धुक्यात हरवलेले...

Submitted by शिवानी बलकुंदी on 12 May, 2026 - 03:30

नुकतेच नवीन घरात प्रवेश करून जेमतेम महीना झालेला, दिवाळी नवीन घरीच करूया यावर सगळ्यांचेच एकमत झालेले म्हणून कसेबसे काम संपवून नव्या घरात डेरेदाखल झालो. स्वतः चे स्वतंत्र घराचे स्वप्न पूर्ण झाले, मुलांना त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र खोल्या मिळाल्या, आईंना त्यांचे मोठे देवघर आणि खोली मिळाली यामुळे मी, अहो, त्यांची आई, मन्या, आणि डुब्बी असे सगळे मनापासून सुखावले होतो.
नवीनच वसाहत असली तरीही आसपास थोड्या थोड्या अंतरावर घरे होती. नाही म्हणायला घरा च्या मागच्या रस्त्यावरून पुढे गेल्यावर एक जूने हेमाडपंथी बांधकाम असलेले कृष्ण मंदिर होते, सकाळी कितीदा तरी तिथला घंटानाद झाल्यानेच मी जागी होत असे.
दिवाळी आनंदात नव्या स्वतः च्या स्वतंत्र घरात साजरी झाली म्हणून, आसमान ठेंगणे झाले होते, त्या आनंदात, नव्या घरात दिवाळी साठी आलेले पाहुणे आता परतले होते.
दिवाळीचा उत्साह अजून ओसरला नव्हता त्यामुळे लवकर उठुन सडा, रांगोळी करायला माझे आत बाहेर सुरूच होते. घराची बाकी मंडळी मात्र दिवाळीच्या सुट्ट्या म्हणून डाराडूर झोपलेली होती. एवढ्यात रस्त्यावरून कुणीतरी पळत पळत गेलय असं वाटलं, पण छे, सकाळच्या अशा शांत वेळी, तुरळक घरे असलेल्या या निर्मनुष्य रस्त्यावरून कोण जाणार असा विचार करून मी घरात परतले, एवढ्यात कुणी फाटकातून आत येतय असे वाटले. कोण असेल म्हणून बाहेर येऊन पहिले, पार फाटक उघडून बाहेर नजर टाकून बघीतले तरी बाहेर कुणीच नाही, आणि रस्त्यावरही कुणीच नाही, रस्त्यावर तर धुक्यामुळे फारसं लांबच दिसत नव्हतं, मात्र गल्लीच्या टोकापर्यंत बघितले तर कुणीतरी लहान मुलगी जाते आहे, असे वाटले.
कोण बरे असेल ही मुलगी? अंधारालेल्या, धुक्यात हरवलेल्या रस्त्यावरून कुडकुडणार्या एवढ्या थंडीत कोण असेल रस्त्यावरील कुत्र्येही एवढ्या थंडीत अंगाचं मुटकुळं करून झोपली असणार, तिच्या सोबतीला पण कुणीच दिसत नव्हते. एकटीच अशी कुठेशी चालली असेल?
तिला आवाज द्यावा असा विचार मनात आलाच होता, तेवढ्यात ती गल्लीच्या कोपर्‍यावरून वळून गेलीसुद्धा.
त्या मुलीबद्दल जास्त काही विचार करण्यास अजिबात वेळ नसल्याने, मी जास्त खोलात न शिरता तडक रोजची आन्हीक आटोपुन कामाला सुरुवात केली.

