एका धर्मगुरूला संस्कृती+ भाषा + धर्म + ईश्वर या भ्रमाचे आवरण फाडणारा झालेला साक्षात्कार!

Submitted by राज अज्ञानी on 9 May, 2026 - 03:04

भ्रमाचे आवरण फाडणारा एक साक्षात्कार

( ज्यांना व्हिडीओ लिंक वर क्लिक करायला काहीही अडचण नाही त्यांनी लेख स्किप करून थेट व्हिडीओ बघायला सुरूवात करावी. ज्यांना मजकूर हवाय त्यांच्यासाठी सारांश दिला आहे. पण तपशील जाणून घेण्यासाठी व्हिडीओ बघावाच लागेल.)

धर्म, भाषा, संस्कृती हे सर्व मानवनिर्मित आहेत म्हणून तो भ्रम आहे हे आपल्यातल्या कित्येकांना मान्य होणार नाही. आपल्यावर लहानपणापासून होणारे संस्कार हेच सत्य आहे असे आपल्याला वाटते. आपण जे शिकतो ते सर्व कृत्रिम आहे, मानवनिर्मित आहे, नैसर्गिक नाही हे कधी कधी जाणवते पण ते स्विकारता येत नाही अशी अवस्था कधी अनुभवली आहे का?

एका आदिवासी जमातीमुळे आदिम मानवाचे रहस्य उलगडण्यास मदत झाली आहे. आदिम मानव कसा होता, तो कसा विचार करत होता हे आज आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आधुनिक मानवी संस्कृतीचा संसर्ग न झलेल्या किंवा कमीत कमी झालेल्या मानवी संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल. अशाच एका प्रयत्नात एका धर्मगुरूला चक्क नास्तिक व्हावे लागले. पूर्वी लल्लनटॉपचा एक सेक्शन असलेल्या आणि आता स्वतंत्र असलेल्या खबरगावने त्यांच्या अलिफ लैला या सेग्मेण्टमधून एक व्हिडीओ रिपोर्ताज प्रकाशित केला आहे. मात्र हा विषय नवीन नाही. भाषाशास्त्रज्ञ नोआम चोस्की यांच्या भाषेच्या सिद्धांताला आव्हान देणारा हा अहवाल असल्याने यावर वादळ उठले होते. घटनाही जुनीच आहे. खबरगावने आज या वादाला उजाळा देऊन या पिढीसाठी नव्या माध्यमातून घटना समोर आणली आहे. लिंक शेवटी दिली आहे.

व्हिडीओचा सारांश खालीलप्रमाणे

:

अमेझॉनच्या दाट जंगलात माईसी / मॅयिसी नदीच्या काठी एक छोटी पिराहा नावाची आदिम जमात राहते.
आजमितीला या जमातीची सुमारे तीन हजार चारशे इतकीच लोकसंख्या आहे . त्यांची भाषा जगातल्या इतर कोणत्याही भाषेशी मिळती-जुळती नाही. त्यांच्याकडे संख्यांसाठी आकडे नाहीत, ते उच्चारण्यासाठी शब्द नाहीत, रंगांची नावे नाहीत. कालमापन नाही. उद्याचे नियोजन ना इतिहास नाही कि इतिहासाची कथा नाही आणि देव किंवा धर्माची कोणतीही कल्पना नाही.

या जनजातीकडे १९७७ मध्ये एक ख्रिस्ती धर्मगुरू आणि भाषा अभ्यासक डॅनियल एवरेट आपल्या पत्नी आणि तीन लहान मुलांसह पोहोचला. त्याचं मिशन होतं, पिराहा भाषा शिकणे, बायबल त्यांच्या भाषेत भाषांतर करणे आणि त्यांना ख्रिस्ती धर्मात आणणे. अमेरिकन चर्चकडून भरपूर आर्थिक मदत मिळाली होती. एवरेटला खात्री होती की, देवाचे वचन त्यांच्या भाषेत ऐकवले की ते आपोआप बदलतील. जिथे देवाधर्माच्या कल्पनांचा स्पर्श झालेला नाही तिथे नव्या धर्माला विरोध होत नाही. कारण तिथे धार्मिक अहंता आड येत नाहीत. कारण ती नसतेच. हे काही तरी नवीन आहे म्हणून ते स्विकारले जाते, जसे ईशान्य भारतात झाले आहे.

