गर्जा महाराष्ट्र माझा!

Submitted by भरत. on 1 May, 2026 - 03:40

आज महाराष्ट्र दिन.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापनदिन.

१ मे १९६० या महाराष्ट्र स्थापना दिनासंबंधीची ही चित्रफीत

जय जय महाराष्ट्र माझा या गीताला नुकतंच राज्यगीत घोषित करण्यात आलं.

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या
यमुनेचे पाणी पाजा
जय महाराष्ट्र माझा

भीती न आम्हां तुझी मुळीही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभुराजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरती कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा!

गीत - राजा बढे संगीत - श्रीनिवास खळे गायक - शाहीर साबळे.

महाराष्ट्राची थोरवी गाणारी आणखीही महाराष्ट्र गीते आहेत.

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय जय राष्ट्र महान

कोटि कोटि प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान
तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण
तू संतांची मतिमंतांची बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

मातीच्या चित्रात ओतिले विजयवंत तू प्राण
मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान
पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान
ब्रीद न तुटले झुंजाराचे रणी होता निर्वाण
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण
काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान
मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान
पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

गीत - चकोर आजगावकर संगीत - श्रीनिवास खळे गायक - शाहीर साबळे

संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा

जय महाराष्ट्र

हे बोल मराठी खेळती ज्यांच्या ओठी
ते सर्व मराठे आम्ही साडेपाच कोटी
ऐक्याची शपथ घेऊया काय मग खोटी
दावुनी कधी काळीचे | दैन्य भाळीचे| दिस सोन्याचे | भविष्यापोटी

राज्य मराठी नागपुराहून गोव्यापर्यंत
पैठण इकडे पसरे तिकडे दर्या अपरांत
तापी वरदा वाहती झुळझुळ तशी वैनगंगा
गोदा भीमा कृष्णा आणिती जीवन रसरंगा

हा दगड फुलांचा मर्द मराठी देश
कणी कोंडा खाया, अंगी फाटका वेश
परि नसानसांतून संचरतो आवेश
स्वातंत्र्यदेवीचे भक्त | उसळते रक्त | इमानी सक्त | साक्ष परमेश

परिमळामाजी कस्तुरी | फुलांत फूल मोगरी
ये मरा ठीचिये घरीव| विद्येचा सुकाळू करी| ती अद्भुत ज्ञानेश्वरी
तुकोबाची भावपंढरी | इथे कडेकपारीमधुन घुमली शाहिरी

भाषा जहाल चिपळूणकरी | केशवसुत देती ललकारी |गर्जती टिळक केसरी
हरिभाऊंची कादंबरी | जोतिबा जळती अंतरी | अण्णांची नाट्यचातुरी |
देवलांची कोणाला सरी | पुढे कोल्हटकर गडकरी |
पठ्ठे बापुराव फडकरी | शाहीर हैदर लहरी |
बालकवी निर्झरापरी | केळकरी नर्मचातुरी|
सानेगुरुजी भावनिर्झरी | तांब्यांची गोड ललकारी|

या मराठीच्या मंदिरी | आसनावरी थोर कितीतरी | शारदापुत्र कीर्तिवंत |
कवी कथाकार कलावंत | किती शाहीर किती संत|

अजिंठ्याची कला काय खुले | नागपुरात वैभव झुले
कोरड्यात कपासी उले | कृष्णाकिनारी शाळू डुले
कोकणची फळे अन फुले | मुंबईला बघुन मन भुले
जय महाराष्ट्र गर्जती धरतीची मुले

मराठ्यांची परंपरा तेजस्वी जाणा | जरा मनात आणा | त्यांचा त्यागाचा बाणा | नाही भ्याले मरणा
शिवराय बाजी तानाजी | ते धनाजी नि संताजी | पेशवाई पहिला बाजी| अभिमन्यूपरी जनकोजी|
राघो भरारी नि महादजी| महादजी हो गोखला बापू रणगाजी

