नजर

Submitted by शर्मिला. on 1 May, 2026 - 02:06

नजर

दिशा आणी दीपक गाडीत चढायला लागले, तेव्हा गर्दी नेहमीसारखीच ढकला ढकली करत होती. दिशा वैतागली.

खरं तर गाडी इथे चांगली पाच मिनिटं थांबते. उतरणारे लोकं आधी रांगेत उतरले, आणी नंतर चढणारे चढले, तर सगळं शिस्तीत होऊ शकतं, कुणालाही त्रास नं होता. पण तेवढा धीर कुणाला असतो? आधी चढायची घाई, आणी मग उतरायचीही घाईच. शिवाय रांगा बिंगा लावणं तर माहीतच नाही. सगळ्यांना सगळीकडे ‘मी पहिला’ हवा असतो. पहिलं राहून तरी काय तीर मारायचे असतात कुणास ठाऊक! तरी बरं, गाडीचे सगळे डबे एकाच वेळी निघणार असतात. हा तर रिजर्वेशनचा डबा. बसायला जागा तर मिळणारच आहे.

पण दिशाने सावकाश चढायचं म्हटलं, तरी मागचे लोकं होतेच ढकलायला. गर्दीच्या स्पर्शाचं तर कुणाला काही वाटतच नाही जणू! ते धक्के तर गृहितच धरायचे असतात. मुली, बायकांनी अंगभर कपडे घालणं तेवढं जपायचं, अन गर्दीच्या स्वाधीन व्हायचं. पुढे नशीब जीचं तिचं!

गाडीत चढल्यावर त्या अरूंद पॅसेज मधून वाट काढत, दिशा आपल्या सिटस शोधायला लागली. मागे दीपक होताच सतत सूचना द्यायला. जणू काही त्याने सांगणं थांबवलं असतं, तर तिला सिट नंबर दिसलेच नसते. दिशाने कान बंद ठेवायची सवय लावून घेतली होती स्वत:ला. डोळे मात्र उघडे ठेवावेच लागायचे, दीपक वर नजर ठेवायला. तेही बंद करता आले असते तर तिला आवडलं असत. पण शेवटी ती त्याची बायको होती. नवऱ्याचे गुण, त्याचे स्वत:चे असतात. त्याच्यातल्या दोषांची जबाबदारी मात्र बायकोची!

जागा सापडल्यावर दिशाला हायसं वाटलं. पॅसेज सोडून ती आत खिडकीच्या दिशेने वळली. दोघांच्याही हातातल्या बॅगा सीट खाली ठेवून हाश-हुश करेपर्यंत गाडी निघाली. दिशा खिडकीजवळ बसली. तिच्या शेजारीच दीपक बसला. आत्ता तिनं डबाभर नजर फिरवली. समोरच विशीची तरुण मुलगी बसली होती. ती हसऱ्या चेहऱ्याने दिशाकडेच बघत होती, काहीतरी बोलण्याच्या अपेक्षेने. नं मावणाऱ्या उत्साहाने तिचा चेहरा ओसंडून वाहत होता. कदाचित खूप आधीच्या स्टेशन पासून तिला कुणी कंपनी नसावी. आता समोर कुणी आलंय म्हंटल्यावर तिला बरंच वाटलं असणार.

दिशाला वाटलं, ‘हिला आपला हुंकार जरी ऐकू गेला ना, तरी फसफसल्यासारखी बोलायला लागेल, इतकी तिला भरती आलेली दिसतेय.’ एकटीच दिसत होती. तिच्या शेजारची जागा रिकामीच होती. दिशाच्या कपाळावर आठ्या चढल्या. तिने दीपक कडे बघितलं. अपेक्षेप्रमाणे तो समोरच टक लावून बघायला लागला होता. पण अजून तरी त्या मुलीला ती जाणीव झाली नव्हती. ती तिच्याच विश्वात होती.