पण इथे घडले उलटे. तीस वर्षे त्या जमातीसोबत राहिल्यावर एवरेट स्वतःच बदलला. तो धर्मगुरू म्हणून गेला आणि नास्तिक बनून बाहेर पडला. भाषा, संस्कृती, ईश्वर, धर्म हे सर्व मानवी भ्रम आहेत, हे त्याला पटले.

पिराहा लोक फक्त जे प्रत्यक्ष पाहतात किंवा जे एखाद्या जिवंत माणसाने पाहिले आहे, त्यावरच विश्वास ठेवतात. भूतकाळातील किंवा भविष्यातील काल्पनिक गोष्टींना त्यांच्याकडे स्थान नाही. त्यामुळे देव, स्वर्ग, नरक किंवा कोणतीही अमूर्त कल्पना त्यांना समजतच नाही. एवरेट जेव्हा येशूची कथा सांगायचा, तेव्हा ते विचारायचे, “तू त्याला पाहिले आहेस का?” उत्तर नाही मिळाले की ते ऐकायचे थांबवायचे. नंतर एवरेस्टच्या लक्षात आले कि दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या येशूला त्यांनी पाहिलेले नाही त्यामुळे त्यांना त्याच्या अस्तित्वात रस नाही. जो कुणी ऐकवेल त्याने त्याला पाहिलेय का हे ते विचारतात. त्यानेही पाहिलेले नाही तर मग विषय संपवतात. खूप सिंपल फंडे आहेत त्यांचे. येशू ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. पण इतिहास ही कल्पनाच त्यांच्यासाठी अस्तित्वात नसल्याने ऐतिहासिक व्यक्ती त्यांच्यासाठी शून्यवत आहेत.

कुणीतरी म्हटलेले आहे कि "वर्तमानात जिवंत माणसे राहतात. त्यांच्यावर इतिहासातल्या व्यक्तींचं राज्य असू नये". हे वचन त्यांच्या बाबतीत किती खरं आहे. कसलाही अभ्यास न करता, विद्वत्तापूर्ण खडाजंगी न करता ते या मार्गावर आहेत.

त्यांची भाषा इतकी वेगळी आहे की तिने जगप्रसिद्ध भाषाविद् नोम चोम्स्कींच्या ‘युनिव्हर्सल ग्रामर’ सिद्धांतालाच आव्हान दिले. चोम्स्की म्हणतात की, भाषा ही जन्मजात जैविक क्षमता आहे आणि प्रत्येक भाषेत ‘रिकर्शन’ (एक वाक्य दुसऱ्याला जोडणे) हे मूलभूत आहे. पण पिराहा भाषेत असे काही नाही. त्यांचे वाक्य छोटे, सोपे आणि वर्तमानकालाशी संबंधित असतात. जटिल वाक्यरचना किंवा इतिहास सांगण्याची गरजच त्यांना भासत नाही. ते छोटी वाक्ये बनवतात. वाक्ये जोडणारे शब्द म्हणजे "जसे, ज्याचे, जिथे, ज्याने, पण, किंतु, परंतु, आणि, म्हणून, कि" वगैरे त्यांच्या लेखी अस्तित्वातच नाहीत.

हे अशा नदीतले मासे आहेत जी अ‍ॅमेझॉनच्या जंगलातून दूरवर वाहत येते असं वाक्य ते वापरत नाहीत. ते म्हणतील. नदीतला मासा. वाक्य संपले. नदी वाहते. वाक्य संपले. संभाषणासाठी एव्हढेच गरजेचे आहे.

संख्या ही संकल्पना त्यांच्यात नसल्याने दुसर्‍या भागातले व्यापारी त्यांना फसवतात, हे कळल्यावर एवरेटने त्यांना गणित शिकवण्याचा प्रयत्न केला. आठ महिने रोज शिकवले. तरीही कोणालाच दहापर्यंत मोजता आले नाही. रंगांसाठीही स्वतंत्र शब्द नाहीत. लाल म्हणजे रक्तासारखे, हिरवे म्हणजे कच्चे. त्यांना फक्त प्रत्यक्ष अनुभव पुरेसा वाटतो. रंगांना ते त्या रंगांच्या वस्तूवरून ओळखतात.

