आक्षेपार्ह(?) कथेचे अध्यापन व नोकरीतून डच्चू

Submitted by हेमंतकुमार on 11 August, 2026 - 01:59

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नैतिकता, अश्लीलता आणि तत्सम मुद्दे हे कायमच जगभरात संवेदनशील विषय होऊन राहिलेले आहेत. ते शब्द बरेच सापेक्ष असून त्यांच्या व्याख्याही देशप्रांतकालागणिक काहीशा भिन्न असलेल्या आढळतात. इतिहासात आतापर्यंत अनेक साहित्यप्रकार अथवा कलाकृतींवर विविध कारणांनी सरकारी बंदी घातल्याची उदाहरणे आहेत. तसेच त्यांच्या लेखक वा कलाकारांनाही न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागलेले आहे. एखादे प्रौढ साहित्य जर काही लोकांच्या मते आक्षेपार्ह असेल तर ते विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी ठेवावे काय, असाही वादग्रस्त मुद्दा चर्चेत येऊ शकतो. तसेच, बंदी नसलेले काही साहित्य शिकवणाऱ्या प्राध्यापकावर कडक प्रशासकीय कारवाई होऊ शकते का, हा पण एक पुढचा मुद्दा. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील फ्लॉरिडामध्ये घडलेली नुकतीच एक घटना आपल्यासमोर मांडतो.

तर घटनास्थळ आहे South Florida State कॉलेज. तिथे 2023मध्ये श्रीमती विनिता प्रभाकर या इंग्रजीच्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. त्यांनी फ्रेशमन इंग्लिश II या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषा अभ्यासासाठी म्हणून Ottessa Moshfegh या अमेरिकी लेखिकेची Bettering Myself ही कथा वाचण्यास सांगितले आणि त्यानंतर त्यावर वर्गात अभ्यासपूर्ण चर्चा झाली. या प्राध्यापकबाईंनी ती कथा आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत सुमारे दहा वर्षे विद्यार्थ्यांना शिकवली होतीच आणि त्याबद्दल कोणतीही तक्रार आलेली नव्हती. परंतु सध्याच्या घटनेत त्या कॉलेजमध्येमधल्या एका विद्यार्थिनीने चर्चेदरम्यान अशी तक्रार केली की, ही कथा वाचल्यावर तिला ‘कसं तरी’ (uncomfortable) झालं. चर्चेदरम्यान विनिता यांनी त्या मुलीसह सर्वांना त्या कथेच्या अध्यापनाचा हेतू समजावून सांगितला. त्यानंतर त्या विद्यार्थिनीला हे पटले की, या प्रकारची कथा ही ‘आव्हानात्मक कथन’ या प्रकारातील असल्याने ती अभ्यासण्यास सांगण्यात आलेली होती आणि तिला बरे वाटले.

परंतु पुढे या घटनेला वेगळेच वळण लागायचे होते.
संबंधित कॉलेजचे अध्यक्ष Fred Hawkins यांना या प्रकारासंबंधी समजले आणि त्यांनी विनिताबाईंना त्याचे स्पष्टीकरण मागितले. या प्रकारात त्या कॉलेजचे डीन आणि इंग्रजी विभागाचे प्रमुख यांनी देखील विनिताबाईंची पाठराखण केलेली आहे. परंतु कॉलेजच्या अध्यक्षांचे मत मात्र या सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यांच्या मते ही कथा त्यांच्या स्वतःच्या कॉलेजवयीन मुलीला वाचायला देण्याच्या योग्यतेची नाही. तसेच त्यांनी आता हे सगळे प्रकरण ‘पॉलिटिकल’ झाल्याचे घोषित केले. पुढच्या दिवशी कॉलेजने विनिताबाईंना प्रशासकीय रजेवर पाठवले आणि सांगितले की आता त्यांना नोकरीतूनही मुक्त करण्यात येईल. विनिताबाईंनी त्याचे स्पष्टीकरण मागितले असता, “इथे अध्यक्षांचा शब्द अंतिम असतो” असे त्यांना उत्तर दिले गेले.

