
मी कोकणचो डॉक्टर.... इरसाल कोकणी माणसाचे खुमासदार अनुभव
तळकोकणातल्या , हायवेला लागून असलेल्या तळेरे गावातला बाजाराचा दिवस .... डॉक्टरांकडे दवाखान्यात खूप गर्दी ... एक बाई छोट्या लेकीला घेऊन आली ... इंजेक्शन टोचून झालं... पैसे कमी पडत होते म्हणून आईची चलबिचल.. डॉक्टर थोडासा हट्टी होऊन पैसे घेतो ... मायलेकी जातात ... थोड्या वेळाने ओपीडी संपवून डॉक्टर गाडी घेऊन फिरायला निघतात .. . खूप पुढे गेल्यावर या दोघी रस्त्याच्या कडेला थोडया विश्रांती घेताना दिसतात ... डॉक्टर काय समजायचं ते समजतो .... आईचे पाय धरतो ...त्यांना गाडीत बसवून त्यांच्या वाडीवर सोडतो ... एवढं होऊनही डॉक्टर घरी सोडायला आला म्हणून वाडीत त्या मायलेकींचा भाव वाढलेला असतो ..
डॉ मिलिंद कुलकर्णी लिखित "मी कोकणचो डॉक्टर" या पुस्तकातला हा भावूक करणारा प्रसंग . पुस्तकाच्या मुखपृष्ठावर "इरसाल कोकणी माणसाचे खुमासदार अनुभव " हाही मजकूर छापलाय खरा . पण वरवर विनोदी वाटणारं हे पुस्तक वाचताना अनेकदा आपल्याही नकळत आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावतात .
गेल्या साताठ महिन्यात या पुस्तकाच्या अनेक प्रती आमच्या दुकानात विकल्या . पण मनात असूनही पुस्तक वाचायचं राहून जात होतं . काल मुंबईला जाऊन येताना दोन अडीच तासाच्या प्रवासात झपाटल्यागत ते वाचून काढलं .
डॉ मिलिंद कुलकर्णी हे जनरल प्रॅक्टिशनर आणि त्यांची पत्नी डॉ सौ ऋचा या गायनोकॉलॉजिस्ट . तीस वर्षांपूर्वी साताऱ्याहून म्हणजे घाटावरून हे वैद्यकीय जोडपं कोकणात प्रॅक्टिस करायला आलं आणि तिथेच स्थिरावलं . या कालावधीत त्यांना भेटलेली ( जीएं च्या भाषेत ) अरभाट आणि चिल्लर माणसं , त्यांचे किस्से , आपल्या बुद्धीचा आणि मनाचा ठाव घेतात . तसं म्हटलं तर पुस्तक छोटेखानी पण त्यातला ऐवज खूपच मोठा आहे . लहानपणी कोकणात दरवर्षी न चुकता आजोळी जाणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला , ऊर भरून त्या मातीचा गंध देणारं हे पुस्तक आहे .
पुस्तकाच्या मनोगतात डॉक्टर लिहितात .......
"हिरावती आजी , टक्के आजी , सावंत आजोबा.. सगळे गेले. आता 'भाऊनो' अशी हाक मारणारे कमी झाले आणि 'सर' म्हणणारे वाढले . ...पूर्वीसारखं दारिद्र्य राहिलं नाही. पैसा आणि मोबाईल हातात आला , पण तरी आमच्या कोकणी माणसाची वृत्ती बदलली नाही. अजूनही डॉक्टरवरचा विश्वास , प्रेम-आपुलकी तीच आहे ... अजूनही आतल्या ओलाव्याचा झरा वाहतो आहे... मला या कोकणी माणसाचं विलक्षण कौतुक आहे . त्यांचं एक फार वेगळेपण मला दिसतं , ते असं ,की हा माणूस देव-धर्म रीतिरिवाज याला धरून आहे पण त्यामुळे तो पापभीरू आहे.... मी फी घेतो , फुकट प्रॅक्टिस करत नाही , हे शंभर टक्के सत्य आहे . .... मी फार चांगला , सर्वोत्तम डॉक्टर नाही याची मला पक्की खात्री आहे पण मला एक कळतं की हा कोकणी माणूस माझा आहे .....या माणसाने आणि मातीने मला अधिक समृद्ध केलं आहे."
