Part 5: https://www.maayboli.com/node/88113
Part 6: https://www.maayboli.com/node/88129
Part 7: https://www.maayboli.com/node/88134
मागच्या भागात...
शाळेच्या स्नेहसंमेलनात सौरभ आणि मयंकने आपल्या सुरेल वादनाने सर्वांची मने जिंकली आणि शिक्षकांकडून शाबासकी व बक्षीस मिळवले. मात्र, या यशाच्या आनंदावर विरजण पडले जेव्हा सौरभच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली आणि तपासणीअंती त्यांना कर्करोग (कॅन्सर) असल्याचे गंभीर निदान झाले. या कठीण काळात सौरभने अत्यंत प्रगल्भता दाखवत घराची जबाबदारी स्वीकारली आणि आई-वडील उपचारासाठी मुंबईला गेले असताना मागे राहून हिमतीने परिस्थिती हाताळली. त्याचे मित्र आणि शेजारी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, ज्यामुळे त्याला एकाकीपणातही आधार मिळाला. दरम्यान, दहावीची परीक्षा आणि भविष्यात कॉलेजेस वेगळी होण्याची भीती यामुळे सावनी आणि सौरभमधील नाते अधिक हळवे व घट्ट झाले. वडिलांच्या आजारपणाचे सावट आणि मनातील अस्वस्थता असूनही सौरभने अभ्यासात स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला, तरीही या मानसिक तणावाचा परिणाम त्याच्या प्राथमिक परीक्षेच्या निकालावर झाला. अशा प्रकारे, कलेतील यश आणि कौटुंबिक संकटाच्या मधल्या काळात सौरभ एका मोठ्या संघर्षाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करत होता.
आता पुढे.....
हरवलेला 'षड्ज':
शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोपाचा कार्यक्रम होता. सौरभ खूप जड अंतःकरणाने शाळेत गेला होता. बऱ्याच दिवसांनी सावनी आणि सौरभची भेट झाली, पण त्यांना बोलण्याइतका मोकळेपणा मिळाला नाही. गंधे सरही ९१ च्या बॅचनंतर निवृत्त होणार होते, त्यामुळे त्यांनाही निरोप दिला जाणार होता. सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून गंधे सरांसाठी 'टायटन'चं एक सुंदर घड्याळ घेतलं होतं. भेटवस्तू दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी सरांना चार शब्द बोलण्याची विनंती केली.
गंधे सर बोलताना थोडे भावूक झाले होते. सरांच्या भाषणानंतर काही विद्यार्थीही बोलले. मग गंधे सरांनी सौरभला विचारलं, "सौरभ, बासरी आहे का रे?" सौरभ म्हणाला, "सर, मी आज बासरी नाही आणली." इतक्यात सारंगने आपल्या सॅकमधून बासरी काढली आणि म्हणाला, "सौरभ, ही बघ!" सौरभ ती पाहत म्हणाला, "पण ही छोटी बासरी आहे." सर आग्रहाने म्हणाले, "तू वाजवतोस ते आम्हाला खूप आवडतं, काहीतरी छोटंसं वाजव." सौरभने विचारलं, "मयंक, तबला?" तेवढ्यात शिवा तबला घेऊन तिथे आला. सर म्हणाले, "हा घ्या!" सौरभ म्हणाला, "सर, आम्हाला दोन मिनिटं द्या." मयंक आणि सौरभने काहीतरी ठरवलं.
सौरभ आणि मयंक म्हणाले, "शाळेसाठी आणि सगळ्या शिक्षकांसाठी आम्ही ही दोन गीतं समर्पित करतो—"
फिरत्या चकावरती देशी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार
याचा मुखडा वाजवून झाल्यावर त्यांनी 1, 2, 3, 4 करत चुटक्या वाजवल्या आणि
बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?
हे गाण चालू झाल्यावर वर्गातल वातावरण एकदम भाऊक झालं होत, सावनी, मुग्धा, मंजू आणि सिंधू सकट बऱ्याच मुलींनी आपले डोळे पुसले.
गाणं संपता संपता सौरभला खूप भरून आलं आणि शेवटी तो बासरी वाजवू शकला नाही. तो शेवटच्या बेंचवर जाऊन बसला, त्याने पटकन डोळे पुसले आणि स्वतःला सावरलं. अख्ख्या वर्गातलं वातावरण भावूक झालं होतं. मयंकही तबला सोडून सौरभच्या बाजूला जाऊन बसला. सौरभला त्या अवस्थेत पाहून सावनी कासावीस झाली होती. सारंगलाही त्याच्या जवळ जाऊन बसावंसं वाटलं.
गंधे सरांनी मयंक आणि सौरभला शाबासकी दिली आणि सौरभच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. तितक्यात शेवडे सर आणि देशपांडे मॅडम सुद्धा वर्गावर आल्या. मयंक आणि सौरभला पुन्हा तेच गाणं वाजवण्याचा आग्रह झाला. शेवडे सर म्हणाले, "कलाकार मयंक आणि वाघोबा, वाजवा रे पुन्हा! तुम्हाला ऐकायला मिळेल, पण केव्हा ते काय ठाऊक?" देशपांडे मॅडमनाही तेच वाटत होतं. सरांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मुखडा पुन्हा वाजवला.
सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. पुढे प्रॅक्टिकल आणि त्यानंतरच्या आठवड्यात परीक्षा होती. सावनीने विचारलं, "सौरभ... All good?" सौरभ फक्त "हं" म्हणाला. सावनीला तो आज काहीसा वेगळा वाटला. तो नेहमीचा हसमुख आणि उत्साही सौरभ आज नव्हता. सावनीच्या मनात आलं, 'काय झालं असेल? शाळा संपतेय म्हणून हा इतका भावूक झाला असेल का? शाळा हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे, हे तर नक्की.'
सौरभ बाजूलाच उभा होता. सावनीने सारंगला विचारलं, "सारंग, हा आज इतका 'डाऊन' का आहे रे?" सारंग म्हणाला, "अरे, आमचे सौरभराव एकदम इमोशनल झाले आहेत." मग सौरभला समजावत तो म्हणाला, "Buck up!" सौरभ काही न बोलता तिथून निघून गेला. मयंकलाही त्याच्याशी बोलायचं होतं, पण संवाद होऊ शकला नाही. सावनी काळजीत पडली. सारंग तिला म्हणाला, "मी बघतो जरा, आमचे साहेब जास्तच इमोशनल झाले आहेत."
सौरभ सायकल घेऊन एकटाच घराकडे निघाला. सारंग त्याच्या मागे "सौरभ, सौरभ!" ओरडत गेला आणि त्याला गाठलं. तो म्हणाला, "शांत हो. चल, थोडा वेळ माझ्याकडे चल." दोघंही सारंगच्या खोलीत गेले. सारंगने त्याला पाणी दिलं. पाणी प्यायल्यावर सौरभने सारंगला कडकडून मिठी मारली आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला. अश्रूंनी सारंगचा खांदा ओला झाला. सारंग म्हणाला, "सौरभ..." सौरभ स्वतःला सावरत म्हणाला, "मी बाबांना असं पाहू शकत नाही रे!" सारंग म्हणाला, "समजू शकतो मी सौरभ. पण to be practical, तुला खूप 'स्ट्रॉन्ग' व्हावं लागेल. तू असा खचून गेलास तर कसं चालेल? काकूंना आता तूच आधार द्यायचा आहेस." सौरभ हुंदके देत म्हणाला, "हो रे, कळतंय मला. पण मी तुला कसं सांगू? एकीकडे घरची ही परिस्थिती आणि दुसरीकडे आपण सगळे वेगवेगळ्या दिशांना जाणार, हे मी कसं पचवू?" पुढे तो हळूच म्हणाला, "सावनी, रंगा सावनी..." सौरभला पुढे बोलताच आलं नाही. सारंगने त्याला जवळ घेतलं, "मला सगळं माहीत आहे सौरभ." "मी तिला कसं सांगू की मी कशातून जातोय?" सौरभने विचारलं. सारंग म्हणाला, "सगळं व्यवस्थित होईल रे, तू टेन्शन नको घेऊस. मला माहीत आहे, म्हणणं सोपं आहे, पण तू धीर धर." सौरभ हळूहळू शांत झाला आणि म्हणाला, "चल, निघतो मी आता." सारंग त्याला घरापर्यंत सोडायला आला.
दिवसेंदिवस वडिलांची तब्येत खालावत होती. भूक नव्हती, तोंडाला चव नव्हती; तरीही ते आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होते. 'सौरभची बोर्डाची परीक्षा होईपर्यंत मला काही होऊ देऊ नकोस,' असं साकडं त्यांनी देवाला घातलं होतं.
प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाल्या. सावनी आणि सौरभची भेट झाली, पण सौरभ पूर्वीसारखा राहिला नव्हता. तो फारसा बोलत नव्हता. सावनी काळजीत होती, पण ती काहीच करू शकत नव्हती. सौरभने अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.
बोर्डाची परीक्षा सुरू झाली. सारंग, अखिल आणि गौरवने सौरभला पूर्ण साथ दिली. सारंग तर सावलीसारखा त्याच्या सोबत असायचा. सौरभच्या घरी सतत कोणीतरी भेटायला येत असे, म्हणून अभ्यासासाठी तो अखिल किंवा सारंगकडे जात असे. वडील अजून चालते-फिरते होते, पण त्यांचं वजन खूप कमी झालं होतं. मार्चअखेर परीक्षा संपली. वर्गातले बरेच जण सिनेमा पाहायला जाणार होते, पण सौरभ आणि त्याच्या मित्रमंडळींनी नकार दिला. सावनीने विचारलं, "तुम्ही कोणीच कसे येत नाही?" तेव्हा सारंगने तिला सांगितलं की सौरभच्या बाबांना कॅन्सर आहे आणि त्यांची तब्येत ठीक नाही.
