चाळीसावा
खरं तर तिला तिथे जाण्याची अजिबातच इच्छा नव्हती. एकतर कुठल्याही मरणाच्या दारावर एकट्याला जायला कुणालाही नकोच वाटतं. तिथे गेल्यावर काय बोलावं हेच कळत नाही मग. बरोबर चार लोकं असतील तर ठीक आहे. कुणी तरी वेळ सांभाळून घेतंच अशावेळी.
पण ह्या घराशी तर तिचे तसे काही संबंधही नव्हते. कुणालाच ओळखत नव्हती ती तिथे, त्या घरातला एक तो मुलगा असिफ, सोडला तर. आणी त्याच्याशीही ओळख म्हणजे काय, तर कंपनीतल्या कामानिमित्त त्याचं जेमतेम नाव गाव माहीत असण्यापूरतीच.
ती ह्या छोट्याशा कंपनीत एच. आर. सांभाळत होती. अगदी वॉचमन पासून मॅनेजर सगळे धरून जेमतेम चाळीस लोकांची ती कंपनी. तिचा सगळ्यांशी संबंध यायचा तो पगाराच्या दिवशी, अन् कुणी लीव्ह कार्ड भरायला आलं तर. एरवी सगळे कामगार मागच्या बाजूच्या कारखान्यात काम करत असायचे. ती आणी आणखी एक-दोन जण, मॅनेजर बरोबर पुढच्या हॉल मधे बसलेले असायचे.
गेल्या महिन्यात असिफचे वडील वारले, मोठ्या आजारपणात. आणी आज त्यांचा चाळीसावा दिवस होता. असिफने मॅनेजरना फोन करून सांगितलं होतं, आणी त्यांच्याच जवळ बाकीच्या लोकां करता पण निरोप दिला होता, संध्याकाळी येण्याचा.
“आप जाओगी ना मॅडम शामको आसिफ के घर?” मॅनेजर साहेबांनी तिला विचारलं.
“मै....” ती चाचरलीच. इथून एकदा घरात शिरलं, की अवघड असतं बाहेर पडणं. सव्वा वर्षाचं तिचं बाळ.. जे तिला संध्याकाळी अजिबात सोडायला तयार नसायचं. सासुबाईंचा चिडका चेहरा! आणी मुळात तिची तिथे नं जाण्याची इच्छा.. सगळंच डोळ्यासमोर आलं तिच्या.
“हां। हो आओ थोडी देर के लीये. हम लोगोको तो जाना पॉसिबल नही होगा, यहा का काम खतम करके। और आसिफ तो आपके घर से नजदिक रेहता है।”
तिचं बाळ लहान असल्यामुळे, तिला एकटीलाच रोज वेळच्या वेळी निघता यायचं इथून. बाकी लोकं जरा उशिरा पर्यंत थांबायचे, रोजचं डिसपॅच वगैरे करायला.
“जी, कोशिश करती हू। ” किमान अभिला तरी नको न्यायला अशा गंभीर ठिकाणी उगाच.
“जरूर जाइये। हमारी तरफसे किसिने जाना जरूरी है।” त्यांनी तिच्यावर ते काम टाकलच.
संध्याकाळी कंपनीतून घरी जातांना, नेहमीप्रमाणे पाळणाघरातून अभिला घेऊन ती घरी गेली. अख्खा दिवस अभिला घरी सांभाळण, सासूबाईंना जमत नव्हतं आणी शक्यही नव्हतं. मुळात तिची नोकरीच त्यांच्या मनाविरुद्ध आहे म्हटल्यावर त्यांना बऱ्याच गोष्टी जमेनाशा झाल्या होत्या. घरात जावून अभिशी खेळता खेळता रोजच्यापेक्षा जरा जास्तच वेगानं तिने संध्याकाळचा स्वयंपाक आटपला. अभिच्या बाबाची नक्की वेळ नसायची येण्याची. जवळपास रोजच रात्री तो जरा उशीराच घरी यायचा, ऑफिस मधून.
