फुलांची परडी

Submitted by मनीमोहोर on 10 April, 2026 - 07:11

शहरात हल्ली देवांची रोज पूजा होत नाही. आठवड्यातून कधी एकदा केली पूजा तर फुलपुडीतून आलेल्या चार फुलांवर समाधान मानावं लागत. आमच्या कोकणातल्या घरी अजून ही भरपूर फुल वाहून पूजा केली जाते. त्यासाठी आगारातून फुल गोळा केली जातात त्याची ही गोष्ट.

फुलांची परडी
पन्नास साठ वर्षापूर्वी आपली खेडी/ गावं स्वयंपूर्ण होती. रोख पैशाचा अभाव आणि प्रवासाची तसेच वाहतुकीची अपुरी साधनं ह्यामुळे स्वयंपूर्णतेला पर्याय ही नव्हता म्हणा . शेतात पिकणारं अन्नधान्य आणि भाजीपाला, गोठ्यातील गायी म्हशींचं दूध दुभतं, परिसरात सहज उपलब्ध असणारा लाकूड फाटा, आगारातल्या विहिरीचं पाणी आणि सुतार, लोहार, कासार शिंपी, न्हावी, बुरुड पुरोहित अश्या व्यावसायिकांनी धान्याच्या किंवा अल्प पैश्याच्या बदल्यात दिलेल्या सेवा आणि वस्तू ह्यावर गुजराण करावी लागत असे.
प्लास्टिक जवळ जवळ नसल्या सारखचं असल्याने त्या काळी बांबूच्या लाकडाच्या , धातूच्या वस्तूच रोजच्या वापरत खूप असत. आकारानुसार आणि डिझाईननुसार नावं असणारे कणगी , हुडा, हारा, टोपली, दुरडी हे काही टोपल्यांचे प्रकार, धान्य पाखडण्यासाठी सुपं, पीठ आणि धान्य चाळण्यासाठी बारीक मोठ्या जाळीच्या चाळण्या, तांदूळ पालेभाज्या वगैरे धुण्यासाठी रोवळ्या ( रोवळीला तर लग्न वेदीवर स्थान असे. मानकऱ्यांना औक्षण करायचा लामण दिवा तो सुरक्षित रहावा म्हणून जरीचा खण बांधून सुशोभित केलेल्या रोवळीतच ठेवला जाई. ) कापूस ,वाती किंवा तत्सम छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी छोट्या छोट्या डब्या (ज्याला आमच्याकडे साक्षी म्हणतात) , लहान बस्करं, लावणी लावताना छत्री चा उपयोग होत नाही तरी डोकं झाकण्यासाठी वापरण्यात येणारी इरली, रात्री कोंबड्यांना झाकायला डालगी , देवांसाठी फुलं गोळा करायची हॅण्डल वाली परडी, अश्या अनेक बांबूच्या वस्तू नित्य उपयोगात असत.
ह्या वस्तू बुरुड जमातीतील लोकं करत असत. तो त्यांचा पिढीजात चालत आलेला व्यवसाय असे. आणि हे कौशल्य त्यांना वंशपरंपरागत प्राप्त होत असे . गावातील एक दोन बुरुड कुटुंब संपूर्ण गावाची गरज भागवत. आमची रुक्मिण नावाची बुरडीण मला अजून आठवते. तिचं काम अतिशय सुबक आणि नेटकं असे. वस्तूंचं फिनिशिंग इतकं छान असे की वापर करताना कधी ही बांबूचं तसू बोटात जात नसे. आमच्या आंबा व्यवसायाच्या ब्रॅण्डिंग चा एक भाग म्हणून हिरव्या शाईने स्वस्तिक काढलेले कोकणातल्या घरातील घुडे, सुपं अजून ही डोळ्यासमोर आहेत. एवढंच कशाला स्वस्तिक काढलेली ही सुपं आणि रवळ्या ठाण्याच्या घरात ही होती.

हळू हळू काळ बदलला. प्लॅस्टिक ची अपूर्वाई कमी झाली. ते बऱ्यापैकी स्वस्त झालं. सामान्यांच्या आवाक्यात आलं. कधी कल्पना ही केली नव्हती अश्या वस्तू प्लॅस्टिक मध्ये मिळायला लागल्या. वजनाला हलके, किमतीला परवडणारे आणि टिकाऊ असणारे प्लॅस्टिक बघता बघता लोकप्रिय झाले. पर्यावरण वादी लोकांनी प्लॅस्टिक पर्यावरण घातक असा किती ही कंठशोष केला तरी खिशाला परवडणारे म्हणून जन सामन्यांसाठी प्लॅस्टिकला पर्याय नाही हे वास्तव आहे. त्यामुळेच तुलनेने महाग, कमी टिकाऊ असणाऱ्या बांबूच्या वस्तूंना प्लॅस्टिकने चांगला पर्याय दिला. परिणामी घरोघरी बांबूच्या वस्तूंची जागा प्लॅस्टिक ने घेतली. खुपश्या बुरुड लोकांनी उदरनिर्वाहासाठी दुसरे व्यवसाय निवडले. बांबूच्या वस्तू दुर्मिळ झाल्या.

