गोडी अपूर्णतेची . . . ? (2)

Submitted by हेमंतकुमार on 11 July, 2026 - 10:05

भाग १ : https://www.maayboli.com/node/88504

पहिल्या भागात आपण प्राचीन अरबी राणी शहरजादे आणि तिचा नवरा राजा शहरयार यांचा प्रेमालाप, प्रणय आणि रोज रात्री गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम पाहिला. आता या लेखात एका आधुनिक कथेतील शहरजादेची गोष्ट पाहू. याच नावाची ही कथा लिहीली आहे नामवंत जपानी लेखक हारुकी मुराकामी यांनी. ती गेल्या दशकात मूळ जपानीत प्रकाशित झाली आणि नंतर तिचा इंग्लिश अनुवाद झाल्याने ती आपल्यापर्यंत पोचलेली आहे. कालांतराने तिचा समावेश लेखकाच्या ‘मेन विदाऊट विमेन’ या कथासंग्रहात झालेला आहे.

प्राचीन कथेशी तुलना करता या कथेत काही महत्त्वाचे मूलभूत फरक आहेत. इथे राजाराणीचा संसार बिलकुल नाही. कथेतला पुरुष हबारा हा स्थानबद्ध झालेला एक ३१ वर्षीय तरुण असून त्याची ‘सेवा’ करणारी शहरजादे (इथून पुढे फक्त ‘जादे’ असेच म्हणतो) एक भाडोत्री बाई असून तिच्या जीवाला कोणताही धोकाबिका नाही. कथा अर्थातच जपानमध्ये घडते. हबाराला कोणीतरी स्थानबद्ध करून एका सदनिकेत कोंडून ठेवलेले आहे. त्याने तिथून बाहेर पडायचे नाही हा नियम. याखेरीज त्या घरात फोन, इंटरनेट आणि छापील वृत्तपत्राची देखील बिलकुल सोय नसल्याने त्याचा एकटेपणा अधिकच गहिरा झालेला. त्याच्या दैनंदिन जीवनासाठी लागणारे खाद्यपेय सामान वगैरे आणून फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याला शरीरसुख देण्यासाठी जादेची काही काळासाठी ‘नेमणूक’ केलेली आहे. ही 35 वर्षांची झकपक कपडे घालणारी तरुणी विवाहित असून तिचा पोराबाळांसह संसार आहे. ती जरी प्रशिक्षित नर्स असली तरी सध्या मुख्यतः गृहिणीच्या भूमिकेत आहे. तिने हबाराकडे आठवड्यातून दोनदा यायचे अशी बोली आहे. दुपारच्या वेळात जेव्हा तिचा नवरा आणि मुले अनुक्रमे कामावर आणि शाळेत गेलेली असतात त्या काळात तिने खरेदी केलेले सामान कारमध्ये टाकून स्वतः कार चालवत यायचे असा तो कार्यक्रम आहे.

तिच्या प्रत्येक भेटीत तिने सामान काढून ठेवायचे, त्यानंतर निर्विकारपणे त्याच्यासह पलंगावर जायचे आणि कुठल्याही प्रकारची प्रेमभावना मनात न आणता दोघांनी यांत्रिकपणे समागम करायचा. त्यानंतर तिने त्याला एक गोष्ट सांगायची. तिच्या ‘जादेपणा’ला अनुसरून ती देखील एका वेळेची गोष्ट उत्कंठावर्धक स्थितीत अर्धवटच सोडते आणि पुढच्या वेळेस ती पूर्ण होईल असे सांगते. इतके सगळे करून झाले आणि घड्याळात दुपारच्या साडेचारचा ठोका पडला की तिची ड्युटी संपली. थोडक्यात, लेखकाने म्हटल्यानुसार जादे ही हबाराची support liaison आहे.