“मला थोडं बाहेर जायचं आहे..” तिने जरा दबकतच सांगितलं.
“आत्ता कुठे जातेयस? आणी अभिला घेऊन जाणार आहेस नं?” सासुबाईंनी लगेच विचारलं. ती घरी असतांना त्या अभिशी खेळायच्या. पण एकटीने त्याची जबाबदारी घ्यायची त्यांची तयारी नसायची.
“नाही.. त्याला नेण्यासारखं नाहीय. तेरावं आहे..”. चाळीसावा सांगून, अजून येणारे प्रश्न वाढवण्याची तिची तयारी नव्हती, “जवळच आहे. शक्य तितक्या लवकर येईन. भेटायला जायला पाहिजे.. रोजच्या महितीतल्या मुलाचे वडील होते.. नं जाणं बरं नाही दिसणार.. जाऊन येऊ का? बाबा येईलच घरी.. कदाचित.. मी येतेच तोपर्यंत.. ”. ती सुचेल ते बोलत गेली.
“लहान मुलाच्या आईने तेराव्यात जात नाही. आपल्यात तसं चालत नाही ..” त्यांनी सबब पुढे केलीच.
“मी फक्त भेटून येते. तिथे जेवणार नाहीय..” तिने सांगितलं. ‘तरी बरं, तेरावा दिवस म्हणाले. चाळीसावा दिवस म्हणाले नाही.’ तिच्या मनात आलं. तिला त्यांना स्पष्टीकरण देऊन अजून अडचणीत भर घालायची नव्हती. अभिला तिथे नं नेण्याचं कारण सांगितलं तेवढं पुरे आहे.
चटचट आवरून अभिला सासूबाईंच्या ताब्यात देऊन ती निघाली. अभिला चुकवूनच. त्याला सोडून आई बाहेर पडतेय, हे त्याला अजिबातच चाललं नसतं.
असिफचं घरं तसं अगदीच जवळ होतं. घराजवळचा मुख्य रस्ता ओलांडून, जरा पलीकडे बैठ्या घरांची वस्ती होती. ती पायीच निघाली. एका रांगेत दोन-दोन खोल्या, पुढे थोडी मोकळी जागा अशी चाळवजा वस्ती होती ती. ती पूर्वी कधी इथे आली नव्हती, तरी साधारण पत्ता माहीत होता. थोडस्स विचारल्यावर सापडलं लगेच घर.
घराचं दार उघडच होतं. पण बाहेर कुणीच नव्हतं. तिने कडी वाजवली. डोक्यावरून पदर घेतलेली, नाकात चमकी असलेली बारकीशी बाई समोर आली.
“आसिफ है घरमे? मै उसकी फॅक्टरी मे काम करती हू..”
“हा.. हा.. आओ.. आओ.. बाहर गया वो.. अब्बी आयेगा.. आओ अंदर..” त्या बाईने आत बोलावले.
दाराच्या बाहेर जरा लांबच, भिंतीजवळ चपला लावून ती आत गेली. बाहेरची ती छोटीशी खोली पूर्ण रिकामी होती. भिंतीशी एक सतरंजी होती फक्त अंथरलेली. एका कोपऱ्यात पाण्याचा माठ होता. जवळच चार पेले ठेवले होते.
“तुम अंदर ही आओ..”
ती आतल्या खोलीत गेली. स्वयंपाक घर होतं ते, बाहेरच्या खोलीपेक्षा थोडं मोठं. अर्ध्या भिंतीशी ओटा होता. त्यावर पाण्याच्या मोठ्या दोन घागरी. ओट्यावर एक भली मोठी पितळी परात ठेवलेली होती.. ओट्याला लागूनच एक दार. बाथरूम असणार तिकडे. एका भिंतीशी भांड्यांची मांडणी. खोलीच्या मध्ये सतरंजीवर चार सहा वयस्कश्या बायका बसल्या होत्या, डोक्यावर ओढण्या, पदर घेऊन. संगळ्यांचीच तोंड रोज खूप पान खात असल्यासारखी दिसत होती.
