीतील एका हायस्कूलच्या चेस क्लबातील शिक्षकांशी तिची ओळख करून देतात. ते
शिक्षक आठवड्यातून एकदा तिची हायस्कूलमध्ये येऊन खेळण्याची व्यवस्था आनंदाने करतात. अनाथाश्रमाच्या
संचालिकाही याला दुजोरा देतात. बेथ त्या क्लबात नियमित जायला लागते. एकदा वयाने तिच्या दुप्पट असलेल्या
१0-१२ मुलांशी एकाच वेळी खेळून त्यांना हरवून येते. आल्याबरोबर शायबेलना आठवणीने सांगते- 'मला त्यांना
हरवून फार बरं वाटलं.'
बेथला बुद्धिबळाच्या चौसष्ट चौरसांमध्ये शांत वाटतं. त्या प्याद्यांमध्ये, खेळींमध्ये कुठेतरी आयुष्यावर नियंत्रण
आल्यासारखं वाटतं. पण या पटाबाहेर ती विखुरलेलीच असते. आईने तिला नेहमीच बाळकडू दिलेलं असतं, की
'जगात तू नेहमी एकटीच असणार आहेस, जगायचं कसं ते तुला स्वतःलाच शिकावं लागणार आहे.' ते तिच्या
आठवणींत कायम असतं. त्यामुळे ती एकटेपणा आवडून घेणारी पण सोबतीसाठीही आसुसलेली असते.
अचानक अनाथाश्रमातील गुंगीच्या औषधांवर बंदी येते. तोवर बेथ त्याच्या आहारी गेलेली असते. गिफ्टेड आणि
जिनियस तर ती असतेच. पण या औषधांमुळे तिच्या मनातले संततधारेसारखे विचार काही काळ थांबवून ती
एकाग्रता बुद्धिबळासाठी वापरायचं तिला कळलेलं असतं. रोज रात्री मनातच पट मांडून, कल्पनेतच खेळ खेळून
स्वतःच स्वतःला ती शिकवत असते. पण या गोळ्या बंद झाल्याने तिला पुन्हा हतबल वाटतं. ती त्या गोळ्या
चोरायच्या ठरवते. लहानगी बेथ गुपचूप जाऊन मोठ्या बरणीतील या गोळ्या मुठीने तोंडात कोंबताना व नंतर
धाडदिशी कोसळताचं दृश्य अस्वस्थ वाटावं इतकं परिणामकारक झालं आहे. या घोडचुकीची शिक्षा म्हणून तिचा चेस क्लब बंद होतो. मग ती आणखीनच हरवल्यासारखी होते. शायबेलना तिच्याबद्दल कणव असते. पण ते तिला
सांगतही असतात, की हे तुझं निसर्गाने दिलेलं वरदान आहे, त्या बदल्यात आयुष्य तुझ्याकडून खूप काही हिरावून
घेत राहणार आहे. कारण बहुतेक वेळा असामान्य किंवा दैवी वाटावी अशी प्रतिभा बऱ्याच सोसण्यातून फुललेली
असते. ज्यांच्या वाट्याला बेथसारखी काटे येतात त्यांच्या अनवट वाटा कुठेतरी आधीच ठरलेल्या असतात.
या सगळ्यात व्हिटली नावाचं एक दांपत्य अनाथाश्रमात येतं. त्यांना एक मुलगी दत्तक घ्यायची असते. विशेषत:
मिसेस व्हिटलींना बेथ आवडते. दरम्यान बेथला आश्रमातील वातावरणाची सवय झालेली असते. जड मनाने आणि
बर्याच शंकाकुशंका घेऊन ती सर्वांचा निरोप घेते. आश्रमात ज्योलिन नावाच्या कृष्णवर्णीय मुलीशी तिची त्यातल्या
त्यात मैत्री झालेली असते. सहसा मोठ्या मुलांना दत्तक घेणं कुणी पसंत करत नाही, त्यामुळे बेथ आणि ज्योलिनने
आपल्याला घर, कुटुंब मिळेल याची आशा सोडून दिलेली असते. मिसेस व्हिटली तिला 'आम्हाला एक मोठं मूलच
दत्तक म्हणून हवं होतं' म्हणतात, तेव्हा ज्योलिन आपल्यापेक्षा मोठी असूनही एका गोऱ्या कुटुंबाने गोरंच मूल दत्तक
घ्यायचं असा काहीतरी अलिखित पण रंगभेद मानणारा नियम तिच्या चटकन लक्षात येतो.