दिशा एकटी असती, तर तीही बोलत आणी ऐकत बसली असती, समोरच्या मुलीचं बोलणं! तेवढंच एका तरुण मुलीचं जग कळलं असतं.. छान वेळ गेला असता, तीचं विश्व ऐकून घेण्यात.. पण.. पण बरोबर दीपक होता. तो बरोबर असतांना कुठल्याही मुली, बायकांशी बोलणं म्हणजे पुढे लागणाऱ्या आगी साठी आपणच काडी पेटविण्या सारखं होतं. समोरच्या मुलीकडे लक्ष नं देताच दिशाने मांडीवरची भली थोरली पर्स उघडली. आतून एक मासिक अन् आजचा पेपर काढला.

“हा घ्या, आजचा पेपर. सकाळी वाचायचा राहिलाय नं तुमचा?” दिशाने पेपर दीपकच्या हातात कोंबला आणि स्वत: मासिक उचलून त्यात डोकं खुपसलं.

आता नकोच समोर बघायला. ती मुलगी काहीतरी विचारणार.. मग आपण उत्तर देणार.. अनायसे मग दीपकला संधीच मिळेल बोलण्यात भाग घ्यायला. तो तर अश्या संधीच्या शोधातच असतो. त्याचे डोळे नाही बंद करता येणार, पण शक्य तितका आडोसा निर्माण करण्याचा नेहमीचा प्रयत्न केला होता दिशाने. नाइलाजाने दिपकने पेपर उघडला.

बोलक्या स्वभावाच्या दिशाला नाइलाजाने स्वत:ला बदलावं लागत होतं, दीपक मुळे. नको असला, तरी मुकेपणा स्वीकारावा लागत होता. एकटी असली तर, तीही बोलायची भरपूर मैत्रिणींमधे.. नातेवाईकांमध्ये.. पण दीपक बरोबर असला की सगळंच अवघड व्हायचं. तो एकटक बघत रहायचा बायकांकडे. गरज नसतांना, मध्ये मध्ये बोलायला निमित्त शोधायचा.. त्यांनाही ते कळायचंच. मग सगळ्यांनाच कानकोंड व्हायचं. तिच्या मैत्रिणी काय.. इतर बायका काय.. टाळायच्याच तिच्याकडे येणं, दीपक घरी असतांना.

लग्नानंतर दिपकचं असं वागणं दिशाच्या लक्षात आलं, तेव्हा तिला खूपच धक्का बसला. म्हणजे काही पुरुष असं वागतात हे माहीत होतं, पण ते नेहमी अनोळखी असायचे नं..! इथे आपल्याच घरातला.. स्वत:चा नवरा.. तोही अगदी उघडपणे सरळ-सरळ बघत राहतो इतर मुली, बायकांकडे.. उगाच लाळघोटे पणे बोलतो.. तिला खूपच त्रास व्हायचा. तिने आधी त्याला आडून-आडून, मग अगदी सरळपणे बोलून सुचवलं.. त्याचं वागणं किती चुकीचं आहे हे सांगितलं.. पण दर वेळी होणारी त्याची ओरडा-आरडी.. भांडणं.. शिवाय एवढं सांगून, बोलून त्याच्या वागण्यात फरक काहीच होत नव्हता.

डोळ्यासमोरचं मासिक वाचण्यात दिशाचं अजिबात लक्ष नव्हतं. गाडीच्या लयबद्ध ठेक्यात आजूबाजूच्या लोकांची अर्धी.. पूर्ण.. वाक्य कानावर पडत होती. पण खूप गोंगाट असला की खरी शांतता मिळते. त्या गोंगाटातलं काहीच आपलं नसतं. ती अधून-मधून दीपक कडे पहात होती. पेपरच्या आडून, रोखून समोरच्या मुलीकडेच बघत होता तो. ती मुलगी आता स्वप्नाळू नजरेने खिडकी बाहेर बघायला लागली होती. कदाचित, दिशाचा खडूसपणा तिला टोंचला असेल, नाही तर.. दिपकची नजर तिच्या लक्षात आली असेल...

