सत्यमेव जयते ही सिरिज साधारण २०१२ मध्ये प्रसारीत व्हायला सुरवात झाली. त्यात काही भाग शेतीसंबंधी होते. त्यात एक होता महाराष्ट्राच्या काही दुष्काळग्रस्त जिल्ह्यातली पाणीटंचाई आणि एक होता पिकांवरील किटकनाशकांमुळे शेतकर्यांमध्ये वाढलेले कर्करोगाचे प्रमाण.
कार्यक्रमाचा निर्माता आमिर खान याची या निमित्ताने शेतीविषयक प्रश्नांशी ओळख झाली.
२०१५ मध्ये ग्रामीण महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. मी ग्रामीण महाराष्ट्र मुद्दाम यासाठी लिहिले की शहरी महाराष्ट्राला या दुष्काळाशी फारसे देणे घेणे नव्हते. त्यांना पाणी व्यवस्थित मिळत होते. मी तेव्हा मुंबैत राहात होते आणि दुष्काळ पडलाय हे केवळ बातम्यातुन कळत होते. बाकी आयुष्यात काही फरक पडला नाही. नळाला चोवीस तास पाणी होते.
ग्रामीण महाराष्ट्रात परिस्थिती इतकी वाईट झाली होती की मुलांनी शाळांना रामराम ठोकुन आईसोबत पाण्याच्या शोधार्थ वणवण सुरु केली. गावेच्या गावे जीव वाचवायला शहरात आली, मागे घरे व गुरे सोडुन.
सत्यमेव जयते पाहुन कित्येक लोक प्रेरित होऊन सामाजिक क्षेत्रात काम करत होते. त्यापासुन प्रेरणा घेऊन सत्यमेव जयतेच्या टिमलाही वाटायला लागले की आपणही एखादा मोठा प्रश्न घेऊन त्यावर काम करावे. ह्या दुष्काळाने त्यांना दिशा दिली.
दुष्काळ नेमका पडतो का या प्रश्नाचे सोप्पे उत्तर पाऊस पडत नाही हे आहे. पण आमिरची टिम जेव्हा महाराष्ट्रात फिरली तेव्हा लक्षात आले की काही गावे उदा. राळेगण सिद्धी, हिवरे बाजार, जाखणगाव, मसवंडी वगैरे ह्या दुष्काळातही हिरवीगार आहेत. त्या गावांच्या आजुबाजुची गावे मात्र वैराण वाळवंटे झालेली आहेत. पाऊस दोन्ही ठिकाणी सारखाच, मग हा फरक कसा काय?
तर ह्या गावात आणि इतर गावांत एकच फरक होता. ह्या गावांमध्ये लोकांनी आपापसातले भेदभाव विसरुन एकत्र येऊन पाणी वाचवायचे प्रयत्न केले, पावसाचा प्रत्येक थेंब वाचवला आणि जमिनीत मुरवला. आजुबाजुचे गाव टँकरवर जगत असताना ही गावे वर्षाला तिन तिन पिके घेत होती.
म्हणजेच पाऊस पडत नाही किंवा कमी पडतोय हा मुख्य प्रश्न नाहीय तर पडलेला पाऊस आपण साठवतच नाही हा मुख्य प्रश्न आहे हे टिमच्या लक्षात आले. पडलेले सगळे पाणी जमिनीवरुन वाहुन समुद्रात जाते, जमिनीच्या पोटात एक थेंबही जात नाही आणि पाऊस पडायचा थांबला की परत सगळा रखरखाट होतो.
प्रश्न तर सापडला, आता याचे उत्तर काय? तर जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबवुन हा प्रश्न सहज सोडवता येईल हे तज्ज्ञांचे मत पडले.
पण ह्या योजना राबवायच्या कोणी? आणि याला लागणारे मनुष्यबळ आणायचे कोठुन? ‘अर्थातच सरकारने’ हे उत्तर आपण लगेच देणार. सरकारने केले असते तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता
सरकारी काम ज्या वेगाने चालते ते पाहता उत्तर माहित असुनही त्याची अंमलबजावणी भविष्यात कधीतरी होईल याची वाट पाहात बसावे लागणार हे टिमच्या लक्षात आले.
ह्या प्रश्नाची सर्वाधिक झळ ज्यांना बसते त्यांनाच जर अंमलबजावणीच्या कामाला बसवले तर काम वेगाने होईल ही अटकळ बांधुन सत्यमेव जयते टिमने २०१६ ला पानी फाऊण्डेशनची स्थापना केली आणि वॉटर कप स्पर्धेची घोषणा केली.
काय होती ही वॉटर कप स्पर्धा?