बेथच्या आयुष्यातील नव्या बदलाची सुरुवात बऱ्याच जुन्या गोष्टींचं बलिदान देऊन, नव्या परिस्थितीत स्वतःला
जुळवून घेऊन होते. मालिकेच्या शीर्षकाचा इथे चपखल संदर्भ आहे. 'द॒ क्वीन्स गॅम्बिट' ही बुद्धिबळातील ओपनिंगची
एक खेळी आहे. त्यात पांढरी बाजू एका प्याद्याचं बलिदान देऊन पटातील मध्यवर्ती जागेवर वर्चस्व स्थापन
करण्यासाठी आक्रमक खेळाची सुरुवात करते.
हे व्हिटली कुटुंब बेथला हवं तसं नसतं, पण अनाथ मुलांना पर्याय नसल्याने जे मिळतंय त्यांनाच आपलंसं मानावं
लागतं. शिवाय ती कबूल करत नसली तरीही तिला कुटुंब, आईचं प्रेम हवं असतंच. मात्र मिस्टर व्हिटली तिच्याशी
तुटकपणे वागत असतात- त्यांना बेथ पूर्वीपासून नको होती किंवा दत्तक मूल नको होतं असं वाटावं इतके. मिसेस
व्हिटलींचं तसं काही नसतं, पण त्यांच्या वागणुकीत आईपणाची सवय नसल्याने आपसूकच येणारं ममत्व नसतं, तर मित्रत्वाच्या भावाने वाटणारी आत्मीयता असते.
या काळात बेथला सिनसिनाटीमधल्या एका मोठ्या स्पर्धेबद्दल कळतं. पण मिस्टर व्हिटली अचानक घर सोडून -
बायको व मुलीला सोडून डेनव्हरला निघून जातात. आर्थिक स्थिती अचानक बेताची होते. स्पर्धेत भाग घेण्यासाठी
प्रवेश फी म्हणून बेथला पाच डॉलर हवे असतात, ते ती पत्र लिहून मिस्टर शायबेलना मागते. स्पर्धेत पहिल्या
बक्षीसाला शंभर डॉलर, तर दुसऱ्याला पन्नास डॉलर रोख मिळणार असतात. 'जिंकल्यावर तुमचे पाच डॉलर मी परत
करेन,' असं ती पत्रात म्हणते. शायबेल खरोखरच हे पाच डॉलर पाठवतात. तिला सिनसिनाटीच्या स्पर्धेत जायला
मिळतं. ती तिथे पहिली येते. बक्षिसाची रक्कम पाहून मिसेस व्हिटलीना लक्षात येतं, की घर चालवण्यासाठी याचा
फायदा होऊ शकतो. पहिल्यांदा ही स्त्री बरीच स्वार्थी वाटते, पण तिला तिच्या अनेक मानसिक व शारीरिक व्यथा
असतात; अल्कोहोल आणि ट्रॅंक्विलायजरचं व्यसन असतं. या गोळ्या बेथही चोरून घ्यायला लागलेली असते.
हळूहळू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन, बक्षिसं मिळवून तिची आर्थिक स्थिती सुधारते. तीही इतर
मुलींसारखे छान, छान कपडे घालायला लागते. स्टायलिश होते. पण तिच्या वयाच्या इतर मुलींमध्ये मिसळण्याचे,
त्यांच्यासारखं वागण्याचे तिचे प्रयत्न मात्र फसतात. तिला त्या गोष्टींचा चटकन कंटाळा येत असतो. एकेकाळी
मुलींच्या ज्या "ॲपल पाय" क्लबमध्ये तिला येण्यापासून मज्जाव केला गेलेला असतो तिथून तिला रीतसर आमंत्रण
येतं. प्रत्यक्ष गेल्यावर मात्र तिचं मन तेथे रमत नाही.