“ये मॅडम अपने आसिफ की फॅक्टरी से आई है।” त्या बाईने तिची ओळख करून दिली. एकदोन कौतुकाच्या नजरा तिच्याकडे वळल्या. जरा सरकून बसत बायकांनी तिला बसायला जागा केली.
“बैठो बैठो.. ” तिला तिथे बसवत एक जण म्हणाली.
ती निमुटपणे तिथे बसली. बाकी बायकांच्या आपसात गप्पा चालू होत्या. तिच्या समोर कापलेल्या फळांच ताट आलं. “लो बेटा...”
“नही.. अभी नही..| आसिफ बाहर गया? कब आयेगा?..” तिला शक्य तितक्या लवकर अफिसला भेटून निघायचं होतं.
“वो सब नमाज अदा करने गये है। अभी आ जायेंगे। तुम खा लो थोडासा..” परत ताट समोर आलं. नाईलाजाने तिने एक फोड उचलली. ‘लवकर निघायला हवं.’
त्यांच्या आपसात गप्पा चालूच होत्या.
“लेकिन ऊनके अब्बाजान नही मान रहे.. मेरी मानो तो खाला....”
“अब चार चार बेटिया घर मे,..”
“मैने अम्मी को बताया..”
“अभी परसो की बात है..खालाजान.. ”
“घर मे कोन कोन है तुम्हारे?..”
एखादा प्रश्न तिच्या दिशेने येत होता, तिची दखल घेण्याकरिता. तिची चुळबुळ चालू होती. ‘निघावं का आत्ता? की आलोच आहोत तर भेटूनच जावं का?.. घरी जायला वेळ होतोय.. ’
“चाची मै निकलती हू। आसिफ को बता देना..” ती उभी रहायला लागली.
“अरे अब्बी आ जाएंगे.. पाच मीनीट मे। बैठो जरा। ”
तिने ठरवलं, अजून खरंच पाच मिनिटात नाही आला तर मग मात्र खरंच निघायचं. सासूबाई चिडतील नाही तर. ती असा विचार करतच होती की बाहेरून बरेच आवाज यायला लागले.
“आ गये .. आ गये.. अम्मा, ये बाहर रख दू?”
“नही नही अबी नही..”
ती चुळबुळत राहिली. वेळ होत होता. आतलं बायकांच बोलणं आता कुजबुजण्यात बदललं होतं. बाहेर पुरूषांचे आवाज येत होते. अफिसला कुणी निरोप देईल का? की त्याला बाहेरच्या गर्दीत पटकन भेटून घ्यावं?
“चाची..”
बाहेरचे आवाज एका सुरात येत होते आता.
“बैठो तुम। वो बाहर थोडे पढेंगे अभी..”
“अभी मुझे निकलना है। मै आसिफ को बाहर मिलती हू..”
“अभी तुम नही जा सकती थोडी देर.. वो लोग बाहर है.. ”
“मुझे कुछ परेशानी नही चाची. मै निकल जाऊंगी. मै उससे कल बात कर लुंगी.. ” ती उभी रहात म्हणाली.
“लेकिन ऐसे समय आदमीयो के सामने से नही जाते। ऐसा नही चलता हमारे घर..” खाली बसलेली एक खालाजान म्हणाली.
