समुद्रावरील पहिला दिवस
१९८९ च्या जूनमधील घटना. मी वैद्यकीय इंटर्नशिप संपवून कुलाब्याला नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करीत होतो आणि जवळच्याच पश्चिम नौदल कमांड मेस मध्ये राहत होतो.
रुग्णालयाच्या कामाची वेळ सकाळी ७.३० ते १३.३० असल्याने मला सकाळी लवकर ६.३० ला उठावे लागे.
त्या दिवशी पहाटे ०५.३० वाजता माझ्या दारावर टकटक झाली. एक नौसैनिक माझ्यासाठी बिनतारी संदेश घेऊन आला होता.
आदल्या दिवशी झालेल्या प्रचंड वादळात बरेच कोळी लोक समुद्रात बेपत्ता झाले होते. त्यांच्या शोधासाठी नौदलाचे एक पाण-सुरुंग विरोधी जहाज (INS BEDI ) “बेदी” साडे सहाला निघणार होते. त्या जहाजाबरोबर मला जायचे होते. मला तेथे घेऊन जाण्यासाठी ०६.०० ला नौदलाची जीप येणार होती व त्यासाठी तयार राहण्याचा हुकुम होता. किती दिवस आणि नेमके कोठे जायचे आहे याचा उल्लेख नव्हता. मी उठलो, तोंड धुतले, आंघोळ केली आणि गणवेष घालून तयार होतो न होतो तोच नौदलाचा सैनिक जीप घेऊन आलाच होता.
छोटीशी बॅग घेऊन निघालो. म्युझियम जवळच्या लायन गेट मधून जीप आत नौसेना गोदीत शिरली आणि “बेदी” जहाजाजवळ पोहोचली. मी जहाजात प्रवेश केला. शिडीजवळ उभ्या असलेल्या नौसैनिकाला बिनतारी संदेश दाखवला. त्याने अदबीने जहाजाचे कमांडिंग ऑफिसर, लेफ्टनंट कमांडर खन्ना यांच्या केबिन पाशी नेऊन सोडले. मला पाहताच ते आनंदी झाले कारण ते माझीच वाट पाहत थांबले होते.
खन्ना साहेबाना काय कामगिरी आहे असे विचारले. ते म्हणाले, काल झालेल्या वादळात बरेच मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाले आहेत. त्यांना शोधून परत आणण्यासाठी आपल्याला समुद्रात जायचे आहे. ते पुढे म्हणाले कि “बेदी” ही पाण-सुरुंग विरोधी (MINE SWEEPER) नौका आहे. तिचा तळ रुंद आणि उथळ (FLAT BOTTOM) असल्याने समुद्रात तरंगणार्या वस्तूना फारशी इजा पोहोचत नाही. आपल्या जवळील पृष्ठभाग मोजणार्या (SURFACE MAPPING) रडारवर पाण्याच्या पृष्ठ भागावर तरंगणार्या गोष्टी सहजपणे दिसतात. समुद्रात तग धरून असलेल्या मच्छीमार लोकांचा शोध घेऊन त्यांची माहिती नौदलाच्या हेलीकोप्टरला देणे म्हणजे ते त्यांना उचलून ताबडतोब किनार्यावर नेतील. तितकेच महत्वाचे दुसरे काम म्हणजे छोटया छोटया मच्छीमार नौकांना सुरक्षित परत आणणे.
डॉक्टर तू आता तुझा दवाखाना बघून घे कारण पुढच्या २ ते ३ मिनिटातच आपल्याला निघायचे आहे.
मी खालच्या डेकवर दवाखाना पाहण्यासाठी गेलो. दवाखाना आटोपशीर छोटासा होता. त्यात एका वर एक असे दोन बेड (बंक बेड सारखे) होते. समोरच्या बाजूला औषधांची कपाटे होती. खास पाहण्यासारखे काहीच नव्हते. समुद्रातील माझा हा पहिलाच प्रवास होता. मी ब्रिजवर (नौका चालवण्याची जागा) आलो. थोडया वेळात जहाजाची शिडी काढून घेतली गेली व सगळे दोर सोडून नौका कामगिरीवर निघण्याच्या तयारीत होती.