एकीकडे तिचं आणि मिसेस व्हिटलीचं नातं बहरत जातं. नवरा सोडून गेल्यामुळे मिसेस व्हिटलीना आलेला एकटेपणा
ती बर्यापैकी दूर करते. मग ती या आईला आपली मॅनेजर करून कमिशनही द्यायला सुरुवात करते. बु्धीबळाच्या
मॅचेसच्या निमित्ताने त्या बऱ्याच नव्या जागा, नवीन वातावरणात, लॅव्हिश लाईफस्टाईलमध्येही रमतात. 'लाईफ'
मॅगझिनमध्ये तिची मुलाखत छापून येते. पण ती मुलाखत बहुतांश 'मुलगी असूनही...' याभोवती फिरत राहते. त्या
मुलाखतकाराच्या मते- 'इजन्ट इट इन्टिमिडेटिंग टु कम्पीट वुइथ मेन अँन्ड विन फॉर अ गर्ल! कारण आमच्या
काळात आम्हा मुलींना 'सबमिसिव्ह' रहायचं शिकवलेलं होतं.'
बेथ हार्मन ही फक्त गिफ्टेड नसून महत्त्वाकांक्षी सुद्धा आहे. तिचं सर्व लक्ष ग्रँडमास्टर होण्याकडे व त्यासाठी लागेल
तो अभ्यास व सराव करण्याकडे आहे. त्यासाठी बुद्धिबळात लागणाऱ्या बर्याच खेळींचा किंवा ओपनिंगचा ( ज्याने
आपली बाजू बळकट राहील) अभ्यास, खेळ व वाचन ती सुरू ठेवते.
मालिकेत बुद्धिबळाचा ताकदीने वापर केला गेला आहे. प्रत्येक एपिसोडचं शीर्षक बुद्धिबळासंबंधितच आहे. यातील
सर्व खेळ, चाली बर्याच खऱ्या स्पर्धांवरून प्रेरित आहेत. खासकरून बेथच्या खेळी पॉल मर्फी या अमेरिकन बुद्धिबळ
विजेत्याच्या गेम्सवरून घेतलेल्या आहेत. ती त्यांचं पुस्तक वाचतानाही दाखवलेली आहे. त्यामुळे बुद्धिबळातील
नाट्य बऱ्यापैकी रिअल आहे.
बेथचं लक्ष्य असतं सोव्हिएत बुद्धिबळपटू. सोव्हिएत खेळाडूंना अधिक जाणून घेण्यासाठी ती तिच्यापेक्षा मोठ्या
मुलांसाठीच्या रशियन भाषेच्या वर्गात जायला लागते. रशियन भाषा शिकते. त्यांचा खेळाडू बॉर्गोव्ह याला हरवण्याचं मालिकेची सिनेमॅटोग्राफी विटेज आहे. ११४०-६० च्या दशकातील वेगवेगळ्या शहरातील काळ व प्रसंग अगदी
उत्कृष्ट उभे राहतात. अनाथाश्रमातील प्रकाशयोजना, कपडे, खोल्या, फर्निचर, भिंतींचे रंग हे सगळंच मंद, काहीसं
उदासीन आणि फिकट आहे. सर्व घटना कमी उजेडात दिसत राहतात. ती व्हिटली कुटुंबाच्या सबर्बन घरात येते,
तेव्हा तिथली वॉलपेपरची रंगसंगती, फुलाफुलांचे पॅटर्न, पिवळसर प्रकाश यांमुळे थोडं चैतन्य जाणवतं. नंतर वेगास,
मेक्सिको सिटी, पॅरिस इथल्या मोठमोठ्या हॉटेलमधलं दर्शवलं गेलेलं बहुतेक चित्रीकरण बर्लिनमध्ये झालं आहे. ते
सर्व पहायला चार्मिंग वाटतं.