या जमातीत राहताना एवरेटला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ते आनंदी होते. ते दिवसात इतर कुठल्याही आनंदी माणसापेक्षा जास्त हसतात.
देवाशिवाय, इतिहासाशिवाय, भविष्याच्या चिंतेशिवायही त्यांचे जीवन समाधानी होते
त्यांचे जीवन सोपे आहे असे अजिबात नाही. त्यांना दु:ख नाही, संकटं नाहीत असंही नाही.

मृत्यू, आजार, सर्प किंवा जंगली प्राणी यांच्याशी ते रोज सामना करतात. तरीही उद्या काय होईल याची चिंता न करता आजच्या क्षणात जगतात. त्यांची ‘सरळ डोकं’ (हियाई) अशी स्वतःची ओळख आणि बाहेरच्या लोकांना ‘वक्र डोके’ म्हणणे यातच त्यांचा साधेपणा दिसतो. खरं तर इथे वक्र हा शब्द वापरावासा वाटला कारण सांस्कृतिक दबाव. वाकडे डोके हाच शब्द वापरायला हवा. साधेच बरे. साधेच ऐवजी साधंच असा शब्द हवा होता. पण आपल्यावर किती दबाव असतात.

एवरेटला प्रथम वाटले की तो त्यांना बदलवेल. शेवटी बदल झाला. पण कुठला?

बायबल भाषांतर करूनही ही जमात देवाधर्माकडे वळली नाही. उलट, त्यांच्या ‘फक्त जे दिसते ते खरे’ या तत्त्वाने एवरेटच्या श्रद्धेला हादरा दिला. जे दिसत नाही, ज्याचा पुरावा नाही, त्यावर विश्वास ठेवणे त्याला भ्रम वाटू लागला. १९८५ पर्यंत त्याने ख्रिस्ती धर्म सोडला आणि नंतर स्वतःला नास्तिक म्हणवू लागला. म्हणजे बदल झाला तो त्यांच्यात नाही तर एवरेस्ट मधे झाला. त्याचेच धर्मांतर झाले.
गावठी म्हण आहे "ढवळ्याशेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला".

आजच्या माणसाला ही सत्यकथा विचार करायला लावते.
आपण भाषा, संस्कृती, धर्म आणि ईश्वर या संकल्पनांना किती अटळ आणि आवश्यक समजतो. अटळ मानण्याचे कारण म्हणजे यांचे अस्तित्व आपल्या जन्मापासून हजारो वर्षे आधीचे आहे असे आपल्याला वाटत असते.

पण पिराहा लोक दाखवतात की, यांशिवायही पूर्ण, आनंदी आणि सत्यनिष्ठ जीवन जगता येते. फक्त वर्तमानात जगणे, प्रत्यक्ष अनुभवावर विश्वास ठेवणे आणि गरजेनुसार साधेपणाने जगणे एवढेच पुरेसे आहे.

हे भ्रम नाहीत असे वाटणारे आपले जग आहे.
एवरेटसारख्या एका धर्मगुरूला अमेझॉनच्या जंगलात फक्त भ्रमच वाटले. ही कहाणी आपल्या समजुतींना हलकेच धक्का देते आणि विचार करते, खरे काय आहे, आणि आपण कशावर विश्वास ठेवतो ते? ही जमात आज तीनशे ते चारशे लोकांचीच आहे. तिची भाषा या माणसाने शिकून घेतली. अर्थात त्यामागे त्याचा स्वार्थ होता. त्याला दिलेलं मिशन पूर्ण करण्यासाठी त्याला ती शिकायची होती. पुढे काय झालं असतं?

पिराहा ख्रिस्ती झाले असते. मग हळू हळू इंग्लीश बोलू लागले असते. वेगळी भाषा शिकल्यावर संस्कृती बदलते. इथे संस्कृतचे अर्थच बदलतात. या आदिवासी लोकांची रूढ अर्थाने संस्कृती नाही. नैसर्गिक किंवा आदिम संस्कृती आहे. तिच्यावर आधुनिक किंवा सुसंस्कृतपणाचे आवरण चढवले गेले असते. मग या लोकांना आधुनिक संस्कृतीची ओळख करून दिली असती. यातून ते अमेरिकेत गेले असते किंवा त्यांच्या कडे सुधारक आले असते. शाळा शिकले असते. मग त्यांना शिक्षणाप्रमाणे काम मिळाले असते. "मुख्य प्रवाहात" आणले गेले असते. आता मुख्य प्रवाहाला साजेलशी एलिट राहणी आणि भाषा ते शिकले असते..

