कथा: कोवळ्या सरी- भाग 7 (आघात, #SchoolDaysOf90s)

Submitted by AD75 on 14 April, 2026 - 00:00

Part 4: https://www.maayboli.com/node/88099
Part 5: https://www.maayboli.com/node/88113
Part 6: https://www.maayboli.com/node/88129
मागच्या भागात...
दहावीचे महत्त्वाचे वर्ष सुरू झाले असतानाच सावनी सौरभच्या क्लासच्या बॅचमध्ये आली आणि दोघांच्याही मनात आनंदाचे 'स्वर' खऱ्या अर्थाने जुळून आले. अभ्यासाच्या ओघात सौरभने पकडलेल्या जहाल विषारी 'मण्यार' सापावरून सावनीने व्यक्त केलेली प्रामाणिक काळजी त्यांच्यातील वाढत्या भावनिक ओढीचे दर्शन घडवत होती. १९९० च्या रामजन्मभूमी आंदोलनाचे पडसाद देशभर उमटत असताना नागपुरातील सत्याग्रहादरम्यान सौरभच्या आईला पोलिसांनी अटक केली आणि तो क्षण सौरभसाठी अत्यंत अस्वस्थ करणारा ठरला. त्या कठीण वेळी सावनीने त्याला दिलेला खंबीर मूक आधार आणि केवळ स्पर्शातून व्यक्त झालेली तिची संवेदनशीलता त्यांच्या नात्याला एका नव्या खोलीवर घेऊन गेली. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी शेवडे सरांनी दिलेल्या जबाबदारीतून सौरभ आणि मयंकने 'मिले सूर मेरा तुम्हारा' सारख्या रचनांचा एक मंत्रमुग्ध करणारा 'इन्स्ट्रुमेंटल' प्रयोग बसवला. सरावाच्या निमित्ताने शाळा सुटल्यावर एकत्र घालवलेले ते क्षण आणि संध्याकाळच्या वेळी सौरभने सावनीला घरापर्यंत सोडताना त्यांच्यात रंगलेल्या गप्पांनी हे वर्ष दोघांसाठीही अविस्मरणीय केले. दहावीचे वर्ष संपत असल्याची हुरहूर आणि भविष्याबद्दलची अनामिक भीती मनात असूनही, बासरीचे ते मधुर सूर आणि एकमेकांविषयीची ओढ त्यांच्या मनात मृदगंधासारखी कायमची दरवळत राहिली. अशा प्रकारे, सुरांची ही साथ आणि संकटात मिळालेला सावनीचा आधार सौरभच्या आयुष्यातील एक अनमोल ठेवा ठरला.
आता पुढे

आघात

सौरभ सावनीला सोडून घरी पोहोचला. आईने त्याला ठणकावून विचारलं, "अरे, कुठे होतास इतका वेळ? मी तुला बजावलं होतं की यंदाचं वर्ष महत्त्वाचं आहे. किती वेळ वाया गेला बघ!"
सौरभ शांतपणे म्हणाला, "अगं आई, माझा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे."
आई काळजीने म्हणाली, “बघ बर जरा बाबांजवळ बस”
सौरभने विचारलं, “का? काय झालं बाबांना?”
“तसंच मागच्या सारखं होतय. अशक्त पणा जाणवतो आहे. शक्ती नाहीये त्यांच्यात” आईने उत्तर दिलं.
सौरभ वडिलांजवळ जाऊन बसला.
थोड्या वेळाने आई तिथे आली आणि ठामपणे म्हणाली, "अहो, मी आता काहीही ऐकणार नाही. उद्या आपण डॉक्टरांकडे जातोय, बस!" वडिलांनी फक्त मान हलवून होकार दिला.

दुसऱ्या दिवशी त्यांना थोडं बरं वाटू लागलं, मग त्यांनी नेहमीप्रमाणे डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिला.
आई वैतागून म्हणाली, "काय करायचं ते करा! ऐकायचंच नाही म्हटल्यावर मी तरी काय करणार?"
सौरभ म्हणाला, "बाबा, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? का जात नाही तुम्ही डॉक्टरांकडे?"
वडील म्हणाले, "अरे, मला काही झालेलं नाही. फक्त कधीतरी खूप क्षीण येतो, इतकंच."
आई चिडून म्हणाली, "पण हे आता तिसऱ्यांदा होतंय. मी दादांना (काकांना) सांगते, ते ओरडले की मगच जाल तुम्ही."
वडील “बर जाऊ पुढच्या आठवड्यात नक्की जाऊ”

सौरभ बाबांजवळ अभ्यास करत बसला.
थोड्या वेळानी बाबा विचारतात, “सौरभ, तू ब्रेक घेणार अशील तेव्हा सांग.”
सौरभ “का काही पाहिजे आहे का तुम्हाला?
सौरभचे वडील “नाही रे असंच”
थोड्यावेळानी सौरभ पाणी पिऊन खोलीत परतला.
बबाना म्हणाला “ह बाबा मी ब्रेक घेतला आहे.”
वडील “मग एक काम कर तुझी बासरी घेऊन ये आणि तुझ्या आवडीच काहीही वाजव”
सौरभ “बरं”

सौरभने बासरी आणली आणि त्याचे आवडते स्वर उमटू लागले—

पल पल दिल के पास

वडील “तुला वेळ आहे”
सौरभ “हो आहे बाबा मी ब्रेक घेतला आहे. तुम्ही सांगा न. तुम्हाला काय पाहिजे?”
वडील “अजून 1 किवा 2 चालतील”
सौरभ “मग त्यात काय एवढ?”
वडील “अरे तू अभ्यास करतो आहे न म्हणून म्हंटल मी”
सौरभ “वाजवतो ना त्यात काय?”