एखादी साहित्यिक पुरस्कारप्राप्त (Plimpton Prize for Fiction ) कथा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासास देणे हा मोठा गुन्हा ठरू शकतो काय, या मुद्द्यावर आता विचारमंथन होत आहे. विनिताबाईंनी देखील विचारविनिमय करून कॉलेजच्या विरोधात First Amendment या हक्कांच्या आधारे 29 जुलै 2026 रोजी कायदेशीर दावा दाखल केलेला आहे.

Screenshot (215).png

(फोटो सौजन्य : IHE)
आपल्या वाचकांसाठी या कथेचा सारांश सांगतो.
कथा प्रथमपुरुषी एकवचनी प्रकारातील निवेदन आहे. Miss Mooney ही या कथेची नायिका असून ती नैराश्याने ग्रासलेली गणिताची शिक्षिका आहे. ती न्यूयॉर्क शहरातील मुलींच्या कॅथलिक हायस्कूलमध्ये शिकवते. तिला सिगरेट, दारू आणि कोकेन अशी सर्व व्यसने आहेत आणि ती त्यांच्या आहारी गेलेली आहे. तिच्या नैराश्यामुळे ती स्वतः, नोकरी, विद्यार्थी आणि एकंदरीत आयुष्यावरच कमालीची वैतागलेली आहे. व्यसनाच्या अंमलाखालीच ती शाळेत शिकवत राहते. शिकवण्यादरम्यान तिच्या विद्यार्थ्यांसोबत लैंगिक विनोद देखील करते. तिच्या बोलण्यात गुदसंभोग, slut इत्यादी शब्दप्रयोग आहेत.
“Most people have had anal sex,” I told them. “Don’t look so surprised.”
हे एक उदाहरण.
एकंदरीत शिकवण्यात तिला बिलकुल रस राहिलेला नाही. मुलांच्या पालकांच्या तक्रारी येऊ नयेत म्हणून ती मुलांना धडाधड पेपरात पास करून टाकत असते.

ती घटस्फोटीत असली तरी तिच्या पहिल्या नवऱ्याशी संपर्क राखून आहे आणि येता जाता त्याला त्रासही देते. अशाच एका रात्री त्याच्याशी झालेल्या भांडणानंतर ती सणक आल्यागत आपल्या नोकरीचा राजीनामा देते आणि तो देण्यासाठी जवळच्या चर्चमध्ये जाते. परंतु ती इमारत बंद असते. मग तिची पावले पुन्हा एकवार मद्यगुत्त्याकडे वळतात आणि ती तिथे व्यसनाचा अतिरेक करुन मग रस्त्यावर चक्कर येऊन पडते. शुद्धीवर आल्यानंतर तशा जखमी अवस्थेत ती शाळेच्या वर्गावर जाते. झोकांडी जात असलेल्या अवस्थेतच ती विद्यार्थ्यांपुढे त्रासिक आणि वैतागवाणी बडबड करते आणि मानवी आयुष्य कसे दुःखानेच भरलेले आहे हे त्यांना सांगते. अखेरीस व्यसन आणि नैराश्याच्या गर्तेतच तिचे दैनंदिन आयुष्य गुरफटते.

BETTERING M.jpg

अशी ही शोकगर्भ कथा, तिच्या अध्यापनावरून उद्भवलेला वाद आणि परिणामी प्राध्यापकबाईंची गेलेली नोकरी. या प्रकरणाची वृत्तमाध्यमांमधून प्रसिद्ध झालेली बाजू इथे मांडली आहे. या व्यतिरिक्त त्याचे अन्य काही पैलू असल्यास त्याची कल्पना नाही. हे प्रकरण न्यायालयात असून कालांतराने त्याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता आहे.

*************************************************************************************************************
संदर्भ :
१. कथा : https://www.theparisreview.org/fiction/6208/bettering-myself-ottessa-mos...

२. पुरस्कार : https://electricliterature.com/bettering-myself-ottessa-moshfegh/

३. बातमी : https://www.insidehighered.com/news/quick-takes/2026/07/31/professor-fir...

