मी वाचलेले पुस्तक -४

Submitted by भरत. on 9 April, 2026 - 01:44

आधीच्या मी वाचलेले पुस्तक -३ या धाग्यावर २००० हून अधिक प्रतिसाद झाल्याने , नवा धागा काढला आहे.

आनंदाने वाचत राहू. काय वाचलं त्यावर काथ्याकूट करत राहू.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

BEARTOWN या पुस्तकाबद्दल मागे लिहिलं होतं. https://www.maayboli.com/node/86439

ही तीन कादंबर्‍यांची मालिका आहे. त्यातला दुसरा भाग US AGAINST YOU वाचला.

पहिल्या कादंबरीत हॉकी आणि तरुण हॉकी खेळाडू ही प्रमुख पात्रं होती. त्यांची एनर्जी होती.
दुसर्‍या भागात खेळाभोवतीची इतर परिस्थिती, राजकारण, पैसा, हेवेदावे, चढाओढ, खेळाचं मॉनेटायझेशन या बाबी येतात. आज कोणत्याही व्यावसायिक खेळासोबत या गोष्टी असतात, होतातच, घडतातच. तो प्रश्न नाही. पण या गोष्टींबद्दल बोलताना हॉकी आणि तरुण मुलं काहीशी बाजूला सारलेली आहेत.
पहिल्या भागात जी एक भूतो न भविष्यति घटना घडते, त्याचे पडसाद सर्व कोनांमधून दुसर्‍या भागात मांडलेले आहेत.
त्यात अनेक बॅकस्टोरीज आहेत. खेळाशी निगडीत, तसंच घरगुती नातेसंबंधांच्या पातळीवरच्याही आहेत.
लेखकाच्या शैलीमुळे पुस्तक पुढे पुढे वाचलं जातं. पण कुठलंच पात्र खणखणीतपणे समोर येत नाही. किंबहुना, या भागाचा तो उद्देशच नसावा. त्या घटनेमुळे बेअरटाऊनला आलेली मरगळ, एकसाचीपणा, गावातल्या हॉकीचं लटकतं भविष्य, संघबांधणीला बसलेला झटका असं सगळं अगदी धीम्या गतीने मांडलेलं आहे.
मुलांच्या संघाची नवीन कोच - हे एक नवीन पात्र आहे. ते पात्र मजा आणतं खरं, पण एकंदर पहिल्या पुस्तकाच्या तुलनेत हा भाग मला मध्ये मध्ये कंटाळवाणा वाटला.

तरी, काही काळाने तिसरा भाग वाचणारच आहे.

दुसर्‍या भागात खेळाभोवतीची इतर परिस्थिती, राजकारण, पैसा, हेवेदावे, चढाओढ, खेळाचं मॉनेटायझेशन या बाबी येतात.
हे क्रिकेट आणि इतर खेळ यांना मिळणाऱ्या आर्थिक पाठिंब्याबाबत भारतात म्हणता येईल. एकदा भुवनेश्वरकडे रेल्वेने जाताना एका स्टेशनवर काही खेळाडू मुले गाडीत चढली. ती हा मुद्दा मांडत होती.

सध्या ईव्ह क्युरी - मादाम मेरी क्युरी यांची कन्या, यांनी लिहिलेले त्यांचे चरित्र वाचत आहे- मादाम क्युरी- अनुवाद विदुषी अश्विनी भिडे देशपांडे. खूप सुंदर अनुवाद आणि स्फूर्तीदायक चरित्र.
चरित्रनायिका अश्विनीजींच्या आदर्श आहेत
WhatsApp Image 2026-04-09 at 4.47.53 PM.jpeg

विनय हर्डीकर कधीच वाचले नव्हते. आता वाचून फॅन झालो. श्रद्धांजली, जनांचा प्रवाहो, देवाचे लाडके हे मागच्या आठवड्यात वाचले.

हर्डीकर भारीचेत. तरी तुम्ही अजून 'विठोबाची आंगी' आणि 'व्यक्ती आणि व्याप्ती' वाचलं नाही. मग तर अजून जबरा फॅन व्हाल. Happy

तुमच्या मुळेच घेतली हर्डीकरांची पुस्तके संप्रति.

म्हणुनच सांगतोय ते वाय झेड अध्यात्माच्या नादी लागू नका. पुस्तके वाचत रहा आणि आम्हाला सुचवा.

<पुस्तके वाचत रहा आणि आम्हाला सुचवा.> टवणे सर , कोणे एके काळी रैनाने हे किंवा असं वाक्य तुम्हांला उद्देशून लिहिलं होतं.

विनय हर्डीकर -

व्यक्तिचित्रे लिहिण्यात विनय हर्डीकरांचा हात कुणीही धरू शकत नाही.

एके वर्षी म्हणजे २०२१ साली, मौजेच्या दिवाळी अंकात म द हातकनंगलेकरांवर आणि साधनेमध्ये वि म दांडेकरांवर विनय हर्डीकरांनी स्मरणलेख लिहिले आहेत (त्या दोघांच्या मृत्यूपश्चात)

ते खरेतर विनय हर्डीकरांनी विनय हर्डीकरांवरच लिहिलेले लेख आहेत लोल. कमाल लेवलचे पुणेकर आहेत हर्डीकर. दोन्ही लेख अक्षरश : हर्डीकरांवरच आहेत.

इथे विनय हर्डीकरांनी लिहिलेला वरील पैकी एक लेख : https://www.weeklysadhana.in/view_article/vinay-hardikar-on-economist-v-...

<ते खरेतर विनय हर्डीकरांनी विनय हर्डीकरांवरच लिहिलेले लेख आहेत लोल. कमाल लेवलचे पुणेकर आहेत हर्डीकर. दोन्ही लेख अक्षरश : हर्डीकरांवरच आहेत.> अगदीच पटलं. मी दिवाळी अंकांत त्यांचे लेख वाचलेत. एक शरद जोशींवर होता.

करेक्ट रॉय! हे विशिष्ट लेख मी बहुतेक वाचलेले नाहीत, पण विनय हर्डीकर कुणावरही लिहिताना स्वतःबद्दलच लिहितात हे खूप वेळा बघितलं आहे!

डोंबिवलीत दरवर्षीप्रमाणे पुस्तके आदान प्रदान सोहळा सुरू आहे. फ्रेंड्स लायब्ररी ( पांडुरंग पै) आणि इतर प्रायोजकांचा उपक्रम. यावर्षीचा उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकरांना समर्पित.IMG-20260410-WA0003.jpg
कुठे: शिवमंदिर रस्ता, गोयंका हायस्कूल पटांगण. डोंबिवली पूर्व.
केव्हा : सकाळी नऊ ते रात्री नऊ, १४ एप्रिलपर्यंत.
कसे : पुस्तकाची विक्री नाही. एक जुने तुमच्याकडचे पुस्तक आणि दहा रुपये द्यायचे आणि प्रदर्शनात मांडलेल्या पुस्तकांतून कोणतेही एक घ्यायचे. ( शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके घेत नाहीत.) इंग्रजी हिंदी मराठी कोणतीही आणा.IMG-20260410-WA0004.jpgIMG-20260410-WA0005.jpg

ते खरेतर विनय हर्डीकरांनी विनय हर्डीकरांवरच लिहिलेले लेख आहेत लोल. कमाल लेवलचे पुणेकर आहेत हर्डीकर. दोन्ही लेख अक्षरश : हर्डीकरांवरच आहेत.
>>>

हेही खरेच! व्यक्तिचित्रात ते त्यांच्या अनुभवाभोवतीच बोलतात जास्त करून. ते ही प्रामाणिक आहेच. ते काही चरित्र लिहित नाहियेत. स्वतःला आलेल्या त्या व्यक्तीबरोबरच्या अनुभवांवर लिहित आहेत. मी त्यांना तो बेनेफिट ऑफ डाउट देइन.