सौरभ

कहीं दूर जब दिन ढल जाए

वडील “आणखीन एक आणि शेवटचं, एखाद मराठी वाजवतो”
सौरभ “हो”

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात

इतक्यात सौरभची आई पण तिथे आली. सौरभच्या डोक्यावर हात फिरवला.
गाण संपता संपता सौरभ चे वडील पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसल्या.
सौरभची आई म्हणते “गुणीच आहे ते माझ बाळ, बासरी तर खरच गोपाळकृष्णासाराखीचं वाजवतो!”
वडील, “खरच रे सौरभ गेल्या वर्षभरात खूपच फरक पडला आहे. जा ग जरा बाळकृष्णा समोर थोडी साखर ठेव बर!”

स्नेहसंमेलनात गाण्याचा कार्यक्रमाचा दिवस आला. सगळा कार्यक्रम उत्तम पार पडला. सगळी गाणी उत्तम झाली. मयंक आणि सौरभ च्या त्या मेडलीला once more मिळाला. कार्यक्रम झाल्यावर अनेक मित्र शाळेतले खालच्या वर्गातले मुल-मुली खूप मंडळी त्यांना अभिनंदन करायला येऊन गेले. अगदी शाळेतला चपराशी शिवा सुद्धा म्हणतो “मल काही खूप कळत नाही त्यातल, पण जेभी होत एकदम best. तुमी तर ते टिव्हीवरच वाजवल”
सौरभ आणि मयंक “Thank you शिवा”
सारंग, गौरव आणि अखिल आले, सौरभ आणि मयंकला मिठी मारून अभिनंदन दिलं.
कार्यक्रमानंतर सावनी कौतुकाने सौरभकडे पाहत होती. तिची नजर त्याच्या गालावरच्या खळीवर खिळली होती.
सौरभ आणि इतर सगळे एकमेकांचा निरोप घेतात.
सावनी “आता काय एक मुलगा तर काय शाळेतल्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झाला आहे. आम्हाला कोण विचारणार आता”
सौरभ “हो का, एका मुलीलापण once more मिळाला होता”
सावनी “नाही पण बासरी कुठे आणि आमचा सूर कुठे”
मुग्धा येते “Autograph मिळेल?”
सावनी “मला पण”
मयंक आणि सौरभ “काही का?”

