३६ वर्षांनी झाली भेट अशी

Submitted by Madan Hunkare on 8 April, 2026 - 11:06

खूप वर्षे झाली या गोष्टीला!

मी त्या वेळी कॉलेजला होतो. तरणावांड असल्याने सर्वांची नजर माझ्यावर असायची. मला त्याची काही खबरबात नसे. मी आपल्या धुन मधे असायचो. मुली त्या वेळी साडी नेसून कॉलेजला यायच्या. एक वेणी घालून शेपटा पाठीवर झुलवत फिरायच्या. त्यांच्या मागे मुलं लागायची. पण जपूनच.

तो काळ तसा बुजरा होता. मुलं मुलींशी बोलायचं धाडस करायला बिचकायची. चिट्ठ्या पाठवायची बात कॉमन होती. मुलं पण ढगळ पँट आणि वर बुशशर्ट घालायचे. विजारीत असलेली मुलं ग्रामीण भागातून आलेली असत. ज्यांच्याकडे पैसे असायचे ते लवकरच शर्ट पँट मधे यायचे. ही मुलं माझी फॅन होती. कारणच तसं होतं.

मुली माझ्याकडे चोरून बघायच्या. पण हे मला माहीत नव्हतं. पण मुलांनी हे केव्हांच हेरलं होतं.
माझ्या नोटस मागायच्या बहाण्याने मुली माझ्याकडे यायच्या. माझ्याशी बोलताना त्यांचा ऊर धपापायचा. त्याची कारणं माहीत असायचं काहीच कारण नव्हतं. मी पटणेबल नव्हतोच. मला वाटायचं कि मुली पीटीच्या तासावरून थेट माझ्याकडे येत असतील. तेव्हांचे हिरो पण साधे सुधेच असायचे. त्यामुळं आताच्या मुलांना जसं मुलींचं अंतरंग माहीत असतं तसं आम्हाला काहीच माहीत नसायचं.

शिवाय घरचे संस्कार कडक असल्याने कुणा मुलीशी लफडं करायची भीतीच असायची.
पुढे पुढे मुली आल्या आणि त्यांचा ऊर धपापू लागला कि मी मनात

ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहाहनुमते प्रकट पराक्रम
सकल दिङ्मण्डल यशोवितान धवलीकृत जगत त्रितय

हे सुरू करायचो. त्याचा फायदा व्हायचा आणि शीलभ्रष्ट होण्यापासून बचाव होत असे.

पण एक मुलगी मात्र नेहमी आडवी जायची. ती तिरपे कटाक्ष टाकायची पण कधी बोलायला येत नसे. खरं तर सतत ती मांजरासारखी आडवी येत असल्याने रागच यायचा, पण कुठेतरी हृदयात नगारे वाजू लागले होते. तिने येऊन बोलावं असं वाटायचं. ती कधी कधी मैत्रिणीसमवेत यायची. तिची मैत्रीण काहीतरी कारण काढून संभाषण करायची. पण ती अंगठ्याने जमीन उकरत असायची. ती असं खोदकाम का करते हे काही कळायचं नाही. पण तिची मैत्रीण तिला कोपराने ढुशी मारायची तर ती लाजायची. या मुली उठसूठ लाजतात, कामाचं कधी बोलणार असा वैताग यायचा.

हळू हळू तिची भीड चेपली असावी. इतर मुली तर माझ्या व्यक्तीमत्वाने दिपून जाऊन धाडसच करत नसत.
पण ही हळू हळू बोलू लागली. पहिल्यांदा तिच्यासाठी लेक्चर बंक केलं. नेमकी त्याच दिवशी दळवी सरांनी हजेरी घेतली. आम्हा दोघांचा अ‍ॅबसेन्टी रिपोर्ट त्यांनी पिन्सिपलला पाठवला. त्यांनी वडलांना घेऊन ये म्हणून सांगितलं.

