शेवटचा दुवा निखळला

Submitted by बेफ़िकीर on 12 April, 2026 - 05:55

आयुष्यात रिलेव्हन्ट राहण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण निसर्गाने अदृश्य केले.

आशा भोसले गेल्या.

'ती आशा भोसले' असा उल्लेख करायची अजिबात इच्छा नाही.

लता, मुकेश, रफी, किशोर, आशा -

असंख्य आयुष्ये घडवणारी नावे. रंजक होऊ शकतील असे अजिबात न वाटणाऱ्यांची आयुष्ये रंजक बनवणारी नांवे. त्यातील शेवटचा दुवा निखळला.

आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक असा दुवा निवर्तलेला आहे जो आपल्याला आता 'चला आता नवीन पिढीशी जोडून घेऊ' असे सुचवतो.

श्रद्धांजली!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेब news पोर्टलवर जो चहाटळपणा सुरू आहे तो पाहून थोत्रीत ठेवावीशी वाटतेय या लोकांना.. कुणी चांगलं माणूस गेलं तर लगेच त्यांच्या आयुष्याची चिरफाड करायलाच हवी का?? लताबाई गेल्या तेव्हाही हीच फालतुगिरी झालेली..

असो..
"मेरा कुछ सामान" ऐकताना आता आशा नाहीत ही जाणीव अजून एक कळ उठवून जाईल. श्रद्धांजली.

हो… हिंदी चित्रपटगीतांच्या सुवर्णयुगाचे एकेक तारे परत त्यांच्या जागी गेले. त्यातले एक मोठे पर्व २०२२ मध्ये संपले आणि आज शेवटची शिलेदार गेली. लता आशा किशोर रफी कायमचे आपल्यासोबतच राहणार.. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत…

आशा भोसले यांचा व्हर्सेटाइल आवाज फार आवडायचा. कधीही अजीर्ण झाले नाही कारण प्र्यत्येक गाण्यात त्यांची निराळी स्टाईल ऐकू येई. मला आवडलेल्या गाण्यांत 'उमराव जान' चा नंबर वरचा आहे. आज परत तो सिनेमा पाहीन.
>>>>>जो आपल्याला आता 'चला आता नवीन पिढीशी जोडून घेऊ' असे सुचवतो.
+१०१

लता किंवा आशा याना लोक एकेरीने हाक मारतात त्यात त्यांची त्यांच्याबद्दलची जवळीक आणि आपुलकी दिसते.

हे संत लोक विठ्ठलाला जसे एकेरीने संबोधतात तसेच आहे.

मंगेशकर घराण्याने भारतावर केवढे उपकार करून ठेवलेले आहेत.

आशा ताईंचा स्वर्गीय आवाज ऐकत आमची पिढी लहानाची मोठी झाली. त्यांच्या बद्दल कितीही लिहिले तरी थोडेसेच आहे.

आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेल्या आशा ताई इतक्या मोठ्या उंचीवर गेल्या तरी प्रत्यक्ष रोजच्या जगण्यात फार साध्या होत्या.

माझी पत्नी आणि सासूबाई याना त्या क्रॉफर्ड मार्केट येथे इतर गृहिणीसारखं बाजार करताना भेटल्या.

तेथेहि आपण कोणी उच्च व्यक्ती आहोत असा कोणताही आव नव्हता.

सर्वात जास्त लक्षात राहण्यासारखं म्हणजे त्यांचं लहान बालकासारखं निवळशंख झऱ्यासारखं पारदर्शक हास्य.

त्यांना मनापासून श्रद्धांजली.

कित्येक पिढ्यांचं भावविश्व आशा-लतांनी समृद्ध केलं आहे. ते सुवर्णयुग आता परत येणे नाही.

यासम केवळ याच! भावपूर्ण श्रद्धांजली.

त्या गेल्याच नाहीत खरे तर
त्यांच्या सुमधुर गाण्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्यासोबत राहतील.
आशाताईंना सादर प्रणाम
त्या म्हणाल्या होत्या मी जरी गेले तरी आशा म्हणजे hope तुमच्या आयुष्यात राहील.