इतक्यात शेवडे सर तिथे आले आणि म्हणाले, "वाघोबा आणि मयंक, अरे शब्द नाहीत रे माझ्याकडे! माझ्याकडे देण्यासारखं आत्ता या क्षणी तरी काही नाही."
असं म्हणत त्यांनी खिशातून दहा रुपयांच्या दोन नोटा काढल्या.
सौरभ म्हणाला, "सर, हे कशाला? हे नको."
शेवडे सर म्हणाले, "हात करा समोर." सौरभने उजवा हात पुढे केला आणि मयंकने डावा.
मयंकला सर म्हणाले, "अबे उजवा हात! अरे हो, तू डाखल्या नाही का!"
मयंकने हसून उजवा हात समोर केला. दोघांनी बक्षीस घेतलं आणि सरांना नमस्कार केला. सरांनी मोठ्या प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्यांना उठवलं.
सर म्हणाले, "एक गोष्ट सांगतो, त्या दिवशी तुम्ही मला हे वाजवून दाखवलंत ना, तेव्हा सुद्धा मला ते खूप पटलं नव्हतं. आता वाटतंय की मी जर तेव्हा 'हो' म्हटलं नसतं, तर मी अपराधी झालो असतो. चांगले मोठे व्हा, संगीत क्षेत्रात नाव कमवा. बाहेर जा, नागपूर सोडून मुंबई किंवा पुण्याला जा, तिथे वाव आहे. नाहीतर माझ्यासारखे व्हाल शाळा मास्तर!" असं म्हणून ते स्वतःच हसले.
सरांचा आवाज आता घोगरा झाला होता आणि डोळे किंचित पाणावले होते. ते पुढे म्हणाले, "असे विद्यार्थी मिळायला सुद्धा भाग्य लागतं." मयंक आणि सौरभ म्हणाले, "काय सर, आमचं भाग्य की तुमच्यासारखे शिक्षक मिळाले!"
सर म्हणाले, "थांब बे वाघोबा, बोलू दे मला. तुमचं शेवटचं वर्ष आता... वर्ष काय, जेमतेम दोन महिने राहिले आहेत. मोठे व्हाल, संगीत क्षेत्रात किंवा इतर कुठेही नाव कमवाल. पण आपण जिथून आलो, ज्या मातीत वाढलो, ज्या मातीत लहानाचे मोठे झालो, तिला विसरू नका. आपल्याला तिथे पोहोचेपर्यंत ज्यांनी ज्यांनी म्हणून मदत केली, त्यांनाही कधी विसरू नका. आता आज तुम्ही मित्र एकत्र आहात, पण ११ वीत वेगवेगळ्या महाविद्यालयांत जाल. आपल्या जुन्या मित्रांना विसरू नका. शेवटी मित्र आणि त्या मैत्रीतलं नातं जपा, मित्रच कामाला येतात. अडीअडचणीत, रात्री-बेरात्री तोच धावून येतो. शेवटी निजधामाची यात्रा संपली की अखेरची यात्रा करायला फक्त ४ खांदे लागतात. खूप अमाप धन मिळवलं पण ४ माणसं नाही जोडता आली आयुष्यात, तर काय कमवलं? असो, पुष्कळ झालं लेक्चर!"
सगळे ओरडले, "नाही सर!"
सर म्हणाले, "अरे तो कुठे आहे, 'माझे माहेर पंढरी’ आणि 'कर हा करी' म्हणणारा, वेदांत?" वेदांतने लांबूनच हात वर केला, "सर, इथे."
सर म्हणाले, "बाळा काय सांगू रे तुला आणि कुठल्या शब्दात सांगू! गळा उत्कृष्ट आहे तुझा, त्याला गुण येऊ दे अजून. तू नववीत ना रे?"
वेदांत म्हणाला, "हो सर."
"इकडे ये, तिथे कुठे उभा आहेस लांब? मी खाणार आहे का बे तुला?" सर म्हणाले.
वेदांत जवळ आला. सरांनी खिशातून पाच रुपये काढून त्याला बक्षीस दिले.
सर म्हणाले, "आता तुला वाटेल की त्यांना दहा आणि मला पाचच? उरलेले पाच आणि पुढच्या वर्षी चांगलं गायलास की पुढच्या वर्षीचे दहा, असे तुझे १५ रुपये बक्षीस माझ्याकडे आहेत. तू खूप छान गायलास, पण हे मी माझ्याकडे मुद्दाम ठेवून घेतले आहेत, तू हुरळून जाऊ नये म्हणून. तू शाळेतच आहेस, माझं लक्ष राहीलच तुझ्यावर. गाणं आणि रियाज चालू ठेव. माहूरकरांकडे शिकतोस का?"
वेदांत म्हणाला, "हो सर."
सर म्हणाले, "वाटलंच मला, चांगलं नाव करतो आहेस गुरूचं. उत्तम गळा आकाराला आणला आहे तुझ्या गुरूंनी. शिकत राहा. मग पुढे जाऊन टीव्हीवर वगैरे आलास की आम्ही सांगू— 'आमच्या शाळेचा विद्यार्थी बरं का!' माहूरकरांना चांगला ओळखतो मी, सांग त्यांना शेवडेंनी नमस्कार सांगितला आहे. पूर्वी भेट व्हायची आमची, अलीकडे माझंच काम वाढलं आहे. शाळेने जबाबदारी दिली आहे. असो, बाकीच्यांनी वाईट वाटून घेऊ नये. सगळ्यांनी आपापलं काम उत्तम केलं. आमचं जरा द्रोणाचार्य आणि अर्जुन... म्हणून बाकीचे पांडव वाईट होते का? किंवा कौरवही. पण 'नेम धर' म्हटल्यावर 'पक्षाचा फक्त डोळा दिसतोय' असं सांगणारा केवळ अर्जुन होता. महाभारत पाहिलंच आहे सगळ्यांनी. चला मग, माझं पण रामायण आटपत घेतो."

सगळेच निरोप घेतात गर्दीत थोडावेळ सौरभ आणि सावनीला बोलायचं असत ते राहून जात. फक्त एकदा एकमेकांना पाहतात आणि उद्या सकाळी क्लास मधे भेटू चा इशारा होतो.
निघताना मयंक आणि सौरभ,
सौरभ “वा उस्ताद वा”
मयंक “वा रे मेरे हरिप्रसाद”
करत निरोप घेतात आणि म्हणतात यंदा उन्हाळ्यात तू आहे, मी आहे, तबला keyboard आणि बासरी बस!
“सौरभ कुमार चला आता” अखिल म्हणतो. “चला” गौरव आणि सारंग म्हणतात.
आज सौरभ खूपच खुश आहे, कार्यक्रम कसा झाला, सर काय म्हणाले सगळ, सगळं त्याला घरी जाऊन आई वडिलांना सांगायचं होतं.
सारंग, गैरव, अखिल आणि सौरभ घराकडे निघाले.
सारंग “सौरभ, गजब, खूपच माहोल झाला होता. ती titan ची धून वाजवली ना तुम्ही. अरे पागल झाले होते सगळे”
सौरभ “रंगा खरच का बे?”
गौरव “म्हणजे काय बे, instrumental पीस ला once more गंमत नाही.”

सौरभ घराजवळ पोचताच त्याला दादांची (त्याच्या काकांची) स्कूटर आणि मामाची कार दिसली. सावदेकर काका चीही स्कूटर दिसली. त्याला वाटत इतके सगळे जण एकदम?

