
BMM 2026 अधिवेशनाच्या सह-संयोजिका (Co-convener) श्रीमती सविता मोरे ह्यांच्याशी संवाद.
नमस्कार. BMM 2026 अधिवेशनाच्या सह-संयोजिका म्हणून जबाबदारी सांभाळताना तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या भावना काय आहेत?
दोन वर्षांपूर्वी जेव्हा मला विचारण्यात आलं की "तू हे करशील का?", तेव्हा ही खूप मोठी जबाबदारी आहे हे मला माहीत होतं. पद मोठं आणि मानाचं आहे, पण या पदी निवड होणं हे काही केवळ वैयक्तिक यश आहे असं मला वाटलं नाही किंवा तशा प्रकारचं अप्रूपही नव्हतं. याआधीही मी सिएटल महाराष्ट्र मंडळात विविध उपक्रमांवर काम केलं आहे. व्हॉलेंटिअरिंग (Volunteering) किंवा स्वयंसेवा करायची, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनात त्या गोष्टीची आवड असायला हवी. "हे मला करायचंच आहे आणि मी ते करणारच!" असा एक निर्धार असायला हवा. आणि महत्त्वाचं म्हणजे, ते का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे आणि मग ते कसं करायचं, याविषयी ध्येय स्पष्ट असायला हवं.
ज्या समाजात मी राहते, त्या समाजासाठी आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे; मग त्यासाठी वेळ द्यायचा, अगदी तो रोजच्या रोज द्यावा लागला तरी हरकत नाही, हे मी आधीच ठरवलं होतं आणि मग पुढच्या गोष्टी सोप्या होत गेल्या. गेली दोन वर्षं हे काम करताना खूप मजा आली. यासाठी खूप वेळ द्यावा लागला. आता अधिवेशन जवळ येतंय, तशी 'काय होणार, कसं होणार' अशी एक धाकधूक नक्कीच वाटते आहे. पण आता जवळजवळ ९०% कामं पूर्णत्वास आली आहेत याचा आनंदही होतोय आणि लोकांना, मित्रमंडळींना भेटायला मिळणार याचाही उत्साह आहे.
या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच 'स्त्री सन्मान' सोहळा होणार आहे आणि याचा मला खूप अभिमान वाटतो. मी २०२२ साली सिएटल महाराष्ट्र मंडळाची अध्यक्ष होते. माझ्या नंतर सलग चार वर्षं महिला अध्यक्ष होत्या. मी सिएटल तसेच उत्तर अमेरिकेतल्या महिलांना स्वयंसेवेसाठी पुढे येण्याचं आवाहन करेन. या कामामध्ये खरंच खूप मजा असते आणि एक वेगळंच समाधान मिळतं.
या अधिवेशनात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी काहीतरी खास असणार आहे. या विविध कार्यक्रमांचं नियोजन करताना तुम्ही आणि तुमच्या टीमने काय विचार केला होता?
हो, या अधिवेशनात बीएमएम इनिशिएटिव्ह्ज (BMM Initiatives) अंतर्गत गुरुवारी म्हणजेच 'डे झिरो'ला (६ ऑगस्ट) विविध कार्यक्रम होणार आहेत. ४ वर्षांपासून ते ८०-८५ वर्षांपर्यंतचे सर्व वयोगट एकत्र यावेत, हा यामागचा मुख्य हेतू आहे. 'बालतरंग' आणि 'किशोरकुंज' अंतर्गत ४ ते ११ आणि १२ ते १८ वयोगटांतील शाळकरी विद्यार्थी सहभागी होत आहेत. व्यावसायिकांसाठी 'बी-कनेक्ट' (B-Connect) आहे. ५५ वर्षांढील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'उत्तररंग' आहे. डॉक्टरांसाठी 'सीएमई' (CME - Continuing Medical Education) आहे. तसेच 'आर्टिस्ट गॅलरी' (Artists Gallery) आहे, ज्यामध्ये कलाकार आणि चित्रकार भाग घेणार आहेत. १९ ते ३५ वर्षे म्हणजेच ज्याला आपण 'क्रीम वयोगट' म्हणू शकतो, हा ग्रुपसुद्धा युवा कार्यक्रमांच्या माध्यमातून या अधिवेशनात जोडला गेला आहे.
अमेरिकेत वाढणाऱ्या पुढच्या तरुण पिढीला आपल्या मराठी संस्कृतीशी जोडून ठेवणं, हे बीएमएमचं तसेच या अधिवेशनाचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर त्यांच्यासाठी या अधिवेशनात काय आकर्षणं आहेत?
हो, हे अगदी बरोबर आहे. आपली जी छोटी मुलं आणि तरुण पिढी असते, ती बऱ्याचदा अशा कन्व्हेन्शन्सपासून थोडीशी दूर राहते; त्यांना इथे यायला नको असतं. पण आपल्या या अधिवेशनात मुलांसाठी शाळांचे नाटक, गाणी, नृत्य आणि स्टँड-अप कॉमेडी (Stand-up Comedy) असे सर्व वयोगटांना आवडतील असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत.
जी मुलं कॉलेजला आहेत किंवा ज्या तरुण मंडळींनी नुकतंच काम सुरू केलं आहे, ती 'एआय' (AI - Artificial Intelligence) वर्कशॉपमध्ये भाग घेऊ शकतात. डॉ. आनंद देशपांडे यामध्ये प्रमुख व्याख्याते आहेत, त्यामुळे ही एक अतिशय उत्तम संधी आहे. आपल्या कन्व्हेन्शनमध्ये इतरही बरेच कार्यक्रम आहेत; जसं की 'फोक आख्यान' (Folk Akhyan) आहे, ज्यामध्ये अनेक तरुण मुलं कलाकार म्हणून सहभागी आहेत. हा खूपच बहारदार कार्यक्रम असणार आहे आणि तो बघायला तरुणांना नक्कीच आवडेल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये कोणती वैशिष्ट्ये पाहायला मिळतील?
ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण 'उत्तररंग' आयोजित केला आहे. यामध्ये डॉक्टर संजय उपाध्ये यांचं व्याख्यान असेल. त्यानंतर मेंटल हेल्थवर (Mental Health), तसेच सीनियर मंडळींसाठी ट्रॅव्हल अँड टुरिझमवर (Travel & Tourism) विशेष चर्चासत्रं (Panel Discussions) होणार आहेत. आणि या मंडळींसाठी सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे 'अंताक्षरी'! सर्व ज्येष्ठ मंडळींना या अंताक्षरीमध्ये खूप धमाल करता येईल.
वेगवेगळ्या व्यावसायिक गटांसाठीही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत का?
नक्कीच! यामध्ये 'बी-कनेक्ट', 'रिअल इस्टेट एक्स्पो' आणि 'सीएमई'चा समावेश आहे. मी आधी म्हटलं तसं, बी-कनेक्टमध्ये 'पPersistent'चे डॉ. आनंद देशपांडे येणार आहेत. तसेच श्रीमती सोनाली देशपांडे त्यांच्या 'शी शेप' (She Shape) या कंपनीबद्दल बोलणार आहेत. ते करिअरच्या संधी, त्यांचे व्हिजन आणि एआय टेक्नॉलॉजीबद्दल (AI Technology) मार्गदर्शन करतील. मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमधूनही उच्चपदस्थ व्यक्ती आपल्याकडे येत आहेत. त्यामुळे व्यावसायिक गटांसाठी 'बी-कनेक्ट' हा अतिशय फायदेशीर उपक्रम ठरेल.
रिअल इस्टेट एक्स्पोमध्ये सर्व रिअल इस्टेट इन्व्हेस्टर्स आणि बिल्डर्स एकत्र येणार आहेत. यामध्ये कोणी ॲग्रीकल्चरवर काम करतंय, कोणी फार्मिंग करतंय, तर कोणी अमेरिकेत व्यवसाय करतंय. त्या सर्वांना नेटवर्किंगची उत्तम संधी मिळेल. शिवाय, अधिवेशनातल्या 'बिझनेस एक्स्पो'मध्ये बूथ घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार करू शकता.
अधिवेशनातल्या सर्व कार्यक्रमांपैकी असा कोणता कार्यक्रम आहे, ज्याची तुम्ही वैयक्तिकरीत्या आतुरतेने वाट पाहत आहात?
अर्थातच 'शाळा'! मला मुलं खूप आवडतात आणि या उपक्रमात जवळजवळ ७७ मुलं भाग घेत आहेत. त्या सगळ्यांची सध्या जोरदार प्रॅक्टिस सुरू आहे बरं का! पहिल्या दिवशी दीपप्रज्वलनाच्या आधी राष्ट्रगीत गायनातही हीच मुलं असणार आहेत. तिथे ती भारताचं 'जन गण मन', तसंच अमेरिका आणि कॅनडाचं राष्ट्रगीत म्हणणार आहेत. मुलांसाठी ही खूप छान संधी आहे आणि मी स्वतः याची आतुरतेने वाट पाहत आहे.
उत्तर अमेरिकेतून तसेच बाहेरूनही अधिवेशनाला येऊ इच्छिणाऱ्या सर्व मराठी बांधवांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
उत्तर अमेरिकेतून जे प्रेक्षक हे अधिवेशन बघायला येत आहेत, आणि भारतातून जे कलाकार किंवा रसिक येत आहेत, त्या सर्वांना आमचं मनापासून आणि आग्रहाचं आमंत्रण! तुम्ही नक्की या. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून यावर खूप मेहनत घेत आहोत. सिएटलमधले जवळजवळ १५० व्हॉलेंटिअर्स यासाठी रात्रं-दिवस काम करत आहेत. आपलं काम, संसार, मुलंबाळं हे सगळं सांभाळून सर्वांनी अधिवेशनासाठी वेळ काढला आहे. या कार्यक्रमात खूप मजा येईल; उत्तम जेवणाची सोय आहे आणि दर्जेदार कार्यक्रम आहेत. संगीताचे कार्यक्रम, नाटकं आणि नृत्याविष्कार आहेत. रंगतदार ओपनिंग सेरेमनी आणि शानदार क्लोजिंग सेरेमनी असणार आहे. गाण्याची स्पर्धा 'स्वरमंच', स्टँड-अप कॉमेडी आणि एकांकिका स्पर्धा रंगणार आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना एक उत्तम आणि अविस्मरणीय अनुभव मिळेल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही सगळेच तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत!
--
अधिवेशनाची माहिती (एका दृष्टिक्षेपात):
दिनांक: ६–९ ऑगस्ट २०२६, स्थळ: सिॲटल, वॉशिंग्टन (अमेरिका)
संकेतस्थळ: www.bmmseattle2026.org
ईमेल: info@bmmseattle2026.org
सोशल मीडिया: फेसबुक (@bmm2026seattle) आणि इंस्टाग्राम (@bmm2026seattl_)
मुलाखत आवडली. स्वयंसेवकांचे
मुलाखत आवडली. स्वयंसेवकांचे कौतुक वाटते.