दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ५: वेलिंग्टन- ईशा आदि योगी (कोईम्बतूर) ९८ किमी

Submitted by मार्गी on 12 April, 2026 - 23:59

✪ वेलिंग्टन- कूनूरचा भयावह उताराचा घाट
✪ पर्वत, धबधबे, जंगल, द-या आणि शेवटी नदी
✪ कोईम्बत्तूर- कोईम्बत्तूर अब जाएंगे कितनी दूर!!
✪ वाटेतल्या लोकांसोबत भेटी
✪ ईशा आदि योगी- योग आणि ध्यानाची विलक्षण पंढरी
✪ ईशामधल्या स्वयंसेवकांसोबत संवाद

नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १६ जानेवारी. आज वेलिंग्टनवरून ईशा आदियोगीला म्हणजे सद्गुरूंच्या आश्रमात जायचं आहे. आज रस्ता उताराचा असेल. त्यामुळे फार वेळ लागणार नाही. पण असं निघण्याच्या आधी वाटत होतं! प्रत्यक्ष दिवस खूप वेगळा जाणार होता! सकाळी वेलिंग्टन कँटोनमेंटमधील शांत व रमणीय परिसर बघत बघत राईड सुरू केली! बंगलोरपासून सुरू केलेल्या सायकल प्रवासाचा पाचवा दिवस! कालचा मुख्य घाटाचा टप्पा पार केल्यावर आता विशेष अडचण येऊ नये असं वाटत आहे. फक्त २००० मी. उंचीवरून रस्ता खाली उतरेल, त्यामुळे थंडी व वारे लागतील. त्यासाठी तयार आहे.

वेलिंग्टन कँटोनमेंटमधून बाहेर येऊन महामार्गावर आलो. आणि परत उताराचा रस्ता सुरू झाला! तीव्र उतार आणि अजिबात न थांबणारा उतार! सामान्यत: सायकल चालवताना उतार सुखद वाटतो. पण हा उतार फार तीव्र आहे आणि मध्ये कुठेच सपाट रस्ता नाही आहे. उतरत्या रस्त्यावरच उटीजवळचं प्रसिद्ध हिलस्टेशन कूनूर लागलं. अतिशय रमणीय परिसर. पण आता शहरीकरण व दाटीवाटी इथेही दिसते आहे. पण निसर्ग आणि सगळीकडचे डोंगर! अद्भुत! त्यात डोंगरातलं धुकं!

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील: त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)


.

.

.

.

.

अर्धा तास उतारावर सायकल चालवल्यावर चांगलीच थंडी वाजते‌ आहे. ब्रेक सतत दाबून बोटं दुखत आहेत. त्यात उतारावरचा वारा! एक हॉटेल दिसलं तिथे चहा घेतला! हिमालयात घेतात तसा आधी बोटांनी, मग चेह-यावर आणि नंतर जीभेने त्याचा आस्वाद घेतला! हा पहिला टप्पा फार कठिण गेला. धुकं आहे, त्यामुळे ऊन अजिबात नाहीय. ब्रेकनंतर पुढे राईड सुरू केली. विलक्षण नजारे! सगळीकडे डोंगर आणि त्यावर धुक्याचं साम्राज्य! आणि अव्याहत उतरणारा रस्ता!

हळु हळु ऊन वाढलं तशी थंडी तर कमी झाली. पण सतत ब्रेक दाबून दाबून बोटं आणि मनगट दुखत आहेत. शिवाय सायकलच्या डिस्क- ब्रेक्सचीही काळजी वाटते आहे. इतक्या अखंड उतारामुळे ते गरम होतात. कारण थोडाही ब्रेक्सना ब्रेक देता येत नाही. तीव्र उतारामुळे गती लगेचच वाढते आणि वळणा वळणाच्या घाटात ती नियंत्रणात ठेवायची असते! घाट ज्या वेगाने चढायचा, त्याच वेगाने उतरायचा असतो. अखंड घाट! कूनूरनंतर बराच टप्पा जंगलातला आहे. सगळीकडे डोंगर रांगा! एका ठिकाणी चक्क काही सायकलिस्टस भेटले! त्यांनी सांगितलं की, अजून दहा किलोमीटर पुढे मेत्तुपलायम पर्यंत उतार आहे आणि मग पुढे सपाट रस्ता मिळेल! ते घाट चढून उटीला जात आहेत. एका गावामध्ये नाश्ता घेतला. इडली- चटणी आणि चहा/ कॉफी असंच इथे जास्त मिळतं आहे. आता पोटाला ह्या पदार्थांची सवय झाली आहे. पहिल्या दोन दिवसांनंतर हॉटेलच्या पदार्थांचा काहीच त्रास झाला नाही.