मग इस्लाम हा आपला शत्रू आहे. इराणी हे आपले शत्रू आहेत हे त्यांना शिकवले गेले असते. एक "सुखी जीवन" काय असते, विकास काय असतो हे त्यांना शिकवले गेले असते. हे सुख कायम राहू द्यायचं तर आपल्याला शत्रूचा नायनाट केला पाहीजे. शत्रूला संपवण्यासाठी सैन्यात तीन वर्षे नोकरी केली पाहीजे इत्यादी..

काही वर्षांनी पिराहा अमेरिकनाळले असते. पिराहा संस्कृती हळूहळू नष्ट झाली असती.
आपल्याकडे प्राचीन असलेल्या पाली, अर्धमागधी या भाषा मृतप्राय झाल्या आहेत. ग्रामीण मराठी लोप पावत चालली आहे. खानदेशी, वर्‍हाडी भाषांना आपण बोली मानतो. खडी भाषा महाराष्ट्रात अल्प राहिली आहे. झाडी बोलीही नष्ट होत चालली आहे. झाडीबोलीतले नाटक मृत्यूपंथाला लागलेले आहे. सर्वांनी प्रमाण मराठी बोलावे असा आग्रह धरला जातो. ज्यांची ही भाषा नाही त्यांच्या प्रमाण भाषेची टर उडवली जात असे. काही वर्षांपासून ते कमी झाले आहे. तरीही एखाद्याच्या चुकीबद्दल "दाताखाली खडा आल्यासारखे वाटले" अशा प्रतिक्रिया येत असतात.

जुनी प्राचीन संस्कृती जपण्याबद्दल आपली ही जागरूकता आहे. इथे आपली आदिम शैली काय आहे ते कोण समजावून घेणार?
हा व्हिडीओ पाहिल्यापासून मनात घर करून असलेला विचार पुन्हा बळावला आहे. प्रगती, विकास म्हणजे काय? आपण विकासाच्या मागे लागून खरंच आनंदी होतोय कि आपल्यासोबत विकासाच्या रेट्याने संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश घडवून आणतोय? थांबायला हवंय का? पिराहा जमातीचं जीवन आपल्याला जागे करतंय का?

https://www.youtube.com/watch?v=V78s5JT7Qe8

या विषयासंदर्भात अधिकचे संदर्भ
१. अ) https://search.brave.com/search?q=daniel+everett+piraha&spellcheck=0&sum...अ)

ब) https://www.youtube.com/watch?v=bzg0MJf7zm0

क)चोम्स्कीने एवरेट च्या दाव्यांबद्दल स्ट्राँग मत दिले होते. त्यावरून विविध ठिकाणी चर्चा सुरू आहेत. काही आता दुर्दैवाने उपलब्ध नाहीत. कदाचित भारतात दिसत नसेल. वाचक अधिक सर्च देऊन पाहू शकतात.
https://www.youtube.com/watch?v=UBla-h36ywA
एवरेटने त्याच्या वेबसाईटवर बरंच काही दिलं आहे.

२.https://www.reddit.com/r/spirituality/comments/11ybtmc/what_does_daniel_...

३. https://ffrf.org/fttoday/april-2010/articles-april-2010/the-pirahae-peop...

४. एवरेटचं पुस्तक - डोन्ट स्लीप देअर आर स्नेक्स
त्याची अन्य पुस्तकंही रोचक वाटताहेत.
https://daneverettbooks.com/books/dont-sleep-there-are-snakes/

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक!
संस्कृती, भाषा, धर्म, ईश्वर हे भ्रम नाहीसे होणे हाच खरा साक्षात्कार. Happy

आपला मेंदू जन्मतः भाषा शिकण्यास सक्षम आहे पण एक वैश्विक व्याकरण जनुकात नसावे हे पटण्यासारखे आहे.

एव्हरेटचे पुस्तक वाचेन.