<चला आता नवीन पिढीशी जोडून घेऊ> हे कठीण नव्हे, अशक्य आहे. आधीच्यांनी इतकं करून ठेवलंय आणि त्याची एवढी छाप आहे की नव्याकडे नीट पाहता येत नाही. आणि नवी पिढी म्हणायची तर यांच्यानंतर आलेल्याच दोन पिढ्या त्यांच्या आधी मावळल्या. अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक , सुरेश वाडकर, शब्बीरकुमार, एस पी बालसुब्रमण्यन , कुमार सानु, उदित नारायण, सोनू निगम.
यानंतरच्या गायकांचा आवाज ओळखता आला तरी भरपूर झालं अशी (माझी) स्थिती आहे. शिवाय ध्वनिमुद्र णाचं बदललेलं तंत्र, त्यात काँप्युटरने केलेल्या करामती यांमुळे ही गायकांची आणि संगीतकारांची गाणी न वाटता तंत्रज्ञांचीच वाटतात.
अर्थात यात माझंच नुकसान आहे. हेही ऐकायला हवं. बघू.

एकमेवाद्वितीय आशाताई!

मला गाणं खूप आवडतं, पण त्याचं व्याकरण मतीपलिकडचं आहे. सा, रे, ग, कोमल धैवत, तीव्र निषाद हे शब्दच रहातात, गाण्यात ऐकू येत नाहीत.

मग आशा, लता, गीता, रफी हे सूर होतात!

माझ्या गाणीप्रेमाचा उगम हे जेव्हा गाणी ही ऐकण्याची (बघण्याची नव्हे) गोष्ट होती तेंव्हाचा. कारण आकाशवाणी! छायागीत आणि चित्रहार खूप उशीरा आले हो आयुष्यात.

निगाहे मिलाने को जी चाहता है...
त्या काळी कुठे पाहायला लाभणार होतं? पिच्चर कुठलं माहीती नव्हतं, ना नट नट्या, ना प्रसंग.
पण शब्द, चाल, साथसंगत आणि तो गळा... मनात चांदणं फुलवणारा, मनमोराला थुईथुई नाचायला लावणारा तो आवाज! त्या आवाजातून एका नवथर तरुणीची भाववृत्ती, तिच्या नयनांचे खेळ, मोहक विभ्रम गळ्यातून उमटले, अन् थिरकत कानावाटे मनावर कायमचे कोरले गेले. ही किमया त्या गीतकाराची, त्या संगीतकाराची, आणि मुख्य म्हणजे आशाताई...

अशी किती गाणी सांगू? बंदिनी मधलं अब के बरस भेज... लहान होतो मी. सासर, माहेर, स्त्रीचं जिणं, कळत होतं, आणि नव्हतं ही. बंदिनीची स्टोरी माहिती नाही. त्या सावन वरती इतकी आनंदाची गाणी आहेत, विरहिणींची गाणी असतात. पण या मुलीचा सावन? अनन्वित दुःखानं व्याकूळ झालेलं मन आधार शोधताना नकळतच बाबुल कडे, माहेरी पोहोचलं. बापाला, सुखाच्या क्षणांच्या आठवणींना केलेलं आर्जव जे त्या गळ्यातून उमटलं, त्यानं तेव्हाही डोळ्यात पाणी आलं होतं. बैरन यौवनानं माझी खेळणी हिरावली, ही भावना शब्दांतून उमटली, पण गळ्यातून पोहोचली ती वेदना... आणि जसंजसं माझं वय वाढलं, समज आली, तशीतशी गहिरी होत गेली.

किती गाणी सांगू?

ताईंच्या रोमँटिक गाण्यांविषयी काय बोलावं हाच प्रश्न! पण आशाताईंची दर्दभरी गाणी? ती तुमच्यामाझ्यासारख्या सर्वसामान्यांची हाक असायची, हुंदका असायचा, जो देवाच्या कानांपर्यंत पोहोचणं कठीण. कारण तो रुद्ध गळ्यातच अडकून पडतो, नै? ती वेदना सुरांतून मांडायची, म्हणावसं वाटतं की अनुभवांशिवाय शक्य नाही.

मी ताईंना कधी बघितलं नाही, खरं तर इच्छाही झाली नाही. त्या आधी-व्याधी-उपाधींपासून सुटका नसलेल्या मानवी रूपाशी माझं नातं वरवरचं. माझं खरं नातं आहे त्या आवाजाशी, त्या सुरांशी. आणि ते सूर मला माझ्या या देहाच्या अंतापर्यंत साथ देणार आहेत. कधी सांगणार आहेत, 'जिवलगा, राहिले दूर घर माझे...', तर कधी मल्मली तारुण्याची आठवण करुन देताना आईये असं मधाळ आवतण देणार आहेत, एका सावळ्या सांजेला जादुई गोकुळाचं, एका अथांग, अनंत सुरमयी दुनियेचं.