४. खटला : https://www.fire.org/cases/prabhakar-v-hawkins-et-al

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hawkins said “he would not want his own college-aged daughter reading” the story, and that he didn’t “ever want to see this story again,” the complaint states. He also told Prabhakar he’d been in contact “with Tallahassee” and the Board of Trustees about the matter.

She was suspended with pay through the end of her annual contract. In addition, the letter said she wouldn't keep teaching classes and her annual contract wouldn't be renewed.

केस सध्या कोर्टात आहे. कोर्टात वकिलांची वादावादी होईल. बहुतेक out of court सेटलमेंट होईल, अशी पण शक्यता आहे. तिचे वकील आणि ती भरपूर पैसे कमवतील.

She sued to “vindicate her constitutional and statutory rights” and seek reinstatement. >>
एकंदरीत असे वाटत आहे की विनीता प्रभाकर ही full tenured प्रोफेसर नाही. (She was hired as an instructor on a contract.) "फ्री स्पीच"मुळे बहुतांशी ती ही केस जिंकेल. परंतु ही केस ती जिंकली तरी कॉन्ट्रॅक्ट बहुदा renew होणार नाही.

मोशेफेघ बाईंची एक कादंबरी वाचली आहे (Eileen. ) तीही अश्याच डिस्टर्ब्ड पत्राभोवती फिरणारी होती.

मला वाटते की इथे फ्रीडम ऑफ स्पीचचा प्रश्न येऊ नये. इथे त्या शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांशी संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून काम करत होत्या. शिक्षकांना एक ठराविक अभ्यासक्रम ठराविक प्रकारे शिकवणे बंधनकारक असते. जर एखादा शिक्षक उत्क्रांती विरुद्ध शिकवू लागला तर त्याला काढून टाकण्याचा हक्क शिक्षण संस्थेला नक्कीच असायला हवा. अर्थातच, शिक्षण संस्थेच्या तत्वांवर मतभेद असू शकतात. पण त्यांना आपली तत्वे इन्फोर्स करण्याच्या हक्क असावा असे वाटते.

त्यामुळे मला व्यक्तिशः बाईंची फार काही चूक आहे असे वाटत नाही, पण तरीही फर्स्ट अमेंडमेंटची पायमल्ली नसावी असे वाटते.

<< मला वाटते की इथे फ्रीडम ऑफ स्पीचचा प्रश्न येऊ नये. >>
Nah, Arbitration कडून केस litigation कडे गेली म्हणजे आधीच्या वाटाघाटी फिसकटल्या असणार (निव्वळ अंदाज). इथे फ्रीडम ऑफ स्पीच मुळेच ती केस जिंकणार आहे कारण litigation साठी दुसरा कुठला चांगला मुद्दा नसणार. तसंही Foundation for Individual Rights and Expression कडे केस आहे म्हणजे पॉलिटिकल झालीच आहे, freedom of speech is low hanging fruit compared to any other claim.

कॉमी, मला वाटते तुम्ही दिलेले उदाहरण इथे लागु होणार नाही. भाषा विषय शिकवताना त्यांनी त्याला पूरक असे काही वेगळे समाविष्ट केले. त्या कथेत कुणाची विक्षिप्त वागणुक, आणि काही शब्द यावरुन ही कथा कॉलेजात शिकवणे योग्य की नाही यावर प्राध्यापक, कॉलेजचे डिन आणि इंग्रजी विभागाचे प्रमुख (दोन्ही एकच व्यक्ती की दोन वेगळ्या कल्पना नाही) आणि कॉलेज अध्यक्ष यांच्यात मतांतर आहे. थोडक्यात अभ्यासक्रमाच्या विरोधात काही शिकवले हे उघड आहे असे वाटत नाही.
कॉलेजचे काही नियम हे त्या राज्यातील काही मूलभूत कायदे/हक्कांपेक्षा वेगळे असू शकतात का हे तिथल्या कायद्यानुसार ठरेल.
तेव्हा फ्रिडम ऑफ स्पीच लागु होईलच की नाही माहित नाही, पण तुम्ही दिलेल्या उदाहरणापेक्षा हे वेगळे दिसतेय असे मला वाटते.
अध्यक्षांनी त्यांना ही कथा यापुढे शिकवु नये असे सांगीतलेय आणि तरीही त्या अडुन बसल्याने कारवाई केली असेल तर मात्र ती वेगळी बाब होईल. तसे नसेल तर केवळ ती कथा शिकवली असे कळले यावरून नोकरीवरून काढुन टाकण्याची कारवाई योग्य वाटली नाही.
हे वरील लेखात वाचले त्यावरून.

