अपरिचित रेडीओ फ्रिक्वेन्सी

Submitted by राज अज्ञानी on 24 July, 2026 - 11:28

(पहिलाच प्रयत्न आहे, मतकरींच्या कथा कधी काळी वाचलेल्या असल्याने प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.)

दिगंबरपंतांना जुन्या आणि दुर्मिळ वस्तू गोळा करायचा भयंकर छंद होता.
निवृत्त बँक कॅशियर असलेले पंत तसे अत्यंत व्यवहारचतुर, पण दुर्मिळ वस्तूंच्या बाजारात मात्र ते एखाद्या लहान मुलासारखे बावळट बनायचे.

शनिवारच्या जुन्या बाजारात भटकताना शास्त्रींच्या दुकानासमोर ते थबकले. पंतांची नजर एका लाकडी पेटीवर पडली. तो १९५० च्या दशकातला एक जुना, नक्षीदार व्हॉल्व्हचा रेडिओ होता. त्याच्यावर प्रचंड धूळ बसलेली, होती. लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे त्याचे पितळी नॉब्स आणि समोर कापडी जाळी. टीव्ही येण्याआधी असे रेडीओज घरोघर असायचे. नाही नाही, हा त्याच्याही आधीचा.

"काय हो शास्त्रीबुवा, हा डबा चालतोय की फक्त शोभेचा?" पंतांनी मिस्कीलपणे दात दाखवत विक्रेत्याला विचारले.

विक्रेता एक वयोवृद्ध, किरकोळ बांध्याचा म्हातारा होता. त्याने चष्म्यातून पंतांकडे पाहिले आणि खोकत म्हणाला, "मालक, हा डबा नाहीये, जुना फिलिप्स आहे. आणि हा विजेवर चालत नाही. माणसाच्या आठवणींवर चालतो!"

पंत खदखदून हसले. "काय सांगता! म्हणजे वीज बिल वाचणार तर! मग यात जुनी गाणी ऐकू येतील की थेट आकाशवाणी पुणे केंद्र?"
पंतांचा विश्वास बसला नव्हता, पण कुतूहल चाळवले होते. शास्त्रीबुवांनी भारी ट्रिक वापरली. आपल्याला आता उत्सुकता लागलीय म्हणजे आपण घेणार हे त्यांना चांगलं ठाऊक आहे.

"तुम्हाला जे ऐकायचे आहे, तेच ऐकू येईल," शाश्त्रीबुवा त्यांच्या चेह यावरचे भाव वाचत गंभीरपणे म्हणाले. पंतांनी ५०० रुपयांना तो रेडिओ विकत घेतला आणि थाटात घरी आणला.

पंतांचे घर गावाबाहेर एका शांत टेकडीवर होते. पाच वर्षांपूर्वी पत्नी वारल्यापासून ते घरात एकटेच राहायचे. घरी आल्यावर त्यांनी रेडिओ स्वच्छ केला. त्याचा जुना लाकडी पोत चमकू लागला. गंमत म्हणून त्यांनी वायर सॉकेटमध्ये न लावताच रेडिओचा गोल नॉब फिरवला.

कडऽऽकड... सरररर...

नॉबच्या दोरीचा सटकल्याचा आणि नंतर सरकल्याचा आवाज.

अचानक रेडिओच्या आतली लाल बत्ती पेटली! पंतांच्या भुवया उंचावल्या.
रेडिओतून स्पष्ट आणि खणखणीत आवाज आला,
"हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. आता ऐका, 'आपली आवड'"
पाठोपाठ एक दुर्मिळ मराठी गाणं सुरू झालं.

"सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला"
पंत खूष झाले. हे गाणं किती आवडायचं त्यांना. काळाच्या ओघात हरवलंच होतं कि ते.
हा रेडीओ त्यांना बेहद्द आवडला.

मग त्यांनी बॅटरी कुठे ठेवलीय त्याच्या शोध घेतला. पण नाही, कुठेच ती सापडली नाही.

ते थक्क झाले!
"अरेच्चा! वायर न लावताही गाणी वाजतात? चिनी तंत्रज्ञान असावं!" पंतांनी स्वतःशीच विनोद केला आणि गाण्याचा आनंद घेत चहा बनवला. तो दिवस अतिशय आनंदात आणि हलक्याफुलक्या वातावरणात गेला.

पंधरा दिवस गेले. पंत काही फुटकळ कामात व्यस्त होते. गावाच्या बाहेरच्या जमिनीचा सौदा जमत आला होता.
पंतांकडे भरपूर पैसा असल्याच्या वार्ता गावात कर्णोपकर्णी होत असल्याने जमिनीचे व्यवहार त्यांच्या मध्यस्थीने होत असत.
पंतांकडे एव्हढा पैसा कुठून आला हा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जाई.

रेडिओ पंतांचा उत्तम सोबती बनला होता. पण हळूहळू सटवाई कूस बदलू लागली होती.

एका पावसाळी रात्री, बाहेर प्रचंड विजा चमकत होत्या.
वारा सुसाट सुटला होता.

पंत बिछान्यावर पडून पुस्तक वाचत होते.

रेडिओ बंद होता.
अचानक रेडिओतून घररर घररर असा आवाज येऊ लागला. पंतांनी पुस्तकावरून मान वर केली.
रेडिओची लाल बत्ती मिणमिणत होती.

रेडिओतून गाणे किंवा बातम्या येत नव्हत्या,
दोन माणसांच्या पुटपुटण्याचा आवाज येत होता!

पंतांनी कान टवकारले. आवाज ओळखीचा वाटत होता.
"दिगंबर फार डँबीस आहे रे, त्या दिवशी बँकेतून पन्नास हजार रुपये लंपास केले होते त्याने, कोणाला सांगूच दिले नाही"

पंतांची छाती धडधडली! हे त्यांचे स्वतःचे खूप जुने, ५० वर्षांपूर्वीचे गुप्त पाप होते, जे जगात कोणालाच माहित नव्हते!

"कोणाचा आवाज आहे हा?"
पंत ताडकन उठले आणि रेडिओजवळ गेले. त्यांनी रेडिओचा नॉब फिरवून बंद करायचा प्रयत्न केला, पण आवाज बंद झाला नाही!

पाठोपाठ दुसरा आवाज आला,"आणि रुक्मिणी आजारी असताना याने डॉक्टरला उशिरा बोलावले, हलगर्जीपणा केला"
पंतांना त्यांच्या दिवंगत पत्नीची आठवण आली.
त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू डवरले.

"बंद हो! बंद हो!"
त्यांनी ओरडून रेडिओची वायर खेचली.
पण वायर तर आधीच उघडी पडलेली होती! विजेचा संबंधच नव्हता!

त्या रात्री पंतांना झोप आली नाही. खोलीतील शांततेत त्यांना रेडिओच्या आतून कोणाचे तरी श्वासोच्छवास ऐकू येत असल्याचा भास होत होता.

पुढचे दोन दिवस पंतांनी त्या रेडिओवर एक जुने फडके टाकून ठेवले.
दिवस कसाबसा जाई पण रात्रीच्या काळोखातली गूढता आता त्यांच्या मनाच्या पटलावर तेलाच्या तवंगासारखी पसरतहोती.

एके दिवशी संध्याकाळी संपूर्ण गावात वीज गेली.
बाहेर ढगांचा गडगडाट सुरू झाला. अंधारात पंतांनी दिव्याची वात पेटवली. तितक्यात रेडिओवरून पुन्हा कडकड असा आवाज झाला.

या वेळी रेडिओवरून स्पष्टपणे बातम्यांचे प्रसारण सुरू झाले.
"विशेष बातमी... ५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास, टेकडीवरील बंगल्यात राहणारे ६५ वर्षांचे दिगंबर जोशी यांच्या घरात अचानक अपघात झाला"

पंतांचे पाय थरथरू लागले. ५ जुलै? आज तर ५ जुलै होती!

बातमी पुढे सुरू राहिली "रेडिओच्या जुन्या व्हॉल्व्हमधून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आणि गॅस गळतीमुळे बंगल्याला भयंकर आग लागली. दिगंबर जोशी यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला."

"काय बाष्कळपणा आहे!" पंत किंचाळले.
"मी जिवंत आहे! मी इथे उभा आहे!"

त्यांनी रागाच्या आणि भीतीच्या भरात शेजारी ठेवलेली भलीमोठी काठी उचलली.
आता रेडीओतून आवाज येऊ लागले.
"मी बरबाद झालो. बॅंकेत माझे पन्नास हजार रूपये गेले. त्या जोशाचंच काम असणार. मला विवरण भरायला सांगून खिडकीतल्या नोटा त्यानेच गायब केल्या. झडतीतूनही सुटला नराधम. मी बरबाद झालो"
कुणीतरी म्हणत होतं "शास्त्रीबुवा शांत व्हा"

दिगंबरपंतांचे डोळे विस्फारले गेले.
म्हणजे शास्त्रीबुवाच?

आणि त्यांनी रेडिओवर सपासप वार केले!

कडाडकड... चक्काचूर!

रेडिओचे लाकडी कव्हर फुटले,
आतील व्हॉल्व्ह आणि तारा बाहेर आल्या. रेडिओ शांत झाला.

पंतांनी सुटकेचा निश्वास सोडला.
"हं! मला घाबरवतोय का डबा?"

पंत वळले आणि स्वयंपाकघरात गेले.
मन शांत करण्यासाठी त्यांनी गॅस पेटवून चहा ठेवण्याचे ठरवले.
त्यांनी काडीपेटी काढली.

काडी पेटण्याच्या क्षणी अचानक पंतांच्या नाकाला एक तीव्र वास आला.,
गॅसच्या गळतीचा वास!

पंतांचे लक्ष गॅसच्या शेगडीकडे गेले.
शेगडीचा नॉब संपूर्ण चालू होता... आणि गॅस कित्येक तासांपासून हळूहळू संपूर्ण घरात पसरला होता!
मघाशी भीतीमुळे त्यांच्या जाणिवा बधिरल्या होत्या. त्यांना समजलेच नाही.

त्यांचे डोळे भीतीने पांढरे पडले.
हातातली पेटलेली काडी विझवण्याचा प्रयत्न केला.
पण.....
खूप उशीर झाला होता!

काडीच्या सूक्ष्म ठिणगीचा स्पर्श गॅसला झाला आणि एका प्रचंड स्फोटाने संपूर्ण स्वयंपाकघर आगीच्या ज्वालांनी वेढले गेले.

पंत जमिनीवर फेकले गेले.
चोहीकडे आग होती. ते वेदनेने किंचाळत होते.
तितक्यात, कोपऱ्यात फुटलेल्या आणि चक्काचूर झालेल्या त्या लाकडी रेडिओच्या अवशेषांमधून पुन्हा एकदा लाल बत्ती पेटली!

फुटलेल्या जाळीतून अतिशय संथ, थंड आणि क्रूर हसण्याचा आवाज आला.
तो शास्त्रींचा होता. शंकाच नाही.
"हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. दिगंबरपंत, बातमी ऐकल्याबद्दल धन्यवाद. आज ५ जुलै वेळ रात्री ९ वाजून १० मिनिटे. तुमचे प्रसारण इथेच समाप्त होत आहे!"

आणि आगीच्या लोळांमध्ये दिगंबरपंतांचे डोळे कायमचे मिटले गेले.
रेडिओच्या तुटलेल्या तारांमधून अजूनही एक गाणे वाजत होते.

भय इथले संपत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

कथा छानच आहे, निर्लेप निर्भेळ आणि काटेकोर कथा असे म्हणेन. तुम्ही ह्या प्रयोगात अजूनही लक्ष घाला मजेदार काहीतरी उतरेल तुमच्या लेखणीतून.

तुमच्या ह्या संकल्पनेला समांतर एक प्रयोग दिग्दर्शक नितेश तिवारीने केला आहे, झी ५ वर सिरीज आहे ती ग्यारह ग्यारह नावाने. राघव जुयाल (युग आर्या पात्राचे नाव) हा उत्तराखंड पोलिस मधला एक कर्मचारी असतो ज्याला एक जुना वाकी टाकी हाती लागतो आणि त्यावर रात्री रोज बरोबर ११:११ मिनिटांनी एक अंथवाल नावाचा अधिकारी संपर्क करून त्याला सुटू न शकणाऱ्या केसेस सोडवण्याच्या लीड्स देतो. अंथवाल हा १९९० मधे वारलेला/ मारलेला एक ईमानदार अधिकारी असतो इत्यादी इत्यादी स्टोरी लाईन आहे. एकंदरीत बरी बनवली आहे सिरीज.

images (32)_2.jpeg

धन्यवाद स्टॉव रॉजर्स, जेम्स वांड आणि सामो.

जेम्स वांड तुम्ही इथे माहिती देत असलेली वेबसिरीज बहुतेक पाहिली असावी असं वाटतंय. या मालिकेशी तुलना म्हणजे "कहां राजा भोज और कहां गंगू तेली" असा प्रकार आहे. पण या प्रेमासाठी धन्यवाद.

आता पुन्हा वाचली तर घिसाडघाई झाली असे वाटते. ग्यारह ग्यारह सारखी मालिका लिहायला लागणारा पेशन्स, तासनतास बैठक आणि पुन्हा पुन्हा वाचून दोष दूर करण्याची शिस्त या सर्वांचा अभाव आहे माझ्या ठायी. खर्डा म्हणता येईल फारतर. तुमच्या अपेक्षां पूर्ण करायला आता ते वय पण नाही राहिलं.