कथा कादंबऱ्यांचा यंत्रमानवी कारखाना

Submitted by हेमंतकुमार on 13 May, 2026 - 06:43

AI मुळे पोटार्थी लेखक आणि अन्य काही कलावंत देखील देशोधडीला लागतील की काय अशी वास्तव भीती आज घोंघावते आहे. नोव्हेंबर 2022मध्ये चॅट जीपीटी सार्वजनिक झाल्यानंतरचा AIचा झंझावात सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेच. सुरुवातीस हे प्रकरण विज्ञान तंत्रज्ञानापुरते सीमित राहील अशी एक वेडी आशा सामान्य माणसाला होती. परंतु त्यानंतर या यंत्रप्रज्ञेने जीवनाच्या असंख्य क्षेत्रांत प्रवेश करून अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसतो. लेखन आणि कलाक्षेत्रही या आक्रमणापासून बचावलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर सन 1954 मधील Roald Dahl या ब्रिटिश लेखकाच्या ‘The Great Automatic Grammatizator’ या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रभावी विडंबन करणाऱ्या समर्थ कथेची प्रकर्षाने आठवण होत आहे. AI सारखे मानवनिर्मित तंत्रज्ञानच एके दिवशी आपल्या मानगुटीवर बसेल आणि त्यातून मानवी विचारक्षमता आणि सर्जनशीलतेचा अंत होण्याचा धोका आहे हे भयस्वप्न त्या कथेतून व्यक्त झालेले आहे. गेल्या 72 वर्षानंतर ती कथा आज तर अधिकच कालसुसंगत ठरल्याने सादर आहे तिचा हा अल्पपरिचय :

तंत्रकुशल नोकर असलेला त्या कथेचा नायक गणिते सोडवणारा एक भला मोठा संगणक तयार करतो. त्यानंतर शिणलेल्या अवस्थेत तो विश्रांती घेत असताना त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते की, इंग्रजी भाषेचे व्याकरण देखील गणितीय सूत्रांप्रमाणे काटेकोर बांधलेले आहे. अशाच एखाद्या अन्य संगणकात जर आपण अंकांच्या ऐवजी शब्द आणि लेखनकल्पना (plots) ठासून भरल्या तर त्यातून हव्या त्या प्रकारची आणि अगदी प्रमाणभाषेतली व्याकरणशुद्ध कथा-कादंबरी सहज तयार होऊ शकेल ! आयुष्यात आपणही कधीतरी लेखक व्हावे ही त्याची मनीषा होती पण प्रयत्नांती देखील त्याला त्यात यश आलेले नव्हते.

मग तो या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन असाच एक भला मोठा संगणक तयार करतो. त्यात कथा-कादंबरी लिहिण्यासाठी लागणारा सर्व मसाला अर्थात ‘कच्चा माल’ विविध प्रणालींद्वारे भरला जातो. प्रत्येक प्रणालीसाठी यंत्रावर एक स्वतंत्र बटन ठेवलेले असते आणि त्यानुसार यंत्रात कथानकाचे प्रकार, मध्यवर्ती संकल्पना, लेखनशैली, पात्रे, शब्दसंग्रह आणि व्याकरणाचे नियम हे सर्व काही यथास्थित भरले जाते. तसेच प्रत्येक कथेमध्ये अथवा कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणात एखादा तरी लांबलचक आणि गूढ शब्द घालण्याची त्यात सोय होती. असा शब्द घालण्याने वाचकाच्या लेखी तो लेखक एकदम प्रतिभावान ठरतो असे नायकाचे म्हणणे ! याचबरोबर कथानकात मिसळण्यासाठी आनंद, दुःख, विनोद, कारुण्य, रहस्य आणि वर असोशीची फोडणी या सर्व गुणधर्मांचीही सोय करण्यात आली. एकंदरीत पाहता त्या काळी बाजारात यशस्वी ठरलेल्या अनेक पुस्तकांचा अभ्यास करून वरील सर्व मालमसाला यंत्राला पुरवण्यात आला. सरतेशेवटी, यंत्रातून लेखनाचे उत्पादन करताना त्याचा सुमार दर्जा हा निकष महत्त्वाचा ठरवण्यात आलेला होता.