पुढचं स्टेशन आलं तसा गाडीचा वेग कमी झाला. ‘चाय गररम..’, ‘सॅमोसा..’, चे आवाज पळायला लागले. गाडीच्या आत आणी बाहेर एकदम वेगळाच जिवंतपणा आल्यासारखा झालं. आतल्या लोकांनीही बोलण्याचे ट्रॅक थांबवून बाहेरची धावपळ बघायला सुरवात केली. “टाइम पास्स.. टाइम पास्स..” खिडकी समोरून आवाज पळत गेला. ‘हे लोकं काही विकतात.. की नुसतेच पळतात..?’ दिशाच्या डोक्यात आलच.

“शेंगा.. ओ.. शेंगा वाले..” समोरच्या मुलीने आवाज देई पर्यंत ‘टाइम पास्स..’ पुढे पळाला होता. गाडी इथे दोनच मिनिटे थांबते. कदाचित तो पुढच्या कुठल्या तरी डब्यात शिरला असेल. येईल केव्हा तरी इथपर्यंत.. असं वाटेपर्यंत गाडीने वेग घेतला. दोन मिनिटांची जाग जाऊन लोकं परत गाडीच्या जुन्या ठेक्यात गेले. समोरच्या मुलीला ‘टाइम पास’ मिळालाच नाही.
“तुझा आवाज ऐकलाच नाही त्यानं .. हे लोकं अशे पळतात ना..” आधी त्या मुली कडे अन् मग दिशाकडे अर्धवट बघत दीपक ने सुरू केलं..
दिशाने मासिकातून डोकं वर काढलं नाही. तिरप्या नजरेने तिने समोर बघितलं. मुलीच्या कपाळावर आता आठी चढली होती. ती शेंगा नं मिळाल्याची नक्कीच नसणार!

तिचा एकेरी उल्लेख तिला खटकलाच असणार. आधीच, समोरच्या नजरेची बोच असणारच. दिशाने दिपकशी बरं.. वाईट.. काहीच बोलून उपयोग होणार नव्हता. त्याने त्यातून फक्त पुढच्या बोलण्याचा धागा शोधला असता. ती गप्पच बसली.

“काही पाहिजे असेल ना, स्टेशन वर.. तर आधीच पैसे हातात घेऊन खिडकीतून बाहेर दाखवावे लागतात. त्या लोकांना आवाज ऐकू येत नाही.. पैसे बरोब्बर दिसतात..” दीपकचं चालूच होतं. त्याला नेहमीप्रमाणेच मौनाचा इशारा लक्षात आला नव्हता. की लक्षात येऊनही मुद्दामहून दुर्लक्ष करतो तो..? वैतागून तरी समोरची मुलगी बोलेल म्हणून..? किमान बायको तरी काही बोलेल.. मग एकदा संभाषण चालू झालं की, त्यात तिसऱ्या व्यक्तीला सामावून घेणं सोपं जातं..

दिशाने मनावर कितीही ताबा ठेवायचा म्हटलं, तरी दर वेळी सारखी तिच्या कपाळावरची शिर फुगलीच. दर वेळी तेवढाच संताप.. तेवढंच असहाय्य वाटायचं. बोलायचं तरी कुणाजवळ..? अवघड जागेचं हे दुखणं! माहेरी आईला सांगितलं होतं सुरवातीला, बोलता बोलता.. तर तिनेही उडवून लावलं होतं .... बदलेल हळू हळू म्हणून.. त्यांच्या सारख्या गरीब घरातल्या मुलीला, त्यांनी खातं पीतं घर मिळवून दिलं होतं.. आता पुढंच तिनेच सांभाळायचं होतं.

दिशा शिकली, हळू हळू…. आहे ते मान्य करायला! दूसरा पर्याय तरी काय होता? पण तिच्या मनावर तर सतत ताण असायचाच. ज्यांना माहीत आहे.. सवय आहे, दीपकच्या अशा वागण्याची.. त्यांच ठीक आहे. म्हणजे त्यांनाही तसं जड जातच असणार.. पण त्या आपल्या आपल्या मार्ग काढायच्या दीपक पासून लांब राहण्याचा. नवीन बायकांच्या बाबतीत, दिशा प्रयत्न करायची आपल्यापासून, म्हणजे खरं तर दीपक पासून त्यांना चार हात लांब ठेवण्याचा.