सत्तावन सालचे बंड | पेटले चंड | राहु काय थंड | ठोकुनी दंड |
मराठे प्राण देती समरात | मर्दानी झाशीवाली हो त्यात |सायबानं हाय खाल्ली चित्तात |

आम्ही नेक मराठे हिंदभूमीचे पुत्र |आम्ही पूज्य मानतो एकच हिंदी छत्र
आमुचे आम्हांला घर राहु दे मात्र
ही एक आमुची आस | एक हा ध्यास| याच घोषास | करू सर्वत्र|

सह्याद्रीचे पिउनी वारे कृष्णेचे पाणी | वीर मराठे स्वातंत्र्याची गाती जयगाणी |
तो प्राण पाखडी वासुदेव बळवंत
चाफेकर फासावर गेले झाले यशवंत
सावरकर जन्मठेपेत अंदमानात
सात वर्ष सजा टिळकांना ब्रह्मदेशात
राजगुरू भगतसिंगाचा छावा स्वर्गात
शिरोड्याला रंगले मीठ मर्द रक्तात
बाबू गेनू शूर वीरांची मरणावर मात
क्रांतीवीर कर्मवीरांचा आमुचा प्रांत
परमीवर चक्र राण्यांना पहिले देशात
तो मराठभूचा पुत्र विनोबा संत

या हो सान थोर कुलवंत | कवी कलावंत | संसारी वा संत |
जय जय महाराष्ट्र बोला | बोला एकस्वरी बोला|
घोष तो भिडवू गगनाला

गीत - वसंत बापट. संगीत व गायक स्वर - शाहीर पिराजी सरनाईक

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे
पौरुषासि अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरें
रत्‍नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा ॥ २ ॥

नग्‍न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्‍नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ॥ ३ ॥

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरी पटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा ॥ ४ ॥

गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्‍ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा॥ ५ ॥

गीत -श्रीपाद कृष्ण कोल्हट्कर. संगीत - शंकरराव व्यास . गायक स्वर - स्नेहल भाटकर, ज्योत्स्ना भोळे

महाराष्ट्र देशा

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.।।

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।

अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा।
बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा।।

भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा।

ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी।।
जोडी इहपरलोकांसी व्यवहारापरमार्थासी
वैभवासी वैराग्यासी।।
जरिपटक्यासह भगव्या झेंडाच्या एकचि देशा

गीत = गोविंदाग्रज . संगीत - गंधार स्वर- मिथिला पालकर, गंधार

जय महाराष्ट्र!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! Happy
महाराष्ट्र देशा हे गाणं माझं अति आवडतं आहे आणि तुम्ही दिलेल्या लिंक मधलं नेहमी ऐकत असते. रोमांच उभे राहतात काही ठिकाणी - भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा..... ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. याला खासकरून. Happy

फारच छान गीतं.

अरे वा! मस्त संकलन. धन्यवाद!
'महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान' याआधी ऐकल्याचं आठवत नाही मला.

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! Happy

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईत फ्लोरा फाउंटन येथे झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात बळी पडलेल्या सामान्य माणसावर लिहिलेले मुक्त सुनीत

पण हे श्रेय तुझेच आहे - विंदा करंदीकर

अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून
तू मातीच्या कुशीत शिरलास
.... ह्याची मांडी मोडू नका ; हा माणूस शेवटपर्यंत उभा होत.
बुडणार्‍या गलबताच्या डोलकाठीसारखा. हाच्या हाताच्या मुठी वळा;
भिऊ नका, त्याच्या हातातील सर्व घट्टे खास त्याच्याच मालकीचे आहेत.
त्याचे उघडे तोंड हे असे आवळू नका, पैशाच्या पिशवीसारखे,
मेला असला तरी मवाली आहे ... पटकन शिवी घालील!