सावनीला मोठा धक्का बसला. तीला आता dots connect करता आले. त्यादिवशी सौरभचं अस बासरीवजवताना रडण, तिथून निघून जाण. त्यानंरर न बोलण किवा मोजक बोलण.
सावनी म्हणाली, "सौरभ, मला आत्ता कळलं रे, सारंगने सांगितलं. तू कसा आहेस?"
सौरभ म्हणाला, "जसा आहे, तुझ्या समोर आहे."
सावनी म्हणाली, "सांभाळ स्वतःला. तुझ्यावर आता दुप्पट जबाबदारी आहे. बाबांना आणि आईलाही तुलाच सांभाळायचं आहे."
सौरभ म्हणाला, "हो."
सावनी पुढे म्हणाली, "Unfortunately, मी मे महिन्यापर्यंत नागपुरात नाहीये. आम्ही नाशिक-पुण्याला जाणार आहोत, बाबांचे तसे बेत ठरले आहेत."
इतक्यात मुग्धा तिथे आली आणि तिने खूप आस्थेने विचारलं, "सौरभ, कसा आहेस तू?"
सौरभ म्हणाला, "ठीक आहे." मुग्धाने त्याला स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं.
काही मुली हसत हसत तिथे आल्या, तेव्हा मुग्धाने त्यांना शांत करून दुसरीकडे पाठवलं. वर्गातले घपांडे, अभय, अजिंक्य सगळे भेटून गेले.
सौरभ म्हणाला, "रंगा, चल आपण निघूया. मला हे 'कसा आहेस?' वगैरे विचारलेलं आता नको वाटतंय."
सावनीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ती म्हणाली, "सौरभ, मी तुला सांगणारच होते की तू निघ. मी बघते काकांना भेटायला मी तुझ्या घरी येऊ शकले तर. सारंग याच्या घराचा पत्ता देतो? मला idea आहे तशी”
सारंग वातावरण light करायला “बघा कामच सगळं माहीत आहे, उगाच विचारायच पत्ता देतो?”
सावनी “चल बे, पत्ता देऊन राहिला न तू”
सगळे थोडे हसले.
सावनी मनातून पूर्ण खचली होती. तिला वाटत होतं की सौरभला मिठी मारून त्याचं दुःख हलकं करावं, पण ते सोपं नव्हतं. तिचाही मुड गेला आणि तिने ड्रायव्हरला गाडी थेट घरी घ्यायला सांगितली.
सारंग, सौरभ, गौरव आणि अखिल आप आपल्या घरी गेले आणि कपडे बदलून सौरभ कडे आले. सगळे काकांजवळ बसले. सौरभ चे बाबा बरे असले तरी खंगत चालले होते.
सौरभच्या आईनी सारंगला आत बोलावले “रंगा अरे तुम्ही का नाही गेलात रे पिक्चर बघायला? एक काम करा उद्या सगळे तुम्हाला हवा तो पिक्चर पाहा. तुमच्या सगळ्या उन्हाळ्यातल्या activity करा, बंद करू नका. मी आहे सौरभ च्या बाबांजवळ. सौरभला ही बदल हवा, सतत आहे तो ह्यांच्याजवळ. त्याला पोहायला ही घेऊन जा”
सारंग “मी बोलतो सौरभ शी आणि सगळ्यांशी”
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मित्रांनी थिएटरमध्ये जाऊन अमिताभ बच्चन यांचा 'हम' चित्रपट पाहिला. दोन चार दिवसांनी अखिल च्या 'VCR' वर आणखीन काही चित्रपट पाहिले. तेव्हा मयंकसुद्धा आला होता. यानांर मयंकसुद्धा जमेल तसा सौरभ कडे यायचा, त्याचीपण सारंग, गौरव आणि अखिल बरोबर गट्टी जमली.
लवरच अंबाझरीवर पोहणही सुरू झालं.
दोन दिवसांनी सौरभ पोहून घरी आला, तेव्हा दारात सरकारी गाडी उभी होती. त्याला शंका आली. आत गेला तर मुग्धा आणि सावनी बाबांजवळ बसल्या होत्या. सौरभची कळी खुलली! आज खूप दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर खरा आनंद होता! मुग्धा आणि सावनी त्याच्या कौतुकात मग्न होत्या—त्याचं प्राणीप्रेम, त्याची बासरी, मयंकसोबतची जोडी... सगळं काही त्या बाबांना सांगत होत्या.
आई म्हणाली, "आम्हाला तर माहीतच नव्हतं की शाळेत इतकं सगळं झालं आहे!"
सावनी म्हणाली, "काकू, सौरभ आणि मयंक ग्रेट जोडी आहे. मुग्धा चलायच का?”
सौरभ, “अरे थांबा काय घाई आहे?”
सावनी, “कशीतरी आले आहे आईला सांगून, उद्या आम्ही नाशिकला जातो आहे, मग पुण. तिथून कुलू मनालीला जाणार आहे. तू पोहायला गेला होता आम्ही कधीच्या आलो आहोत.”
सौरभ “अच्छा, आता मला काय माहीत तुम्ही येणार आहे ते?”