सौरभ घरात गेला, माधव मामा बसला होता. दादा (काका) बसले होते, बाबांचे मित्र सावदेकर काका बसले होते. सगळ्यांकडे पाहून तो हसला. पण वातावरण त्याला नेहमी सारखं नव्हत वाटत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती.
सौरभ म्हणतो, “काय आज सगळे एकदम?” दादा त्याला जवळ बोलावतात, ही तुझी बॅग ठेव मी सांगतो तुला.”
सौरभ “आई-बाबा कुठे आहेत?”
दादा “आहेत न आत आई आहे, बाबा पडून आहेत.”
सौरभ “का काय झाल बाबांना?”
दादा “चल आपण बाहेर जाऊ”
दादा त्याला बाहेर झोपाळ्यावर घेऊन गेले. "बस इथे बस. आज काय झालं, बाबा बँकेत चक्कर येऊन पडले. त्यांना थोड कपाळावर आणि गालाला मुका मार बसला आहे, बाकी काही लागलेलं नाही. पण त्यांना ही चक्कर का आली? म्हणून आम्ही, म्हणजे मी, तुझी आई आणि बाबा असे डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी काही टेस्ट सांगितल्या आहेत, त्या केल्या. त्याचे रिझल्ट उद्या कळतील. त्यांना अशक्तपणा येतो म्हणून औषधही लिहून दिलं आहे, त्याचा पहिला डोस आज पोटात गेला आहे. पण सध्या काळजीचं काही कारण नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे."
"पण..." सौरभचा बांध फुटला आणि तो रडू लागला. दादा म्हणाले, "अरे, अरे सौरभ! रडायचं नाही. काही झालेलं नाही. बरं, मामाशी बोलतोस का तू?"
माधव मामा सौरभचा फेव्हरेट होता. लहानपणापासून माधव मामाशी त्याचं एक वेगळं नातं होतं. सौरभला पहिली बासरी माधव मामानेच घेऊन दिली होती. दादा उठून आत गेले आणि म्हणाले, "अरे माधव जरा, सौरभला बघ."
माधव मामा बाहेर आला. सौरभजवळ झोपाळ्यावर बसला आणि त्याने त्याला प्रेमाने जवळ घेतलं. तो म्हणाला, "बरं, बरं... मन मोकळं करून घे." सौरभ मामाच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडला. थोड्या वेळाने स्वतःला सावरत तो म्हणाला, "मामा, आई बाबांना कधीची म्हणतेय की आपण डॉक्टरांकडे जाऊ, पण बाबा ऐकतच नाहीत!"
मामाने समजावलं, "जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही. पण आता आपण गेलो आहोत ना डॉक्टरांकडे. उद्या रिपोर्ट मिळतील, मग कळेल. आजचा तुझा कार्यक्रम कसा झाला?"
सौरभ म्हणाला, "छान." मामा म्हणाला, "एक काम कर, आता तू बाबांना जाऊन भेटून ये. पण रडायचं नाही, तू हिंमतवाला आहेस ना? तू रडलास तर त्यांना अजून त्रास होईल. ठीक?"
सौरभ म्हणाला, "हो, ठीक. मला दोन मिनिटं दे."
सौरभ आत गेला आणि त्याने वडिलांना पाहिलं. तिथे आई, काकू आणि मामी बसल्या होत्या. वडिलांच्या कपाळावर छोटी पट्टी लावलेली होती आणि उजवा गाल काळा-निळा पडला होता. वडिलांना पाहून सौरभला एकदम भरून आलं, पण त्याने प्रयत्नपूर्वक हिंमत गोळा केली. मनाचा हिय्या करून तो बाजूला बसला.
वडिलांनी विचारलं, "कसा झाला तुझा कार्यक्रम?"
सौरभ म्हणाला, "खूप छान!"
सौरभने सगळा कार्यक्रम सांगितला.शेवडे सरांनी कसं बक्षीस दिलं, तेही सांगितलं.
बाबा म्हणाले, "नशीबवान आहात तुम्ही, चांगले शिक्षक मिळाले तुम्हाला."
थोड्या वेळ गप्पा झाल्या. सावदेकर काका आत आले आणि म्हणाले, "चल रे मनोहर, येतो मी. काळजी घे. वहिनी, काहीही लागलं तर नि:संकोचपणे सांगा." थोड्या वेळात सावदेकर काका निघाले. मामा-मामी पण निघायला उठले. मामाला दादांनी सांगितलं, "माधव, तू काळजी करू नकोस. आम्ही आज तर इथेच राहतोय. उद्या मी जाऊन रिपोर्ट आणीन. काही असेल, काही लागलं तर मी कळवतो." मामा म्हणाला, "आम्ही येऊच उद्या संध्याकाळी."
सगळे बाहेर आले. बाहेर पडता पडता मामा म्हणाला, "सौरभ, काळजी घे. रडायचं नाही, काही झालेलं नाही. तू आता घराचा मोठा मुलगा आहेस ना, मग आता मोठा हो. ओके? आपण जेव्हा डोंगर चढतो, तेव्हा एक क्षण असा येतो की वाटतं— बस आता! पण तीच खरी परीक्षेची वेळ असते. दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण आपल्याला आपला अभ्यासही जपायचा आहे. पुढच्या वर्षी सी.पी. (CP) मध्ये ॲडमिशन पाहिजे आहे ना?"
सौरभ म्हणाला, "हो मामा."
मामा म्हणाला, "चल, येतो आम्ही उद्या."
मामीने पण सौरभच्या पाठीवरून हात फिरवला आणि मामा-मामी निघून गेले.
शेवटी वेळ माणसाला खूप काही शिकवते. सौरभने स्वतःला खूप सांभाळून घेतलं आणि प्रचंड मॅच्युरिटी दाखवली. त्याने काका-काकूंसाठी वरच्या खोलीत चादर बदलून मच्छरदाणी लावून दिली. खाली आई-बाबांसाठी गाद्या घालून दिल्या आणि मग तो अभ्यासाला बसला.