बेथ मोठी होत जाते तसा तिचा मेकप आणि कपडेही जास्त महागडे आणि फॅशनेबल होत जातात. तिच्या डोळ्यांच्या
मेकपवर आणि त्यांच्या क्लोज-अप्सवर भरपूर भर दिलेला आहे. कारण बुद्धिबळाचा ताण तिने डोळ्यांतून दाखवला
आहे. आधी मोठमोठ्या रित्या वाटणाऱ्या डोळ्यांत नंतर मोठ्या स्वप्नांना जागा करून दिली आहे. तिचे कपडे
बुद्धिबळातील प्यादी, पट, त्यांची रंगसंगती आणि पॅटर्नशी जुळणारे आहेत. पार्श्वसंगीतात पियानो आणि बासरीचा
वापर केला गेला आहे. शेवटी ती ग्रँडमास्टर होते तेव्हा तिला दिलेला पांढरा कोट अगदी बुद्धिबळातील राणीसारखा
वाटतो.
माझ्या आवडत्या प्रसंगांपैकी एक- जेव्हा तिला तिचीच जुनी मैत्रीण 'तू माझ्यासाठी आदर्श आहेस' म्हणते तेव्हा ती
व्यसनात पूर्णपणे बुडालेली असूनही अचानक ताळ्यावर येते. स्वतःच स्वतःला पुढचा मार्ग दाखवते. आपल्या
वाहवत जाण्याची प्रकर्षाने जाणीव होण्याचा कुठेतरी वेकअप कॉल म्हणू असा क्षण जगते. बुद्धिबळावरील प्रेमापोटी
व्यसनमुक्तीसाठीचं पहिलं पाऊल उचलते. दुसरा प्रसंग - शेवटच्या मॅचमध्ये बॉर्गोव्हच्या कठीण चालीला
आव्हानात्मक उत्तर देण्यासाठी मनाची एकाग्रता पणाला लावलेली असताना तिला सगळा पट व पुढील तोडीस तोड
चाली छतावर (कल्पनेत) दिसायला लागतात आणि ती व्यसनाधीनतेतून मुक्त होते. तो क्षण रोमांच आणणारा होतो,
कारण ट्रँक्विलायझरशिवाय आपण हे दृष्य मनात उभं करू शकणार नाही, जिंकू शकणार नाही आणि पर्यायाने आपण
अस्तित्वहीन आहोत असं तिचं तोपर्यंतचं मत ती स्वतःच मनोबलाने पूसून टाकते. नितळ आणि एकाग्र होते. खऱ्या
अर्थाने स्वतंत्र होते!
ही एक मिनीसिरीज आहे, पटकन पाहून संपवता येते. कथेचा गाभा हा साधारण संघर्ष, व्यसनाधीनता, परस्वाधीनता, तरीही जिद्दीने काही तरी करून दाखवण्याची हिंमत बाळगणं व स्वतःसाठी एक वेगळं विश्व उभं करणं याभोवती फिरतो. ॲना टेलर जॉय बेथची भूमिका जगली आहे. बेथचा हा प्रवास आपल्यालाही काही तरी देऊनच जातो. 'इन्टेलिजन्स अँन्ड क्रिएटिव्हिटी टुगेदर कॅन कॉज सायकॉसिस' या मुद्द्यालाही कथानकात वारंवार स्पर्श केला जातो. बेथ या चक्रात अडकलेली असते, पण तरीही पुढे सावरते. तिच्या गुंतागुंतीच्या प्रवासाचा शेवट सकारात्मक व प्रसन्न होतो.
ही मालिका 'द॒ क्वीन्स गॅम्बिट' या कादंबरीवर आधारलेली आहे. लेखक आहेत वॉल्टर टेव्हिस. कादंबरीचं कथानक
पूर्णपणे काल्पनिक आहे. मात्र बेथ हार्मन ही व्यक्तीरेखा एका खऱ्या बुद्धिबळपटूवर बेतलेली आहे, असं म्हटलं गेलं.