पण त्या आवाजाच्या धनी गेल्या, ती नितनवे रंग लेऊन येणारी प्रतिभा लोप पावली याचं दुःखही अपार.. श्रद्धांजली!

बेफिंच्या मथळ्याचा आदर करूनही एक कणसूर लावतो... त्या सोनेरी युगाच्या साक्षीदार, नव्हे भागीदार, सुमनताई आहेत अजून. (त्यांच्या नशिबीची उपेक्षा...)

कालपासून किती वेळा हा धागा उघडला आणि नक्की काय लिहायचे ते न कळल्याने बंद केला!

४ वर्षांपूर्वी लता गेल्यावर जे फिलिंग आले तेच कालही. टीव्हीवर लागलेली गाणी पाहताना तोच गळ्यात आवंढा!

इतकी अफाट कारकीर्द असलेल्या कलाकाराचा आपण काय आलेख बिलेख काढणार? गेल्या २-३ वर्षांत नव्याने क्लिक झालेली व त्यामुळे पुन्हा पुन्हा पाहिलेली गाणी आठवली. वरती निगाहें मिलाने को जी चाहता है चा उल्लेख आला आहेच. त्यात "नूतनच्या अदाकारी" ची भर घालावी लागेल. दुसरे म्हणजे लूटमार मधले जब छाये मेरा जादू, आशाच न्याय देऊ शकेल असे गाणे. जैत रे जैत मधले नभ उतरू आलं हे असेच अचानक पुन्हा सापडले. कोठेतरी काहीतरी वाचताना "वल्या पान्यात पारा, एक गगन धरा" ही ओळ वाचली, मनातल्या मनात ऐकली आणि मग यूट्यूबवर शोधून कितीदा ते गाणे पाहिले/ऐकले असेल. एक दोन वर्षांपूर्वी सुधीर फडक्यांवर चित्रपट आला त्यात तिची गाणी ऐकली. जिवलगा कधी रे येशील तू मधे सुधीर फडक्यांनी चार कडव्यांत (ऋतूंचे वर्णन करताना) चार वेगवेगळे राग वापरले आणि आशाने ते किती सहज पेलले वगैरे माहिती त्यात होती.

अशी एकेक गाणी मधेच क्लिक होतात. पुढेही होत राहतील. जेव्हा एकाच क्षेत्रातील दोन दिग्गजांची तुलना होते आणि एकाच्या वाट्याला प्रचंड आदर येतो पण दुसर्‍याला रसिकांचे प्रचंड प्रेम लाभते - अशी बरीच उदाहरणे आहेत. रफी-किशोर, दिलीपकुमार-अमिताभ, द्रविड-सचिन. लता-आशा तशीच जोडी असावी.

मेरा नाम है शबनम या एका गाण्यासाठी asha sings for R D Burman हा चार कॅसेट्सचा संच विकत घेतला होता आणि त्याआधी कधी न ऐकलेली किंवा रजिस्टर न झालेली कित्येक गाणी माहीत झाली.

मला संगीतातले काहीही समजत नाही. तरी एक आठवले. आशा ताईंनी मंगेशकर घराण्याची गातकी जतन केली. उदा. हे गाणे
"चांदणे शिंपित जाशी..."
https://www.youtube.com/watch?v=XZwi5u6iiS0

आवडती गायिका. एकदम जिंदादिल व्यक्तिमत्व. ह्या जुन्या गायकांचे किती अनंत उपकार आहेत आपल्यावर. भावपूर्ण श्रद्धांजली. सुधीर गाडगीळना आशानेच विचारले होते की दीदी आणि माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटते, त्यावर ते म्हणाले की दीदी बद्दल आदर वाटतो तुमच्या बद्दल जिव्हाळा. Happy
आशाबाईंचा एक लाइव्ह कार्यक्रम २००७ मध्ये रमणबागेत ऐकला होता, आपली आशा असे काहीसे नाव होते. नियोजित दिवशी असा काही पाऊस आला, तरी बाई गातच होत्या, पावसाचा जोर वाढल्यावर परत दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाला. स्वर्गीय आवाज.
भरतजी म्हणतात तसे नवीन काही ऐकलेच जात नाही. कोण गायक गायिका आहेत ते माहित नाही. कनेक्ट होताच येत नाही.
आशाची काही आवडती गाणी म्हणजे अंबर की एक पाक सुराई, चैन से हमको कभी, फिरसे आईयो बदरा बिदेसी (नमकीन). अहाहा काय आवाज.मराठी मधली एकाच ह्या जन्मी जणू, गेले द्यायचे राहून, चांदण्यात फिरताना, फिटे अंधाराचे जाळे, सांज ये गोकुळी, एक झोका आणि कितीतरी.
विनम्र आदरांजली...

