पुन्हा एकदा..!
अनवट घटनांनी भरलेल्या आपल्या आयुष्यात हे कधी ना कधी घडू शकते याची तिला पूर्ण कल्पनाच नाही तर खात्री होती. जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. प्रचंड दुःख दाटलेलं तिच्या मनात .. पुन्हा एकदा रक्ताचं माणूस गमावलं होतं तिने...मात्र याक्षणी तिच्या दोन्ही डोळ्यांतले अश्रू पूर्णतः आटलेले ... तसंही लहानपणापासूनच त्यांना ओहोटी लागलेली होती. डोक्यात अनेक प्रश्न होते मात्र त्या प्रश्नांच्या उत्तरांचा पाठपुरावा करावा असं तिला वाटत नव्हतं. तिच्या भावना बोथट झालेल्या तिच्याही नकळत.. !
तिला वाटलं, पप्पांनी आपल्याशी बोलायला हवं होतं.. असं दुर्दैवीरित्या स्वतःला संपवण्याआधी निदान एकदा तरी..!त्यांनी अश्या प्रकारे आयुष्याची अखेर करावी ह्याचा सल जन्मभर छळेल आता आपल्याला..!
पप्पांनी एकदाही आपला विचार केला नसेल का स्वतःला संपवण्याआधी..? एकदाही आपला चेहरा आला नसेल त्यांच्या डोळ्यांसमोर...? मनुष्याच्या मनातल्या सगळ्या भावना एका क्षणात ठप्प कश्या काय होऊ शकतात..? त्या निसरड्या क्षणी एकदाही स्वतःला सावरण्याची बुद्धी जागी होऊ नये..?
डोक्यात अविरत फिरणारे विचारचक्र तिला थांबवता येत नव्हते. तसा त्यांनी आयुष्यभर कधीच कुणाचा विचार केला नाही.. आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांचा , त्यांच्या भावनांचा तर कधीच नाही. पायदळीच तुडवल्या त्यांच्या सगळ्या भावना अगदी त्यांच्यासकट.! ..अपराधी भावनेतून त्याचीच शिक्षा तर त्यांनी स्वतःला दिली नसेल..??
गरगर फिरवणारे विचार तिने झटकण्याचा प्रयत्न केला.
नानूकाकांचा निरोप मिळताच तिने निघण्याची तयारी केली. ती घरी पोचली तेव्हा घर माणसांच्या गर्दीने फुललेलं. ती घरात शिरताच गर्दीने तिला वाट करून दिली. तिला पाहून लोकांची आपसांत कुजबूज वाढली. पप्पाचं पार्थिव हॉलमध्ये मध्यभागी ठेवलेले होते. नानूकाका त्यांच्या डोक्याजवळ बसलेले. तिला पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. ती पप्पांच्या पायाजवळ बसली. एकटक ती त्यांचा निर्जीव चेहरा निरखत होती. तिने गर्दीवर नजर फिरवली. पमी आत्या कुठेही तिच्या नजरेस पडली नाही. तिने तसं नानूकाकांना विचारलं देखील मात्र त्यांचा मख्ख चेहरा पाहून ती जे काही समजायचं ते समजून गेली.
" तुमचा कुणावर संशय..?" पोलिसांनी घराची झडती घेऊन झाल्यावर तिला विचारलं.
" नाही कुणावरही नाही..!" तिने उत्तर दिले.
" कुणावर संशय असेल आणि काही शंका असेल तर तुम्ही पोलिस स्टेशनला येऊन भेटा.. केसचा पुढचा तपास करता येईल आम्हांला !"
तिने मान हलवली.
पप्पांच्या कपाटातून मिळालेली नैराश्यावरील औषधे , त्या संबंधित फाइल आणि ज्या मानसरोग तज्ञाकडे त्यांचे नियमित औषधोपचार सुरू होते त्यांच्या जबानीवरून ' तीव्र नैराश्य आणि त्यातून केलेली आत्महत्या' असा शेरा देत पोलिसांनी फाइल बंद केली.
ज्या घरात बालपण गेलं, ते घर आज पप्पा गेल्यावर तिला अनोळखी वाटलं. घरातली रक्ताची माणसं कायमची सोडून गेली की त्या घराशी असलेला मायेचा ओलावा देखील त्यांच्यासोबत नाहिसा होत असावा का..?
तिला याक्षणी आई तीव्रतेने आठवली.. खूप काळाने..! तिला वाटलं, आज जर ती ह्या घरात असती तर दोघींनी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून किती अश्रू गाळले असते... एकमेकींचं दुःख वाटून घेतलं असतं.
ती आईच्या खोलीत आली. क्षणभर तिला खिडकीजवळ आई उभी असल्याचा भास झाला. भासच होता तो.. अगदी क्षणभर..!