लोकांनी एकत्र येऊन श्रमदानाच्या माध्यमातुन जलसंधारणाची स्ट्रक्चर्स पावसाळ्याच्या सुरवातीला उभी करायची. पाऊस पडला की ही स्ट्रक्चर्स त्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणार. हे मुरवलेले पाणी भुजलाची पातळी वाढवणार व त्यायोगे तळ्यांना व विहिरींना पाणी लाभणार आणि दुष्काळ दुर होणार ही इतकी सोपी कल्पना. ह्यात सर्वाधिक यश जे गाव मिळवेल ते विजेते.
ही स्ट्रक्चर्स म्हणजे काय? तर पाणी अडवण्यासाठी नवे बंधारे बांधायचे, पाणी जमिनीत मुरवण्यासाठी खड्डे मारायचे, खंदक
खोदायचे, तळी, नदी, नाले वगैरे गाळ काढुन साफ करायचे. हे सगळे पावसाळ्याआधी करुन पावसाची वाट पाहात बसायचे.
आणि हे सगळे शाश्वत असायला हवे. यंदाच्या पावसापुरते केले आणि पुढच्या वर्षी परत पाणीटंचाई असे व्हायला नको.
आणि स्पर्धा का? तर स्पर्धा एक ईर्षा निर्माण करते. ह्या ईर्षेतुन आपले काम सर्वोत्तम व्हायला हवे ही जिद्द मनात स्फुरते. आणि जर बक्षिसाची रक्कम मोठी असेल तर त्या जिद्दीला डबल ईन्जिनाची ताकद लाभते. 
तर अशा तर्हेने वॉटर कप स्पर्धा घोषित झाली. काम तर करायचे पण काय काम करायचे हे कोण सांगणार? प्रत्येक गावातुन स्वयंसेवक उर्फ जलदुत निवडले गेले, ह्या जलदुतांना फाउंडेशनतर्फे शास्त्रशुद्ध पद्धतीने जलसंधारणा कशी करायची आणि लोकाना एकत्रित घेऊन कामे कशी करुन घ्यायची याचे प्रशिक्षण दिले.
हे जलदुत गावात परत गेल्यावर गावाला एकत्र आणायचे कठिण काम त्यांना करायचे होते. भारतीय जनतेच्या निगेटिवीटीवर व आपापसातील मतभेदांवर मात करुन हे काम करायचे म्हणजे शिवधनुष्य पेलणेच होते. पण जलदुतांनी हे कठिण काम केले.
२०१६ साली स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा फक्त ३ तालुक्यांनी व त्यातल्या ११६ गावांनी या स्पर्धेत भाग घेतला. यात सातारा, बीड व अमरावती ह्या तिन जिल्ह्यांमधले कोरेगाव, अंबेजोगाई व वरुड हे तिन तालुके होते. सातार्यातल्या वेळु गावाने ७५ लाखांचे पहिले पारितोषिक पटकावले.
२०१७ मध्ये ३० तालुके व १३२१ गावे यात सामिल झाली. या वर्षी वर्धा जिल्ह्यातील काकडदरा गावाने पहिला नंबर पटकावला.
२०१८ मध्ये ७५ तालुके व ४०२५ गावात स्पर्धा झाली.
सातार्यातले टाकेवाडी गाव पहिले आले.
कपाच्या शेवटच्या वर्षी ७६ तालुके व ४७०६गावे यात होती. ह्या वर्षी सोलापुरातील सुर्डी गावाने बाजी मारली.
चार वर्षात या गावांनी मिळुन ५५० बिलियन लिटर पाणी भुगर्भात मुरवले असावे हा अंदाज. कारण एवढे पाणी मुरेल
इतके बंधारे व खड्डे बांधले गेले!!
कोकण वगळता बाकी मराठवाडा, विदर्भ, उत्तर व पश्चिम
महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि याचा परिणाम ती सगळी गावे सुजलाम सुफलाम होण्यात झाला.
या गावांचा पाणी प्रश्न कायमचा मिटला हे बक्षिस सगळ्यात मोठे होते.
२०१९ हे स्पर्धेचे शेवटचे वर्ष होते. यानंतर ही स्पर्धा थांबवण्यात आली कारण पाण्यासंबंधी जनजागृती, जलसंधारणाची माहिती, उपाय व कायमस्वरुपी कामे ही स्पर्धेची उद्धिष्ट्ये पुर्ण झाली होती.
https://paanifoundation.in/satyamev-jayate-water-cup/
पाण्याची मुबलक उपलब्धता असणे ही शेतकर्याची मुलभुत गरज आहे. ही गरज भागल्यावर शेतकरी काय करणार? तर अर्थातच शेती. शेतीचा विषय आल्यावर शेतीत असलेले अक्राळविक्राळ प्रश्न टिमला दिसायला लागले. आधीचा अनुभव होताच. तर आता ह्या प्रश्नाला तोंड कसे द्यायचे याची चाचपणी सुरु झाली.
