बीएमएम २०२६ अधिवेशनातील मान्यवर वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांच्याशी संवाद

Submitted by Ashwini Kshirsagar on 8 July, 2026 - 20:16
Dr.Sanjay Upadhye

डॉ. संजय उपाध्ये यांची थोडक्यात ओळख:
डॉ. संजय गोविंद उपाध्ये हे लेखक, कवी, जादूगार, वक्ते, विचारवंत आणि शैक्षणिक मार्गदर्शक म्हणून परिचित आहेत. सध्या ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे मार्गदर्शक आणि मुख्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. साहित्य, कविता, नाट्य, पटकथा लेखन आणि रंगभूमी या क्षेत्रांत त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांनी पीएचडीसाठी प्रबंध म्हणून ‘विनायक विजय’ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ५००० ओळींचे काव्य चरित्र रचले. ‘गप्पाष्टक’ आणि ‘मन करा रे प्रसन्न’ हे त्यांचे विशेष गाजलेले कार्यक्रम आहेत. गप्पाष्टक कार्यक्रमाचे १५ देशांमध्ये १,५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
यंदाच्या बीएमएम २०२६ सिॲटल अधिवेशनात ते दोन वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर करणार आहेत.
उत्तररंग - ६ ऑगस्ट, २०२६
मस्त बिनधास्त चोवीस तास - ताणतणाव विसरून आनंदी आणि बिनधास्त आयुष्य जगण्याचा हलकाफुलका प्रवास.
मुख्य अधिवेशन- घर करा रे प्रसन्न – संवाद, समजूतदारपणा आणि प्रेमातून घर अधिक आनंदी व प्रसन्न कसे बनवावे, याचा हृदयस्पर्शी वेध.
विनोद, विचार आणि जीवनानुभवांचा सुंदर संगम असलेले हे दोन्ही कार्यक्रम रसिकांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरतील.

‘संजय उवाच’
डॉ. संजय उपाध्येंशी संवाद

बँकर ते प्रवचनकार हा प्रवास कसा घडला?"
हा प्रवास मी ठरवून केलेला नव्हता; तो हळूहळू घडत गेला. १९७९ मध्ये कॅनरा बँकेत नोकरीला सुरुवात केली आणि तब्बल १६ वर्षे बँकेत काम केलं. पण त्याचबरोबर जादूचे प्रयोग, चित्रकला, वाचन, क्रिकेट, नाटक अशा अनेक आवडी जोपासत राहिलो. जादूच्या प्रयोगांमुळे स्टेजची भीती गेली आणि निवेदनाची संधी मिळाली.
एका कार्यक्रमात ऐनवेळी निवेदक अनुपस्थित होता. मी सहज निवेदन केलं आणि ते लोकांना इतकं आवडलं की पुढे अनेक कार्यक्रम मिळू लागले. त्यातूनच 'गप्पाष्टक'चा जन्म झाला. १९९५ मध्ये कार्यक्रमांची संख्या इतकी वाढली की बँकेची नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात आलो. पुढे लक्षात आलं की बदलत्या पिढीशी जोडणारा, सर्वांना सहज समजणारा कार्यक्रम हवा. त्यातून 'मन करा रे प्रसन्न' हा कार्यक्रम जन्माला आला. आजही माझं बोलणं स्क्रिप्टवर नाही, तर त्या क्षणी श्रोत्यांशी होणाऱ्या संवादावर उभं असतं. हा प्रवास माझ्या नियोजनापेक्षा परमेश्वराच्या कृपेने आणि लोकांच्या प्रेमाने घडत गेला, असंच मी मानतो.