दुसऱ्या दिवशी सकाळी....
दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभने विचारलं, "आई, मी क्लासला जाऊ ना?" आई म्हणाली, "म्हणजे काय?" काकूंनी ते ऐकलं आणि त्या म्हणाल्या, "अरे, क्लास वगैरे सगळं रूटीन व्यवस्थित चालू ठेवायचं आहे. आपला अभ्यास, शाळा, क्लास सगळं. फोडणीची पोळी केली आहे बघ तुझ्यासाठी, ती खाऊन मग क्लासला जा." सौरभ म्हणाला, "हो."
सौरभ रोजच्यासारखा अखिलकडे गेला आणि दोघं ठरल्याप्रमाणे क्लासला गेले. काही कारणास्तव केमिस्ट्रीचे सर आले नव्हते. अखिल, सौरभ आणि सावनी कालच्या कार्यक्रमाबद्दल बोलू लागले. सावनी म्हणाली, "सौरभ की तो निकल पडी कल!" अखिल म्हणाला, "विचारू नका, भाव खूपच वाढले आहेत." सौरभ लाजला, "उगाच काय?"
इतक्यात राणे सर बाजूच्या खोलीतून म्हणाले, "आज सर येणार नाहीत. तेव्हा शांत बसा किंवा खाली जा." अखिल, सौरभ, सावनी आणि इतर बहुतेक सगळेच खाली जायला निघाले. सावनीने सौरभचा हात पकडून त्याला एक झटका दिला आणि खुणेनेच 'थांब, खाली नको जाऊ' असं सांगितलं. ते बालकनीतच थांबले.
सावनी म्हणाली, "सौरभ, काल तुम्ही शाळेत सगळ्यांना जिंकलंत. खूपच मस्त रे!" सौरभ म्हणाला, "तुमची पण गाणी छान झाली. वेदांत सुरेख गायला." सावनी म्हणाली, "हो, तो अप्रतिम गायला. पण काल सर जे म्हणाले..." "काय?" सौरभने विचारलं. सावनी म्हणाली, "हेच की आता दोनच महिने शिल्लक आहेत. नंतर सगळे दुसरीकडे जाल, वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये. कळतंय?" सौरभ म्हणाला, "बरोबर. त्या दिवशी मी तुला सोडायला आलो होतो, तेव्हा हाच विषय राहून गेला होता. तुला काय करायचं आहे पुढे सावनी?"
सावनी म्हणाली, "नक्की ठरत नाहीये रे. एकदा वाटतं की सायन्स घेऊन इंजिनीअरिंग करावं, मग असंही वाटतं की मस्त कॉमर्स किंवा आर्ट्स घ्यावं आणि पुढे जाऊन आय.ए.एस. (IAS) साठी तयारी करावी. I am sure तुला डॉक्टर बनायचं असेल." सौरभ म्हणाला, "हं... डॉक्टर तर नक्की माहीत नाही, पण मला ११ वी-१२ वीला बायो (Bio) कंटिन्यू करायचं आहे." सावनी हे बोलताना थोडी हळवी झाली, "मी आर्ट्स किंवा कॉमर्स घेतलं, तर आपली कॉलेजेस वेगळी होतील सौरभ."
सावनीच्या बोलण्यातील तो भाव सौरभच्या लक्षात आला आणि त्याची नजर शून्यात गेली. गेल्या दीड वर्षात सावनी आणि सौरभ कसे जवळ आले, हे दोघांनाही कळलं नव्हतं. तिचं ते "सौरभ..." असं म्हणणं त्याला खूप आवडायचं. त्याला सावनी पहिल्यांदा वर्गात आली होती तो दिवस आठवला. काही दिवसांपूर्वी ती त्याच्यासाठी प्रतापनगर चौकात आली होती आणि त्याचा हात घट्ट पकडला होता.
नुसती सावनीच नाही, तर सगळेच मित्र आता पांगणार होते. गौरवला नाशिकला मिलिटरी स्कूलमध्ये जायचं होतं आणि तो जिद्दी असल्याने जाणारच होता. अखिलचं पॉलिटेक्निक ठरलं होतं. सारंगला बायो घ्यायचं नव्हतं. सगळे मित्र आता वेगळे होणार होते. सौरभ आणि सारंग तर लहानपणापासूनचे मित्र होते. सौरभने या सगळ्यांशिवायचं जग कसं असेल, याचा विचारच केला नव्हता. तो पार सैरभैर झाला.
सावनी म्हणाली, "सौरभ... अरे कुठे हरवलास?" सौरभ भानावर आला आणि समजुतीच्या स्वरात म्हणाला, "हो, पण आपण तर इथेच आहोत ना, म्हणजे नागपुरात. आणि जसं सी.पी. मध्ये ॲडमिशन घेतली, तर त्यांचं तर सगळं एकाच ठिकाणी आहे." सावनीला हा विषय अजून बोलायचा होता, पण इतक्यात राणे सरांनी बोलावलं आणि तो विषय पुन्हा अर्धवटच राहिला.
सौरभच्या वडिलांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. घरी सगळं स्थिरावल्यासारखं वाटत होतं, पण ते काही दिवसांसाठीच.
जानेवारीच्या मध्यावर सौरभच्या वडिलांना पुन्हा त्रास झाला. यावेळी मात्र डॉक्टरांनी आणखी सखोल टेस्ट सांगितल्या. रिपोर्ट्स आले आणि अल्ट्रासाऊंडमध्ये 'पॅनक्रियाज'मध्ये एक गाठ दिसली; जी इतर अवयवांमध्येही पसरली होती. डॉक्टरांना शंका आली आणि त्यांनी ताबडतोब मुंबईला घेऊन जायला सांगितलं.
