थकल्या सारखं वाटतंय

Submitted by जोतिराम on 14 April, 2026 - 13:02

शाळेतला जुना मित्र , भेटला, थकल्यासारखा वाटला, सहज विचारलं "काय झालं भाई?"
म्हणाला, "सगळं ठीक आहे", पण त्या वाक्यात एक एक वेगळा अर्थ जाणवला ,

आयुष्याच्या प्रवाहाला
थटल्या सारखं वाटतयं
चाळीशीच्या उंबरठ्यावर
थकल्या सारखं वाटतंय

हरेक पायरी चढताना
पाय कधीही दुखला ना
पण आता पायी काहीतरी
रूतल्या सारखं वाटतंय
चाळीशीच्या उंबरठ्यावर
थकल्या सारखं वाटतयं

किंमत, मान या जाणिवांची
उणीव, ना, संपल्या समजा !
हल्ली हल्लीच्या प्रवासात
चुकल्यासारखं वाटतंय
चाळीशीच्या उंबरठ्यावर
थकल्या सारखं वाटतंय

अपेक्षांसोबत उपेक्षा का?
चांगुलपणालाच शिक्षा का?
सगळं जवळ असूनही काही
सुटल्या सारखं वाटतंय
चाळीशीच्या उंबरठ्यावर
थकल्या सारखं वाटतंय

सगळ्यांना मोकळीक आहे
जशी त्यांची सोयरिक आहे
पूर्णपणे रिता तरी काही
साठल्यासारखं वाटतंय
चाळीशीच्या उंबरठ्यावर
थकल्या सारखं वाटतंय

Group content visibility: 
Public - accessible to all site users