तिला आठवलं, ह्याच खिडकीत उभी राहून आई रडत असे. तिच्याजवळ आईच्या खूप आठवणी नव्हत्या. आयुष्यातली उणीपुरी नऊ वर्षे आईचा सहवास लाभला तिला.. उरलेल्या आठवणी देखील हळूहळू विरत चाललेल्या. आईचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. देव्हाऱ्यात ठेवलेल्या महालक्ष्मीसारखा भासायचा तो चेहरा तिला.. सणावाराला आई अगदी देवीसारखी सजायची.
तिला आठवलं, आधी आई छान हसायची, भरभरून बोलायची मात्र जेव्हा निस्सी आंटी पप्पांसोबत घरी येऊ लागली तेव्हा मात्र आई आतल्या आत कुढू लागली. हळूहळू तिचं गोड हसणं, कोसळणाऱ्या धबधब्यासारखं बोलणं खीळ लागल्यागत थांबत गेलं. चेहरा निस्तेज होत गेला. तिचं देखणं रूप कुरूपतेकडे झुकू लागलं. पप्पांनी तिला टाकलं होतं. टाकलेपणाच्या वेदना विलक्षण असतात. जखमा दिसत नाहीत मात्र घाव खोलवर गेलेले असतात.
निस्सी आंटी पप्पांच्या ऑफिसमध्ये काम करायची. तिला निस्सी आंटी खूप आवडायची. गुडघ्यापर्यंत स्कर्ट आणि फ्रॉक घालून येणारी निस्सी आंटी तिला बाहुलीसारखी वाटायची. गोरी -गोमटी असलेली निस्सी आंटी तिच्याशी छान बोलायची. चॉकलेट द्यायची. मोठेपणी आपण निस्सी आंटीसारखेच कपडे घालायचे आणि फॅशन करायची असं तिने मनात ठरवलं होतं. मात्र तिचं निस्सी आंटीसोबतचं बोलणं आईला जराही आवडायचं नाही. एकदा आरश्यात पाहून ती निस्सी आंटीसारखे कपडे घालून तिच्यासारखंच चालण्याची नक्कल करत होती .. त्यावेळी नेमकं तिच्या आईचं तिच्याकडे लक्ष गेलं अन् मग तिची आई जे तिला मारत सुटली ते थांबायचं नावच घेईना.
" काय नखरे चाललेत तनू तुझे..? त्या ख्रिस्ताविणीकडून शिकलीस ना हे सगळं..? बापाने तर मनाचीही लाज सोडलीयं.. तूही तशीच वाग .. जगू देणार नाहीत तुम्ही मला सुखाने.. वात आणायला डोक्याला नुसता..!" आई खूप संतापली होती.
निस्सी आंटी पप्पांसोबत घरी आली की आई खोलीबाहेर येत नसे. दोन्ही हातांची घडी घालून पलंगावर बसून राहायची. कधी स्वतःचंचं कपाळ बडवत बसे. निस्सी आंटी निघून गेली की, मग खिडकीजवळ उभी राहून तिला हात चोळून शिव्या-शाप देत असे. पप्पा आईकडे लक्षच देत नसत. ती खूप भांडायची अधून-मधून पप्पांशी मात्र ते शांत राहायचे.
एकदा मात्र पप्पांनी आईला खूप मारलं होतं. ती शाळेतून घरी आली होती आणि आई खूप रडत होती त्यादिवशी...!
" मला नाहीच राहायचं ह्या घरात... त्या राक्षसासोबत तर बिलकुल राहायचं नाही.. त्या ख्रिस्ताविणीने विष कालवलं माझ्या संसारात.. तळपट होईल तिचं..!" असं काहीतरी रडत म्हणत होती. आईला रडताना पाहून तिलाही रडू कोसळलं होतं.
त्यानंतर दोन दिवसांनी आई घर सोडून गेली. कुठे गेली, कधी गेली कुणालाच माहित नाही. तिला न भेटताच गेली. आधी ती खूप रागावली आईवर , तिला न सांगता गेली म्हणून पण बरेच दिवस आई परतली नाही मग मात्र तिला रडू कोसळू लागलं. आईची वाट बघून - बघून ती थकून गेली.
एके दिवशी पोलिस घरी आले. ते बाबांशी , नानूकाकांशी काहीतरी बोलले. तिलाही काही प्रश्न विचारले. पण ती काहीच म्हणाली नाही. तिची जीभ जणू टाळ्याला चिटकली होती.
" बेबी घाबरते" असं म्हणत नानूकाका तिला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. त्यांचं घर बंगल्याच्या पाठी होतं. त्यांच्या घरात साईबाबाची तस्वीर होती. भितींला टेकवून महालक्ष्मीचा फोटो होता. फोटोजवळ समई तेवत होती. समईतली ज्योत शांतपणे जळत होती. महालक्ष्मीचा फोटो पाहून तिला आईची आठवण आली. तिला जरावेळ शांत वाटलं. तिला आपली आई आजूबाजूला असल्याचा क्षणभर भास झाला. आईच्या आठवणींनी ती रडू लागताच नानूकाकांनी तिला प्रेमाने थोपटलं.
नानूकाका शिर्डीला नेहमी जात. जेव्हा ते घरी नसायचे तेव्हा पमी आत्याला पप्पा घरी बोलावत. ती यायला नाखूश असायची. तिला आवडायचं नाहीच. मात्र भाचीवरच्या मायेखातर ती यायची.
" अशी कशी बेपत्ता झाली तुझी बायको..? आकाशाने ओढलं का जमिनीने गिळलं तिला..?? तूच मारलं असणार तिला.. नाहीतरी बायका खाणारे राक्षस तुम्ही..!" पमी आत्या आल्या - आल्या पप्पांशी भांडू लागली होती.
" वेडी आहेस का तू..? काहीही बरगळतेस..!" पप्पा शांत आवाजात तिची समजूत काढत होते. तरीही पमी आत्याचा राग शांत होत नव्हता.
पमी आत्या निघून गेली आणि निस्सी आंटी बंगल्यात कायमची राहायला आली. शाळेत तिला यावरून सगळे चिडवत.
तिची बालमैत्रिण सपना एकदा तिच्या कानात कुजबुजत म्हणाली , " तुझे पप्पा किनई आता ख्रिश्चन होणार. त्या निस्सी आंटीने बाटवलं तुमचं घर आणि तुझ्या पप्पांना... तुझ्या आईला ना तिने आणि तुझ्या पप्पांनीच मारलं.. !" हे ऐकून तिला खूप रडू कोसळले.
" तुला कुणी सांगितलं..?" तिने रडत विचारलं.
" सगळेच असं म्हणतात आणि किनई निस्सी आंटी खूप श्रीमंत आहे म्हणून तुझे पप्पा तिच्याशी लग्नही करणार आहेत..!" सपनाने अजून तिच्या माहितीत भर घातली.
निस्सी आंटी तिला मनापासून आवडायची.. आईसारखं तिच्यावर खूप प्रेम जरी करत नसली तरीही तिचा ती राग किंवा तिरस्कार देखील नाही करायची. मात्र कानावर पडणाऱ्या गोष्टींमुळे आता तिच्या मनात निस्सी आंटी आणि पप्पांबद्दल अढी बसू लागली. तिला दोघांचाही तिरस्कार वाटू लागला.
पुढे पाचवीनंतर पप्पांनी तिला हॉस्टेलमध्ये ठेवलं. तिलाही बरंच वाटलं. आई ज्या घरात नव्हती तिथे तिला राहावंसं वाटत नव्हतं. तीन- चार वर्षाचा काळ निघून गेला. पप्पांनी निस्सी आंटीशी लग्न केलं होतं. जेव्हा सुट्टीत ती घरी यायची तेव्हा दोघांशीही कामापुरतेच बोलायची. स्वतः भोवती तिने कोष विणला होता. त्या कोषातच ती रमू लागली.
दहावीच्या परिक्षेनंतर ती सुट्टीत घरी आली तर तिला पुन्हा एकदा धक्का बसला. निस्सी आंटी कुणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झालेली .. अगदी तिच्या आईसारखीच..! ' तळपट होईल तिचं' आईचे शब्द तिच्या कानात वाजले.
तिने पप्पांना निस्सी आंटीबद्दल काहीही विचारले नाही. प्रश्न होते डोक्यात मात्र तिला त्यांचा पाठपुरावा करण्याची अजिबात इच्छा नव्हती.
नानूकाका नसताना पुन्हा एकदा पमी आत्या घरी आली. म्हणजे पप्पांनीच तिला बोलावून घेतले होते.
" ऐक तनू, तुझ्या आईला मारली तसंच ख्रिस्ताविणीला पण तुझ्या बापानेच मारली असणार ..!" एखाद्या रहस्याचा भेद करावा तशी पमी आत्या तिच्या कानाजवळ पुटपुटत म्हणाली.
ती हतबद्ध होऊन ऐकत राहिली. अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आत्या आपल्याला ऐकवत आहे असं समजून ती ऐकू लागली.
" तुझी आई गावातलीच .. सोन्यासारखी पोर पण मूर्ख निघाली.. ह्याच्या नादाला लागली आणि फसली जाळ्यात.. तरी मी तिला म्हटलंही दूर रहा ह्याच्यापासून , एकदा का मन भरलं ना तुझ्यापासून की फेकून देईल बघ तुला तो त्याच्या वाटेतून..तेचं खरं झालं.. राख-रांगोळी झाली तिच्या जन्माची..त्या ख्रिस्ताविणीची पण तीच गत झाली असणार.. तिला देखील यानेच मारलं असणार..नस् न् नस् ओळखून आहे मी आपल्या घरातल्या हिस्त्र प्राण्यांची.. !"