मग तो त्याच्या मालकाला ही अभूतपूर्व योजना पटवून देतो आणि त्यानुसार लेखन पाडून ते दोघेही रातोरात लेखक बनतात आणि त्यावर चांगली कमाई पण करू लागतात. त्यातूनच पुढे एक मोठा साहित्यिक धंदा उभा राहतो. नंतर अनेक काल्पनिक लेखकांच्या नावांनी देखील ते साहित्य-उत्पादन वाढवू लागतात. तरी देखील खऱ्याखुऱ्या हयात प्रतिभावंत लेखकांशी आपल्याला अजूनही स्पर्धा करावी लागतेय याची त्या नायकाला खंत असते. मग तो त्याचे अखेरचे अतिसंहारक ब्रह्मास्त्र सोडायचे ठरवतो. तो अनेक प्रथितयश लेखकांना भेटतो आणि त्यांच्यापुढे एक करारनामा ठेवतो. त्यामध्ये असे म्हटलेले असते की संबंधित लेखकाने त्याचे आयुष्यभराचे जे काय मानधन असेल ते एकदाच या संगणक कंपनीकडून घ्यावे आणि इथून पुढे ती कंपनी जे साहित्य निर्माण करेल त्यावर आपले नाव वापरण्याची लेखी परवानगी देऊन टाकावी. याखेरीज त्या लेखकांनी इथून पुढच्या आयुष्यात अन्यत्र काहीही सार्वजनिक लिहायचे नाही हीदेखील जाचक अट.

नायकाच्या या प्रयत्नांना संमिश्र प्रतिसाद मिळतो. काही तरुण लेखक तर त्याला जवळपास कानाखाली काढूनच बाहेर हाकलतात. पण प्रणयकथांची राणी असलेल्या एका श्रीमंत लेखिकेला ही कल्पना खूपच रंजक वाटते आणि ती संगणक प्रत्यक्ष बघण्याची इच्छा व्यक्त करते. नायक तिची इच्छा पूर्ण करतो आणि तिलाच तिथे योग्य ती बटणे दाबायला बसवतो. त्यातून जी कादंबरी निर्माण होते ती वाचून ती लेखिका अवाक् होते कारण तिला जाणवते की तिच्या स्वतःच्या सर्जनशील लेखनापेक्षाही त्या यंत्रातून निघालेली कादंबरी अधिक चांगली आहे ! मग ती आनंदाने करारनाम्यावर सही करते.
अशा तऱ्हेने तेव्हाच्या साहित्यिक विश्वातले जवळपास 70% लेखक गुमान तो करार मंजूर करून आपले स्वत्व त्या यंत्राला विकतात. ओसरणीला लागलेले ज्येष्ठ लेखक तर या प्रस्तावाला अगदी सहज बळी पडतात.

कथेच्या अखेरीस उभरता लेखक असलेला कथानिवेदक या सर्व प्रकाराने भयंकर अस्वस्थ झालेला दाखवलाय. या यांत्रिक साहित्यिक धंद्यामुळे त्याच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. परिणामी त्या करारनाम्यावर आपण देखील सही करावी की काय अशा द्विधा मनस्थितीत तो आहे. पण अखेरीस वैतागून तो देवाला म्हणतो,
“ही उपासमार सहन करण्याची ताकद मला दे रे, देवा !”
या उदास व खिन्न सुरावर ती कथा संपते.

कथा अप्रतिम व ओघवती आहे. तिची भाषा तर सोपी आणि मधाळ. संपूर्ण कथेत लेखकाने (विस्तृत स्पष्टीकरण या अर्थी) वापरलेला 'epexegetically' हा एक शब्द पूर्णतः अपरिचित असल्याने अवघड व बोजड वाटला. कदाचित कथेच्या आशयाला पुष्टी मिळण्यासाठीच तो वापरला गेला असावा का ? किंवा कदाचित 1954मधील ब्रिटिश इंग्लिशचा तो खास नमुना असू शकेल.
कथेत सूचित केल्याप्रमाणे कालौघात तंत्रज्ञानाच्या तुफान रेट्यात मनुष्य-लिखित साहित्याचे भवितव्य असे दारुण असेल काय, हा विचार वाचकांच्या मनात सोडण्यात कथा यशस्वी होते. हेच तिचे बलस्थान. तसेच कथनाच्या ओघात ती लेखन व प्रकाशन क्षेत्रातील विविध वृत्तीप्रवृत्तींना छानसे चिमटे देखील घेते. आज त्यातली 1954 मध्ये मांडलेली भयसंकल्पना आज वास्तवात उतरलेली पाहून आपल्यालाही भयाण अस्वस्थ वाटल्याशिवाय राहत नाही.