ती निघून गेल्यानंतर त्याने त्याच्या डायरीत त्या दिवशीच्या गोष्टीची संक्षिप्त नोंद करून ठेवणे हा त्याचा स्थानबद्धतेतील एक छंदच ! अशाप्रकारे आठवड्यातून दोनदा शरीरसुख आणि कथाकथन असा सिलसिला चालू राहतो. तिच्या गोष्टी खऱ्या आहेत, खोट्या आहेत की खऱ्याखोट्याचे मिश्रण आहेत, याची तो फक्त कल्पनाच करू शकत होता.
Screenshot (205).png

एके दिवशी ती त्याला उत्सुकतेने विचारते की त्याने आतापर्यंत कधी दुसऱ्याच्या घरात घरफोडी करून आत शिरण्याचा अनुभव घेतला आहे का. त्यावर तो नाही म्हणतो. मग ती तिने स्वतः केलेल्या घरफोडीच्या अनुभवाची कथा सुरू करते . . .
तेव्हा ती माध्यमिक शाळेत शिकत असते. वर्गातल्या एका मुलाचे तिला भयंकर आकर्षण वाटते आणि तिचा त्याच्यावर जणू जीवच जडतो. परंतु हे एकतर्फी प्रेम असते कारण तो मुलगा एका वेगळ्याच मुलीच्या प्रेमात असतो. जादे तर त्याच्या विचाराने दिवसरात्र पछाडलेली असते. एके दिवशी तिच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते. ती त्या मुलाची सगळी कौटुंबिक माहिती काढते आणि घरातले सगळे जेव्हा बाहेर गेलेले असतात ती वेळ ठरवून निवडते. घरून शाळेला म्हणून निघते परंतु शाळेला बुट्टी मारून ती सरळ त्याच्या घराकडे येते. घराच्या बाहेर ठेवलेल्या पायपुसण्याखालीच तिला त्याच्या घराची किल्ली मिळते आणि मग रीतसर कुलूप उघडून ती आत शिरते. त्या घरातली चिडीचूप शांतता अनुभवत ती घरभर फिरते आणि मोठ्या उत्सुकतेने त्या मुलाच्या खोलीकडे जाते.

त्याचे टेबल, त्यातल्या ड्रॉवरमधील वस्तू वगैरे प्रेमभराने हाताळत नंतर क्षणभर त्याच्या पलंगावरही लोळण घेते. आता त्याची आठवण म्हणून एखादी वस्तू उचलण्याचा तिला मोह होतो आणि मग ती त्याच्या ड्रॉवरमधील एक पेन्सिल उचलून तिच्या दप्तरात टाकते. पण लगेचच आपण चोरी करतोय हा अपराधभाव तिला खाऊ लागतो. मग ती एक शक्कल लढवते. अखेर जादेच ना ती ! आपण त्याची एक वस्तू घेतली तर आपलीही एक वस्तूही त्याच्या ड्रॉवरमध्ये हळूच ठेवून जायचे. म्हणजे मग तत्वतः ही चोरी होत नाही. या कल्पनेवर ती स्वतःच खूष होते आणि काय ठेवावे याचा खूप विचार करुनही तिला योग्य ती पर्यायी वस्तू काही सुचत नाही. अखेरीस वैतागून ती तिच्या दप्तरातला tampon त्याच्या ड्रॉवरच्या खालच्या कप्प्यात हळूच लपवून ठेवून देते. हा सगळा कार्यभार उरकल्यानंतर साळसूदपणे शाळेत जाऊन बसते. पुढे काही दिवस त्याच्या पेन्सिलने लिहिणे आणि त्या पेन्सिलला कुरवाळत आणि चोखत लैंगिक कल्पनाविलास करणे हा तिचा उद्योग होऊन बसतो.

पहिली घरफोडी यशस्वी झाल्यामुळे आता तिला पुन्हा एकदा त्या प्रकाराची ओढ लागते. मग काय, दुसऱ्यांदा घरफोडी. यावेळेस ती पुन्हा एक तिथली पेन्सिल उचलून त्याच्या बदल्यात तिचे स्वतःचे जपून ठेवलेले तीन केस त्याच्या एका वहीत घालून ठेवते.
झालं, जादेने एवढी कथा सांगेपर्यंत साडेचार वाजतात आणि ठरल्यानुसार ती गोष्ट अर्धवट ठेवून निघून जाते.

पुढच्या भेटीत मागची कथा पुढे चालू राहते . . .
आता तिला घरफोडीचे व्यसनच लागल्यागत होते आणि अशा तऱ्हेने तिसरी घरफोडी. तिचा लैंगिक कल्पनाविलास दिवसेंदिवस वाढतच असतो. या टप्प्यावर तिला त्याचा एखादा वापरता कपडा हवा असतो. कपाटातल्या परीटघडीच्या कपड्यांना हात लावायचा तिचा काही धीर होत नाही. मग ती धुण्याच्या बादलीमध्ये जे कोरडे कपडे ठेवून दिलेले असतात त्याच्यावर झडप घालते. त्याच्यात त्याचा एक टी-शर्ट असतो व तो अजून धुवायचा बाकी असल्याने त्याच्या काखेत त्याच्या घामाचा वास राहिलेला असतो. याचीच तिला खूप ओढ लागलेली असते. यावेळेस पर्यायी वस्तू ठेवताना तिला जाम काही सुचत नाही. त्या शर्टाच्या बदल्यात आपली आतली चड्डी काढून त्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्याचा विचित्र विचारही तिच्या मनात येतो. ती चड्डी काढते देखील, परंतु ती हुंगल्यासारखी करून तो विचार रद्द करते आणि पुन्हा अंगावर घालते. वस्तूची काहीच परतफेड न करता ती आता त्याचा टी-शर्ट घेऊन पोबारा करते. अशा तऱ्हेने यावेळेस तिची उचलेगिरी ही खऱ्या अर्थाने चोरी ठरते.

एव्हाना तिचे अभ्यासातले लक्ष उडालेलेच असते आणि त्याच्या घरात घुसखोरी करायची तिला जबरी ओढच लागते. मात्र चौथ्या वेळेस जेव्हा ती तिथे जाते तेव्हा घराचे कुलूप बदललेले असते आणि पायपुसण्याखाली त्याची किल्ली देखील ठेवलेली नसते. हे पाहिल्यावर क्षणभर तिला एकदम चिंतामुक्त झाल्यासारखे वाटते. चला, आता आपल्या घरफोड्या संपल्या ! दरम्यान त्या मुलाच्या वागण्यातही तिला काही फरक झालेला जाणवत नाही. हळूहळू तिच्या मनातली त्याच्याबद्दलची ओढ कमी होते आणि ती त्याचा विचार मनातून काढून देखील टाकते. दरम्यान दोघांचे शालेय शिक्षण संपते आणि मग पुढे ते आपापल्या मार्गाला लागतात. ती त्याला विसरून गेलेली असते. मात्र ती नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना एक विचित्र योगायोग घडतो आणि अचानक पुन्हा एकदा तिच्या मनातला तो मुलगा तिच्या संपर्कात येतो. आता त्या दोघांची भेट घडवून आणायचे काम खुद्द त्या मुलाची आईच करते. हे सगळे खरोखर अनपेक्षित आणि काहीसे विचित्रच (spooky) असते.

इतकं सांगून होईपर्यंत जादेची वेळ संपते आणि ती तडक कुठून हबाराला म्हणते की आता पुढची गोष्ट ऐकण्यासाठी माझ्या पुढच्या भेटीची वाट पहा.

या बिंदूवर वरील एकतर्फी प्रेमकथेत पुढे काय झाले असेल याची हबाराप्रमाणेच वाचकांनाही खूप उत्सुकता लागलेली असते. परंतु आता इथे खुद्द लेखकच कथा तोडतो आणि अर्धवटच ठेवून देतो (इथे लेखकाला काही 10001 गोष्टींचे लक्ष्य ठेवण्याचे कारण नाही !)
लेखक आता हबाराच्या मनस्थितीकडे वळतो. त्या रात्री झोपता झोपता त्याला एकदम वाटते की आता कदाचित त्याला जादे आयुष्यात कधीच भेटणार नाही आणि तो एकदम चिंतित होतो. त्याचे विचारचक्र अजूनच जोरात फिरू लागते आणि अचानक त्याला वाटते की जादेच काय पण कदाचित त्याच्या आयुष्यात यानंतर कुठलीच स्त्री येणे सुद्धा शक्य नसेल. आपलं स्त्रीसुख आता कायमचे संपलंय हीच भावना त्याला छळू लागते. तो या विचारात गुरफटून अतिशय खिन्न होतो आणि हळूहळू जादेला विसरून जातो.
झालं, इथे कथा संपली.

ही कथा आणि या संग्रहाच्या निमित्ताने मी मुराकामींचे लेखन प्रथमच वाचले. कथनशैली उत्तम आहे. वातावरणनिर्मिती झकास. पात्रांचे स्वभाव आणि घटनांचे बारकावे टिपण्याची लेखकाची हातोटी विलक्षण. कथेची वाचनीयता हा तर मोठाच गुण दिसून येतो. बहुतेक कथांमधली लैंगिकतेची वर्णने अगदी इत्थंभूत असून ती जणू ‘मुराकामी-तडका’ देऊन कढईतून काढल्यासारखी वाटतात. या कथेत तर पौगंडावस्थेतील लैंगिक भावना आणि कल्पनाविलास उत्कटतेने चितारला आहे. त्याची वर्णने करताना कुठलाही आडपडदा नाही. स्त्रीचे पूर्ण कपडे उतरवणे आणि क्रिया झाल्यावर पुन्हा एकदा ते क्रमाने घालणे, याचे हबाराच्या नजरेतून टिपलेले बारकावे तर भारीच. अनेक वाचक कथेशी एकरूप होऊन पात्रांच्या जागी स्वतःला ठेवू लागणे अगदीच शक्य वाटते. प्रस्तुत कथा मी दोनदा वाचली आणि तिच्या निमित्तानेच प्राचीन अरबी कथेची उजळणी करण्याचा मोह झाला.

‘शहरजादे’ कथा तिच्या उत्कटबिंदूवर अर्धवट सोडलेली असल्याने वाचकांच्या मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठल्यास नवल नाही. नमुन्यादाखल काही प्रश्न व मुद्दे असे असू शकतात :
१. हबाराला कोणी आणि कशासाठी स्थानबद्ध केलंय ? माहित नाही कारण त्याचा काहीच उल्लेख नाही.

२. ‘त्यांच्या’ कॉलेज जीवनात दोघे पुन्हा संपर्कात येतात तेव्हा पुढे काय झाले हे न सांगताच कथा दाबून टाकल्याने वाचकाच्या मनातली अपूर्णत्वाची भावना तीव्र आहे.

३. त्या मुलाच्या आईने घरफोडी आणि शर्टचोरी ओळखली असावी पण ती जादेनेच केल्याचे ओळखले असावे का? म्हणून तिला त्या दोघांना एकत्र आणावे असे वाटले असेल का?

४. शालेय जीवनातला ‘तो’ मुलगा म्हणजेच मोठेपणीचा हबारा आहे की काय, असाही एक कल्पनाविलास.

५. ही संपूर्ण कथा एक गोष्ट(narration) न समजता माणसाच्या एकटेपणाचे रूपक समजायची का? सध्या माणसाने स्वतःला कोंडून घेतलेल्या डिजिटल जगात आता खरी गरज आहे ती कोणीतरी समोर बसून आस्थेने संवाद करण्याची. . . असाही एक विचार.