" काहीही काय सांगतेस आत्या तू.. माझे पप्पा असं काही नाही करणार..!" तिला आत्याचं बोलणं किळसवाणं वाटलं.
" मग खोटं बोलत्येयं का मी..? आमचा बाप पण तसाचं .. त्याचं घाणेरडं रक्त तुझ्या बापाच्या नसातून धावतेयं.. मी गेल्ये माझ्या आईच्या वळणावर.. सालस होती बिचारी...मला कळतंय माझं भलंबुरं .. ! " उसासत आत्या सांगू लागली.
" माझ्या आईला मारली माझ्या बापाने.. नायकिणीसाठी..! टाकली उचलून शेतातल्या विहिरीत .. मी पाहिलं, तुझ्या बापानं पाहिलं .. नको नको म्हणत होती बिचारी.. पण त्या राक्षसाला दया ना माया.. गावाला सांगत सुटला पाय निसटून पडली म्हणे विहिरीत.. आई मेली न कोठ्यावरची नायकिण आणून ठेवली काही दिवस घरात .. तिला पण घालवली काही दिवसांनी नकोशी झाल्यावर ...!" पमी आत्याला हुंदके आवरेनात.
" तू पोलिसांना का खरं सांगितलं नाहीस.?"
" काय सांगू बाई, तुझ्या बापाने हात आडवा धरला माझ्या डोळ्यावर . काही पाहिलचं नाही म्हणे... लहान होते गं , घाबरले जीवाला... बायका खाणारे राक्षस आहेत हे घरातले पुरुष.. इतरांचं मन एका बाईने भरेल पण ह्यांची भूकच पाशवी.. पशूच्या जातीचे कुठले ... दुसऱ्यांच्या पोरी खायच्या आणि घरातल्या पोरी निर्जीव शिळा बनवून ठेवायच्या. .. कुठं फेडतील हि पापं..?!"
" तुझे वडील कुठे आहेत सध्या..?"
" मसणात..!" पमी आत्या एकदम उसळून म्हणाली.
" असेल उकीरडे हुंगत इथे - तिथे.. देवाच्या भजनी लागलायं असं ऐकलं होतं.. करून - करून भागलं न म्हणे देवपूजेला लागलं, पापं धुवत फिरत असेल दुनियाभर...मरू दे ती पीडा जिथे असेल तिथे.. नाव नको आता त्याचं.. .!"
पमी आत्या गेली मात्र तिच्या डोक्याला कायमचा भुंगा लावूनच .. निस्सी आंटी पुन्हा परतलीच नाही. पोलिस तपास झाला पण पुढे तिचं काय झालं हे काही कळलंच नाही.
ती पुढच्या आयुष्यात रमत गेली. पप्पांच्या आयुष्यात अजून एक स्त्री आली होती असं तिच्या कानावर आलं होतं. पमी आत्याचं बोलणं तिला आठवायचं ... तिच्या मनात खूप प्रश्न असायचे जे तिला पप्पांना विचारावेसे वाटायचे पण त्याचा पाठपुरावा करावा असं तिला मनापासून वाटायचं नाही.
ऋतू पालटत होते. आजकाल पप्पांची वेगळीच तक्रार सुरु झाली होती. अधून - मधून त्यांना तिची आई , निस्सी आंटी दिसते म्हणे घरात वावरताना असं पप्पा तिला म्हणू लागले.
तिला जाणवलं, त्यांचं नैराश्य.. त्यांचं एकटेपण..!
तिने पप्पांसाठी मानसरोग तज्ञाची मदत घेतली. ती, नानूकाका काळजी घ्यायला होतेच तरीही दिवसेंदिवस पप्पा तीव्र नैराश्याच्या खाईत जाऊ लागले.. आणि ज्याची भीती तिला वाटत होती ते शेवटी घडलेच. आई- वडील दोघेही नसलेले घर तिला अंगणातला जुनाट पिंपळवृक्ष उन्मळून पडल्यावर अंगण जसं ओसाड वाटू लागतं तसं वाटू लागलं.
नानूकाकांना न सांगता तिने पप्पांच्या जाण्याबद्दल पमी आत्याला कळवलं.
" मी पमी आत्याला कळवलंय , येईल ती दोन दिवसांत..!" तिने नानू काकांना म्हटलं. त्यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
" हे मालकांनी दिलंय तुमच्यासाठी..!" तिच्या हातात दोन बंद लिफाफे
नानूकाकांनी टेकवले.
तिने नानूकाकांना आज निरखून पाहिलं. तिच्या पप्पांच्या जाण्याने ते खूप दुःखी, खचलेले दिसले.
