सध्या २०२७ च्या जनगणनेच्या निमित्ताने 'हिंदी' तसेच 'संस्कृत' भाषेंची नोंद करण्याबाबतचे काही भावनिक संदेश पसरवले जात आहेत. आपली संस्कृती, प्रार्थना आणि श्लोक यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असणे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु, जनगणनेसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत केवळ भावनिक आवाहनाला बळी पडण्यापूर्वी, आपण आपला इतिहास, आपल्या संतांची शिकवण आणि आपल्या खऱ्या मायबोलींचे - मराठी, कोंकणी, मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी भाषांचे - भविष्य काय, याचा अत्यंत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
संस्कृत आणि ऐतिहासिक वास्तव
आपण दैनंदिन पूजेत आणि मंत्रांमध्ये संस्कृत वापरतो, म्हणून जनगणनेत ती आपल्याला अवगत असलेली भाषा म्हणून नोंदवावी. पण वास्तव हे आहे की, भाषा ही केवळ पाठांतरापुरती नसते; ती जगण्याची, अभिव्यक्तीची आणि दैनंदिन संवादाची भाषा असावी लागते.
ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास, संस्कृत ही मुख्यतः सर्वसामान्यांची भाषा नव्हती. ती मूठभर उच्चवर्णीयांपुरती मर्यादित ठेवली गेली. सर्वसामान्य समाजाला आणि इतरांना ती शिकण्याचा किंवा वाचण्याचा अधिकार अनेक शतके नाकारण्यात आला होता. याच भाषिक आणि धार्मिक मक्तेदारीला छेद देण्यासाठी महाराष्ट्रातील संतांनी मोठे बंड पुकारले. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतच्या भिंती ओलांडून भगवद्गीता सर्वसामान्यांसाठी प्राकृत (मराठी) भाषेत आणली आणि "माझा मराठाचि बोलु कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके॥" असा सार्थ अभिमान बाळगला. संत एकनाथांनी तर थेट समाजाला विचारले, "संस्कृत वाणी देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली?" हा संत एकनाथांचा सवाल आजही तितकाच जिवंत आहे. ज्या भाषेने आपल्याला ओळख दिली, विचार दिले, त्या मराठीला दुय्यम ठरवून पुन्हा हिंदी/संस्कृतचे स्तोम माजवणे, हे आपल्या संतांच्या कार्याला विसरण्यासारखे आहे.
हिंदी-संस्कृत सक्ती आणि मराठी शाळांचे मरण
आज आपण उत्तर भारताकडे पाहिले, तर तिथे हिंदी भाषेच्या वाढत्या प्रभावापुढे अवधी, भोजपुरी, ब्रज, मैथिली यांसारख्या अनेक समृद्ध स्थानिक भाषा आणि बोलीभाषा दबल्या गेल्या आहेत. उत्तर भारतीयांनी स्वतःच्याच स्थानिक भाषा हिंदीच्या अतिरेकामुळे दुबळ्या होऊ दिल्या. आज तिथे हिंदीने सामाजिक आणि शैक्षणिक स्तरावर इतका अतिरेक केला आहे की, मूळ स्थानिक भाषांची गळचेपी झाली आहे. जर आपण आज जनगणनेत किंवा व्यवहारात आपली मराठी आणि स्थानिक भाषा सोडून हिंदी/संस्कृतचा पुरस्कार केला, तर उद्या आपली मराठी भाषा केवळ घरापुरती मर्यादित राहील आणि सार्वजनिक जीवनातून हद्दपार होईल.
आज महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात एक भयानक बदल घडत आहे. अनेक शाळांमध्ये 'त्रिभाषा सूत्रा'च्या नावाखाली हिंदी आणि संस्कृतची सक्ती केली जात आहे. जर आपल्या मुलांवर लहानपणापासूनच हिंदी आणि संस्कृत लादली गेली, तर त्यांचा आपल्या मूळ मराठी आणि स्थानिक बोलीभाषांशी (मालवणी, कोंकणी, वऱ्हाडी, अहिराणी इ.) असलेला संबंध तुटेल. जेव्हा मुले त्यांच्या मातृभाषेतून शिकत नाहीत, तेव्हा त्यांची विचार करण्याची क्षमता आणि सर्जनशीलता खुंटते. ते केवळ पोपटपंची करतात, पण विषयाचे आकलन खोलवर होत नाही.
एकीकडे हिंदी आणि संस्कृतचा उदोउदो केला जात असताना, दुसरीकडे आपल्या हक्काच्या मराठी शाळांचे अस्तित्वच मिटवले जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या १०-१२ वर्षांत (२०१४-१५ ते २०२४-२५ शैक्षणिक वर्षे) महाराष्ट्रात सुमारे २,००० ते २,८०० सरकारी शाळांना कुलूप लागले आहे. एकीकडे सरकारी शाळा बंद होत असताना खाजगी शाळांच्या संख्येत वाढ झाली असून सुमारे २,५०० ते ३,००० नवीन खाजगी शाळा नोंदवलेल्या आहेत. ही आकडेवारी आपल्याला सावध करण्यासाठी पुरेशी आहे. (संदर्भ इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत)..
