तुला ते आठवेल का सारे ….. सुमनताई...... तुम्ही नक्कीच आठवणीत रहाल

Submitted by रेव्यु on 3 June, 2026 - 03:13

तुला ते आठवेल का सारे ….. (कुणी तरी अनामिकाने खूप सुंदर लिहिलय हे)
हे गाणं सुरु होतं ते सतारीच्या एकामागून एक सुट्या-सुट्या वाजवल्रेल्या सुरांनी. त्यांतून निर्माण झालेल्या सुरावटीची पूर्तता होते ती आल्हाददायक जलतरंगाने, आणि पाठोपाठ सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजातला काळीज कातरणारा प्रश्न कानावर पडतो: ‘तुला ते आठवेल का सारे’.
हा प्रश्न विचारणा-या युवतीच्या आठवणीतलं हे ‘ते सारे’ म्हणजे नेमकं काय हा विचार मनात येतोय, आणि ‘सारे’ म्हणजे बरंच काही घडून गेलेलं दिसतंय एवढं जाणवतंय, तोच त्याचा पोत सांगणारे शब्द येतात:
‘दवात भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे’.
हळवेपणाची सांगड जुईशी, आणि ती जुईदेखील कशी, तर ‘दवात भिजलेली’!
गोळीबंद पाकासारखी, धनुष्याच्या टणत्कारासारखी, अर्जुनाच्या लक्ष्यभेदासारखी नेमकी आणि भाव पोहोचवणारी ही शब्दांची किमया मंगेश पाडगावकरांची.
तुझ्या करातील मोरपीस ते
अजून गालावरुनी फिरते
बनातुनी केतकीच्या येती
सुगंध शिंपीत वारे
या ओळी कितीतरी आठवणी घेऊन आल्या! शाळेत असताना पुस्तकाच्या पानांत पिसं आणि चांद्या ठेवण्याचं लागलेलं वेड आठवलं, आणि . ‘केतकी’ म्हणजे नेमकी कोणती वनस्पती, जीवशास्त्रात कधी अभ्यासलीच नाही का, ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ असंही एक गाणं आहे खरं, केतकीचं बन पाहायचं अजून राहिलंच आहे – कुठे बरं मिळेल पाहायला, असे विचार झरझर येत असतानाच, ‘वारे’ शब्दातल्या ‘वा’वरची स्वरांची वेलबुट्टी ‘रे’वर घेऊन गेली, आणि मनात ’आहा’ उमटला. तिथे पोहोचल्याची जणू पावतीच ‘रे’नंतरच्या जलतरंगाच्या सुराने दिली, आणि समेपाशी भान आलं.

दोन कडव्यांना जोडणारा बासरीचा अप्रतिम तुकडा वाजला. पुढचं कडवं सुरु झालं:
त्या तरुवेली, तो सुमन-परिमळ
ऐकताना आसमंतात दरवळ पसरल्याचा भास झाला. आणि पुन्हा एकदा काळीज हलवणारा बासरीचा आणखी एक मखमली तुकडा वाजला.
त्या तरुवेली, तो सुमन-परिमळ
झ-यातली चांदीची झुळझुळ

झ-याच्या पाण्यावर पडलेला प्रकाश पाण्याच्या प्रवाहीपणामुळे कसा चमचमणा-या चांदीचा आभास निर्माण करतो! जेव्हा कवीचं शब्दवैभव आणि दृष्टी लाभते तेव्हा ‘उजेडात वाहणारं झ-याचं पाणी’ हे नुसतं तसं, आणि तितकं गद्य, न राहता ‘चांदीची झुळझुळ’ कशी होतं, याचा विस्मय वाटत राहिला! आणि मागोमाग प्रश्न आला:
आठवणींच्या चिंचा गाभुळ
रुचतील काय तुला रे?
आठवणींना उपमा कशाची, तर गाभुळ चिंचांची! हाय, मैं मर गया! आणि पुन्हा एकदा कडवं संपवताना ‘ला’वर वेलबुट्टी करुन ‘रे’वर पोहोचणं – घाव अगदी वर्मीच बसला पाहिजे. पुन्हा एकदा ‘रे’पाठोपाठ ‘टण्ण’ करुन आलेला जलतरंगाचा सूर; जणू काही शेवटचा खिळा, पण हळुवार हाताने शरसंधान.

