झंप्या झोलकरचे (ज्याला लोक प्रेमाने 'आळसाचा ब्रँड ॲम्बेसेडर' म्हणायचे) घर नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्त आणि शांत होते. पण ती शांतता वादळापूर्वीची होती!
रात्रीचे पावणे बारा वाजले होते. झंप्या नुकताच टीव्हीवर क्रिकेट मॅच बघत खुर्चीवर बसला होता. त्याचे जेवण बाकी होते. तेवढ्यात डायनिंग टेबलने आपला लाकडी जबडा उघडला.
“काय रे झंप्या! रोज तेच ते बेचव वरण-भात आणि पोळी? मी कोण आहे माहितीये? मी पनीर बिर्याणीचा भुकेला आहे!” असं ओरडत टेबलने एक मोठा ‘गपाक्!’ आवाज केला आणि त्यावर ठेवलेल्या सगळ्या खाद्य पदार्थांनी भरलेल्या प्लेट्स गिळल्या!
त्यानंतर त्याने एक जोरदार ढेकरही दिली.
झंप्या झोलकर चमकला, “अरे बाप रे! आज टेबल जेवतोय? आणि तोही माझ्यापेक्षा जास्त भुकेला आहे?”
त्याने गृहीत धरले की त्याला भास होतोय म्हणून तो आरामात बसायला सोफ्यावर बसायला गेला.
झंप्या बसायला गेला आणि सोफाचे कुशन एकाएकी फुगले. त्याने झंप्याला वर उचलले आणि कडाडला, “तू खूप जड झालायस झोलकर! रोज माझ्यावर लोळून माझ्या स्प्रिंगा ढिल्या केल्यास. एकतर डाएट कर किंवा मी तुला उडवून देतो!”
असे म्हणत सोफ्याने जोराची उसळी मारली आणि झंप्याला हवेत भिरकावले.
झंप्या हवेत उडत जाऊन सरळ भिंतीवर धडाम्! आदळला. त्याच्या डोळ्यात अर्धा किलो तारे चमकले.
“आयला! काय चाललंय काय हे?” झंप्या उठतो न उठतो तोच शेजारच्या वॉर्डरोबने आपले दोन्ही दरवाजे करकरत उघडले आणि आतून दोन लांब लाकडी हात बाहेर आले.
“तुझा ड्रेसिंग सेन्स एकदम भंगार आहे झंप्या! चल, आज नवीन फॅशन ट्राय करूया!” असे म्हणत त्याने झंप्याला कॉलरला पकडून आत ओढले. आतून दोन मिनिटे धडपडीचा आवाज आला आणि झंप्या बाहेर फेकला गेला.... पूर्ण पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत, गुलाबी ब्लाउजमध्ये आणि डोक्यावर मुंडावळ्या बांधलेल्या अवस्थेत!
“अरे कुणीतरी वाचवा रे!” झंप्या ओरडला.
त्याच वेळी टीव्हीच्या स्क्रीनवर एक मोठा लाल डोळा उघडला. टीव्हीने स्वतःच हवेत उडून रिमोट हिसकावला.
“रोज तुझे तेच ते फालतू पिक्चर! आज मी ठरवणार काय बघायचे!” असे म्हणत टीव्हीने फुल आवाजात “सासूची भयानक कथा” ही मालिका चालू केली. झंप्याला सासूंच्या हॉरर कथा आवडायच्या नाहीत कारण त्या बघितल्या की त्याला घरातील बाथरूमच्या खिडकीत त्याची खिल्ली उडवणारे हसणारे सासरे दिसायचे.
झंप्या रिमोट खेचण्यासाठी धावला, पण टीव्हीच्या वायरने त्याच्या पायात असा काही खोडा घातला की झंप्या घरंगळत थेट किचनमध्ये फ्रिजसमोर जाऊन पडला.
किचनमध्ये तर वेगळंच युद्ध सुरू होतं! फ्रिजने सायरन वाजवल्यासारखा आवाज केला आणि दार उघडले. आतून छोटे-छोटे अन्न बॉम्ब बाहेर पडू लागले!
पटाक्! पटाक्! भडाम्!
एक वाटी हवेत उडाली आणि फस्स करून थंडगार दह्याची पिचकारी झंप्याच्या चेहऱ्यावर उडाली. दोन शिळ्या इडल्यांनी रॉकेटसारखं उडून त्याच्या कानाखाली जाळ काढला आणि वरून कडक टोमॅटो आणि बटाट्यांचा पाऊस सुरू झाला. एका फ्रिजच्या कप्प्यातून कोबीचा अख्खा गड्डा उडून थेट त्याच्या डोक्यावर हेल्मेटसारखा बसला.