दादा आणि मामा पुन्हा घरी आले. असं ठरलं की दादा, सौरभची आई आणि वडील मुंबईला जातील. मुंबईत सौरभचे एक काका राहत होते, त्यांना कळवण्यात आलं. दादांची 'बॉम्बे हॉस्पिटल'मध्ये ओळख होती, त्यामुळे प्रवासाचं आणि इतर सगळं दादांनीच बघून घेतलं.
प्रश्न होता की सौरभला काय सांगायचं? ते काम मामाने केलं. मामाने सौरभला सांगितलं की काही टेस्ट आणि ट्रीटमेंटसाठी ५-६ दिवस बाबांना मुंबईला घेऊन जावं लागेल. मामा म्हणाला, "तू धनतोलीला घरी चालतोस का? तुला शाळेत सोडायला-घ्यायला ड्रायव्हर येईल रोज." सौरभ म्हणाला, "मामा नको, मी राहीन घरीच. तिथून मला सगळं लांब पडेल. आणि आता शाळा काही पूर्णवेळ नाही, सगळं शेड्युल बदललं आहे. माझे सगळे मित्र इथेच आहेत, मी घरीच राहीन." मामा म्हणाला, "बरं ठीक आहे, मी चक्कर टाकीन मधून मधून."
सौरभची आई अखिलकडे आणि सारंगकडे सौरभला न सांगता जाऊन आली. "आम्ही मुंबईला ट्रीटमेंटसाठी जाऊ तेव्हा सौरभ घरीच राहील, पण त्याच्यावर लक्ष असू द्या," असा निरोप तिने दिला. सारंग आणि सौरभच्या घरचे अनेक वर्षांचे संबंध होते, त्यामुळे सारंगची आई म्हणाली, "सौरभ आम्हाला सारंगसारखाच आहे, तो इथे येऊन सुद्धा राहू शकतो." सौरभची आई म्हणाली, "हो, त्यात तर काही शंका नाही. पण सौरभ घरीच राहील, रात्री तिथेच झोपेल म्हणजे घर बंद राहणार नाही. त्याला सकाळचा डबा लावून दिला आहे आणि संध्याकाळी तो अखिलकडे जेवेल." सारंगची आई म्हणाली, "अहो काहीतरी काय? डबा काय? हाकेच्या अंतरावर राहतो तो. ते काही नाही, सौरभची काळजी आम्ही घेऊ. तो आमच्याकडे जेवेल सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा, काहीच प्रश्न नाही." सगळे मित्र आणि शेजारी खूप मदत करत होते आणि खंबीरपणे उभे राहिले होते.
सौरभची आई त्याला सूचना देऊ लागली, "अभ्यास नीट कर, त्याच्यात ढिलाई येऊ देऊ नकोस. परीक्षा तोंडावर आहे. राणे सरांच्या क्लासची प्रिलिम्स आधी आहे, मग शाळेची, नाही का?" सौरभ म्हणाला, "हो." आई म्हणाली, "बाहेर जाताना नीट कुलूप लावत जा. रात्री अखिल किंवा सारंग, गौरवला बोलावून घे आणि इथेच अभ्यास करत जा." सौरभ म्हणाला, "हो आई, काही काळजी करू नकोस. मी करीन सगळं." संध्याकाळी गौरवच्या वडिलांनी सौरभच्या आई-वडिलांना त्यांच्या कारने स्टेशनवर सोडलं.
काळ सौरभची सगळ्याच अंगाने परीक्षा घेत होता. तो मित्रांत असायचा तेव्हा ठीक वाटायचं, पण त्याला एकांत खायला उठायचा. एकांतात तो रडूनही घ्यायचा, पण स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायचा. हळवे क्षण येत-जात राहिले. त्याला अजून स्पष्ट काही सांगितलं नसलं, तरी तो विज्ञान शिकणारा मुलगा होता; काही दूधखुळा लहान मुलगा नव्हता.
त्याला आता सावनीला भेटता येत नव्हतं आणि ते कोणाला फारसं सांगताही येत नव्हतं; कारण राणे सरांचा क्लास संपला होता. शाळेतही आता काही विशेष राहिलं नव्हतं. शाळेत भेटले तरी त्यांना मोकळेपणाने बोलता यायचं नाही. अखिल आणि सारंग सावलीसारखे सतत त्याच्यासोबत असायचे आणि रात्री सगळे सौरभकडेच अभ्यासाला असायचे. गौरवही त्याला जमेल तसा वेळ द्यायचा, पण गौरवचं घर लांब असल्याने तो या तिघांसारखा पटकन येऊ शकत नव्हता.
मुख्यतः अलजेब्रा, जॉमेट्री, केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजीचे जुने पेपर्स सोडवणे आणि ते तपासून घेणे, यावरच सगळ्यांचा भर होता.