त्यावरून वादंगही निर्माण झाला. पण वॉल्टर टेव्हिस यांनी त्यात तथ्य नसल्याचं मोठ्या दिलगिरीने स्पष्ट केलं.
कादंबरीच्या सुरवातीला उपोद्धात म्हणून एक छोटीशी कविता दिलेली आहे- डब्ल्यू. बी. यीट्स यांची 'द लॉन्ग लेग्ड
फ्लाय'. बुद्धिमान स्त्रीच्या अंतरंगातील गूढ असं या कवितेचं सार होईल. टेव्हिस यांच्या मते ही कादंबरी म्हणजे एका
विदुषीला वाहिलेली आदरांजली आहे.
बेथ गिफ्टेड असूनही अनेक वेळा चुकते, हारते. परिस्थितीला शरण जाते, तडजोड करते. त्यामुळे तिची व्यक्तीरेखा
खूपशी रिलेटेबल वाटते. ती नेहमी जिंकत नाही. तिला सातत्याने जिंकत राहण्यासाठी सातत्याने मेहनतही घ्यावी
लागली आहे. धोरणीपणाही शिकावा लागला आहे. शिवाय खेळात लागणारी खिलाडूवृत्ती सुद्धा आत्मसात करावी
लागली आहे. 'पुरुषांच्या विरूद्ध खेळणं' हे तिला सातत्याने करावं लागत असलं तरी तिचा दृष्टिकोन हा त्यांना
हरवून फेमिनिझम सिद्ध करण्याचा नसतो. बुद्धीबळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होणं यातला तो एक छोटासा भाग
असतो. ही सर्व लढाई जिद्दीने जिकण्याची, पुढे जाण्याची, कठीण परिस्थितीवर मात करण्याची तर असतेच, पण
कुठेतरी स्वतःला शोधण्याचीही असते. बुद्धिबळ हे एक फक्त मोठं माध्यम ठरतं. त्या चौसष्ट चौकोनांत ती स्वतःलाच
शोधत असते. तुकड्यातुकड्यात हरवलेल्या तिला शेवटी तिचं खरं अस्तित्व सापडतं. आपण सगळे सुद्धा कुठे
पुस्तकांत, कुठे चित्रपट-सिरीजमधल्या व्यक्तिरेखांत स्वतःलाच शोधत असतो, तुकड्यातुकड्यात सापडतोही -
अशावेळी आभाळ गवसल्याचा आनंद होतो. अशा प्रवासात बेथसारखी व्यक्तिरेखा भेटते, तेव्हा आपल्याच
अस्तित्वाचा एखादा तुकडा ती हातात देऊन जाते. वरवर साध्या वाटणाऱ्या बेथच्या कथेतून आपलं सुद्धा एक
पाऊल पूर्णत्वाकडे टाकलं जातं.
सुरेख लेख आहे.
सुरेख लेख आहे.
ही मालिकादेखील खूप आवडली होती.
पुन्हा बघायला हवी.
खूप आवडला लेख! सुंदर ओळख!
खूप आवडला लेख! सुंदर ओळख! मिनी-सिरीज च्या मानाने बराच मोठा प्रवास आहे आणि ते सगळे इथे मस्त उलगडले आहेस.
ही सिरीज मस्तच आहे. पहिल्यांदा एक मुलगी रजिस्ट्रेशन करायला आलेली पाहून तिची "तू काय इथे टिकणार" टाइप चेष्टा करणारे दोघे नंतर तिचे फुल फॅन होतात तो रनिंग सिक्वेन्स मला खूप आवडला. अगदी सुरूवातीचा तिचा प्रतिस्पर्धीही तिला नंतर खूप मदत करतो, तो भागही. तिची दत्तक आई आणि तिचे नाते, त्यांचे सीन्सही मस्त. तिला बेडवर झोपल्यावर छतावर बुद्धिबळाचा पट दिसणे हा मेटॅफोर खूप चांगला वापरला आहे सिरीज मधे.
