दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २१ (अंतिम): फक्त कृतज्ञता!

Submitted by मार्गी on 5 June, 2026 - 10:43

नमस्कार. १२ जानेवारी ते ३१ जानेवारी ह्या २० दिवसांमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" प्रवास झाला. तो ३१ जानेवारीला चेन्नै येथे पूर्ण झाला. आपला देश खूप वेगळ्या प्रकारे अनुभवता आला आणि आपल्या देशबांधवांना भेटता आलं. चेन्नैमध्ये हा प्रवास थांबवताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. आणि कोणत्याच प्रकारे ही एखादी अचिव्हमेंट आहे असं वाटत नाही. सायकलिंगची आवड, त्यासाठीचं मार्गदर्शन, तयारी, निसर्गाने दिलेली क्षमता, निरामय सदस्यांची मदत, प्रवासासाठीची मदत अशा गोष्टी सगळ्या बाहेरून आल्या व मी त्या फक्त माझ्यामध्ये साकार होताना बघितल्या. प्रत्येकाला निसर्गाने दिलेली ही क्षमता असते. मी फक्त एक उदाहरण समोर‌ ठेवू शकलो. त्याची जाणीव ही राईड पूर्ण करताना आहे.

(माझा ब्लॉग. सायकल अनुभवांविषयी संवाद. )


.

.

.

.

३१ जानेवारीला माझी बहिण- अदितीच्या घरी थांबलो. अदिती आणि शौनकजींशी गप्पा झाल्या. १ फेब्रुवारीला जवळच्याच कोटीवक्कम बीचवर वॉक केला. नंतर सायकलच्या पॅनिअर सॅकमधून सगळं सामान बाहेर काढलं. तेव्हा कळालं की, अरे इतके कपडे आणि इतकं सामान त्यात होतं! ही पॅनिअर सॅक माझी सायकलिस्ट मैत्रीण स्मिताने दिली होती. १ फेब्रुवारीच्या संध्याकाळी निरामयच्या टीमसोबत गूगल मीटद्वारे संवाद झाला. सायकलिंग पूर्ण झाल्यानंतरची प्रतिक्रिया, वाटेतल्या संस्थांचे मुख्य अनुभव हे सगळं तिथे बोलता आलं.

सायकलिंगच्या ह्या उपक्रमातलं संचित अजून समोर यावं म्हणून अदितीने मला अनेक प्रश्न विचारले. योगाचा एक अर्थ जोडणे, असा आहे. ह्या पूर्ण प्रवासाच्या प्रक्रियेत आपण लोकांशी कसे जोडलेले असतो हे अनुभवता आलं. योगाच्या दृष्टीने सर्व जग एक ऑरगॅनिक अस्तित्व आहे. सगळे एकमेकांसोबत जोडलेले आहेतच. ती गोष्ट ह्या प्रवासात अनुभवता आली. एकाच कुटुंबातल्या पण अंतराने आणि संपर्क नसल्याने दुरावलेल्या कुटुंबियांना भेटता आलं. मला वाटतं अशा भेटी, हा संवाद ह्या उपक्रमामधील एक महत्त्वाचा भाग ठरला. त्याशिवाय दक्षिण भारतातल्या अनेक प्रसिद्ध आणि उत्तम काम करणार्‍या योग संस्थांचं काम बघता आलं. चिन्मय मिशन असेल, ईशा आदि योगी असेल, विवेकानंद केंद्र, अमृतापुरी आश्रम, अरविंद आश्रम, रामकृष्ण मठ किंवा थिऑसॉफिकल सोसायटी. त्यांची वेगवेगळी कार्यपद्धती, स्वरूप, तिथे चालणारे उपक्रम अशा गोष्टी बघता आल्या आणि त्यामध्ये समान असलेलं योगाचं सूत्रही अनुभवता आलं.

एक उद्दिष्ट दक्षिण भारताचा असाधारण वारसा अनुभवणं, तो समजून घेणं हेसुद्धा होतं. तंजावुर, कुंभकोणम, थिरूअनंतपूरम आणि रामेश्वरम अशा ठिकाणी त्या गोष्टी अनुभवता आल्या. शिवाय ह्या भागांमध्ये चौल, पांड्य, नायक अशा पूर्वीच्या राजवंशांच्या काळातील अविश्वसनीय वास्तु आणि नगर रचनेची ओळख करून घेता आली. आज ह्या राजवटींचा ठसा आपल्याला अगदी पूर्व आशियापर्यंत दिसतो. त्याचं एक मुख्य केंद्र बघता आलं. कलेसाठी आणि उपासनेसाठी इतकी प्रचंड निर्मिती करणारी ती संस्कृती किती प्रगत असेल, हा प्रश्न पडला.

