१. एक माणूस. समोर एक डॉगेश शेपूट हलवत उभा. माणूस स्टॉलवरून पार्लेचा पुडा घेतो, फोडून फरशीवर पसरतो आणि निघून जातो. डॉगेश त्याच्या मागे मागे थोडं अंतर पळत जातो आणि मिनिटभरानं माघारी येतो. तोवर तिथं दुसऱ्या डॉगेशनं येऊन एक बिस्कीट उचललेलं असतं. दोघांची गुरगुर. बाचाबाची कम् शक्तिप्रदर्शन. डॉगेश नंबर एक धमकावतो की ही माझी बिस्कीटं आहेत. तुझा यावर अधिकार नाही. हे मान्य नसल्यास हो युद्धाला तयार.
डॉगेश नंबर दोनची युद्धाची तयारी दिसली नाही. तो माघार घेतो. जाताजाता 'तुला नंतर बघून घेतो' असं काहीतरी फेससेव्हिंगसदृश पुटपुटतो. डॉगेश नंबर एक आरामात एकेका बिस्कीटाचं दातांखाली पाणी करतो. पाचेक मिनिटांचं हे नाट्य डोळ्यांसमोर.
नशीब एवढंच की मध्यस्थीला ट्रंप नव्हता. त्यानं व्हेनेझुएलाच्या अध्यक्षासारखं दोन्ही डॉगेशना जप्त करून सगळी बिस्कीटं स्वतःच हबकली असती.
२. जवळपास मोकळीच बस. सीट्स बसण्यासाठी कंफर्टेबल नाहीत. ढुंगण आपोआप पुढं पुढं सरकत जातं. मग पुन्हा मागं सरकून बसावं लागतं. या घर्षणामध्ये प्रवाशांचा वेळ मजेत जावा म्हणून महामंडळानं ही चतुराई केलेली आहे की काय अशी शंका घेतेवेळीच गाणं कुठून ऐकू येतंय म्हणून वळून बघितलं तर कंडक्टरनं वरच्या खिशात मोबाईल ठेवून त्यावर लावलेलं. 'कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानीमनी नसताना..' सरळच अश्लील ओळ.! हे अशा पद्धतीनं मागून हल्ला करण्यासाठी खुलेआम निमंत्रण देणं. तेही चालू बसमध्ये. शोभतं का हे, वगैरे एकवेळ समजा बाजूला ठेवलं तरी एवढं धाडसच कसं होतं म्हणतो मी.
३. १९४७ साली सत्ता वाटपाचा भंडारा चालला होता त्यावेळी ह्मांना एक दाणाही मिळाला नाही. नंतर साठ वर्षं हात चोळत बसावं लागलं. नंतर मग मधल्या पाच पन्नास वर्षांतल्या सरकारांनी हळूहळू कणाकणानं तिजोरी भरत आणलेली तेवढ्यात हे जन्माचे उपाशी आले दोमदोम करत पोटावर हात मारत. तर आता काय हे सगळं लूटून फस्त केल्याशिवाय थांबत नसतेत. आता हे काईच शिल्लक ठेवत नसतेत.
-- तुम्हा लिब्रांडूंच्या अशा कमेंट्स बघून मला इतका राग येतो ना! मी प्रत्येक कमेंट खोडून काढायला जाते. आणि मग ताबाच राहत नाही. नंतर मलाच त्रास होतो. मला कंट्रोल ठेवायला हवे. स्वामी ओम्. _/\_
४. एक कावळा वर उडाला. डोन्ट लेबल द थिंग्ज. एक काळा पुंजका वर उडाला, ज्याला पृथ्वीच्या या भागातले लोक कावळा म्हणतात, असं म्हण.
असंय की समोर एकटक निश्चल बघत बसलो तर शेवटी आपण या संपूर्ण दृश्याचाच एक भाग बनून जातो. हा घाट, ही झाडं, ही नदी, ही जमिन हे सगळं आपल्या आतच प्रकट होतं. आपली जाणीव ज्या दिशेने वळते ते आपल्या आत प्रकट झालेलं जाणवतं. म्हणजे आपण आजवर जे समजून चाललो होतो की आपण एक सेपेरेट स्कीनबॅग आहोत आणि इतर सगळं आपल्या बाहेर आहे, ती एक घोर फसवणूक होती. इट वॉज ॲन अल्टीमेट फ्रॉड !