सकाळचे पावणे सात वाजले होते. वातावरण ढगाळ होते. पावसाचे बारीक बारीक थेंब पडत होते; सूर्य दिसत नव्हता. सूर्योदय झाला होता कि नव्हता हे कळत नव्हते. मुंबई बंदराच्या पूर्वेला प्रकाश दिसत होता आणि पश्चिमेला शहरातील दिवे. फार छान देखावा होता. जहाजाचा खानसामा मला चहा आणि नाश्त्यासाठी खाली बोलावित होता. थोड्या वेळाने येतो असे मी त्याला संगितले. सकाळपासून काहीच न खाल्याने भूक लागलीच होती पण आजूबाजूची ती निसर्ग किमया सोडून जाण्याचा विचार सुद्धा मनात येत नव्हता. मी उल्हसित होऊन आजूबाजूला पाहत होतो. मुंबई बंदरातील खाडीच्या पाण्यातून जहाज मोठ्या डौलदारपणे जात होते. ठाणे खाडीपूल मागे लांबवर दिसत होता. उजवीकडे शेअर बाजार व रिझर्व बँकेच्या उंच इमारती. पुढे कुलाब्याची दांडी दिसत होती. देखावा विहंगम व फारच मनोहारी होता.
पुढच्या काही मिनिटात जहाजाने कुलाब्याची दांडी ओलांडली आणि समुद्राचे रौद्र रूप दिसू लागले. १०-१५ फूट उंचीच्या लाटा उसळत उफाळत होत्या. आमचे जहाज उथळ बुडाचे असल्याने ते डावी - उजवीकडे ४५ अंशात डोलू लागले आणि माझ्या पोटात ढवळू लागले. जहाज अशा तर्हेने हलत होते की ब्रिजवर उभे राहणे मला अशक्य झाले. मी घाई घाईने शिडी उतरून खाली दवाखान्याकडे आलो. तोवर माझ्या पोटात प्रचंड ढवळून आले आणि आतडी बाहेर येतात की काय अशी शंका येईल इतकी जोरदार उलटी झाली. उलटीत बाहेर पडण्यासाठी सुदैवाने पोटात काहीच नव्हते पण पोटात तयार झालेले थोडे फार आम्ल बाहेर आले. डोके जोरदार गरगरू लागले आणि काय करावे ते सुचत नाहीसे झाले. काहीही झाले तरी मला धीर धरणे आवश्यकच होते.
मी दवाखान्यातील खालच्या बेडवर आडवा झालो आणि माझ्या वैद्यकीय मदतनीसाला उलटी प्रतिबंधक गोळी (अवोमीन – avomine ) देण्यास सांगितले. ती गोळी न गिळता जिभेखाली धरली कारण उलटी होण्याची शक्यता होती. थोडया वेळापूर्वीच्या निसर्ग विभ्रमाचे आकर्षण पूर्ण नाहीसे झाले होते. पुढे काय वाढून ठेवले होते ते काहीच कळत नव्हते. गोळी तोंडात धरूनच पडून राहिलो. थोडया वेळाने पोटात ढवळणे थांबले परंतु डोके गरगरतच होते.
थोडेसे धैर्य बाळगून उठलो आणि परत जिना चढून ब्रिज वर गेलो. वरून दिसणारे दृश्य आता भयंकर होते. जहाज पूर्ण तिन्ही मितीत ४५ अंशात वर खाली होत होते. समुद्र खवळलेलाच होता. पाणी लाटा आणि फेसामुळे पांढरे दिसत होते. तेव्हढ्यात तेथील रडार वर काहीतरी दिसल्याचे ऑपरेटरने सांगितले. कप्तानाने त्या दिशेने जहाज वळविण्याचा हुकूम दिला. जवळ जाऊन पहिले तर समुद्रात एक प्रेत तरंगत होते. प्रेताची बोटे आत वळलेली होती, शरीर आखडलेले होते. लाटांवर खाली वर होणारे प्रेत पाहून मला परत पोटात ढवळू लागल्या सारखे होऊ लागले. कप्तानाने मागून येणाऱ्या तट रक्षक दलाच्या ‘वरद’ नावाच्या जहाजाला त्या प्रेताचा ठावठिकाणा सांगितला आणि आम्ही पुढे निघालो.
मी कप्तानाला विचारले की प्रेत सोडून का दिले? तो म्हणाला कि आपल्याला जास्तीत जास्त जिवंत लोकांना वाचवायचे आहे प्रेत जहाजावर घेण्यात आपला वेळ फुकट घालवणे परवडणारे नाही. रडार वर दिसणाऱ्या गोष्टींचा मागोवा घेत आम्ही पुढे जात राहिलो, फिरत होतो. मधेच एक होडके दिसले. त्याच्या जवळ गेल्यावर लक्षात आले कि त्यावर जिवंत माणसे आहेत आणि ते होडके समुद्रावर भरकटत आहे. दोराच्या सहाय्याने आमच्या जहाजाने होडक्याला हळूहळू खेचत आणले व त्या वरील लोकाना सर्वात जवळ असलेल्या अलिबाग बंदरात सोडले. जहाज परत फिरले. या वेळेपर्यंत माझे डोके परत जबरदस्त गरगरू लागले आणि पोटात ढवळू लागले. कोणालाही न सांगता मी घाईघाईने परत येऊन दवाखान्यातील बेडवर आडवा झालो, डोळे घट्ट मिटून घेतले. जहाज फारच हलत होते. इतक्यात बाजूच्या केबिन मधून काहीतरी ओरडण्याचा आवाज आला..
केबिन मधून एक दाक्षिणात्य अधिकारी ओरडत होता अप्पा, अम्मा व्हाय डिड आय जॉईन नेव्ही? आय वाज बेटर अॅज ए क्लार्क इन बँक. व्हाय डिड आय मेक धिस मिस्टेक? मला तशा स्थितीत सुद्धा हसायला आले. नंतर त्याचे नाव लेफ्टनंट रवि असे कळले. माझ्यासारखेच त्याचे डोके गरगरत होते. तो उलटया करीत पडला होता असे मला नंतर सांगण्यात आले. बहुधा अवोमीनच्या प्रभावाने मला डुलकी लागली असावी. थोड्या वेळाने दवाखान्याच्या ध्वनिक्षेपकावर घोषणा ऐकली “ए सेलर ईज अनकोन्शस ऑन ब्रिज; मेडिकल ऑफिसर टू इव्हाक्यूएट” ( ब्रिज वर एक नौसैनिक बेशुद्ध पडला आहे त्याला डॉक्टरने येउन घेऊन जावे ) मी माझ्या सहाय्यकाना स्ट्रेचर घेऊन चलण्यास संगितले. मी पण ब्रिजवर गेलो. आणि कप्तानाला काय झाले विचारले. तो म्हणाला हा सैनिक बाजूच्या गच्चीतून समुद्रात निरीक्षण करण्याच्या डयूटीवर होता आणि आता बेशुद्ध आहे. काय झाले ते मला माहित नाही. आता जे काय करायचे आहे तो तुझा प्रश्न आहे. इति कप्तान. मी आजूबाजूला असलेल्या नौसैनिकांना विचारले त्यांनाही काही माहीत नव्हते. शेवटी त्या गरगरत्या अवस्थेतच मी माझ्या सहाय्यकाला त्या सैनिकाला स्ट्रेचरवर घेण्यास सांगितले. त्याला स्ट्रेचरवर आवळले ( हे स्ट्रेचर दुपांगी घडी घालण्यासारखे असते ).
पुढचा दांडा मी व मागचा दांडा सहाय्यकाने धरून ते स्ट्रेचर एका वेळी एकच व्यक्ति चढू-उतरू शकेल एव्हढ्या चिंचोळ्या उभ्या सरळ जिन्याने उतरवले. दवाखान्यात आणले. त्या सैनिकाला जमिनीवर झोपवले व त्याची नाडी तपासली. त्याच्या नाडीचे / हृदयाचे ठोके मंद मंद पडत होते. मिनिटाला फक्त ४०. श्वास सुद्धा मंदपणे चालला होता. त्याच्या ह्या परिस्थितीचा अंदाज येण्यासाठी इतर काहीही माहिती उपलब्ध नव्हती. माझे डोकेच चालेना. काय करावे ते सुचेना.
मी माझ्या वैद्यकीय सहाय्यकाला रूग्णाला सलाईन लावण्यास संगितले. तो म्हणाला सर सलाईन नाही! . मी म्हटले ग्लुकोज लाव. तो म्हणाला शिरेतून देण्याचे कोणतेच औषध नाही. आता मला काय करावे ते कळेना.
तो सैनिक आता दगावतो कि काय अशी अनामिक चिंता मला वाटू लागली. नौदलात आलो डॉक्टर म्हणून आणि समुद्रावरचा तो पहिलाच दिवस. मृत्यूचे सर्टिफिकेट देऊन आपल्या कारकिर्दीला सुरूवात होते की काय ही मनात भीती.
रुग्णाची अशी स्थिति कशाने निर्माण होऊ शकेल याचा मी मनातल्या मनात मागोवा घेऊ लागलो. एकदा वाटले कि याच्या नाडीचे ठोके ४० झाले आहेत म्हणजे त्याच्या रक्तातील कॅल्शियम कमी झाले असावे किंवा पोटॅशियम वाढले असावे. मी सहाय्यकाला एट्रोपिन चे इंजेक्शन ( हे औषध हृदयाचे ठोके वाढवते ) देण्यास सांगितले. त्याने ते दिले. थोड्या थोड्या वेळाने त्याच्या नाडीचे ठोके जसे जसे जसे वाढत गेले तसा तसा माझ्याही जीवात जीव जीव येत गेला. मी सहाय्यकाला विचारले की नाकातून घालायची नळी आहे का? तो हो म्हणाला. त्याने एक नळी त्या सैनिकाच्या नाकात सरकवली. तो बेशुद्ध असल्याने नळी पटकन आत गेली. नळीतून इलेकट्रोल देण्यास सांगितले. त्याने एका भांड्यात इलेकट्रोलचे द्रावण तयार केले आणि एक एक घोट घालीत नळीने रूग्णाला तीन ग्लास द्रावण पाजले. काय आश्चर्य? त्याने डोळे उघडले. इकडे तिकडे बघितले आणि तो चक्क उठून बसला. मी त्याला विचारले तुला काय झाले होते? तो म्हणाला मला सारखे गरगरत होते आणि उलट्या होत होत्या.
नौदलात समुद्रावर कोणालाही गरगरते उलट्या होतात म्हणून रजा / सूट मिळत नाही. त्याला काळ्या रंगाची बादली देतात. उलटी आल्यास त्यात करायची आणि काम करायचे हा नियम. समुद्रावर सगळ्यांनाच गरगरते कोणाचे लाड करणार? मीही त्याला अपवाद नव्हतो.
आता माझ्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडू लागला होता. बहुधा उलटया करून करून त्या सैनिकाच्या शरीरातील पाणी कमी झाले आणि इलेक्ट्रोलाईट कमी जास्त झाल्याने तो बेशुद्ध झाला असावा. अर्थात हा माझा तर्क आहे. त्याला पुष्टी देणे त्या वेळी तरी शक्य नव्हते. निदान "प्रथम ग्रासे मक्षिका पात:" टळला होता. (पहिल्याच घासात माशी पडली नव्हती). इंजेक्शनने त्याचे ढवळणे पूर्ण थांबले होते आणि तो छान बसून खिडकीतून इकडेतिकडे पाहत होता. खरेतर आता त्याची परिस्थिती माझ्यापेक्षा चांगली होती. माझे डोके गरगरत होते, मळमळही सुरूच होती.
