तलावाच्या मध्यभागी, एक प्राचीन मंदिर....
निळ्या पाण्यावर शोभे... शुभ्र संगमरवर...
देवदर्शन कराया... येती नेहमी भाविक...
वय वास्तूचे त्या किती? नसे कुणाला ठाऊक...
तलावातलेही पाणी, स्वच्छ निर्मळ सतत,
कुण्याकाळचे आश्चर्य.. नाही वाढत ...आटत!
स्थान केंव्हाचे हे इथे... पिढ्या अनेक पहिल्या...
आजूबाजूला काळाच्या... घड्या, मोडल्या पडल्या...
फोफावला चहूकडे... भवताली परिसर...
वाटे पाहते चोरून... भविष्यातले शहर...
थोडा कच्चा, थोडा पक्का.. रस्ता तळ्याच्या पूर्वेस...
अर्धवट रंगलेली, पाठ वाकलेली वेस...
आणि मंदिराच्या मागे...जाता तिरकस वर..
भगवी घोंगडी ओढून, उभा म्हातारा डोंगर...
डोंगरा-पल्याड राहते, लाटा पिकलेली नदी...
काठावर तिच्या वाढे, रोज स्मृती-भ्रम व्याधी...
ठार आळसावलेली, एक ग्रामपंचायत...
शेजारीच नावासाठी... शाळेचीही इमारत...
टप्प्या-टप्प्याने माघार, घेते शेत आणि शेती...
जग-रहाटीस कधी, सांगा अडवते माती?
जिल्हा-तालुका कशाला... महानगरी मजल...
खेडे, इवले ठेवले, परदेशीही पाऊल...
गेले शिक्षण घेऊन, सात समुद्राच्या पार,
दूर खेळते अडाणी...बालपण अलवार...
जाणवते पावलांना, अचानक कधीतरी!
ओढ डोंगर-नदिची, स्पर्श संगमरवरी...
लपंडाव रंगलेला, सरकारी कचेरीत...
तळहाती, होते जागी, चव वेताची तिखट...
आली पंखांना भरारी, तुटे अलगद नाळ...
श्वास घेते अभ्यंतरी... माझ्या गावचे आभाळ...
दुरावली जन्मभूमी... लांब राहिले आकाश...
माझ्यापाशी आता फक्त... आठवांचे अवशेष!