छान लेख. आवडला. लल्लनटॉप चा विडिओ पाहिला. नवीन माहिती कळली. दुसऱ्या युट्युब व्हिडीओ ची लिंक गाण्याची आहे. चुकून वेगळी लिंक दिली गेली असावी.
एकूणच हि जमात रोचक दिसते. वरवर तरी सुखी वाटतायत. आपल्या अंदमानात पण अश्या जमाती असाव्यात. पण मला काही फारशी माहिती नाही त्याबद्दल.
पुराव्याशिवाय सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, हि चांगली गोष्ट आहे.
संस्कृती, भाषा या चांगल्याच गोष्टी आहेत. फक्त त्यावरून संघर्ष होणे वाईट.

मस्त व्हिडिओ आहे!
चेक करूया म्हणून सुरू केला आणि थांबलोच नाही.

तुमचा लेख सुद्धा छान जमला आहे. त्यामुळेच उत्सुकता वाढली.

आज जिथे आहे तिथेही या पिराहा लोकांसारखेच जगायला आवडेल. ना भूतकाळाचे ओझे ना भविष्याची चिंता. ना धर्माचे बंधन, ना कोणी आखून दिलेली शिष्टाचाराची चौकट..
दोन चार गरजेपुरते शब्द बोलून जगत आहेत निवांत आपल्या विश्वात आणि आपण इथे इंग्लिश फ्ल्यूएंट बोलता आली पाहिजे नाहीतर आपले काही खरे नाही याचे टेन्शन एकीकडे तर परप्रांतीयांना आपली भाषा यायलाच हवी अशी अपेक्षा दुसरीकडे ठेवून जगत असतो Happy

तो धर्मगुरु बदलल हे त्याचे विशाल मन. (ओपन माईंड)
.
बाकी रानटीपणातून संस्कृती निर्माण करण्याकरता ऋषीमुनी झटलेले आहेत आणि त्याचे फळ म्हणजे आपल्या समजुती. काही का असेना हे देव , सद्भावना, वसुधैव कुटुंबकम वगैरे, मूल्याधारित शिक्षणच होते.
ते नंतर विसरले गेले. देव एका जागी आपला काळा धंदा दुसर्‍या जागी. गल्लत होता कामा नये - वगैरे चापलूसी आली.
.
माणूस आला म्हणजे बायसेस आले.

लाल म्हणजे रक्तासारखे, हिरवे म्हणजे कच्चे.

उद्या काय होईल याची चिंता न करता आजच्या क्षणात जगतात.

या आदिम जमाती आणि चिम्पान्झी सारख्या बुद्धिमान मर्कटामध्ये फरक काय आहे?

एकंदर आदिवासी जीवनशैलीचे कौतुक करण्याची फॅशन सध्या फार बोकाळली आहे असे जाणवते.

>>> एकंदर आदिवासी जीवनशैलीचे कौतुक करण्याची फॅशन सध्या फार बोकाळली आहे असे जाणवते.

मला वाटते त्याच्या खूप पलीकडचा संदेश आहे या लेखात

प्रत्येकाचं आपलं मत असतं त्यामुळे ते खोडायचं नाही.
खरे सरांचं जे मत आहे अशा प्रकारचं मत माहीत आहे. काहींना माझ्यासारख्यांचा हा दुटप्पीपणा वाटतो, जे खूप स्वाभाविक आहे.

या बाबतीत स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे.
देशादेशात लागलेली ही स्पर्धा जोवर थांबत नाही तोपर्यंत हा विनाश चालूच राहणार आहे. वसुंधरा किंवा द अर्थ नावाने जे विचारमंथन चालू आहे ते आशादायी आहे. अडचणि येत राहणार. पण विचार जिवंत आहे तोवर बदल होण्याची शक्यता आहे.

गरज किती तेव्हढा विकास झाला तरच हा ग्रह राहण्यासाठी योग्य ठरणार आहे. या वर्षीची उष्णतेची लाट हा इशारा होती. तरी आपण शिकलो नाही तर विनाश अटळ आहे.

आजच्या जगात युद्ध, हिंसाचार, गरीबी, ताणतणाव आहे हे सर्व संस्कृतीच्या विकासातून आलेलं आहे. त्यातून देशांच्या सीमा आल्या. परस्परांबद्दलचा अविश्वास निर्माण झाला. स्पर्धा आली. स्पर्धात्मक विकास आला. त्यातून निसर्गाचे ओरबाडणे सुरू झाले.