दोघी निघायला उठल्या. सौरभ त्यांना बाहेरपर्यंत सोडायला आला. सावनीने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. आणि सौरभनेही सावनीकडे, गुलाबी सूटमध्ये ती खूप छान दिसत होती.
सौरभने विचारलं, "सावनी, कधी परत येणार आहे?"
सावनी म्हणाली, "साधारण मे महिन्याच्या मध्यावर."
सौरभ म्हणाला, "अच्छा. मनालीला मजा कर”
दोघींचा निरोप घेऊन सौरभ आत गेला. आईने त्याला विचारलं, "ही सावनी म्हणजे एकदा आपल्याला बर्डीवर भेटली होती तीच ना रे?" सौरभने होकार दिला. आई म्हणाली, "किती छान आहे! एकदम 'मॅच्युअर' आणि लाघवी मुलगी आहे."
मयंक-सौरभ एक आनंदाच बेट!
सगळी मुल बहुदा रोजच सौरभ कडे जमत. अधूनमधून मयंकही हजेरी लावत असे. कधी पत्ते, कधी कॅरम खेळायला सारंग कडे तर कधी अखिल कडे असं सुरू होत. सौरभच्या बाबांना बर वाटाव म्हणून पोरांनी एक दिवस VCR आणला होता आणि त्यावर African Safari, Animals are Beautiful People आणि Savage Harvest हे चित्रपट पाहिले. Animals are Beautiful People दोनदा पाहिला. सौरभच्या वडिलांनाही थोड बर वाटल. सिनिमा संपल्यावर सौरभच्या बाबांकडून नैसर्गिकरित्या आणखीन माहितीचा खजिना सगळ्यांना ऐकायला मिळाला. सारंगच्या सूचनेवरून सौरभने बाबांच्या आवाजात ती सगळी माहिती रेकॉर्ड करून ठेवली.
एके दिवशी त्यांनी घरीच एक छोटा कार्यक्रम ठेवला. मयंक आपला की-बोर्ड आणि इलेक्ट्रॉनिक तबला घेऊन आला होता. सौरभला सावनीची खूप आठवण येत होती, पण आता त्याची प्राथमिकता त्याचे बाबा होते शिवाय सावनी नागपुरातही नव्हती. मयंक आणि सौरभने शाळेत आणि सहलीत वाजवलेले सगळे तुकडे सादर केले. दोघांचं ट्यूनिंग बघून सगळे थक्क झाले. वडिलांनी मयंकला विचारलं, "मयंक, सुधीर फडक्यांच्या 'जगाच्या पाठीवर' चित्रपटातलं 'ग बाई मी विकत घेतला श्याम' हे गाणं माहीत आहे का? त्या गाण्याआधी पेटीचा एक पीस आहे, तो वाजवता येईल का?" मयंक म्हणाला, "काका, मी तो ऐकला आहे. एकदा पुन्हा ऐकला तर नक्कीच वाजवू शकेन." सारंग पळत घरी गेला आणि कॅसेट घेऊन आला. मयंकने ती धून आत्मसात केली आणि पाचव्याच मिनिटाला जशीच्या तशी वाजवून दाखवली. सौरभच्या वडिलांनी त्याला खूप शाबासकी दिली आणि म्हटलं
“तुमची ही जोडी अशीच कायम ठेवा. आजच्या तुमच्या या सुरांनी मी इतका सुखावलो आहे की माझा आजार आज कुठल्या कुठे पळून गेला.”
यानंतर सगळ्यांचं चहा आणि खाणी उरकली सगळ्यांनी निरोप घेतला. अखिल आणि सारंग सौरभकडेच थांबले. मयंकही उशीरापर्यंत रेंगाळला त्याचा पायच निघत नव्हता, शेवटी रात्री उशिरा घरी गेला.
एप्रिल महिना उलटला आणि सौरभचे बाबा हळूहळू अंथरुणाला खिळले. त्यांना भेटायला येणाऱ्यांची रोज गर्दी असायची. राणे सरहीदोन तीन दा येऊन गेले. दादा आणि माधव मामा तर रोजच हजेरी लावत होते. सर्व उपचार थकले होते आणि डॉक्टरांनीही आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे संकेत दिले होते.
ठरल्याप्रमाणे मे महिन्याच्या मध्यात सावनी नागपुरात परतली. परतल्यावर दुसऱ्याच दिवशी ती आणि मुग्धा सौरभच्या वडिलांना भेटायला आली. सावनीला सौरभशी काहीतरी बोलायचे होते, पण सतत कोणाचे ना कोणाचे येणे-जाणे सुरू असल्याने तिला तसा मोकळेपणा मिळाला नाही. दोन दिवसांनंतर ती पुन्हा एकदा आली, पण आजही तीच परिस्थिती कायम होती, सौरभशी बोलायला पाहिजे असलेली मोकळीक तिला मिळाली नाही. जव्हा अस वाटायचं की बोलू शकते तेव्हा तिच्या मनात यायचं आधीच इतक सगळं चालू आहे, कसं सांगू सौरभला आणि अजून कष्टी कशाला करू मी त्याला? सावनीला सौरभला काहीतरी अत्यंत महत्त्वाचे सांगायचे होते, जे राहून गेले.