पमी आत्या तिच्या यायच्या एक दिवस आधीच घरी पोचली.
" कर्माचं फळ .. दुसरं काय म्हणू..?" असं म्हणत डोक्याला हात लावत पप्पांच्या फोटोसमोर बसली.
नानूकाकांच्या खोलीतून देवाची आरती म्हटल्याचे आवाज कानावर येत होते. पमी आत्या आवाजाचा कानोसा घेऊ लागली.
" कोण गं देवाची आरती म्हणतंय..?"
" नानूकाका.. नावाला नोकर पण घरातलेचं आहेत..!"
" अस्सं..!" पमी आत्या विचारात पडल्यासारखी वाटली.
तिने टेबलवरचा एक लिफाफा उघडला. त्यात पप्पांचे मृत्युपत्र आणि सगळ्या मालमत्तेचे कागद होते. पप्पांनी सगळी मालमत्ता तिच्या नावे केली होती. काही लाख रुपये नानूकाकांसाठी आणि पमी आत्यासाठी ठेवले होते.
तिने दुसरा लिफाफा उघडला. त्यात तिच्यासाठी पत्र होते पप्पांनी लिहिलेले. ते पत्र थरथरत्या हाताने तिने वाचायला घेतले. पत्र वाचण्यासाठी तिने मानसिक बळ एकवटण्याचा प्रयत्न केला.
प्रिय तनू,
खूप आशिर्वाद,
तू हे पत्र वाचताना थरथरशील हे मी जाणून आहे. तुझ्या मनात दुःख, राग, द्वेष, तिरस्कार, हतबलता ह्या साऱ्या भावना दाटतील हे देखील मला ठाऊक आहे.. तरीही हे पत्र लिहिण्याची हिंमत मी करतो आहे.. तू मला ह्या जन्मात माफ करू नयेच...!
मी माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व स्त्रियांचा गुन्हेगार आहे हे आधीच कबूल करतो. सर्वात जास्त तुझाच गुन्हेगार आहे हे मला मान्य आहे. तुला निरागस बालपण देऊ शकलो नाही त्याबद्दल तुझी माफी मागण्याची माझी लायकी नाही.
मला आयुष्यात स्थिर विचार कधीच करता आला नाही. हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागण्यात माझं आयुष्य संपलं. मृगजळापाठी लागून माझ्या हातून पापचं घडली. गंगेत पापं धुवून माणसं पवित्र होऊ पाहतात मात्र माझ्यासाठी तूच माझी गंगा आहेस .. माझ्या पापांचे धडे मी तुझ्यासमोर वाचणार आहे. ते ऐकण्याची हिंमत माझ्या बाळास मिळो हिच देवाला विनंती. इतकी वर्ष जे पाप मी मनात दडवून ठेवलंय ते मी तुला सांगणार आहे.
तनू, तुझ्या आईला मी मारलं, निस्सीला देखील मीचं मारलं. मी पाप केलं आणि त्याचं प्राय:श्चित देखील मी घेणार आहे.
स्वतःची काळजी घे.. पमी आत्याला सांभाळ..!!
कायम तुझा अपराधी असलेला
तुझा पिता
पत्र वाचता - वाचता तिला रडू कोसळले. तिला वाटलं , तिला आता चक्कर येईल. ती काही क्षण नुसती बसून राहिली. तिला पत्रातली अक्षरे दिसेनाशी झाली. पमी आत्या जे तिला सांगायची ते कधी सत्यात उतरेल असं तिला खरंच वाटलं नव्हतं. तिने थरथरत्या हाताने पत्राची घडी घातली.
पप्पांनी गुन्हा तर कबूल केला होता मात्र गुन्हा कसा केला, कुठे केला .. आई आणि निस्सी आंटीच्या मृत शरीराचं काय झालं त्याबदद्ल कुठलाही उल्लेख नव्हता. ते गुपित शोधायला हवं होतं.. ते जरुरीचं होतं. आता तिला पडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा ती निश्चितच करणार होती. उत्तरे शोधणार होती.
तिने ठरवलं, उद्या सकाळी नानूकाकांना भेटायचं. पप्पांच्या जीवनात दीर्घकाळ- अगदी आपल्या जन्मापासून आलेले तेच एकटे.. त्यांच्याशी याबाबतीत बोलावं.. त्यांना विचारावं..!
ती सकाळीच घरापाठच्या नानूकाकांच्या खोलीवर आली. दार ओढलेले होते. तिच्या मागोमाग पमी आत्या देखील आली. खोलीत कुणीही नव्हते. तिने नानूकाकांना आवाज दिला मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
खोलीतल्या महालक्ष्मीच्या फोटोची नुकतीच पूजा झालेली दिसत होती. फोटोसमोर नेहमीसारखी सतरंजी अंथरलेली होती. खोलीतलं वातावरण शांत होतं. महालक्ष्मीचा फोटो पाहून तिला आई आठवली. क्षणभर आई तिथे उभी आहे असा तिला भास झाला. अगदी क्षणभर ..!
