
बीएमएम २०२६ सिअॅटल अधिवेशनाच्या प्रमुख वक्त्या आहेत लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त). डॉ. कानिटकर भारतीय सशस्त्र दलातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि कर्तबगार अधिकारी आहेत. भारतीय लष्करातील 'लेफ्टनंट जनरल' (Three-star rank) या द्वितीय सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या देशातील तिसऱ्या महिला अधिकारी तर पहिल्या मराठी महिला अधिकारी आहेत. आपल्या वैद्यकीय शिक्षणात 'राष्ट्रपती सुवर्णपदक' पटकावणाऱ्या डॉ. कानिटकर यांनी लष्करात डॉक्टर, प्राध्यापक आणि 'एएफएमसी' (AFMC) कॉलेजच्या डीन अशा विविध पदांवर काम केले आहे. सैन्यदलातील ३९ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त होऊन, सध्या त्या 'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ' (MUHS), नाशिकच्या कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. या पदावर असताना वैद्यकीय अभ्यासक्रमात 'डिजिटल हेल्थ'चा समावेश करण्यात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. डॉ. कानिटकरांशी अधिवेशनापूर्वी साधलेला हा संवाद.
नमस्कार, सर्वप्रथम बीएमएम २०२६ सिअॅटल अधिवेशनाच्या प्रमुख वक्त्या म्हणून येण्याचे आमंत्रण तुम्ही स्वीकारल्याबद्दल तुमचे खूप आभार. तुम्हाला या अधिवेशनाकडून काय अपेक्षा आहेत?
-> मला बोलावल्याबद्दल तुमचेही आभार. गेल्या वर्षी लेस्टर (यूके) मध्ये झालेल्या युरोप अधिवेशनालाही मी वक्ता म्हणून गेले होते. देशापासून इतक्या लांब राहूनही आपले भारतीय, मराठी बांधव एकत्र येतात आणि आपली संस्कृती जपतात हे बघून मला खूप आनंद झाला. अमेरिकेतही असं दृश्य बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी जी मंडळी इथे स्थलांतरित झाली, ती कदाचित भारताच्या बदलत्या वेगाशी जोडलेली नसतील. त्यामुळे त्या मंडळींना भेटून मी त्याबद्दल सांगू शकेन तसेच माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन.
आज आपण विकसित भारताचे स्वप्न पाहत आहोत. सायन्स, टेक्नॉलॉजी, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत भारत खूप पुढे गेला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत मी अधिवेशन केंद्रात तुमच्यासोबत उपस्थित राहून लोकांशी, विशेषतः तरुणांशी संवाद साधू इच्छिते. त्यांच्या आकांक्षा आणि स्वप्ने काय आहेत, हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. मीही तुमच्याकडून नक्की बरंच काहीतरी शिकू शकेन याची मला खात्री वाटते.
तुमचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच, पण हा असा संवादही खूप महत्त्वाचा आहे. भाषणे तर यूट्यूब किंवा टीव्हीवरही ऐकता येतात, पण प्रत्यक्ष संवाद साधता येणे जास्त परिणामकारक असते, नाही का?
-> नक्कीच. मी 'पंतप्रधान विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार परिषद' (PM-STIAC) या उपक्रमाचा भाग आहे, तसेच मी वैद्यकीय विद्यापीठाची कुलगुरू म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे शिक्षणातील बदल किंवा डिजिटल हेल्थ मोहिमेत माझा सक्रिय सहभाग आहे.
उत्तर अमेरिकेत अनेक बुद्धिमान, कर्तृत्ववान मंडळी आहेत आणि मला या सर्व लोकांना भेटायला आवडेल. नुकताच मी मेयो क्लिनिकसारख्या मोठ्या संस्थेमधील शास्त्रज्ञांशी संवाद साधला. ते भारतात कॅन्सर रिसर्चसाठी काम करू इच्छितात. अशा कल्पनांना पाठिंबा देणे हाच माझा मुख्य उद्देश आहे.
आता थोडसं तुमच्या करिअरबद्दल. तुम्ही सैन्यदलात जाण्याचं कधी ठरवलं आणि त्यामागची प्रेरणा काय होती?
-> सगळ्यात पहिलं कारण म्हणजे, मी अतिशय प्रखर राष्ट्रभक्ती असलेल्या घरात जन्मले आणि वाढले. माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. माझ्या आजीने वैद्यकीय शिक्षण घेतले होते. एक अनाथ मुलगी आणि नंतर बालविवाहिता असून सगळ्या परिस्थितीशी लढून वैद्यकीय शिक्षण घेणे हा तिचा प्रवास खूपच कठीण होता. त्यामुळे मला आजी-आजोबांकडून खूप प्रेरणा मिळाली. दुसरं म्हणजे, या सगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर मी एकदा योगायोगाने एएफएमसीला (AFMC) गेले होते. तिथली एकंदरीत शिस्त, लोकांची हुशारी हे सगळं पाहून मी ठरवलं की मला या सगळ्याचा भाग व्हायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, बारावीत असताना मी माझ्या भावी पतीला भेटले. ते त्यावेळी नुकतेच एनडीए (NDA) मधला अभ्यासक्रम संपवून बाहेर पडले होते. सैन्यदलाबद्दल सगळ्यांना असतं तसं कुतूहल, आकर्षण मलाही होतं आणि त्यांच्या भेटीनंतर माझ्या करिअरची आणि आयुष्याची पूर्ण दिशाच बदलून गेली.
तुम्ही आणि तुमचे पती लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर ह्यांना भारतीय लष्करातील पहिले 'थ्री-स्टार जनरल' दाम्पत्य असा मान मिळाला. सैन्यदलातली एवढी मोठी जबाबदारी सांभाळताना तुम्ही घर, नोकरी आणि करिअर यांचा समतोल कसा साधला?
-> हा प्रश्न आम्हाला दोघांनाही नेहमी विचारला जातो. कुठल्याही करिअरमध्ये असलेल्या पती आणि पत्नी या दोघांनाही एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे असतं. आमच्या बाबतीत बोलायचं तर आम्ही दोघेही लष्करात होतो. आमच्या ३६ वर्षांच्या लग्नाच्या प्रवासात, २४ वर्षे आम्ही एकमेकांपासून लांब होतो. तरीही भारतीय लष्करातील करिअर यशस्वी होऊन पहिले 'थ्री-स्टार जनरल' जोडपे होण्याचा मान आम्हाला मिळाला. सिअॅटलच्या अधिवेशनात माझ्या कामाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल कसा राखला यावर मी बोलणारच आहे.
भारतीयांची जी पिढी आज परदेशात राहते, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
-> परदेशात राहत असतानाही घरी आपली मातृभाषा बोलणे खूप गरजेचे आहे. लहान मुलांवर सुरुवातीपासून आपल्या भाषेचे आणि संस्कृतीचे संस्कार झाले, तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. याबद्दलचे शास्त्रीय पुरावेही उपलब्ध आहेत. आम्ही लष्करी कामातून शिकलेला मुद्दा म्हणजे शिस्त! तुम्ही देशात असाल किंवा परदेशात, 'स्वयंशिस्त' (Self-discipline) ही प्रत्येकासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ती प्रत्येकाने पाळायला हवी. शिवाय आपण परदेशात राहूनही आपल्या देशासाठी काय करू शकतो, ही Sense of ownership प्रत्येकामध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. याही विषयावर तुमच्याशी मी अधिवेशनात संवाद साधणार आहे.
सैन्यदलातील महिला अधिकारी, डॉक्टर आणि शिक्षिका अशा विविध भूमिका सांभाळणाऱ्या डॉ. माधुरी कानिटकर यांचे विचार अधिवेशनात ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुम्हीही अधिवेशनाला येताय ना?
------
वेबसाईटा: https://bmmseattle2026.org/
इंस्टाग्रामः https://www.instagram.com/bmm2026seattle/
फेसबूक: https://www.facebook.com/bmm2026seattle
सुंदर ओळख! अशा कर्तृत्त्ववान
सुंदर ओळख! अशा कर्तृत्त्ववान आणि नम्र व्यक्तीची प्रमुख वक्त्या म्हणून निवड केलीत हे फार चांगले केलेत. त्यांचे भाषण ऐकायला/वाचायला आवडेल.
फा +१
फा +१
सुंदर ओळख! अशा कर्तृत्त्ववान
सुंदर ओळख! अशा कर्तृत्त्ववान आणि नम्र व्यक्तीची प्रमुख वक्त्या म्हणून निवड केलीत हे फार चांगले केलेत. त्यांचे भाषण ऐकायला/वाचायला आवडेल.>>>>>
सहमत.
शिस्त! तुम्ही देशात असाल किंवा परदेशात, 'स्वयंशिस्त' (Self-discipline) ही प्रत्येकासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ती प्रत्येकाने पाळायला हवी>>>>
ह्याबद्दल अजुन ऐकायला आवडेल की हे कसे करायचे. ठरवले जाते भरपुर काही पण पाळले जात नाही.
सुंदर ओळख! अशा कर्तृत्त्ववान
सुंदर ओळख! अशा कर्तृत्त्ववान आणि नम्र व्यक्तीची प्रमुख वक्त्या म्हणून निवड केलीत हे फार चांगले केलेत. त्यांचे भाषण ऐकायला/वाचायला आवडेल.>>> +१
या डॉक्टर माधुरी खोत कानिटकर
या डॉक्टर माधुरी खोत कानिटकर मला ए एफ एम सी मध्ये पाच वर्षे वरिष्ठ होत्या. पूर्ण तिन्ही एम बी बीएस मध्ये त्या पुणे विद्यापीठात प्रथम आलेल्या आहेत. नौदलाच्या आश्विनी या मुंबईतील रुग्णालयात त्या एम डी करत असताना त्यांच्या हाताखाली मी काम केलेले आहे.
मी विक्रांत बोटी वर असताना त्या आपल्या यजमान (तेंव्हा) कर्नल राजीव कानिटकर यांच्याबरोबर विक्रांत पाहायला माझ्या पाहुण्या म्हणून पण आलेल्या आहेत.
त्या स्वतः बालरोग तज्ज्ञ असून त्यांनी बालकांच्या मुत्रपिंड विकारामध्ये (pediatric nephrology) सुपर स्पेशालिटी केलेली आहे.
अत्यंत हुशार आणि कर्तबगार अशा लेफ्ट. जन. डॉ माधुरी कानिटकर याना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे हे अत्यंत उचित आहे.
फारएण्ड +१ फारच भारी.
फारएण्ड +१
फारच भारी.
फा +१
फा +१
ज्ञानप्रबोधिनीत प्रत्यक्ष ऐकायला दिसायला सुंदर तर आहेतच पण अतिशय नम्र व उत्कृष्ट व्यक्त्या आहेत्.
टिझर मुलाखत आवडली
टिझर मुलाखत आवडली
मी तर नुसता फोटो बघूनच fan
मी तर नुसता फोटो बघूनच fan झाले आहे..
आता लेख वाचते..
वा! खूपच इन्स्पायरिंग प्रमुख
वा! खूपच इन्स्पायरिंग प्रमुख पाहुण्या लाभल्या आहेत या वेळी. जबदरस्त व्यक्तिमत्व!
>>>टिझर मुलाखत आवडली +१
>>>टिझर मुलाखत आवडली
+१
मुलाखतीचा टीझर आवडला. डॉक्टर
मुलाखतीचा टीझर आवडला. डॉक्टर कानेटकरांचे व्यक्तिमत्त्व आणि करीयरमधे गाठलेली उंची अतिशय प्रभावशाली आणि प्रेरणादायी आहे. सविस्तर मुलाखत वाचायला /ऐकायला आवडेल.
मुलाखतीचा टीझर आवडला. डॉक्टर
मुलाखतीचा टीझर आवडला. डॉक्टर कानेटकरांचे व्यक्तिमत्त्व आणि करीयरमधे गाठलेली उंची अतिशय प्रभावशाली आणि प्रेरणादायी आहे. सविस्तर मुलाखत वाचायला /ऐकायला आवडेल.>>>>> +१
>>>>>बऱ्याच वर्षांपूर्वी जी
>>>>>बऱ्याच वर्षांपूर्वी जी मंडळी इथे स्थलांतरित झाली, ती कदाचित भारताच्या बदलत्या वेगाशी जोडलेली नसतील. त्यामुळे त्या मंडळींना भेटून मी त्याबद्दल सांगू शकेन तसेच माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन.
खूपच सुंदर! आपले प्रेरणादायी विचार ऐकायला जरुर आवडतील.
वा! खूपच इन्स्पायरिंग प्रमुख
वा! खूपच इन्स्पायरिंग प्रमुख पाहुण्या लाभल्या आहेत या वेळी. जबदरस्त व्यक्तिमत्व!>>+१