आणि असे उपचारासाठी कवटी फुटेपर्यंत थांबूही नका;
ती अगोदरच फुटलेली आहे...
पहा उगवतीला 'फटफट'ले आहे, आणि उद्याची ताजी बातमी
शाई पिऊन झिंगली आहे.

अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून
तू मातीच्या कुशीत शिरलास ;
ती माती तुला विसरणार नाही. अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे,
ह्या शेवटच्या दगडाचा आधार घेऊन एक बुरूज अजून दात विचकीत राहील.
तुझ्या अभावाजवळ मी अजून उभा आहे. अंधार आणि अधिक अंधार
यांच्यामधील रित्या रेताडात डावा पाय रोवून
मी अजून उभा आहे ... पण हे श्रेयस तुझेच आहे.

मुंबई १८-८-५६

छान संकलन आणि जयजय महाराष्ट्र माझा राज्यगीत घोषित केलं हे पण छान.
गीते सगळी।छानच आहेत. गाणी ऐकली. यातली काही आधी नीट लक्ष देऊन ऐकली नव्हती.
शेवटल्याची नव्याच्या तुलनेत मला जुनी दोन व्हर्जनच अधिक आवडतात
नव्यात संगीत छान आहे.
जुन्या पैकी एक जयवंत कुलकर्णींनी गायलेल्याचा ऑडिओ आठवणीतील गाणींवर आहे.
आणि दुसरं हे.

'महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान' >> हे रेडिओवर लागायचं. मला हे आता ऐकलं तर 'सकाळच्या कामगार सभेत हे गाणं लागलेलं आहे, आणि मी जेवण करतोय/ दुपारच्या शाळेची तयारी करतोय' असं एकदम डोळ्यापुढे आलं. ह्याला खळ्यांचे संगीत आहे माहित न्हवते.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काय होती, त्यात नक्की काय काय घडले, कसे महाराष्ट्र राज्य जन्माला आले इ. कुठे शाळेत वगैरे शिकवलेलं आठवत नाही. फक्त १०५ हुतात्मे झाले आणि तो हुतात्मा चौक इतकंच माहित होतं.
त्याच वेळी तेव्हा अत्र्यांचे कर्‍हेचे पाणी वाचलेलं, आणि अत्र्यांच्या आणि त्यांच्या (हशा) आणि (टाळ्या) आणि (प्रचंड टाळ्या) शैलीच्या प्रेमात पडलेलो. झेंडुची फुले ही त्याच काळी एकटाच वाचत हसत बसलेलो आठवते. तर कर्‍हेचे पाणी मधुनच या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि इतिहास समजलेला. तो कदाचित एका बाजुचा ही असेल पण रोमहर्षक मात्र जरुर होता.

मला आठवतच नव्हते म्हणून लिंक मधला "हे बोल मराठी" पोवाडा ऐकला. पोवाड्याला एक रॉनेस, एक वीररस असतो, तो अशा गाण्यांना फार चपखल बसतो.

मला वाटतं आपल्याला शाळेत नव्हतेच याबद्दल अमित. मलाही आठवत नाही. झी मराठी वर गर्जा महाराष्ट्र नावाची मालिका होती. अतिशय सुंदर मालिका. महाराष्ट्रातील थोर लोकांची ओळख होती. त्यात थोडे पाहिले होते. सगळे मराठी भाषक आणि प्रदेश एकाच महाराष्ट्र राज्यात यावेत म्हणून ही चळवळ होती. शिवाय मुंबई सुद्धा हातातून जाणार होती. बऱ्याच गंभीर गोष्टी घडल्या यात. तरीही कर्नाटक साईडचा बराच मराठी भाषा बोलणारा भाग तिकडेच गेला. मलाही वरवरची माहिती आहे.

हो गुजराथ आणि महाराष्ट्र हे एक राज्य होते. ते तोडून भाषावर करायचं ठरलं, पण तेव्हा मुंबई केंद्रशासित करायची ते गुजराथला जोडायची असा नेहरुंचा प्लॅन होता. तो हाणुन पाडून मुंबई महाराष्ट्र्रात आली.