आणि हे जे लोक वावरत आहेत समोर, ते, आपण, सगळे एकाच कॉन्शसनेसचे तुकडे आहेत. कॉन्शसनेसला एकटीला करमत नव्हतं म्हणून तिनं हा सगळा वैश्विक खेळ रचलेला आहे. एकच कॉन्शसनेस तुकड्या तुकड्यांत विभागली गेली आहे. आपल्यात आणि इतरांच्यात एकच जीवन वाहतं आहे. त्यामुळे इतरांना दुखावणं हे स्वतःलाच दुखावण्यासारखं आहे. साधं गणित आहे. सो, बी काईंड. आणि सेन्स ऑफ ह्युमर लागतो जगायला, तो सोडू नको. थेट भकास करणारं बोलू नको. ज्याचे त्याचे आपापले संघर्ष असतात, जिची तिची आपापली दु:खं असतात, त्यात तू अजून कुठे आणखी एक हंबरडा फोडायला निघालायस?
जमतंय. छान जमतंय. आता फक्त थोडंसं धाडस केलं पाहिजे. आपण स्वतःला लॉंच करून टाकलं पाहिजे. रोज डोळ्यांदेखत नवनवीन बाबा लॉंच होतायत आणि मार्केट खेचतायत. आता फार उशीर करता उपयोगाचं नाही. चेहरा, दाढी, कपडे आणि हेअरस्टाईलवर सढळ खर्च केला तर पुरेसं आहे सुरूवातीला. बाकी भाषा काय आपल्याकडे आहेच. वरती झलक दिसतेच आहे.
५. 'क्रिश्नानं बी आरजुनाला ह्येच सांगितल्यालं की बाबा भाव आसलं म्हनून काय झालं? ही आसलीच नासक्या आवलादीची हैत. मरायच्याच लायकीची हायती ही. मार ह्येंन्ला. येकालाबी जित्ता सोडू नगो.'-- वंदनीय बनसोडे सर, विषय मराठी, इयत्ता सहावी.
गीतेवरचं आणखी एक टोकदार भाष्य. आणखी एक अनोखा दृष्टिकोन.
६. डंकापती इरिटेटिंग आहेत. कबूल आहे. परंतु त्यांचाही उपयोग करून घेता येतो. विशेषतः त्यांचा आवाज मेडिटेशनसाठी वापरता येऊ शकतो. काही नाही. एखादं भाषण लावून द्यायचं आणि डोळे मिटून बसायचं. लक्षपूर्वक बघायचं की या आवाजामुळे आपल्या आत काय घडतंय? सबकॉन्शसमध्ये दबलेल्या कोणत्या भावना उफाळून यायला लागतात ? क्रोध, रिपल्शन, डिसलाईक, इरिटेशन कशा प्रकारे ट्रिगर व्हायला लागते.
एरव्ही अशा भावनांबद्दल अवेअर होता येत नाही. एरव्ही या भावना आपल्याला काही कळायच्या आतच आपल्यावर सवार होतात. तर डंकापतींची भाषणं होश वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्या आवाजाकडे होशपूर्वक बघितल्यास हळूहळू आपल्या लक्षात येतं की डंकापती थोडेसे आपल्या आतही मौजूद आहेत. त्यामुळेच आपण ट्रिगर होतो आहोत. हा शोध धक्कादायक असतो. परंतु प्रॅक्टिस तशीच चालू ठेवल्यास पुढे एका टप्प्यावर आपल्या मनात डंकापतींबद्दलही करूणा उत्पन्न होताना दिसू लागते. आपण यांच्याहीबद्दल कंपॅशनेट होऊ शकतो, याचं आश्चर्य वाटू लागतं.
७. खाण्याच्या बाबतीत आपले काही चोचले नाहीत, पुढ्यात येईल ते खाली मान घालून खातो. हे श्रेय माझे नाही. नव्वदच्या दशकातल्या महान मिडलक्लास आयांच्या मेहनतीला आलेलं हे फळ आहे. मुलाला समोर बसवायचं आणि धमकावून जेवायला भाग पाडायचं, हा त्यांच्या अनेक छंदांपैकी एक होता. गिळ मुकाट्यानं या दोनच शब्दांत सगळा विद्रोह खलास. एक कुथका बसला की भगतसिंग वगैरे सगळे आतल्या आत गायब.