खूप टेण्शन आलं होतं. मुलांनी काय काय थापा मारायच्या याची माझ्याकडून तालीम करून घेतली होती.
पण वाटायचं कि सांगून टाकावं. पण वडील संतापले तर धू धू धुतील ही भीती वाटत होती. हो, त्या वेळी मुलांची पिटाई आम बात होती. मुलींची सुद्धा पिटाई व्हायची.

तरी बरंं, तिला फक्त समज देऊन सोडून दिलं होतं.
शेवटी लायब्ररीत पुस्तक वाचण्यात गढून गेल्याने लेक्चरचं भान राहीलं नाही ही थाप मारली. ती पचली कि नाही माहीत नाही, पण घरी वडलांनी खूप वेळ भाषण दिलं. " दिवट्या चिरंजीवांमुळे आज आमची वरात निघाली. आज थोडक्यात निभावथो, नाही तर कमावलेली सर्व प्रतिष्ठा धुळीत मिळणार होती" त्यांनी फारच सिरीयसली घेतलं होतं.

आताच्या पिढीला हे पटणार नाही पण असंच असायचं तेव्हां.
दिवस भुर्रकन उडून गेले. हम दोनो त्या वेळी थेटरात लागला होता. तिने मला तो पिक्चर बघायला जायचं का हे आडवळणाने विचारलं होतं. खरं तर या कल्पनेने रोमांच फुलले असले तरी कुणी पाहीलं तर या भीतीने घाम फुटला होता. शिवाय एकी बरोबर गेलो तर बाकीच्या मुली नाराज झाल्या असत्या. माझ्या मनात तसं काही नसायचं. सगळ्याच मुलींना समान नजरेनं पाहिलं पाहिजे हे संस्कार होते.

असंच कधी तरी कॉलेज संपलं. रस्टन कंपनी चिंचवडला सुरू झाली होती.
तिथे शॉप फ्लोअर सुपरवायजर म्हणून सुरूवात झाली. प्रमोशन मिळालं. त्याच वेळी एस के एफ कंपनीही सुरू झाली. मग तिथे अनुभवी लोकांची गरज असल्याचे समजल्यावरून तिकडे जॉईन झालो. घसघशीत पगारवाढ झाली. त्या वेळी चार आकडी पगार हे अप्रूप होतं. वडील पण शांत झाले. आता ते समाधानी दिसू लागले. मग करीअरच्या नादात सगळं विसरून गेलो.

पुढे व्हल्कन, सँडविक, बकाऊ वुल्फ, बेकर मर्सर अशा कंपन्या बदलत गेलो. आता स्थैर्य आलं होतं. वेळच मिळत नव्हता.
कंपनीची मोटार न्यायला यायची. आईला भरून यायचं. आता तिला माझ्या लग्नाचे वेध लागले.

आणि मला तिची आठवण झाली.
मालती नाव तिचं. चार अक्षरी आडनाव.

तिचा खूप शोध घेतला. त्या वेळी लँडलाईन पण नसायचे. फोन करून कुणाकडे जाणे हा प्रकारच नव्हता. मुलांचे पत्ते माझ्याकडे नव्हते. काही मुलींचे होते. पण त्यांचा शोध घेतला तर त्या आता तिथे राहत नव्हत्या. काहींची लग्नं झाल्याचं समजलं.

अशीच एक मुलगी रस्त्यात भेटली. कडेवर बाळ होतं. खूप बारकाईने बघितल्यावर म्हणाली "हाय हॅण्डसम"
हे फारच धाडसी होतं. पण आता ती ही स्थिरस्थावर झालेली. मी ही आता दोन पायावर उभा होतो. म्हणजे आता प्रगल्भता आली होती. मी ती कॉम्प्लिमेण्ट म्हणून विनयाने स्विकारली.

गप्पात तिने सांगितलं कि मालतीचा फार जीव होता तुझ्यावर. तू नक्की तिला शोधत येशील असं तिला वाटत होतं. तिच्या वडलांची बदली मुंबईला झाली तेव्हां तिने माझी चौकशी केली होती. पण मुलींचा त्रास नको म्हणून मी माझा पत्ताच कुणाला दिलेला नव्हता.

आता त्याचा पश्चात्ताप होत होता.