तुमच्या आयुष्यातले विविध टप्पे तुम्हाला घडवत गेले. यापैकी कोणता टप्पा तुम्हाला सर्वाधिक घडवणारा ठरला?
माझ्या आयुष्यात अनेक टप्पे आले, पण वक्ता म्हणून मला घडवलं ते 'गप्पाष्टक' या कार्यक्रमाने.
आजही मिनियापोलिसमधला एक प्रसंग विसरता येत नाही. कार्यक्रम संपल्यानंतर प्रेक्षकांनी आयोजकांना विचारलं,"हे पुन्हा बोलतील का?" त्यांनी हॉलची वेळ वाढवली. मी आणखी दोन तास पूर्णपणे नवीन विषयांवर बोललो. एखाद्या दोन तासांच्या कार्यक्रमाला "वन्स मोअर" मिळणं हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता.
माझ्या प्रवासात एक गोष्ट कायम राहिली मी कधीच नवीन संधीला 'नाही' म्हटलं नाही. जादूचे प्रयोग असोत, निवेदन, लेखन, गाणी, प्रवचनं, नाटकं किंवा मंगलाष्टक लिहिणं जे काही समोर आलं, ते मनापासून स्वीकारलं. प्रत्येक अनुभवाने मला काहीतरी नवीन दिलं आणि त्यामुळे माझं व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होत गेलं. ई-टीव्हीवर भगवद्गीतेवरील हजाराहून अधिक भाग सादर केले, गीतेवर २५ गाणी लिहिली, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पीएच.डी. केली. या सगळ्याचा परिणाम माझ्या विचारांवर आणि बोलण्यावर झाला. पण या सगळ्याचं श्रेय मी स्वतःला देत नाही. माझा एकच विश्वास आहे - "I am a trustee of my ability, not the owner of my ability."
आपली क्षमता ही आपली मालमत्ता नसून आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आहे. त्यामुळे अहंकाराला जागा राहत नाही. आजही मी कुठेही जातो तेव्हा आधी स्वतःला कलाकार नव्हे, तर कार्यकर्ता समजतो. स्टेजवर गेल्यावर कलाकार असतो; स्टेजच्या बाहेर मी तुमच्यासारखाच एक स्वयंसेवक असतो. कदाचित त्यामुळेच आजही काम करण्याचा आणि लोकांशी जोडले जाण्याचा आनंद तितकाच ताजा वाटतो.

तुमच्या कार्यक्रमांमध्ये विनोद, जादू, अध्यात्म आणि संवाद यांचा सुंदर मिलाफ दिसतो. हा समतोल तुम्ही कसा साधता?
माझ्यासाठी जादू ही फक्त करमणूक नाही; ती संवादाचं माध्यम आहे. जादूतील illusion वापरून मी अध्यात्मातील अनेक संकल्पना सहज समजावून सांगू शकतो. दिवस-रात्र, सुख-दुःख, जीवनातील समतोल हे सगळं एखाद्या छोट्या प्रयोगातूनही सांगता येतं.
माझा नेहमी प्रयत्न असतो की, समोरच्या श्रोत्यांच्या भाषेत आणि त्यांच्या पातळीवर जाऊन संवाद साधावा. कोणता शब्द वापरायचा, कोणतं उदाहरण द्यायचं, हे श्रोत्यांनुसार ठरतं. लहान मुलं असतील तर गाणी आणि जादू, तरुण असतील तर विनोद आणि मिमिक्री, ज्येष्ठ असतील तर ज्ञानेश्वरी, भगवद्गीता किंवा अध्यात्म प्रत्येकाला आपलंसं वाटेल असा संवाद घडवण्याचा प्रयत्न असतो.
यामागे एकच भूमिका आहे मी लोकांना प्रभावित करण्यासाठी बोलत नाही; त्यांच्याशी जोडण्यासाठी बोलतो. मी स्वतःला मोठा कलाकार समजून कधीच वागत नाही. आजही कुठेही गेलो की आधी माणूस म्हणून जातो, कलाकार नंतर. मला प्रसिद्धीपेक्षा आपलेपणा महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे जाहिरातीत किंवा वागण्यात स्वतःचं मोठेपण मिरवण्याची गरज मला कधी वाटली नाही. लोकांनी कार्यक्रम संपल्यावर, "आज खूप छान संवाद झाला," असं म्हटलं, तर तेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे.