आता तिचं टेंशन खूपच वाढलं होतं. आत्ता ह्यांची प्रार्थना चालू झालीय.. ती संपणार कधी..? बायकां समोरून काय, अन् पुरुषां समोरून काय... तिला कुठूनही जायला काहीच अडचण नव्हती. पण आता घरी तिला जायचं होतं. खूप वेळ होत होता. पण ह्या घराला बाहेर जायला ते एकच दार होतं. तिला डोळ्यासमोर अभिचा चेहरा दिसायला लागला. रडत असेल का? अजून त्याचा बाबा घरी आला नसेल तर, सासुबाईंचा संताप आता खूपच वाढला असेल. तिला रडू कोसळायच्या बेतात आलं.
बाहेरचे आवाज एका लयीत चालू होते... ह्यांच्यात असं चालत नाही.. आपल्यात तसं करत नाही.. इथे ह्या बायका.. घरी सासूबाई.. मॅनेजर म्हणतो, जायला हवं...
बराच वेळ गेला. बाहेरची प्रार्थना संपली. क्षण दोन क्षण शांतता पसरली. हळू हळू बाहेरून बोलण्याचे आवाज यायला लागले. एका बाईने लगबगीने फळांच ताट उचललं. दुसरीने ओटयावरची मोठी परात घेतली, बाहेर कुणाच्या तरी हातात द्यायला. ती ताडकन उभी राहिली.
“बेटा, खाना खाके जाना..”
“मै निकल रही हू चाची. असिफसे कल मिल लुंगी। उसको को बता देना.. ”
उत्तराची वाट नं पहाता ती बाहेरच्या दिशेने झेपावली. तिच्या बायकी चपलां जवळ इतर चपला बुटांची गर्दी नव्हती. ती जवळपास धावतच सुटली घराच्या दिशेने. हिरकणी सारखी.
मागून असिफचा आवाज येत होता, “मॅडम.. मॅडम..”
**************
पोहोचली कथा...
पोहोचली कथा...
वातावरणनिर्मिती आणि विषय, तो
वातावरणनिर्मिती आणि विषय, तो मांडण्याची पद्धत हे सगळं आवडलं. शेवट मात्र कळला नाही.
वातावरणनिर्मिती आणि विषय, तो
वातावरणनिर्मिती आणि विषय, तो मांडण्याची पद्धत हे सगळं आवडलं. शेवट मात्र कळला नाही. +१००
थोडं थोडं उमजलं असं वाटतंय खरं. पण स्पष्ट सांगता येत नाही
धन्यवाद धनवन्ती, वावे.
धन्यवाद धनवन्ती, वावे.
शेवट मात्र कळला नाही.>> ती असिफकडे गेली ती तिच्या कामाचा भाग म्हणून नाईलाजाने. ती सतत घरच्या दडपणाखाली आहे. घरी थोडं खोटंही बोलली आहे. थोडी घरची मदत मिळाली असती तिचं बाळ सांभाळण्यात आनंदाने सहकार्य केल्या गेलं असतं तर आसिफ कडे जाण्याचं कर्तव्य तिने सहजपणे आणि मोकळ्या मनाने केलं असतं.
शेवटी तिचं टेंशन इतकं वाढलंय की आसिफ तिला आवाज देत असतांना पण, दोन मिनिटं थांबून तिला दुखवटा व्यक्त करता येत नाही.
कथेचा चाळीसाव्या दिवसापेक्षा
कथेचा चाळीसाव्या दिवसाशी निमित्तमात्र संबंध असल्याने "आधुनिक हिरकणी" वगैरे नाव चाललं असतं. चाळीसाव्या दिवसाचं फक्त निमित्त होतं. ती कुठेही गेली असती (एखाद्या आजारी वर्कर ला बघायला / हिंदू घरी / बाईमाणसाच्या घरी/ आनंदाच्या प्रसंगी / कोणाला बाळ झालं म्हणून) तरी छाती अशीच धडधडून तिला पळून यावे लागले असते. एखाददोन ठिकाणी अभी ला घेऊन जाता आले असते हाच काय तो फरक.
पोहोचली कथा. तिची तगमग, एकूण
पोहोचली कथा. तिची तगमग, एकूण वातवरणनिर्मिती आणि बरंच काही, छान मांडलंय!