लिहिलय पण छान आणि मालिका पण
लिहिलय पण छान आणि मालिका पण छान आहे.
मागे कोविडच्या काळात बघितली
मागे कोविडच्या काळात बघितली होती. नंतर नंतर तिची ती व्यसनाधीन फेज बघवेना म्हणून अर्ध्यातून सोडून दिलेली असं आठवतं.
अवांतरः
बुद्धिबळावर स्टीफन झ्वाईग ची 'द रॉयल गेम' म्हणून एक दीर्घकथा आहे. १९४० चं दशक. नाझी जर्मनीची पार्श्वभूमी. जबरदस्त कथा आहे. अलीकडे त्याच नावानं मूव्ही पण आलाय ह्या स्टोरीवर.
आवडला लेख! सुंदर ओळख!
आवडला लेख! सुंदर ओळख!
फारच सुंदर ओळख करून दिली आहे
फारच सुंदर ओळख करून दिली आहे
छान ओळख करून दिली आहे.
छान ओळख करून दिली आहे.
सुंदर लेख!
सुंदर लेख!
पहिल्यांदा एक मुलगी
पहिल्यांदा एक मुलगी रजिस्ट्रेशन करायला आलेली पाहून तिची "तू काय इथे टिकणार" टाइप चेष्टा करणारे दोघे नंतर तिचे फुल फॅन होतात तो रनिंग सिक्वेन्स मला खूप आवडला.
>>>>> हो, मलाही. ती किंवा कोणतीच मुलं तशी बुलीज किंवा दुष्ट नाहीतच. पण त्यांना मुलींच्या सहभागाची सवयच नाही, आणि जिंकण्याची तर त्याहूनही नाही. त्यामुळे त्यांना असं असू शकते हेच माहीत नाही. एकदा तिची क्षमता कळाल्यावर सर्वांनी तिचे कौतुकच केले आहे व सपोर्टही दाखवला आहे. प्रसंगी मदतही केली आहे. एकदम ऑरगॅनिक वाटतं ते पाहायला.
संप्रति, आता पूर्ण करून पाहा.
छान लेख, हा पूर्वी वाचलेला.
छान लेख, हा पूर्वी वाचलेला. परत आवडलाच.
मला छतावर बुद्धीबळातील उंट वझीर दिसणे आणि ते मनात हलवून बघणे हे व्हिज्युअल फार म्हणजे फारच आवडलं होतं. मनात घरच करुन बसल्यासारखं. आज हा लेख परत दिसल्यावर अॅन्या टेलर-जॉयचा चेहरा आणि छतावर बुद्धीबळाची घरं आणि त्यातुन हलणारे हत्ती हेच डोळ्यापुढे आलं. काय शक्ती असते व्हिज्युअलची!
मला काटाच आला ते पाहताना.
मला काटाच आला ते पाहताना. जबरदस्त व्हिज्युअल आहे. चेस हा कुस्तीसारखा बाहेरून adrenaline दाखवून आक्रमक, नाट्यमय आणि वेधक करता येणं अशक्य होतं , आणि ही सगळी आतली एनर्जी अशी दाखवून त्यांनी तो तणाव व कुरघोडी चपखल दाखवली आहे.
फारच सुंदर ओळख करून दिली आहे
फारच सुंदर ओळख करून दिली आहे >>>> +9999
चांगली ओळख करून दिली अस्मिता,
चांगली ओळख करून दिली अस्मिता,
आवर्जून पाहणार ही मालिका!
सुरेख लिहिलंय.
सुरेख लिहिलंय.
ही दोन वाक्ये quote करतोय.
ती अतिशय बुद्धिमान- गिफ्टेड असते; भावनिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या इतरांपेक्षा वेगळ्या प्रतलावर असते. त्यामुळे तिला समजून घेऊ शकणारं कोणी नसतं.
इन्टेलिजन्स अँन्ड क्रिएटिव्हिटी टुगेदर कॅन कॉज सायकॉसिस'.