वेलिंग्टनपासून ३० किलोमीटरवर अखेर मेत्तुपालयम आलं आणि उताराचा घाट एकदाचा संपला! शेती आणि मैदानी प्रदेश आला! सायकलीच्या ब्रेक्सना काही नुकसान झालं आहे, असं वाटत नाहीय. फक्त परवा सायकल जंगलातून लॉरीमधून नेली तेव्हा कॅरीअरचा एक नट पडला होता, ते लूज झालंय. ते नीट करून घ्यावं लागेल. तरी माझं नशीब चांगलं की, मी उटीच्या ऐवजी कालच १६ किलोमीटर पुढे वेलिंग्टनला आलो होतो. त्यामुळे १६ किलोमीटरचा घाट मला आज कमी लागला! म्हणजे हा २३०० मीटरवरून थेट २०० मीटर इतक्या कमी उंचीवर आणणारा ४५ किमीचा घाट होता! एका बाजूने चांगलं वाटलं की, मी हा चढलो नाही. आणि हा घाट चढण्याऐवजी आधीच १००० मी. उंचीवर असलेल्या गुडलूरवरून गेलो!

मेत्तुपालयममध्ये योगायोगाने एक सायकल दुकान मिळालं! माझं कॅरीअर खूप जुनं आणि घट्ट लावलेलं होतं. त्यामुळे नट बसत नव्हता. पण सायकलवाल्याने मेहनतीने आणि जिद्दीने जुगाड करून ते नीट केलं. भाषेची अडचण आली नाही! इशारे आणि खाणा- खुणा! बाजूचा दुकानदार अगदीच अडलं तर सांगत होता. पण त्यात साधारण पाऊण तास गेला. परत परत सांगूनही दुकानदाराने पैसे घेतलेच नाहीत. ईशा आदि योगी अजूनही बरंच म्हणजे ५५ किलोमीटर पुढे आहे! आणि मला पोहचायला उशीर झाल्यामुळे वाटेतच जेवणही करावं लागेल. त्यातही वेळ जाईल. पण काय थरारक प्रवास होतोय! आणि किती वेगळा परिसर आणि किती चांगले लोक भेटत आहेत!

पुढच्या टप्प्यात एक सायकलिस्ट कोईम्बत्तूरला जाणारा भेटला. रस्ता चांगला आहे आणि विशेष ट्रॅफिकही नाहीय. पण डोंगरावरून खाली आल्यामुळे गरम होतंय! मला कोईम्बत्तूरमध्ये न जाता आधीच उजवीकडे वळायचं आहे. ईशा आदि योगीचा फाटा घ्यायचा आहे. कोईमबत्तूर! अचानक मनामध्ये एक वेगळंच गाणं आलं! आणि योगायोगाने त्यामध्ये मेरीडा सायकलसुद्धा फिट बसली!

कोईमबत्तूर कोईमबत्तूर! अब जाएंगे कितनी दूर!
नाजुक नाजुक मेरीडा रानी चलने पे मजबूर!

सायकलने थोडी जायबंदी होऊनही खूप चांगली साथ दिली! डिस्क ब्रेक्स तर जवळपास ५०% झिजलेच असावेत. पण तरी नंतर व्यवस्थित आहेत. स्पीतिमध्ये नाकोचा घाट ह्याच सायकलीसोबत चढलो होतो! तेव्हा मी आणि सायकल ज्यातून गेलो होतो, तेव्हा हेच गाणं मनात येत होतं- “कुछ ना हो, कुछ भी ना कहो!” आणि आता सायकलीसोबत हे गाणं आठवलं! हळु हळु कोईम्बत्तूर दूर न राहता जवळ येत गेलं! एका ठिकाणी व्हेज बिर्यानीचं जेवण केलं. हॉटेलमधल्या लोकांशी मोजका पण छान संवाद झाला. एका एका शब्दातून बोललो. सायकल प्रवासाचा योग प्रसार व संवाद हा हेतु सांगितला. त्यांनी शुभेच्छा दिल्या. एक हिंदी बोलणारासुद्धा भेटला. पुढे कोणता रस्ता चांगला आहे, तेही त्यांनी सांगितलं.


.

.

.