कोकणच्या माणसाची नाडी खऱ्या अर्थाने ओळखलेला हा घाटावरचा डॉक्टर हे असं प्रांजळ मनोगत मांडतो आणि पुढच्या ११२ पानांत कोकणी माणसाच्या हृदयाचा जो ECG काढून दाखवतो त्याला तोड नाही .
तळ कोकणातली मालवणी बोली 'संगीत वस्त्रहरण' सारख्या नाटकाने अजरामर केली . पुलं च्या 'अंतू बरव्या'ने रत्नांग्रीचा अस्सल नमुना आपल्यासमोर कॅरिकेचर सारखा मनात ठसवलाय . पण जिथून तळकोकण सुरू होतं त्या साखरपा , तळेरे या भागातल्या खरोखरच इरसाल कोकणी मंडलींचे ( मंडळींचे हा आपला शब्द) भन्नाट नमुने डॉक्टरांनी पेश केले आहेत .
म्हंजे ( म्हणजे नव्हे ...म्हंजे) असा की........ " रात्री मला कसातरी वाटता , माका ऍडमिट करून घ्या म्हणत" पेशंट येतो ... त्याला तपासून ऍडमिट केलं ... सकाळी उठून बघतात तर हा ठणठणीत... 'माका आजच डिस्चार्ज द्या' म्हणतोय...बिल बनवून झालं ... बिलाप्रमाणे १५०/- रुपये दिले आणि मग "आता काय ते स्पष्ट सांगतो" असं म्हणून त्याने सांगितलं काय ?...तर रात्री राजापूरहून आल्यावर वाडीवर जायची बस चुकली ... रिक्षावाल्यान घरी सोडायचे ४०० रुपये सांगितल्यान... त्यापेक्षा डॉक्टरकडे ऍडमिट होऊन मस्त पंख्याखाली झोपून १५० रुपयांत काम झाला ... ( पेशंट ठणठणीत आणि डॉक्टर केविलवाणा ..!!)
या पुस्तकांत ठायी ठायी असे नमुने भेटतात पण म्हणून हे केवळ विनोदी किस्से सांगणारं पुस्तक नाही . दुर्गम प्रदेश.. तुरळक वस्ती .. पूर्वीच्या भाषेत सांगायचं तर चाकरमानी मंडळींच्या मनिऑर्डर वर चालणारी अर्थव्यवस्था .... इकडे शहरात LED ट्यूबच्या जमान्यात वावरणारे आपण आणि आजही ४० ते ६० वॅट च्या पिवळ्या दिव्यांच्या साथीने आयुष्य काढणारे म्हातारे कोतारे.... पंधरा-वीस किलोमीटरवर असलेला डॉक्टरचा दवाखाना.. त्यासाठी लागणारं गाडीभाडं.... हे सगळं वाचताना त्यातल्या अनेकांची आर्थिक हलाखी आपल्याला वाकुल्या दाखवत रहाते .
आपण डॉक्टर आहोत आणि या व्यवसायातून आपल्यालाही पैसे कमवायचे आहेत याचं भान सुटलेलं नाही . पण म्हणून आपणच सर्वोत्तम आहोत असं बिल्कूल नाही . एकाच वेळी डेंटिस्ट कम ऑर्थो कम गायनॅक कम सर्जन कम पेडिअट्रीशीयन असं मुरारबाजी सारखं लढावं लागतंच . मात्र हाताबाहेरची केस असेल तर वेळप्रसंगी स्वतःच्या गाडीत पेशंट (सहित त्याचे चारपाच वाडीवाले) घालून त्याला कणकवलीत नेण्याचा उद्योगही अनेकदा केलाय . तिथे आर्थिक प्राप्तीची गणितं मांडायची नसतात असं म्हणताना दुसरीकडे मंगळवारी बाजाराच्या दिवशी भरपूर गर्दी असते आणि रात्री घरी जाताना माझं पाकीट जड झालेलं असतं हेही मोकळेपणाने मान्य करण्याचा मोठेपणा डॉक्टर कुलकर्णी दाखवतात .
आधीची औषधांची कागदपत्रं न घेता डॉक्टरकडे धाव घेणं , कितीही समजून सांगितलं तरी औषधं नीट न घेणं , अज्ञान शिक्षणाचा अभाव आणि बाहेरच्या बाधा होतातच या अंधश्रद्धा ... यातून डॉक्टरांची होणारी चिडचिड ... एवढं झाल्यावरही " भाऊनो , ह्या तुमी आमच्याच भल्यासाठी भडकतास , त्येचा काय एक राग नाय .." असं सरळ सांगून टाकण्याची वृत्ती .... त्याही पुढचं म्हणजे " आज आमचे डॉक्टर नाय हत म्हणून नाईलाजाने तुमच्याकडे इलाव...आतापूरते काय ते द्येवा .. उद्या ते इले की त्यांनाच दाखवतय" असंही ऐकायची तयारी ठेवावी लागते.
"ती फुलराणी" मध्ये मंजूच्या बापाच्या तोंडी एक सणसणीत वाक्य आहे.... " धोतराच्या निऱ्यांसारखं एकदा उलट एकदा सुलट बोलायचं नाय ... जे काय बोलायचं ते सरळ.." ( माझे शब्द कदाचित इकडे तिकडे झाले असतील ) हे वाक्य लिहिताना पुलं च्या समोर ही कोकणातली माणसं असणार . या पुस्तकात अशा रोखठोक बोलण्याचे अनेक नमुने पानोपानी आहेत .
इंजेक्शन, सलाईन आणि कोकणी पेशंट हे असंच एक अतूट ( फिट्ट ) समीकरण आहे . सलाईन चढवणं हे रंगमंचावर एखादा नाट्यप्रवेश सादर करण्याइतकंच नाट्यपूर्ण असायला हवं . त्या सलाईन मधून रंगीत औषध सोडणं हे म्हणजे अजून भारी .... हे प्रकरण मुळातूनच वाचायला हवं ... आधुनिक मेडिसिन च्या कुठल्याही पाठ्यपुस्तकात न सांगितल्या जाणाऱ्या अशा अनेक गोष्टी ... पण पेशंटचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ते करावंच लागतं . याबद्दल त्यांनी लिहिलेलं एकच वाक्य महत्त्वाचं .... " सलाईनविषयी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न जीपीने करणं म्हणजे भटजींनी कम्युनिस्ट होण्यासारखं आहे ..." या वाक्यातच सगळं काही आलं .
या पुस्तकात काही नवीन शब्दप्रयोग सापडले . पण त्यातला एक शब्दप्रयोग मला प्रचंड आवडला . नर्सला डॉक्टरांनी चक्क "दवाईसुंदरी" करून टाकलंय ... हवाईसुंदरी च्या धर्तीवर ... लय भारी शब्दप्रयोग..!! ( हा शब्द मुळात कुणी तयार केला ? डॉक्टर कुलकर्णी यांनी की त्याही आधी कुणी याची कल्पना नाही !!)