दुसरीकडे, गल्लीबोळांत 'अमराठी' खाजगी शाळांचे पीक आले आहे. या शाळांमध्ये मराठीला केवळ एक 'ऐच्छिक' किंवा 'तृतीय' दर्जाची भाषा म्हणून वागणूक दिली जाते. महाराष्ट्रात असूनही अनेक खाजगी शाळांमध्ये मराठी बोलण्यावर मानसिक दंड आकारला जातो / अपमानित केले जाते. ही आपल्याच मातीत आपल्या भाषेची होत असलेली गळचेपी आहे.
जनगणनेचे महत्त्व: आपला निर्णय, आपले भवितव्य
जनगणनेतील भाषेची आकडेवारी ही सरकारी निधी, शैक्षणिक धोरणे आणि भाषा विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते. जर आपण केवळ केवळ मंत्र, प्रार्थनेपुरती मर्यादित असलेल्या हिंदी, संस्कृतची नोंद केली, तर आपल्या खऱ्या मातृभाषेची आणि बोलीभाषेची आकडेवारी कागदोपत्री कमी होईल. परिणामी, आपल्या स्थानिक भाषांच्या विकासासाठी, साहित्यासाठी आणि संवर्धनासाठी मिळणारा निधी आणि सरकारी पाठिंबा कमी होऊ शकतो.
आपली पूजाअर्चा आणि श्रद्धा यांबद्दल आदर नक्कीच असावा, पण अधिकृत प्रक्रियेत केवळ भावनिक होऊन चुकीची माहिती देणे आपल्याच भाषेच्या मुळावर येऊ शकते. जनगणनेमध्ये आपली मातृभाषा आणि आपण खऱ्या अर्थाने ज्या भाषा बोलतो व समजतो (उदा. मराठी, कोंकणी, मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी इ.), त्यांचीच नोंद आवर्जून करा.
आपल्या मुलांना मराठी किंवा इंग्रजी (जी सध्या व्यवहाराची भाषा आहे) शाळांमध्ये जिथे मराठीला प्राधान्य दिले जाते अशा शाळेत शिकवा आणि आपल्या भाषेवर होणारे हे 'सांस्कृतिक आक्रमण' ओळखा. आपल्या संतांनी गौरवलेली आणि आपल्या आयुष्याला आकार देणारी आपली मायबोली टिकवणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. हा विचार जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपण आपल्या खऱ्या भाषिक अस्मितेचे रक्षण करू शकू!
लेख आवडला.
लेख आवडला.
हा २०११ चा लेख. तेव्हा
हा २०११ चा लेख. तेव्हा संस्कृत फॉर्मात होते, आज मायबोली, पुढच्या वेळेस बघु काय होते ते.
https://www.maayboli.com/node/23369
स्वतः रोज मराठी बोलत असले तरी
स्वतः रोज मराठी बोलत असले तरी मातृभाषा म्हणून मराठी ऐवजी संस्कृत म्हणून लिहिणारे असे किती असतील? मागच्या वेळची आकडेवारी असल्यास अंदाज येईल
अशी भावनिक आवाहने कुठल्या ना
अशी भावनिक आवाहने कुठल्या ना कुठल्या हेतूने काही पंटरांना हाताशी धरून प्रसारीत करण्यात येत असतात.
जनगणनेच्या वेळी अशी विविध आवाहने काही सुपीक मेंदू आणतात. आताही अशी दोन तीन आवाहने पाहिली आहेत. त्यामागचा हेतू ध्यानात येतो.
संस्कृत आणि हिंदी या दोन्हीही प्राचीन भाषा नाहीत. संस्कृत ही दुसर्या शतकापासून निर्माण करण्यात आलेली आणि सातव्या शतकापर्यंत क्लासिक संस्कृत म्हणून पूर्णत्वाला पावलेली भाषा आहे. ती फारसी, चिनी आणि देशी भाषा मिळून बनली. त्या वेळी यातल्या कुठल्याही भाषांचे व्याकरण क्लासिक स्वरूपात नव्हते. त्याची गरज पडू लागली आणि देशोदेशीच्या भारतात येणार्या विद्यार्थ्यांना सोयीची व्हावी म्हणून या भाषेची निर्मिती झाली असे आताचे संशोधन सांगते. संस्कृत मधे पहिल्या शतकापूर्वी भारतात, भारतीय राजांनी दिलेल्या आज्ञा, ताम्रपट, शिलालेख यातले काहीही आढळत नाही. मात्र जुनागढ येथे पहिल्या शतकातला लेख आढळतो जो शक राजाने खोदला आहे. शक हे परकीय राजे होते.
उर्दू सुद्धा मध्ययुगातच अस्तित्वात आलेली आहे.
हिंदी तर दोनशे वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे. त्या आधी खडी बोली होती.
या भाषा जनगणेत नोंदवून त्यांना लोकाश्रय आहे असे दाखवायचा अट्टाहास कशासाठी हे लक्षात येण्यासारखे आहे.
जनगणनेत आम्हाला मराठी येते,
जनगणनेत आम्हाला मराठी येते, आणि हिंदी अजिबात येत नाही असे नमूद करणे मराठी लोकांच्या हिताचे आहे. हिंदी येते असे सांगितले तर सरकारला मराठी हद्दपार करून हिंदी लादायला अधिकच सोपे होईल.
ती फारसी, चिनी आणि देशी भाषा
ती फारसी, चिनी आणि देशी भाषा मिळून बनली
>>> या मताला काही आधार? काही पुरावे?
त्याही पेक्षा
त्याही पेक्षा
"संस्कृत आणि हिंदी या दोन्हीही प्राचीन भाषा नाहीत. संस्कृत ही दुसर्या शतकापासून निर्माण करण्यात आलेली आणि सातव्या शतकापर्यंत क्लासिक संस्कृत म्हणून पूर्णत्वाला पावलेली भाषा आहे..."
हे मस्त आहे.
ह्यावर तर मी एक फुल स्पूफ लिहिणार होतो. पण विचार केला असेलही असे, आपल्याला काय कळतंय/?
संस्कृत किंवा हिंदी किती
संस्कृत किंवा हिंदी किती प्राचीन हा वादाचा मुद्दा नाही, पण सोशल मीडियावर हिंदी/संस्कृत भाषांसाठी आव्हानं पहिली म्हणून हा लेख लिहावासा वाटला. आपल्या स्थानिक बोलीभाषा जवळजवळ लुप्तच होत चालल्या आहेत. आपण स्थानिक बोलीभाषा ज्या खरोखरच आपल्या मातृभाषा आहेत त्या नोंदवल्या, ज्या माराठीच्याच पोटभाषा आहेत, त्यामुळे मराठी भाषाच किती समृद्ध आहे ते दिसेल. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की हिंदी/संस्कृत सारख्या भावनिक आव्हानांना बळी न पडता आपल्या खऱ्या मातृभाषा, त्या ज्या कोणत्याही मराठीच्या पोटभाषा असतील, त्या मातृभाषा म्हणून नोंदवा आणि ज्ञात भाषांमध्ये मग मराठी जरूर नोंदवा.
>>>>>खऱ्या
>>>>>खऱ्या
हा शब्दच किती पॉवरफुल आहे. का खोटं बोलायचं. सत्य स्वतःतच परिपूर्ण आहे/असते. कसा काय खोटेपणा करावासा वाटतो?
लेख आवडला. १००% सहमत.
लेख आवडला. १००% सहमत.
मला अजबरावांची प्रतिक्रिया
मला अजबरावांची प्रतिक्रिया पटली. सद्यस्थितीत मराठीची परिस्थिती पाहता हेच योग्य आहे अस वाटतं. .
एच आर एम, मला वाटतं प्रथम
एच आर एम, मला वाटतं प्रथम भाषा (मातृभाषा) म्हणून मराठी सांगून इतर ज्ञात भाषा म्हणून मालवणी, अहिराणी वगैरे सांगावे. त्यात हिंदी अजिबात सांगू नये. म्हणजे मराठी मातृभाषा असलेल्या लोकांची संख्या चांगली दिसेल. जर उलट केलं, म्हणजे मातृभाषा मालवणी, अहिराणी, वऱ्हाडी वगैरे सांगून मराठी ची गणना इतर ज्ञात भाषांमध्ये केली तर मराठी मातृभाषा असलेल्या लोकांचा टक्का फार कमी दिसेल. सरकार नेमकं तेच स्टॅटिस्टिक धरेल. उदाहरणार्थ मुंबईत 25% मराठी भाषिक असतील पण त्यातील 20 टक्क्यांनी मातृभाषा मालवणी, अहिराणी वगैरे दिली आणि मराठी इतर ज्ञात भाषांत जरी गणली, तरी मराठी भाषिक फक्त पाच टक्के दिसतील. मग फक्त पाच टक्के मराठी भाषिकांसाठी कशाला हवेत मराठी फलक? मातृभाषा गुजराती असो किंवा मालवणी असो त्याला ते अमराठीच म्हणतील. मराठी इतर ज्ञात भाषांत धरून फायदा होणार नाही. सेकंड लँग्वेज म्हणून हिंदी ही मराठीच्या बरीच पुढे आहे.
अजबराव, मी ह्याबद्दल अधिक
अजबराव, मी ह्याबद्दल अधिक माहिती मिळते का बघतो..