थोड्या वेळाने त्याला पुन्हा एक लिटर इलेक्ट्राल पाजले. तो पूर्णपणे टुणटुणीत झाला. हा ऍट्रोपीन देण्याचा प्रत्यक्ष अनुभव पुढे नौदलात मला खूप उपयोगी पडला.
काही वेळाने मी परत ब्रिज वर गेलो. तेथे परिस्थिती तशीच होती. मी कप्तानाला विचारले कि जिवंत माणसांचे काय केले. त्याने सांगितले कि जिवंत माणसाना आम्ही हेलिकोप्तरने कुंजाली या तळावर पोहोचविले आणि तिथून जे जे हॉस्पिटलला पाठविले. त्यांना आपल्याबरोबर फिरविण्यात काहीच हशील नव्हता. ५-६ जहाजांना अलिबागला सोडले व मागून येणाऱ्या वरद या जहाजाने प्रेते मुंबईला नेली. आपले काम फक्त माणसे किंवा बोटीना शोधून काढणे होते.
कप्तानाने मला खाण्यासाठी सँडविच देऊ केले पण खाण्याकडे पाहण्याचीही हिम्मत माझे पाशी नव्हती. . मी पाणी सुद्धा पिण्यास घाबरत होतो.
आपण सैनिकाच्या अवस्थेत गेलो आणि बेशुद्ध पडलो तर मला atropine केंव्हा आणि द्यायचं कि नाही हा निर्णय कोण घेणार होते? याचा मी विचार करत होतो. अवोमीन च्या गोळीमुळे मला तशा उलट्या होत नव्हत्या आणि पोटात तर काहीच नव्हते.
आमच्यापेक्षा खूप जास्त माणसे तटरक्षक दलाच्या "डोर्नियर" या विमानाने शोधली होती. हे विमान पाण्याच्या पातळीच्या १५-२० फुटावरून उडत होते आणि २०० किलोमीटर वेगाने गेल्याने मोठया क्षेत्राचे लवकर निरिक्षण करू शकत होते. डोर्नियर या विमानाने डझनावारी माणसांचा ठावठिकाणा शोधून फारच छान काम केले होते. त्याबद्दल त्यांच्या वैमानिकाला तटरक्षक दलाने गौरव पदक दिले ( १५-२० फूट उंचीवरून २०० किमी वेगाने हवेत उडत जाणे हि गोष्ट फार कठीण आणि अतिशय कौशल्याची आहे. थोडीशी चूक जीवावर बेतू शकते.)
असे दिवसभर फिरत फिरत शेवटी सूर्यास्ताला आम्ही परत फिरलो. जेव्हा कुलाब्याच्या दांडीच्या पुढे जहाज आले तेंव्हा जहाज डुलणे पूर्ण बंद झाले. आता माझी परिस्थिती पण बर्यापैकी सुधारली होती. जहाजाचा खानसामा सुद्धा आपल्या पायावर उभा होता. पूर्णवेळ तो सुद्धा आडवाच होता असे मला कळले.
असो मी त्याला एक कोकाकोला देण्यास सांगितले. कॅनमधील कोकाकोलात थोडेसे लिंबू घालून प्यायलो तो अमृतासारखा गोड लागला. अख्ख्या दिवसात माझ्या पोटात गेलेले ते पहिले अन्नद्रव्य होते. परताना सकाळ सारखाच देखावा दिसत होता. पश्चिमेला मावळता सूर्य, मुंबईतील त्याच इमारती, तेच लुकलुकणारे दिवे व तीच लखलखती नगरी. फरक इतकाच की पायाखालची जमीन हलत नव्हती. ती किती घट्ट असते ह्याचा हा पहिला अनुभव होता. असे बरेच दिवस परत माझ्या आयुष्यात येणार होते त्याची ही नांदी नसावी ? आज सुद्धा तो दिवस माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.
