ठाण्याचा ढाण्या वाघ : मेजर मनीष पितांबरे

Submitted by गुरुदिनि on 10 August, 2026 - 05:43

manish pitambare.jpg

"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला" हे कुसुमाग्रजांचे ‘कोलंबसाचे गर्वगीत’ नावाचे काव्य सर्वपरिचित आहे. त्यातला जिगरबाज नाविक समुद्रातल्या आणि जीवनातल्या सर्व वादळांना आणि संकटांना आपल्या दुर्दम्य कर्तृत्वाने नामोहरम करीत, आपल्या नावेला आणि त्यातील प्रवाशांना सुखरूप किनाऱ्यावर पोहोचवतो. त्याचप्रमाणे आपल्या सैन्यदलातील शूर जवान आपल्या प्राणांची पर्वा न करता शत्रूशी लढा देत असतात, ज्यामुळे आपल्यासारखे सामान्य लोक सुखरूप राहतात आणि दैनंदिन आयुष्य निर्धोकपणे जगू शकतात. याच शूर परंपरेतील एक लखलखते मराठी नाव म्हणजे हुतात्मा ‘मेजर मनीष हिराजी पितांबरे’!

मनीष यांचा जन्म ठाण्यामध्ये १९७५ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात हिराजी आणि हेमांगिनी पितांबरे या दाम्पत्याच्या पोटी झाला. मुरबाड तालुक्यातील ‘व्यापारी-मानवली’ हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या वाडवडिलांची तेथे शेती होती परंतु त्यातून फारसे उत्पन्न होईना म्हणून त्यांचे वडील हिराजी ठाण्यात आले. त्यांना शिक्षणानंतर सरकारी नोकरी मिळाली आणि ते ठाण्यातच स्थिरावले. त्यामुळे मनीष यांचे प्राथमिक शिक्षण ठाण्याच्या ‘ब्राम्हण सेवा संस्थे’च्या शाळेत आणि नंतरचे शिक्षण ‘महाराष्ट्र माध्यमिक’ शाळेत झाले. शाळेत असताना ते अभ्यासाबरोबरच खेळातही चमक दाखवत असत. शाळेत एकदा समाजशास्त्राच्या वर्गात जयश्री जोग मॅडमनी लष्करातील करियरविषयी माहिती दिली. त्याने मनीष अतिशय प्रेरित झाले आणि त्यांनी सैन्यात जाण्याचा निश्चय केला. त्या काळात मनीषना शस्त्रात्रे, सैनिक, देशसेवा यांचे प्रचंड वेड लागले. खरं तर मनीष अभ्यासात हुशार असल्याने त्यांनी डॉक्टर व्हावे असे त्यांच्या आई वडिलांना वाटत होते. पण मनिषचा सैन्य अधिकारी होण्याचा निश्चय मात्र दिवसेंदिवस ठाम होऊ लागला. त्यामुळे दहावीला चांगले ८४% मिळूनही मेडिकलला न जाता त्यांनी खडकवासल्याच्या ‘एनडीए’ला ऍडमिशन घेतली. तिथला कोर्स चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्यानंतर ते ‘इंडियन मिलिटरी अकॅडमी’मध्ये दाखल झाले. १९९६ मध्ये ते भारतीय सैन्यात सेकंड लेफ्टनंट या पदावर कमिशन्ड ऑफिसर म्हणून रुजू झाले.

यानंतर दोन वर्षात १९९८ साली कॅप्टन बनले आणि अथक प्रयत्न आणि मेहनत यांच्या जोरावर २००२ साली ते मेजर झाले. या काळात देशाच्या विविध भागांत अनेक जबाबदारीच्या कारवायांमध्ये भाग घेतला. सैन्याच्या वेगवेगळ्या ऑपरेशन्स मध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी केलेल्या अतिशय धाडसी कामगिरीमुळे वरिष्ठ त्यांच्यावर खुश असत. नंतर त्यांनी स्वेच्छेने ‘स्पेशल फोर्स कमांडो’ म्हणून प्रशिक्षण घेतले आणि २००६ साली पॅराशुट रेजिमेंटच्या ‘एलिट थ्री पॅरा स्पेशल फोर्स’ बटालियन मध्ये नियुक्त झाले. दरम्यानच्या काळात जुलै २००६ मध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट मालिका झाली होती. त्यात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला होता. या हल्ल्यातील प्रमुख संशयित ‘अल बद्र’चा अतिरेकी तौफिक कमाल याचा शोध घेणाऱ्या टीमचा मेजर पितांबरे हे एक महत्त्वाचा भाग होते. ह्या दरम्यानच्या कालावधीत २००३ साली ते ‘मुग्धा’ यांच्यासोबत विवाहबद्ध झाले आणि या जोडप्याला २००५ साली ‘युक्ता’ नावाची मुलगी झाली

त्यांच्या जम्मू काश्मीरमधील कार्यकाळात ते दहशतवादविरोधी पथकामध्ये पॅराशुट रेजिमेंटच्या तिसऱ्या बटालियनमध्ये कार्यरत होते. लष्कराच्या चार ऑपरेशन मध्ये भाग घेतला, ज्यात त्यांनी सात दहशतवादांना यमसदनी धाडलं. शिवाय ओलीस ठेवलेल्या तीन नागरिकांची सुखरूप सुटका केली. २००६ साली मेजर पितांबरे यांनी जम्मू-काश्मीरमधील त्यांचा कार्यकाळ जवळपास पूर्ण केला आणि आग्रा येथे त्यांच्या पुढील असाइन्मेंटसाठी निघणार होते. त्यांची पत्नी पॅकिंग करण्यास व्यस्त झाली आणि आपल्या नवीन घरासाठी अनेक योजना आखू लागली. पण भविष्यात काही वेगळेच घडायचे होते. २७ नोव्हेंबर २००६ रोजी त्यांना एका एन्काऊंटर इन्सर्जन्सी ऑपरेशनमध्ये सामील व्हावे लागले. दक्षिण काश्मीरमधील बीजबेहारा भागात हिजबुल मुजाहिदिन या संघटनेचा एक कट्टर दहशतवादी आणि प्रमुख कमांडर लपून बसल्याची माहिती त्यांच्या युनिटला गुप्तचर सूत्रांकडून मिळाली.

ही खबर मिळाल्यानंतर मध्यरात्री ते आपले पथक घेऊन संशयित भागात पोहोचले आणि त्यांनी घेराव घातला. त्याबरोबर लपलेल्या दहशतवाद्यांनी आपल्या सैन्याच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ही चकमक अनेक तास सुरू राहिली. या चकमकीदरम्यान मेजर पितांबरे यांनी सोहेल फैजल या भयंकर जहाल आतंकवाद्याला ठार मारले. त्याच दरम्यान दहशतवाद्यांकडून केल्या गेलेल्या गोळीबाराच्या फैरीत त्यांच्या पथकातील एक जवान गंभीर जखमी झाला. त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मेजर पितांबरे स्वतःच्या प्राणांची आणि सुरक्षेची परवा न करता पुढे झाले. पण यादरम्यान शत्रूच्या गोळीबारात मनीष गंभीरपणे जखमी झाले. यावेळी प्रचंड प्रमाणात झालेला रक्तस्त्राव आणि प्राणांतिक वेदनांमुळे त्यांना वीरमरण आले.