दक्षिण भारतात आज वेगवेगळे पंथ, वेगवेगळ्या चालीरिती आणि आधुनिक जीवनशैली असं मिश्रण दिसतं. कदाचित काही जणांना वाटेल की, हे आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जाणं नाही का. पण मला असं वाटलं की, उपासना पंथाचं नाव किंवा लेबल बदललं असलं किंवा बाह्य फरक दिसत असले तरी त्यातले मूल्य आणि त्याचं सार अजूनही टिकून आहे. आत्मीयता, मेहनत करण्याची वृत्ती, शिस्त, एकमेकांसोबत बांधिलकी ह्या गोष्टी तर जाणवत होत्याच. पण त्याबरोबर सण- उत्सवांमध्ये एकत्र येण्याची भावना, उत्साह, रांगोळ्या, सुगंधी धूप, संगीत अशा गोष्टी आहेतच. शिवाय जेवणासाठी केळीचं पान, साग्रसंगीत स्वयंपाक, स्थानिक पातळीवर बनणारे विविध पदार्थ अशी परंपरा अजूनही टिकून आहे.

अदितीने मला एक प्रश्न खूप छान विचारला. तो म्हणजे ह्या सायकल प्रवासानंतर तू काय मागे ठेवशील आणि काय नेहमी सोबत ठेवशील? त्याबद्दल मला असं वाटलं की, ह्या प्रवासातले अंतरं- किलोमीटरचे आकडे किंवा टप्पे हे मी बाजूला ठेवून देईन. आणि फक्त आणि फक्त कृतज्ञता सदैव सोबत ठेवेन. इतकं काही मला ह्या प्रवासात मिळालं. लोकांची मदत, निसर्गाची सोबत आणि माझ्या सायकलचीसुद्धा साथ मिळाली. जीवन खूप वेगळ्या प्रकारे जगता आलं. ती कृतज्ञता नेहमी सोबत राहील. घरातूनही सगळ्यांनी साथ दिली. आई- बाबा, बायको- मुलगी आणि इतर. अगदी क्लाएंटससुद्धा. त्यांच्यामुळेच हे सगळं इतकं करता आलं.

ह्या सायकल प्रवासात फिरण्याचा खूप वेगळा अनुभव मला घेता आला. एक प्रकारची निसर्ग तीर्थयात्रा. एक प्रकारचा निसर्ग सत्संग. जेव्हा आपण प्रचंड असा समुद्र बघतो, उत्तुंग पर्वत बघतो तेव्हा आपल्या आतमध्ये असलेल्या उच्च तत्त्वाला साद घातली जाते. आपल्यात असलेल्या विराट तत्त्वालाही साद घातली जाते. आणि अर्थातच ह्या पूर्ण प्रवासात मला भेटलेले विविध स्वामीजी, संन्यासी आणि साधक. त्यामुळे मनामध्ये फक्त आणि फक्त कृतज्ञताच येते.

अजून एक गोष्ट मला जाणवली की, जी प्रत्येक स्थितीमध्ये महत्त्वाची असते. ती म्हणजे समर्पण. केवळ संकल्प करून गोष्टी होत नाहीत. संकल्पाबरोबर समर्पणही आवश्यक असतं. ऑगस्टमध्ये व्हायरल फीवरमुळे बंगलोरला जाऊन एकही पेडल न मारू शकता परत यावं लागलं होतं. ह्यावेळी अगदी निघेपर्यंत ती शंका मनात होती. जानेवारीत राईडसाठी निघताना संकल्प होताच. माझ्या बाजूने तयारी होती, पण ही जाणीवसुद्धा होती की, केवळ माझ्या तयारीने हे होणार नाही. जीवनाचीसुद्धा तशी इच्छा असली तरच तसा प्रवास होईल.त्यासाठी मी मनोमन समर्पण केलं होतं. मनामध्ये ही जाणीव होती.

असा हा प्रवास तर २० दिवसांमध्येच झाला, पण त्याचे अनुभव लिहायला मात्र पुढचे पाच महिने लागले! त्यावरून तुम्हांला कळेल की, सोपं काय आहे आणि अवघड काय आहे! पण हे अनुभव इतके वेगळे होते की, ते लिहून त्यामधली प्रक्रिया व संचित लोकांसोबत शेअर करणं हे अपरिहार्यच होतं. आणि ते मी करू शकलो ह्याचा नक्कीच मला आनंद आहे.

दोन दिवस चेन्नैमध्ये बहिणीकडे राहिलो. बंगलोरला सायकल नेली तेव्हा बसमधून नेली होती. आता चेन्नैवरून परत बंगलोरला बसने आणायची व बंगलोरवरून बसने पुण्याला आणायची असा एक पर्याय होता. पण हा प्रवास मोठा होता. ट्रेनने सायकल आणता येते- तिचे चाक आणि मुख्य भाग वेगळे केले की, अशी डिसमँटल केलेली सायकल ट्रेनमध्ये सीटच्या खाली बसून जाते. पण त्यासाठी‌ एक पिशवी लागते! ह्यावर अदिती आणि शौनकजींनी उपाय शोधला. सायकल ठेवण्यासाठी एक DIY पिशवी बनवली! टर्पोलिनची शीट त्यांनी आणली आणि त्याला पट्ट्या लावून सायकल ठेवण्यासाठीची एक तात्पुरती पिशवी बनवली. सायकल डिसमँटल केल्यावर अशा पिशवीमध्ये मावली! तत्काळचं ट्रेनचं तिकिटही शौनकजींनी मिळवून दिलं! ट्रेनमध्ये डब्यात सायकल ठेवताना थोडी अडचण आली, पण सह- प्रवाशांनी सहकार्य केल्यामुळे काही त्रास झाला नाही! बंगलोरला न जावं लागता थेट पुण्यात आलो.