क्रमशः
अरे वा. रोचक आहे हे. केवढी
अरे वा. रोचक आहे हे. केवढी लीडरशिप लागत असेल.
रोचक, वाचतोय.
रोचक, वाचतोय.
छान लेख. पाणी फाउंडेशन चे काम
छान लेख. पाणी फाउंडेशन चे काम छानच वाटते आहे.
छान होणार ही लेखमाला. २०१६ ते
छान होणार ही लेखमाला. २०१६ ते २०१९ या कालखंडात मला जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये सरकारी बाजूने काम करण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने पाणी फाऊंडेशन च्या टीम बरोबर पण काम करायला मिळाले. माझा रोल म्हणजे नकाशाच्या आधारे कुठे कुठे ही structures बांधायची, कोणती आणि किती अंतराने ते ठरवण्याचा
अरे वा मनिम्याउ!
अरे वा मनिम्याउ!
अरे वा मनीमाउ, छानच. अजुन
अरे वा मनीमाउ, छानच. अजुन तपशिलात लिही ना. पानी फाऊण्डेशनच्या टिमसोबतचे अनुभव पण जमले तर लिही. खुप
मस्त, चार्ज्ड अप टिम आहे.
वाचतेय..
वाचतेय..
अरे वा मनीमाउ, छानच. अजुन तपशिलात लिही ना>>>+१
खूपच प्रेरणादायी आहे ही चळवळ.
खूपच प्रेरणादायी आहे ही चळवळ. पानी फाउंडेशन बद्दल थोडी माहिती होती, पण फर्स्ट हँड अनुभव वाचायला मस्त वाटेल.
मी खूप सुरूवातीपासून पानी
मी खूप सुरूवातीपासून पानी फाउंडेशन च्या कामाचा मागोवा घेत आहे. मला फार कौतुक आणि आदर आहे त्यांच्या कामाविषयी.
ही मालिका वाचण्यास उत्सुक आहे!
छान होणार ही लेखमाला.
छान होणार ही लेखमाला. साधनाचे लेखांचे विषय उत्सुकता निर्माण करणारे असतातच आणि लेखही खूप माहितीपूर्ण आणि सोप्या छान भाषेत लिहिलेले असतात.
मनिम्याऊ तुम्हीही लिहा तुमचे अनुभव.
छान लेख आणि पाणी फाउण्डेशनचे
छान लेख आणि पाणी फाउण्डेशनचे कामही! पुढे वाचायला आवडेल. मनिम्याऊ, तुम्हीही लिहा जमेल तसे.
रोचक तर आहेच, पण शेतीबद्दल
रोचक तर आहेच, पण शेतीबद्दल आणि ग्रामीण भागाबद्दल असं सकारात्मक वाचायला आवडलं. पुभाप्र.
सध्या महाराष्ट्रात शेतीत
सध्या महाराष्ट्रात शेतीत प्रचंड सकारात्मक गोष्टी घडताहेत आणि कामे होताहेत.
सगळ्यांनी उत्सुकता दाखवली
सगळ्यांनी उत्सुकता दाखवली त्याबद्दल धन्यवाद. ही लेखमाला साधना ताईची आहे. पाणी फाऊंडेशनच्या कामा विषयी, त्यात मी माझे ठिगळ जोडणे बरे न्हवे.
शिवाय माझी बाजू सरकारी. साध्या साध्या गोष्टींसाठी कासवाच्या गतीने चालणारा कारभार ( जलयुक्त शिवार याला अपवाद). . ताईची लेखमाला होऊ द्या. मी मला अनुभवाला आलेल्या गमती जमती सांगेन मग.
वाह वाह
वाह वाह
प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध लिखाण वाचायला मिळणार !
पाणी फाउण्डेशनचे काम पहिल्या पासून फॉलॉ करत आलो आहे. एक दोन वेळा श्रमदानासाठी स्वयंसेवक म्हणूनही गेलो आहे.
मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे आमीर खानने त्याच्या परफेक्शनिस्ट ह्या लौकीकाला साजेश्या प्रकारे भरपूर अभ्यास करून सत्यमेव जयते मधल्या अनेक सामाजीक कार्यक्षेत्रातून प्रत्यक्ष काम करण्यासाठी " शेती आणि पाणी" हा विषय निवडला. एका दगडात अनेक पक्षी.