एक बाजूला नानूकाकांच्या चिपळ्या, टाळ ठेवलेल्या होत्या. साईबाबांची तस्वीर मात्र तिथून गायब होती. नानूकाकांची पिशवी जागेवर दिसत नव्हती जी ते नेहमी बाहेर जाताना घेऊन जायचे.
" हा महालक्ष्मीचा फोटो इथे कसा..? हा गावच्या घरातल्या देव्हाऱ्यात होता ..तिथून नाहिसा झालेला बऱ्याच वर्षापूर्वी.. आईने आणला होता तिच्या माहेरातून, .. इथे कुणी आणला..? " पमी आत्याने 'आ' वासला.
" ह्या चिपळ्या, टाळ सगळंच घरचं..!" तिला धक्क्यावर धक्के बसू लागले.
दोघींची नजर अचानक एकमेकींकडे वळली. दोघींनाही एकाच वेळी काहीतरी उमगलं. कसली तरी ओळख पटली.
" न्याय मिळायला हवा आत्या, दोघींनाही न्याय मिळायला हवा..!"
ती बडबडू लागली.
" पोलिसांना बोलावं तनू... आत्ताच्या आत्ता...बायका खाणाऱ्या राक्षसाला सोडू नको.. लवकर फोन कर..!" पमी आत्या ओरडून म्हणाली.
तनूचं डोकं चक्रावलं. तिने स्वतःला सावरलं.
" हॅलो, पोलिस स्टेशन..!" तिने फोन लावला.
__ आणि नानूकाकांच्या खोलीत अचानक वाऱ्याचा झोत शिरला अन् महालक्ष्मीच्या फोटो समोर ठेवलेल्या दोन्ही समईतल्या ज्योती विलक्षण तेजाने अचानक प्रखर होऊन उजळू लागल्या.
समाप्त..!
धन्यवाद..
भारी!!
भारी!!
शेवट कळाला नाही
कुणीतरी सांगा
कथा आवडली.
कथा आवडली.
कथा आवडली. खूप दिवसांनी लिखाण
कथा आवडली. खूप दिवसांनी लिखाण केलंस रुपाली.
नानू काकांनी मारलं दोघींना? पपा च्या वतीने?
आवडली कथा. छानच लिहिली आहे.
आवडली कथा. छानच लिहिली आहे. एखाद्या टीव्ही सिरीयलसारखी डोळ्यासमोर दिसली कथा.
शेवटी पूर्णत्वास सुद्धा गेली.
एखाद्या कादंबरीचे पोटेन्शियल आहे या कथेत.. तुम्ही मोजक्या शब्दात छान डिटेलिंग केले आहे. लिहीत राहा...
मला वाटते नानूकाका म्हणजे
रुपाली, वेलकम बॅक.
प्लॉट छान जमलाय कथेचा.
स्पॉइलर अलर्ट: ------ स्पॉइलर अलर्ट:
मला वाटते नानूकाका म्हणजे तिचे आजोबा, पपा-पमी आत्याचे वडील.
कदाचित पपा आणि पमीआत्या दोघेच भावंडं होते. पमी आत्याच्या बोलण्यात नानुकाकांचा उल्लेख नाही. नानुकाका नसतानाच पपा पमीला बोलवत. आताही पमीआत्या नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच आली आणि नानुकाकारुपी आजोबा तिने आपल्याला बघु नये म्हणून गायब झाले.
गडी म्हणुन आपल्याच वडिलांना पपांनी आसरा दिला होता. त्यांच्या करवी दोघींचा खून केला होता.
मानवमामा हो अगदी बरोबर
मानवमामा हो अगदी बरोबर
म्हणून कथा पूर्णत्वास गेल्यासारखे वाटले.
तुम्ही प्रतिसादाआधी स्पॉइलर टाका
मानव, पटले.
मानव, पटले.
खूप दिवसांनी तुम्ही कथा
खूप दिवसांनी तुम्ही कथा लिहिली.
नेहमीप्रमाणेच छान फुलवली आहे.
शेवट अनपेक्षित. मानव यांनी लिहिलं नसतं, तर कळलं नसतं.
शेवट कळाला नाही
शेवट कळाला नाही
मानव मामांचे स्पष्टीकरण हेच लेखिकेच्या मनात आहे का हे लेखिकेने सांगावे..
मानवजी, तुम्हांला राजा
मानवजी, तुम्हांला राजा विक्रमादित्याचा मुकूट माझ्याकडून बक्षिस..!
शक्य असतं तर तुम्हाला आणि ऋन्मेषला दोन- दोन गावं इनाम दिली असती.