या पुस्तकातलं प्रत्येक प्रकरण म्हणजे डॉक्टरांच्या इतक्या वर्षांच्या "अनुभवाचा अर्क" आहे . रात्री अपरात्री मदतीला "पुलं"च्या नारायण सारखे धावून येणारे रिक्षावाले , मुंबईत गेलेले आणि मे महिन्यात गावच्या ओढीने गावात येणारे चाकरमानी , डॉक्टरांसोबत गजाल्या करताना मध्येच त्यांची टोपी उडवणारे इरसाल पेशंट , डॉक्टरांची लाडकी बच्चेकंपनी हे सगळं इतकं चित्रमय पद्धतीनं मांडलंय की ते वाचता वाचता आपण त्या दवाखान्यात बसून हे सगळं अनुभवतोय असा भास होतो .
नरहर कुरुंदकर यांनी "पुलं"वर लिहिलेल्या एका लेखात म्हटलंय की खरा विनोद कारुण्यातून जन्माला येतो . हे पुस्तक वाचताना त्याची वारंवार प्रचीती येते . वाचताना अनेकदा आपण खळखळून हसतो . पण अनेक प्रकरणांच्या शेवटी डॉक्टर अशी काही वाक्य टाकतात की ते कारुण्य अधोरेखित होतं आणि आपल्याला अस्वस्थ करून जातं . मुलीचं लग्न झालं ... अचानक तिची आणि बापाची डॉक्टरांच्या दवाखान्यात भेट होते ... पण जाताना लेकीकडेही जेमतेम पैका आणि बापाची दुबळी झोळी ... दोघे समजून उमजून आपापली फी देऊन जातात... हे बघताना डॉक्टर हसायचं विसरतात आणि वाचताना आपले डोळे गहिवरून येतात .
ज्या असोशीनं हे सगळं लिहिलंय ते वाचताना ठायी ठायी असा गहिवर येतो . हे पुस्तक वाचताना जर आपल्याला असं भरून आलं नाही तर नक्की समजावं की एकतर आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत किंवा तो कोकणी माणूस आपल्याला कळलेला नाही.
"डिलिव्हरी" या लेखात डॉक्टरांनी लिहिलंय .... "हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी पेशंट ऍडमिट झाली की तिची संपूर्ण जबाबदारी माझ्या पत्नीकडे असूनही मी अस्वस्थ होतो . डॉक्टर होण्यासाठी जे आवश्यक गुण लागतात ते खरं तर माझ्या पत्नीकडेच आहेत . मी मात्र आंब्याच्या झाडाऐवजी पपईचं झाड आणि प्राजक्ताच्या झाडाऐवजी झेंडूची रोपं लावणारा मनुष्य आहे . हा वाट न पाहू शकण्याचा , प्रतीक्षा न करू शकण्याचा दुर्गुण माझ्या ठायी पुरेपूर भरलेला आहे ." त्यांचं हे म्हणणं असलं तरीही घाटावरून येऊन हा माणूस गेली तीस वर्षं तिथे प्रॅक्टिस करतोय , लोकांचं प्रेम आणि आदर मिळवतोय ही एकच गोष्ट त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जाणारी आहे .
डॉक्टर साहेब ,
पैशापलीकडे जाऊन जे प्रेम , आदर आणि जगण्याचा अस्सल अनुभव कोकणी माणसानं दिलाय तो तुम्ही मनापासून अनुभवलाय . पण आज या पुस्तकरूपी सलाईन मधून तो तुम्ही आमच्या रक्तात इंजेक्शन सारखा सोडलाय .
तुम्हाला मनापासून धन्यवाद !
पुस्तक प्राप्तीस्थान : पुस्तक स्टेशन ९६१९८०००३०
(साभार :मयूरेश गद्रे )
जबरदस्त ओळख.
जबरदस्त ओळख.
जबरदस्त पुस्तक परिचय !
जबरदस्त पुस्तक परिचय !
अनुभवकथन हे असेच असावे. किती सुंदर अन् झऱ्यासारख्या सच्च्या ताज्या तवान्या शब्दांत मांडले तुम्ही ! लेखकांचं समृद्ध अनुभवविश्व हे तर नीट पोचवलेत तुम्ही पण त्यासोबतच तुमचे कोकणाशी असलेले ऋणानुबंध पण फारच हृद्य आणि उत्तम पद्धतीने मांडले आहेत. बरं हे सगळं करताना मी माझा माझ्यापुरता असे काही न मांडता अतिशय सहज वैयक्तिक भावना आणि पुस्तक परिचय गुंफला आहे.
