अनोळखी बंध

Submitted by निमिष_सोनार on 6 May, 2026 - 08:29

रिओ दि जानेरोच्या समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळचे सोनेरी रंग उतरले होते. दूरवर सांबा संगीताचा मंद आवाज येत होता. पण त्या गर्दीतही एक मुलगी शांतपणे बसली होती. तिचं नाव होतं एलिसा.

एलिसा एका छोट्याशा गावातून रिओमध्ये आली होती. तिच्या घरची गरिबीची परिस्थिती होती. तिचं स्वप्न होतं जगप्रसिद्ध नृत्यांगना बनायचं. तिच्या घरचे लोक तिचे हे स्वप्न समजू शकले नाहीत. त्यांनी तिला स्वप्न किंवा कुटुंब यातून एकच निवड करायला सांगितली. तिने नृत्य निवडले आणि या शहरात आली. पण या शहराने तिचं स्वागत फुलांनी नाही, तर काट्यांनी केलं. पदोपदी भीती, अवहेलना, संघर्ष आणि पोटासाठी वणवण.

तिने दिवसाला एका कॅफेमध्ये वेटरचे काम सुरू केले. काही दिवसांनी पुरेसे पैसे जमल्यावर रात्री नृत्याचे क्लासेस सुरू केले. पण तिचं आयुष्य थकवणारं होतं. तिने नंतर फुकटात त्या कॅफेमध्ये नृत्य कार्यक्रम सुरू केला कारण जगण्यासाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी अजून पैसे पाहिजे होते. कारण तिला मोठ्या स्टेजवर लाईव्ह शोज करायचे होते. लोकांनी टाळ्यांच्या गडगडाटात तिच्या नृत्याचे स्वागत करावे असे तिला वाटे. पण तिच्यासाठी कोण स्टेज शो अरेंज करणार?

ती कॅफे मध्ये रोज नाचायची पण तिच्या नृत्यातील आत्मा हरवलेला होता. प्रेरणा नव्हती. जणू काही एक अचेतन शरीर नाचते आहे. पण काही प्रेक्षकांना तिच्या हरवलेल्या आत्म्याशी तसे काही कर्तव्य नव्हते. ते बघायचे तिचे नाचणारे शरीर. तिच्या तालबद्ध हालचाली. आणि वाजवायचे, टाळ्या! पण असे होते म्हणून कमीत कमी तिला तिथे चार पैसे तरी मिळत होते.

नाचताना तिला हमखास घरची आठवण यायची. ते तिच्या नृत्यात उतरायचे आणि तिचा ताल हरवायचा.

एके दिवशी त्या कॅफेमध्ये एक वृद्ध माणूस आला. एलिसाचे नृत्य त्याने एकदा पाहिले आणि तो तिथे रोज येऊ लागला. त्याचं नाव होतं मातेओ. तो फार कमी बोलायचा, पण एलिसाच्या चेहऱ्यावरचं दुःख तो ओळखायचा.

“तू छान नाचतेस. तालबद्ध. पण मनापासून नाही” तो एकदा शांतपणे तिला तिचा एक कार्यक्रम संपल्यावर म्हणाला.

एलिसा हसली, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं.
“मनात खूप काही तुटलंय. नाते संबंध. गाव. मित्र. मैत्रिणी. केवळ आणि केवळ एका स्वप्नपूर्तीसाठी!” ती म्हणाली.

गंभीर हसून पुढे मातेओने तिला सांगितलं की, ती जगात एकटीच नाही जिला अशा प्रकारचे दुःख आहे. तो पूर्वी प्रसिद्ध गिटारवादक होता. पण एका अपघातात त्याने पत्नी आणि मुलगी दोघींनाही गमावलं होतं. त्यानंतर त्याने संगीतच सोडलं. हा निर्णय अर्थात चूक होता हे त्याला तिचे सांत्वन करतांना मात्र कळून चुकलं.