पुढच्या स्टेशन साठी गाडीचा वेग कमी झाला तेव्हा दीपक आधीच उठून उभा राहिला. “आलोच मी..” दाराच्या दिशेने जात तो म्हणाला.
मोठं जंक्शन होतं हे. गाडी चांगली पंधरा मिनिटे थांबणार होती इथे. दिशाने हातातलं मासिक खाली ठेवलं. जागच्या जागीच उभं राहून तिने जरा पाय मोकळे केले. चेहऱ्यावरचे स्नायू जरा शिथिल झाले. तिने मुलीकडे बघितलं.
आता त्या मुलीचं पूर्ण लक्ष बाहेर होतं. अर्धवट ओणवून ती अगदी अधीरपणे बाहेर बघत होती. समोरच्या विक्रेत्यांना वगळून, तिची नजर काहीतरी शोधत होती.

“आकाश.. आकाश..” तिने खिडकीतून जोर जोराने हात हलवला. बाहेरच्या आकाशलाही ती इथे असणार ह्याची कल्पना नक्कीच दिसत होती. त्याचाही हात हलला आणी गाडीत शिरायला तो दाराकडे वळला. तिच्याच वयाचा दिसत होता तो.
दिशाला आत्ता त्या मुलीच्या इतक्या उत्फुल्लपणाचं कारण कळलं. आपल्याकडे अजून चारचौघात मिठी मारायची पद्धत नाही म्हणून.. असती तर त्या मुलीने नक्कीच त्या आकाशला मिठी मारली असती. केवढी आनंदात दिसत होती ती.. सिटखाली बॅग ठेऊन, हातातला पेपर मांडीवर ठेवत आकाश त्या मुलीच्या शेजारी बसला.
‘अच्छा.. म्हणून ती जागा रिकामी होती तर.. त्याचं रिजर्वेशन इथून असणार..’ दिशाच्या लक्षात आलं.

एकत्र शिकायला असतील का ही दोघं..? सुट्ट्या संपवून परत कॉलेजला निघालेली..? की शहरात नुकतीच नोकरीला लागलेली..? एकत्र काम करणारी..? दिशा मनाशी अंदाज बांधायला लागली. कित्ती आनंदात आहेत नं ही दोघं! त्या मुलीला मघाशी हवा असलेला ‘टाइम पास्स..’ तर ती केव्हाच विसरलेली दिसत होती. त्या दोघांचही बाहेरच्या जगाकडे लक्ष नव्हतं. भरभरून हसत एकमेकांशी बोलण्यात अगदी गुंतली होती ती दोघं.

“हे घे.. जरा तोंड हलवायला आणल्या..” दीपक हातात शेंगाच्या तीन पुड्या घेऊन उभा होता.
दिशाने एक पुडी हातात घेतली.

“ही तुझ्याकरता..” दिपकने समोरच्या उत्साहाला खीळ घालत, एक पुडी मुलीसमोर केली.
“नक्कोय..” समोरून रागातच उत्तर आलं. तिच्या सैलावलेल्या हसऱ्या चेहऱ्यावर परत आठी उमटली होती.
हातात दोन पुढ्या घेऊन दीपक तसाच बसला, टक लावून समोर बघत.. पुढची वाक्य शोधत..

मुलीने मित्राच्या मांडीवरचा पेपर उचलला. पेपरच्या पानाच एक टोक आकाशकडे दिलं. त्यातली काहीतरी बातमी दाखवतेय असं, दाखवत स्वत: पण त्यात चेहरा खुपसला. कुजबुजत्या आवाजात ती आकाशशी बोलायला लागली.

समोरच्या आरपार जाणाऱ्या नजरेपासून स्वत:चा बचाव करत......