असा अनेक प्रश्नांचा गुंता सोडवताना वाचकाच्या मनात पुढची कथा आकार घेऊ लागते हे मात्र खरं. हेच या ‘अपूर्ण’ कथेचे यश म्हणावे का ?

‘शहरजादे’ची कथा आणि तिच्या गोष्टी यापलीकडे या कथेतून बरेच काही ध्वनित होत असावे. काही तर्कवितर्क मांडतो. कथा जपानसारख्या प्रगत आणि संपन्न देशात घडते, जिथे औद्योगीकरणाच्या कमाल रेट्यामुळे माणसे अक्षरशः मनाने एकटी पडलेली आहेत. तिथे कुटुंबात रहात असूनही आपल्या खोलीत एकटे कोंडून घेण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आढळते आणि मानसशास्त्रात त्याला Hikikomori असे म्हणतात.
असेच (मनाने) एकटे पडलेले दोन जीव आपल्याला इथे काही काळासाठी तरी निकट भावनिक संपर्कात आल्यासारखे दिसतात. गोष्टी सांगण्याच्या प्रक्रियेतून त्या दोघांमध्ये एक तात्पुरता का होईना पण मैत्रीचा पूल बांधला गेला आहे. प्राचीन अरबी कथेत जीव वाचवण्यासाठी रंजक गोष्टी सांगण्याचा वापर केला गेलाय तर या आधुनिक कथेत गोष्टींच्या निमित्ताने दोन आत्म्यांना/मनांना विखंडनापासून वाचवलेले दिसते. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहता एकमेकांना गोष्टी सांगणे हा सुद्धा एकटेपणावरील एक प्रभावी उपचार ठरू शकतो. एकट्या पडलेल्या हबाराला त्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत या निवाड्याने काही फरक पडणार नाही, परंतु त्या ऐकता ऐकता त्यात गुंतून आणि रंगून जाण्यात जो भावनिक आधार मिळतो तो फार मोलाचा आहे.

भिन्न काळांतील दोन शहरजादेंबद्दलचे असे हे मनोगत. एकीची अंतिम ‘कहाणी’ पूर्ण तर दुसरीची अपूर्ण.
‘अपूर्णत्वातच खरं तर पूर्णत्व सामावलेलं असतं’ असे एक वचन पूर्वी वाचले होते. त्यावर या निमित्ताने पुन्हा एकदा विचारमंथन झाले.
****************************************************************************************************
समाप्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान विचार मांडले आहेत. गोष्टी माणसांना फक्त मनोरंजन देत नाहीत, तर एकटेपणात भावनिक आधारही देतात, हे सुंदरपणे उलगडले आहे. विशेषतः अपूर्ण गोष्टी मनात कायम राहून विचार करायला लावतात, हा मुद्दा खूप आवडला.

कथा संपल्याची हुरहूर..
कधी संपूच नये वाटणारा एखादा नयनरम्य प्रवास असावा आणि गंतव्य स्थान येताच प्रवास संपणे हे जसे ठरलेले असते तसे काहीसे..

सर्वांना धन्यवाद !
रच्याकने,
Men without women हा मुळात Hemingway यांचा १९२७चा कथासंग्रह आहे. मुराकामीनी तेच शीर्षक वापरलेले आहे.
आणि या उलट
Women without Men
ही कादंबरिका Shahrnush Parsipur या लेखिकेने लिहिलेली आहे. नुकतेच या विदुषीचे 3 जुलैला निधन झाले.

मस्तच लेख.
अपूर्णत्वातच खरं तर पूर्णत्व सामावलेलं असतं..... आवडलं

दोन्ही भाग वाचले आणि आवडले. हा भाग जास्तच आवडला. काही तरी ओळखीचे आणि तरीही काही तरी अनोळखी वाचायला मिळाले. शीर्षक एकदम चपखल.