एक दिवस अभ्यासातून ब्रेक आणि थोडा बदल म्हणून सारंगच्या घरच्या गच्चीवरून सगळे पतंग उडवू लागले. सारंग पतंग उडवण्यात पारंगत होता. पेच घेणे, विविध पतंग, मांजा यात त्याला या तिघांपेक्षा जास्त गती होती. संक्रांतीच्या दिवसांत नागपुरात आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरलेलं असतं आणि गच्च्या माणसांनी फुललेल्या असतात. आज सारंगचा मोठा भाऊ शशांक पण पतंग उडवायला आला होता. "ओ पार... अबे ढील दे, ढील दे! अरे कटली यार!" असं करत सगळे मजा घेत होते. सौरभचं लक्ष थोडं 'डायव्हर्ट' व्हावं, हाही त्यामागचा एक उद्देश होता. अखिल आणि सौरभ फक्त पतंग थोडी वर जाईपर्यंत उडवायचे आणि नंतर शशांक किंवा सारंगकडे देऊन टाकायचे. मग एकतर चक्री पकडायची किंवा गच्चीच्या कठड्याला टेकून मस्त गंमत बघायची.
इकडे सावनीही जोमाने अभ्यासाला लागली होती, पण मधूनच तिला सौरभच्या बासरीचे सूर ऐकू यायचे— 'स्वर आले दुरुनी'.
सावनीला सौरभला भेटायची खूप ओढ होती, पण सध्या सगळे मार्ग बंद होते. सौरभची परिस्थितीही काही वेगळी नव्हती, वडिलांच्या काळजीचं टेन्शन त्याच्या subconscious mind मध्ये सतत असायचं. आता त्यांना थेट राणे सरांच्या क्लासच्या प्रिलिम्सलाच भेटता येणार होतं.
मुंबईला सगळ्या चाचण्या झाल्या आणि शेवटी कर्करोगाचं (कॅन्सर) निदान झालं. डॉक्टरांनी दादांशी बोलताना स्पष्ट सांगितलं की, "यावर आता काहीही उपाय नाही. ऑर्गन ट्रान्सप्लांट होऊ शकतं, पण त्याची सोय आपल्या देशात नाही आणि असती तरी ती प्रचंड महागडी आहे. आजार पॅनक्रियाज आणि लिव्हरमध्ये पसरला आहे." डॉक्टरांनी काही गोळ्या लिहून दिल्या आणि सांगितलं की, "या गोळ्यांनी आपण त्यांची तब्येत सांभाळण्याचा प्रयत्न करू, पण त्यांच्या हातात जेमतेम ३ ते ५ महिने आहेत."
दादांना हे ऐकताना खूप जड गेलं. स्वतःचा सख्खा भाऊ, जो सावलीसारखा सोबत असायचा, जो सदा आनंदी असायचा... साप पकडणं वगैरे त्याचे छंद लोकांना विचित्र वाटायचे, पण त्याने कमीतकमी १०० लोकांचे प्राण वाचवले होते. त्याच्यासोबत असं व्हावं? त्यांनी सौरभच्या आईला ही बातमी सांगितली. सुरुवातीला त्या खचल्या, पण त्यांना लगेच जाणीव झाली की 'आपण जर खचलो, तर सौरभने कोणाकडे पाहायचं?' त्यामुळे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या.
सारंगकडे फोन असल्याने मुंबईहून दोन-तीनदा त्यांचं बोलणं झालं होतं. मुंबईहून निघताना त्यांनी सारंगला तसं कळवलं होतं. सात-आठ दिवसांनी ते नागपूरला परत आले. आज सौरभ खूप खुश होता, कारण आई-बाबा घरी आले होते. सौरभने विचारलं, "काय म्हणाले डॉक्टर?" आई म्हणाली, "काही नाही, औषधं दिली आहेत, पण महिनाभराची 'बेड रेस्ट' सांगितली आहे." "अशक्तपणाचं कारण काय?" सौरभने पुन्हा विचारलं. आईने उत्तर दिलं, "सतत तडतड करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे आणि विश्रांती न घेणे." सौरभने विचारलं, "बाकी काही नाही ना?" आई म्हणाली, "तू आता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर."
वडिलांनी हाक मारली, "सौरभ, इकडे ये." सौरभ म्हणाला, "आलो बाबा." वडील म्हणाले, "हे बघ, मुंबईहून काय आणलंय?" त्यांनी एक लांब गिफ्ट पॅक त्याच्या हातात दिलं. सौरभने विचारलं, "बाबा, काय आहे याच्यात?" "उघड," वडील म्हणाले. सौरभने ते उघडलं आणि आनंदाने म्हणाला, "बाबा, नवीन बासरी!" वडील म्हणाले, "हो, मी निरंजन काकाला सांगून ठेवलं होतं, तो घेऊन आला. तुला वेळ असेल तेव्हा वाजव." सौरभने विचारलं, "वाजवू आत्ता?" वडील म्हणाले, "सौरभ हे बघ, हा गोंडा लाव त्याला आणि देवासमोर बाळकृष्णाजवळ ठेव थोडा वेळ, मग वाजव. म्हणजे त्याला कृष्णाच्या बासरीचा गुण आणि स्वर येईल." सौरभ खूपच खुश झाला होता.
राणे सरांच्या क्लासची प्रिलिम्स सुरू झाली. सोमवार ते शुक्रवार परीक्षा होती. सावनी भेटली, पण विशेष काही बोलणं झालं नाही. अख्ख्या क्लाससमोर काय बोलणार?