परंतु तरीही भेंडीची भाजी मात्र काहीच कामाची नसते, हे मान्य केलं पाहिजे. नावच भेंडी ठेवलं गेलं आहे. यापेक्षा परफेक्ट इन्सल्ट अजून कुठला असणार ? मागं एका नेत्यानं मुलाखतीत भेंडीची भाजी आवडते, असं सांगितलेलं. याउपर मी त्याला मत देत नसतो. कारण हे म्हणजे त्याला भेंडीची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिल्यासारखंच होईल.
जेवायला जावं लागलं आज एकाकडे. त्यानं ॲंबुश केलं. टाळाटाळ करता आली नाही. 'काय भेंडी वगैरे तर नाही ना?' असं मी विचारलं नाही. ते ऑड दिसलं असतं.
बाकी, पाहुण्यांना आग्रहानं घरी बोलावून भेंडी खाऊ घालू नये, हे तत्व म्हणून सुंदरच आहे. परंतु हे मी एकट्यानं सांगून काही होणार नाही. समाज अवाढव्य असतो. एका व्यक्तीची ताकद कशी पुरी पडणार? अशा बदलांसाठी व्यापक पातळीवर प्रबोधनाची गरज आहे. चारदोन पिढ्या संघर्ष करण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. त्याशिवाय भेंडीसारखा लिबलिबीत पदार्थ मागं हटणार नाही.
ताटातलं ते गिळगिळीत संकट एकाच झटक्यात संपवून टाकू म्हणून दोन मोठे बकाणे भरले तर माऊली "आवडली का?'' म्हणत अजून वाढू लागते. आणि ह्या आपुलकीची भीड या जन्मात काही मोडेल अशी दिसत नाही.
८. विद्यापीठाच्या परीक्षांचे पेपर चेकिंगचे सेंटर्स. मोठ्या हॉल्समध्ये शेकडो मास्तर-मास्तरणी. तंबाखूची गुळणी धरून खाली मान घातलेल्या मास्तरांकडून पेपरची पानं उलटतानाचे सामुहिक आवाज घुमत राहतात सगळीकडे. मोठं संमोहन करणारं दृश्य. पिन ड्रॉप सायलेन्स. आणि सगळे तल्लीन.
जणू एखादी ऊसतोड मजुरांची टोळी एका लयीत रान तोडतेय. आणि सब्जेक्ट चेअरमन्स म्हणजे समजा त्या त्या टोळीचे मुकादम. ते टोळ्या मूव्ह करतात.
साठ पेपर्सचा एक बंडल. एका बंडलमागे दीड दोन हजार सुटतात. त्यामुळे दर ताशी किती पेपर्सचा स्पीड ठेवायचा याचे डोक्यात अनुभवसिद्ध ठोकताळे. एकूण महिना दीड महिन्याचा खेळ. एका केंद्रातल्या आपापल्या विषयांच्या पेपर्सचं भुस्काट पाडून ह्या टोळ्या आठवड्याभरात दुसऱ्या केंद्रावर हल्लाबोल करतील. सगळा वडाप कारभार.
नेहमीप्रमाणेच चांगलं लिहिलंय.
नेहमीप्रमाणेच चांगलं लिहिलंय.
उद्विग्नता पोहोचली.
आवडल्या नोंदी.
आवडल्या नोंदी.
भेंडीबाबत वाचून अगदी अगदी झाले.
लोल, काळजाला हात घालणारं
काळजाला हात घालणारं लिखाण. डंकापतींची करूणा
झ का स !!
झ का स !!
भारी लिहिलेय!
भारी लिहिलेय!
डंकापती..
डंकापती..
सुरुवात थोडी सपक वाटली.... मग
सुरुवात थोडी सपक वाटली.... मग जे चालू झालं... मस्तच!
डंकापती - ट्राय करून पाहायला पाहिजे
भारी आहेत
भारी आहेत
पहिल्या दोन नोंदी संपताना
पहिल्या दोन नोंदी संपताना फिसकन हसू आलं.
चौथी आत शिरून सगळं व्यापत असतानाच टाचणी लावलीत.
शेवटची वाचून कॉलेज प्राध्यापक असाल असं वाटलं
सहावं जमायचं नाय.