किल्ली पहिल्या प्रतिसादासाठी खूप आभार...
तुझा प्रतिसाद वाचून वाटलं, कथेचा शेवट फसला की काय..?
अनंतयात्री, शर्मिलाजी, ऋन्मेष ह्यांचा प्रतिसाद वाचून वाटलं कथा जमलीये जरा..
भरत, शर्मिलाजी धन्यवाद, हो खूप दिवसांनी लिहिलं काहीतरी . लेखनाची खुमखुमी मध्येच गायब होते.
धनवंती, मानवजीनी शेवट अचूक ओळखलायं .. नानूकाका हेच तनूचे आजोबा आहेत आणि दोघींच्या खुनाच्या कटात सहभागी देखील ते आहेत. मुलाला त्यांनी गुन्ह्यात मदत केलीयं.. मृतदेहाची विल्हेवाट पण त्यांनीच लावली असणार असा संशय तनू आणि पमी आत्याला आहे.. कथेत थोडीशी हिंट आहे..
मानवजी , जमलं तर मला सांगा मृतदेह कुठे असू शकतील..?
धन्यवाद सर्वांना कथा वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल... गूढकथा लिहायला काही प्रमाणात जमलीय असं समजते मी आता..
छान कथा.
छान कथा.
महालक्ष्मीच्या फोटो मागे
महालक्ष्मीच्या फोटो मागे भुयार असेल.
मानवजी, तसंही असू शकेल. त्याच
मानवजी, तसंही असू शकेल. त्याच खोलीत कदाचित फोटोंच्या खाली मृतदेह गाडले असावेत असं दोघींना जाणवलं असावं. पहिल्यांदा आई गायब झाली तेव्हा त्यांच्या खोलीत गेल्यावर तिला आईचा भास झाला. त्यावेळी महालक्ष्यीच्या फोटोसमोर एकच समई तेवत होती. कथेच्या शेवटी दोन समया तेवत होत्या. दोन खून करून पुन्हा पापं झाकण्यासाठी देवीची पूजा नानूकाका करत होता. समयांच्या प्रतिकातून तसं फक्त मला सुचवायचं होतं.. कदाचित लिहिताना थोडा गोंधळ झाला माझा..!
स्पार्कल धन्यवाद..!
सॉलिड!!
सॉलिड!!
मस्त झालीय.
मस्त झालीय.
मस्त झालीय.
मस्त झालीय.
शेवट कळला नाही हा माबुदो
शेवट कळला नाही हा माबुदो
कथा छानच आहे
कथा आवडली.
कथा आवडली.
तशा बर्याच hints आहेत. आपले वडील देवपूजेला लागलेत असं पमीआत्याने सांगणं, तिला नानूकाका नसतानाच पपांनी घरी बोलावणं, नानूकाकांच्या खोलीतून भजनाचा आवाज ऐकल्यावर पमीआत्याने विचारात पडणं (तिला वडिलांच्या आवाजातील साधर्म्य जाणवले असणार) आणि पमीआत्याने बघायच्या आधी नानूकाकांनी पळ काढणं.
मृतदेह खोलीत किंवा तिच्या बाजूला कुठेतरी लपवलेले असणार.
छान सस्पेन्स
छान सस्पेन्स
खुप छान कथा!
खुप छान कथा!
गूढकथा जमलीये अगदी!
रुपाली, भिंतीला लावुन ठेवलेला
रुपाली, भिंतीला लावुन ठेवलेला फोटो, एकाच्या दोन समया, ज्योती अधिक प्रखर झाल्या याची नोंद केली होती. अमानवीय लिबर्टी घेऊन दोन आत्मे आपल्याला आता न्याय मिळणार म्हणुन ज्योत प्रखर करतात असा त्यात संकेत वाटला. खोलीतच प्रेत पुरले असते तर खूप दुर्गंध जाणवला असता काही महिने. पोलीस येतात तेव्हा नानुकाका तिला आपल्या खोलीत घेऊन जातात तेव्हा तिला दुर्गंध जाणवला असता. म्हणुन मी फोटो (तो तेवढा मोठा असेल असे गृहीत घरून) मागे भितींतून खाली सरपटत जाता येणारे भुयार असेल आणि पुढे कुठेतरी प्रेत पुरली असतील असा अंदाज लावला.
छान लिहिलीय. मानवजी धन्यवाद
छान लिहिलीय. मानवजी धन्यवाद.
काय गंमत असते ना.. स्त्रियांचे नवरे त्यांना सोडुन दुसर्या स्त्रीच्या मागे जातात. आपल्या नवर्याचे गुण माहित असणारच तरीही ह्या स्त्रिया त्या दुसर्या स्त्रीचे तळपट होवो असा शाप देतात. तिचे तळपट जर झालेच तर आपला नवरा तिसरीच्या मागे लागेल ही शक्यता त्या विचारात घेत नाहीत.