एक दिवस असाच कामावरून दमून आलो. माझ्या सुविद्य पत्नीने चहा आणला.
टिव्हीवर ज्ञानदीप लागलेलं. त्यात आकाशानंद म्हणाले "आता आपलं पार्ल्याचं ज्ञानदीप मंडळ बघूयात काय म्हणतंय. मग ज्ञानदीपची टीम पार्ल्यात पोहोचलेली दिसली. तिथल्या ज्ञानदीप मंडळाची ओळख करून देताना काही तरी ओळखीचं वाटलं.
तर ती मालती.

माझ्या तोंडून हर्षोद्गार निघणार होता. पण तो रोखून धरला. बायकोला संशय आला असता.
कंपनीचा एक व्हेंडर मुंबईचा होता. या वेळी मीच त्याच्याकडे जायचं ठरवलं. दोन महीन्यांनी योग आला. त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी ओळखी होत्या.
खडा टाकून बघावा म्हटलं तर दूरदर्शनचा पण तो व्हेंडर होता. आम्ही आकाशानंदांकडे गेलो. त्यांनी आढेवेढे घेत पार्ल्यातला पत्ता दिला.
कसे बसे पार्ल्यातले ते मंडळ हुडकून काढलं.
तर ते आता बंद झालं होतं. त्या बायकांनी खोली एक महीन्यासाठी भाड्याने घेतली होती. ज्या बाईंनी खोली भाड्याने घेतली होती त्या पालघरच्या होत्या आणि त्यांचा नेमका पत्ता घरमालका माहीत नव्हता,

इतक्या जवळ येऊनही ती भेटली नाही.
व्हेंडर पण गालातल्या गालात हसत होता. तो म्हणाला, " आप इतने हँडसम हो, चलो मै आपको हिरॉईन लोगों से मिलवाता हूं. आज रूक सकते हो तो साधना से मिलवाता हूं"

साधना म्हटल्यावर एकदम अभी ना जाओ छोडकर गाणं आठवलं आणि हे गाणं लिहीलेली चिठ्ठी रोमन लिपीत लिहील्याने झालेला सावळा गोंधळ, कंठाशी आलेले प्राण आठवले.

असेच दिवस जात राहीले.
आता रिटायरमेण्टला आलो होतो. मुलांची लग्नं झाली होती. नातू आला होता.

स्मिता तळवलकर बातमी सांगत होती. मालतीचा फोटो.
अपंग मुलांसाठी ती संस्था चालवत होती. पुण्यातच कुठेतरी होती.

पणा हे दूरदर्शन नेमका पत्ता देईल तर शपथ. यामुळेच ते बंद पडलं. अजिबात प्रोफेशनल नाही. मग पुणे दूरदर्शनचा पत्ता काढला. ते नुकतंच एम आय टी कॉलेजच्या शेजारी आलं होतं. तिथे जाऊन सगळा संदर्भ सांगितला. त्यांनी तीन वेळा एकच गोष्ट विचारली मग म्हणाले "आमच्याकडे पत्ता नाही. कोण मालती माहीत नाही"

निराश होऊन हात हलवत यायची ही दुसरी वेळ.
रिटायर झाल्यानंतर मग रोज निगडीची बस पकडून जायचो. निगडीच्या वेगवेगळ्या गल्ल्यात फिरत रहायचो. पण ती काही भेटली नाही.

समजा मी गल्ली क्र १ मधे दहा वाजता असेल आणि ती त्या वेळी गल्ली क्र १२७ मधे भाजी घ्यायला आली असेल तर?
भेटच होत नव्हती.

आताचं तिचं आडनाव सुद्धा माहीत नव्हतं
तिच्या वडलांचं नाव शरद होतं हे माहीत होतं. मग टेलिफोन डिरेक्टरी घेऊन शोधत बसायचो. मालती नावाने शोधलं तर लाखभर नावं यायची.
यातलं कोणतं?

नातू आता थोडा मोठा झाला होता. तो कॉम्प्युटर वर काही तरी करत असायचा.