.

.

.

पुणे स्टेशनवर आल्यावरही निरामय पुणे टीमचे सदस्य स्वागतासाठी आले! हेलसकर मॅडम, कारेगांवकर सर आणि बाबा. खूप भावुक करणारे क्षण ते होते. सगळ्यांना वाटलं की, मी काही तरी अवघड काम केलं आहे. माझा अर्थात् तो गैरसमज होत नव्हता. हे सगळे करू शकतात, पण आपल्याकडे फार लोक असे करत नाहीत आणि त्यामुळे हे फार अवघड आहे, असा आपला समज होतो. घरी पोहचल्यावर मुलीने "वेलकम बेस्ट फादर" असं दारावर लिहीलं होतं! तीसुद्धा नकाशात माझा प्रवास बघत होती.

पुण्यामध्ये निरामय टीमने अनुभव कथनाचा कार्यक्रम ठेवला. तिथेसुद्धा हे अनुभव शेअर करता आले. निरामय टीममधल्या हेलसकर मॅडम, अर्चनाताई जाधव, श्रीधरजी कारेगांवकर आणि इतरांनी पूर्ण नियोजन व प्रवासात खूप मदत केली. विशेषत: अर्चनाताई आणि श्रीधरजींना मी थोडा जास्त त्रास दिला.

चिन्मय मिशनचे स्वामी सुंदरजी चैतन्य ह्या प्रवासामध्ये सदैव सोबत होते. जिथे कुठे अडचण होती, तिथे ते मदत करत होते. इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशनच्या ऍकेडेमिक डायरेक्टर डॉ. गौरी माहुलीकर मॅडमनीसुद्धा सुरूवातीपासून खूप मदत केली. त्यांनीच केरळमध्ये अनेकांशी जोडून दिलं. मी तिथे असताना त्या प्रवासात होत्या, त्यामुळे त्यांची भेट राहून गेली होती. पण आल्यानंतर लवकरच त्या पुण्याला आल्या होत्या. तेव्हा त्यांची छान भेट झाली. त्यांनी खूप कौतुक केलं आणि प्रोत्साहन दिलं. गंमत म्हणजे माझ्या वहिनीची आणि त्यांची जुनी ओळख. त्यांची ह्या निमित्ताने अनेक वर्षांनी भेट झाली. Yoga reconnects!

त्या त्या ठिकाणी मदत करणार्‍या व्यक्तींबद्दलही कृतज्ञता मनात आहे. त्याशिवाय प्रवासाच्या उत्तरार्धामध्ये सेवा भारती तमिळ नाडूचे शुण्मुगा राजा जी, सिद्धार्थजी, केशवनजी आणि श्री. विजय राजमोहनजी ह्यांनी खूप मदत केली. ह्या सगळ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

पुढच्या सायकल प्रवासाची इच्छा नक्की आहे. तो लगेच करणार नाही. पण येत्या काही वर्षांमध्ये करू शकतो. एक सायकल दौरा ईशान्य भारत- नॉर्थ ईस्टमध्ये असेल आणि एक सायकल दौरा लदाख़मध्ये असेल. सध्या तरी हे स्वप्न आहे. बघूया कसं होतं.

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 5 जून 2026.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाली मालीका.
पण "त्यावरून तुम्हांला कळेल की, सोपं काय आहे आणि अवघड काय आहे " ह्याचा प्रताधिकार माझ्याकडे आहे. तुला परवानगी नाही. Proud

सुरेख झालीय लेखमाला!!!!!
जमिनीवर पाय असलेल्या मात्र खूप उत्तुंग काहीतरी ध्येय ठेवून प्राप्त करणाऱ्या अत्यंत मोजक्या व्यक्तींपैकी एक आहात.

आज संपूर्ण लेखमाला वाचुन झाली. प्रत्येक लेख अणि छायाचित्र छान आहेत. खरच तुमच फार कौतुक वाटत. मुळातच दक्षिण भारत फिरणे खूप आवडीचं आहे. छोट्या छोट्या गावातील प्रवासात तर फार मजा वाटतेच. तुमच लिखाण प्रेरणादायी आहे. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.

@ हर्पेन/ पप्पाजी ओह! Happy

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.

@ झकासराव जी, असं काही नाही हो. सहज जमेल व आवडेल ते करत असतो. धन्यवाद shubhadap जी.