मी नाशिकला असताना डोंगरे मैदानावर आशाचा कार्यक्रम ऐकला-बघितला होता. अवकाळी पावसामुळे २ दिवस पुढे ढकलला होता. तेव्हाही स्टेज ओलसर होतं, पण कार्यक्रम जो काही रंगला होता! एकदम उत्साहात अधेमधे हलकासा नृत्याचा ठेका धरत, मधेच नातवंडं म्हणतायत "आजी गॉगल लावून गा" म्हणून गॉगल लावून गात एकदम भारी मजा आणली होती!
नुकतीच यूट्यूबवर अभिजित खांडकेकर ने घेतलेली मुलाखत ऐकली. इतकी गोड वाटली त्यात आशाआजी ( माझी लेक आशाआजी म्हणते तीच सवय.. Sad )

<<हे कठीण नव्हे, अशक्य आहे. आधीच्यांनी इतकं करून ठेवलंय आणि त्याची एवढी छाप आहे की नव्याकडे नीट पाहता येत नाही. आणि नवी पिढी म्हणायची तर यांच्यानंतर आलेल्याच दोन पिढ्या त्यांच्या आधी मावळल्या. अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक , सुरेश वाडकर, शब्बीरकुमार, एस पी बालसुब्रमण्यन , कुमार सानु, उदित नारायण, सोनू निगम.
यानंतरच्या गायकांचा आवाज ओळखता आला तरी भरपूर झालं अशी (माझी) स्थिती आहे.>>+१!

उरले उरात काही आवाज चांदण्याचे... आकाश तारकांचे....

सुवर्णयुगाचे सगळे शिलेदार आता गेले. त्यांची गाणी मात्र अमर आहेत. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहणार..
a big THANK YOU to Asha Bhosale. you made my every moment worth living..

एका मुलाखतीत आशा म्हणाली होती की सुरवातीलाच मला कळाले की इन्डस्ट्रीत गायिका म्हणुन पाय रोऊन उभे राहायचे असेल तर लता मंगेशकर सारखे गाऊन चालणार नाही, वेगळे गायला हवे.

हे वेगळे काय ते मला कळलेले नाहीय. पण लतासारखा हिमालय समोर उभा असताना, त्या हिमालयाचा हिच्यावर रोष आहे हे इन्डस्ट्रीत माहित असतानाही ती गाण्यावर संसार चालवायला उतरली आणि तिने गाणी मिळवलीही. आयुष्यात इतके प्रचंड दु:ख भोगुनही तिने कधीही तिच्या गाण्याला कडवट चव दिली नाही, ना त्याचे भांडवल केले.

लता आशा यांना देवाने गळ्यात सरस्वतीचा सुर दिला तशीच हत्तीची स्मरणशक्तीही दिली. त्यांनी त्यांच्या आठवणी लिहिल्या असत्या तर किती किंमती असत्या त्या. इन्डस्ट्रीचा प्रदीर्घ इतिहास त्यांच्या ह्या स्मृतीतुन लिहिला गेला असता. अर्थात काही अप्रिय घटनाही त्यात आल्या असत्या. पण जे आहे ते आहे. दुर्दैवाने ते झाले नाही.

आशाने कोविडदरम्यान यु ट्युब चॅनेल् सुरु केले व जुन्या आठवणी सांगायला सुरवात केली पण तिचा उत्साह टिकला नाही.

लता आशाच्या मुलाखतींमधुन त्या दोघी उत्तम नकलाकार होत्या हेही लक्षात येते. या आठवणीतरी कोणी लिहिल्या असत्या….

आता सगळेच संपले. कसले दैदिप्यमान आयुष्य या दोघी जगल्या.

मला समहाऊ त्या दोघींना आता वेगळे करताच येत नाहीये.. जिथे लता गेली तिथे तिच्यामागोमाग आशाही पोचलीच. त्या आता एकत्रच आहेत.