तुमच्या प्रवासात असा एखादा अनुभव आहे का, ज्याने आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला?
असे अनेक अनुभव आहेत, त्यातील दोन प्रसंगांचा मी नक्की उल्लेख करेन.
पहिला म्हणजे अहिल्यानगरमधील 'सावली' या अनाथाश्रमाचा. निधी संकलनासाठी मी विनामूल्य कार्यक्रम केला होता. कार्यक्रमादरम्यान कळलं की, ज्या जागेत अनाथाश्रम चालत होता ती विकली जाणार होती आणि २३ मुलांच्या डोक्यावरचं छप्पर जाण्याची वेळ आली होती. त्या क्षणी फक्त कार्यक्रम करून निघून जाण्यापेक्षा काहीतरी करावं असं वाटलं. मित्रांची मदत, ओळखी आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यामुळे ती जागा वाचवता आली. आज त्या ठिकाणी अनेक मुलांचं आयुष्य घडत आहे. त्या दिवशी जाणवलं, ओळखी असण्यापेक्षा त्या योग्य कारणासाठी वापरणं अधिक महत्त्वाचं असतं.
दुसरा प्रसंग एका दिव्यांग मुलीचा. ती माझे रेडिओ कार्यक्रम नियमित ऐकायची आणि मला "बाबा" म्हणायची. एक दिवस तिची भेट घेतली. तिची परिस्थिती पाहिल्यावर वाटलं, आपण फक्त बोलून उपयोग नाही; शक्य असेल तेवढी मदतही केली पाहिजे. त्या भेटीने मला पुन्हा जाणवलं की, समाजात आपल्यापेक्षा खूप मोठी आव्हानं झेलणारी माणसं आहेत. आजपर्यंत सामाजिक कार्यासाठी काही आर्थिक योगदान देता आलं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे अशा अनुभवांनी मला कायम जमिनीवर ठेवले. कितीही यश मिळालं तरी माणुसकी आणि संवेदनशीलता जपणं हेच खरं यश आहे.

गप्पाष्टक हा तुमच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा, त्याचा जन्म कसा झाला?
हा कार्यक्रम पूर्णपणे नियोजित नव्हता, तो घडत गेला. मी त्यावेळी कॅनरा बँकेत नोकरी करत होतो आणि सोबतच स्टेजवर लहान-मोठ्या गोष्टी करत होतो- जादूचे प्रयोग, निवेदन, आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम. रोह्यात एक कार्यक्रम झाला, तो माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरला. माझा मित्र श्री. विजय मागीकर याच्यामुळे खरंतर गप्पाष्टक सुरु झाला. तो मला मुंबईहून रोह्याला घेऊन गेला नसता तर मी कदाचित आज बँकेतील निवृत्त अधिकारी असतो. रोह्याच्या कार्यक्रमात मी कोणत्याही स्क्रिप्टशिवाय, सहज बोलत गेलो. काव्य, विनोद, अनुभव, समाजभान सगळं एकत्र आलं. लोकांचा प्रतिसाद खूप प्रचंड होता. त्या एका अनुभवातून मला जाणवलं की “मनमोकळ्या गप्पा” हा एक स्वतंत्र फॉरमॅट होऊ शकतो. मग मी त्याचं नाव ठेवलं ‘गप्पाष्टक’. “खडाष्टक” म्हणजे दोघांमधील तीव्र मतभेद किंवा हाडवैर, पण मी त्याला सकारात्मक वळण देऊन गप्पाष्टक केलं, म्हणजे आठ विषयांवर मनमोकळ्या गप्पा. त्या आठ विषयांत साहित्य, काव्य, समाज, धर्म, विनोद, संगीत. असं ते गप्पांचं अष्टक.
त्याच दिवसापासून हेच माझं ओळखपत्र बनलं आणि मग हळूहळू बँकेची नोकरी मागे पडत गेली आणि गप्पाष्टक पुढे येत गेलं. 'गप्पाष्टक' या कार्यक्रमाचे १५ देशांमध्ये १,५०० हून अधिक प्रयोग सादर झाले आहेत.

