Submitted by हर्षल वैद्य on 27 May, 2026 - 09:09
चंद्र दोनशे चाळीस वेळा मोठा होत गेला
आणि लहान होत गेला
वेळा थोड्या थोड्या बदलून भरती येत राहिली
आणि ओहोटीही
समुद्रही तिथेच राहिला
आणि किनाराही
थोडा भिजला किनारा समुद्राच्या योगे
पण किनारा म्हणजे काही समुद्राची सीमा नव्हती कधी
माहित होते ते किनाऱ्यालाही
किनाऱ्याचे काम होते घट्ट धरून ठेवणे आपली जमीन
सरकू न देणे पायाखालची वाळू
कितीही आली भरती तरी
आणि वाट पाहणे प्रत्येक ओहोटीत शांतपणे
पुढल्या भरतीची
समुद्राचे काम होते न ओलांडणे किनाऱ्याची मर्यादा
भरतीतही
आणि हरवू न देणे स्वतःतली किनाऱ्याची ओढ
ओहोटीतही
दोघांनीही चोख सांभाळली आपापली बाजू
आणि सांभाळतील
चंद्रही होत राहील लहानमोठा
नातिचरामि
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडली !
आवडली !