मराठी चित्रपट "तुंबाडची मंजुळा" - निरीक्षणे
क्रमांक १) मध्ये चार ओळीत स्टोरीलाईन सांगतो. माझ्यामते त्यात स्पॉइलर नाहीये. तरी शंका वाटल्यास किंवा चित्रपट बघताना मनाची पाटी अगदी कोरी हवी असल्यास क्रमांक २ वर उडी मारा.
----
१) थोडक्यात कथानक - चित्रपटाचा हिरो ओम भुतकर रात्रीच्या अंधारात एक कांड करतो. पकडले जाणार असे वाटते तेव्हा अंगात भूत शिरल्याचे नाटक करतो. भूत म्हणून एका बाईचे नाव घेतो ते मंजुळा. गंमत अशी होते की शेजारच्या गावात त्याच नावाची बाई खरोखर वर्षभरापूर्वी मेलेली असते. तिची मुलगी सई ताम्हणकर आईच्या भुताला मोक्ष मिळवून द्यायला येते. पण सोबत तिचे काही प्रॉब्लेम्स घेऊन येते. ज्यातून आपली आई आपल्याला सोडवेल अशी अपेक्षा घेऊन येते. पण आईचे भूत तर प्रत्यक्षात नसते. मग ते प्रॉब्लेम सुटतात की नाही आणि सुटल्यास कोण सोडवते यासाठीच तर बघायची आहे तुंबाडची मंजुळा!
--------
आता परीक्षणाकडे वळूया,
२) पूर्वार्ध पूर्ण कॉमेडी आहे. माझ्या थिएटरमधील लोकं नॉनस्टॉप खिदळत होती. हाऊसफुल असल्याने जरा जास्तच.
(अरे हो, मी मंगळवारी चित्रपट बघायला गेलो होतो. फक्त ९२ रुपये तिकीट होते. त्यामुळे अगदी पहिली A रांग सुद्धा हाऊसफुल होती. एवढ्या पब्लिकसोबत पिक्चर बघायची एक वेगळीच मजा. ती सुद्धा मराठमोळी पब्लिक. कपल वगैरे फाफटपसारा नाही, जे हसतात कमी आणि लाजतात जास्त)
असो, पण तरीही दुर्दैवाने मला इतरांच्या तुलनेत कमी हसायला आले. असते एकेकाची आवड.
तसा मी फार उच्च अभिरुचीच्या विनोदावरच हसतो अश्यातला भाग नाही. पण मासला आवडणाऱ्या विनोदामध्येही प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. तरी हसणाऱ्यांचे बहुमत पाहता चित्रपट धमाल विनोदी आहे असे आपण (माझे वैयक्तिक मत बाजूला ठेवून) म्हणू शकतो.
३) उत्तरार्धात सई ताम्हणकर एन्ट्री घेते आणि जो इमोशनल अँगल असलेला ड्रामा सुरू होतो., मला तो जास्त आवडला. दोन तीन दृश्यात डोळे पाणावले. जिथे माझे डोळे पाणावतात ते मला भावते. व्हायसे वर्सा सुद्धा म्हणू शकतो. त्यामुळे उत्तरार्धात आलेले प्रासंगिक विनोद सुद्धा भावले. कारण तेव्हा सोबत कारुण्याची झालर जोडली गेली होती. पूर्वार्धात फार एकसुरी झाले होते असे वाटले. त्यामुळे एडिटिंग करताना तिथे काटछाट करता आली असती आणि उत्तरार्ध वाढवला असता तर बरे झाले असते असे अजून एक वैयक्तिक मत.
४) सई ताम्हणकर! अगदी पूर्वीपासूनच मी हिच्या प्रेमात होतो.
आहे नाही, होतो... कारण आता नव्याने पडलो आहे 
जेव्हा ती नवीनच आली होती तेव्हा मी सुद्धा वयात येत असल्याने ती माझ्या क्रश लिस्टमध्ये होती इतकी आवडीची अभिनेत्री. (मायबोलीकरांना वेगळे सांगायला नकोच) तिच्यावरून तेव्हा बरेच चिडवणे झेलले आहे. पण आजच्या तारखेला जेव्हा त्या गुलाबाचे असे "गुलकंद" बघायला मिळते तेव्हा आत काहीतरी सुखावते. वर उल्लेख केल्याप्रमाणे या चित्रपटात जेव्हा जेव्हा डोळे पाणावले आहेत समोर पडद्यावर सई होतीच!