लता गेली आणि पंधरा दिवसात माझी आईही गेली. मुलीला दोन आज्या एकदम गेल्याचा शॉक बसला. ती लताआजी व आशाआजीच म्हणते. लता आठवली की आई आठवते आणि आई लताची आठवण घेऊन येते. Sad

नव्या पिढीशी कुठे कोणाला जमवुन घ्यायचेय? सुवर्णकाळातलेच इतके अवीट अमृत अजुन ऐकायचे
राहिलेय त्यापुढे आजच्या काळातले भंगार कोण ऐकणार…

भवतालचा कोलाहल असो वा मनातला विचारांचा कल्लोळ, तो ट्यून आऊट करून आपल्याच अंतर्मनाचा आवाज आपल्याला ऐकता येण्याइतका अवकाश खुला करायची शक्ती माझ्यासाठी दोनच स्वरांत आहे.
लता आणि आशा.

फा म्हणाला तसं इतक्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान कारकीर्दीचा आपण काय आलेख काढणार! मात्र तिने गायलेलं जयशंकर प्रसादांचं हे गीत माझ्यालेखी तिच्याच आवाजाचं वर्णन आहे!

काय बोलणार! आशाची कित्येक गाणी परत परत परत परत ऐकत रहाणे हेच आपलं मोठं भाग्य आहे.
काय सुरेख गाणं आहे हे! जयदेव आणि आशा! किती ऐकू आणि किती होतं.

मात्र तिने गायलेलं जयशंकर प्रसादांचं हे गीत माझ्यालेखी तिच्याच आवाजाचं वर्णन आहे!>>> तुमुल कोलाहल. फारच भारी आहे

आशा - हृदयनाथ यांच्या एका कार्यक्रमाच्या दोन कॅसेट्सचा संच नक्षत्रांचे देणे या नावाने टी सिरीज किंवा व्हिनसने काढला होता. त्यात "आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला" ही ओळ सुधीर फडके, लता, गुलाम अली इ. कशी गातील हे आशाने गाऊन दाखवले होते. आज सहज शोधलं तर मिळालं.

हो! ही कॅसेट आणि आशाची मधली बडबड सगळ्या व्हेरिएशन सकट पाठ होती/ आहे. गुलाम अलींची तर फारच सही होती. खूप वेळा ऐकली आहे ही कॅसेट. Happy

आशा - हृदयनाथ यांच्या एका कार्यक्रमाच्या दोन कॅसेट्सचा संच नक्षत्रांचे देणे या नावाने टी सिरीज किंवा व्हिनसने काढला होता>> हो हो. गंधर्व ला झाला होता तो कार्यक्रम बहुदा. ती कॅसेट आणि मग ऋतू हिरवा, त्या नंतर जानम समझा करो. Happy

एक गंमत : पेयिंग गेस्ट सिनेमातल्या 'ओ निगाहें मस्ताना' गाण्यात तिचा आवाज फक्त हमिंगसाठी वापरला आहे.
पण त्या हमिंगशिवाय हे गाणं इमॅजिन करून बघा!

आशा चा ८२ नावाचा अल्बम कुठे ऐकता येईल का? त्यात भटांच्या कवितांना रॉक/ पॉप नव्या सहज गुणगुणता येतील अशा चाली लावल्या आहेत. मला चटकन शोधुन सापडली नाहीत त्यातली गाणी.
इथे बर्‍याच लोकांनी नवे आवाज, नवे संगीत, शेवटचा दुवा इ. म्हटलंय. पण खुद्द आशा या नव्याचा खुल्या मनाने स्वीकार करतच ८४ वर्षे ताजी राहिली. Happy स्वतःचीच गाणी मोडून तोडून परत परत नवा साज देऊन कोण गाईल नाहीतर. बाकी कोणा बुजुर्ग व्यक्तीकडून अडेल आणि स्विफ्टी बद्दल ऐकलेलं नाही पण आशा सगळ्यांना कवेत घेणारी आणि म्हणुनच जवळची वाटते. स्पेशलच आहे ती! Happy

हो खरंय. तिच्याकडून ते शिकायला हवं.
तिने इंग्लिश गाणीही गायलीत.
यातलं फक्त ब्रेट ली सोबतचं ऐकलंय.

इथेही अदनान सामी, लेस्ली लुइस अशा नव्या लोकांसोबत काम केलं.

तिने कंपोझ केलेल्या हिंदी गाण्यांची एक सी डी आली होती.

ट्विटरवर या अल्बमबद्दल वाचलं.

Legacy: 16th -18th Century Music of India - Asha Bhosle, Ustad Ali Akbar Khan (1996)

आशाताई! Sad __/\__
लताबाईंपेक्षा तसूभरही कमी नव्हत्या. पद्मविभूषण पेक्षाही भारतरत्न द्यायचं होतं त्यांना खरंतर. She deserved it.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा