काही रेषा

Submitted by द्वैत on 15 May, 2026 - 10:04

काही रेषा

मिटून गेल्या काही
काही अजून आहेत
पुसट पुसटश्या
आठवणींच्या पानांवरती
काही रेषा
हव्या नकोश्या

काही रेषा कधी उमटल्या?
कुणास ठाऊक?
आणि कशास्तव?
काही रेषा मिटण्याआधी
सांगू बघती
कुठले वास्तव?

काही रेषा हसती रडती
उगाच सलती
खोल खोलवर
काही रेषा केविलवाण्या
खिन्न खिन्नशा
आणि निरुत्तर

काही रेषा काही तरीही
बऱ्याचकाही
रेषांहूनही
काही रेषा मिटण्याआधी
जपू वाटती
श्वासांहूनही

Group content visibility: 
Public - accessible to all site users