देवशयनीच्या रात्री

Submitted by अनन्त्_यात्री on 26 July, 2026 - 10:43

देवशयनीच्या रात्री
पेंगलेला माझा विठू
म्हणे," झोपू दे रे मला
कार्तिकीला आता भेटू"

"भोळ्या भाबड्यांची माथी
पायी घेतो टेकवून
त्यांचे नवस भाबडे
जाती कान कोंदवून"

"सगुणाचा हाच पेच
त्याचा ताण येतो घोर
कसे देऊ त्यांना सांग
काही थातूरमातूर?"

"रखुमाई रुसलेली
सल्ला देत नाही मला
चातुर्मासी शयनाचा
मार्ग म्हणून सुचला"

"आता कार्तिकी पावेतो
योगनिद्रेत जाईन
प्रबोधिनीच्या मुहूर्ती
पुन्हा कामाला लागेन"

सगुणाची बेडी विठो
कधीची रे मी तोडिली
शयनी वा प्रबोधिनी
दोन्ही एक मला झाली

Group content visibility: 
Use group defaults

सुरेखच...
योग माया
योग निद्रा
सगुण निर्गुण एकु गोविंदु रे....
___/\___

सगुणाची बेडी विठो
कधीची रे मी तोडिली
शयनी वा प्रबोधिनी
दोन्ही एक मला झाली

व्वा सुंदर

सुंदर कविता..!
तुमच्याकडे शब्द संपदा अफाट आहे..!