कथेचे दणदणीत शीर्षक तर मार्मिक आणि तिच्या आशयाला अतिशय साजेसे आहे. Great या शब्दातून तंत्रज्ञानाची घमेंड दाखवली आहे तर Grammatizator हा लंबाचौडा व तिरपागडा शब्द कॅल्क्युलेटर व जनरेटरच्या धर्तीवर खास तयार करण्यात आलेला दिसतो. मानवी भावभावना व्यक्त करणारी आतड्याची भाषा अखेर एका यंत्राची गुलाम होऊन राहते हा त्यातून व्यक्त होणारा भाव आपल्याला थरारून टाकतो. एकूण काय, तर ही कथा मुळातून वाचण्यातच खरी मजा आहे.
. . .
आता येऊ थेट 2026 मध्ये . . .
काय दिसतंय अवतीभवतीच्या लेखनविश्वात ? साहित्य असो की पत्रकारिता, शैक्षणिक पातळीवरील निबंध असोत की प्रबंध, नोकरीचे अर्ज असोत की संस्थांचे नियमित अहवाल, सर्वत्र एआय वापरून पाडलेल्या विविध प्रकारच्या सपक व निर्जीव लेखनाचा सुळसुळाट झालेला दिसतोय. त्यातला काही अधिकउणे भाग अगदी नजरेत भरण्यासारखा आहे. भाषा आणि व्याकरणशुद्धता, तर्कसंगत मांडणी आणि एकंदरीत सभ्यता व सांस्कृतिकतेचा मुलामा असलेले लेखन आता कुठल्याही सुमार लेखकाला यंत्राद्वारे आयते हाती मिळत आहे. सुमारे 25-30 वर्षांपूर्वी ‘खाऊजा’ धोरण अवतरल्यानंतर जगभर जसे सांस्कृतिक सपाटीकरण दिसून आले तद्वत आज हे लेखनातले सपाटीकरण अगदी सहज जाणवते आहे. एकदा का लेखनासाठी यंत्रमानवी मदत घ्यायचे ठरवले की मग प्रयत्नांती सुद्धा खराब लेखन करता येत नाही, हा झाला अधिकचा भाग. परंतु उण्याच्या बाजूला लेखनातील सपक यांत्रिकपणा, रुक्ष कोरडी भाषा, वाचकाच्या मनाला साद घालण्यातील असमर्थता आणि नव्या धाडसी लेखनप्रयोगांचा अभाव या उणिवा अगदी प्रथमदर्शनीच जाणवतात. भविष्यात जर बहुसंख्य लेखन याच पद्धतीचे होत राहिले तर त्यातून वाचकांची विचारक्षमता रुंदावणे तर कठीणच. चांगले लेखक जर हळूहळू संपू लागले तर चांगले वाचक तयार होणे देखील अर्थातच संपुष्टात येणार. परिणामी स्वतंत्र विचारशक्ती गमावलेला यंत्रवत समाज हे पुढच्या शतकातील चित्र असेल काय, अशी साधार भीती आज सतावते.

मानवाने आपली अफाट आणि अचाट बुद्धी वापरून हे लेखनतंत्र निर्माण करून ठेवले खरे, पण आजच्या घडीला ते त्याच्याच उरावर बसू पाहतंय. ही समस्या तर उद्भवली आहे आणि तिच्यातून मार्ग काढणे हा देखील एक मानवी गुणधर्मच. काही विचारी लेखकांनी त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न जरूर चालवलेले आहेत. आपले लेखन खरोखर नैसर्गिक (मानवी) वाटण्यासाठी लेखनात काही विशिष्ट बदल केले जात आहेत. त्यामध्ये लेखनात बोलीभाषा आणि विशिष्ट समूहांच्या भाषेचा (slangs) पुरेसा वापर, पारंपरिक लेखनशैलीची काही प्रमाणात मोडतोड, वाचकाला साद घालणारी निवेदनपद्धती, काही प्रमाणात मुद्दामून बिघडवलेली शब्द अथवा वाक्यरचना आणि काही धाडसी लेखन प्रयोगांचा समावेश, हे त्यातले काही उपाय. ही झाली लेखकांची बाजू.

man lens book.png
( सौजन्य : Vectors)
दुसऱ्या बाजूस वाचकांनीही जागरूक असणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात पाश्चात्य जगात नुकतेच घडलेले एक उदाहरण पथदर्शक ठरावे. Mia Ballard या लेखिकेची Shy Girl ही भय-कादंबरी निर्मितीक्षम एआय वापरून लिहीली असल्याचे तीव्र आक्षेप अनेक वाचकांकडून आल्यानंतर संबंधित प्रकाशकांनी ती कादंबरी मागे घेतल्याचे जाहीर केलेले आहे. इंग्रजीचे जागतिक स्थान आणि महत्त्व पाहता त्या भाषेत केलेले एआय-निर्मित लेखन सध्या बहुधा सर्वाधिक असू शकेल. त्या तुलनेत सध्या तरी प्रादेशिक भाषांमधले ‘असले’ उद्योग मर्यादित असावेत. त्या भाषांमध्ये बेमालूम घुसखोरी करण्यासाठी या तंत्राला अजून बराच पल्ला गाठावा लागेल.