नेहरू आणि स का पाटिल आणि मोरारजी म्हणजे वाईट हे एक तेव्हा समजलेलं. Lol आणि यशवंतराव चव्हाण आणि सी डी देशमुखांबद्दल आदर ही निर्माण झालेला.

असं नाही!! 'खरा इतिहास' आला न्हवता असं म्हणायचं असतं ना! Lol

हल्ली आहे का पुस्तकांत महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती बद्द्ल ? असेल तर चांगलं आहे.

त्या मालिकेत मला डॉ रूक्माबाई राऊत बद्दल कळाले. फारच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. त्यांच्यावर अजून माहिती काढून लिहायचे होते. त्या भारतातील दुसऱ्या स्त्री डॉक्टर. आनंदीबाई या दुर्दैवाने प्रॅक्टिस करू शकल्याच नाहीत. पण रूक्माबाईंनी आयुष्यभर प्रॅक्टिस केली. त्यांच्या आईचा विधवा विवाह. पण सावत्र वडिलांनी भरपूर सपोर्ट केला. त्यांचं लग्न लहानपणी झालेले आणि नवरा अशिक्षित. ह्या बुद्धिमान म्हणून नवरा आवडत नाही म्हणून घेतलेला त्यांचा बहुतेक भारतातील पहिला घटस्फोट होता. असो.‌खूप हिंमतीच्या जिद्दीच्या वाटल्या.
अवांतर सहन करा भरत. Happy

हो. नेहरू विरोधात होते. पण सगळी कडून विरोध होऊ लागल्याने त्यांना भाग पडलेले. गुजराथ आणि महाराट्र एकच राज्य असावे त्यांना वाटत होते. मग मुंबई महाराष्ट्रात जाऊ नये असेही वाटत होते.
डीटेल परत वाचायला हवे लक्षात नाही.

वर लिंक दिली आहे.
मूळ मुंबई राज्य होतं ज्यात महाराष्ट्र आणि गुजरात यांचा समावेश होता.
गुजरात , महाराष्ट्र आणि मुंबई शहर राज्य हे केंद्रशासित प्रदेश अशी त्रिराज्ये.

विंदांच्या कविते तले हातावरचे घट्टे, पैशाची पिशवी, डावा पाय , मवाली हे शब्द केवढा तरी अर्थ सांगतात.

>>> विंदांच्या कविते तले हातावरचे घट्टे, पैशाची पिशवी, डावा पाय , मवाली हे शब्द केवढा तरी अर्थ सांगतात.
हो ना!

>>>
हा माणूस शेवटपर्यंत उभा होत.
बुडणार्‍या गलबताच्या डोलकाठीसारखा

अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे
<<<
शब्द कसे तलवारीसारखे तळपतात त्यांचे!!

डीटेल परत वाचायला हवे लक्षात नाही.>>> त्यावेळच्या भाषणांचे, घटनाक्रमांचे, बातम्यांचे, लेखांचे, पोवाड्यांचे, छायाचित्रांचे, हॅंडबिल्स/भित्तीपत्रकांचे समग्र संकलन केले असेल असे एखादे अथवा एकापेक्षा अधिक पुस्तक/पुस्तके उपलब्ध आहेत का?

छान संकलन.

विंदा करंदीकर यांची 'पण हे श्रेय तुझेच आहे' ही कविता माहिती नव्हती मला. एकदम हृदयाला भिडणारी आहे.

छान संकलन
ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची
महा वंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी आमुची

स्वातीच्या धाग्यावर गाण्याचे नक्की शब्द शोधताना हे आणखी एक वसंत बापटांचे महाराष्ट्र गीत सापडले.


गीत - वसंत बापट
आकाशवाणीच्या वाद्यवृंदाने गायलेले इथे ऐकता येईल.