विकासामुळे माणसाचे आयुष्य वाढले. पण त्यामुळे लोकस्ण्ख्याही वाढली.
पिराहा जमातीची लोकस्ण्ख्या फक्त ४०० आहे. इथे विकास पोहोचला नाही. त्यामुळे मृत्यूदर जास्त असणार. प्रेग्नन्सीच्या वेळी मृत्यू असणार. जन्मदर कमी, मृत्यूदर जास्त. यामुळे लोकसंख्या मर्यादीत आहे. या मर्याईत लोकसंख्येला पोट भरायला जेव्हढं लागतं ते मुबलक आहे. त्यामुळे निसर्गावर ताण येत नाही. फक्त माणसानेच निसर्ग ओरबाडला तर इतर प्राण्यांना काय उरणार हा प्रश्नच इथे नाही.

यात वाईट काय आहे?
असंच जिणं असलं पाहीजे ही सक्ती नाही. पण आयुष्य कसं असावं याचं तारतम्य पिराहांकडून शिकता येईल.
एकट्याने हा बदल होणार नाही. एक देश हा बदल करू शकत नाही, पण हा विचार टिकला तर तो जास्तीत जास्त देशांपर्यंत पोहोचला पाहीजे. जागतिक चळवळीमुळे बदल होई शकतो. जगाच्या प्रवाहाविरूद्ध पोहणे शक्य नाही. तसेच देशांतर्गत प्रवाहाविरूद्ध पोहणेही शक्य नाही.
मात्र आपण चर्चा करू शकतो.

छान पोस्ट.
पृथ्वीचं जे काय आयुष्य आहे, त्यात निसर्गतः जिवनास अनुकूल परिस्थिती जो पर्यंत राहील (सूर्य राक्षसी तारा होण्यास वाटचाल करून जिवन नष्ट करण्यापर्यंत) तो पर्यँत पृथ्वीवर जिवन रहाण्याची शक्यता शाश्वत विकासामुळे वाढेल. यात इतरही खाचाखोचा असतील, तेव्हा पृथ्वीवर जास्तीत जास्त काळ जीवन रहाण्यास शाश्वत विकास आवश्यक आहे असे म्हणता येईल. याच अर्थी तुम्ही आधी लिहिले आहे आणि त्याच्याशी सहमत आहे.