त्यांच्या अतुलनीय धैर्य, नेतृत्व आणि सर्वोच्च बलिदानासाठी मेजर मनीष यांना ‘कीर्तीचक्र’ देऊन गौरविण्यात आले. कीर्तीचक्र हा शौर्यासाठीचा देशाचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी सांगतात की आपली नोकरी, ध्येय आणि देश याच्यासमोर त्यांना कुटुंबासहित बाकी सारे काही अगदी दुय्यम होते. मेजर मनीष आपल्या सहकाऱ्यांमध्ये एवढे लोकप्रिय होते की त्यांना शेवटची सलामी देण्यासाठी आलेल्या त्यांच्या रेजिमेंटच्या सैनिकांना अश्रू आवरणं अवघड जात होतं. त्यांचा मृतदेह ठाण्यामध्ये आणला गेला तेव्हा जणू अवघे ठाणे शहर त्यांना सलामी द्यायला रस्त्यावर उतरलं होतं. त्या शूर सैनिकांनाही भावनावश झालेले पाहून उपस्थितांच्याही अश्रूंच्या बांध फुटला. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री साडेबारा वाजता मेजर यांची अंतयात्रा निघाली त्यावेळी त्यांचा मित्रपरिवार, शेजारीपाजारी, कुटुंबीय आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी सारेच सद्गदित झाले, कोणी त्यांच्या बालपणीच्या आठवणीत रमले होते तर कोणी त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत होते. कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या मेजर मनीषची शौर्यगाथा प्रत्येकाच्या ओठी होती.

लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव दिलखुलास आणि कोणाच्याही अडचणीत धावून जाण्याचा असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या धाडसी, मनस्वी स्वभावामुळे वारिष्ठांनाही त्यांच्याबद्दल प्रेम वाटत असे. अनेक जुन्या दुर्मिळ गोष्टी संग्रह करण्याचा छंद त्यांना होता. ते आणि त्यांचे खास मित्र मेजर निलेश पाथरकर हे दोघे आग्रा येथे एकत्र कामगिरीवर काही काळ होते. मनीषच्या निधनामुळे पाथरकर कुटुंबियांवरही दुःखाचा डोंगर कोसळला. काही महिन्यांपूर्वीच मेजर मनीष आणि निलेश यांचे अजून एक मित्र ‘मेजर ओंकार’ हेही हुतात्मा झाले होते. त्यावेळी निलेश यांचा मुलगा अभिमन्यू याने ओंकार यांचा फोटो देवघरात ठेवला होता. दुर्दैवाने त्यात लवकरच मेजर मनीष यांच्याही फोटोची भर पडली.

मेजर मनीष आज आपल्याबरोबर असते तर त्यांनी यावर्षी वयाची पन्नाशी साजरी केली असती. त्यानिमित्ताने त्यांचे केलेले हे विशेष आदरपूर्वक स्मरण. आपल्यासारख्या सामान्य जणांना घरी सुरक्षित राहता यावे आणि दीपावलीसारखे सण कुटुंबासहित आनंदाने, सुखरूपपणे साजरा करता यावेत यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या मेजर मनीष यांच्यासारख्या देशाच्या शूर, धाडसी सुपुत्रांना मानाचा मुजरा.
जय हिंद!!

(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)
२७/११/२०२५

- गुरूप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)
guru.pandurkar@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखन भावना फार आवडली पण ती लेखनात दिसायला हवी, असे स्पष्ट पण प्रांजळ मत आहे. लेखन करताना अजूनही थोडे संशोधन करून लिहिण्याची गरज आहे असे वाटते.

एन्काउंटर इन्सर्जन्सी नावाचे कुठलेच ऑपरेशन आर्मी करत नाही, त्याला काउंटर इन्सर्जन्सी (कॉइन) ऑपरेशन म्हणतात आणि त्यात पुढे caso (कॉर्डन अँड सर्च) व sado (सीक अँड डिस्ट्रॉय) हे उपप्रकार असतात.

स्वेच्छेने ‘स्पेशल फोर्स कमांडो’ म्हणून प्रशिक्षण घेतले आणि २००६ साली पॅराशुट रेजिमेंटच्या ‘एलिट थ्री पॅरा स्पेशल फोर्स’ बटालियन मध्ये नियुक्त झाले.

त्यांनी स्वेच्छेने स्पेशल फोर्सेस प्रवेशांसाठी उमेदवारी करून त्याचा खडतर परिविक्षा अवधी (९० दिवसांचे प्रोबेशन) पूर्ण करून ३ पॅरा एस एफ मधे रुजू झाले (तुमचे वरील वाक्य असे लिहिले जाऊ शकते) एलिट हा शब्द त्या बटालियनच्या नावात नाहीये तर तिचे स्वरूप समजावून सांगताना सहसा वापरला जातो.

सकारात्मक लिहिताय त्यामुळे तुमचे लेखन अजून झळाळून जावे म्हणून हा सल्ला देतोय, फार काही तोफ नाही मी स्वतः तरी पण जे वाटले ते बोललो. आवडले पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या.

धन्यवाद.

मेजर मनीष पितांबरे यांना अभिवादन!

अशा सर्व वीरांची ओळख आपण करून देत आहात यासाठी आपल्यालाही वंदन.
माबोचे धाग्या वाघ आहात.

लेखन भावना फार आवडली पण ती लेखनात दिसायला हवी, असे स्पष्ट पण प्रांजळ मत आहे. लेखन करताना अजूनही थोडे संशोधन करून लिहिण्याची गरज आहे असे वाटते.

एन्काउंटर इन्सर्जन्सी नावाचे कुठलेच ऑपरेशन आर्मी करत नाही, त्याला काउंटर इन्सर्जन्सी (कॉइन) ऑपरेशन म्हणतात आणि त्यात पुढे caso (कॉर्डन अँड सर्च) व sado (सीक अँड डिस्ट्रॉय) हे उपप्रकार असतात.

स्वेच्छेने ‘स्पेशल फोर्स कमांडो’ म्हणून प्रशिक्षण घेतले आणि २००६ साली पॅराशुट रेजिमेंटच्या ‘एलिट थ्री पॅरा स्पेशल फोर्स’ बटालियन मध्ये नियुक्त झाले.

त्यांनी स्वेच्छेने स्पेशल फोर्सेस प्रवेशांसाठी उमेदवारी करून त्याचा खडतर परिविक्षा अवधी (९० दिवसांचे प्रोबेशन) पूर्ण करून ३ पॅरा एस एफ मधे रुजू झाले (तुमचे वरील वाक्य असे लिहिले जाऊ शकते) एलिट हा शब्द त्या बटालियनच्या नावात नाहीये तर तिचे स्वरूप समजावून सांगताना सहसा वापरला जातो.

सकारात्मक लिहिताय त्यामुळे तुमचे लेखन अजून झळाळून जावे म्हणून हा सल्ला देतोय, फार काही तोफ नाही मी स्वतः तरी पण जे वाटले ते बोललो. आवडले पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या.

धन्यवाद.

बाकी ठाण्याचा ढाण्या म्हणले अन् शहीद मेजर कौस्तुभ राणे आठवले नाहीत असे शक्यच नाही होत. वयाच्या २९व्या वर्षी गुरेज सेक्टर मध्ये अत्युच्च बलिदान देणारा जिगरबाज योद्धा !

images (24)_3.jpeg

धन्यवाद - "जेम्स वांड". आपल्या सकारात्मक सूचनांचे, टीकेचे स्वागत आहे. भविष्यात याबाबत काळजी घेतली जाईल.

गेली तीन वर्षे साधारण असा लेखन उपक्रम चालू केला आहे की -
देशासाठी बलिदान केलेल्या अश्या मराठी हुतात्मा वीरपुत्रांवर समाजमाध्यमांवर, दिवाळी अंकातून लिहावे - ज्यांची त्यावर्षी २५वी किंवा ५०वी किंवा ७५वी जयंती आहे किंवा जन्मशताब्दी आहे.
तसेच २५वी किंवा ५०वी किंवा ७५वी पुण्यतिथी आहे.

भविष्यात 'मेजर कौस्तुभ राणे' यांच्या वीरस्मृतींना लेखनातून जागवायला नक्कीच आवडेल.
धन्यवाद.