शेवटचा परिच्छेद पुन्हा वाचला. अर्थगर्भ, खोल तरीही व्यापक - मालिकेच्या पुढे जाऊन काही सांगतो.
एके ठिकाणी बुधीबळाच्या असं आलंय.
कॉपी पेस्ट केल्याने alignment असं आलंय का?
पिडीएफचे टेक्स्ट फाईल मधे
पिडीएफचे टेक्स्ट फाईल मधे रूपांतर करून चिकटवताना सगळी गडबड होऊन बसली. तरी मी बरेचदा सुधारणा केली, पुन्हा वाचून बघते. त्यात "बुद्धिबळ" शब्द तर त्याला मुळीच आवडला नाही, अगदी दरवेळी चुकवून ठेवले.
सिरीज आहे आबा पण छोटीशीच , सिनेमा एवढीच!
सुंदर लिहिलंय. मला ते
सुंदर लिहिलंय. मला ते पोस्टरही बोलकं वाटलं खूप.
बघणार ही मालिका.
छान लिहिले आहे. आणि सविस्तर..
छान लिहिले आहे. आणि सविस्तर.. असे वाटले चित्रपटावर आधारित पुस्तक वाचले.
मी पाहिली ही सिरीज मागच्या
मी पाहिली ही सिरीज मागच्या वर्षी. पण पूर्ण करता आली नाही. शेवटी माझा रस निघून गेला.
लेख आवडला, आणि पूर्ण करायची हुक्की आली.
आवडली ओळख. नक्की बघेन.
आवडली ओळख.
नक्की बघेन.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
मालिका पाहिली तर येथे नक्की लिहा, काय आवडले काय खटकले.
जो भाग मी काही कारणाने यात वगळला, त्यात तिला रशियातील मॅचेससाठी पैसा उभा करण्यासाठी कुठलेतरी मिशनरीज फंडिंग देऊ पाहतात, अट एकच की सतत देवाची महती गायची व त्यांचे उदो उदो करायचे. तिला काहीच पर्याय उरला नसल्याने ती त्यासाठी तयार होते पण नंतर ते तिला पटतच नाही कुठेतरी, शिवाय सतत त्यांच्या कंट्रोल मधे राहणं जाचक वाटतं. मग त्यांना ती "बसा बोंबलत, गेलात उडत. तुमचं फंडिंगही नको आणि देवदेवही नको" म्हणून घरातले सगळे महागडे कपडे, वस्तू विकून मित्रमंडळी कडून उधार उसनवारी करून ती सोव्हिएट ट्रिपसाठी पैसे उभे करते. मला फारच आवडलं ते.
ही सिरीज आवडली असेल तर
ही सिरीज आवडली असेल तर
क्वीन ऑफ कटवे पण बघा सिनेमा
विषय वेगळा आहे पण मस्त
आफ्रिकेतल्या एकदम दरिद्री गावातून बुद्धिबळ खेळून पुढे आलेल्या खेळाडू वर
छान परिचय..!
छान परिचय..!
लेख सुंदर लिहिलायं..!
सुंदर ओळख करुन दिलेली आहे.
सुंदर ओळख करुन दिलेली आहे.
>>>>>आपण सगळे सुद्धा कुठे
पुस्तकांत, कुठे चित्रपट-सिरीजमधल्या व्यक्तिरेखांत स्वतःलाच शोधत असतो, तुकड्यातुकड्यात सापडतोही -
अशावेळी आभाळ गवसल्याचा आनंद होतो.
अनेकांच्या बाबतीत शक्य आहे. मला मात्र असा अनुभव अजिबात येत नाही. मला सिनेमा प्रचंड वेस्ट ऑफ टाइम वाटते. याचा अर्थ मी कुठेतरी त्या वेळात महत्वचे काही करत असते, काही परिपूर्ण , अफाट कामगिरी गाजवत असते असे नव्हे पण सिनेमा म्हटले की अजिबात बघता येत नाही. नवराही प्रयत्न करुन थकला.