ज्याच्या अंगात भूत आले तो भुतकर, गावचे तडफदार व्यक्तिमत्व जोशी जितेंदर, मांत्रिकाच्या भूमिकेत अनासपुरे मकरंद आणि अध्येमधे तडका देणाऱ्या आज्जी उषा नाडकर्णी अशी दिग्गज कलाकारांची फौज एकेका भावखाऊ भूमिकेत असूनही चित्रपट मध्यंतरानंतर एन्ट्री घेतलेल्या सईपाशी येऊन थांबतो. तिच्या कॅरेक्टरने आणि त्याला साजेश्या तिच्या अभिनयाने चित्रपटाला डेप्थ येते.
५) "हे देवा मला पाव की रे.., की देवा घे धाव की रे.." हे गाणे ऐकताक्षणीच भिडते. समान आशयामुळे "देवाक काळजी" गाणे आठवले. पण त्याच्याशी तुलना नको. ते प्रचंड आवडीचे आहे. अजय यांच्या आवाजात अतुलनीय आहे. पण हे गाणे भिडते आणि सईच्या चित्रपटातील आयुष्याशी आपल्याला जोडते.
६) "वेड्या मनाचं, वेड्या मनाला, वेड लागू लागलंय पुन्हा.." हे गाणे सुरू झाले आणि हळूवार आत झिरपत जाणारा हा नवा गोड आवाज कोणाचा याची उत्सुकता वाटली. घरी आल्यावर उत्साहाने चेक केले पण पदरी निराशाच पडली. जुनाच खिलाडी होता. गायक हरिहरन निघाले. आपल्याला आवाजाचा कान आहे एवढेच काय ते समाधान मिळाले.
७) बाकी इतर गाणी सुद्धा चांगली आहेत. काही न आवडलेल्या विनोदांनी मला असह्य झाले असेल पण गाण्यांनी बिलकुल झाले नाही. पण ती तुमची तुम्ही शोधा. गाण्यांची आवड सुद्धा प्रत्येकाची वेगळी असते.
उदाहरणार्थ, सैराट मधील झिंगाट गाण्याचे यात एक तर्राट वर्जन आहे. अर्थात झिंगाटची सर येणे अशक्यच, पण काय माहीत खरोखरचे तर्राट झालेले यावरही तितक्याच भक्तिभावाने झिंगतील..
८) हा चित्रपट कन्नड ब्लॉकबस्टर 'सु फ्रॉम सो' ('सुलोचना फ्रॉम सोमेश्वर' ) या चित्रपटाचा ऑफिशियल रीमेक आहे. तो चित्रपट हिंदी डब मध्ये उपलब्ध नसल्याने कोणी बघितले असण्याची शक्यता कमीच. तरी हे फक्त माहितीसाठी म्हणून सांगितले आहे. आपल्याला दोन्हींची तुलना करायची काही एक गरज नाही. आपल्या चित्रपटाचा बाज मराठी आहे आणि ती मराठी मातीतीलच कथा वाटते इतके आपल्यासाठी पुरेसे आहे. कोकणात घडते कारण त्यामुळे कदाचित भूतांवर एखाद्याचा चटकन विश्वास बसावा. अन्यथा महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात घडणारी अशी कथा आहे. त्यात कोकण शोधायला जाऊ नये. ते कुठे दिसलेच नाही. बाकी भूताखेतानवर विश्वास असेल नसेल आपापल्या जबाबदारीवर बघून घ्या.
-- तुमचा अभिषेक

बघायचाय लका मुंजाडची तुंबाळा
बघायचाय लका मुंजाडची तुंबाळा
हो बघा. पहिलाच आठवडा आहे.
हो बघा. पहिलाच आठवडा आहे. थिएटरतच बघू शकता. स्वतंत्र धागा त्याच्यासाठी काढला आहे. अन्यथा नंतर ओटीटी आहेच..
चांगले परीक्षण.
चांगले परीक्षण.
सई ताम्हणकरचा अभिनय आवडतो.
आजूबाजूच्या बच्चेकंपनीला
आजूबाजूच्या बच्चेकंपनीला सांगितलं कि ते फोन मधे आणतात नवीन पिक्चर.