चाळीसाव्या दिवसाचं फक्त
पियू, प्रज्ञा धन्यवाद.
चाळीसाव्या दिवसाचं फक्त निमित्त होतं. >> हे सासूबाईंना कळलं असतं तर त्यांनी तिला जाऊच दिलं नसतं. ते खोटं बोलण्याने ताण आणखीन वाढला.
शिवाय चाळीसावा असल्याने प्रार्थना चालू असताना पुरुषांसमोरून जायचं नाही वगैरे आलं.
घरी परत आल्यावर उशीर का झाला ह्याचं खरं कारण तिला देता येणार नव्हतच.
किती hidden stress असू शकतो
किती hidden stress असू शकतो हे खूप छान अधोरेखित झालं आहे. हे मला मगाशी नीट लिहिता नाही आलं. कदाचित या ताणाची कल्पना खोलीतल्या इतर जणींना येऊ शकत नाही. पुरूषांना तर त्याहूनही येऊ शकत नाही. (त्यांना इतर ताण असतात, पण इथे तो विषय नाही)
आणि हे सगळं सांगता येत नाही हे तर त्याहूनही घुसमटवणारं असतं.
सुन्दर लिहीली आहे कथा.
सुन्दर लिहीली आहे कथा.
तिची तगमग अगदी पोहोचली. या प्रकारच्या ताणातून मीही बरेचदा गेले आहे.
कुणाकडे गेलं की तिथे अडकून पडायला होतं, आणि मग ज्या साठी मुख्यतः गेलो आहोत, ते काम अर्धवट सोडून निघून यावे लागते.
कथा आणि तिची तगमग पोचली. ऐसा
कथा आणि तिची तगमग पोचली. ऐसा नही चलता हमारे घर..” हे दोन्ही घरांत सारखंच होतं.
फक्त ऑफिसातून अशा वेळी एखाद्या स्त्रीला तिथे जायला सांगितलं जाणं, त्याच्या बरो बर काम करणार्यांतल्या कोणालाही जाणं शक्य न होणं, हे माझ्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर थोडं खटकलं.
>>>>>>अख्खा दिवस अभिला घरी
>>>>>>अख्खा दिवस अभिला घरी सांभाळण, सासूबाईंना जमत नव्हतं आणी शक्यही नव्हतं. मुळात तिची नोकरीच त्यांच्या मनाविरुद्ध आहे म्हटल्यावर त्यांना बऱ्याच गोष्टी जमेनाशा झाल्या होत्या.
सिनिअर लोकांना गृहीत धरुन आपली जीवनशैली त्यांच्यावर लादणे सुद्धा बरोबर नाहीच.
कथा आवडली. वातावरणनिर्मिती छान जमली आहे.
धन्यवाद स्वानंदी, भरत, सामो.
धन्यवाद स्वानंदी, भरत, सामो.
ऑफिसातून अशा वेळी एखाद्या स्त्रीला तिथे जायला सांगितलं जाणं, त्याच्या बरो बर काम करणार्यांतल्या कोणालाही जाणं शक्य न होणं, हे माझ्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर थोडं खटकलं.>> लहान एस्टॅब्लिशमेंट मधे, तेही जिथे रोजचं dispatch (लहान फॅक्टरी असल्यामुळे) रोजच संध्याकाळी होतं, तिथे लोकांना उशीरा पर्यंत थांबायला लागतं.
तिला रोज वेळच्या वेळी घरी जाण्याची "परवानगी" होती. जिथे इतर लोकं रोज उशिरापर्यंत थांबतात आणि ती एकटी घरी जाते, हेच कानकोंड करणारं असतं.
शिवाय ती एच आर सांभाळत होती, तिचं घर आसिफ च्या घराजवळ होतं ही आणखीन कारणं होतीच.