एकंदरीत पाहता नजीकच्या काळात साहित्यजगतात दोन प्रकारची लेखने वाचकांना उपलब्ध असतील. त्यापैकी एक असेल ते लेखकाने स्वयंप्रज्ञेने केलेले नैसर्गिक व प्रामाणिक लेखन आणि दुसरे म्हणजे अर्थातच एआयच्या कारखान्यातून घाऊक प्रमाणात बाहेर पडलेले कृत्रिम चकचकीत लेखन. बाजारातील या दोन्हींच्या स्पर्धेत आपल्या पुढ्यातील लेखनाचा नीरक्षीरविवेक करणे हे सर्वस्वी सुजाण वाचकाच्या हातात असेल.
************************************************************************************************************
टीप : हा लेख लिहिण्यासाठी आंतरजालावरील मुक्त माहितीचा वापर केलेला असला तरीही प्रत्यक्ष हे लेखन स्वतः विचार करून आणि मानवी हातांनीच लिहिलेले आहे याची खात्री बाळगावी ! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक नवीन गोष्टीला विरोध होतो.
असे म्हणत विरोध मोडीत काढायचा नाही. एआय चा मदतनीस म्हणून वापर केला तर काय होईल? मला तरी असं वाटतं कि माणसाची क्रिएटिव्हिटी सर्वोच्च आहे. तिची जागा एआय घेऊ शकत नाही. मी चूक असेन कदाचित. पण एआय सपाट कथा कविता लिहील असा माझा अंदाज आहे. त्यात बारकावे येणार नाहीत.

कथा लिहिताना जर 1932 सालच्या महत्त्वाच्या घटना, त्या वेळेस असलेले पोषाख यांची माहिती एआय नेट घेतली तर हरकत नसावी.

पूर्वी लेखक प्रत्यक्ष जागा पाहून येत. ही मेहनत कथेत चांगली रंग भरत असे. तर कालिदासाने एका जागी बसून मेघाचा प्रवास लिहिला त्यावर पुण्यातील डॉक्टर भावांनी स्वतःच्या विमानाने त्या प्रवासाचा वेध घेतला. एरियल फोटो आणि कालिदासाचे वर्णन तंतोतंत जुळते अशा अर्थाचे लेख त्यांनी मराठी वर्तमानपत्रात लिहिले होते. त्याचं पुस्तक येणार होतं.

पण गुगल आल्यावर गुगलच्या सहाय्याने जर हे सर्व बसल्या जागी मिळत असेल तर लेखक का घेणार नाही?

एआय मुळे दहा वेबसाईट वाचण्याचे कष्ट कमी झाले आहेत.

एआय ने पूर्ण कथा यावर मत देता येणार नाही. आधी अशा कथा बघायला लागतील. एआय चा अतिरेकी वापरही नको आणि साप साप म्हणून भुई धोपटणे नको. अतिरेक कुठेच नको.

छान लेख. मुद्द्यांशी सहमत.
AI मध्ये ज्या झपाट्याने सुधारणा होत आहेत ते पाहता जे लेखन आज सपाट, कृत्रिम चकचकीत वाटत आहे ते काही काळाने वाटणार नाही. म्हणजे माणसाने लिहिलेले कोणते व AI ने लिहिलेले कोणते हे ओळखता येणार नाही हि अवस्था लवकरच सर्व भाषांत गाठली जाईल असे वाटते.

टिप नसती तर...
तरी मला वाटतं AI जे digitized आहे तेच शोधून देते आणि त्यात अजूनही सुसंगती नाही. गणितीभाषा अलंकारिक कशी होईल.
रंग ले आयेंगे, रूप ले आयेंगे
कागजके फुल खुशबू कहासे लायेंगे ?

सर्वांना धन्यवाद !
प्रतिसादांमधील मुद्दे व साधक-बाधक चर्चा आवडली.

