पाचूनगरी अशी यथार्थ ओळख सांगणाऱ्या सिअॅटल या शहरात होऊ घातलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळ २०२६ अधिवेशनाचे घोषवाक्य आहे— 'जपूया संस्कृती, विणूया नाती!!' बीएमएमच्या या २२ व्या अधिवेशनाची तयारी पूर्ण जोमानिशी सुरू आहे आणि त्यासाठी हे घोषवाक्य अत्यंत उचित आहे. बीएमएमच्या स्थापनेपासून, किंबहुना महाराष्ट्राच्या पाऊलखुणा जगभर उमटवणाऱ्या सर्वांनीच, या ना त्या प्रकारे आपली संस्कृती फक्त जपण्याचाच नव्हे, तर ती अभिमानाने सर्वतोपरी जोपासण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. नवी नाती निर्माण केली आहेत आणि जुन्या नात्यांची वीण घट्ट केली आहे. सप्तसागरापलीकडे एका खंडात लावलेल्या इवल्याशा रोपाचा 'वेलू गेला गगनावरी' अशी वस्तुस्थिती आज दिसण्यासाठी अनेक हातांनी अनेक वर्षे त्या रोपाचे जिव्हाळ्याने संगोपन केले आहे.
या परंपरेचा वारसा चालू ठेवताना अधिवेशनाचे यजमानपद सिअॅटलकरांनी मोठ्या उत्साहाने स्वीकारले आहे. आणि त्या उत्साहाला साजेसे गीत सुप्रसिद्ध कवी श्री. संदीप खरे यांच्या संवेदनशील लेखणीतून साकारले आहे. त्यात जोम आहे, उल्हास आहे, मराठीपणाचा गौरव आणि अधिवेशनाचे अंतरंग आहे. सिअॅटलचा निसर्ग अन् विविधता, आशावाद आणि आधुनिकता यालाही कौतुकाची दाद दिली आहे. या गीताला साजेसे संगीत आमचे सिअॅटलकर श्री. प्रसन्न गणपुले यांचे आहे. उत्तर अमेरिकेतील विविध शहरांमध्ये मराठी संस्कृती जपण्यासाठी केल्या जाणार्या प्रयत्नांचं, सोहोळ्यांचं प्रतिबिंब तुम्हांला व्हिडीयोत बघायला मिळेल. तुमच्या शहरांमधली चित्रं/दृष्य किंवा ओळखीची मंडळी व्हिडीयोत दिसली, तर नक्की इथे लिहा!
शब्दांतील भाव जाणून घेणारीआणि गीत ऐकल्यासरशी लगेच ओठांवर यावे व गुणगुणत राहावे अशी सुगम पण चैतन्यपूर्ण, जोशपूर्ण चाल आणि संगीतसाज यामुळे हे गीत खूप संस्मरणीय झाले आहे आणि सगळ्यांना आवडेल ह्याची खात्री वाटते.
जगभर गेली साद मराठी,
जगभर घुमतो नाद मराठी!
करावया जयघोष मराठी,
जपावया संस्कार मराठी,
दहा दिशांतून जमले सारे
संस्कृतीचे हे सांगाती!
जपूया संस्कृती... विणूया नाती!!
सुखमय रंगे इथे सोहळा,
आनंदाचा रंग वेगळा;
देश असो परदेश असू दे,
सदा मराठी थाट आगळा!
पुत्र मराठी जेथे जाती,
नक्षत्रांसम लखलखती!!
जपूया संस्कृती... विणूया नाती!
स्वागतास हे उभे सिअॅटल,
नाव जयाचे जगात उज्ज्वल!
झिमझिम पाऊस... हवा सावळी,
पाचूनगरी मुक्त मोकळी!
ऐशा जागी जमले अतिथी,
ही तर झाली भाग्ययुती!
जपूया संस्कृती... विणूया नाती!!
विश्व मराठी जमले सारे,
परस्परांशी रमले सारे!
आधुनिकतेचा ठसा तरीही,
वसा मराठी मनामध्ये!!
हाच वारसा जपला आपण,
अन् जपण्याचा निश्चय कायम!
करू मराठी संस्कारांनी,
नव्या पिढीचा पाया भक्कम!!
उजळत राहो दीप मराठी,
हीच असावी फलश्रुती!
जपूया संस्कृती... विणूया नाती!!
- अश्विनी देवधर
>>>>>>Seattle is called the
>>>>>>Seattle is called the Emerald City because of its abundant parks and greenbelts, which give it a vibrant, lush appearance year-round. In addition to ample vegetation within the city itself, Seattle is surrounded by areas of great natural beauty, including the densely forested Olympic Peninsula and the Cascade Range.
वाह वाह!! सिअॅटल ला जाउन हे वैभव पहायला हवे. मला वाटते तिथे अमेरिकेतील सर्वात मोठे ग्रंथालय आहे असे मी वाचलेले. पण हे पाचूनगरी वगैरे माहीत नव्हते.
सिअॅटल ला जाउन हे वैभव
सिअॅटल ला जाउन हे वैभव पहायला हवे. >>>> अधिवेशनाला या मग
(No subject)
छान आहे गीत आणि चित्रीकरण.
छान आहे गीत आणि चित्रीकरण.
गीत, संगीत, गायन आणि
गीत, संगीत, गायन आणि चित्रीकरण चांगले झाले आहे. संमेलनाला शुभेच्छा!
एक छोटासा विचार आला. गायक आणि संगीतकार अमेरिकेतील आहेत तर मग गीतकारही अमेरिकेतील शोधला असता तर? संदीप खरेंविषयी काहीच आक्षेप नाही पण अमेरिकेतही सुयोग्य गीतकार मिळू शकला नसता/ नसती का?