आता शाश्वत विकासासाठी आपल्याला फार मोठा त्याग करावा लागेल का? मी याबद्दल जे काही वाचलं त्यावरुन तरी असं वाटलं नाही. मी चूकतही असेन आणि व्यक्तीनुसार वेगळे मतही असू शकते. पण त्यासाठी लोकसंख्या मात्र लौकर नियंत्रणात आणावी लागेल. लौकर म्हणजे जननदर नियंत्रणाचे जे योग्य ते उपाय असतील त्याद्वारे शक्य तितक्या लौकर.
जगात महत्वांकांक्षी लोक असतात आणि त्यांच्या हव्यासापोटी जंगले नष्ट करणे, पर्यावरणावर मोठ्याप्रमाणात प्रतिकूल परिणाम होणाऱ्या गोष्टी करतच राहणे, युद्ध आणि प्रगत युद्ध म्हणजे पर्यावरणाची मोठी हानी इत्यादि, यावर नियंत्रण करण्याचे मोठे आव्हान असेल.
समजा हे सगळं शक्य झालं तर शाश्वत विकासात लोक आनंदी राहतील का? नसतील तर मग शाश्वत विकास शाश्वत राहणार नाही.
संस्कृती, भाषा चांगली. पण यातूनही तुम्ही काही उदाहरणे दिली तशी अनेक समस्या व आव्हाने आहेत. आपण जे काही मानसिक मायाजाल उभे केले आहे - कुटुंब, नाती, समाज त्यांच्या सौख्याच्या, सुरक्षेच्या, यशाच्या, नीतिमत्तेच्या कल्पना, ठोकळेबाज पणा, परंपरा, इतिहास, आपापले देव, पंथ धर्म , दुरभिमान यात आपण वास्तवापासून फार दूर गेलो आहोत का? हीच आमची संस्कृती आणि हाच आमचा मार्ग आणि तोच योग्य मार्ग यावर सगळे जग ठाम झालेय का? युवाल नोआ हरारी यांनी लिहिलंय की धर्मामुळेच (अगदी सुरवातीच्या काळातील श्रद्धा -समजूती-कल्पना) यामुळेच आपण चलन वापरू शकलो मोठ्या प्रमाणात संघटित होऊ शकलो. (हे खरे मानले तरी याशिवायही होऊ शकलो नसतो का? शंभर पिराहांना एकत्र येण्यास धर्मासारख्याच एका संकल्पनेची गरज भासेल का? असे प्रश्न आहेत.) पण त्यामुळेच आता आपण त्याला कवटाळून बसल्याने त्याचे दुष्परिणामच जास्त होत नाहीयेत का?
एवढी प्रगती आपण केलीय तर अशा आपापल्या संस्कृती, समजुती, भाषा, इतिहास, धर्म, ईश्वर यांना कवटाळुन बसून तेच आपल्याला तारणार या भ्रमाचे आवरण गळुन पडणे हाच खरा साक्षात्कार असे मला वाटले. याशिवाय माणुस आनंदाने जगू शकतो याचे पिराहा हे उदाहरण आहे. जिवनाकडे बघण्याचा एक वेगळा पण प्रॅक्टिकल ऍप्रोच आहे. आपण सगळेच तंतोतंत त्यांच्यासारखेच केले पाहिजे असे नाही म्हणजे वल्कले बांधुन जंगलात निघून जाणे. तर हे भ्रम नाहीसे झाल्याने आपण धर्मवाद, समाजवाद, पुंजीवाद, आदर्श जिवनाच्या आपापल्या कल्पना वगैरेतून बाहेर पडुन नवा दृष्टीकोन निर्माण करू शकु का जो शाश्वत विकासाला पूरक असेल?

शाळकरी आदर्शवादी निबंध वाटु शकतो हा याची कल्पना आहे. पण आपापले धर्मवादही तसेच आहेत. आणि त्यात सगळी उधारीच आहे. आत्मा विल रेस्ट इन पीस, मोक्ष, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, जन्नत इत्यादि.
उधारी पेक्षा रोखेकडे क वळु नये?

एक मुद्दा विसरून चालणार नाही तो म्हणजे पिराहांची कॉग्निशन ऍबिलिटी आपल्यापेक्षा कमी नाही. त्यात त्यांच्या परिस्थितिशी ती काही बाबतीत खास विकसित झालेली आहे, जे अपेक्षितच आहे सगळीकडे होते त्याप्रमाणे. म्हणजे कमी बौद्धिक क्षमता म्हणुन ते श्रद्धा, ईश्वर, धर्म यांकडे वळण्यास असमर्थ आहेत असे नाही.

सामो, मानव.
चांगले मुद्दे. मानव तुम्ही मर्म पकडले आहे. हा विषय आपल्या नेहमीच्या समजुतीपेक्षा वेगळा आहे.
पिराहांनी हे सिद्ध केले आजे कि मानवाच्या मुलभूत जाणिवांमध्ये देव , धर्म येत नाही. ते विचारमंथन होऊन नास्तिक झालेले नाहीत तर नास्तिकता हीच आपली मुलभूत जाणीव आहे. देव, धर्म हे बाह्य प्रदूषण आहे. असेच कोणकोणते प्रदूषण आपल्या विचारात झालेले आहे हे ती पुटं बाजूला केल्याशिवाय स्विकारता येत नाही.

पिराहांनी हे सिद्ध केले आजे कि मानवाच्या मुलभूत जाणिवांमध्ये देव , धर्म येत नाही. ते विचारमंथन होऊन नास्तिक झालेले नाहीत तर नास्तिकता हीच आपली मुलभूत जाणीव आहे. देव, धर्म हे बाह्य प्रदूषण आहे. >>> सहमत. हे बाह्य प्रदूषण मुक्त होणे हे अतिशय अवघड आहे. फार कमी जणांना जमते.

कुठलीतरी मूठभर माणसे वेगळी वागली म्हणून तेच जगभरातल्या माणसाचे मूळ आहे हा निष्कर्ष काही पटत नाही.

जे मी पाहिले नाही त्यावर मी विश्वास ठेवणार नाही हे सुद्धा काही फार थोर लॉजिक झाले नाही.

कुठलीतरी मूठभर माणसे वेगळी वागली म्हणून तेच जगभरातल्या माणसाचे मूळ आहे हा निष्कर्ष काही पटत नाही.>> पिराहा होमो सॅपियन्सच आहेत, आपलेच बांधव आहेत. ईश्वर, धर्म मानव निर्मित (मुझे क्रेडीट नही चाहीए) आहेत यावर काहींचा विश्वास नाही, मतभेद वाद आहेत. त्यावर याने पडदा पडतो. आदिवासींच्या अभ्यासात ते काहितरी श्रद्धा बाळगतात, ईश्वराचे अस्तित्व मानतात असे दिसून येत होते. यातून अभ्यासक मंडळी फक्त ईश्वर या मानवी संकल्पनेचा उगम कसा केव्हा झाला हे शोधतात तर या केवळ मानवी संकल्पना नाहीत मानणारे यातून पहा ईश्वर त्यांच्यातही आहे म्हणजे मानव निर्मित नाही असा निष्कर्ष काढतात. आता आपल्यासमोर आदिवासींची टोळी आहे जे बॉयोलॉजीकली आपलेच बांधव आहेत, त्यांचे व आपले मेंदू सारखेच आहे, कॉग्निटिव्ह ऍबिलिटीज सारख्या आहेत पण त्यांना या संकल्पनेने अद्यापही स्पर्श केला नाही. तेव्हा या संकल्पना मानवी आहेत आपण मूळ नास्तिक असा निष्कर्ष निघतो.

आणि ती संकल्पना रुजवण्याचा खास दीर्घ प्रयत्न करूनही ती रुजली नाही या बाबतीत त्यांनी कसे रिस्पॉन्स दिले हे पाहता "या बाबतीत" आपण जे पहात नाही यावर विश्वास नाही हा व्हर्च्यु कामी आला.
तत्वतः मी डोळ्यांनी अथवा इतर इंद्रियांनी अनुभवत नाही ते अस्तित्वात नाही असे ठाम रहाणे शहाणपणा नाही हे अगदी बरोबर आहे.
(पण ते "हेलियम कुठे डोळ्यांनी दिसतो? पण असतोच ना! तसाच ईश्वर असतो (मग त्याला फक्त शक्ती माना वगैरे)" हा बालिश युक्तीवादही चुकीचा आहे. हे तू म्हटले नाही पण जिथे आस्तिक/नास्तिक चर्चा सुरू होते तिथे हा बालिश युक्तिवाद बहुत करून येतो म्हणुन आधीच लिहुन घेतले.)

समजा त्यांना सांगितलं की एक प्रकारचे पाणी असते त्याला आग लावता येते. त्यांनी ज्वलनशील द्रव अद्याप पाहिला नाही. ते म्हणाले नाही असं शक्य नाही. तर हे तोट्याचं की फायद्याचं हे ठरवणे कठीण आहे.

एके ठिकाणी कुणी गंधहीन, रंगहीन द्रवाचा ट्रॅप लावला आहे आणि त्यांना कुणी भला मनुष्य सांगतोय की बाबांनो पुढे जाऊ नका, ते पाण्यासारखे दिसते त्याला आग लागु शकते. त्यांनी विश्वास ठेवला नाही आणि गेले पुढे आणि ट्रॅप लावलेल्यानी ते पेटवून भडका उडवला. भयंकर नुकसान, जीवित हानी. शिकले पण मोठी किंमत चुकवून. (आपण हे बरेच काही असेही शिकलो असु.)

त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणाले आम्हाला दाखव आग लावून. एक जळते लाकूड घेतले लांबून फेकले. द्रव पेटले. प्रयोग सिद्ध होऊन विश्वास ठेवला. फायद्याचे. कारण कोणी काहीही सांगून त्यांना टोपी घालु शकत नाही.
पण लॉंगटर्म दृष्टीने हे फायद्याचेच.

हा विषय आस्तिक नास्तिक च्या पलिकडे आहे. ज्यांना या जाणिवांची जाणीव होईल तेव्हा त्यांच्याशी या विषयावर बोलता येत. हे एखाद्या कोड्याप्रमाणे आहे.