खौट माणूस आहे. कुमार गंधर्व आणि मल्लिकार्जुन मन्सूर लेखात मधले एक पान सत्तर सालानंतर लोकप्रिय झालेल्या गायक वादकांवर एक पान लिहिले आहे. त्या पानभर हेटाळणीची परमोच्च आहे. शेवटचे वाक्य आहे "जसराज आणि परवीन सुलताना यांनी मैफिलीच्या संगीत बालवाड्या केल्या त्या याच पाच पंचवीस वर्षात आणि झाकिर हुसेन टाइप तबल्याला गायक आणि वादक साथ करू लागले तोही याच काळाचा महिमा".

हेटाळणीचा हायपरबोल होतो - पण सगळेच गुडी गुडी छान म्हणणार्‍या ("खूप खूप" आजच्या भाषेत) आजच्या काळात - हे असे 'तुच्छतापूर्ण लिखाण' मला आवडते. हर्डीकरांची भाषा मला जवळची वाटते. वाचायला आवडते. ६०-२००० मधला जो पेंडसे, दळवी, नेमाडे हा उच्चवर्णीय नॉन-पुलं - नॉन -लघुकथा कँपातले जे लेखक होते त्यांच्या भाषेशी मिळती आहे. हे वाचन आवडण्याचा निकष होऊ शकतो का नाही हा खरेच महत्वाचा प्रश्न आहे. पण एक कम्फर्ट फॅक्टर आहे मला त्यांचे लिखाण वाचताना.

माफ करा, हा वर रॉय यांनी दिलेला दांडेकरांवरचा स्मरणलेख मला अजिबात भावला नाही. रानोमाळ काहीही सूत्र न ठेवता आठवणींची जंत्री आहे. स्मरणलेखातून व्यक्तीचे एक ठाशिव चित्र डोळ्यासमोर तयार झालं पाहिजे पण इथे वाचुन विक्षिप्तपणाची विनोदी उदाहरणे, चक्रम माणुस आणि फारसा खिसगणतील नसलेला इगोईस्ट माणूस याशिवाय माझ्या झोळीत फार काहीच पडलं नाही. ठाशिव सोडा काही चित्रच तयार झालं नाही. दांडेकर कोण होते, ते काय करायचे, त्यांचं काय योगदान आहे मला कुठेच समजलं नाही. ते माहित असणे हे प्रिरिक्विझिट ठेवून वाचायचं कोणी ठरवलं तरी त्यातून रानोमाळ हरवलेली डोक्यातली जळमटं मिळतील का आणखी काही मला शंकाच आहे.
वर सर्वांनी नावजले आणि उदाहरण म्हणून दिलेले लिखाण मला इतकं टाकाऊ वाटणे हा माबुदो असेल कदाचित.

वर सर्वांनी नावजले आणि उदाहरण म्हणून दिलेले लिखाण मला इतकं टाकाऊ वाटणे हा माबुदो असेल कदाचित.
>>>

ते नावाजलेले नाहिये उलट रॉय त्यांची टरच उडवत आहेत.

>> खौट माणूस आहे. कुमार गंधर्व आणि मल्लिकार्जुन मन्सूर लेखात मधले एक पान सत्तर सालानंतर लोकप्रिय झालेल्या गायक वादकांवर एक पान लिहिले आहे. <<

या बाबतीत मी त्यांच्या प्रकृतीचाच आहे.

मी मागे एकदा आमचे मित्रवर्य आणि लाडके शल्यचिकित्सक आशुतोष दिवाण यांच्याशी प्रचंड वाद घातला होता की कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, किशोरी आमोणकर वगैरे गायकांना उगाचच कसे इन्फ्लेट करून ठेवले आहे. विशेषत: काहीही कळत नसताना निर्गुणी भजन आवडून घेणे वगैरे. किंबहुना हा भारतीय शास्त्रीय संगीताचाच प्रकारच (थियोरिटिकल संगीताचा प्रकारच) उत्तरोत्तर कसा बोगस झालेला आहे / किंवा मुळातच तो कसा बोगस आहे यावर.

नुकतेच बीन देअर डन दॅट हे मेघना पेठे यांचे पुस्तक वाचले.

डाव्या पानांवरचा फाँट (जो मेघनाच्या हस्ताक्षराला जुळता आहे) तो अत्यंत अनॉयिंग आहे.
मेघना कधी कधी चपखल आणि तीक्ष्ण उपमा वापरतात. (बोल्ड नव्हेत, तीक्ष्ण, सुस्पष्ट, ओल्ड स्कूल, तरल नव्हेत)

एकूण लेखन आवडले. अगदी normal वाटले. या normal लेखनाला आपले (समीक्षक आणि इतर साहित्यिक) लोक बोल्ड वगैरे म्हणतात म्हणजे एकूण आपल्या लोकांची समज एवढी कशी भंगार आहे याचीच प्रकर्षाने जाणीव होते.

मेघना chatgpt वापरून लिहीत नाहीत किंबहूना त्या ओल्ड स्कूल असल्याने त्या कोणत्याही जीपीट्या वापरणार नाहीत ही खात्रीच असल्याने मी पुस्तक वाचले. आणि मला तरी ते आवडले. त्यांचा एक छोटासा कल्ट आहे. तोही आवडतो. जर्मन फ्राउ सारखा त्याचा मुखपृष्टवरचा फोटो देखील मला आवडला. (जो हेअरकट आपल्याईकडे पुन्हा बोल्ड वगैरे म्हणून संबोधला जातो! च्यायला)

मेघनाचे हे मेटा लेखन आहे. लेखनाविषयीची तिची मते, तिच्या एकूण पुस्तक/साहित्य व्यवहार यांच्याविषयी तिची मते, तिच्या आस्था आणि तिची मूल्ये जो तिच्या लेखनाचा गाभा आहे त्याविषयी.

तिचे एकटे असण्याविषयीचे विचार खूपच मोहक आहेत. एकूण ती एक एकाकी शिलेदार आहे मराठी मधली. मला तिची आणि गौरीची तुलना पटत नाही.

आपण समाज म्हणून एकसंध झालो नाही. त्यात मराठी लेखक धड अर्बन देखील नाहीत धड ग्रामीण देखील नाहीत तो गॅप अजूनही आपल्यात आहे. त्यामुळे मेघनाचे एकूण लेखन आजही एका कप्प्यात सारले जाते. युरोपातल्या किरकोळ देशातही जे लेखन अगदी नॉर्मल म्हणून खपून गेले असते ते असे एखाद्या मध्ययुगीन-सामाजिक लेव्हलच्या (शहरी संवेदनाछाप, स्त्रीवादी) कप्प्यात गेलेले पाहून वाईट वाटते.

हंस अकेला कथासंग्रह त्यांचाच आहे ना, तो आवडला. नातीचरामी अजिबात आवडले नाही तरी पूर्ण वाचलं, आवडलं नसलं तरी ओघवते आहे. बाकी काही वाचलं नाही.

रॉय, सहज कुतुहल वाटलं म्हणून विचारतेय, एखादा लेखक एआय वापरुन लिहितो किंवा नाही हे कसे ठरवता तुम्ही? एआय अजुन बाल्यावस्थेत निदान लेखनामध्ये तरी असल्याने अनुभवी लेखक माहिती गोळा करण्यासाठीच फक्त त्याचा वापर करत असतील असा माझा अंदाज आहे. तुमचा अनुभव वेगळा आहे का?

पर्णिका,

खूप साध्या चाचण्या आहेत -

१. एम डॅश : हा डॅश दिसताच ते लेखन AI खालून गेलेले आहे हे तत्काळ ओळखावे
२. हे नाही; ते : अशा पद्धतीची व्यत्याशी वाक्यरचना दिसली तरी ते लेखन AI ने केलेले आहे असे ओळखावे. किंवा, हे नाही, ही नाही, ते. असा पॅटर्न.
३. निर्बुद्ध मराठी प्रतिशब्द (कंसात इंग्रजी शब्द) : हा पॅटर्न दिसला आणि हे प्रतिशब्द काहीही असले की ओळखावे की हे लेखन AI कडून संपादित तरी किमान केले आहे.
४. २०२२ पूर्वीचा स्पार्क : एखादा लेखक २०२२ पूर्वी ह*त असेल आणि अचानक त्याचे लेखन सुसंबद्ध आणि intellegent वाटायला लागले तर तत्काळ ओळखावे की तो चमत्कार AI चा आहे.
५. स्मायलींचा वापर आणि बुलेट पॉइंट : हे जरा वाजवीपेक्षा जास्तच दिसले की AI चा हात आहे असा संशय घ्यावा.