सिनिअर लोकांना गृहीत धरुन आपली जीवनशैली त्यांच्यावर लादणे सुद्धा बरोबर नाहीच.>> बरोबर आहे सामो. म्हणूनच अभिला ती पाळणाघरात ठेवत होती. पण त्या एखाद्या वेळी गरजेला पण बाळाला आनंदाने सांभाळतील हा विश्वास नव्हता तिला.
>>>>> बरोबर आहे सामो. म्हणूनच
>>>>> बरोबर आहे सामो. म्हणूनच अभिला ती पाळणाघरात ठेवत होती.
होय मला वाटलेले तसे.
छान लिहिली आहे.
छान लिहिली आहे.
तणाव तगमग दोन्ही पोहोचले.
चाळीस दिवस प्रथेची कल्पना नव्हती.
प्रतिसादात अश्यावेळी ऑफिसतर्फे महिलेने जायची दिलेली कारणे पटली. किंबहुना वाचतानाच ते याच कारणांनी विश्वासार्ह वाटले होते.
लहानपणी आई ऑफिसच्या लायब्ररी मधून बहुतांश वेळा बायकांची मासिके आणायची. मला दुसरे काही वाचायला नसले की मी तीच वाचायचो. त्यातल्या एखाद्या कथेसारखी वाटली. एखादा प्रसंग पण बायकांचे भावविश्व दाखवणारा..
छान कथा! तगमग -तणाव- कोंडी
छान कथा! तगमग -तणाव- कोंडी सगळे पोहोचले.
छान मांडणी.
छान मांडणी.
फक्त सुरुवातीला आसिफ नाव वाचून कथेबद्दल वेगळा अंदाज केला होता..
विशेषतः मूल लहान असताना असे सूक्ष्म ताण पेलताना होणारी तगमग पोहोचली.
छान जमली आहे कथा, मला आवडली.
छान जमली आहे कथा, मला आवडली.
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.
भावविश्व दाखवणारा..
@ऋन्मेऽऽष
कुठेतरी वाचलं होतं, जगात मूळ कथाबिज आठ दहा च आहेत(नंबर जरा इकडे तिकडे असेल) . बाकी कथा ह्या त्यांचेच variations आहेत.
हे मी सुद्धा वाचलेले. मी ७ की
हे मी सुद्धा वाचलेले. मी ७ की ८ नंबर वाचलेला.
शर्मिला, मी सार्वजनिक
शर्मिला, मी सार्वजनिक क्षेत्रातील एका आस्थापनात काम केलं. पण माझी पहिली नोकरी. खाजगी क्षेत्रातली होती. इंडस्ट्रियल इस्टेटमधले गाळे. टेबल वर्क करणारे तीनचार जण. बाकी वर्कर्स. दोन्ही मधल्या स्त्रियांसाठी घरी जायची वेळ ठरलेली होती. अन्य = पुरुष कर्मचार्यांना थांबावं लागलं तरी त्यांनी थांबावं अशी अपेक्षाही नसे.
त्या आस्थापनातही विवाहित स्त्रिया संध्याकाळी उशिरा थांबत नसत. स्त्रियांची दुसर्या शहरांत त्यांनी मागितल्याशिवाय ट्रान्सफर होत नसे.
मॅटर्निटी लीव्हवरून परत आलेली एक असिस्टंट माझ्या सेक्शनमध्ये बदली होऊन आली. तिच्या सासूला तिचे नोकरी करणे पसंत नव्हते. त्यामुळे तिची ओढाताण दिसायची.
आणखी एकदा सीबीआय ऑफिसमध्ये जायची वेळ आली तेव्हा ते काम जिच्या अंडर होते, ती स्त्री आहे म्हणून तिला न पाठवता, एका पुरुष ऑफिसरला पाठवलं गेलं.
तेव्हा स्त्रियांची नोकरी करताना होणारी ओढाताण ऑफिसात लक्षात घेतली जायची. त्यांच्यासाठी वातावरण सुरक्षित असावं हाही विचार होता. हे गेल्या शतकातलं आहे आणि मुंबईतलं आहे.
सगळीकडे असं असू शकत नाही, याची कल्पना आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षिकांच्या बाबत.
शिवाय कामाच्या ठिकाणी कोणाकडे डेथ झाली तर निव्वळ उपचार म्हणून कोणीतरी भेटायला जाणं हे ही थोडं पटलं नाही. इतक्या लोकांत आसिफच्या जवळचं कोणी असेल आणि फॅक्टरीतलं त्याच्या जवळचं कोणी तिथे जायला फॅक्टरी तल्या वरिष्ठांनी परवानगी न देणं हे अगदी चीन रशिया टाइप वाटलं. शिवाय अशा प्रसंगी एका स्त्रीला तिथे जा सांगणं हेही सामाजिक संकेतांच्या विपरीत वाटलं.
अर्थात हे मी माझ्या अति मर्यादित अनुभवविश्वाच्या वर्तुळातून लिहितो आहे. एक वाचक म्हणून माझी प्रतिक्रिया त्याच मर्यादित अनुभव विश्वातून येणार.
कथेचा उद्देश नोकरी करणार्या स्त्रीची ओढाताण आणि तगमग दाखवणे, हा आहे हे कळतं. ती पोचते.
भरत,
भरत,
तुमच्या नोकरीतील अनुभवांचा आणि त्यावर आधारित प्रतिक्रियांचा आदर आहे.
अनुभव वेगवेगळे असू शकतातच.
मी स्वतः पण खूपच वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम केलंय आणि कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही असे अनुभव घेतले आहेत.
कंत्राटी कामगार एके ठिकाणी फक्त अकरा महिने काम करू शकतात तरी वर्षानुवर्षे तेच कामगार दर अकरा महिनांनी नाव बदलून असायचे.
स्त्री आणि पुरुषांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह असणे हे कायद्याने अपेक्षित आहे. पण एके ठिकाणी ते नव्हते. (ही आस्थापना लहान असली तरी इथले प्रॉडक्ट भारतभर supply होत होते) तिथे माझ्या व्यतिरिक्त आणखी एकच महिला माझ्या आधीपासून होती (त्याच ठिकाणी काम करणाऱ्या तिच्या पतीचे अचानक निधन झाल्यामुळे तिला कामावर घेतले होते. आणि तिची गरज म्हणून तिला घेतले हे तिच्यावर उपकार आहे असं गृहीत धरून तिच्या करिता आणखी वेगळं काही करण्याची तसदी घेतल्या गेली नाही.
मी लवकरच ती नोकरी सोडली.
शिक्षण क्षेत्रातील एका संस्थेत बाळंतपणाची रजा अवघी दोन महिने आहे. ही संस्था खूपच मोठी आहे (त्यांची फी लाखो रुपये आहे) पण त्यांची नोंदणी अल्पसंख्यक गटात असल्यामुळे सरकारी नियम इथे लागू नाहीत. बायका अक्षरशः शेवटच्या दिवसा पर्यंत काम करतात.
पुढे एका मुलीची सासू आणि नवरा शाळा सुटायच्या वेळी लहान बाळाला घेऊन गेट वर आलेले असायचे, बाळाची भूक भागवायला. (ती मुलगी गरज म्हणूनच नोकरी करत असणार).
असे बरेच अनुभव गोळा झालेले आहेत जे मी कधीतरी कथांमधून मांडते.
तुमचा अनुभव पण मला मान्य आहे.
इतक्या लोकांत आसिफच्या जवळचं
इतक्या लोकांत आसिफच्या जवळचं कोणी असेल>> कामगारांपैकी नक्कीच कुणीतरी असणार आहे. पण कामगार आणि ऑफिस स्टाफ (blue and white collar) असे वेगळे धरले जातात आणि ऑफिस स्टाफ पैकी कुणीतरी जावं म्हणून तिला सांगण्यात आलं.