आवडले. पुस्तक नक्कीच मिळवून वाचणार
हे डॉक्टर पूर्वी लोकप्रभेत
हे डॉक्टर पूर्वी लोकप्रभेत लिहित होते का ?
तेव्हा वाचलेत त्यांचे लेख. खूप छान ( तरी कसे म्हणायचे ) लिहिले आहे. त्या लेखातून पै पै ची किंमत असणारी माणसे भेटली, वरून खडूस पण मनाने प्रेमळ माणसे भेटली.
पुस्तक नक्की घेऊन वाचेन.
पुस्तक प्राप्तीस्थान : पुस्तक
पुस्तक प्राप्तीस्थान : पुस्तक स्टेशन ९६१९८०००३०
दिलीप पानसरे 9922433606
परवा मॅजेस्टिकमधून खरेदी केले
परवा मॅजेस्टिकमधून खरेदी केले आणि आज वाचून संपले सुद्धा. अतिशय सुंदर पुस्तक.
सलाईनची गमतीची गोष्ट माझ्या
सलाईनची गमतीची गोष्ट माझ्या मित्राने सांगितली होती.
चिपळूणच्या जवळ कालुस्ते म्हणून गाव आहे तेथे मुसलमान वस्ती आहे तेथील एक महंमद आपल्या अम्मीला घेऊन डॉक्टर कडे आला होता. अम्मीला "सलाईन लावायचे" म्हणून.
डॉक्टर ने अम्मीला विचारले तुला काय त्रास आहे? तिला काहीही त्रास नव्हता.
महंमदने सांगितले कि तिला ताकती साठी सलाईन लावायचे आहे. या डॉक्टर ने सांगायचा प्रयत्न केला अम्मी चांगली खाती पिती आहे तिला सलाईनची गरज काय आहे? त्यावर तो म्हणाला तुम्ही लावणार का नाहीतर मी दुसरीकडे जातो.
डॉक्टरने सलाईन लावले २०० रुपये घेतले
अम्मी गेली. एक दोन महिन्याने अम्मी परत हजर, आता शौकत बरोबर.
डॉक्टर ने विचारले कशासाठी आलात तर शौकत ने सांगितले तिला ताकती साठी सलाईन लावायचे आहे.
अम्मी दर दोन तीन महिन्यानी सलाईन लावायला येते
कारण तिच्या चार मुलांपैकी तीन जण गल्फ मध्ये नोकरीला आहेत. जो कोणी सुटीवर परत येतो तो अम्मीला ताकती साठी सलाईन लावायला घेऊन येतात.
आम्ही एवढा पैसे कमावतो अम्मीला उपयोग झाला नाही तर काय फायदा त्या पैशाचा ?
परिचय आवडला. पुस्तक वाचेन.
परिचय आवडला. पुस्तक वाचेन.
>>सलाईनची गमतीची गोष्ट माझ्या
>>सलाईनची गमतीची गोष्ट माझ्या मित्राने सांगितली होती.
चिपळूणच्या जवळ कालुस्ते म्हणून गाव आहे तेथे मुसलमान वस्ती आहे तेथील एक महंमद आपल्या अम्मीला घेऊन डॉक्टर कडे आला होता. अम्मीला "सलाईन लावायचे" म्हणून.>> हसायचं का??????
मला आलं हसायला. तुम्हाला नाही
मला आलं हसायला. तुम्हाला नाही आलं तर जबरदस्ती थोडीच आहे!
मस्त आहे हे पुस्तक. मी दोनदा
मस्त आहे हे पुस्तक. मी दोनदा वाचलं. एकापेक्षा एक अनुभव आहेत!