अशी अजून चारेक लक्षणे दिसतात त्यावरून निदान करता येते.

AI मराठी लिहिण्यात बाल्यावस्थेत नाही हे मात्र मी सांगू शकतो. तो बराच तरुण झालेला आहे.

>> तुमचा अनुभव वेगळा आहे का? <<
मी अनेकांना पकडले आहे. अगदी किमान चार लोकांना तरी ज्यांचे लेखन वर्तमानपत्रात देखील आले आहे. एका लेखिकेने (मीच नाव विसरलो, तरुण लेखिका आहे कुणीतरी) तर नोबेल विजेत्या लेखकावर दुसऱ्याच दिवशी सकाळ सप्तरंग मधे लेख छापला होता त्यातले एकूण एक वाक्य AI चे होते की तिने संपादनासाठी एक अक्षर देखील बदलले नव्हते. मी तत्काळ ओळखून बोभाटा केला तर लेखिकेने मला लगेच ब्लॉक केले. पण तोवर आमच्या सगळ्या मित्रात ती लबाडी धरली गेली.
सतीश वाघमारे नावाच्या लेखकाने देखील सुनील तांबे यांच्या पुस्तकाचे परीक्षण असेच AI कडून लिहून घेऊन छापले होते. तर ही लबाडी धरल्यावर, वाघमारे म्हणाले की यात प्लॅगरिजम चेक करून बघा. म्हणजे यांना AI चे output आणि plagairism यांच्यातल्या फरक देखील ठाऊक नाही इतके बालिश वापरकर्ते आहेत.
मी दिलेली सगळी लक्षणे त्या लेखात होती.

पुस्तकाचं परीक्षण AI कडून करायला ते पुस्तक अपलोड करावे लागत नसेल का?

--
मेघना पेठेंच्या लेखनाबद्दलचं मत आवडलं.
त्यांची दोन पुस्तकं माझ्याकडे पडून आहेत. कथा कादंबर्‍यांना प्राधान्य द्यावंसं वाटत नाहीत. कधीतरी वाचेन म्हणून घेऊन ठेवलीत. लायब्ररीत त्यांचं एक पुस्तक दिसलं तेव्हा तिथल्या ताईंनी हे समलिंगी संबंधांवर आहे की यात समलिंगी संबंधांचा उल्लेख आहे असं मला सांगितलं.
( लायब्ररीत कवितासंग्रह मागून वाचणारा मी एकटाच सभासद आहे, होतो आणि कथा कादंबर्‍या नसलेले दिवाळी अंक मला हवे असतात, असत , त्यामुळे त्या ताईंशी पुस्तकांवर गप्पा व्हायच्या.
त्यांचं लेखन बोल्ड मानलं जायचं हे कारण असेल का? तसंच गौरी देशपांडेंबद्दल. मला त्यांचं तेरुओतलं प्रेमाबद्दल लिहिलेलं फार आवडलं होतं.

श्री राज अज्ञानी ह्यांनी स्पष्ट केले आहे कि हा धागा पुस्तकांबद्दल आहे, आणि मी तर AI ने लिहिलेल्या कथेची लिंक दिली होती. ही मोठी चूक झाली. म्हणून हा प्रतिसाद काढून टाकत आहे.
श्री राज अज्ञानी मला उदार मनाने क्षमा करतील अशी आशा करतो.

मी सध्या नेमाने काय वाचत असेन तर लोकसत्ता रविवारच्या लोकरंग पुरवणीतली जादुई अहसास ही वास्तुशास्त्र व तत्सम सगळ्या गोष्टींची भेळ असलेली जाहिरात. पेपर आला की आधी ते वाचून काढतो.

एअ आय चा माहितीचा स्रोत म्हणून वापर करण्यास हरकत नसावी.... त्या नंतर तो मजकूर हव्या त्या लेखन शैलीत लिहायला काय हरकत आहे?

Pages