आमचं घरं ही ह्याला अपवाद नाही. सुपं , रवळ्या आणि देवांसाठी काढलेली फुलं ठेवण्याची परडी हे वगळता बाकी सगळ्या गोष्टी प्लास्टिकच्याच आहेत. परडी चा फोटो खाली देत आहे. ही खूप मोठी असल्याने खूप फुलं असली तरी छान मांडून ठेवता येतात. रुंद बेस मुळे जमिनीवर कुठे ही ठेवता येते फुलं काढताना किंवा हॅण्डल कोपरामध्ये अडकवलं तर दोन्ही हात मोकळे राहतात फुलं काढण्यासाठी. ही परडी खूप छान आणि सध्या तशी दुर्मिळ म्हणून मौल्यवान ही आहे. खूप जुनी असली तरी रोज वापरात असल्याने अजून ही कुठे कसर वगैरे लागलेली नाहीये. छान टिकली आहे.

सध्या उन्हाळ्यामुळे फुलं कमीच आहेत. शहरात झेंडू ॲस्टर शेवंती अशी टिकाऊ फुलेच दिसतात फुलपुडीत. पण इथे मात्र कात्री जास्वंदी, कोरंटी, गोकर्ण, तगर अशी हटके फुलं लक्ष वेधून घेत आहेत. प्लॅस्टिक च्या अतिक्रमणामुळे अजून किती दिवस ही फुलांनी भरलेली परडी बघण्याचं नेत्रसुख अनुभवता येईल हे माहित नाही. पण आज तरी हे सुख मी कोकणात गेले की मनसोक्त उपभोगून घेते.

हेमा वेलणकर

20260330_092548.jpg

नेहमी माटवीच्या हुकला टांगूनच ठेवलेली असते. पहिल्या फोटोत फोटोसाठी मुद्दाम जमिनीवर ठेवली होती.
20260330_092617.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. लेखातून काही नवीन शब्द समजले.

लहानपणी यापैकी काही वस्तू घरोघरी वापरात असलेल्या बघितल्या आहेत.

चाक फिरून परत मूळ जागी यावे तसे अशा बांबूच्या वस्तू eco friendly म्हणून आता परत ट्रेंडिंग झाल्या आहेत. मुंबईच्या घरात मात्र कॉकरोच सुखाने वापरू देत नाहीत.

व्वा. सुरेख लेख आणि फोटो.
अगदी छान स्मरणरंजन झाले.
ह्यातील सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत.
डाल, हारा, पाटी, टोपली ही उतरती भाजणी.
सूप,दुरडी, रोवळी, केरसुणी हे तर शकुनाचे. लग्नकार्यात बुरुड आळीतून ही खरेदी करावीच लागत असे.
सूप घेताना त्याच्या बांधणीच्या पट्ट्या नेहमी विषम असाव्यात अशी माझी आजी म्हणे. त्या मोजताना ती एक, दोन, तीन असे न मोजता यश अपयश, यश अपयश अशी मोजायची म्हणजे सुरुवात आणि शेवट यशाने होई.
सुपे नंतर सारवावी लागत. लग्नाची सुपे रंगवावी लागत.
आताशा गावी सुद्धा बऱ्याच गोष्टी प्लास्टिकच्या वापरतात. समृद्धी प्लास्टिक ब्रँड फेमस आहे.
यावर "बुरुड कला" म्हणून जागुताईचा सुंदर लेख आहे मायबोलीवर.
माहिमच्या एका सिग्नलवर आणि परळला टाटा हॉस्पिटलसमोर अजून काही बुरुड कलावंत आहेत.

सुंदर लेख
रोजच्या देवपूजेला अशी ताजी सुंदर फुले मिळणे म्हणजे वैभव.
आम्ही विकत आणतो, इकडे मुबलकता आहे पूजा साहित्याची.
गोकर्ण वेल लहान आहे आता
फुले आली की मजा.
मग रोज देवांना सुंदर निळी फुले

सर्वांना धन्यवाद
ऋतुराज , प्रतिसाद खूप आवडला, छान लिहिलं आहे.