ओटीटी काय असतं?
लिखाण आवडले. बघण्याची शक्यता
लिखाण आवडले. बघण्याची शक्यता नाही.
सई ताम्हणकर मधे शर्मिला टागोर
सई ताम्हणकर मधे शर्मिला टागोर, वहिदा रेहमान आणि मधुबाला यांचं परफेक्ट मिश्रण आहे.
तिच्यासाठी गझनी खूप वेळा पाहिला.
आधी बोकलत होते आता मदन पण आले
आधी बोकलत होते आता मदन पण आले आहेत काहीही प्रतिसाद देऊन irritate करायला
हा माझा सन्मान आहे.
हा माझा सन्मान आहे.
<< सई ताम्हणकर मधे शर्मिला
<< सई ताम्हणकर मधे शर्मिला टागोर, वहिदा रेहमान आणि मधुबाला यांचं परफेक्ट मिश्रण आहे.
>>>
जर हे मनापासून लिहिले असेल तर तिच्यावरचा हा लेख जरूर वाचा.
https://www.maayboli.com/node/50822
तिथे २९९ प्रतिसाद झाले आहेत.
३०० वाह प्रतिसाद द्यायचा मान पटकावू शकता.
हा लेख वाचलेला नाही. सिनेमा
हा लेख वाचलेला नाही. सिनेमा बघितला की वाचेन.
पण मला सई आवडते, म्हणून इकडे आलो
पोस्टरवर सईच्या साडीवर एक लाल
पोस्टरवर सईच्या साडीवर एक लाल डाग आहे कुंकवाचा / रक्ताचा.
त्याचा सिग्निफिकंस काय असेल असा प्रश्न पडला.
<<<< त्याचा सिग्निफिकंस काय
<<<< त्याचा सिग्निफिकंस काय असेल असा प्रश्न पडला.
>>>>>
काही नाहीये...
की काही आहे आणि मी मिस केले..??
बाई दवे,
हा असा पोस्टर दोन फोटो जोडून मी बनवला आहे.
या विकेंड कोणी बघून आला हा चित्रपट तर इथे लिव्हा..
परिक्षण छान लिहिले आहे.
परिक्षण छान लिहिले आहे. चित्रपटगृहात चित्रपट बघण्याची शक्यता कमीच आहे. तुम्ही मराठी चित्रपट थेअटरमध्ये पाहण्याचा विडा उचललायं त्याबद्दल मनापासून अभिनंदन .!
पेपरात रोज मोठ्या कॉलममध्ये जाहिरात असते चित्रपटाची.. पोस्टर लक्ष वेधून घेतेयं..
हा हा.. मराठी चित्रपट बघायचा
हा हा.. मराठी चित्रपट बघायचा नाही तर बघितल्यावर जे चांगले वाटेल ते इतरांपर्यंत पोहोचवायचा विडा म्हणू शकता.
कारण चित्रपट मला थिएटरमध्ये बघायला आवडतातच. शनिवार रविवारी मुले उशीरा उठत असल्याने सकाळचा तो बेस्ट टाईमपास असतो. मराठी चित्रपटांना प्राधान्य देतो इतकेच
छान लिहिले आहे. बघणार आहेच.
छान लिहिले आहे. बघणार आहेच. ट्रेलर आवडलं होतं. यातील दोन गाणी फारच आवडली. रोज झी मराठी वर संध्याकाळी लागत आहेत आणि मी रोजच पाहात आहे. असं वेगळं गाव - फार आवडलं.
मराठी चित्रपट बघायचा नाही तर बघितल्यावर जे चांगले वाटेल ते इतरांपर्यंत पोहोचवायचा विडा म्हणू शकता.
नाही तर आम्हाला कधीकधी कळलेच नसते.
>>> खरंच धन्यवाद यासाठी.
मी फारसे चित्रपट बघत नाही.
मी फारसे चित्रपट बघत नाही. माझ्यावरचा कुणीतरी जाऊन बघा. एकदा स्वतःकरता आणि एकदा माझ्यासाठी.
तेव्हढीच मराठी चित्रपटाला मदत.
हो मी सुद्धा काही गाणी पुन्हा
हो मी सुद्धा काही गाणी पुन्हा पुन्हा ऐकत आहे.
बायकोचा नेहमी टोमणा असतो यावर. पिक्चर बघून आला की माझे आठवडाभर त्याची गाणी सतत ऐकणे होते म्हणून. चित्रपट बघितल्यावर आपण त्या गाण्यातील भावनांशी जास्त रिलेट झालेले असतो त्यामुळे ती वेगळीच हिट करतात.
@ राज अज्ञानी, ओळखीचा कोणीही चित्रपट प्रेमी शोधा ज्याचे बजेट तंग असते. त्याला तिकीट काढून द्या.
मी आपणाला आवाहन केले असे
मी आपणाला आवाहन केले असे आपणास का बरे वाटले/ जर असे वाटलेच आहे तर मग मग आपणच माझ्या वतीने स्वतःच्या पैशाने का बघत नाही? माझे बजेट खूप तंग आहे आणि वेळ पण नाही.
आपण हा जो पण केला आहे तो आमच्यासारख्यांच्या अनेकांच्या वतीने चित्रपट पाहून तडीस न्याल. खरे तर अशा अनेक अनोळखी असहाय्य, दुर्बल प्रेक्षकांच्या वतीने तुम्ही हे कार्य सिद्धीस न्याच. शुभेच्छा!
>>>
>>>
मी आपणाला आवाहन केले असे आपणास का बरे वाटले
>>>>
मी असे समजून ती पोस्ट लिहीलीच नाही.
तुम्ही पब्लिक फोरम वर "कोणीतरी.." असे म्हणत पोस्ट टाकली. मी "एक कोणीतरी" त्यावर व्यक्त झालो
बाकी मला वाटले की पैसे तुम्ही भरणार आहात.
तुमच्या वाक्याचा अर्थ तसाच होतो.
असे मला तरी वाटले
तुमच्या पुढच्या प्रतिसादाला उद्या उत्तर देतो
शुभरात्री
ब्वार!
ब्वार!
महत्वाचा प्रश्न असा असताना झोप लागते हे आश्चर्यकारक आहे. या पवित्र्यामुळे अपेक्षाभंग झाला.
आता या पोस्टवर पुन्हा येणार नाही हे दु:खाने जाहीर करावे लागत आहे.
बघून आलो भीषण सिनेमा आहे
बघून आलो भीषण सिनेमा आहे
जोक्स जेवढे ट्रेलर मध्ये आहेत तितकेच आहेत सगळ्या सिनेमात
हास्यास्पद केविलवाणा विनोद करण्याचा प्रयत्न, ना धड गंभीर ना निखळ विनोदी, अक्षरशः सगळ्यांनी पाट्या टाकल्या आहेत
मकरंद अनासपुरे थोडा वेळ बरा वाटतो, सई ताम्हणकर असहनीय, जितेंद्र जोशीच त्यातल्या त्यात बरा, ओम भूतकर पण करायचं म्हणून काहीतरी करतो
कशाचा कशाला ताळमेळ नाही, बालवाडी लेव्हलचे फार्सीकल विनोद
एकूण 3 मिनिटे जास्तीतजास्त बघावा इतकाच सिनेमा आहे
सरांच्या रिव्ह्यूला फसू नका पैसे वाचवा
अहो विनोद मलाही आवडले नाही
अहो विनोद मलाही आवडले नाही असंच म्हटले आहे. थिएटर मात्र हसत खिदळत होते.
मात्र यातील सई ताम्हणकर बद्दल कोणी निगेटिव्ह बोलत असेल तर त्या मतावर पूर्वग्रह प्रभाव असण्याची शक्यता जास्त. तुमचे तसे असेलच असे नाही. पण इथे बरेच जणांचे तसे आहे हे तिच्यावर वेळोवेळी झालेल्या चर्चेदरम्यान समजले आहे.
खरोखरच सांगा त्या बाईच्या रोल
खरोखरच सांगा त्या बाईच्या रोल ला काय शेंडा ना बुडखा
बर ती मुळात रडणे सोडून काय करते
जो काका अत्याचार करतो तिथेच परत जाऊन रहाते
अगदी मनापासून छातीवर हात ठेवून सांगा की सई ताम्हणकर ने खूप भारी काम केलं आहे यात म्हणून, मग पूर्वग्रह कळतील
सरांच्या रिव्ह्यूला फसू नका
सरांच्या रिव्ह्यूला फसू नका पैसे वाचवा>>>>>> उगाच सर वगैरे बोलुन चढवु नका. फुकट चेकाळेल.