एका रविवारी सकाळी घरात सर्वजण बसले होते. दादा, काकू, माधव मामा-मामी आणि सौरभची औरंगाबादहून आलेली मावशीही तिथे होती. सारंगही सोबतच होता. गेल्या काही दिवसांपासून सौरभचे बाबा बहुतांश वेळ ग्लानीतच असायचे, फार थोडा वेळ ते शुद्धीवर येत. पण आज ते बराच वेळ शुद्धीवर होते. त्यांनी क्षीण आवाजात हातानेच बासरीची खूण केली आणि सौरभला बासरी वाजवायला सांगितले. सौरभने आपली नवीन बासरी आणली आणि सूर छेडले—
"निज रूप दाखवा हो हरी, दर्शनास या हो..."
बासरी वाजवून झाल्यावर बाबांनी सौरभला जवळ बोलावले आणि आपल्या शेजारी बसायला सांगितले. त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्यांनी त्याला शाबासकी दिली. ते क्षीण आवाजात म्हणाले, "सौरभ, बासरी वाजवणं सोडू नकोस. तुला देवाने हे उपजत दिलं आहे, मी तर खूप थोडं शिकवलं. तुझा तो मित्र आहे ना मयंक, त्याची साथ सोडू नकोस. आईची काळजी घे, खूप शिक आणि मोठा हो. आता माझं काही खरं नाही, मी काही क्षणांचाच सोबती आहे."
सौरभ गदगदून म्हणाला, "बाबा, काहीही काय बोलताय?" वडिलांनी सौरभचा हात घट्ट पकडून ठेवला. सौरभची आई साश्रू डोळ्यांनी तिथेच उभी होती. थोड्या वेळाने त्यांचा तो हात ढिला पडला आणि खाली आला. सौरभचा भक्कम आधार कायमचा निखळला होता. सौरभने "बाबा!" असं म्हणत टाहो फोडला आणि सर्वत्र एकच रडारड सुरू झाली. कोणीतरी डॉक्टरांना बोलावले, त्यांनी तपासून सौरभच्या बाबांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले.
सौरभ आणि त्याच्या वडिलांचं नातं वडील-मुलगा कमी आणि मित्रासारखं जास्त होतं. बासरी वाजवता वाजवता, ते नुसत बासरी वादन न राहता त्याची कित्येकदा एक छोटे खानी गाण्याची मैफलच व्हायची. कुठलही नवीन गाण ऐकलं की सौरभ पहिल्यांदा त्याच्या वडिलांना सांगायचा. काही चांगल वाचल, पाहील आणि ऐकलं की ते वडिलांना कधी एकदा सांगतो असं सौरभला व्हायचं. सौरभच्या वडिलांना सुद्धा त्याच्या बासरी वादनाचं खूप कौतुक होतं. खरतर सौरभच्या बासरी वादनाला योग्य मार्गरदर्शन आणि न्याय मिळावा म्हणून पुण्याला बदलीची सुद्धा चौकशी केली होती. पण त्यांचीच तब्येत बिघडली आणि तो विषय मागे पडला. वडील सांगू लागले की वन्य प्राण्यांच्या गोष्टी सौरभ मन लाउन ऐके, कधी कधी त्यांच्या संगतीला सारंग सुद्धा येऊन बसायचा. गप्पा खूप रंगायच्या आणि अस वाटायच की त्या कधी संपूच नए. सारंगला सुद्धा सौरभच्या वडिलांचं जाण फार जाणवत होत, पण सौरभ साठी तो खूप खंबीरपणे उभा राहिला, कधी मन मोकळ कराव आणि रडाव असं त्यालाही वाटे, पण ही मुभा त्याला नव्हती!
सौरभ आणि त्याच्या आईसाठी हा काळ अत्यंत कठीण होता. पण काका-मामा आणि मित्रमंडळी सौरभच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. त्याच दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली की, दहावीचा निकाल २० जूनला लागणार आहे; म्हणजे बाबांच्या जाण्यापासून बरोबर १७ व्या दिवशी.
हिंदू पद्धतीप्रमाणे सर्व अंत्यविधी पार पडले. अकराव्या दिवशी पुन्हा सावनी आणि मुग्धा भेटायला आली. सौरभकडे पहावत नव्हत, तो पार कोमेजून गेला होता. सावनीचा धीर सुटला सौरभच्या आईने सावनीला जवळ घेतले, तेव्हा सावनीने कसाबसा स्वतःला सावरले. सावनीने बाहेर आल्यावर सारंगची भेट घेतली आणि त्याला एक धक्कादायक बातमी दिली.
सावनी म्हणाली, "सारंग, बाबांना गोसीखुर्द प्रकल्पाचे काम मनासारखे पुढे सरकत नसल्याने त्यांनी बदलीचा अर्ज केला होता, तो मंजूर झाला आहे. बाबांची मुंबईला बदली झाली आहे. पण मला आणि आईला ते पुण्याला पाठवणार आहेत, कारण दादाला तिथेच जॉब लागला आहे." सारंगने विचारले, "तू सौरभला सांगितलंस?"
सावनी डोळ्याच्या कडा पुसत म्हणाली, "नाही, मी सांगणारच होते पण ती वेळ नव्हती. It would have been too much for Saurabh."
सारंग म्हणाला, "बरं झालं नाही सांगितलंस. खूप हळवा आहे तो, त्याला हे सहन झालं नसतं."
सावनी भावूक होऊन म्हणाली, "सारंग, काय करू रे मी? हे सगळं इतक्या लवकर होईल असं मला वाटलं नव्हतं."
सारंगनी तिला हळव्या स्वरात समजावले, "खरं आहे. सौरभ कशातून जातोय हे मी रोज पाहतोय. काकांचं जाणं आम्हा सर्वांना जड जातंय, तर सौरभसाठी ते किती कठीण असेल! 'खंबीर राहा' म्हणणं सोपं असतं, पण ज्याच्यावर प्रसंग ओढवतो त्यालाच ते दुःख माहीत असतं. सावनी, आपण खूप लहान आहोत, म्हणजे we are tiny fish in the ocean... परिस्थिती समोर आपण आत्ता काहीच करू शकत नाही."
सावनी म्हणाली, "सारंग, तू खूप 'मॅच्युअर' आहेस. इतका अलिप्त विचार कसा करू शकतोस? मला आनंद आहे की सौरभकडे तुझ्यासारखा मित्र आहे. तू पण स्वतःला सांभाळ. तू सुद्धा सौरभ बरोबर सतत आहे आणि या सगळ्यातून जातो आहेस."
सारंग किंचित हसला, त्याच्या पण डोळ्यात पाणी तरळल.
सारंगच्या खांद्यावर थोपटत सावनी तिथून निघाली.
घरी पोहोचल्यावर ती आईला बिलगून खूप रडली.
सावनीनी आईला विचारलं, “आई अवश्यक आहे का ग पुण्याला जाण? आत्ता तर मी इथे एडजस्ट झाले होते.”
आई म्हणते, “सावनी, अग दादा आहे न पुण्याला तो चार वर्ष एकटा रहिला न”
सावनी, “मी पण राहते इथे नागपूरलाच एकटी”
आई “सावनी तुला माहीत आहे हे शक्य नाही, बाबा कधीही तयार होणार नाही”
सावनी पाय आपटत खोलीत निघून गेली.
19 तारखेलाच निकाल 'प्रेस'मध्ये आला. माधव मामांची तिथे ओळख असल्याने त्यांनी सर्वांचे निकाल आधीच मिळवले होते. सौरभला ८२.७७%, सारंगला ८५.६७%, गौरवला ८७.०७%, अखिलला ८४.०५%, सावनीला ८६.५४%, मयंकला ८३.६८% आणि मुग्धाला ८५% मार्क मिळाले होते.
कठीण परिस्थितीतूनही सौरभने मिळवलेल्या यशाचे सर्वांना खूप कौतुक वाटले. माधव मामाला तर सौरभचे खूपच कौतुक होते, तो त्याचा एकुलता एक भाचा होता. त्याचे मार्क्स कळले तसा तो हातातली सगळी काम सोडून सौरभला ताबडतोब घड्याळ घ्यायला जेऊन जाणार होता. पण सौरभच्या आईने सांगितले की शाळेतून पूर्ण निकाल हातात मिळू दे मगच त्याला घेऊन जा.
शाळेत 20 तारखेला मार्कशीट आणि TC मिळणार होता. या मित्रांची चौकडी शाळेत पोचली. मार्कशीट आणि TC हातात घेऊन सौरभ आणि सारंग उभे होते. सौरभला बरेच मित्र भेटून गेले. सौरभ सारंगला म्हणतो “रंगा, मी तिकडे कोपऱ्यात आहे”
सौरभची नजर सावनीला शोधत होती पण ती दिसली नव्हती. थोड्यावेळानी सावनी आली, पण तिचे वडील तिच्या बरोबर होते. तीनी TC आणि मार्कशीट घेतली, बऱ्याच जणाना भेटली. तिचे वडील म्हणाले, “सावनी एक काम कर मी गाडीत वाट पाहतो तू पटकन ये पण खूप उशीर नको लाऊ”
सावनी थोडी वैतागली आणि म्हणाली “बाबा, आज शेवटचा दिवस आहे, यानंतर हे कोणी मला भेटतील की नाही काय, दिसतील की नाही कुणास ठाऊक? मी येते तुम्ही वाट बघा.”