असल्या नवर्याचे तळपट होवो हा शाप खरेतर द्यायला हवा पण संस्कार यांना तसे करु देत नाही.
<<< असल्या नवर्याचे तळपट
<<< असल्या नवर्याचे तळपट होवो हा शाप खरेतर द्यायला हवा पण संस्कार यांना तसे करु देत नाही.
>>>>>
संस्कारापेक्षाही नवऱ्यावर अवलंबून असणे.
त्याचे तळपट झाले तर आपण कुठे जाणार? आपल्या संसाराचे काय होणार?
अन्यथा स्वतःच सोडून गेल्या असत्या.
सामो, दत्तात्रेयजी, शरदजी,
सामो, दत्तात्रेयजी, शरदजी, आबा धन्यवाद ..!
किल्ली, असं काही नाही.. दुसरी कुणाची कथा वाचताना मलाही तुझ्यासारखं वाटू शकलं असतं.
चिकू , धन्यवाद.. तुम्ही तर सगळ्या hints ओळखल्या.
एकाच्या दोन समया, ज्योती अधिक प्रखर झाल्या याची नोंद केली होती. अमानवीय लिबर्टी घेऊन दोन आत्मे आपल्याला आता न्याय मिळणार म्हणुन ज्योत प्रखर करतात असा त्यात संकेत वाटला. >> अगदी बरोबर मानवजी.. तिथे मी तांत्रिकदृष्ट्या सूट घेतली. माझ्या डोक्यात जशी कथा होती तशीच तुम्ही ओळखली. दुर्गंधी पसरली असणार हा point बरोबर आहे तुमचा.. मात्र गुन्हेगारांनी perfect गुन्हा केलायं. पोलिसांनी सुद्धा कसून तपास केला नसावा. दोघींच्या बाजूने लढणारं कुणी नसणार बहुतेक.. तनूची आई गायब होण्याच्या दोन दिवस आधी वडिलांनी आईला मारहाण केली होती कदाचित ती गोष्ट पोलिसांना तनूने सांगू नये आणि त्यांना काही संशय येऊ नये म्हणून नानूकाका ' बेबी घाबरते' असं सांगून तिथून तिला घेऊन गेले.
साधनाताई धन्यवाद.. तुमचं म्हणणंही पटलं. खरंतर दुसऱ्या स्त्री एवढा नवरा देखील अनैतिक गोष्टी करण्यास जबाबदार आहे. खरंतर तो जास्तच.. पण कदाचित एखाद्या स्त्रीला पुरुषापेक्षा स्त्रीकडूनच अपेक्षा जास्त असू शकतील. तू स्त्री असून तू अशी कशी वागू शकतेस..? हा हि एक सामाजिक संस्कार किंवा सामाजिक दबाव असावा.
कथेतल्या स्त्री बद्दल म्हणाल तर तिने संसार वाचवण्यासाठी भांडूनही पाहिलं. त्याला संधी देऊन पाहिलं असणार.. पण जेव्हा नवऱ्याकडून तिच्यावर हात उचलला गेला तेव्हा मात्र तिची सहनशक्ती संपलीय.. तिला तिथून बाहेर पडायचं होतं मात्र त्याआधीच तिला त्याने वाटेतून दूर केलंय.. कथेत नवऱ्याला कर्माचं फळ मिळालंय. कथेतली सुमी आत्या खरी खमकी स्त्री आहे. तिलाच मनापासून वाटतेयं की, रक्ताचे जरी असले तरी गुन्हेगारांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायला हवी, त्यांचे तळपट व्हायला हवे.
ऋन्मेष, तुम्ही म्हणताय ते काही प्रमाणात खरंही असेल ... पण मांडलेला डाव क्षणात उधळून टाकणं स्त्री-पुरुष दोघांसाठीही एवढं सोप्पं नसणार .. ताण-तणाव , सामाजिक कुंचबणा दोघांनाही सहन करावी लागणार.. मुलांची होरपळ होणार... जी कथेत तनू आणि सुमी आत्याची झालीयं...
मस्त कथा रूपाली!
मस्त कथा रूपाली!
मस्त कथा रूपाली!
मस्त कथा रूपाली!
वावे,, धन्यवाद..!
वावे, धन्यवाद..!
आवडली कथा.
आवडली कथा.
नानू काका गुन्ह्यांत सहभागी होते - हे शेवटी लक्षात आलं. पण तेच तनूचे आजोबा असणार - हे डोक्यात आलं नाही.
कथेला शीर्षक आणखी काहीतरी नेमकं आणि समर्पक हवं.
सॉलिड!!
सॉलिड!! प्लॉट छान जमलाय कथेचा.
जबरदस्त ! आवडली. खूपच छान
जबरदस्त ! आवडली. खूपच छान खुलवली आहे.
Pages