माफ करा, जीं ना सर म्हणतात हे
माफ करा, जीं ना सर म्हणतात हे माहीत नव्हते. अज्ञानातून काही आगळीक झाली असेल तर पोटात घ्या (चूक).
प्रत्येक जेलचे नियम वेगळे. प्रत्येक ठिकाणी एक बॉस असतो. त्याचे हातपाय इतर कैदी चेपून देत असतात. पण तिथे नवीन कैद्यांना सिनीयर कैदी समजावून सांगत असतात. मराठी संकेतस्थळावर असं कुणी सांगत नाही.
पण काहीही असले तरी जेलमधले दादा पण गरीबाला फसवत नाहीत. गरीब लोक भावनिक असतात. मराठी भाषा त्यांच्या मुळेच टिकून आहे. कुणी मराठी पिक्चर बघायचं आवाहन केलं कि बिचारे काहीही जुगाड करून जातात बघायला. मजूर अड्ड्यावरच मायबोली माहिती झाली. इथली आवाहन वाचून मराठी पिक्चर बघितले. पण आता बॅंका सोडा, सोसायटी पण पिक्चर बघायला कर्ज देत नाही. आधीचं कर्ज फेडा म्हणतात.
अशात सरांनी तिकीट घेऊन दुसऱ्याला द्या सांगितले. तो आदेश आहे हे आता लक्षात आले. तो पाळला नाही तर व्हॅन मधून उचलतील म्हणून हा खुलासा.
प्रत्येकाला वरचं किंवा दोन नंबरचं इन्कम नसतं. बेटींग, जुगारात सगळेच जिंकतात असंही नाही. शिवाय भांडवल लागतंच. आमच्या सारख्या गरीबांनी कुठून आणायचं ते? त्यातून पण आठवडाभर दोन शिफ्टस हातगाडी ओढून बघितलाही असता... पण गरीबाची अशी फसवणूक? बंडल पिक्चर बघायला सांगितला?
मराठी पिक्चर चालला तर आनंदच आहे. पण तुमच्या सारख्या वरचं इन्कम असलेल्यांनी मायबोलीकर गरीबांना तिकिटे काढून द्यायला काय हरकत आहे?
<<<<आता या पोस्टवर पुन्हा
<<<<
आता या पोस्टवर पुन्हा येणार नाही हे दु:खाने जाहीर करावे लागत आहे.
Submitted by राज अज्ञानी on 14 June, 2026 - 23:12
>>>>>
आज सकाळी हे वाचले आणि क्षणभर खरेच वाटले होते
<<<
<<<
जो काका अत्याचार करतो तिथेच परत जाऊन रहाते
>>>>
याबद्दल सईला जबाबदार धरावे की पटकथाकार दिग्दर्शक यांना?
मी म्हणालो ना, पूर्वग्रह दूषित मत असण्याची शक्यता आहे.
ती आता वाढली
असो,
याला जबाबदार सई नसून पटकथाकार, दिग्दर्शक असला तरी मलाही चित्रपट बघताना तसेच वाटले हे मात्र प्रामाणिकपणे कबूल करतो.
पण मग त्याच वेळी मनात विचार आला की त्या मुलींमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहायची धमक नसेल तर बिचारी करणार काय? जाणार कुठे? त्यात तिचा काका मोठा गुंडा होता ज्याची एक टोळी सुद्धा होती.. जाऊन जाऊन जाणार कुठे?
आपण आपल्या सुरक्षित आयुष्यात बसून जगाने कसे वागावे याचे सल्ले देणे सोपे असते हे स्वतःलाच जाणवले म्हणून मी ती शंका मनातून काढून टाकली.
सरांचा आदेश पाळला नाही याचा
सरांचा आदेश पाळला नाही याचा खुलासा करावा लागला.
नाहीतर भर रस्त्यात काही झालं तर..
त्या बाईच्या रोल ला काय शेंडा
त्या बाईच्या रोल ला काय शेंडा ना बुडखा>> हे लिहून मग ते पुढचे वाक्य आहे
पण त्यालाही सई कशी जबाबदार?
पण त्यालाही सई कशी जबाबदार?
उलट कॅरेक्टर डेव्हलप न करता तिचे भाव खाऊन जाणे हे extra कमाल आहे.
Pages