.

.

कोईम्बत्तूरमधल्या रामकृष्ण मिशनची शाळा ब्रिजवरून जाताना दिसली. नंतर टर्न घेताना थोडी घाई केली, एक रस्ता आधीच वळालो. त्यामुळे पुढे अजून छोट्या गावांमधून जावं लागलं. खूप वळणं- वळणं घ्यावी लागली! पण हळु हळु ईशा आदि योगी जवळ येत गेलं. इथे लोक "ईसा" म्हणतात, ईशा नाही, हेही कळालं! गूगल मॅप आणि लोकांना विचारत विचारत जात राहिलो. परत एकदा चहा- चिक्कीचा ब्रेक घेतला. कारण ईशा सेंटरला पोहचल्यावरही रूमपर्यंत जायला वेळ लागेल हे माहिती आहे.

अखेर खूप उशीरा म्हणजे दुपारी ४ वाजता ईशा आदि योगी परिसरात पोहचलो! दूरवरून ती शिव मूर्ती दिसली! वा! गेटवरची चौकशी, माझं बूकिंग हे सांगत पुढे गेलो. हे एक वेगळं नगरच आहे! अति भव्य! त्याला खूप वेगवेगळे गेटस आहेत. त्यामुळे सगळीकडे विचारत आणि त्यांनी तपासून जाण्यात वेळ लागला. पण माझी रूम दिनेशजी राजांनी बूक केली होती. त्यामुळे अडचण आली नाही. फिरत फिरत माझं कॉटेज होतं तिथे पोहचलो. ९८ किलोमीटर पूर्ण झाले! विशेष म्हणजे ईशा केंद्रामध्येही सायकल हे फिरण्याचं एक प्रमुख माध्यम आहे. त्यामुळे ते सायकलिस्टही भेटले! पोहचून थोडा आराम केला आणि मग आंघोळ केली.

तीव्र उताराच्या घाटामुळे आणि सायकल दुरुस्तीमुळे पोहचायला उशीर झाला. त्यामुळे म्हणावं तसं हे काही बघता आलं नाही. त्यात जेवणाची- भिक्षा प्रसादाची पहिली बॅच साडेसहाला होती. म्हणून पहिले ते केलं. रूमवर येताना, रिसेप्शन काउंटर व इतर ठिकाणी ईशाच्या स्वयंसेवकांसोबत छान बोलणं झालं. एक स्वयंसेवक बंगलोरचे भेटले. बंगलोरवरून इथे सायकलवर आलोय असं त्यांना सांगितलं. पूर्ण सेंटरमध्ये शिस्त व व्यवस्था चोख वाटली. मुक्काम करणारे लोकसुद्धा सिन्सिअर वाटले. जेवतानाचा मंत्रोच्चार आणि मौन! माझे ईशामध्ये राहून आलेले व तिथे दीक्षा घेतलेले मित्र म्हणतात तसं हे किमान आठ दिवस बघण्याचं ठिकाण आहे. आणि इथे अनेक साधना पद्धती, अभ्यासक्रम, विविध विधि चालतात. त्यामुळे हे केंद्र बघायला तसा जास्त वेळच पाहिजे. मला वेळ अर्थातच कमी पडला. ह्या सायकल प्रवासात ती उणीव पुढेही जाणवली.

ईशा आदि योगी! अति भव्य शिव पुतळा आणि अतिशय सुनियोजित नगरी! इतर मंदिरं किंवा ठिकाणांपेक्षा मला शिव पुतळाच जास्त आवडला. आणि अर्थातच बाजूचे रम्य पर्वत! काय ठिकाण आहे हे! जेवल्यानंतर तिथल्या वातावरणाचा अनुभव घेत एका ध्यान कक्षामध्ये थोडा वेळ ध्यान केलं. सद्गुरूंचे प्रवचनं व्हिडीओ लावली होती, ती थोडा वेळ ऐकली. जेवण्यासाठी सायकलवरच गेलो आणि आलो. त्यातही ३ किलोमीटर गेले त्यामुळे आज खरं तर १०१ किमी झाले! उद्या इथून जवळच असलेल्या चिन्मय मिशनच्या एका शाळेला भेट द्यायची आहे! आणि तिथून पुढे केरळात प्रवेश होईल! व्वा! काय नशीब आहे माझं!

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ६: ईशा आदि योगी (कोईम्बतूर) ते वडक्कनचेरी ११७ किमी

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 12 एप्रिल 2026.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान