सुगीची वरात (भात लावणी)

Submitted by दत्तात्रय साळुंके on 10 August, 2026 - 01:15

व-हाड पावसाचे आले द-याखो-यात
सुखावले भातखाचर न्हाले जलधारात
कोण आचारी खपतो लाल महालात
अशी लगबग चालली रानी लग्नात

आली सुगीची वरात हिरव्या डोंगराला
नाचतात बेभान सानथोर नदीनाले
गावोगावचे सोयरे आलेले लग्नाला
बुट्टी हिरवी साजिरी, लाल मांडवाला

ताल धरीते इरले टपटप थेंबांच्या सुरात
लाल हळद सर्वांगा, भारी हुरूप मनात
गाणं भाकरीचं आलं श्रमिकांच्या ओठात
आयाबाया,बापू,नाना व-हाडाच्या स्वागता

लाल गालिचा पसरला बांधा बांधाला
शाल इरल्यांची सुरेख माना पानाला
विडा तरव्यांचा गोड ओठ लाल रंगला
असे अनोखे स्वागत व्याही भारावला

व्याही झाले वेडेपिसे अंग अंग बरसे
लाल कौलारू घरही कात टाकत हसे
सुखसपान सुगीचे लागीरले चराचर
कोंदणात कोकणाच्या नंदनवन वसे

नाते भुईचे जडले आकाशाशी
खळ्याखळ्यात नांदती सुवर्णराशी

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कसली सुंदर आहे. इथे 'लाल' रंगाचे आधिक्य का आहे?
----
लाल रंगाच्या आधिक्यावरुन 'ललिता देवी' आठवली - अरुण, सिंदूर, रक्त असे विविध 'लाल' रंगांच्या छटा दाखविणारे शब्द तिच्या सहस्रनामत आहे. तिचे ध्यानही रक्तवर्णी वस्त्रातच असते.

हेमंतसर
सामो
खूप धन्यवाद

सामो लाल हा शब्द इतका का आला हे मलाही कळलं नाही. तुमचा प्रतिसाद आल्यावर पाहीले.
कोकणची लाल माती म्हणून तेथलं पाऊसपाणी लालतांबूस अशा अर्थी.
भरपावसातली भातलागण आणि तिचा उत्साह एखाद्या लग्नासम वाटला.

सुंदर कविता..!

मला भात लावणीच्या दिवसांची आठवण आली. कविता वाचून शेताची सफर करून आले मी..!

लहान असताना भात लावणीच्या दिवसात शेतात लावणी करणाऱ्या माणसांसाठी शिदोरी घेऊन घरातले कुणीही गेले की शाळेला सुट्टी असली की मी मुद्दाम सोबतीला जायचे .. पाणी किंवा ताटं हातात घेऊन मदतीला जाण्याचे निमित्त असायचे.. खरं कारण हे की, मला त्या दिवसांत शेतात बांधावर बसून जेवायला खूप आवडायचे. हिरवीगार खाचरं, खाचरातून वाहणारं स्वच्छ पाणी पाहत दोन घास जास्तच खाल्ले जायचे.. तेव्हा चिखलात पाय घसरून पडायची भीती नव्हती की साप - किड्यांची भीती नाही वाटायची. रस्त्याला जाताना जमिनीतून फुटणारे लहान-लहान झरे मोजत जायचे मी..! फारच अवांतर आहे पण राहवलं नाही लिहिल्याशिवाय..!

खूप छान... ना धो महानोरांची आठवण आली वाचताना.
रूपाली छान प्रतिसाद. सामो जबरदस्त निरीक्षण.
हे आमचं शेत.. तरवा तरारलाय.
IMG-20260731-WA0002.jpg

शेजारचं शेत आहे. आम्ही भात लावत नाही. आसपास सगळे एकजात इंद्रायणी तांदूळ लावतात.
हेमाताई, तरवा म्हणजे काय?

कल्याणच्या आसपास त्याला 'आवणी' म्हणायचे. तिथल्या शाळांना आवणीची सुट्टी असायची. इथे तळेगाव जवळही आवणी म्हणतात. गेल्या आठ - दहा दिवसात सगळ्यांची आवणी झाली. आता खाचरात पाणी भरलंय. त्यात आभाळाचं प्रतिबिंब दिसतं. हिरवीगार रोपं, पाणी आणि सावळं-करडं आभाळ. डोळ्यांना मेजवानी.
आता थांबते. नाहीतर इतक्या सुंदर कवितेचा धागा हायजॅक होईल!

मनीमोहोर खूप धन्यवाद
ना. धो. उत्तुंग प्रतिभेचे धनी, त्यांच्या बहुतांश कविता अभ्यासल्या.
तरव्यांचा फोटो भारी आहे. खूप भात लागण होत असेल एवढ्या तरव्यात. तरवे वेचताना पाण्यात स्टुलावर बसलेली माणसं, दिवस,दिवस चिखलात राबणारे हातपाय. त्यावर पडलेल्या चिखल्या (भेगा) दोन घासासाठी सगळं सोसून धो, धो पावसात गाणं गात चाललेली हातांची लगबग डोळे थक्क करते. माणसाच्या जिद्दीला मर्यादा नसतात.

अनया आभार
कल्याण पश्चिम येथे बरीच वर्ष वास्तव्य, खडकपाडा, गोदरेज हिलकडं भातशेती जवळून अनुभवलीय. अगदी‌ भात पिकें पर्यंत पाह्यला जायचो.

तरवे,आवणी या शिवाय रोपांना कुठे, कुठे दाढही बोलतात.
वाक्यप्रयोग: दाढ काढायला जायचंय.
किती मजेशीर.

याच विषयावर सुधीर मोघेंच एक सुंदर गीत आहे. तरवे म्हणजे काळजाच्या मायेनं वाढवलेली वयात आलेली लेक. तिचं लग्न लावून सासरी पाठवणी करायचीय अशी कल्पना केलीय.
आला आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा || धृ ||
नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप
ओठी हसू पापणीत आसवांचा झरा || १ ||
आजवरी यांना किती जपलं जपलं
काळजाचं पाणी किती शिंपलं शिंपलं
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा || २ ||
येगळी माती आता ग येगळी दुनिया
आभाळाची माया बाई करील किमया
फुलंल बाई पावसानं मुलुख गं सारा || ३ ||

मंजूताई अनेको धन्यवाद

रूपालीताई खूप धन्यवाद...
>>>>लहान असताना भात लावणीच्या दिवसात शेतात लावणी करणाऱ्या माणसांसाठी शिदोरी घेऊन घरातले कुणीही गेले की शाळेला सुट्टी असली की मी मुद्दाम सोबतीला जायचे>>>

हा क्षण भात लावणी करणा-या कष्टक-यांना पोटपुजे बरोबर क्षणभर विश्रांतीचा, हसत खेळत विरंगुळ्याचा असतो. त्या गारेगार वातावरणात, चिंब ओलं झाल्यावर दोन घास गरम खाणं, गरमागरम चहा पिणं खूप सुखद असतं.
अवांतर काही नाही. खरं तर मला हे कवितेत उतरायचं होतं पण नाही आलं.

ममोताई, धरतीने हिरवा शालू नेसलायं ही उपमा खोटी वाटणार नाही तुमचं हिरवेगार शेत पाहून.. मला तिथे शांत बसून राहायला आवडेल.. खूप छान फोटो..!

अनया, फोटोतले करड्या रंगाचे आभाळ किती सुंदर दिसत्येयं..!

आमच्या भागात देखील आवणीचं म्हणतात भात लागवडीला.. वडील सांगायचे, आवणीच्या दिवसांत शाळेला सुट्टी मिळायची त्यांना..!

भाताच्या रोपांना आम्ही मूठ म्हणतो.. रात्रभर खाचरात बांधून ठेवलेल्या मुठांवर विंचू येऊन राहायचे.. काळजीपूर्वक हाताळावे लागत भाताची रोपे नाहीतर विंचवाचा दंश हमखास ठरलेला असायचा..

पूर्वी आदल्या वर्षीचे कणग्यातले भात बियाणे म्हणून वापरले जायचे .. त्यांची नावही मला आवडायची.. रत्ना, जया अशी असायची.. त्या भाताला चव होती. नंतर संकरीत भात बियाणे आली.. पीक भरघोस पण चव मात्र नाममात्र..!

कोलम तांदूळ काही खाचरात व्हायचा पण त्यासाठी वेळ आणि मशागत जास्त लागायची. वाडा कोलम फेमस आहे इथे..!

आवणी संपली की, आावणीच्या रोजंदारी कामाला जे आदिवासी बांधव एक - दोन महिने घर सोड़ून यायचे ते घरी जायच्या आदल्या दिवशी ज्याची आवणी संपली त्याच्या अंगणात तारपा नृत्य करायचे .. आमच्या अंगणातले तारपा नृत्य मला अंधुकसे आठवते.

दत्तात्रेयजी, ' आला आला वारा.. संगे पावसाच्या धारा..' हे आवडतं गाणं आहे.

>>>>>>>तरवे म्हणजे काळजाच्या मायेनं वाढवलेली वयात आलेली लेक. तिचं लग्न लावून सासरी पाठवणी करायचीय अशी कल्पना केलीय.
अरेच्या हे नव्हते माहीत. ही उपमा फारच समर्पक आहे.