सावनी ऑफीच्या पायऱ्या उतरली तेव्हा तिला सौरभनी मागच्या वर्षी चातक दाखवला होता ते आठवल. त्याची ती श्रावणात घन निळा बरसला वाजवतानाची शीळ तिला ऐकू आली. एक क्षण ती पायरीवर थांबली मागे वळून पाहिलं, तिला 305 आणि 307 दिसल्या. ती नवीन होती तेव्हा समूह गान स्पर्धेसाठी केलेल्या तालमी, त्या स्पर्धेच्या निमित्ताने मुग्धाशी झालेली ओळख व नंतरची घट्ट मैत्री. स्नेहसंमेलनात गाण्याच्या कार्यक्रमासाठी केलेल्या तालमी. सौरभ आणि मयंक बरोबर केलेल्या प्रॅक्टिसेस आठवल्या आणि स्नेहसंमेलनाच्या वेळचे मंतरलेले दिवस आठवले. सौरभ संध्याकाळी उशीर झाला होता म्हणून सोडायला आला होता, किती समजूतदार वागला होता तो त्या दिवशी. शाळेचा तो गाण्याचा कार्यक्रम, सौरभ आणि मयंकला मिळालेल्या टाळ्या आणि once more. शेवडे सरांनी दिलेले आशीर्वाद, तिचा तो शाळेतला पहिला दिवस आणि सौरभशी झालेली भेट, सीतबार्डीवर दुकानात भेटलेला सौरभ किती अवघडला होता, हे आठवून तिला किंचित हसू आल, मयंककडे केलेल्या तालमी, सौरभची जब दीप जले आना ची ती गोड बासरी, शाळेच्या निरोपवेळी
बीज अंकुरे अंकुरे पूर्ण न वाजवू शकलेला आणि भाऊक झालेला सौरभ.
त्याचा तो absent mindedness हे सगळ झरकन एखाद्या चित्रफितीसारखं तिच्या डोळ्यासमोरून गेलं. तिला अस वाटलं एक सुंदर स्वप्न होतं ते आणि अर्धवटच राहील….. सावनीला खूप भरून आल होतं, तिला असं वाटल सौरभला म्हणाव चल आपण कुठेतरी पळून जाऊ, पण तीनी स्वतःला सावरलं.
सावनी सौरभ जवळ आली. सारंगही तिथे होता. सावनीला येतांना पाहून सौरभच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली, सावनी येऊन काय सांगणार आहे याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती.
सावनी जवळ आल्यावर, सारंग “मी जाऊ, थांबू?”
सावनी “अरे तुझ्यापासून काही लपल आहे का?, थांब इथेच”
सगळी शक्ती एकत्र करून तीनी अवंढा गिळला आणि सावनी म्हणाली, “सौरभ.. मी कस सांगू तुला मलाच कळत नाही आहे. अरे मी… मी पुण्याला जाते आहे, कायमची. माझ्या बाबांची बदली झाली आहे मुंबईला पण आम्ही दादा बरोबर पुण्याला राहू”
सौरभ सैरभैर झाला “काय? पुण्याला, कायमची?”
सावनी डबडबलेल्या डोळ्यांनी “हो रे. सौरभ माझ्या हातात काहीच नाही रे. माझ रोज १५ दिवस रडून झालं, आई बाबांशी भांडून झालं, मी सगळ करून पाहिल पण ते तयारच नाही.”
हे ऐकून सौरभ सुन्न होऊन तिथेच मटकन खाली बसला. त्याच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. सारंगने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तितक्यात सावनीच्या वडिलांनी फाटकातून तिला आवाज दिला. सावनी त्यांच्याकडे बघत म्हणाली, "आले, ५ मिनिटात!"
सावनीने आपल्या पिशवीतून काही वस्तू काढल्या, “सारंग आणि गौरव हे तुमच्या साठी माझ्याकडून छोटस गिफ्ट आणि हे अखिलच पण ठेवा तो दिसला नाही मला. मी नागपूरचे हे दिवस कधीच विसरू शकत नाही. जेमतेम 2.5 वर्ष होते पण 10 वर्षांसारखी वाटतात”
सारंग वातावरण हलकं करायचा प्रयत्न करत म्हणाला, "इतकं छळलं का आम्ही तुला?" सावनी म्हणाली, "हो, खूप!"
शेवटी ती सौरभकडे वळली आणि म्हणाली, "सौरभ... कदाचित नियतीला आपली साथ इथपर्यंतच मंजूर होती. माझा काहीच इलाज नाही रे. ही घे माझ्याकडून छोटीशी भेट, यात हरिप्रसाद चौरसियांच्या 4 कॅसेट्सचा संच आहे. येते मी."
ऊन रणरणत होतं, जून अर्धा उलटला असला तरी प्रचंड उकाडा होता. सारंग सौरभच्या शेजारी बसला. सौरभने सारंगच्या खांद्यावर डोके ठेवले आणि तो सुन्न होऊन बसला होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कधी नव्हे ते गौरवचे डोळे पाणावले.
सौरभ म्हणाला, "बाबा गेले, गौरवही जाणार, अखिलही जाईल, मयंकचं मला माहीत नाही. आज सावनी पण गेली. रंगा, कदाचित तूही जाशील. मी एकटा पडलो रे!"
सारंग खंबीरपणे म्हणाला, "नाही सौरभ, मी आहे ना तुझ्यासोबत!"