'मन करा रे प्रसन्न' हा तुमचा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. मग 'घर करा रे प्रसन्न' हा नवा कार्यक्रम करण्यामागची प्रेरणा काय होती? या दोन्ही कार्यक्रमांमध्ये नेमका काय फरक आहे?
खरं सांगायचं तर हे दोन्ही कार्यक्रम एकाच विचाराची दोन रूपं आहेत.
'मन करा रे प्रसन्न' हा व्यक्तीच्या मनाशी संवाद साधणारा कार्यक्रम आहे. पण एकदा एका कार्यक्रमासाठी बिल्डर प्रायोजक होता. तेव्हा सहज विचार आला मन प्रसन्न असणं जितकं महत्त्वाचं, तितकंच घर प्रसन्न असणंही महत्त्वाचं.,आणि बिल्डरचा धंदा जर घर बांधायचा आहे. तर मला वाटलं की, हे सोयीचं जाईल तिथून 'घर करा रे प्रसन्न' या कार्यक्रमाचा जन्म झाला. 'घर' म्हटलं की फक्त चार भिंती नव्हेत; त्यात पती-पत्नीचं नातं, पालक आणि मुलं, भावंडं, संवाद, मतभेद आणि समजूत हे सगळं आलं. आजच्या धावपळीच्या जीवनात मतभेद होणं स्वाभाविक आहे; पण मतभेदांचं मनभेदात रूपांतर होता कामा नये. विसंवादाचं विघटनात रूपांतर होऊ नये, हा या कार्यक्रमाचा मुख्य संदेश आहे. मी समुपदेशन करताना एक गोष्ट नेहमी सांगतो असा कोणताही प्रश्न नसतो ज्यावर मार्ग सापडू शकत नाही. फक्त तो योग्य पद्धतीने समजून घ्यावा लागतो. हेच मी विनोद, किस्से आणि दैनंदिन आयुष्यातील उदाहरणांमधून मांडतो. उदाहरणार्थ, मी गंमतीने म्हणतो
"पूर्वी घरांना उंबरठे असायचे. बेडरूममधला प्रश्न बेडरूममध्येच राहायचा. आता उंबरठे नाहीत, त्यामुळे तोच प्रश्न हॉलमध्ये, किचनमध्ये आणि शेवटी शेजाऱ्यांपर्यंत पोहोचतो!"
लोक हसतात, पण त्यामागचा संदेश लगेच पोहोचतो. माझा विश्वास आहे की प्रत्येक नात्याचा पाया संवाद आहे. म्हणूनच श्रीकृष्णाने भगवद्गीतेत उपदेश केला नाही, तर संवाद केला. नाती टिकवायची असतील तर संवाद, समजूत आणि कधी कधी 'लेट इट गो' करण्याची कला शिकावी लागते. हाच 'घर करा रे प्रसन्न'चा गाभा आहे.

आज सोशल मीडियाच्या युगात माणसं अधिक जोडली गेली आहेत की अधिक एकटी पडली आहेत?
माझ्या मते प्रश्न सोशल मीडियाचा नाही; प्रश्न संवादाचा आहे. आपण मोबाईलवर बोलतो की समोरासमोर, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण काय बोलतो आणि कसं बोलतो. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे; नाती जोडायची की तोडायची, हे आपल्या संवादावर अवलंबून असतं. ज्ञानेश्वर माउली पसायदानात म्हणतात, " बोलते जे अर्णव पीयूषाचे." म्हणजे आपल्या शब्दांत अमृतासारखा गोडवा असावा. तो असेल, तर मोबाईलवरचा संवादही मनापर्यंत पोहोचतो.
आजचं तंत्रज्ञान टाळणं शक्य नाही. प्रत्येक काळानुसार साधनं बदलत राहतात. प्रश्न एवढाच आहे की, आपण त्यांचा उपयोग करतो की त्यांचे गुलाम होतो. मला "उपयोग"पेक्षा "विनियोग" हा शब्द अधिक आवडतो. योग्य गोष्टीसाठी योग्य साधन वापरणं, हीच खरी कला आहे.
पण एक गोष्ट मात्र चिंतेची वाटते, ऐकण्याची सवय कमी होत चालली आहे. आपण सगळे बोलतो; पण ऐकणारे कमी झालो आहोत. माझ्या मते माणसाचं वर्तन त्याच्या डोळ्यांपेक्षा त्याच्या कानांशी अधिक जोडलेलं असतं. ऐकणं म्हणजे फक्त शब्द कानावर पडणं नव्हे; तर समोरच्याला समजून घेणं. घरात, नात्यांत आणि समाजातले अनेक संघर्ष याच कारणाने निर्माण होतात. संवाद तेव्हाच घडतो, जेव्हा दोघेही एकमेकांना मनापासून ऐकतात. म्हणूनच तंत्रज्ञान बदलत राहील, सोशल मीडिया बदलत राहील; पण संवादातला आपुलकीचा सूर आणि ऐकण्याची वृत्ती जपली, तर नातीही टिकतील आणि माणुसकीही.
माझ्या मते नाती तुटण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक जण म्हणतो, "ही तुझी चूक" किंवा "हा तुझा प्रश्न." पण लग्नानंतर किंवा कुटुंबात ‘तुझा प्रश्न’आणि ‘माझा प्रश्न’ असं काही नसतं; तो "आपला प्रश्न" असतो. ही भावना आली की नातं बदलायला सुरुवात होते. विश्वासही तितकाच महत्त्वाचा. नातं म्हणजे मालकी हक्क नव्हे; तर एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर. समोरच्याचं स्वातंत्र्य, गुण आणि स्वप्नं जपणं, हेही प्रेमाचंच रूप आहे.
आणि मी नेहमी एक गंमत सांगतो—'Adjust' चं स्पेलिंग माझ्यासाठी थोडं वेगळं आहे.
Adjust is ADD JUST
जे न्याय्य आहे ते नात्यात वाढवत राहा. समजूत, संवाद, विश्वास आणि थोडंसं सोडून देण्याची तयारी असेल, तर नाती सहज फुलतात. शेवटी, घर भिंतींनी नाही, तर माणसांनी आणि त्यांच्या नात्यांनी प्रसन्न होतं.
मतभेद असू द्या, पण मनभेद होऊ देऊ नका.

बीएमएम २०२६ साठी घर करा रे प्रसन्न हा विषय निवडण्यामागे काय विचार होते?
सुरुवातीला विषय ठरलेला नव्हता. मी आयोजकांना म्हटलं होतं, "तुम्ही विषय सुचवा; मी कोणत्याही विषयावर बोलू शकतो." पण जेव्हा या कार्यक्रमाला कोटीभास्कर यांची प्रायोजक म्हणून साथ मिळाली, तेव्हा त्यांच्या कामाशी घर या संकल्पनेशी जुळणारा विषय मनात आला.
त्यात मला आणखी एक गोष्ट जाणवली. BMM असो, महाराष्ट्र मंडळ असो किंवा सिॲटलची अधिवेशनाची आयोजक समिती, हे सगळं एका मोठ्या कुटुंबासारखंच आहे. घर हा शब्द केवळ चार भिंतींचा नाही; तो नाती, आपुलकी, सहकार्य आणि मनःशांती यांचा आहे. म्हणून हा विषय अनेक स्तरांवर जोडता आला.

घर प्रसन्न ठेवणं हे अनेकांना कठीण का वाटतं? हा विषय मंचावरून सादर करण्याची गरज का भासते? खरंच परिस्थिती इतकी बदलली आहे का की घरातलं समाधान टिकवणं अवघड झालं आहे?
हो, आज घर प्रसन्न ठेवणं कठीण वाटतं कारण माणसं स्वतःच्या ‘व्हर्च्युअल इमेज’ मध्ये जगतात. घरी आल्यानंतरही ती आपली व्यावसायिक ओळख (CA, executive, etc.) सोडत नाहीत आणि नवरा, वडील, भाऊ अशा भूमिका बदलत नाहीत. त्यामुळे घरात अपेक्षित असलेली लवचिकता आणि कम्पॅटिबिलिटी कमी होते. प्रत्येकजण एकच मुखवटा घेऊन वागतो, त्यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. याशिवाय परदेशात किंवा विविध पार्श्वभूमीत वाढलेल्या कुटुंबांमध्ये सवयी, संस्कृती आणि अपेक्षा वेगळ्या असल्याने गैरसमज वाढतात. म्हणून ‘घर प्रसन्न ठेवणं’ हा संवाद, समजूतदारपणा आणि भूमिका बदलण्याच्या क्षमतेचा विषय आहे आणि म्हणूनच तो आज स्टेजवर मांडणं आवश्यक झालं आहे.
Art of Living इतकीच जास्त गरज आहे ‘Art of Leaving’ ची. Ego सोडणं, भूमिका घरी आल्यावर सोडणं, आणि अपेक्षा कमी करणं. घरी आल्यानंतर “मी कोण आहे” हे विसरून “मी कोणासाठी आहे” हे लक्षात ठेवायचं. मुलं, कुटुंब यांच्यासोबत title नाही तर warmth घेऊन यायचं. लोकांना हे कठीण वाटतं कारण आपण role सोडत नाही, office मधला ego, control, vocabulary घरीही चालू राहतो. त्यामुळे moment miss होतो. मोबाईलप्रमाणे प्रत्येकाचं कॉन्फिगरेशन वेगळं असतं. आयफोनमध्ये अँड्रॉइड चालत नाही, तसं माणसांमध्येही होतं. पण नात्यांमध्ये "मी बदलणार नाही" अशी भूमिका चालत नाही. Leaving मध्ये सर्वात मोठं काय सोडायचं? तुलना, ego आणि unnecessary seriousness. कधी कधी छोट्या गोष्टींसाठी “right असणं” सोडणं जास्त महत्त्वाचं असतं. आयुष्य जगण्यापेक्षा ते हलकं करणं महत्त्वाचं आहे, जे अडथळे आहेत ते सोडले की खरं living आपोआप सुरू होतं.

परदेशात राहणाऱ्या मराठी कुटुंबांसाठी हा विषय अधिक महत्त्वाचा वाटतो का?
निश्चितच. दोन पिढ्यांचं राहणीमान, विचार, सवयी वेगळ्या असतात. भारतातून आलेल्या आई-वडिलांच्या सवयी आणि अमेरिकेत वाढलेल्या मुलांची जीवनशैली यात फरक असतो. अशा वेळी प्रश्न "कोण बरोबर?" हा नसतो. प्रश्न असतो "आपण एकमेकांना किती समजून घेतो?" संवाद आणि परस्परांना समजून घेण्याची तयारी असेल तर घर प्रसन्न राहतं.

तुमच्या भाषणातून लोकांनी काय घेऊन जावं, अशी अपेक्षा आहे?
मी उपदेश करणार नाही. मी गोष्टी, उदाहरणं आणि विनोद यांच्या माध्यमातून विचार मांडणार आहे. माझा विश्वास असा आहे की माणूस हसत असताना त्याचं मन सर्वात जास्त खुलं असतं. म्हणून आधी हसवायचं आणि मग विचार करायला लावायचं.

बीएमएम २०२६ ला येणाऱ्या रसिकांसाठी काही संदेश?
संदेश देण्यापेक्षा मी त्यांच्याकडून शिकायला येतोय. परदेशात राहूनही मराठी भाषा, संस्कृती आणि नाती जपण्याचं जे काम बीएमएम (बृहन्महाराष्ट्र मंडळ) आणि स्थानिक महाराष्ट्र मंडळं करत आहेत, ते प्रेरणादायी आहे. एकच सांगेन "अवघे लोक मेळवावे." एकत्र राहूया, एकमेकांना जोडूया आणि ही आपुलकी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया.

RAPID FIRE

'आनंद' या शब्दाची एका शब्दात काय व्याख्या तुम्ही सांगू शकाल?
निर्माण करायची गोष्ट. किंवा मला मिळणारा यापेक्षा माझ्याकडनं बाहेर जाणारा
यश म्हणजे?
क्षणापुरतं समाधान आणि मग पुढच्या प्रवासाची सुरुवात.
'कुटुंब' म्हटलं की तुमच्या मनात पहिला कोणता शब्द येतो?
आई.
तुमचं सगळ्यात आवडतं पुस्तक कोणतं?
ज्ञानेश्वरी. आणि अर्थातच भगवद्गीता, तुकारामांची गाथा.
आवडते संत?
संत तुकाराम. त्यांच्या अभंगांमधून दैनंदिन आयुष्यासाठी मार्गदर्शन मिळतं. संत ज्ञानेश्वर तर आवडते आहेतच.
आवडते विनोदकार?
पु. ल. देशपांडे. छोट्या प्रसंगातून मोठं तत्त्वज्ञान मांडण्याची त्यांची शैली मला खूप आवडते. अगदी कॉमन टॉपिक घ्यायचा आणि त्यातून मोठं तत्त्वज्ञान मांडायचं.
तुमचं व्यक्तिमत्त्व इतकं बहुआयामी आहे, तरी असं कुठलं क्षेत्र आहे का जे तुम्हाला अजूनही खुणावतंय?
गाणं!
मी पोवाडा म्हणतो, कोळीगीत, लोकसंगीत म्हणतो, पण शास्त्रीय किंवा भावगीताचं शिक्षण घ्यायची इच्छा अजूनही आहे.

मुलाखतकार आणि शब्दांकन: अश्विनी क्षीरसागर
बीएमएम २०२६ समिती
वेबसाईट: https://bmmseattle2026.org/

Group content visibility: 
Public - accessible to all site users