आमिर खान ची एक मुलाखत बघीतली होती त्यामधे तो सांगतो की केवळ आर्थिक मदत वाटणे हे पाणी फाऊंडेशनचे ध्येय नसून , गावकऱ्यांना शिक्षित करणे आणि सक्षम करणे हे आहे. ही संस्था स्थानिक समुदायांना शास्त्रीय पाणलोट व्यवस्थापन (उदा. बंधारे बांधणे, समोच्च चर खोदणे इत्यादी) आणि सामुदायिक नेतृत्वाचे प्रशिक्षण देते, जेणेकरून ते स्वतःच्या पर्यावरणाची जबाबदारी घेऊ शकतील. त्याची अंतिम दृष्टी या संस्थेला कालबाह्य करण्याची आहे, म्हणजेच गावे इतकी स्वयंपूर्ण व्हावीत की त्यांना त्यांच्या जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्यासाठी बाह्य मदतीची गरज भासू नये.
मी आधी बघीतली ती मुलाखत मला आत्ता लगेच सापडली नाही, जी सापडली ती खाली देतोय.
https://youtu.be/HPtKnW9QjgQ?si=wNcvFYlW5LBG04r4
पुभाप्र
खूप छान माहिती.
खूप छान माहिती.
खूप छान काम आहे पाणी फौंडेशनचे.
आमिर खान ची एक मुलाखत बघीतली
आमिर खान ची एक मुलाखत बघीतली होती त्यामधे तो सांगतो की केवळ आर्थिक मदत वाटणे हे पाणी फाऊंडेशनचे ध्येय नसून , गावकऱ्यांना शिक्षित करणे आणि सक्षम करणे हे आहे. >>>
हो. फाऊंडेशनने एकाही गावाला एका पैश्याचीही मदत केलेली नाही. यंत्रसामग्री व तज्ज्ञ दिले पण जे काम गावकर्यांनी केले ते रोजंदारीवर नाही तर श्रमदानाने केले. फुकट काही मिळाले की त्याची किंमत शुन्य होते. गावकर्यांनी स्वकष्टाने पाणी मिळवले आणि त्याचे त्यांना खुप अप्रुप आहे
भारी आहे हे. वाचण्यास उत्सुक.
भारी आहे हे. वाचण्यास उत्सुक. छान लिहीत आहात आपण.
आमिर खानचे यासंदर्भात फार कौतुक वाटते. इतरांसोबत त्यानेही जे काम केले ते तुमच्या लेखाच्या निमित्ताने समजेलच, पण अश्या एखाद्या सेलिब्रेटीचे नाव जोडले गेले असल्याचा फायदा झाला असावा. मलाही वॉटर कप स्पर्धाबद्दल त्याच्यामुळेच समजले होते. त्यांचे कार्यक्रम बघणे झाले होते. अन्यथा शहरी महाराष्ट्राला फार फरक नाही हे दुर्दैवाने खरेच आहे.
खूपच प्रेरणादायी आहे ही चळवळ.
खूपच प्रेरणादायी आहे ही चळवळ. पानी फाउंडेशन बद्दल थोडी माहिती होती, पण फर्स्ट हँड अनुभव वाचायला मस्त वाटेल. >>>>+9999
गावकर्यांनी स्वकष्टाने पाणी
गावकर्यांनी स्वकष्टाने पाणी मिळवले आणि त्याचे त्यांना खुप अप्रुप आहे >>
आमीर ने / सत्यमेव जयते च्या टीमने पाण्याकरता काम करणार्या जुन्या संस्थांकडून देखील भरपूर माहीती मिळवली आणि त्यातून तो जे शिकला ते हेच की कितीही चांगली गोष्ट बाहेरच्या कोणीतरी सांगीतलेली / येऊन केलेली / आयती मिळालेली असली की त्याचे महत्व / किंमत राहत नाही. त्यामुळे फुकट काही द्यायचे नीही आणि लोक सहभाग असलाच पाहीजे अशीच चळवळ / योजना सुरु करायची.
आज किती योग्य ठरलाय हा विचार हे दिसतेच आहे.
मला त्याची ती मुलाखत मुळातूनच ऐकण्याजोगी आहे. मला सापडत नाहीये . कोणाला मिळाली तर त्याची लिंक नाकी द्या.
पानी चे यु ट्युब चॅन्र्ल.
पानी चे यु ट्युब चॅन्र्ल. इथे रोजच्या शेतीशाळाही पाहता येतील.
https://youtube.com/@paanifoundation?si=DY7M08DQaUJqJ487
आमिर खान त्याचे विचार मांडताना
https://youtu.be/ffawEFR2_Pc?si=lKDpy0hatfdh4ngj
टिम
https://youtu.be/qXwzaPtCJsI?si=VuoQYidkXYtoTf4Y
धन्यवाद साधना
धन्यवाद साधना