कुमार सर, छान कथा.
मला सुद्धा ह्या AI मुळे आपण विचारशक्ती, प्रतिभाशक्ती गमावून बसू की काय असे वाटते.
AI मध्ये ज्या झपाट्याने सुधारणा होत आहेत ते पाहता जे लेखन आज सपाट, कृत्रिम चकचकीत वाटत आहे ते काही काळाने वाटणार नाही. म्हणजे माणसाने लिहिलेले कोणते व AI ने लिहिलेले कोणते हे ओळखता येणार नाही हि अवस्था लवकरच सर्व भाषांत गाठली जाईल असे वाटते.>>>>>> अगदी सहमत

त्यामध्ये लेखनात बोलीभाषा आणि विशिष्ट समूहांच्या भाषेचा (slangs) पुरेसा वापर, पारंपरिक लेखनशैलीची काही प्रमाणात मोडतोड, वाचकाला साद घालणारी निवेदनपद्धती, काही प्रमाणात मुद्दामून बिघडवलेली शब्द अथवा वाक्यरचना आणि काही धाडसी लेखन प्रयोगांचा समावेश, हे त्यातले काही उपाय. ही झाली लेखकांची बाजू.>>>>>>>>

असे लिही हा प्रॉम्प्ट ए आय ला दिला तर असेही लिहिल ए आय. ते तसेही खुप जलद शिकतेय.

फेबुवर लोक लंब्याचौड्या कथा टाकत असतात ज्यात परिच्छेदही नसतात. तेही सगळे ए आयची देण असे वाटते. मी तर सरळ स्क्रोल करुन पुढे जाते.

५० व ६० च्या दशकात लिहिलेल्या कथा आज तंतोतंत खर्‍या होताना पाहुन आश्चर्य वाटते.

* असे लिही हा प्रॉम्प्ट ए आय ला दिला तर असेही लिहिल ए आय.
>>>
खरंय, याचे उत्तर येणारा काळच देईल.
दरम्यान एका भाषेच्या प्राध्यापकाने लिहिलेले हे स्फुट वाचनात आले :
https://theconversation.com/is-ai-really-writing-from-a-priestess-to-phi...

त्यातील हे निवडक :
“ . . . Although AI can generate creative texts, its writing may not “move souls” the way human writing does. Several studies show a “pro-human attribution bias” or an “AI penalty,” meaning that people prefer human writing even when AI writing is stylistically similar. People want to read what other people write, not what an algorithm pumps out. . . .”

मी स्वतः एआय च्या मदतीने 3 दीर्घ कथा आणि एक कादंबरी लिहिली आहे आणि ती काहींना वाचायला दिली असतं त्यांना आवडली सुद्धा
एआय रुक्ष नाही उलट मदतनीस होऊ शकतो हा स्वानुभव
ज्यांच्याकडे कथाबीज आहे पण ते फुलवण्यासाठी आवश्यक असणारे शब्द किंवा लिहायचे कष्ट नसतील तर त्यांना एआय वरदान आहे
आणि जसे कितीही गर्दी झाली तरी दर्दी वाचक चांगलेच लेखक शोधून वाचतो त्याप्रमाणे एआय ने कितीही पुस्तके लिहिली तरी प्रतिभावंत लेखकांना धोका नाही
धोका आहे तो भरड पुस्तके लिहिणार्यांना

खूपच छान परिचय करून दिलात कथेचा कुमार.
१९५४ साली लेखकाला सुचलेली ही कल्पना, Automatic Grammatizator हे नाव, व त्याने पुढे वास्तविक उतरेल असा केलेला कल्पना विस्तार, हे मला खूप रोचक वाटले. ही कथा वाचेनच.

आता एआयद्वारे लेखना बाबतीत थिंकींग aloud:
कुठले लेखन एआयकडुन लिहिलेले व कुठले मानवी हे ओळखण्याबाबत AI लेखन मानवी वाटावे म्हणुन जे काय प्रयत्न करायचे ते करूनही, लेखन कोणत्या प्रकारचे, ते लघु की दीर्घ - दीर्घ असल्यास ओळखता येण्याची शक्यता अधिक, आणि विशिष्ट बोली स्लँग सोबतच ती विशिष्ट जीवनशैली तिथल्या प्रत्यक्ष जीवनानुभव या सगळ्यांचा समावेश होईल.