त्याने एकदा मालती नावाने मला डिरेक्टर धुंडाळताना पकडलं.
त्याने विचारल "आबा मालती तुमची क्रश आहे का?"

माझी तर हवाच गेली. क्रश म्हणजे त्याने समजावून सांगितल्यावर कानातून धूरच यायचं राहीलं.
मग त्याला सांगितलं कि अरे त्यांना कि नाही एक महत्वाचा निरोप द्यायचाय कॉलेजचा.

मग तो म्हणाला
"हॅत तिच्या, आबा अहो मग डिरेक्टरीत कुठे शोधता?"
माझ्या आशा पल्लवीत झाल्या.
मी विचारले "अरे राहा कुठे शोधायचं मग?"
नातवाने विचारलं कि तुमचं ऑर्कुटचं अकाऊण्ट आहे का?
मी म्हणालो नाही. नातवाने वाटलंच होतं म्हणत मान हलवली.

मग म्हणाला जगातले सगळे लोक ऑर्कुट वर असतात. मी आश्चर्यचकीत झालो.

त्याला मालती हे नाव सांगितलं. परत म्हणालो मालन असं सुद्धा नाव होतं बरं का तिचं.
मग माहेरचं चार अक्षरी आडनाव सांगितलं.

त्याने वेगवेगळी काँबिनेशन्स केली.
अनेक मालन येऊ लागल्या. मग आडनावाची चार अक्षरे घेऊन शोधू लागल्यावर एक नाव समोर आलं.

मालती माहेरचं आडनाव सासरचं आडनाव.
खाली कंसात आणखी एक नाव हे बहुतेक लग्नानंतरचं असेल.

चेहरा बदलला असला तरी माझ्यासाठी तो ओळखीचा होता. डोळ्यात तीच चमक होती.
मी म्हणालो हीच.

मग नातू म्हणाला "आबा आता काही टेण्शन घेऊ नका"
मी म्हणालो कि बाळा ही गंमत अजून कुणाला सांगायची नाही, बरं का?

आठवड्याने नातवाने मला तिचा पत्ता, फोन नंबर सगळं दिलं.
मी आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहीलो. इतकी वर्षे झाली याने काही क्षणातच पत्ता सुद्धा काढला.

नातवाला एक छानशी गिफ्ट दिली. सूनबाई यावरून डाफरणार हे माहीत होतं. पण सीक्रेट लीक होऊ नये यासाठी ही लाच देणं गरजेचं होतं.

मग स्कूटर काढून निघालो.
पत्ता सहकारनगरचा होता. खुणा बघत बघत एकदाचा पत्ता मिळाला.

थेट जावं कि फोन करावा?
फोन नवर्‍याने घेतला तर?

शेवटी हिय्या करून दरवाजा ठोठावला.
एका लहान मुलीने दरवाका उघडला.

"कोण पाहीजे तुम्हाला?"
मी नाव सांगितलं. ती ओरडतच गेली , आज्जी एक आजोबा आलेत तुझ्याकडे.

मी आजोबा दिसतो का? असं मनात आलं. पण आता नातू मलाही होताच. तसे आताचे हिरो या वयातही तिसरं लग्नं करतात.

ती व्हरांड्यात आली. माझ्याकडे बघतच राहिली.
आणि मग दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या नात्याला नाव नव्हतं.

एकदाची तिची भेट झाली.
आम्ही काहीही बोललो नाही. पण फोन नंबर घेतले.

मग फोनवर मात्र भरपूर गप्पा व्हायच्या.

अशीच पुन्हा काही वर्षे गेली.
तिचे पतीदेव निवर्तले. तेव्हां तिला भेटायला गेलो.

मुला बाळांनी स्वागत केलं.
त्यानंतर आजतागायत त्या घरी चक्कर टाकली नाही असे झालेले नाही. आता तर पणतूही असतो सोबत.

तो तिला मालती आजी म्हणतो. ती त्याच्या हातावर खाऊ ठेवते.
नात सून ओरडेल म्हणून येतानाच संपवायला त्याला सांगतो.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे.
त्या काळातील कॉलेजमधील वातावरण इमॅजिन केले.