दुसर्या दिवशी आमचे (नौदलाचे) नाव वर्तमानपत्रात वाचण्यास मिळाले. मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष श्री भाई बंदरकर यांच्या म्हणण्याप्रमाणे वसई सातपाटी इथल्या कोळी लोकांच्या बोटीना नौदलाने अलिबागला न सोडता वसई येथे पोहोचवायला हव्या होत्या कारण त्या लोकांजवळ परत जायचे पैसे नव्हते. थोडक्यात नौदलाने हात राखून सहकार्य केले असल्याची त्यांनी टीका केली होती.
हवामान खात्याने वादळाचा लाल बावटा दाखवला असताही मच्छीमार समुद्रात का गेले याचे उत्तर देणे त्यांनी चातुर्याने टाळले होते. .
कर्मण्ये वाधिकारस्ते म फलेषु कदाचन.
कामावर आपला अधिकार असतो, फलावर नाही हा बोध मिळाला
थरारक अनुभव कथन. मजा आली
थरारक अनुभव कथन. मजा आली वाचायला.
मूळ घटना गंभीर आणि दुःखद असली
मूळ घटना गंभीर आणि दुःखद असली तरी तुमचा अनुभव वाचून गंमत वाटली. हे म्हणजे 'चिंगारी कोई भडके' सारखं झालं. डॉक्टरच आजारी पडल्यावर त्याला कोण बरं करणार?
लाल बावटा असतानाही समुद्रात जाणाऱ्या कोळ्यांचीही काही मजबूरी असेल कदाचित.
थरारक अनुभव आवडला.
थरारक अनुभव आवडला.
छानच कथन केले, प्रत्यक्ष
छानच कथन केले, प्रत्यक्ष असल्याचा अनुभव आला
लाल बावटा असतानाही समुद्रात
लाल बावटा असतानाही समुद्रात जाणाऱ्या कोळ्यांचीही काही मजबूरी असेल कदाचित.
माणसाना पोटासाठी काहीही करावे लागते हि वस्तुस्थिती आहे
याशिवाय
आमचं आयुष्य गेलं समुद्रात, हे हवामान वाले काय सांगतात हा थोडा फार अहं सुद्धा मी मच्छीमार लोकांत पाहिलेला आहे.
त्याबद्दल काही म्हणणे नाही परंतु अशा वादळात जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवायचा कि त्या मच्छीमारानाअलिबाग ऐवजी वसई ला सोडण्यात महत्वाचा वेळ फुकट घालवायचा.
वादळात बोटी हरवल्या कि त्या दिशाहीन होऊन भरकटत जातात कारण ढगांमुळे आभाळात सूर्य/ चंद्र तारे ही दिसत नाहीत, जर जमीन दिसत नसेल तर लाटांच्या दिशेवरूनही भर समुद्रात दिशा समजत नाही आणि बोटी अधिकच खोल समुद्रात भरकटतात.
मग अशा स्थितीत हाताशी असलेल्या होड्या ना जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर आणून सोडले जाते आणि अधिक होड्याना शोधण्यासाठी परत कूच केले जाते.
रंजक... वाचतांना गंमत वाटते
रंजक... वाचतांना गंमत वाटते पण प्रत्यक्ष अनुभव फार वाईट असतो. मुंबई ते एलिफेंटा केव्हज् एवढा छोटा प्रवासही मला झेपला नव्हता. अशाच अजून कथा वाचायला आवडतील.
हे अनुभव कथन वाचकाचे चित्त
हे अनुभव कथन वाचकाचे चित्त गुंतवून ठेवणारे आहे.
डॉक्टर तुमच्या अशाच रंजक पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.
थरारक लिखाण.
थरारक लिखाण.