मला खानदेश किंवा जरावा लोकांबद्दल विशेष काही माहीत नाही. एआय ने खानदेशातील बोली, तिच्या काही लकबी वापरून एखादी कथा लिहिलीय किंवा जरावांबद्दल जी माहिती आहे त्यावर आधारित कथा लिहिलीय तर मला दोन्ही अगदी वास्तव वाटुन ही एआयने लिहिली की मानवाने हे सांगता येणार नाही. पण खानदेशातील त्या स्थानिक भागात जगणाऱ्याला, जरावांमध्ये दीर्घ काळ राहुन आलेल्या कुणाला त्या लेखनात अनेक त्रुटी आढळुन, रिलेट न होवून कुण्या विशेष कष्ट न घेतलेल्या लेखकाने किंवा ए आय ने ते केले आहे हे चटकन सांगु शकेल.
अशा वेगवेगळ्या ठिकाणी तिथले लोक जे प्रत्यक्ष पहातात, अनुभवतात, जगतात ते सगळे एआयला फिड होईल का आणि सतत फिड होत राहील का? असे झाल्यास सर्वच प्रकारच्या लेखनाबाबतीत एआय आणि मानवी लेखनातील फरक फारच कमी होऊ शकतो. तो सर्व प्रकारा बाबतीत शून्य होईल का याचा मला अंदाज बांधता येत नाहीय.
पण बऱ्याचशा लेखनात अजिबात फरक कळणार नाही हे मात्र नक्की होईल असे वाटते.

इथे सर्वजण AI ला मानवा पेक्षा गौण समजताहेत. जसे आपण कुत्रा घोडा किंवा चिंपांझी ला समजतो. एका संशोधकाने लिहिले आहे तसे मानवी विश्वात केवळ सात कथानके आहेत. तसेच भाव पण सहाच आहेत. तसेच आपण AI ला मानवी चष्म्यातून बघायची चूक करतो. पण ही परिस्थिती थोड्याच काळात बदलणार आहे. तेव्हा AI जे साहित्य लिहील ते आपल्या समजण्याच्या पलीकडचे असेल.

अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचतोय.
एआयच्या मदतीने लिहिलेली कादंबरी,
धोका आहे तो भरड पुस्तके लिहिणार्यांना,
दोन्ही प्रकारच्या लेखनांमधील फरक येत्या काळात कसा कमी राहील आणि
एआय आपल्या समजण्याच्या पलीकडे जाऊ शकेल,
हे वरील सर्व मुद्दे मननीय आहेत.

सर्वांना धन्यवाद !

NVIDIA चे संस्थापक जेन्सन हुआंग यांनी पदवीदान समारंभात केलेल्या भाषणात AI संबंधी केलेले विधान :

“AI तुम्हाला रिप्लेस करणार नाही, परंतु AI चा तुमच्यापेक्षा अधिक प्रभावी वापर करणारी व्यक्ती तुम्हाला मागे टाकू शकते”.

https://www.lokmat.com/editorial/will-ai-make-humans-fall-behind-in-the-...

Has an AI-authored story just won a literary prize? What does it mean for writing and books?
At least one – and maybe three – of the five regional winners of the Commonwealth Short Story Competition faces allegations of using AI to write the stories.
https://scroll.in/article/1093049/has-an-ai-authored-story-just-won-a-li...
बातमी मुळातून वाचा.

वरील बातमी संबंधित स्फुट काल लोकसत्तामध्ये वाचले होते. मूळ बातमीचा पहिला परिच्छेद वाचायला लागल्यानंतर ती मोफत नसल्याचा फलक समोर आला !
असो..

ओ हो ! दुसऱ्या प्रयत्नात बातमी वाचायला मिळाली. अगदी रोमहर्षक आहे.
इथून पुढे आता AI plagiarism हा शब्द नित्याचा होणार आहे !

संबंधित बातमीचा सारांश या अप्रतिम वाक्यात आलेला आहे :
". . .. So the question is this: should literature now be judged on the basis of the quality of the work, irrespective of how it was produced?"

एकूण काय, तर मागच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे,
"“AI तुम्हाला रिप्लेस करणार नाही, परंतु AI चा तुमच्यापेक्षा अधिक प्रभावी वापर करणारी व्यक्ती तुम्हाला मागे टाकू शकते”,
हे खरोखर होणार आहे , नव्हे, होत आहे.

लेखात उल्लेख केलेल्या Shy Girl कादंबरीबाबत देखील वाद झाला होता. तेव्हा लेखिकेने आपण ती स्वतःच्या मनाने लिहीली असल्याचे सांगून हात झटकले आणि पुढे म्हणाली की, प्रकाशकाच्या संपादकांनी एआय साधने वापरली असू शकतील.
थोडक्यात काय,
लेखक >> संपादक>>> प्रकाशक या क्रमाने जाणारी व्यावसायिक पुस्तके कधी ना कधी एआयच्या मांडीवरून जाणार हे उघड दिसत आहे Happy
. .
संगणकपूर्व काळात पुस्तके अथवा लेखांच्या बाबतीत संपादकीय हात फिरवणे हा वाक्प्रचार होता. भावी काळात तोच संपादकीय हात एआयचे बोट (घट्ट ?) धरून चालत राहील !