इथे फर्स्ट अमेंडमेंट लागू होतो. पब्लीक युनिवर्सिटी आहे म्हणजे फेडरल लॉ. त्यातून ही कथा अनेक वर्षे अनेक विद्यापिठांतून इंग्रजी साहित्याचा अभ्यास म्हणून अभ्यासक्रमात आहे. प्रौढ साहित्य म्हणून आक्षेप तर विद्यार्थी काही मिडल स्कुलर्स नाहीत तर त्या वयोगटासाठी अयोग्य कथा म्हणायला. केवळ मला माझ्या मुलीला वाचायला द्यायला आवडणार नाही म्हणून ही कथा अभ्यासक्रमात नको आणि म्हणून प्रोफेसरच्या पदावरील व्यक्तीला नोकरीवरुन काढून टाकणे हे चुकीचे, खरे तर अधिकारचा गैरवापर. पब्लीक युनिवर्सिटीचे अध्यक्ष असणे म्हणजे काही सर्वे सर्वा नव्हे उलट फेडरल लॉ पाळण्याची जबाबदारी आली.
जो विषय शिकवायची जबाबदारी आहे त्याच्याशी आखलेला अभ्यासक्रम, असाईनमेंट्स वगैरे निगडीत असणे आवश्यक असते. मात्र इंग्रजी साहित्याच्या अभ्यासक्रमात कुठल्या कथा, कविता अभ्यासक्रमात असतील त्यावर विद्यापिठाच्या अध्यक्षांचा अंकूश, तो देखील केवळ वैयक्तीक कल/मत म्हणून आणि वर परत नोकरीवरुन काढून टाकणे हे सगळेच गैर!

हा. अध्यक्षाचे वैयक्तिक मत त्यांना अशा प्रमाणे लादण्यात यावे की नाही हा त्या संस्थेचा गव्हर्नन्स इश्यु होऊ शकतो. पण चर्चेसाठी तात्पुरते मानू की अध्यक्षांचे हे म्हणणे बोर्ड सुद्धा ratify करत आहे. त्यावेळीस आपण काय म्हणू ?

>>अध्यक्षांचे हे म्हणणे बोर्ड सुद्धा ratify करत आहे. त्यावेळीस आपण काय म्हणू ?>> तरीही तेच. त्यातून ही काही फेथ बेस्ड युनिवर्सिटी नाही. त्यांना जरा लिगल रुम असते पण ही पब्लीक युनिवर्सिटी आहे, विद्यार्थी सज्ञान आहेत आणि अशा प्रकारच्या सेन्सॉरशिपमधून प्रोफेसर मंडळींच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर घाला घालणे अयोग्य.
काही वेळा स्टेटच्या कायद्यानुसार काही गोष्टी शिकवता येणार नाहीत असे असते मात्र त्यात हे पुस्तक बसत नाही.

शाळेत डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत शिकवल्याबद्दल एका शिक्षकावर खटला भरण्यात आला होता. त्या घटनेवर आधारित ' Inherit the Wind ' हा प्रचंड गाजलेला सिनेमा ( 1960 ) ! स्पेंसर ट्रेसी व फ्रेडरिक मार्च ह्या दोन कसलेल्या महान अभिनेत्यांनी एक अविस्मरणीय व अद्वितीय court room drama या सिनेमाद्वारे करून ठेवला !!
या पोस्टच्या संदर्भात त्या सिनेमाची आठवण झाली , इतकंच.

