Part 1:https://www.maayboli.com/node/88038
Part 2:https://www.maayboli.com/node/88058
Part 3:https://www.maayboli.com/node/88091
Part 4: https://www.maayboli.com/node/88099
मागच्या भागात...
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर नववीच्या वर्गात पदार्पण करताना सौरभ आणि त्याच्या मित्रांनी शाळेत चातक पक्षाचे दर्शन घेतले, ज्याच्या आगमनाने पावसाची चाहूल लागली. सौरभने मांडलेली निसर्गविषयक माहिती आणि पावसाच्या पहिल्या सरींवेळी त्याने वाजवलेली मंत्रमुग्ध करणारी शीळ सावनीच्या मनात घर करून बसली. पावसात भिजताना मयंकच्या तालावर सौरभने गायलेली गाणी आणि त्याची निसर्गाप्रती असलेली संवेदनशीलता पाहून सावनी त्याच्याकडे अधिकच कुतूहलाने पाहू लागली. ताडोबाच्या शालेय सहलीमध्ये कबड्डीच्या थरारक सामन्यात सौरभने आपल्या जिद्दीने आणि ताकदीने 'क' तुकडीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. याच दरम्यान खेळताना झालेल्या जखमेवर सावनीने गुपचूप दिलेल्या औषधाने त्यांच्यातील अबोल जवळीक अधिक स्पष्ट झाली. सहलीच्या रात्री शेकोटीभोवती रंगलेल्या कार्यक्रमात सावनीने आपल्या सुमधुर आवाजात गाणे सादर केले, तर त्यानंतर सौरभने बासरीच्या सुरांनी अख्खे जंगल व्यापून टाकले. बासरी वाजवतानाचे सौरभचे तन्मय होणे आणि त्याच्या गालावर पडणारी खळी सावनीला पूर्णपणे भारावून टाकणारी होती. या साऱ्या प्रवासामुळे दोघांच्याही मनात एकमेकांविषयी एक सुप्त ओढ निर्माण झाली. मित्रांच्या खोडकर चिडवाचिडवीत आणि ताडोबाच्या त्या निसर्गरम्य वातावरणात सौरभ आणि सावनीच्या नात्यात एक नवीन आणि सुंदर वळण आले, ज्याच्या आठवणी त्यांच्या मनात मृदगंधासारख्या कायमच्या दरवळत राहिल्या.
आता पुढे
कथा: कोवळ्या सरी- भाग 5
क्रिकेटची मॅच पाहिली का?
डिसेंबर महिना होता. नागपूरची गुलाबी थंडी आता चांगलंच बाळसं धरू लागली होती. सोमवारची ती सकाळ इतर दिवसांसारखी नव्हती. नेहमी शाळेच्या फाटकापाशी अभ्यासाच्या किंवा इतर विषयांच्या गप्पा रंगायच्या, पण आज मात्र माहोल वेगळाच होता. शाळेच्या फाटकापासून ते वर्गाच्या बाकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा होती, शनिवारच्या पाकिस्तान विरुद्ध सामन्याची.
नेहमीप्रमाणे शाळा भरण्यापूर्वी सगळी मुलं गोळा झाली होती. गौरव, सौरभ, सारंग मयंक, अभय सगळ्यांचे चेहरे उत्साहाने फुलले होते.
कुणीतरी म्हणाला, "अबे, शनिवारची पाकिस्तान विरुद्धची मॅच पाहिली का? अब्दुल कादिरला त्या नवीन कोवळ्या सचिन तेंडुलकरने काय सुतलं बे! खतरनाक! त्याच्या इज्जतीचा पार फालुदाच करून टाकला त्याने."
सारंगही तितक्याच जोशात म्हणाला, "हो ना बे! 53 नॉट आऊट, तेही फक्त 18 बॉलमध्ये! त्या कादिरच्या एका ओव्हरमध्ये तर त्याने २८ रन कुटले. पेशावरच्या त्या मैदानात पाकिस्ताची आणि सगळ्या गोलंदाजांची पार मिजास उतरवली. प्रेक्षकही शांत झाले होते."
गौरवने विचारलं, "अबे, तो मुलगा फक्त सोळा वर्षांचा आहे ना? आपल्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठा आहे, पण काय बॅटिंग करतोय! वकार युनूसचा बॉल नाकावर लागूनही तो खेळत राहिला होता म्हणे."
त्या दिवशी फक्त मुलांमध्येच नाही, तर स्टाफ रूममध्येही सगळे याच विषयावर चर्चा करत होते. चहाचे घोट घेत प्रत्येक जण त्या सोळा वर्षांच्या मुलाच्या धैर्याचं कौतुक करत होता. सकाळच्या 'तरुण भारत' आणि 'The Hitvada' मध्ये त्या छोट्या सचिनचे फोटो झळकले होते. भारताला जणू एक नवा 'हिरो' मिळाला होता.
प्रार्थनेची घंटा वाजली, पण मुलांच्या मनात अजूनही त्या षटकारांचे प्रतिध्वनी उमटत होते.
भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवीन तारा नुकताच उगवला होता, येणारी कितीतरी वर्ष क्रिकेट विश्वावर अधीराज्य गाजवायला!
दाहकतेची चाहूल
वर्षाचा शेवट आला होता. राणे सरांनी क्लासमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना बजावून सांगितलं होतं की, "दहावीचा Summer क्लास लावू नका. जेमतेम अडीच महिने मिळतील, या अडीच महिन्यात ते सगळे विषय कव्हर करतील. म्हणजे विचार करा, ते केवळ अडीच महिन्यात किती speed ने शिकवतील, सुसाट! तुमच्यावर खूप ताण पडेल. त्यापेक्षा छान उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्या. दहावीचा आपला क्लास आपण १ जूनपासून सुरू करतोय, म्हणजे नेहमीपेक्षा एक महिना आधी. माझा हा सल्ला आहे, शेवटचा निर्णय तुमचा आणि तुमच्या आई-वडिलांचा आहे."
नववीच्या परीक्षा झाल्या आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या. वर्गातलं वातावरणही आता थोडं बदललं होतं, पण खूप नाही. मुलं-मुली एकत्र बोलत असत, पण फार नाही. मयंक आणि सौरभने काहीही करून उन्हाळ्यात दोन-चारदा तरी भेटायचं ठरवलं होतं. निरोप घेताना सावनी आणि सौरभच्या चेहऱ्यावर एक हुरहूर होती. मुग्धा आणि सावनी मयंक आणि सौरभशी बोलायला आल्या.
मुग्धा म्हणाली, "तुमचा काय बेत आता?"
मयंक म्हणाला, "घरी जायचं, जेवायचं, आंब्याच्या रसावर ताव मरायचा आणि कुलरमध्ये मस्त ताणून द्यायची!"
मुग्धा वैतागून म्हणाली, "चल रे, ते नाही विचारत मी."
सावनी म्हणाली, "उन्हाळ्यात बाकी काय करणार ते विचारतोय आम्ही. Keyboard-तबला and बासरी का कुछ होने वाला है?"
मयंक हसून म्हणाला, "अरे, ही तर हिंदीवर आली! मागच्या वर्षी शाळेत आली होती तेव्हा किती English मध्येच बोलायची. झाली ही नागपूरकर."
सावनी उत्तरली, "होऊन राहिले ना बप्पा आता नागपूरकर!"
मयंक जोरात ओरडला, "बप्पा!"
मुग्धा म्हणाली, "मग! माझ्या संगतीत राहून राहिली ना ती!"
सगळे हसतात.
पण मुग्धानी विचारलं “अरे एकदा आपण असे भेटू शकतो का, काहीतरी करू ना Keyboard/तबला, बासरी आणि गाण?”
मयंक “अबे सौरभ काही बोलशील का? प्रश्न आहे, मला तर धावेल”
सौरभ “अरे आत्ताच बोललो न आपण भेटू म्हणून”
मयंक “ते आपण म्हणालो रे या नव्हत्या तेव्हा”
सौरभ “अच्छा अरे हो, नाही मला पण धावेल, केव्हा आणि कुठे?”
मयंक “माझ्या घरी भेटता येईल, वरच्या आमच्या खोलीत जागा आहे आणि तिथे कोणीही येत नाही. संगीत साधने साठी उत्तम!”
सौरभला खूप उत्कंठा असुनही ती न दाखवता त्याने विचारलं “कुठे झालं, आता केव्हा?”
मुग्धा “मी गावाला चालले आहे. अ… आपण रिझल्ट नंतर भेटायच का? मग रिझल्ट च्या दिवशी जेव्हा भेटू तेव्हा ठरवू”
मयंक “बढिया”
सौरभचा चेहरा थोडा पडला आणि सावनीचा देखील; कारण त्यांना अपेक्षा होती की आत्ता पुढच्या काही दिवसात भेटता येईल.
मुग्धा म्हणाली, "चला मग, भेटूया. चलायचं सावनी?"
सावनीला जायचं नव्हतं, पण तिच्याकडे आता थांबायला काही कारण नव्हतं. सौरभ काही बोलणार, तितक्यात त्या दोघी मागे वळून निघून गेल्या.
मयंक म्हणाला, "सौरभ, आपण तर भेटू ना या आठवड्यात, रविवारी महाभारत झालं की, किंवा महाभारता आधीच ये, म्हणजे झालं की लगेच वर जाऊ." सौरभ म्हणाला, "मस्त, भेटू. श्रद्धानंद पेठ, दुसऱ्या गल्लीतून आत तिसरं घर?"
मयंकने होकार दिला, "बरोबर."
जड अंतःकरणाने सौरभ तिथून बाजूला झाला आणि सारंगला शोधू लागला. त्याची नजर एकदा हेही पाहत होती की सावनी आहे की गेली? सावनी गेलेली नव्हती, ती थोडी लांब उभी होती. एक सेकंद त्यांची नजरा नजर झाली, इतक्यात मागून अखिल आला आणि म्हणाला, "देसाई, चलायचं ना बे?"
सौरभ भानावर आला आणि म्हणाला, "कुठे आहेत गौरव आणि सारंग?"
अखिल म्हणाला, "काय माहीत कुठे गेले पोट्टे तर?"
दोघांनी सारंग आणि गौरवला शोधलं आणि घराकडे निघाले.
नेहमीप्रमाणे सारंग, सौरभ आणि गौरव यांचं अंबाझरीला नित्यनेमाने पोहायला जाणं सुरू झालं. यंदा आत्मविश्वास खूप बळावला होता, त्यामुळे अंबाझरी तलावाच्या मधोमध असलेल्या पोलपर्यंत जाणे आणि येणे हे नेहमीचंच झालं होतं. कधी पैजही लागे. बहुतेक वेळा सारंग बाजी मारायचा, कारण तो धावणे, बॅडमिंटन, टेबल टेनिस यात पूर्वीपासून होता. गौरवकडेही खूप स्टॅमिना होता. सौरभचा स्टॅमिना मात्र थोडा कमी पडायचा. सौरभ, गौरव आणि सारंगने पुन्हा अलंकार टॉकीजला जाऊन 'For a Few Dollars More' नावाचा चित्रपट पाहिला. यावेळी त्यांच्याबरोबर मयंकही होता. मयंक आणि सौरभचं लक्ष त्याच्या संगीताकडे आकर्षित झालं.
अखिल म्हणायचा, "अबे, 'मैने प्यार किया' ला जाऊ ना बे." याला सारंग आणि गौरवने जोरात, "No torture please!" करत सपशेल नकार दिला. सौरभलाही त्यात विशेष स्वारस्य नव्हतं. अखिल म्हणाला, "अबे, इतके लोक पाहून राहिले, काही तर विचार करा बे?" पण कोणीच काही उत्तर दिलं नाही.
सौरभला वाट होती ती रिझल्टच्या दिवसाची. रिझल्ट लागला आणि सगळ्यांना उत्तम मार्क होते. निकालाच्या दिवशी कधी भेटायचं ते ठरलं— मंगळवारी दुपारी.
ठरल्याप्रमाणे सौरभ आधीच मयंककडे पोहोचला. मयंक आणि सौरभ दोघं वर मयंकच्या खोलीत गेले. सौरभने बासरी काढली, मयंकने तबला आणि keyboard वरचं कव्हर काढलं. थोडावेळ त्यांनी काहीतरी वाजवल. इतक्यात मयंकला खालून त्याच्या बहिणीने आवाज दिला. मयंक बालकनीत आला, बहिणीने त्याला खाली बोलावलं होतं. इतक्यात सावनी आणि मुग्धा पण तिथे पोहोचल्या. दोघींनी स्कार्फ काढले आणि सायकल झाडाखाली स्टँडला लावली.
समोरून मुग्धाला कोणीतरी आवाज दिला, "अरे मुग्धा, तू इथे?"
सावनी थोडा वेळ वाट पाहत उभी राहिली. थोड्यावेळाने ती मुग्धाला म्हणाली, "मुग्धा, मी जाऊ का गं आत?"
मुग्धा म्हणाली, "हो, मी आलेच."
सावनी फाटक उघडून आत आली. मयंक बाहेरच्या खोलीत काहीतरी काम करत होता, त्याच्या हातात कुकरचं झाकण होतं.
तो सावनीला म्हणाला, "अरे ये, ये! कधी आली?"
सावनी म्हणाली, "अरे हे काय, आत्ताच."
मयंकने विचारलं, "आणि मुग्धा?"
सावनी म्हणाली, "ती बाहेर उभी आहे, तिला कोणीतरी ओळखीचं भेटलं आहे."
मयंक म्हणाला, "अच्छा! तू जातेस का जिन्याने वर? सौरभ बसला आहे वरच." मुग्धा बाहेरून ओरडली, "सावनी, मी येते पाच मिनिटात."
सावनी जिना चढून वर गेली. खोलीचं दार हलकेच उघडलं. तिच्या कानावर बासरीचे स्वर पडले—
“स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी
विरहार्त मनाचे स्मित
सरले, गालावर आसू ओघळले-
होता हृदयाची दो शकले
जखमेतुन क्रंदन पाझरले-
घाली फुंकर हलकेच कुणी..
स्वर आले दुरुनी
स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी
स्वर आले दुरुनी”
सौरभ खिडकीत उभा राहून त्याचं पूर्ण चित्त ओतून, डोळे मिटून बासरी वाजवत होता. बासरी थांबली. सौरभने मागे वळून पाहिलं. एरवीच या गाण्याचे सूर थेट हृदयाला जाऊन भिडतात, त्या बासरीच्या गोड पण थोड्या आर्त स्वरांनी सावनीच्या हृदयाचा ठाव घेतला, ते इतक जाऊन तिच्या मनाला भिडलं की तीचं मन एकदम हळवं झालं.
ती म्हणाली "खूप छान वाजवतोस रे तू सौरभ..." सावनीचे डोळे भरून आले होते. ती एवढंच बोलू शकली. सौरभच्या नकळत ती आपल्या डोळ्यांच्या कडा टिपत होती. सौरभने बासरीकडे पाहिलं आणि मग सावनीकडे. तो म्हणाला, "हे गाणं माझ्या वडिलांना खूप आवडतं आणि ही बासरीही माझ्या बाबांची आहे. तुला आवडतं का हे गाणं?" सावनीने फक्त होकारार्थी मान डोलवली. खोलीत शांतता पसरली होती.
त्या क्षणी सावनीला जाणवलं की, हे सूर आपल्याला एकत्र घेऊन आले आहेत आणि हेच आपल्याला एकत्र जोडून ठेवणार आहेत!
मयंक खोलीत आला, त्याला वातावरणातला तो शांतपणा जाणवला. तो म्हणाला, "यहा इतना सन्नाटा क्यो है भाई? सावनी तू उभी का? बस ना!" सावनी म्हणाली, "हो बसते. अरे मी आले तेव्हा हा 'स्वर आले दुरुनी' वाजवत होता. याच्या बासरीत काही जादू आहे, खरंच!"
मयंक “एकदम बरोबर बोलते आहे सावनी तू”
यानंतर थोड्या वेळात मुग्धाही आली. तिने बाहेर कोण भेटलं होतं ते सांगितलं. चौघंही तास-दोन तास संगीतात बुडून गेले. मयंक आणि सौरभने त्यांना ते ऐकवलं जे त्या दोघांनी काही दिवसांपूर्वी भेटून बसवलं होतं.
मयंक म्हणाला, "1,2,3,4!" सौरभ बासरीवर स्वर वाजवत होता आणि तेच स्वर मयंक keyboard वर वाजवत होता. त्यांनी अनेक variations घेतले, लय कमी-जास्त करत वाजवलं. शेवटी तो पीस बासरीच्या लांब स्वरांनी संपला. मुग्धा आणि सावनीने टाळ्या वाजवल्या.
सावनी म्हणाली, "तुम्ही दोघं अशक्य आहात. अरे, तुम्ही जुगलबंदी पेश केलीत आत्ता!"
मुग्धा गालावर हात ठेवत आश्चर्य व्यक्त करत म्हणाली, "हे... हे खतरनाक होतं. Unbelievable!"
मयंक म्हणाला, "इतकं काही नाही, पण प्रयत्न मनापासून करतोय. चुका पण होतात भरपूर. चला, आता तुम्हाला काय करायचं आहे सांगा?"
सावनी म्हणाली, "इथेच आणि या बांधावर... आणि 'कयामत से कयामत तक' मधलं 'गजब का है दिन'."
मयंकने विचारलं, "पहिलं, माणिक वर्मा?"
सावनी म्हणाली, "हो."
मयंक म्हणाला, "मला ऐकायला लागेल एकदा."
मुग्धा म्हणाली, "मला... 'केतकीच्या बनी तिथे' आणि 'रात अकेली है'."
मयंकने ठरवलं, "एक काम करू, 'इथेच आणि या बांधावर' पहिले घेऊ, मग 'केतकीच्या बनी तिथे', मग 'रात अकेली है' आणि शेवटी 'गजब का है दिन'."
सावनी आणि मुग्धा म्हणाल्या, "चालेल."
मयंक म्हणाला, "एकदा असंच raw गा."
सावनी गायली. मयंक म्हणाला, "थांब, मला डबा आणू दे—ताल-तबला... ते नाही का आजकाल electronic ताल मिळतो. आणि कॅसेटही आहे, एकदा ऐकू दे."
कॅसेट लागली. सौरभ म्हणाला, "अरे, याची तर सुरुवातच मस्त बासरीच्या स्वरांनी होऊ शकते!" सौरभने ते सूर पटकन बासरीवर बसवले, मयंकने keyboard वर साथ दिली. सगळी गाणी झाली. शेवटच्या गाण्याला मयंकने विचारलं, "अरे, 'गजब का है दिन' हे तर duet आहे."
सावनी म्हणाली, "पण त्याचं पहिलं कडवं female voice मध्ये आहे आणि दुसरं male voice मध्ये."
मयंक म्हणाला, "सौरभ, 'पापा कहते है' तर तू गातोच."
सौरभ गडबडला, "नाही रे, मी कुठे गाणार! माझा अत्याचार बासरीपर्यंतच ठीक आहे. तूच गा." मयंक हट्टाला पेटला, "गा, गा!"
गाणं झालं आणि सावनीला पुन्हा धक्का बसला, सौरभ तर उत्तम गातो! मयंकची बहीण चहा आणि काहीतरी खायला घेऊन आली, तीही तिथेच थांबली.
सावनी म्हणाली, "सौरभ, काय रे! बासरी काय, गाणं काय!"
सौरभ म्हणाला, "त्यात काय, मयंकही नाही का... तबला, की-बोर्ड!"
मयंकची बहीण माया म्हणाली, "सावनी आणि सौरभ, मस्त झालं हं गाणं. आता जरा ब्रेक घ्या."
ब्रेक झाला. सावनी आणि मुग्धा मयंकच्या वडिलांचं काम बघायला खाली गेल्या. थोड्या वेळाने त्या परत आल्या, तेव्हा सौरभ बासरी वाजवत होता आणि मयंक तबला—
बड़े अच्छे लगते हैं
ये धरती ये नदिया ये रैना
और और तुम
मुग्धा आणि सावनी वर आल्या तेव्हा त्यांना हे स्वर ऐकू आले. अनामिक ओढीने सावनी मात्र भरभर आत शिरली आणि तशीच स्तब्ध उभी राहिली. दोघंही तल्लीन होऊन, पूर्ण जीव ओतून आपापली भूमिका बजावत होते आणि एकमेकांना दादही देत होते. सौरभ म्हणाला, "वा उस्ताद, वा!" मयंक म्हणाला, "वा रे मेरे हरिप्रसाद!"
सगळे हसले.
मुग्धा म्हणाली, "चला निघूया."
सावनीने विचारलं, "तुम्ही खूप वर्षांपासून करता का रे हे सोबत?"
सौरभ म्हणाला, "नाही, त्या दिवशी शाळेत नाही का पाऊस पडला, खूप जोरात आवाज येत होता. मयंक सहज वाजवायला लागला बाकावर, तर मी त्यावर हलकी शीळ वाजवली. बस, त्या दिवसापासून!"
मयंक म्हणाला, "सहलीला गेलो होतो तेव्हा जे वाजवलं होतं, तेव्हा आम्ही एकत्र practice केली होती आणि बसवलं होतं."
सावनी म्हणाली, "भारीच!"
मुग्धा खोचकपणे म्हणाली, "भारीच?"
सावनी म्हणाली, "बरं बाई, माहोल, खतरनाक!"
मुग्धा म्हणाली, "आता कसं! चला आता, नाहीतर दादा बघायला येईल."
सावनी “मुग्धा just दोन मिनिट, सौरभ आणि मयंक एकदा ते तुम्ही सहलीत वाजवलं होत ते वाजवाल का?, सगळी गाणी यमन रागातली होती. मला फक्त ‘जब दीप जले आना…’ आणि ‘शुक्रतारा मंद वारा’ हवं आहे. आपल्याला हे रेकॉर्ड करता येईल का मयंक?”
मुग्धा “सावने आज मला मार मिळणार आहे घरी, तुझ्यामुळे”
सावनी “अपनी दोस्त के लिए आप इतना नाही कर सकती?”
मयंक “रेकॉर्ड? मला दोन मिनिटं दे, मी एखादी Blank कॅसेट आहे का पाहतो”
दोन मिनिटानी तो एक TDK ची Blank कॅसेट घेऊन आला. ती Tape Recorder मधे घातली.
मयंक आणि सौरभ दोघही ready झाले, मयंक नी 1,2,3,4 केल आणि गाण आणि रेकॉर्डिंग चालू झालं.
गाणी झाली, सावनी मंत्रमुग्ध झाली तिनी जब दीप जले आना आपल्या कानात साठवून घेतले.
सावनी म्हणाली, “सौरभ आणि मयंक, स्वर आले दुरूनी पण. Please?”
मुग्धा नी सावनीला डोळे मोठे केले. सावनी मुग्धाला म्हणाली “2 मिनिटं ग, बोलणी तर मी पण खणार आहे आज. दादा आला आहे कालच आणि मी दूपारभर इथे आहे.”
सौरभनी स्वर आले दुरूनी वाजवलं, मयंकनी electronic ताल तबला लावला आणि सौरभ ला keyboard वर साथ दिली. सावनी ने पुन्हा तल्लीन होऊन ऐकलं. मयंकनी गाण होताच रेकॉर्डिंग थांबवल आणि कॅसेट सावनीला दिली. कॅसेट घेतांना सावनी म्हणाली, “मयंक TDK ची कॅसेट महाग असते माहीत आहे मला, मी पुढच्यावेळी घेऊन येते माझ्याकडे आत्ता इतके पैसे नाहीत.”
मयंक हात पुढे करत गंमतिच्या स्वरात म्हणाला, “नाही ह, मला पैसे आत्ताच्या आत्ता हवे आहेत. त्याशिवाय कॅसेट मिळणार नाही.”
सावनी हसत “बर, पुढच्या आठवड्यात भेटू तेव्हा घेऊन येते”
मयंक नी कॅसेट दिली. दोघी खाली उतरल्या.
मुग्धा म्हणाली, "बहुतेक बासरीवाला, बहुतेक नाही 100%!" सावनीने तिला हाताला मारलं, "मारीन हं मी!"
वरून सौरभ आणि मयंक पाहत होते, दोघींनी 'अच्छा' केलं. सौरभला फक्त सावनी दिसत होती आणि त्याच्या कानात सूर घोळत होते— "गजब का है दिन..." थोड्याच वेळात सौरभही निघाला. जाता जाता तो सारंगकडे गेला. सारंग म्हणाला, "मलाही सांग, मी पण येईन. मयंक मस्त वाजवतो आणि तुमचं दोघांचं छान tuning जमलं आहे."
सावनीने घरी पोचल्यावर सौरभनी बासरीवर वाजवलेली सगळी गाणी पुन्हा पुन्हा ऐकली.
सौरभ घरी पोहोचला, तेव्हा त्याचे वडील थोडे लवकर घरी आले होते. त्यांना अशक्तपणा जाणवत होता, ते कधी नव्हे ते पडून होते. पुढचे दोन दिवस त्यांनी आराम केला, तेव्हा त्यांना थोडं बरं वाटलं. एक दिवस संध्याकाळी पिता-पुत्र मस्त बासरी वाजवत बसले होते. सौरभची आई कौतुकाने दोघांकडे पाहत म्हणाली, "आज खूप दिवसांनी असा योग आला आहे."
सौरभने
'अच्युतम केशवम' वाजवलं.
वडिलांनी पहिल्याच सुराला त्याच्या पाठीवर हलकेच हात फिरवून दाद दिली. ते संपल्यावर त्यांनी 'ओम जय जगदीश हरे' चालू केलं. ते पूर्ण होतं ना होतं, तोच सौरभने
'बडे अच्छे लगते हैं' वाजवलं.
त्यानंतर वडिलांनी
'चलते चलते मेरे ये गीत याद रखना'
थोडं वाजवलं आणि त्यांना अचानक श्वास लागला. थोडा खोकला आला आणि तो वाढला, शेवटी त्यांना थांबावं लागलं. सौरभची आई म्हणाली, "ऐकत नाहीत! मी म्हणतेय की चला डॉक्टरांकडे, तर अजिबात तयार होत नाहीत."
सौरभचे वडील शांत बसले आणि आडवे झाले. म्हणाले, "काही नाही गं, थोडा क्षीण आला आहे, बस." सौरभची आई लिंबू सरबत आणायला गेली. कुणालाच कल्पना नव्हती की, ही पुढल्या रणरणत्या उन्हाची चाहूल होती!
सौरभला पुन्हा दुसऱ्यांदा मयंककडे जायला जमलं नाही. तो बाबांजवळ थांबला. त्याने सारंगबरोबर निरोप पाठवला की मी येऊ शकत नाही. त्या दिवशी सारंग मयंककडे गेला, गाणी झाली. पण मयंक, सावनी आणि मुग्धाला हे जाणवलं की सौरभ नाही तर ती मजा नाही. सावनीला तर ते फारच जाणवलं; गाण्याच्या निमित्ताने होणारा हा संवाद तिला आवडत होताच, पण त्याहीपेक्षा तिला सौरभशी होणारी भेट आणि तो संवाद हवाहवासा वाटत होता. मुग्धा म्हणाली, "सौरभ आणि मयंक एकमेकांना पूरक आहेत, कोणी एक जरी नसेल तरी मजा नाही यायची."
तिसऱ्या वेळी सावनीचं जमलं नाही. सौरभ बासरी वाजवत होता, मयंकबरोबर होणारी देवाणघेवाण त्याला खूप आवडत होती. पण सावनी नाही, तर त्याला बासरीतले सूर हरवल्यागत वाटत होते. मयंक शेवटी म्हणालासुद्धा, "सा-व-नी नव्हता तुझ्यात आज!"
बर्फातून आलेले रक्ताचे अश्रू
"काश्मीरमधून एक खूप वाईट बातमी आली आहे. काश्मिरी पंडितांना, म्हणजेच हिंदूंना, काश्मीरमधून हाकलून देण्यात आलंय. आपलं वडिलोपार्जित घरदार, जमीनजुमला, सगळं सोडून हजारो कुटुंबांनी दिल्ली आणि जम्मूमध्ये आसरा घेतला आहे. दिल्ली आणि जम्मूमध्ये केंद्र सरकारने निर्वासितांसाठी कॅम्प (Camp) बांधले आहेत. आपल्याच देशात काश्मिरी पंडितांना निर्वासित आणि शरणार्थी म्हणून जगावं लागतंय. काही बातम्या तर हृदय हेलावून टाकणाऱ्या आहेत; त्या इतक्या भयानक आहेत की मी सांगूही शकत नाही. जम्मू आणि दिल्लीतल्या कॅम्पमध्ये धड पाण्याचीही सोय नाही, महिलांना नीट अंघोळ करता येईल अशा साध्या सोयींचाही तिथे अभाव आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री तर काश्मीर सोडून लंडनला निघून गेले आहेत. ज्या कुटुंबांवर कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली आहे, त्यांच्यासाठी हा खरंच खूप कठीण काळ आहे.
माझ्याकडे कार्यालयातून आलेली ही पत्रकं आहेत. आपल्याला आता काय करायचं आहे? ही पत्रकं आपल्याला आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये जाऊन वाटायची आहेत. पण नुसतं वाटणं हेच काम नाही, तर प्रत्येक घरात जाऊन लोकांशी बोलायचं आहे, त्यांना हा विषय नीट समजावून सांगायचा आहे. काश्मिरी पंडितांना आता गरम कपडे, चादरी आणि ब्लँकेटची नितांत गरज आहे. त्यांना विचारायच, यांपैकी तुम्ही जर काही देऊ शकत असाल, तर आम्ही ते घ्यायला पुन्हा येऊ. तुम्ही सांगाल त्या दिवशी आणि वेळी आम्ही येऊ. पण एक लक्षात ठेवायच आहे, या वस्तू नवीन नसल्या तरी चालतील, पण त्या चांगल्या स्थितीत हव्या आहेत. फाटलेल्या, जुन्या-पुराण्या किंवा छिद्र असलेल्या वस्तू चालणार नाहीत. वस्त्यांमध्ये जातांना आपण दोन किंवा तीन जणांच्या ग्रुपने वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे.
हे सगळं आपण करूच, पण ही परिस्थिती काश्मिरी पंडितांवर का आली? हिंदू जिथे जिथे अल्पसंख्याक झाला, तिथे तिथे त्याला या परिस्थितीला सामोरं जावं लागलं, हे त्रिवार सत्य आहे. १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यावरही हीच परिस्थिती होती, पण हिंदू समाज यातून काही शिकला का? दुर्दैवाने म्हणावं लागतं की, काहीही नाही. 'मी, माझं घर, माझी मुलं आणि माझे सण-वार' इतकंच आपलं जग झालंय. जाती, भाषा, प्रांत आणि आपापसातले पराकोटीला गेलेले मतभेद यामुळे हिंदूंमध्ये एकी नाही. ही वेळ ओढवण्याचं हेच मुख्य कारण आहे. चला, आता आपल्या हातात जे करण्यासारखं आहे ते करूया, आपल्याकडे जास्त वेळ नाही. कोणाला काही प्रश्न आहेत?"
शाखा संपल्यावर शाखेच्या पटांगणावर शैलेश मास्तर समजाऊन संगत होते. हे सगळं ऐकून शांतता पसरली, कोणीच काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता.
काश्मिरी पंडितांसाठी त्या काळी ज्यांनी मनापासून काम केल ती एकमेव संस्था होती (आणि त्यांच्याशी संबधित काही संस्था) राष्ट्रीय स्वयम सेवक संघ (RSS). या काश्मिरी पंडित परिवारांसाठी संघानी ब्लैंकेट, गरम कपडे, चादरी गोळा करायचं काम केल होत. नंतर बरेच वर्ष संघ या कामासाठी झटला. सौरभ आणि सारंग शाखेत जात असत. घरोघरी जाऊन हे सामान गोळा करायचं आणि सत्य परिस्थिती सांगून जनजागरण करायच्या कामात सौरभ आणि सारंगनी हिरहिरीने भाग घेतला होता. काश्मिरी पंडितांच्या पळण्याचा काळ होता जानेवारी 1990 ते में 1990.
सौरभची आई सुद्धा ‘निर्धार’ या संस्थेचं पश्चिम नागपूर मधील काम बघायची. ही संस्था रा. स्व. संघाची नसली तरी रा स्व. संघांच्या विचारांची हिंदुत्ववादी संस्था होती. निर्धार संस्थेच्या मार्फात गरीब वस्त्यांमध्ये छोट्या शाळा, जिथे शाळा शक्य नसेल तिथे 2 री 3 री पर्यंतचे वर्ग घ्यायचे. रात्र शाळा किंवा रात्रीचे वर्ग चालवायचे. गरिबांच धर्मांतरण थांबवणे आणि हिंदू धर्माशी जोडून ठेवण्याचं काम ही संस्था करत असे. सौरभची आई यासाठी वेळ द्यायची.
क्रमश:
- अमोल दांडेकर
पुढच्या भागात: स्वर आले जुळूनी, सौगंध राम की खाते है हम मंदिर वही बनाएँगे!, मिले सूर मेरा तुम्हारा
जुगलबंदी मस्तच- प्रत्यक्षात
जुगलबंदी मस्तच- प्रत्यक्षात ऐकायची इच्छा झाली ....
काश्मिरी पंडितांचा इतिहास दुखः दायकच आहे. पण त्या गोष्टीचा इथे तो संबंध कसा ?
धन्यवाद वैशाली!
धन्यवाद वैशाली!
काश्मिरी पंडितांचा इतिहास
काश्मिरी पंडितांचा इतिहास दुखः दायकच आहे. पण त्या गोष्टीचा इथे तो संबंध कसा ?
ह्या गोष्टीचा काळ काश्मिरी पंडितानी काश्मीर मधून पलायन केलं तेव्हाचा आहे. बर्फातून आलेले रक्ताचे अश्रू या उप प्रकरणात दिल आहे ना, सौरभ आणि सारंग शाखेत जात असत. शाखेत त्यांनी ती माहिती मिळते, एप्रिल - में १९९० चा तो काळ तेव्हाच्या भारताला फारसं हे माहीत नव्हतं आणि असतं तरी कोणाला त्याची काहीही पडलेली नाही, माझ घर जळत नाही ना मग मी मजेत! असो.
त्या काळात झालेल्या प्रमुख घटना घेतल्या आहेत आणि त्या गोष्टीत गुंफायचा प्रयत्न केला आहे.