आपण AI ला अशी सापत्न वागणूक किती दिवस देणार आहोत? पाहिजे तर त्या साठी वेगळा विभाग उघडावा. AI वापरून कथा लिहिणे हेही साधे काम नाही. AI वापरून कसे लिहावे ह्याबद्दल बरेच साहित्य आता उपलब्ध आहे.
ह्या कथे बद्दल जजेस काय म्हणतात पहा.
According to Sharma Taylor, judge, Caribbean region, “Jamir Nazir’s language is sublime – precise yet richly evocative – conjuring vivid, lush imagery with remarkable economy. Through sharp sensory detail, he renders the Grove as a living presence, where labour, landscape, and memory are intimately entwined. Polished and confident, this is a story with a melodic voice that lingers long after the final line. Jamir Nazir’s prose pulses with a voice of restraint and quiet authority – a beautifully told and assured piece of storytelling.”

फारच मस्त झाले आहे लेखन. वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करून- माहिती घेऊन अगदी रोचक लिहिले आहे. Happy

लेखकांना त्यांचे नाव वापरून AI ला लिहायला लावणं मला अनैतिक वाटलं. काही तरी morally wrong आहे. माबोवर सुद्धा असं यांत्रिक लेखन दिसतेय, निर्जीवपणाचा सुळसुळाट होतो आहे. मी येथे फक्त ह्यूमन कनेक्शन साठी येते, त्यामुळे रूक्ष माहिती वाचवत नाही. काही तरी चुकत आहे. तुम्ही लिहिल्याप्रमाणे विचारशक्ती कमी, कमी होत जाणार आहे. त्यामुळे माझ्या पुरतं तरी मी त्याच्या वाटेला जात नाही. लेखाखालची टिप Lol

प्रतिक्रिया सुद्धा माहितीपूर्ण आहेत.

आपण AI ला अशी सापत्न वागणूक किती दिवस देणार आहोत? AI वापरून कथा लिहिणे हेही साधे काम नाही. >> Well said. अगदी सहमत.

दर्जापेक्षा, एखादी कथा कुणी लिहिली यालाच महत्त्व दिले जाते. याचे कारण त्या लेखकांभोवती एक वलय निर्माण झालेले असते आणि ते तसे व्ह्यायला आणि ते तसेच रहायला त्या लेखक मंडळींचा हातभार असतो. ते वलय टिकून राहिले तर त्यातच त्यांचा जास्त फायदा असतो. बहुतेक कला क्षेत्रात हा प्रकार दिसून येतो. जर कुठल्याही कलेमध्ये निष्पक्षपणे दर्जा ठरवायचा असेल तर blind testing करून ते ठरवले पाहिजे. म्हणजे परिक्षेत कसे फक्त रोल नंबर लिहून उत्तरपत्रिका दिली जाते आणि तशीच तपासली जाते, असा प्रकार केला पाहिजे. उत्तम गायक कोण ते ठरवताना पडद्यामागे गाऊ द्यावे, चित्रकार कोण आहे ते जाहीर न करता प्रदर्शन भरवावे, पुस्तकावर लेखकाचे नाव न टाकता लेख, कविता प्रकाशित करावे. पण एकहीजण याला तयार होणार नाही आणि त्यामुळेच जेव्हा AI त्यांना तुल्यबळ होऊ लागते, तेव्हा ते त्यांना आवडत नाही.

मी नोकरीला लागलो तेव्हा प्रत्येक ऑफिसमध्ये स्टेनोग्राफर्स असत, जे अगदी झटझट लिहून, बर्‍याचदा त्याचे व्याकरण सुधारून, वाक्यरचना बदलून टाइपरायटरवर पत्र लिहून साहेबाला देत असत. माझ्या मनात विचार आला की काँप्युटर आले तेव्हा त्या स्टेनोग्राफर्सनापण अशीच भिती वाटली असेल का? आपण सुंदर पत्र चुका न करता लिहितो, याचा त्याला अभिमान असेल का? आपण जे काम करतो ते आता स्वतः साहेब करू शकतो, हे बघून त्याला काय वाटले असेल? त्यामुळे त्याचा अभिमान गळून पडला असेल का? तो खिन्न झाला असेल का? आपले महत्त्व आता कमी होणार हे त्याला समोर दिसले असेल का? लेखकांची परिस्थिती पण काहीशी अशीच आहे. सुरुवातीला काँप्युटरना पण असाच विरोध झाला होता. पण तुम्हाला आवडो वा न आवडो, येणारे नवीन तंत्रज्ञान तुम्ही थोपवू शकत नाही.