* Inherit the Wind
>>>> अरे वा ! छान माहिती दिलीत.
यूट्यूबवर आहे पण त्यातील नट वेगळे आहेत.
पण काही हरकत नाही. नक्की पाहीन !

अवांतर :
* स्पेन्सर ट्रेसी >>>>
याचे चित्रपट काही मी पाहिलेले नाहीत परंतु विजय तेंडुलकर यांच्या लेखनात त्याचे कौतुक वाचलेले होते ते आठवले. तो मजकूर उद्धृत करण्याचा मोह होतोय :
“ . . . आणि या सर्वांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनयसामर्थ्याने ताडमाड उंच झुलणारे स्पेन्सर ट्रेसी आणि चार्ल्स लॉटन तर अगदी ऐन फॉर्मात होते. या सर्वांनी त्या काळात पुण्यातल्या एका थेटरात आडवेळच्या खेळांना अगदी आमच्या पुढ्यात उपस्थित होऊन, त्यांना न्याहाळताना दुखलेल्या आमच्या माना देखील आम्हाला जाणवू नयेत इतकी अपार सुखे आणि तृप्तीचे क्षण आम्हाला दिले . . . “

(‘सर पॉल म्युनी’ या रातराणी’ पुस्तकातील लेखातून साभार !)

*पण त्यातील नट वेगळे आहेत* - नंतरचा 1990 च्या दरम्यानचा तो सिनेमा असावा ( बहुतेक कर्क डग्लस होता त्या सिनेमात ).
*स्पेन्सर ट्रेसी आणि चार्ल्स लॉटन तर अगदी ऐन फॉर्मात होते. *. - अगदी खरंय. ट्रेसीचा Judgement at Nyurenberg, Father of the Bride व लॉटनचा Witness for Prosecution मिळाल्यास अवश्य पहावे.

* बहुतेक कर्क डग्लस >>>
Jack Lemmon, George C. Scott, Lane Smith ही नावे दिसताहेत.

* Witness for Prosecution >>> याचे मराठी रूपांतर 'खरं सांगायचं तर' बरेच वेळा पाहिले आहे.
बघूया आता इंग्लिश सवडीने . . .

@ भाऊ,
चित्रपट पाहिला. https://www.youtube.com/watch?v=CLOa0eJpPuI&t=4s
अशक्य सुंदर आहे ! अप्रतिम. धन्यवाद.

उत्कृष्ट संवाद हा तर चित्रपटाचा आत्माच म्हणावा लागेल. सर्व ज्येष्ठ अभिनेत्यांच्या भूमिका देखील अतिशय सुंदर आणि प्रगल्भ.
अनेक संवाद मनाला भिडले. नमुन्यादाखल हे काही :
“That is evolution for you. . . “
“window shopping for heaven . . . “
“a wicked law like cholera will destroy everyone..”

चित्रपटाच्या शेवटी बचाव पक्षाचा वकील आणि पत्रकार एकमेकांचे बौद्धिक घेत एकमेकांना ज्या काही शालजोड्या देतात त्या तर अप्रतिमच. आणि संवादातले अखेरचे वाक्य - curtain line - तर अगदी सरताज ! ते प्रत्यक्षच पहावे असे . . .

सर्व संवाद नीट पचवून घेण्यासाठी चित्रपट पुन्हा एकदा पाहावा लागेल Happy
. . . .
या लेखातील खटल्याचा निकाल पाहणे रोचक असेल.

ऑन अ लायटर नोट, मला ना पुलंच्या लिखाणातले त्यांचे ते प्रोफेसर आठवले

"That part of Radha below her shoulders and above her abdomen"

"That much laughter is enough"

ऑन अ सिरीयस नोट -

मुक्त अभिव्यक्ती ही अध्यापनात असली, तरच ती अध्ययनात पण रुजू शकते, मुक्तिविचारी समाज बनवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात सेन्सॉर लावणे मला तर तितकेसे पटत नाही.