दिशाने आकाशकडे नजर टाकली.. अधिकच उदास.. संपलेली.. हरलेली..
********

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रभावी शब्दचित्रण. बायकांना न सांगताही समोरच्या नजरेचा, हेतूचा आणि वागण्यातल्या अस्वस्थतेचा sense लगेच येतो. दीपकच्या असंवेदनशील वागण्यामुळे दिशाच्या मनातला ताण स्पष्ट जाणवतो, तर समोरच्या तरुण मुलगा-मुलीच्या निरागस आनंदाशी त्याचा विरोध अधिक ठसठशीतपणे जाणवतो.

धन्यवाद धनवन्ती.
ही कथा समोरच्या मुलीला खुपणाऱ्या नजरेची कमी आणि दिशा च्या कोंडमाऱ्याची अधिक आहे.
अशा कित्येक दिशांना नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे सामाजिक वर्तुळाच्या बाहेर रहावे लागत असेल.

दिशा हे पात्र खूप छान उभं केलंय
बाकीची छान लिहिली आहेतच
पण तिची अस्वस्थ ता आणि संताप पोचला.
.
अशा नमुन्याचं काय करावं कळत नाही
स्त्री आणि तिला झेलाव्या लागणाऱ्या नजरा हा अनुभव लिहिताही येत नाही इतका किळस वाणा असतो

खूप चांगली लिहिली आहे कथा शर्मिला. अशा पुरुषाच्या बायकोची परिस्थिती प्रभावीपणे उभी केली आहे.
गंगाधर गाडगिळांची एक कथा आहे. नाव लक्षात नाही, कदाचित 'पर्व्हर्ट' असावं. बायकांचा पाठलाग करणारा, छेड काढणारा एक पुरुष, त्याचं घरातलं वागणं हा विषय. त्या कथेची आठवण झाली.

धन्यवाद किल्ली, वावे.

अशा पुरुषांच्या घरातल्या स्त्रियांबद्दल खूप कणव वाटते. असा एक दीपक पहिला आहे नात्यामध्येच .

लहानपणी एक गुन्हा ऐकला होता ओळखीच्या घरात. ती घटना कायम आठवत राहते. लिहिते सावकाश.

मला तरी स्त्रीने आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असावेच असे वाटते. कारण अश्या लोकांबरोबर झक मारत रहायला लागू नये. उद्या अधिक गंभीर काही इश्यु निघाला तर तोडता आले पाहीजे. अर्थात प्रत्येकीस शक्य नसते, हेही माहीत आहे.
अजुन एक आर्थिक स्वावलंबन म्हणजे मानसिक बळ नव्हे हेही जाणते मी. क्वचित एक असू शकते पण दुसरे नसते असेही होते.
----------
मला लेख आवडला. फक्त एक कळले नाही की हा माणूस मॅनरलेसली बघत असतो की त्याची नजरच वाईट असते अर्थात वखवखलेली असते. कारण काही लोकांना मॅनर्स नसू शकतात.
आम्ही गेल्या ट्रिपमध्ये भारतात एका रेस्टॉरंटमध्ये जाउन जेवत गप्पा मारत होतो. एक जोडपे होते ज्यांच्याकडे एकमेकांशी बोलण्यासारखे केवळ शून्य होते - भोपळा! ते दोघे बिनदिक्कत आमच्याकडे पहात आमच्या गप्पा ऐकत बसलेले होते. धिस वॉज सुपर अ‍ॅनॉइंग पण त्यात वाईट नजर वगैरे नव्हती.

माणूस मॅनरलेसली बघत असतो की त्याची नजरच वाईट असते अर्थात वखवखलेली असते. कारण काही लोकांना मॅनर्स नसू शकतात.>> माझ्या डोक्यातला (आणि प्रत्यक्ष बघितलेला पण) हा दीपक सतत फक्त रोखून बघत असतो बायकांकडे.
त्याच्या मनात कुठलेही विचार असले नसले तरी बायका मुलींना uncomfortable वाटतंच.

>>>>>>>बायका मुलींना uncomfortable वाटतंच.
मग हा बायका मुलींचा प्रश्न आहे की त्या माणसाचा? दुर्लक्ष करावे.
.
>>>>>मुलीला खुपणाऱ्या नजरेची कमी आणि दिशा च्या कोंडमाऱ्याची अधिक आहे.
हां हे पटले.