It is not the most intellectual of the species that survives; it is not the strongest that survives; but the species that survives is the one that is able best to adapt and adjust to the changing environment in which it finds itself. - चार्ल्स डार्विन

चांगली साधकबाधक चर्चा. वाचतोय.
धन्यवाद !

हे मुद्दे विशेष आवडले :
1. "मी येथे फक्त ह्यूमन कनेक्शन साठी येते",
आणि
2. "कुठल्याही कलेमध्ये निष्पक्षपणे दर्जा ठरवायचा असेल तर blind testing करून ते ठरवले पाहिजे".
. .
शाळा कॉलेजमध्ये जशा आयत्यावेळी विषय देऊन बोलण्याच्या वक्तृत्व स्पर्धा असतात त्याचप्रमाणे आता साहित्य क्षेत्रातील लेखनस्पर्धा देखील अशाच प्रकारे लेखकांना एका परीक्षा दालनात बसून घ्यायच्या का, असा गमतीशीर विचार मनात आला.

मी मा़झ्या काही मतांमध्ये बदल करू इच्छितो. हा धक्का आहे मला.
मी जे आय वापरत होतो ते गलिच्छ मराठी वापरते. त्यामुळं एआय कधीच सर्जनशील होऊ शकत नाही हे ठाम मत झालं होतं.
पण चॅटजीपीटीला रोमँटिक गझल लिही असे सांगितले तेव्हां त्याने जी गझल लिहीली त्याने आश्चर्य वाटले. याचं मीटर कुठलं हे ठाऊक नाही. काही शब्द नवख्या कवीसारखे आहेत, तरीही ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आता नवीन कविता वाचताना सतत शंका राहील. जे कविता लिहीतात त्यांचाही आनंद निघून जाईल. त्यांच्या सर्जनशीलतेवर शंका घेतली गेली तर तो अपमान असेल, पण एआय मुळे अशी परिस्थिती उद्भवणार आहे.

केसांत चांदण्याचे गजरे गुंतले तुझ्यामुळे
या रातराणीचे श्वास सारे दरवळले तुझ्यामुळे

ओठांवरी थरथरते नाव तुझेच मंदसे
मी बोलणे टाळले, डोळेच बोलले तुझ्यामुळे

पहिल्याच स्पर्शाने हा देह पावसाळला
अंगणातल्या मोगऱ्याचे ऋतूही फुलले तुझ्यामुळे

भांडून मी बसले होते खिडकीत एकटी अशी
पापण्यांतले हट्टी ढग हळवेच विरघळले तुझ्यामुळे

सांगू कशी तुला मी, स्त्रीपणाची ही गुपिते
आरशातले माझे मलाच रूप आवडले तुझ्यामुळे

हायलाईट केलेले शब्द खटकले. नाहीतर ही निर्दोष कविता झाली असती. मीटरमधे पण चुका असाव्यात असं वाटतंय,

वरील गजल तयार करताना एआयने शांता शेळके यांच्या
‘आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे’. .
या कवितेचा आधार घेतला असावा का, अशी एक शंका उगाचच मनात आली.

दोन्ही काव्यांमध्ये भरपूर ‘मुळे’ आहेत .

चर्चा वाचतोय!

मला एक वाचक म्हणून काही फरक पडत नाही AI असल्याचा. फक्त ते ओळखता आले की मजा जाते आणि मी ते चक्क वाचायचे सोडून देतो. हे असे आणखी कोणाचे होते का? तसे असल्यास AI समोर नवीन चॅलेंज हे असेल की ते AI आहे हे ओळखता येऊ नये. आणि याचे टेन्शन AI ला घेऊ द्या. आपण कश्याला घ्यायचे.

या कवितेचा आधार घेतला असावा का,
दोन्ही काव्यांमध्ये भरपूर ‘मुळे’ आहेत .>>> Lol
AI कल्पकतेच्या मुळावर उठलेय शब्दशः Lol

* याचे टेन्शन AI ला घेऊ द्या. आपण कश्याला घ्यायचे. >>> वेगळा विचार !

* कल्पकतेच्या मुळावर उठलेय >>>> भारीच ! Happy
. . .
सध्या पश्चिमी जगात साहित्यातील नोबेल विजेत्यांसह अनेक मान्यवर लेखकांवर एआय वापरल्याचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. यासंबंधीच्या चर्चा वाचायला रोचक असतात.
https://notesfrompoland.com/2026/05/21/polish-nobel-literature-laureate-...

Szczepan Twardoch या लेखक महोदयांनी केलेली ही टिप्पणी बघा :
“Entering into a ‘relationship’ with a language model, whether emotional or creative, makes about as much sense as marrying a vibrator.

Pages