दोघांनी ठरवले. आपले मागे सुटलेले नाते विसरून दोघांमध्ये वडील मुलीचे एक नाते तयार करू. ते जगू.

त्या दिवसापासून दोघांमध्ये एक वेगळंच नातं तयार झालं. रक्ताचं नाही, पण समान जखमांचं!

मातेओ रोज गिटार घेऊन कॅफेमध्ये बसू लागला. एलिसा नाचायची आणि हळूहळू तिच्या नृत्यात पुन्हा भावना परतू लागल्या. लोक थांबून त्यांचं सादरीकरण पाहू लागले. आता लोकांना तिचे नाचणारे फक्त शरीर नाही तर त्यामागच्या भावना आणि ऊर्जा सुद्धा जाणवू लागली. ती फेमस झाली. मातेओचे आधीचे चाहते तिथे येऊ लागले. एलिसाचे नवीन चाहते तयार झाले.

दोघेही खुश होते. त्यांची स्वप्ने परतली आणि नवे नाते पण तयार झाले. दोघांना वेगवेगळे स्टेज शो मिळू लागले.

एका मोठ्या सांबा फेस्टिव्हलमध्ये एलिसाला संधी मिळाली.

पण कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मातेओची तब्येत अचानक बिघडली. त्याला असाध्य आजार झाला होता. हे आधीपासून त्याला माहित होते. पण आता तो आजार बळावला.

हॉस्पिटलमध्ये तो बेडवर आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये अडकून पडला होता.

एलिसा रडत त्याच्या जवळ बसली.

“मी उद्या परफॉर्म करणार नाही,” ती म्हणाली.

मातेओ हलकंसं हसला.

“जर तू नाचणं थांबवलं तर माझं संगीत पुन्हा मरेल. मी मरतांना माझं संगीत मात्र जिवंत होतं याहून जास्त आनंद मला दुसरा कोणताच नाही. तू नाच. माझी काळजी करू नको!"

दुसऱ्या दिवशी रिओच्या विशाल स्टेजवर हजारो लोकांसमोर एलिसा उभी होती. तिच्यावर दिव्याचा झगमगाट पडला आणि अचानक मागून गिटारचा सूर वाजू लागला. तिने मागे पाहिले. ते एक सरप्राइज होते. मातेओने तिच्यासाठी आधीच तयार करून ठेवलेला एक संगीताचा सूर तो एका व्हील चेअरवर बसून वाजवू लागला. मागे एक डॉक्टर आणि बाजूला एक नर्स होती.

एलिसा डोळ्यात अश्रू घेऊन बेभान होऊन नाचू लागली. स्टेज एक अनोख्या प्रेरणेने भारून गेलं. मातेओने आजपर्यंत एवढ्या एकाग्रतेने आणि मनापासून संगीत वाजवले नव्हते. प्रेक्षक भारावले. मंत्रमुग्ध झाले. डोलू लागले.

त्या नृत्यात तिचं नवं दुःख होतं आणि एका तुटलेल्या माणसाने पुन्हा जिवंत केलेलं संगीत होतं.

परफॉर्मन्स संपल्यावर संपूर्ण मैदान उभं राहून टाळ्या वाजवत होतं. पण एलिसाच्या नजरा आकाशाकडे होत्या. दूर आकाशात एक नवीन हसरा तारा उदयास आला होता, त्याकडे ती अश्रू पूर्ण नयनांनी बघत होती कारण त्या रात्री ब्राझीलच्या रंगीबेरंगी शहरात, स्टेजवर एका वृद्ध गिटारवादकाने शांतपणे जगाचा निरोप घेतला हिता आणि एका मुलीला तिचं खरं स्वप्न देऊन गेला होता.

(ही कथा कोणत्याही इंग्रजी कथेचे भाषांतर नाही. ही मी स्वतंत्रपणे लिहिलेली ओरिजनल कथा आहे)

- निमिष सोनार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users