शेवटचं कडवं. ती सांगतेय:

ते सारे मी हृदयी जपते
उगीच लाजते, उगीच हसते
हृदयामधल्या देवासाठी हवेत का देव्हारे?

‘देव्हारे’ शब्दाची मोडतोड होऊ नये म्हणून या वेळी कडव्याअखेरची वेलबुट्टी ’व्हा’ऐवजी ‘रे’वरती. शेवटच्या ओळीत नेमका प्रश्न; निरुत्तर करणारा.

गाणं संपलं. मी काही काळ स्तब्ध. नंतर प्रतिक्षिप्त क्रियेसारखा हात पुन्हा ‘प्ले’च्या बटनावर टेकला. लागोपाठ ३ वेळा गाणं ऐकलं. मग थांबलो. ‘डोळयांच्या कडा ओलसर झाल्या आहेत का?’ असा विचार डोक्यात. ऐकणा-याला सांगणा-याच्या भावनांची अनुभूती देणारे समर्थ शब्द लिहिणा-या पाडगावकरांना मनोमन सलाम केला. त्या शब्दांमधला भाव आर्तपणे व्यक्त करणारी सुंदर चाल दिल्याबद्दल विश्वनाथ मोरे यांचे आभार कसे मानायचे, आणि किती, असा प्रश्न पडला.

हे गाणं आपल्याला आवडतं ते स्मरणरंजनामुळे, की पुन:प्रत्ययामुळे; काव्यामुळे की उत्कृष्ट संगीतामुळे; का अन्य काही कारणामुळे? या गाण्याचं रसग्रहण मराठीचे प्राध्यापक कसं करतील? त्याचा आपल्याला भावलेला अर्थ बरोबर आहे का? खूप प्रश्न आणि अस्वस्थता. मग अगदी राहावलं नाही, आणि जे मनात उमटलं ते सरळ लिहू लागलो .

. . . . .

गीत-मंगेश पाडगांवकर
संगीत-विश्वनाथ मोरे
स्वर-सुमन कल्याणपूर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमन ताईंवर अन्याय केला त्या काळात. एक प्रसिद्ध गायिका होत्या त्यांनी सुमन ताई पुढे येणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण केली होती.

असेच नितांतसुंदर गाणे आहे

विसरशील तू सारे

हेही गाणे श्री मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले आहे अन संगीत श्री श्रोनिवास खळे यांचे आहे!

सुरेख लिहिलंय.

बोकलत, सुमनताईंवर अन्याय झाला यावर सहमत.

खुप छान लिहिलेय.

ते सारे मी हृदयी जपते
उगीच लाजते, उगीच हसते
हृदयामधल्या देवासाठी हवेत का देव्हारे?>>>>

हे लिहिणार्‍याला तर नमनच पण सुमनताईंनी असे गायलेय की डोळ्यात पाणी येते. प्रेम केलंय आणि आपण ते कधीही विसरणार नाही हे तिला माहित आहे पण तो सगळे विसरलाय हेही माहित आहे. ह्याचा सल तिच्या हृदयी आहे हे आवाजातुन अचुक उमटते.

मला सुमनताईंचे पैलतिरी, रानामाजी नको नको येऊ नको रे .. पण खुप आवडते. अबोध निरागस ती … सुमनताईण्च्या आवाजातुन जशीच्या तशी दिसते.

अन्याय कसला झाला? सिनेसृष्टी ही ईंडस्ट्री आहे, तिथे प्रत्येकजण पैसा कमवायला जातो. कोणा दुसर्‍यावर उपकार करायला व हात देऊन वर काढायला कोणीही तिथे गेलेला नाही. Happy