>>>>>>सासू आणि नवरा शाळा
>>>>>>सासू आणि नवरा शाळा सुटायच्या वेळी लहान बाळाला घेऊन गेट वर आलेले असायचे, बाळाची भूक भागवायला.
ब्रेस्ट मिल्क पंप त्या काळात नसणार
ब्रेस्ट मिल्क पंप त्या काळात
ब्रेस्ट मिल्क पंप त्या काळात नसणार>> सामो ही घटना खूप पूर्वीची नाहीय.. चार पाच वर्षच झाले असतील ते पहिल्याला. घर खूप लांब होतं तिचं. सकाळी सहा साडेसहाला बाहेर पडायची ती. कदाचित एखाद दुसरी भूक ब्रेस्ट मिल्क पंप वापरून भागवत असेलही.
^^^ब्रेस्ट मिल्क पंप त्या
^^^ब्रेस्ट मिल्क पंप त्या काळात नसणार^
"भारतात" अजूनही ९९% स्त्रियांना हे माहिती नाही, अगदी कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांना सुद्धा...
तीन महिने तरी मॅटर्निंटी
तीन महिने तरी मॅटर्निंटी लिव्ह चा कायदा सर्व आस्थापनांना लागू होणं गरजेचं नाहीय का? अल्पसंख्यक नोंदणी ला सूट का मिळावी?
ह्या उलट कॉर्पोरेट्स मधला अनुभव नवऱ्याकडून ऐकायला मिळायचे. सहा महिने maternity लिव्ह. नंतर पण हवी असेल तर काही कंडिशन्स वर वाढवून मिळायची. शिवाय तिथे पाळणा घर कम्पल्सरी. ब्रेस्ट फीडिंग करता ठराविक वेळे नंतर ब्रेक घेता येतात.
शंभर दीडशे कामगार असलेली एक
शंभर दीडशे कामगार असलेली एक आस्थापना होती. तिथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. फॅक्टरी इन्स्पेक्टर कधीतरी तर भेट देत असणारच तिथे. पण मॅनेज केल्या जायचं.
तिथे मी दिवसाचे फक्त दोन तास जायचे.
खोटं वाटू शकेल, मी सर्वांकडून वर्गणी गोळा करून एक स्टील चा मोठा पिंप आणि पेले आणून ठेवले तिथे. पिंपा करता स्टँड तिथल्या कामगारांनी बनवला (फोर्जिंग होत होतं तिथे)
गंमत म्हणजे वर्गणी घ्यायला मी ओनर कडे पण गेले होते. वयस्कर सरदारजी होता तो (अमेरिकेतून MS करून आला होता आणि मग स्वतःची फॅक्टरी टाकली होती). वर्गणी देतांना म्हणाला ,"कम पडे तो मुझसे ले लेना और पैसे."
>>>>>>ब्रेस्ट फीडिंग करता
>>>>>>ब्रेस्ट फीडिंग करता ठराविक वेळे नंतर ब्रेक घेता येतात.
हाऊ थॉटफुल.
माझ्या एका ऑफिसात खरोखर नर्सिंग रुम होती
कथेचं बीज कुठेतरी पाहिलेलं
कथेचं बीज कुठेतरी पाहिलेलं अनुभवलेल असतं हे मान्य आहे तरी तिची वास्तविकतेच्या बारीक सारीक तपशीलांवर अशी चिरफाड कशाला करायला हवी ? कथा कथा म्हणून वाचून तिचा आनंद घेता येणार नाही का ?
कथा नायिकेची कुतरऒढ मनाला
कथा नायिकेची कुतरऒढ मनाला भिडली.
तपशीलांवर अशी चिरफाड कशाला करायला हवी ? कथा कथा म्हणून वाचून तिचा आनंद घेता येणार नाही का ?+१