तो दिवस तर इतर दिवसांप्रमाणे घरची, ऑफीसची कामे करून संपला. झोपायला पलंगावर आडवी झाले आणि अचानक मला सकाळी दिसलेल्या मुलीची आठवण आली. कितीतरी वेळ उगाचच् ती आठवून झोप येत नव्हती, मध्यरात्री कधीतरी डोळा लागला असेल, आणि पहाटे रोजसारखीच देवळातील घंटेच्या आवाजाने जाग आली, आणि मी दचकून उठले. खरे तर या आवाजाने मी याआधी देखील उठलेली होती, पण कधी एवढे दचकायला झाले नव्हते. आज कधी नव्हे ते मी उठल्या बरोबर आधी अंगणात गेले, उंच फाटका बाहेर कुणीतरी उभे आहे असे वाटले, थोडी भीती थोडी उत्सुकता वाटून मी, कोण आहे ऱे ? असे मोठ्याने विचारले तर कुणीतरी पळत पळत गेले असे वाटून गेले. म्हणू मी परत फाटक उघडून बाहेर जाऊन बघितले तर ती मुलगी परत कोपऱ्यावरून जाताना दिसली.
आज आता या मुलीच्या मागे जायचेच असे ठरवून आणि न राहवून मी तिच्या मागे निघाले देखील, रस्त्यावर थोडं धुकं आणि अंधुक असा दिव्यांचा मंद मंद प्रकाश होता, त्या अंधुक उजेडात ती मुलगी पाठमोरी आणि मी तिच्या मागे मागे रस्त्याने जातेय, मी तीला आवाज देत देत जातेय आणि ती मुलगी आपल्याच नादात पुढे पुढे जाते आहे.
रस्त्यावरून जाताना समोरून गाडी चा प्रखर झोत अंगावर आल्यामुळे माझे लक्ष तिकडे गेले, कार बाजूने निघून गेल्यावर ती मुलगी अचानक दिसेनाशी झाली. अरे अशी कुठे गेली असेल? मी सभोवताली बघितल्यावर मला सगळी कडे दाट धुके पसरलेले आहे असे जाणवले. अचानक थंडीची जाणीव झाली, आणि मी घरातून बाहेर येऊन अंधारात इथे काय करते आहे? मला तर काही कळतच नाहीये, मी इथे घरातल्या कपड्यांमध्ये कशी? माझे घर तर इथून दोन गल्लींच्या पलीकडे आहे, आता सकाळ होणार आहे की रात्र आहे? असा विचार करून मनात भीतीची जाणीव तीव्र झाली, आणि थंडीतही कपाळावर घाम आलेला जाणवला.
मी भरभर घराकडे जायला निघाले. सकाळी पेपर टाकणारी, कामावर जाणारी मंडळी दिसू लागली तसे मला आता सकाळ होणार आहे याची खात्री पटली. घरातून आत जाताना लक्षात आलं की फाटक उघडेच आहे, घराचा दरवाजा देखील उघडा आहे घरातली मंडळी अजूनही गाढ झोपलेली आहे, मी घराबाहेर गेल्याचे कुणाला कळले पण नाही पण मग मी तरी कशी एकटीच घरा बाहेर पडले? आणि काय म्हणून तिकडे गेली असेल? विचार करून करून डोक्याचा पार भुगा होतो आहे की काय असे वाटले.
संगळे जण झोपलेले असल्यामुळे घरच्या लोकांना काही सांगावे का न सांगावे, अशा संभ्रमात पडल्यामुळे मी विचार करून गप्प गप्प च होते, आणि रोजच्या प्रमाणे कामे करत होते, नाही म्हणायला आहो आई म्हणाल्या देखील, “अग आज काही बोलत नाहीयेस, बर वाटत नाहीये का तुला?”,
“काही नाही आई, आज लवकर जायचे आहे ना म्हणून, सगळी कामे आटोपून लवकर निघते आहे,
मी ऑफिस ला पोहाचेले. पीसी सुरू होईसतोवर मनात देवाचे स्मरण करून कामाला सुरुवात केली. कामांच्या नादात आणि पोहचण्याच्या घाईमुळे एव्हाना मी सकाळी बघितलेल्या मुलीबद्दल पार विसरूनही गेले होते,