अतिशय जड अंतःकरणाने सावनी तिथून निघाली. मुग्धा तिला फाटकापर्यंत सोडायला गेली. सावनीच्या डोळ्यातल्या भावना या पेक्षा वेगळ्या नव्हत्या.
जिवलगा राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा
किर्र बोलते घन वनराई सांज सभोती दाटून येई
सुखसुमनांची सुखसुमनांची सरली माया पाचोळा वाजे
जिवलगा राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे जिवलगा
फाटकापर्यंत पोहोचल्यावर सावनी थांबली. तिला अचानक चातक पक्ष्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले. सौरभ आणि सारंगही त्या आवाजाने चमकून चातकाला शोधू लागले. सावनी ओरडून म्हणाली, "तो बघ, तिथे बसला आहे!" सौरभने एकदा तिच्याकडे पाहिले. अश्रूं भरलेल्या डोळ्यांमुळे त्याला सावनी अंधुक दिसत होती.
सावनी गाडीत बसली, तिने वडिलांच्या दंडाला घट्ट पकडले आणि डोळ्यातून धरा वाहू लागल्या. तिने वळून मागे पाहिले, तर सौरभ आणि सारंग अजूनही त्या चातकाकडे पाहत होते; पण आता सावनी तिथे नव्हती!
(समाप्त)
- अमोल दांडेकर
dandekaram@gmail.com
तुम्हाला काय वाटत ही गोष्ट इथे संपली? की अजून पुढे काही आहे? खाली नक्की कमेंट करा!
कशी वाटली गोष्ट? If you don't have Maayboli account you can write to me on my email dandekaram@gmail.com
अप्रतिम!!
अप्रतिम!!
क्लासच एकदम!! आहे अजून, येउ
क्लासच एकदम!! आहे अजून, येउ द्या!
अमोल
अमोल
अतिशय सुंदर कथा. प्रत्येक भाग वाचताना चित्र डोळ्यासमोर उभ राहत होत. ही कथा अगदीच काल्पनिक वाटत नाही, एवढ छान विस्तृत वर्णन केल आहे की वाटत की लेखक स्वतः ह्या कथेतील एखाद पात्र असावे किंवा निदान ही कथा सत्य घटनांवर आधारित असावी.
एखादा लघुपट होईल ह्या कथेवर,अभिनय बेर्डे आणि आर्या, सौरभ आणि सावनीच्या भूमिकेत छान शोभले असते.
माझ्या कडून विशेष धन्यवाद, तो काळ आणि ते वय माझ्या बाबतीत बरच मिळत जुळत आहे. शाळा नागपुरातील असो किंवा मुंबईतील, त्या रम्य आठवणी खूप सुखदायी आहेत. कथेतील बरेच संदर्भ त्या जुन्या आठवणींना उजाळा देतात.
करोना काळात आम्ही आमच्या शाळेच्या Whatsapp गृप वर शाळेतील आठवणी पोस्ट करायचो, त्या इतक्या पोस्ट होत्या की त्याच संकलन करून एक संग्रहच तयार केला आम्ही.
तुम्ही कथा एका छान वळणावर आणून सोडली. सौरभ ह्यातून सावरून पुढे आपली कला आणि जीवशास्त्राची आवड जोपासत पुढे करिअर करेल ना? सावनी त्या आठवणी जोपासेल का दुसऱ्या वाटा, दुजा गावचा वारा लागून हरवून जाईल? आणि ही दोघ पुढे कधी आणि कुठल्या वाटेवर वळणावर भेटतील, ह्या सगळ्याची उत्सुकता ठेवत तुम्ही ह्या कथेला विराम दिला.
ती पुढे चालू ठेवायची का नाही हा निर्णय तुमचा आहे, आम्हाला पुढे वाचायला नक्कीच आवडेल.
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा
किती छान कथा आहे
किती छान कथा आहे
छान कथा ! आणि तुम्ही नक्कीच
छान कथा ! आणि तुम्ही नक्कीच यातील एखादे पात्र आहात. त्याशिवाय इतके बारकावे जमू शकत नाहीत.

अगदी हळुवारपणे भावना उलगडल्या आहेत. शाळकरी मुलांच्या मनातली स्पंदने छान टिपली आहेत. प्रत्येकजण यातून गेला आहे.
सुरेख.
खुप छान पुढेहि चलु थेवा.
खुप छान
पुढेहि चलु थेवा.
काय सुंदर कथा आहे.
काय सुंदर कथा आहे.
खूप मस्त, त्या काळातल्या
खूप मस्त, त्या काळातल्या सर्वाना कुठे ना कुठे आपापले सावनी आणि सौरभ नक्की आठवले असतील
सगळे भाग वाचल्यावर आज
सगळे भाग वाचल्यावर आज प्रतिसाद नोंदवतेय. खूप आवडली कथा. छान जमली आणि एका छान वळणावर संपवलीत. लिखाण अजून करत राहाल तसं अजून polished होत राहीलच. जमल्यास याचा पुढचा एक सीझन आणा ना. वाचायला नक्की आवडेल