“बास्स झालं तुमचं!” झंप्या रागाने लालबुंद झाला आणि जीव वाचवून स्टडी रूममधल्या टेबलकडे धावला.
पण तिथेही शांती नव्हती. टेबलवरील पुस्तके स्वतःहून उघडली आणि खोलीत हिरवा धूर पसरला.
स्टडी टेबल एका हेडमास्तरसारखा ओरडला, “अभ्यास कधी करणार? की फक्त झोपाच काढणार?” झंप्याने दोन सेकंदात अदृश्य खुर्चीवर बसल्यासारखे केले आणि “होय गुरुजी... मी अभ्यास करतो...” म्हणत थरथरत्या हाताने पाटीवर लिहू लागला:
१+१ = ११
२+२ = २२
झंप्या झोलकर = एक नंबरचा जोकर!
तेवढ्यात बेडरूममधून बेडने मधाळ आवाजात हाक मारली, “झंप्या, इकडे ये रे माझ्या बाळा... झोपायला ये... मी तुला आराम देईन.”
झंप्या सुटकेचा निश्वास टाकत बेडवर पडला, पण गादीने मगरीसारखे मोठे जबडे उघडले आणि “च्युईक्!” असा आवाज करत झंप्याची नऊवारी गिळली.
झंप्या आता पूर्णपणे हादरला होता. तो धावत तोंड धुण्यासाठी सिंककडे गेला. पण बेसिनचे दोन्ही नळ अचानक दोन साप झाले आणि फुत्कारू लागले, “आज तुझ्या हाताची चव बघूया झोलकर! नेहेमी पाणी वाया घालवतो आळशी कुठला” म्हणत त्यांनी झंप्याच्या हाताला चावण्याचा प्रयत्न केला.
झंप्या किंचाळत मागे सरकला आणि थेट बुकशेल्फवर आदळला. सगळी पुस्तके वटवाघळांसारखी हवेत उडू लागली!
“आम्हाला वाचा... नाहीतर आम्ही तुम्हाला चावू!” पुस्तकांनी घोषणाबाजी सुरू केली.
एक ‘मॅथ्स’चे जाडजूड पुस्तक झंप्यांच्या डोक्यात ठणक् करून आदळले, दुसरे ‘इंग्लिश ग्रामर’ त्यांच्या तोंडात घुसण्याचा प्रयत्न करू लागले. तर एका ‘रेसिपी बुक’ने झंप्यांच्या कानाजवळ उडून “कांदा चांगला लाल होईपर्यंत परतावा” असा न संपणारा लेक्चर सुरू केला.
शेवटी झंप्या खाली गुडघ्यावर बसला, हात जोडले आणि मोठ्याने किंचाळला, “बासSSS! मी हार मानतो! मायबाप हो, मला माफ करा! हे घर तुमचंच आहे, तुम्हीच चालवा! मी चाललो गॅलरीत झोपायला!”
त्या रात्री घरात एकच पार्टी झाली...
डायनिंग टेबलने स्वतः झोमॅटोवरून दोन प्लेट काजू पनीर आणि व्हेज पुलाव मागवला (आणि स्वतःच खाल्ला).
सोफ्याने पाय पसरून टीव्हीवर 'हा झंप्या झोलकर किती मूर्ख आहे' या विषयावर डिबेट शो लावला.
वॉर्डरोबने स्वतःसाठी मस्त इस्त्री केलेले कपडे निवडले, घातले आणि परफ्यूम मारून घेतला.
फ्रिजने स्वतःला डीफ्रॉस्ट करून मस्तपैकी थंड पाण्याने आंघोळ केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी झंप्या डोळे चोळत गॅलरीतून घरात आला.
सगळे फर्निचर नेहमीसारखे शांत आणि निर्जीव होते.
झंप्या सुटकेचा निश्वास टाकत हसला, “बापरे! किती भयंकर स्वप्न पडलं होतं रात्री... आजपासून रात्रीचे जेवण नक्कीच कमी करायला हवे.”
तेवढ्यात डायनिंग टेबलने हळूच एक डोळा मारला, एक छोटी ढेकर दिली आणि कुजबुजला, “काय रे झोलकर... आज गरमागरम पावभाजी बनवायची की मसाला डोसा? आणि हो... तुझी नऊवारी बेडच्या पोटातून काढून घे!”
हे ऐकताच झंप्या झोलकरने अशी धूम ठोकली, ती धूम हृतिक, आमिर आणि जॉन तिघांनाही सापडली नाही.
लेखक: निमिष सोनार, पुणे
मस्त, आवडली.
मस्त,
आवडली.
(No subject)