Having said that, मुक्तविचारी अध्यापनात सुद्धा तारतम्य हवे, कारण पुस्तकात काहीही अन् कितीही मुक्त असले तरी प्रॅक्टिकल जगात प्रत्येकच गोष्टीवर काहीतरी कार्यकारभावोद्भव इफेक्ट असतात.

सबस्टन्स अब्युज वर आधारित अमर्याद वागणुकीचे वर्णन करणारी शोकांती कथा पाठ्यक्रमात वर्णी लावताना जर संबंधित संस्थेच्या अध्यक्षांना चालणारी होती तर त्यांनी त्या शिक्षिकेला ती शिकवल्याबद्दल बडतर्फ करणे तितकेसे तार्किक वाटत नाही. Makin the buck stop midway isn't the right approach. त्या शिक्षिकेने त्या कथानायिका (?) असणाऱ्या व्यसनाधिन मास्तरणीचे महिमामंडन केले असते तर कदाचित त्या शिक्षिकेला काही एक्सप्लेनेशन कॉल करणार एखाद मेमो मिळणे समजू शकलो असतो मी पण.

वैयक्तिक मत - मुक्तविचारी अभिव्यक्ती ही पुस्तकी अभिव्यक्ती इतकी मुक्त नसते, तिचे सामाजिक इफेक्ट असतात आणि त्यांची जबाबदारी पण कुठेतरी येऊन थांबते, असा संयत स्टँड मी इंडोर्स करेल पण त्या शिक्षिकेला बडतर्फ करणे आततायी वाटते मला तरी.

टीप - संबंधित स्टेट लॉ किंवा अशा खटल्यात असणारा फेडरल लीगल प्रेसिडेन्स ह्यावर माझा कायदेविषयक अभ्यास नक्की नाहीच आणि माझे विचार हे मी माझ्या जबाबदारीवर माझे एक स्वगत/मुक्तक म्हणून मांडतोय हे मी नमूद करू इच्छितो.

* वरील स्वगत/मुक्तक >>> नक्कीच चांगले आहे आणि आवडले !
* पुलंच्या लिखाणातले त्यांचे ते प्रोफेसर >>. खासच.
. . .
“. . . Inherit the Wind . . . “ ही बायबलमधली ओळ तर सुंदरच आहे. तसेच चित्रपट ज्या 1925 मधील घटनेवर (खटला) बेतलेला आहे ती घटना देखील भारी. आता ती मुळातून वाचणे आले. याच नावाचे नाटक देखील आहे असे दिसते.

>>अरे!! काय सुरेख सिनेमा आहे. बघते आहे. भाऊ खूप आभार. इथे असे चतुरस्र लोक आहेत - हा फायदा.>> +१

बाकी माझ्या लेकालाही शाळेत ते डार्विनची उत्क्रांती वगैरे शिकवले नव्हते. हा २००८-२००९ चा काळ. त्याने आठवीला बायो -१० घेतले होते. ही खरे तर हायस्कूल ग्रॅड्यूएशनसाठी आवश्यक अशी स्टेटची परीक्षा होती आणि त्याच्या मानकामधे उत्क्रांती वगैरे होते पण आमच्या लोकल स्कूलबोर्डाची मर्जी म्हणून शाळेत शिकवत नसत. तो सगळा भाग घरी करुन घ्यावा लागे. जी मुलं आठवीला हा कोर्स घेत त्यांना अनुभवी पालक कठीण व्रत असल्याच्या थाटात ओपन हाउसच्या दिवशी हे सगळे ऐकवत. या परीक्षेचे मार्क ट्रान्सक्रिप्टवर जात. साहाजिकच एरवी उत्क्रांती वगैरे न मानणारी, आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेली डबल ढोलकी, लेकराचा जीपीए चर्च पेक्षा महत्वाचा म्हणून घरी गुपचुप अभ्यास करुन घेत. जी मुलं हाच कोर्स १०वीला घेत त्यातल्या बहुतेक मुलांसाठी घरी कुणी शिकवेल हा पर्याय नसल्याने श्रद्धा असो, नसो तो भाग अभ्यासातून बादच होई.