पण कुणीतरी मागे उभे आहे असे वाटून मी दचकून मागे बघितले. रश्मी माझी असिस्टंट उभी होती. मी दचकले, तशी ती म्हणाली, "एवढे दचकायला काय झाले गं?, सरांनी कालची फाईल करेक्ट करून परत दाखवायला मागितली आहे. मी तू सांगितल्यावर परत काही बदल केलेत, एकदा चेक करतेस का? " तुला पाठवली आहे बघ.." का कुणास ठाऊक मला परत सकळचा प्रसंग आठवला त्यामुळे रश्मी च्या बोलण्याकडे माझे फारसे लक्ष नाही देऊ शकली . तरीपण मी फाईल उघडून त्यावर एक नजर फिरवली. आणि विशेष खोलात न जाता, ओके म्हणून तीला परत पाठवून दिली.
दुपारीही लंच टाईम मधेही माझे रश्मीच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतेच. रश्मी ला सकाळ चा प्रसंग सांगावा का म्हणून मनात विचार डोकावून गेला, पण छे, ती मलाच चक्रम म्हणेल असा विचार करून मी तीला माझं डोकं दुखतंय, बरं वाटत नाहीये असं म्हणून मी अर्धा दिवस रजा घेऊन जाते म्हणून सांगितले आणि घरी जायला निघाले. घरी गाडीने जाता जाता सकाळ बद्दल विचार करून करून डोकं बधिर झालं होतं.
मात्र मी पहाटेच्या अंधारात घराबाहेर एकटीच निघालेली होती, एवढेच मला स्मरत होते, पण कशी काय तिकडे गेले होते हे कोडे काही उलगडत नव्हते.
घरी पण सगळ्यांना बरं वाटत नाहीये असं सांगून मी शांत शांत च होते, मुलांच्या बडबडीकडे तर माझे अजिबात च लक्षच नव्हते, काही नाही तरी किमान होम वर्क झालेय का? जेवायला चला एव्हडे तरी मी मुलांशी बोलतेच, हे तर घरी पण कुणाशी तरी अखंड फोनवरच बोलत होते त्यामुळे यांना काही सांगावे तर त्यांना बोलायला वेळच नव्हता त्यामुळे माझे आटोपून मी झोपायला गेले सुद्धा..
केव्हातरी जाग आली तेव्हा एक गोड मुलगी माझ्या समोर मंद मंद हसत उभी होती तिचा चेहरा खूप ओळखीचा वाटत होता, आणि मी तिच्याकडे बघून का कुणास ठाऊक पलंगवरून उठून उभी राहिले, तशी ती झरकंन दाराबाहेरून अंगणात गेली सुद्धा आणि मी देखील तिच्या मागोमाग चालू लागले.
ती पहाटेच्या धुक्यातून अंधारातही अगदी मजेत रस्त्याने निघाली मी देखील थंडी, धुकं, अंधार असूंन ही त्याची तमा न बाळगता आपोआप तिच्या मागेमागे ओढल्या सारखी चालत राहिले. आणि आम्ही एका मंदिरात जाऊन पोहचलो, अरे हे तर घराजवळचेच कृष्ण मंदीर आहे, मंदिरातील वातावरण भारावलेले. धुपाच्या धूरात, मंद सुगंधात अगदी धीरगंभीर झाले होते, देवाच्या मूर्तीवरील भाव तर असे की आत्ता तो कृष्ण सखा आत्ता बोलू लागेल, माझे हात तर अगदी नकळत जोडले गेले, एवढ्यात त्या लहान मुलीने देवासमोर बसून सुर धरला आणि ती सुरेल आवाजात भजन म्हणू लागली, तिच्या त्या गोड आवाजाने माझी तंद्री लागली आणि मी तल्लीन होऊन भजन ऐकू लागली. अचानक घंटा नाद झाला, माझी तंद्री भंग झाली आणि मी डोळे उघडले तर सकाळ झालेली होती मला रोज सारखीच जाग आली, उठायला अंमळ उशीरच झाला होता म्हणून मी झटकन उठले आणि उठून माझी सकाळची कामं झपाझप करायला सुरुवात केली आज एक महत्वाची मीटिंग होती म्हणून ऑफिस मध्ये रोजच्या पेक्षा लवकर जायचे होते.

#सुरपाखरू
शिवानी बलकुंदी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

एवढीच आहे कथा.
ती कृष्णाची मीरा होती.
असा माझा अंदाज..
छान लिहिली आहे.. शैली आवडली Happy

जूने हेमाडपंथी बांधकाम असलेले कृष्ण मंदिर होते, >> हेमाडपंथी शैलीत बांधलेली बहुतेक मंदिरे शंकराची किंवा देवीची आहेत. कथा काल्पनिक आहे हे माहित आहे पण नुसते जुने मंदिर किंवा दीड दोनशे वर्षे जुने मंदिर असे लिहिता आले असते

प्रतिक्रियांसाठी मनः पूर्वक धन्यवाद, @ धनवंती, सामो, शर्मिला, ऋन्मेssष, मेधा,
हो कथा एवढीच आहे. कथेचा शेवट मुद्दामच असा केला, वाचकांच्या कल्पनेसाठी किंवा त्यांना जसे आवडेल तसे, कथा आणखी पुढे वाचायला आवडेल का?

हेमाडपंथी हा शब्द मुद्दाम च वापरला आहे, फक्त जूने मंदीर म्हटल्याने तो फील नाही येत. तरीही सुचनेसाठी धन्यवाद.