शेवटच्या पेपरच्या दिवशी सर म्हणाले, "पेपर तपासून ८ तारखेला भेटू. संध्याकाळी ४:३० ला निरोप समारंभ होईल." सरांनी दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक बॅचला दोन ग्रुप्समध्ये विभागून वेळ दिली. सावनी आणि सौरभला एकाच 'स्लॉट'मध्ये वेळ मिळाली, ज्यामुळे दोघांनाही अनामिक आनंद झाला.
राणे सरांच्या क्लासमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला. सौरभला सावनीला भेटायची खूप आस होती; खूप नाही पण थोडा वेळ तरी बोलता येईल असं त्याला वाटलं होतं. सावनी आली खरी, पण ती लवकर निघू लागली. ती निघाली हे पाहून सौरभही तिच्या पाठीमागे गेला आणि तिला आवाज दिला, "सावनी, अरे निघालीस? आज बोलली पण नाहीस. काय झालं?" सावनी म्हणाली, "काही नाही रे, थोडं बरं वाटत नाहीये." सौरभने विचारलं, "का गं, काय झालं?" सावनी म्हणाली, "आम्हा मुलींना होतं असं मधून मधून." सौरभ भोळेपणाने म्हणाला, "तुला काय झालं आहे आता?"
त्यावर सावनी हसून म्हणाली, "खुळाच आहेस तू, तुला नाही कळायचं. तुझा हाच भाबडेपणा मला आवडतो. सॉरी रे सौरभ, बाबा खाली उभे आहेत. आपल्याला जास्त वेळ नाही बोलता येणार. तू खाली नको येऊ." सावनीचे डोळे खूप काही बोलत होते. ती खाली उतरली आणि वळून सौरभकडे पाहत तिने हातानेच 'बाय' केलं. ती दोन मिनिटं तिथेच थांबली. सौरभ रडवेला झाला होता. ती पुन्हा वर आली आणि सौरभचा हात पकडून म्हणाली, "उद्या भेटू, पण आता मला नाही थांबता येणार." सौरभने तिचा हात सोडला आणि म्हणाला, "निघ तू, भेटू."
दुसऱ्या दिवशी त्यांची पुन्हा भेट झाली. सौरभने विचारलं, "आता कशी आहे तुझी तब्येत?" सावनी म्हणाली, "मस्त, एकदम झकास!" असं म्हणत तिने सौरभचं नाक पकडलं आणि म्हणाली, "बुद्धू!" सौरभला काहीच कळेना. तो म्हणाला, "अरे, किती दिवस झाले सावनी आपण भेटलोच नाही. कालची भेट तर फक्त सेकंदभराची होती." सावनी म्हणाली, "हो ना रे, मी सुद्धा वाटच बघत होते की आपल्याला कधी बोलता येईल." इतक्यात सरांनी सावनीला बोलावलं आणि त्यानंतर सौरभचा नंबर आला.
सावनी सौरभची वाट पाहत बालकनीत उभी होती. चांगल्या मार्कांचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता, पण तिला वाटत होतं की यापेक्षा जास्त मार्क मिळू शकतात. दोघांनाही उत्तम मार्क मिळाले होते; सौरभला ८७% आणि सावनीला ९०%. इतक्यात सौरभ बाहेर आला. तो म्हणाला, "सर खूप खुश नाहीत. म्हणाले— देसाई अजून प्रयत्न करा, तुमच्यात खूप potential आहे." सावनी म्हणाली, "मलाही असंच काहीतरी म्हणाले."
दोघांचाही मूड गेला, तरीही ते बराच वेळ तिथेच थांबून राहिले. सावनी म्हणाली, "चल सौरभ, मला गेलं पाहिजे आता. ड्रायव्हर खाली वाट पाहतोय." सौरभने विचारलं, "निघालीस?" सौरभ आज नेहमीसारखा नव्हता, हे सावनीच्या लक्षात आलं होतं. पण तिला वाटलं की मार्कांमुळे आणि सर बोलल्यामुळे तो नाराज आहे. सावनी म्हणाली, "डोन्ट वरी सौरभ, तू बोर्डात उत्तम करशील." सौरभ म्हणाला, "हं..." सावनी म्हणाली, "चल, निघते मी."
सौरभला आता त्याच्या घराच्या आघाडीवर सुद्धा एक लढाई लढायची होती. वडिलांची तब्येत खालावतच चालली होती. वडील बाहेर फिरत असले, तरी त्यांचं वजन खूप कमी झाल्याचं त्याला दिसत होतं. काल रात्री त्याने आईला खूप खोदून विचारलं, तेव्हा त्याला सत्य कळलं की बाबांना 'कॅन्सर' आहे. त्याला ही शंका आधीपासून होतीच.
शाळेची प्रिलिम्स परीक्षाही पार पडली. त्याच्या सगळ्या मित्रांना ८५% आणि त्याहून जास्त मार्क मिळाले होते, पण सौरभला ७९% मिळाले होते. एका वादळाची चाहूल त्याला लागली होती.

क्रमश :
अमोल दांडेकर

कथा: कोवळ्या सरी- भाग 8 (Concluding Part: हरवलेला 'षड्ज',#SchoolDaysOf90s)
https://www.maayboli.com/node/88139

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users